विनोबांची ‘गीता प्रवचने’ व ‘स्थितप्रज्ञदर्शन’

‘गीता प्रवचने’ यातील ‘अध्याय पहिला’ या प्रवचनात विनोबा म्हणतात, “तर्काला छाटून श्रद्धा व प्रयोग या दोन पंखांनीच गीतेच्या गगनात मी यथाशक्ति भराऱ्या मारीत असतो.” (गीता प्रवचने, आ. १३, पान १) तर्काला छाटल्यामुळे सत्यशोधन टाळता येते. तर्काला फाटा दिल्यामुळे गीतेतील सर्व प्रतिपादन खरे म्हणून स्वीकारावे लागते, आणि विनोबांनी ते तसे स्वीकारले आहे.

गीता प्रवचनांतील अध्याय २ वरील प्रवचनात विनोबा म्हणतात, “पूर्ण स्थितप्रज्ञ या जगात कोण होऊन गेला ते हरीलाच माहीत”. (गीता प्रवचने, आवृत्ती १३, पान २४) परंतु स्थितप्रज्ञदर्शनामध्ये विनोबा म्हणतात, “बुद्धी कोणाच्या ठिकाणी कमी असो, कोणाच्या ठिकाणी अधिक असो, त्याचे महत्त्व नाही. महत्त्व आहे स्वच्छ बुद्धीचे. अग्नीची एक लहानशी ठिणगी असली तरी ती कार्यकारी होऊ शकते. ती कापसाच्या ढिगाला जाळू शकते. उलटपक्षी, भला मोठा कोळसा असला तरी तो दबून जातो. बुद्धीच्या कमीजास्तपणाचा प्रश्न नाही. निखळ बुद्धीची एक लहानशी ठिणगी, एक लहानशी ज्योत असली तरी पुरे. बुद्धीच्या शक्तीची हीच खुबी आहे. एखाद्या अल्पबुद्धी माणसाला राष्ट्राचा कारभार चालविण्याचे नेतृत्व साधणे संभवनीय होणार नाही. पण अगदी अल्पबुद्धीच्या आणि अशिक्षित माणसालाही या जन्मात स्थितप्रज्ञ होण्याची शक्यता निःसंशय आहे. त्याला भाराभर बुद्धीची गरज नाही. प्रज्ञेची एक ठिणगी पुरे.” (स्थितप्रज्ञदर्शन, आवृत्ति ६, पान ८).

विनोबांच्या म्हणण्याप्रमाणे अशिक्षित माणसाला स्थिप्रज्ञ होता येणे शक्य आहे असे गृहीत धरले तरी अशा स्थितप्रज्ञाचा समाजाला कोणता उपयोग? खुद्द विनोबासुद्धा स्थितप्रज्ञ होऊ शकले नाहीत. म्हणूनच त्यांचा समाजाला उपयोग होऊ शकला. सर्वंकष क्रांतीची चळवळ चालू असतांना त्या क्रांतीचे प्रणेते जयप्रकाश नारायण विनोबांना भेटण्यास गेले तेव्हा त्यांना विनोबांनी “भाई, रणछोडदास बनों” असा संदेश दिला होता. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर जुलै महिन्यात इंदिरा गांधी प्रथमच दिल्लीच्या बाहेर पडून विनोबांच्या आश्रमात गेल्या. विनोबांनी त्यांना “चरैवेति, चरैवेति” असा संदेश दिला. जयप्रकाशजींना व इंदिराजींना विनोबांनी दिलेले संदेश त्यांच्या त्यांच्या स्वभावधर्मानुसार अयोग्य होते असे कोणी म्हणणार नाही. सांगायचा मुद्दा म्हणजे विनोबा स्थितप्रज्ञ असते तर कोणालाच संदेश देण्याच्या भानगडीत पडले नसते. जी गोष्ट विनोबांनासुद्धा साध्य करता आली नाही ती गोष्ट अल्पबुद्धी अशिक्षित माणसाला कशी काय साध्य होऊ शकेल?

गीतेमध्ये हिंसेला देण्यात आलेल्या चिथावणीबत प्रा. डी. डी. कोसंबी म्हणतात, “भगवद्गीतेमध्ये जितकी युद्धाला चिथावणी दिलेली आहे व निरर्थक मनुष्यहत्येच्या समर्थनासाठी जितके प्रशस्त युक्तिवाद केलेले आहेत त्यांच्याशी थोडीशी देखील तुलना होईल असे लिखाण कोणत्याही मार्क्सवादी ग्रंथात सापडणार नाही.” ‘गीतेतील नीतिशास्त्र’ (उत्तरार्ध) यात लेखाच्या उपसंहारात प्रा. दि. य. देशपांडे म्हणतात “एवढ्या मोठ्या देशात सर्वांनी उठावे आणि गीतेला डोक्यावर घेऊन नाचत सुटावे ही गोष्ट येथील लोकांच्या बुद्धिमत्तेला अभिमानास्पद आहे काय याचा विचार आपण केला पाहिजे.”

‘तातस्य कुपोयमिति बुवाणो, क्षारं जलं कापुरुषाः पिबन्ति’ या वृत्तीचे बहुसंख्य लोकच फक्त गीतेला डोक्यावर घेऊन नाचत सुटतात. सर्व लोक नव्हेत!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.