कामवासना आणि नीती

जेथे जेथे दोन किंवा अधिक व्यक्तींचा परस्परसंबंध येतो तेथेच नीतीचे प्रश्न उपस्थित होतात, व कामवासना नैसर्गिक रीतीने तृप्त करण्यास प्रत्येकास अन्यलिंगी व्यक्तीची जरूर असते, यामुळे याबाबतीत नीतीचे प्रश्न नेहमीच येतात. अर्थात एवढ्याच दृष्टीने पाहिल्यास असे म्हणता येईल की दोन व्यक्तींची जर संमती असेल, व एकापासून दुसर्‍यास कोणत्याही रोगाचा नकळत संसर्ग होण्याचा संभव नसेल, तर त्यांच्या समागमास हरकत नाही. नकळत म्हणण्याचे कारण कित्येक वेळा दुसर्‍यापासून संसर्गाचा संभव आहे हे माहीत असताही लोक समागमास उद्युक्त होतात, परंतु ते आपले स्वतःचे नुकसान करून घेतात व यात कोणावरही अनीतीचा आरोप करता येणार नाही. तथापि ही दृष्टी दोन व्यक्तींपुरतीच झाली. समाजाच्या दृष्टीने विचार केल्यास असे म्हणावे लागते की अशा रीतीने स्वतःचे नुकसान करून घेणारा मनुष्य रोगप्रसारास मदत करतो; कारण त्याने जरी दुसर्‍या कोणाशी समागम करून प्रत्यक्ष रोगाचा प्रसार केला नाही, तरी तो अप्रत्यक्ष रीतीने त्याच्यापासून दुसर्‍यास लागण्याचा संभव राहतोच, यामुळे ज्या समागमाने एकापासून दुसर्‍यास कोणताही रोग लागतो, तो अनीतीचा समजला पाहिजे, त्याचप्रमाणे ज्या समागमापासून अनिष्ट संतती उत्पन्न होते तोही अनीतीचाच होय. हे दोन्ही नियम इतरांप्रमाणेच पतिपत्नींच्या समागमासही तितकेच लागू आहेत हे लक्षात ठेवण्यासारखे आहे.