प्रा. काशीकरांचा नवविवेकवाद!

गीतेवरील माझ्या लेखावर प्रा. श्री. गो. काशीकर यांनी घेतलेल्या आरोपांना मी जे उत्तर दिले ते त्यांना पटले नसून त्यांनी आता नवविवेकवादाची गरज आहे’ या शीर्षकाचे प्रत्युत्तर पाठविले आहे. हे प्रत्युत्तर या अंकात अन्यत्र छापले असून त्याबद्दलची माझी भूमिका येथे देत आहे.
प्रथम मी प्रा.काशीकरांचे आभार मानतो, कारण त्यांनी एका गोष्टीकडे माझे लक्ष वेधले आणि माझा एक गैरसमज दूर केला. माझी अशी समजूत होती (आणि अजूनही बर्या च प्रमाणात आहे) की विश्वाची उत्पत्ती हा विषय वैज्ञानिक पद्धतीच्या आटोक्यात नाही. काही वैज्ञानिक विश्वरचनेच्या (cosmology) क्षेत्रात काम करीत आहेत हे मला माहीत होते. तसेच विश्वाच्या उत्पत्तीच्या Big Bang उपपत्तीविषयीही मी ऐकले होते. परंतु या विषयात speculation ला, वितर्काला खूप वाव आहे, आणि म्हणून वैज्ञानिक पद्धतीने त्याचा शोध लागणे दुरापास्त आहे असे माझे मत झाले होते. विशेषतः (Big Bang) ने विश्वाची उत्पत्ती झाली आहे, असे असेल तर त्याच्यापूर्वी काय होते हा प्रश्न शिल्लक राहतो असे मला वाटते. परंतु काशीकरांचे पत्र आल्यावर मी तपास केला तेव्हा मला असे आढळून आले की cosmology बरोबरच cosmogony (विश्वोत्पत्तिशास्त्र) च्या क्षेत्रातही अनेक थोर शास्त्रज्ञ काम करीत आहेत, आणि त्यांत विशेषतः Stephen Hawking या शास्त्रज्ञाने खूपच प्रगती केली आहे असे मानले जाते. ही गोष्ट माझ्या लक्षात आणून दिल्याबद्दल मी प्रा. काशीकरांचे आभार मानतो.
परंतु astrophysics मधील संशोधकांनी एकोणिसाव्या शतकातील विज्ञानावर आधारलेला विवेकवाद आता कालबाह्य झाला आहे, विसाव्या शतकातील विज्ञान अध्यात्माच्या जवळ आले आहे, आणि आता अध्यात्मशास्त्राशी जवळीक असलेला नवा विवेकवाद आपण स्वीकारला पाहिजे इत्यादी जे निष्कर्ष प्रा. काशीकरांनी काढले आहेत ते बहुतांशी निराधार आहेत असे मला म्हणायचे आहे. त्यांच्या लेखातील वैज्ञानिक शोधांविषयी त्यांनी केलेले दावे कितपत बरोबर आहेत यांचा शोध घेणारा आमचे मित्र डॉ. पु. वि. खांडेकर या भौतिकीच्या ज्येष्ठ प्राध्यापकांनी लिहिलेला एक लेख याच अंकात छापला आहे. त्याकडे मी वाचकांचे लक्ष आकृष्ट करतो, आणि प्रा. काशीकरांच्या आरोपांना माझ्या समजुतीप्रमाणे उत्तरे देतो.
विसाव्या शतकात विज्ञानाच्या स्वरूपात मोठे बदल झाले आहेत हे प्राः काशीकरांचे म्हणणे मला अर्थातच मान्य आहे. उदा. न्यूटनचे mechanics आला मागे पडले असून एका नवीन mechanics ने त्याची जागा घेतली आहे. या शतकाच्या आरंभी प्रकाशाचा वेग विश्वात सर्वात अधिक आहे, एवढेच नव्हे तर त्याहून अधिक वेग अशक्यआहे हा सिद्धांत प्रस्थापित झाला आणि त्यातून आइन्स्टाइनची सापेक्षतेची उपपत्ती उद्भवली. या उपपत्तीनुसार काळ आणि अवकाश ही आतापर्यंत स्वतंत्र मानली गेलेली तत्त्वेआता अवकाशकाळ या एकाच तत्त्वाचे अवकृष्ट ( abstract ) घटक आहेत हे मत प्रस्थापित झाले. त्यातून युगपत्त्व ( simultaneity) या संकल्पनेचे परिष्करण करावे लागले, आणि दोन घटना एका काळी घडतात की नाही याचा निश्चय अंशतः निरीक्षकाच्या वेगावर अवलंबून असतो असे सिद्ध झाले. पूर्वी वस्तुमान (mass) आणिऊर्जा (energy) ही दोन वेगळी तत्त्वे मानली जात. आइन्स्टाइनने दाखवून दिले की ह्या दोन तत्त्वांची परस्परात रूपांतरे होतात. परंतु नवे शोध येथेच थांबले नाहीत. परमाणूहून लहान अशा सूक्ष्माकार क्षेत्रात या शास्त्रात अनिश्चिततेच्या तत्त्वाचा (uncertainty principle) शोध लागला. या नियमानुसार इलेक्ट्रॉनचे स्थान आणि वेग ही दोन्ही एकाच वेळी मोजता येत नाहीत. म्हणजे इलेक्ट्रॉनचे भ्रमण अंशतः तरी अनियमित असते. या शोधाने शतकानुशतके चालत आलेल्या नियतिवादी (determinism) तत्त्वाचा त्याग करणे भाग होते.
हे सर्व बदल फार मोठे आहेत, भौतिकीच्या क्षेत्रात उलथापालथ करणारे आहेत, यात शंका नाही. पण त्यामुळे विज्ञानाच्या कार्यपद्धतीत आणि वैज्ञानिक वृत्तीत काही बदल घडले आहेत असे म्हणता येत नाही. हे नवे शोध लागले ते जुन्याच वैज्ञानिक पद्धतीच्या संशोधनाने निरीक्षण, उपन्यास (hypothesis) -रचना त्याचा निगामी विकास आणि त्याचे परीक्षण- त्याचे सत्यापन किंवा असत्यापन- हीच रीत अजून वापरात आहे. ही रीत टाकून देऊन वैज्ञानिक आता ध्यानधारणा करू लागले आहेत असे म्हणणे चूक होईल. आणि म्हणून वैज्ञानिक रीत आणि वैज्ञानिक वृत्ती यांच्यावर आधारलेला विवेकवाद कालबाह्य झाला आहे, आणि आता नवविवेकवादाची गरज निर्माण झाली आहे असे म्हणणेही चुकीचे होणार आहे.
तेव्हा प्रा. काशीकरांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ कोणती कारणे दिली आहेत किंवा कोणते युक्तिवाद केले आहेत ते आता पाहू.
प्रा. काशीकर लिहितात : ‘विसाव्या शतकात विज्ञानाच्या स्वरूपात बरेच बदल झाले आहेत. त्यांची दखल प्रा. देशपांडे यांनी घेतलेली दिसत नाही. परंतु पुढच्या परिच्छेदात ते या बदलाची माहिती न देता तेथे ते एक नवाच विषय चर्चेला घेतात. ते म्हणतात, ‘विज्ञानाची अध्ययनपद्धती विश्लेषणात्मक असते. तीत एखाद्या वस्तूला किंवा तिच्या भागाला इतर सर्व वस्तूंपासून किंवा वस्तूच्या इतर सर्व भागांपासून अलग करून त्याचे परीक्षण केले जाते. अशा अध्ययनातून होणारे ज्ञान पूर्णांशाने यथार्थ असत नाही. अशा ज्ञानाच्या उपयोजनातून घातक पाश्र्वपरिणाम (side effects) निर्माण होतात. यांचा संकलित परिणाम म्हणून सर्वसंहारक अशा पर्यावरण-संतुलन-नाशाचे महाभयानक संकट मानवजातीपुढे उभे ठाकले आहे.
विज्ञानाची पद्धत विश्लेषणाची आहे, त्यामुळे त्याचे निष्कर्ष पूर्णांशाने खरे नसतात असे प्रा. काशीकर म्हणतात. आता कोणत्याही विषयाचा अभ्यास करावयाचा म्हणजे त्याच्या अंगोपांगांचा अभ्यास करावा लागतो; पण नंतर अंगोपांगांच्या माहितीचे संश्लेषणही केले जाते आणि सबंध विषयाचे व्यापक दर्शन घडविले जाते. विशेषतः सतत अधिकाधिक व्यापक नियम शोधण्याची विज्ञानाची पद्धत एकांगी आहे असे म्हणणे विपर्यस्त दिसते. संकुचित नियम व्यापक नियमात समाविष्ट केले गेल्यामुळे समावेशक असे दर्शन प्राप्त होते. विज्ञानात कोठेही परस्परविरुद्ध विधाने येत नाहीत; विज्ञानाच्या एका शाखेत प्रस्थापित झालेले ज्ञान अन्य सर्व शाखांतील ज्ञानाच्या अविरोधी असते, एवढेच नव्हे तर सबंध विज्ञान हे एकसंध, सुसंगत व्यवस्था असली पाहिजे अशी सतत धडपड असते.
बरे, विज्ञानाची पद्धत विश्लेषणात्मक आहे हे क्षणभर मान्य करू या.प्रा. काशीकर म्हणतात की अध्यात्माच्या संश्लेषणात्मक पद्धतीची जोड तिला दिली की पूर्णपणे सत्य असे विज्ञान आपल्याला प्राप्त होईल. पण अध्यात्माची पद्धत संश्लेषणात्मक असते म्हणजे काय? ध्यानधारणा करणे ही अध्यात्माची पद्धत. तिने संश्लेषण कशाचे होतेआणि कसे? उदा. आइन्स्टाइनची सापेक्षतेची उपपत्ती आणि प्लांकची क्वाँटम उपपत्ती यांत मेळ घालण्याच्या प्रयत्नांत अध्यात्म उपयोगी पडू शकेल काय?अध्यात्माने असे वैज्ञानिक सिद्धांतांचे संश्लेषण केल्याचे एखादे उदाहरण ते देतील काय?
वरील उतार्‍यात प्रा. काशीकर असेही म्हणतात की विज्ञानाच्या विश्लेषणात्मक अभ्यासपद्धतीमुळे पर्यावरणनाशाचे संकट निर्माण झाले आहे. हे म्हणणे तर फारच असंबद्ध दिसते. विश्लेषणात्मक पद्धती आणि पर्यावरणनाश यांचा अर्थाअर्थी कसलाच संबंध दिसत नसताना प्रा.काशीकर सरळ एकीमुळे दुसरे घडले आहे असे कसलेही समर्थन न देता म्हणतात हे चमत्कारिक वाटते.
बरे ते असो, पर्यावरणनाशाला विज्ञान जबाबदार आहे असे म्हणण्याकरिता प्रा. काशीकरांजवळ काय कारणे असतील ती असोत. ती ते सांगेपर्यत आपणच काही हाती लागतात का याचा शोध करू या. मोठ्या प्रमाणात झालेली जंगलतोड, रासायनिक खतांचा बेबंद उपयोग, अणुशक्तीचा गैरवापर इत्यादी गोष्टींमुळे पर्यावरणाचा तोल बिघडला आहे. हे खरे आहे, परंतु या गोष्टी विज्ञानाचे पार्श्वपरिणाम आहेत हे म्हणणे कितपत सयुक्तिकआहे? वैज्ञानिकाचे कार्य विज्ञान गोळा करणे. ते जीवनाच्या विविध शाखांत वापरणे हे विज्ञानाचे काम नव्हे. विज्ञानाच्या वापरातील धोके, खाचखळगे यांची कल्पना देणे वैज्ञानिकाचे काम आहे. पण स्वार्थी, अदूरदर्शी, बेजबाबदार राज्यकर्त्यांनी आणि उद्योगपतींनी त्याचा दुरुपयोग करून मानवजातीवर संकटे आणली तर त्याचा दोष विज्ञानाला कसा देता येईल? एका दूरान्वयाने विज्ञानाचा दुरुपयोग हा विज्ञानाचा पार्श्वपरिणाम म्हणता येईल; म्हणजे अशा अर्थाने की जर मुळात विज्ञानच नसते त्याचा दुरुपयोग झाला नसता.. पण दुरुपयोग होणार आहे म्हणून विज्ञानाच टाकून द्यायचे हा मार्ग शहाणपणाचा खास नव्हे. तेव्हा विज्ञानाच्या विश्लेषणात्मक पद्धतीमुळे पर्यावरणनाशाचे संकट उद्भवलेले आहे हे म्हणणे बरोबर नाही.
पुढच्याच परिच्छेदात विज्ञानाची आणखी एक उणीव प्रा. काशीकर सांगतात. ते म्हणतात की विज्ञानात मूल्यांना स्थान नसते, आणि वैज्ञानिक ज्ञान हेच खरे ज्ञान मानले गेल्याने मूल्यांचा र्हािस होत आहे. त्यामुळे मानवापुढे नैतिक विनाशाचेही संकट उभेराहिले आहे.
विज्ञानात मूल्यांना स्थान नसते हे म्हणणे बरोबर आहे. ज्ञानात मूल्यविचार असूच शकत नाही. उदा. गणितात मूल्यविचार नाही ही तक्रार कितपत समंजसपणाची आहे? विज्ञानाची दृष्टी विश्वाचे सत्य ज्ञान प्राप्त करण्याची आहे. त्याने प्राप्त झालेले ज्ञान सत्य आहे की नाही एवढेच फक्त विचारणे बरोबर आहे, विज्ञान ननैतिक आहे. हे सर्वच ज्ञानाला लागू आहे. अर्थात विज्ञान ननैतिक असले तरी वैज्ञानिक ननैतिक नाहीत हे मान्य केले पाहिजे. त्यामुळे प्राप्त ज्ञानाचा दुरुपयोग स्वतः न करणे आणि इतरांना त्यापासून परावृत्त करणे हे त्यांचे कर्तव्य ठरते. परंतु त्यांनी हे कर्तव्य केल्यानंतर त्यांना न जुमानता जर कोणी विज्ञानाचा संकुचित स्वार्थांकरिता दुरुपयोग करीत असेल तर त्याचा दोष विज्ञानाला लावता येणार नाही. हे सर्वच ज्ञानाला लागू आहे. उदा. अतिशय अपयुक्त अशा औषधिशास्त्रालाही, वैद्यकशास्त्रालाही ते लागू आहे. कारण त्या शास्त्राचा उपयोग कोणी प्राण वाचविण्याकरिता न करता प्राणहरणाकरिता करू शकेल, आणि त्याकरिता वैद्यकशास्त्राला जबाबदार धरणे चुकीचे होईल.
वरील परिच्छेदानंतरच्या परिच्छेदात प्रा. काशीकर आणखी एक मुद्दा मांडतात. ते म्हणतात की विज्ञानामुळे वस्तुजाताचे ययार्थ ज्ञान होते या श्रद्धेलाही तडा जाऊ लागला आहे. आणि या मताच्या पुष्ट्यर्थ ते उदाहरण देतात कावळ्यांच्या रंगाचे. ते म्हणतात की कावळ्यांना आपण पृथ्वीभोवतालच्या प्रकाशात पाहतो, त्यात ते आपल्याला काळे दिसतात म्हणून आपण त्यांना काळे म्हणतो. आपण त्यांना वेगळ्या प्रकाशात पाहिले असते तर ते आपल्याला वेगळ्या रंगाचे दिसले असते. त्यामुळे कावळ्यांचा खरा रंग कोणता हा प्रश्न अनिर्णीत राहतो असे प्रा. काशीकर म्हणतात.
पण त्यांचे हे सबंध विवेचन वैज्ञानिक उपपत्तींच्या अज्ञानावर आधारलेले आहे. विज्ञानाच्या सिद्धांतानुसार पदार्थाचे रंग हे वस्तुगत गुण नाहीतच मुळी. रंग संवेदनगत असतात, किंवा रंगाच्या संवेदना असतात. परंतु ज्याला आपण रंग म्हणतो त्याचा आधारभूत गुण वस्तूत असतो. तो गुण म्हणजे त्या वस्तूची आण्विक रचना. त्या रचनेमुळे प्रकाशकिरणांपैकी विशिष्ट लांबीच्या लहरींचे परिवर्तन होते, आणि त्या लहरींचा संबंध आपल्या डोळ्यांशी आला की आपल्याला दृक्संवेदन होते. तेव्हा कावळ्याचा रंग कोणता, म्हणजेच त्याची आण्विक रचना, विज्ञानाला माहीत नाही असे म्हणणे बरोबर नाही.
वस्तुतः कावळे काळे आहेत किंवा सर्व कावळे काळे आहेत हे उदाहरण सामान्यपणे या संदर्भात दिले जाते. (आणि मी स्वतः ते अनेकदा दिले आहे) ते उद्गमनाचे उदाहरण म्हणून. वैज्ञानिक ज्ञान सार्विक असते, म्हणजे एखाद्या प्रकारच्या सर्व वस्तूंसंबंधाने ते असते. विशिष्ट वस्तूंच्या ज्ञानाला विज्ञान म्हणत नाहीत. आता असेसार्विक ज्ञान आपल्याला कसे मिळू शकेल हा प्रश्न उद्भवतो, कारण निरीक्षणाने आपल्याला विशिष्ट वस्तूंचेच ज्ञान होते. निसर्गात सामान्य असे काही नसते. तेव्हा विशिष्ट वस्तूंच्या ज्ञानावरून सामान्य सार्विक ज्ञान कसे मिळू शकेल असा प्रश्न उद्भवतो. त्याला उत्तर आहे- उद्गमनाने ( induction) किंवा सामान्यीकरणाने (generalisation). एखाद्या प्रकारच्या काही वस्तूंचे निरीक्षण करून (कारण सर्व वस्तूंचे निरीक्षण आपण कधीच करू शकत नाही सर्व वस्तूंत वर्तमान वस्तूंबरोबर भूत आणि भविष्य वस्तूही येतात) त्यात अमुक एक धर्म आहे हे पाहून त्यावरून तो धर्म त्या प्रकारच्या सर्व वस्तूंत असावा असे अनुमान करण्याला उद्गामी अनुमान म्हणतात. ही क्रिया उघडच अवैध आहे; काहींवरून सर्वांचे अनुमान करणे धोक्याचे असते. परंतु आपल्याजवळ तिच्याखेरीज अन्य कोणताही उपाय नाही. म्हणून हाच उपाय खबरदारीने, अतिशय काळजीपूर्वक वापरणे एवढेच आपण करू शकतो. विज्ञानही तेच करते.
याप्रमाणे विसाव्या शतकात विज्ञानात घडून आलेले बदल आणि त्यामुळे वैज्ञानिक ज्ञानावरील श्रद्धेला गेलेला तडा या सदराखाली प्रा. काशीकरांनी सांगितलेल्या तिन्ही गोष्टी गैरसमजावर आणि वैचारिक गोंधळावर आधारलेल्या आहेत असे म्हणावे लागते.
प्रा. काशीकर पुढे म्हणतात की विज्ञानाची पद्धत विश्लेषणात्मक असल्यामुळे तिला साकल्याने विचार करण्याच्या अध्यात्माच्या संश्लेषणात्मक पद्धतीची जोड दिली जावी असा विचार आता पुढे येऊ लागला आहे. श्रेष्ठ वैज्ञानिकही आता अध्यात्माची भाषा बोलू लागले आहेत. तिचा आपण अधिक्षेप करणे बरोबर नाही असे ते म्हणतात.
आता या बाबतीत पुढील स्पष्टीकरणे अवश्य आहेत. विश्वाचे ज्ञान मिळविण्याचा दावा अध्यात्माचाही आहे असे ते म्हणतात, आणि विज्ञानाची पद्धत विश्लेषणात्मक, तर अध्यात्माची पद्धती संश्लेषणात्मक आहे असे ते सांगतात पण म्हणजे काय हे ते सांगत नाहीत. अध्यात्मात कशाचे संश्लेषण केले जाते. सर्व खलुइदं ब्रह्म’ आणि अशा प्रकारच्या अन्य वाक्यांत ते व्यक्त होते असे त्यांना अभिप्रेत असेल तर हे संश्लेषण अगदीच पोकळ आहे असे म्हणावे लागेल. सर्व वस्तू ब्रह्मच आहेत हे म्हणणे अतिशय अर्थपूर्ण भासत असेल, पण स्पष्टच सांगायचे तर ते निरर्थक आहे. त्याला कसलाही सुसंगत आणि महत्त्वाचा अर्थ देणे शक्य नाही.
तसेच आता विज्ञानाने अध्यात्माची जवळीक करावी असे म्हणणारे कोण श्रेष्ठ वैज्ञानिक आहेत आणि त्यांचे म्हणणे नेमके काय आहे याविषयी प्रा. काशीकर काहीच सांगत नाहीत. तसेच असे जे वैज्ञानिक आहेत त्यांच्याविषयी समस्त वैज्ञानिक जगताची प्रतिक्रिया काय आहे याही बाबतीत ते मौन पाळतात.
प्रा. काशीकरांनी Stephen Hawking या खगोल भौतिकीतील विख्यात वैज्ञानिकाच्या संशोधनाचा हवाला दिला आहे. ते म्हणतात की हॉकिंगच्या अनेक सिद्धांतांचे भारतीय अध्यात्मशास्त्रातील सिद्धान्तांशी विलक्षण साम्य आहे. ही सर्व साम्यस्थळे केवळ वरवरची, अपघातात्मक, केवळ शाब्दिक आहेत हे दाखविणारा डॉ.पु. वि. खांडेकर या भौतिकीच्या ज्येष्ठ प्राध्यापकांचा लेख याच अंकात छापला आहे. त्यात या तथाकथित साम्यांचा फोलपणा स्पष्ट केला आहे. परंतु त्या भारतीय अध्यात्मातील कल्पनांविषयी मीही बरेच सांगू शकतो. ते येथे सांगतो.
प्रा. काशीकरांनी हॉकिंगच्या A Brief history of Time या पुस्तकातून त्यांची काही मते उद्धृत केली असून त्यांची तुलना भारतीय अध्यात्मशास्त्रातील काही कल्पनांशी केली आहे. विश्वाचा शून्यापासून अनंतापर्यंत होणारा विस्तार आणि परत शून्यापर्यत होणारा संकोच असे विश्वाविषयीचे मत हॉकिंगने मांडले आहे. त्यामुळे विश्वाला आरंभ नाही आणि अंतही नाही, आणि म्हणून ईश्वराला त्यात काही जागाच नाही असे हॉकिंग म्हणतात. ईश्वराचे प्रयोजन नाही या म्हणण्याने प्रा. काशीकर डगमगत नाहीत. ते म्हणतात की भारतीय अध्यात्मशास्त्रात सनातन ब्रह्माची कल्पना आहे. ते सत् आहे, चित् आहे, आणि आनंदही आहे. ते पूर्ण आहे आणि शून्यही आहे, ते अणोरणीयान् आहे आणि महतोमहीयान् सुद्धा आहे. त्यातूनच एकोहं बहु स्याम्’ या तत्त्वानुसार संपूर्ण विश्व निर्माण झाले व त्यानेच ते व्यापले आहे. हॉकिंगने सांगितलेले आधुनिक विज्ञानाचे स्वरूप अशा रीतीने भारतीयअध्यात्मशास्त्राच्या जवळ आले आहे.
प्रा. काशीकरांच्या या दाव्याविषयी मला काय म्हणायचे आहे? खरे सांगायचे तर मला त्यात कसलेच साम्य दिसत नाही. ब्रह्म सनातन आहे, असे म्हणतात ते खरे आहे. ते पूर्ण आहे असेही म्हणतात. परंतु ते शून्यही आहे असे कोठे म्हटले आहे?ब्रह्माचे वर्णन ‘शून्य’ असे केल्याचे माझ्या ऐकिवात नाही. बरे, हे ब्रह्म अणोरणीयान् आणि महतो महीयान् ही आहे असे प्रा. काशीकर म्हणतात. एकच गोष्ट दोन्ही कशी असू शकेल हे सांगणे कठीण आहे. पण आपण तिकडे दुर्लक्ष करू या, आणि आधुनिक विज्ञानाच्या कोणत्या सिद्धांताशी ही कल्पना तुल्य आहे याचा तपास करू. प्रा. काशीकर म्हणतात, की ‘एकोऽहम् बहुस्याम् या तत्त्वानुसार त्या ब्रह्मातून सबंध विश्व निर्माण झाले ‘एकोऽहम् बहुस्याम् हे कोणते तत्त्व आहे? त्याला तत्त्व म्हटल्याने सृष्टीच्या उत्पतीचा कोणता उलगडा होतो? खरी गोष्ट तर अशी आहे की ब्रह्मातून जगाची उत्पत्ती वस्तुतः होतच नाही, तो जीवात्म्याला होणारा केवळ भास असतो. शुद्ध सत्स्वरूपी ब्रह्माखेरीज विश्वात आणखी काहीच नाही; ते अद्वितीय असे एकमेव तत्त्व आहे. म्हणून ब्रह्म मानणार्‍या दर्शनाला अद्वैत वेदान्त म्हणतात. आता हे खरे आहे की हे तथाकथित शुद्ध अद्वैत शुद्ध नाही; कारण त्याला मायानामक दुसर्या. एका तत्त्वाची जोड आहे. हे तत्त्व कसे आहे? ते सत् ही नाही आणि असत् ही नाही; ते सदसद्भ्यां अनिर्वचनीयम् असे आहे. जे आहे असेही म्हणता येत नाही, आणि नाही असेही म्हणता येत नाही अशा पदार्थाच्या कल्पनेचा उपयोग ज्या तत्त्वज्ञानात केला जातो ते गहन आहे खरे, पण ते फारसे समाधानकारक आहे असे म्हणता येत नाही. महत्त्वाची गोष्ट अशी की ब्रह्मातून जगाची उत्पत्तीही होत नाही, आणि त्यात ते लोपही पावत नाही. सर्ग आणि प्रलय ह्या दोन्ही गोष्टी खर्याअ नाहीत. परंतु विश्वाचा विस्तार खरोखरच होत आहे; आणि पुढेमागे त्याचा संकोच झाला तर तोही खराच संकोच होईल. संकोचाचा केवळ भास होणार नाही.
जेव्हा बुद्धिमान माणसे सृष्टीच्या उत्पतीविषयी विचार करतात तेव्हा साहजिकच त्याना अनेक कल्पना सुचतात. त्या अनेक कल्पनांपैकी कोणती वास्तव आहे याचे सत्यापन करण्याचे उपाय अध्यात्माजवळ नाहीत. आणि अध्यात्मे अनेक असल्यामुळे प्रत्येक अध्यात्म आपली कल्पना हीच एकमेव सत्य आहे असे मानते; भिन्न अध्यात्मांची एकवाक्यता करण्याचा प्रयत्न कोणी करीत नाही. परंतु तत्त्वज्ञांनी स्वैर कल्पनाविलासातून पुरविलेल्या कल्पनांपैकी एखादी कल्पना विज्ञानाने उपन्यास ( hypothesis ) म्हणून स्वीकारली, आणि ती सत्यापनात उत्तीर्ण झाली तर तो एक अपघात असतो. शिवाय ती वैज्ञानिक म्हणून स्वीकारली जाते याचे कारण ती परीक्षणात उतरते हे असते . ती एखाद्या अध्यात्माने सुचविली म्हणून तिचा स्वीकार होत नाही. उदा. प्राचीन ग्रीसमधील एका तत्त्वज्ञाने परमाणुवादाची कल्पना मांडली, किंवा दुसर्यासने मूळच्या एकाच जीवजातीतून अन्य सर्व जीवजाती निर्माण झाल्या हे मत मांडले. पण त्यांचा स्वीकार विज्ञानात केला जाण्यापूर्वी त्यांची अनुभवाच्या पातळीवर कठोर परीक्षा व्हावी लागली. डार्विनने वरील दुसर्याू कल्पनेला मोठ्या परिश्रमाने विज्ञान ही पदवी प्राप्त करून देण्यापूर्वी ती केवळ एक कल्पना होती. अध्यात्मशास्त्रातील अनिर्बध स्वैर वितर्कातून (speculation) उद्भवलेल्या शेकडो कल्पनांपैकी एखादीच विज्ञानाच्या पदवीला पोचते हे लक्षात घेतले म्हणजे अध्यात्मातील कल्पना आणि विज्ञानातील सिद्धान्त यांतील भेद स्पष्ट होतो. भारतीय अध्यात्मशास्त्रातील षड्दर्शनांपैकी कितींच्या जवळ विज्ञान आले आहे हा विचार केल्यास आधुनिक विज्ञान प्राचीन भारतीय अध्यात्माच्याजवळ येत आहे हे म्हणणे सत्यापासून किती दूर आहे हे आपल्या लक्षात येईल.
प्रा. काशीकरांची मुख्य भिस्त ज्या Stephen Hawking या वैज्ञानिकावर आहे त्याचे प्रा. काशीकरांच्या दाव्यांबाबत कायमत आहे हा प्रश्न विचारणे उद्बोधक ठरेल. काही भौतिकीज्ञ असे म्हणू लागले आहेत की आधुनिक विज्ञान आणि प्राचीन भारतीय गूढवाद यांत काही संबंध आहे, आणि काही तर याच्याही पुढे जाऊन पौर्वात्य पद्धतीची ध्यानधारणाही करू लागले आहेत, असे म्हणतात. पण या लोकांसंबंधी हॉकिंगचे मत काय आहे? त्यांचा परिचय करून देणारा John Boslough म्हणतो की अशा लोकांसंबंधी हॉकिंगचे शब्द आहेत : think it is absolute rubbish… Write it down. It is pure rubbish.” हॉकिंग पुढे म्हणतो, “पौर्वात्य गूढवादाचे विश्व म्हणजे एक भ्रम आहे. जो भौतिकीज्ञ आपल्या अभासाला त्याची जोड देतो त्याने भौतिकीला सोडचिठ्ठी दिली आहे असे म्हटले पाहिजे.'( Stephen Howking’s Universe, पृ. ११४)
कोणत्याही काळी कोणत्याही क्षेत्रात काम करणार्‍या लोकांपैकी काही लोक असे असतात की त्यांना विज्ञानाचा कठोर बुद्धिवाद पेलवत नाही. ते चांगले वैज्ञानिक असतात; कारण त्यांच्या आध्यात्मिक मतांचा परिणाम त्यांच्या वैज्ञानिक उपपत्तीवर होत नाही. त्यांची आध्यात्मिक मते स्वतंत्र असतात, ती त्यांच्या वैज्ञानिक संशोधनाचा भाग होत नाहीत. परंतु ती मते व्यक्त केल्यावाचून त्यांना राहवत नाही, १९३५ च्या सुमारास ऑर्थर एडिंग्टन आणिजेम्स जीन्स या दोन थोर वैज्ञानिकांनी आपली आध्यात्मिक मते आपल्या लोकप्रिय ग्रंथांतून व्यक्त केली होती. आणि त्यावेळी विज्ञान अध्यात्माजवळ आले आहे अशी हुल उठली होती. ती लाट नंतर ओसरली. आता ही दुसरी लाट येताना दिसते आहे. पण तिचीही वाट पहिलीसारखीच लागेल यात शंका नाही.
प्रा.काशीकरांच्या लेखात आक्षेप घेण्यासारखे आणखी पुष्कळ आहे. पण मी येथेच थांबतो. त्यांच्या लिखाणातील विचारांचे जे दोष मी दाखवून दिले आहेत. तसेच दोष बाकीच्या लिखाणातही आहेत. त्यामुळे त्यांचा स्वतंत्र समाचार घेण्याची गरज नाही असे मला वाटते. हे उत्तर संपविण्यापूर्वी मी एवढेच म्हणू इच्छितो की प्रा. काशीकरांचा नवविवेकवाद विवेकवादापासूनच फार दूर आहे. हिटलरचा National Socialism सोशलिझमपासून जितका दूर होता, किंवा सोव्हिएट संघातील लोकशाही खर्‍या लोकशाहीपासून जितकी दूर होती, तितकाच त्यांचा नवविवेकवादही खर्‍या विवेकवादापासून दूर आहे. आपल्या विवेकविरोधी मतांना ‘विवेकवाद ‘असे गोंडस नाव दिल्याने त्यातील विवेकविरोध नाहीसा होत नाही हे प्रा. काशीकरांनी लक्षात ठेवावे.