विवाह आणि नीती

बहुजनसमाजास ही नीती अजून कळू लागली नाही, व केवळ विवाहबाह्य समागम म्हणजेच अनीती अशी त्याची समजूत आहे. शास्त्रीयदृष्ट्या विवाहाचा व नीतीचा बिलकुल संबंध नाही; किंबहुना विशिष्ट वयोमर्यादेपुढे पत्नीवर बळजबरी करण्याचा कायदेशीर हक्क पतीस असल्यामुळे, व विवाहबाह्य समागमात बळजबरी कायदेशीर नसल्यामुळे विवाह हीच कायदेशीर अनीतीस सवड आहे. तथापि धार्मिक वेडगळांस हे कळत नाही, व विवाहबाह्य समागम करणारांस सामाजिक त्रास होण्याची खात्रीच असते; कारण समाज कितीही दुबळा असला तरी त्रास देण्याची शक्ती त्याला असते. अर्थात् यामुळे विवाहबाह्य समागम किंवा व्यभिचार बंद झालेला नाही, मात्र तो समाजाच्या नजरेस येणार नाही अशी खबरदारी लोक घेतात इतकेच …… अशा वेळी समागम करणार्‍या पुरुषाच्या पदरात अनीती येते, कारण त्यापासून अशा स्त्रीची समाजात फजीती होईल, इतकेच नव्हे तर तिचे उपजीविकेचे साधन नाहीसे होऊन तिच्यावर वेश्यावृत्तीचा प्रसंग येईल……. या गोष्टी पुष्कळ वेळा केवळ अविचाराने होतात व कामोद्दीप्त स्थितीत विचार करणे कठीण असते हे खरे. परंतु स्त्रीच्या अविचाराचे फळ तिलाच भोगावे लागल्यामुळे आमच्या मते तिची अनीती होत नाही. परंतु पुरुषाच्या कृतीने मात्र त्याचे स्वतःचे नुकसान न होता दुसर्‍याचे होते. यामुळे अशा व्यभिचारात पुरुषाची मात्र अनीती होते. हे मनात असल्यास अशा वेळी देखील विचार करणे सवयीने पुरुषास शक्य होईल असे वाटते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.