हे प्रेतांचे कारखाने थांबवा!

माणूस भोवतालचे जग बदलू शकतो, घडवू शकतो अन् या व्यवहारातूनच स्वतःलाही घडवत जातो. ही माणसाची व्याख्या मानली तर शिक्षणाने माणूस हा माणूस होतो. प्राण्यांच्या पिल्लांना न शिकविता ती अन्न मिळवू शकतात, मोठी होऊ शकतात. पण माणसासारखे जगणे मुळातच शक्य करायला शिक्षण आवश्यक आहे. समाजात वाढताना अनेक मार्गांनी हे शिक्षण आपण शोषत असतो, पण शाळा कॉलेजातल्या शिक्षणाचा त्यात सर्वांत मोठा व महत्त्वाचा वाटा असतो हे उघड आहे.
खरे शिक्षण नेहमी दुहेरी असते. माणूस बाहेरच्या जगाचा एक भाग आहेच, पण तो या जगाचा पूर्ण गुलाम नाही. त्यामुळे त्याची कोणतीही कृती वा शिक्षणही एक दुतर्फी संबंध असेल तरच खऱ्या अर्थी मानवी असेल. मूल म्हणजे एक मातीचा गोळा आहे व त्याला शिक्षणाने आकार द्यायचा आहे. हे मुळातच चूक आहे. मुलाला आकार देतादेताच त्याने स्वतः आपला आकार शोधण्याची, मिळवण्याची प्रक्रिया शिक्षणात चालू राहील तरच ते खरे, चांगले शिक्षण होईल. विद्यार्थी म्हणजे आरसा किंवा ज्ञानरस शोषणारा स्पंज नव्हे. त्याने स्वतः पुढे येऊन ज्ञानाशी हस्तांदोलन केले पाहिजे.
आणि हा स्वतःचा आकार शोधून मिळवण्याची क्षमता असलेलाच माणूस स्वतंत्र असू शकतो. अमुक केल्याने अमुक होते एवढेच बाहेरून त्याच्या मनात जर शिरले तर तो स्वतंत्र होणार नाही. असे अनेक नियम शिकता शिकता त्याला जर मी अमुक करावे, किंवा करीन, अशी निवड सुजाणपणे करण्याची क्षमता आली तरच तो स्वतंत्र होईल. मग केवळ जगाच्या व समाजाच्या नियमांचे तो आंधळे पालन करणार नाही, गुलाम होणार नाही, तर स्वतंत्रपणे निर्णय घेईल, विशिष्ट प्रकारे जगण्याचा प्रयत्न करील. दुसऱ्या शब्दांत, शिक्षणाचा उद्देश माणसाला एखादी फिल्म बनवण्याचा वा खूप माहिती असलेला काँप्युटर बनवण्याचा नाही. त्याला या ज्ञानाच्या आधारे संकल्प करण्याची, स्वप्ने पहाण्याची क्षमता आणून देण्याचाही आहे. योग्य शिक्षण असे दुहेरी असेल.
किंवा आणखी एका दृष्टीने पहायला लागले तर शिक्षण माणसाला सर्जनशील बनवते. आणि सर्जनशीलता ही मानवाची स्वातंत्र्याबरोबरच मूलभूत अशी खूण आहे. शिकवताना मूल व जग यांच्यात एक संबंध जोडला जात असतो. हा संबंध एकतर्फी असेल तर मुलाचे मन एखाद्या आरशासारखे जगातल्या गोष्टी टिपून घेईल, त्याचे फोटो काढून संग्रही ठेवील, पण त्या वस्तूंचे काय करायचे हे त्याला कळणार नाही. मग त्या वस्तूच त्याला हवे तसे वाकवतील, त्याच्यावर ताबा मिळवतील. तो स्वतःलाच हरवून बसेल. ‘या वस्तूंचा ताबा असलेली एक वस्तू’ एवढेच त्याला स्वतःविषयी उमगेल. पण शिक्षण जर खरेच योग्य असेल तर त्यात जो मूल व जगाचा संबंध येतो तो दुतर्फी असेल. जगाविषयी त्याला ज्ञान होईल ते ‘टिपून घेण्या’च्या स्वरूपाचे नसेल, जगाची त्याला ‘समज येईल’ – म्हणजेच जगातल्या वस्तूंबरोबरच, त्या वस्तूंचा व त्याचा जो संबंध आहे तोही तसाच जिवंत रूपात त्याला आकळेल. पर्यायाने या संबंधातून त्याला स्वतःविषयीही जाण येईल आणि ही जाण व जगाविषयीचे ज्ञान यांचा उपयोग करून तो पुन्हा जगाशी नीटपणे, सुशिक्षित संबंध जोडू शकेल. सर्जनाची क्षमता त्याच्यात येईल. पोपटपंची आणि समंजसपणा यात नेमका हा फरक असतो. पहिल्यात माणूस गुलाम असतो, दुसऱ्यात आवश्यकतेचे ज्ञान स्वतंत्रपणे पुन्हा वापरू शकतो. पहिल्यात कृती – कृती उदासीन (पॅसिव्ह) रहातो, दगड रहातो; दुसऱ्यात सर्जनक्षम होतो, माणूस होतो.
एक उदाहरण घ्या. एखाद्या लहान मुलाला एक विषय दिला व चित्र चांगले येईपर्यंत त्याला गिरवायला लावले, तर तो ते चित्र हुबेहूब काढू शकेलही. पण रंगाची, रेषांची जाण त्याला येणार नाही. त्यामुळे त्याला दुसऱ्या एखाद्या वस्तूचे चित्र काढायला सांगितल्यावर त्याला ते येणार नाही. सर्जनशीलता त्याच्यात आलेली नसेल. किंवा आपणहून एखादे चित्र काढायला सांगितले तरी तो जुनेच काढील वा गप्प बसेल. स्वातंत्र्याचा अभाव. आणि तेच चित्र हुबेहूब काढायचाच प्रश्न असेल तर एखादे कॉपी करणारे यंत्रही त्याच्यापेक्षा ते काम चांगले करू शकेलच. मानवीपणाचा नाश होऊन यंत्रवत अवस्था त्याला प्राप्त झाली असेल. उलट एखाद्या मुलीला रंगपेटी घेऊन मोकळे सोडले तर तिला चित्रकलेची जाण अधिक येईल. तिचा हात केवळ तेच गिरवण्याकरता नव्हे, तर वेगळी वळणे सहजपणे शोधण्याकरता समर्थ होईल. तिला एखादे चित्र हुबेहूब काढता येणारही नाही, पण ती जे काढील त्यात तिचे स्वतःचे काही असेल, उत्फुल्लता असेल. जे येथे खरे आहे तेच तत्त्वज्ञान-आल्जिब्रा किंवा प्रत्येक गोष्टीबद्दल आहे. खरे शिक्षण माणसाला ही क्षमता आणून देते.
आणि यातून आणखी एक मुद्दा स्पष्ट होतो. नवीन शिकण्याची गोष्ट आपल्यासमोर एक चमत्कारिक, विलक्षण वस्तू म्हणून येते. तिच्याविषयी कुतूहल, एक प्रकारची भीती आणि आदरही वाटत असतो – जसा एखाद्या परक्या माणसाबद्दल वाटावा. पण शिक्षणाच्या प्रक्रियेत हा विलक्षणपणा कुठे तरी खोलवर आपल्याला छेडतो, आपण पुढे जाऊन त्या वस्तूला हात लावतो, हाताळतो अन् आपल्यात सामावून घेतो. जणू तिच्यावर विजय मिळवतो व आपल्याला समजेच्या साम्राज्यात तिला खेचून आणतो. त्याचबरोबर त्या वस्तूचे ज्ञान आपल्याला झालेले असते, तिची अंगांगे कळलेली असतात; आणि एका अर्थी आपणच ही अंगांगे तिला प्रदान करून शिकण्यातूनच ती वस्तू घडवलेलीही असते. अनाकलनीय काळ्या गोळ्यातून एक शिल्प घडवलेले असते. ती परकी व्यक्ती आता आपल्यातली झालेली असते. या सबंध प्रक्रियेत एक अचाट आनंद भरलेला आहे. सर्जनाचा आनंद किंवा ‘ज्ञानानंद’ आहे. जर खरोखर मी काही समजून घेऊ शकलो, आपलेसे करू शकलो तर मिळणारे ते समाधान आहे. मग तो एखाद्या गणिताचा सिद्धान्त असो वा कविता वा तत्त्वज्ञान असो.
बोलता बोलता शिक्षणाला आपण बरेच पैलू आतापर्यंत पाडले आहेत. खरे शिक्षण दुतर्फी असते; ते माणसाला स्वतंत्र व सर्जनक्षम करते; खरोखर माणूस करते. अशा शिक्षणाची प्रक्रिया एकाचवेळी वस्तूचा शोध असते व वस्तूची निर्मिती असते, तिच्या परकेपणावरचा विजय असते, आनंददायी असते.
आज शाळा-कॉलेजात शिकणाऱ्या व शिकवणाऱ्यांना हे वरचे सगळे वाचून परीकथा वाचल्यासारखे वाटेल यात शंका नाही. कारण शिक्षण म्हटले की एक भयंकर कंटाळाच डोळ्यांसमोर उभा रहातो. कंटाळा आणि भीती! काहीही नवे शिकायचे म्हटले, नव्या गोष्टींचा विचार करायचा म्हटला म्हणजे आमच्या अंगावर काटा उभा रहातो. आणि हे समजण्यासारखे आहे. आजच्या शाळा-कॉलेजातल्या शिक्षणामुळे ‘शिक्षण’ या गोष्टीचा आनंद वगैरे सोडाच पण एक प्रचंड भय आमच्या मनात साचून राहिलेले असते. पार मरेपर्यंत. नवे काही शिकायचे म्हणजे भय वाटते. त्यात आपल्या ‘चालले आहे ते ठीक आहे’ प्रकारच्या सुरक्षिततेला आह्वान मिळाल्यासारखे वाटते. नवे प्रदेश qजकून घेण्याऐवजी आहे त्याच कोंडवाड्यात कसेबसे चालवणे बरे वाटते. आजच्या शिक्षणाने आनंदाऐवजी भयप्रद स्मृती देण्यात, स्वातंत्र्याऐवजी गुलामीची आवड बाणवण्यात, सर्जनक्षमतेऐवजी मुकाट दगडपणा रुजवण्यात यश मिळवले आहे निःसंशय.
मार्क्सने म्हटले आहे, माणसाकडे किती आहे त्यापेक्षा तो स्वतः किती आहे त्यावर त्याची किंमत अवलंबून असते. शिक्षणाचा पहिल्यापासून शेवटपर्यंतचा उद्देश माणसाची किंमत वाढवणे हा आहे. त्याला आतून समृद्ध करणे आहे. आजच्या शिक्षणामुळे कदाचित माणूस माया जोडू शकेलही, संपत्ती त्याला मिळेलही, पण तो स्वतः समृद्ध होत होत नाही. स्वातंत्र्याचे, सर्जनक्षमतेचे, अफाट जाणिवेच्या साम्राज्याचे धन त्याला मिळत नाही, आनंद मिळत नाही. आत्मविकास वा स्वतःला समृद्ध करून घेणे शक्य आहे हेच माणूस विसरायला लागला आहे.
दुसऱ्या शब्दांत, माणसासारखे जगणेच शिक्षणाने अशक्य करून टाकल्यासारखे झाले आहे. शाळाकॉलेजे म्हणजे फक्त प्रेतांचे कारखाने झाले आहेत! एकीकडून विस्फारल्या डोळ्यांची, कोवळी मुले सरकावयाची की दुसरीकडून चिपाड झालेल्या सांगाड्यांच्या कवायतीच्या कवायती तयार! त्यात इंजिनियर, डॉक्टर, प्राध्यापक, कारकून — सगळे आहेत. समाजाला उपयोगी पडणारेच आहेत. नाहीत फक्त माणसे — जवळून गेले तरी अंगात वीज खेळावी अशी जिवंत माणसे! आणि याची मुळे आजच्या शिक्षणसंस्थांमध्ये, शिकवण्याचे विषय व पद्धतींमध्ये खोलवर गेलेली आहेत.
तीन प्रकारे त्यांचा विचार करू.
एक तर आजच्या शिकवण्याच्या पद्धती एकतर्फी आहेत. विद्यार्थ्याला टिपून घ्यायला लावणाऱ्या, घासायला लावणाऱ्या आहेत. प्रथम पहिलीत कविता पाठ करायला लावण्यापासून (कविता ही पाठ करण्याची गोष्ट आहे हा अत्याचारी विचार फक्त चरक झालेल्या पद्धतीतच शक्य आहे!) ते पदवीपरीक्षांमधल्या सिद्धान्तापर्यंत. आम्हाला चित्रकलेसारखा विषयसुद्धा ‘‘कावळा झाडावर मांसाचा तुकडा घेऊन बसला आहे, कोल्हा खाली आहे, दूरवर उजवीकडे डोंगर आहे : ४५ मिनिटे’’ या पद्धतीने शिकवला गेल्याचे स्मरते. कधी मुलांना घेऊन बाहेर गेलेत, कधी रंग नुसते उधळू दिलेत – हे होत नाही. शास्त्राचे नियमसुद्धा अत्यंत रूक्षपणे पुस्तकातून शिकवले जातात. (विज्ञान म्हणजे एक गद्य गोष्ट आहे हीसुद्धा एक पुराणकथा आहे!) प्रयोगशाळा, विज्ञान-छंद-मंडळे, आणि शिकवतानाही त्या नियमांचा व रोजच्या अनुभवांचा तसेच मोठमोठ्या शोधांचा संबंध जोडून शिकवणे खरे तर प्रभावी ठरेल. खरे पाहता विद्यार्थ्याला स्वतंत्रपणे या नियमांचा ‘शोध’ लावता येण्याकरता वळण दाखवणे, किंता फार तर बोट धरून त्याला नेणे, एवढेच केले पाहिजे. सध्या म्हणजे तय्यार नियम खिळ्यांनी त्याच्या डोक्यावर ठोकून बसवला जातो. त्यामुळे जिवंत समज कधीच येत नाही. साधी गणिते सोडवणे, दिलेल्या विषयावर निबंध लिहिणेसुद्धा त्याला जड जाते. त्याची सर्जनक्षमताच मारली जाते. मग स्वतंत्रपणे नव्या अनुभवांना हाताळणे, आपणहून चित्र काढणे, कविता, वा निबंध लिहिणे, तर अशक्यच आणि याचमुळे परीक्षा – पढवणी – गाइड – स्वातंत्र्य व सर्जनशीलतेचा नाश – परीक्षेचे ओझे – हे दुष्टचक्र सुरू होते. कारखान्याचा एक भाग हा असा असतो.
आजच्या एखाद्या अवाढव्य, अद्ययावत शाळेच्या इमारतीत मधोमध जाऊन ‘ज्ञानानंद’ हा शब्द मोठ्याने ओरडला तर मला वाटते तो कुणालाही चक्क ऐकूच जाणार नाही! शिकण्या-शिकवण्यात आनद असू शकतो हे आज शिक्षक आणि विद्यार्थी दोघे पार विसरून गेले आहेत. उलट विद्यार्थी मारून-मुटकून वर्गात बसतात आणि कधी एकदा शाळा सुटून स्वतंत्र, आनंदी संध्याकाळ सुरू होती आहे ते पहात राहतात! अशा शाळा वा कॉलेजे म्हणजे रूक्ष तुरुंग बनतात. शिकणे म्हटल्याबरोबर कंटाळा अन् धडकी छातीत भरून येतात. वर्ग बुडवणे, लक्ष न देणे, बेशिस्त; सगळ्यांचे हे मूळ आहे. याचाच एक भाग म्हणजे गुरुशिष्य नाते ही सौदेबाजी होते. त्यात ओलावा, आदर शून्य उरतो. एखाद्या सर्जनशील, आनंददायी व्यवहारातच माणसे एकमेकांशी खरे जिव्हाळ्याचे नाते जोडू शकतात. सबंध प्रकियाच तशी नसल्याने हे होऊ शकत नाही. धंदा केल्यासारखे शिक्षक खिळे ठोकठोकत रहातात, अन् मुले घायाळ होऊन सोसत रहातात. आजच्या जगातले कारखान्यातले श्रम, शिक्षण, फार काय सिनेमा-नाटकासारख्या करमणुकीच्या गोष्टींतही हा थंड, पैशांची गणिते करणारा गारठा भरून राहिला आहे. खरी नाती जोडणे अशक्य झाले आहे. युरेका असे ओरडत रस्त्याने नागवे धावण्याचा आनंद आज अशक्य झाला आहे.
लहान मुलाला प्रत्येक वस्तूबद्दल कुतूहल असते; ती हाताळण्यात, शोधण्यात, ‘मिळवण्या’त इंटरेस्ट असतो, आनंद असतो. ही क्षमता चरकाच्या प्रत्येक दात्यातून वर जाता जाता नाहीशी व्हायला लागते. अन् त्याचबरोबर आणखीही एक घडते :
मुलाचा माणूस व्हायच्याऐवजी कारकून वा डॉक्टर होतो! समाजाला आवश्यक अशी ही यंत्रे या कारखान्यांमधून तयार होतात. त्यांना मेकॅनिकल इंजिनीयरिंगची वा उच्च तत्त्वज्ञानाची माहिती होते. पण त्याचा त्यांच्या स्वतःशी संबंध काय ते उमगेनासे होते. एम.ए.होऊन नोकरी मिळते व पैसे मिळतात; एवढेच माणसाला कळू लागते. म्हणजे स्वतःला हे शिक्षण समृद्ध करत नाही; उलट फक्त पैसे मिळवण्याची क्षमता आणून देऊन पैशांची व्यापारी तहान वाढवून देते. कामामध्ये व एकंदर जगण्यामध्ये स्वातंत्र्य व सर्जन उरत नाही. उलट काम हे एक प्रचंड ओझे होते व माणूस पैशांचा गुलाम होतो. आतमधून रिता होतो. वर म्हटल्यासारखे चिपाड होतो. कुणी म्हणेल की, मग या विशेष शाखांमध्ये स्पेशलायझेशन नकोच का? तर ते हवे; पण संपूर्ण जीवनशिक्षणातलाच एक पुढे गेलेला तो भाग असायला पाहिजे. आज ती केवळ सूज आहे, किंवा पोकळ मनावरचे पैसे मिळवण्याकरता उपयोगी पडणारे एक गळू आहे. मराठी घेऊन एम.ए. झालेल्या माणसाला कलेची व साहित्याची जिवंत जाण आज बहुतेक वेळा शून्य असते. तत्त्वज्ञान-पंडिताला स्वतःच्या जीवनाचा अर्थ उमगत नसतो. इंजिनियर आपल्या मनाच्या व समाजाच्या प्रचंड यंत्रापुढे अवाक् होऊन बसतो, भेदरून जातो. कारण तो आत अत्यंत दरिद्री झालेला असतो. तो भेदरून, भोवंडून जगत राहतो. बालकवींच्या कवितेवरील पंडितांची मते त्याला पाठ असतात, पण त्याच्या स्वतःच्या हृदयातले काव्य मरून गेलेले असते. तो प्रचंड धरण उभे करू शकतो : पण स्वतः स्वतंत्रपणे उभा राहू शकत नाही. शिक्षणाने केवळ डोक्यांवर विशिष्ट ज्ञानाचे ओझे घेतलेले सांगाडे तयार होतात, अन् त्यांना बाहेरच्या कशाच्या तरी पैसा, देव, सत्ता इत्यादींच्या — आधाराशिवाय उभे रहाता येत नाही.
म्हणजेच, वेगळ्या दृष्टीतून, आजचे शिक्षण अत्यंत गैरलागू झाले आहे. मुलांपुढे वा नंतर मोठ्या माणसांपुढे येणाऱ्या व्यक्तिगत दैनंदिन जीवनाचा व शिक्षणाचा सांधा साफ तुटला आहे. भोताली दिसणाऱ्या जीवनाच्या प्रचंड कोलाहलाचा आणि मनातल्या आशा-आकांक्षा अन् दुःखे व भये यांचा अर्थ लावण्याची ताकद माणसात ते आणू शकत नाही. त्याला पोकळ करून भेदरवून टाकले जात आहे. त्यामुळे सगळे जग व तो स्वतः त्याला अनोळखी, अनाकलनीय झाला आहे. मी एवढा शिक शिक शिकलो पण समाजवादावर त्यात एक अक्षर नव्हते; आणि बाहेर पडतो तर जो तो त्याच्याबद्दल बोलत सुटलेला! ते कळणार कसे? माझ्यापुढे गरिबी, जात, भूक, qहसा, स्वार्थ यांचे थैमान चालले आहे, पण त्याविषयी मला इतक्या वर्षांत कुणीच सांगितले नाही. माझ लैंगिक उपासमार व त्यातून येणारे प्रश्न सोडवण्याकरता जे लागते ते मला कधीच दिले गेले नाही. ‘मी सुशिक्षित आहे’ याचा अर्थच मला कळू शकत नाही. पैसे मिळवण्याची एक जादू मला आता येते यापलीकडे त्याला अर्थच नाही. जर मला पैशाचा गुलाम व्हायचे नसेल, समृद्धी जमवायची नसेल, स्वतःलाच समृद्ध व्हायचे असेल, जर मला शुभ्र शीड उभारून मुक्त होऊ पहायचे असेल, आनंदी व्हायचे असेल, तर हे सगळे शिक्षण गैरलागू आणि भंकस ठरत आहे. आणि ह्या आकांक्षा प्रत्येक माणसाच्या, त्याला कळत नसले तरी, असतात. त्याच्या जगण्याचा पाया, आनंदाचे स्रोत, त्याचे मूळ माणूसपणच वर ठरण्याऐवजी एक शाप झाले आहे. निराशेचे, दुःखाचे कारण झाले आहे. इतर अनेक गोष्टींबरोबरच गैरलागू शिक्षण हे ह्याचे एक कारण आहे.
आतापर्यंतचा सगळा विचारही जर असल्या शिक्षणाचाच एक भाग व्हायचा नसेल तर इतक्या खोलवर जाऊन आणखी पुढेही गेले पाहिजे : शिक्षणपद्धती अशी का आहे ते समजून घेऊन, ती बदलायची कशी ते पाहिले पाहिजे. थोडक्यात, निदान हा लेख तरी ‘लागू’ केला पाहिजे!
जरा डोळे आणखी उघडले तर शिक्षणाचे आजचे स्वरूप अटळ का आहे ते कळू शकते. स्वतंत्र, सर्जनशील, प्रेममय माणूस आजच्या समाजात नको आहे. असा प्रत्येक माणूस त्याचा हाडवैरी आहे. कारण आजचा समाज, माणसाने माणसाच्या केलेल्या पिळवणुकीवर, हिंसेवर, स्वार्थावर आधारलेला आहे. हा त्याचा पाया आहे, अन् यावर कोणताही आघात होऊ न देण्याची व्यवस्था या समाजाने परिपूर्ण केली आहे. माणसाला शून्यवत प्रेत केल्याशिवाय, त्याला पैसा या राक्षसी देवाचा गुलाम केल्याशिवाय, तो पुरता नेस्तनाबूत होत नाही. त्याची सर्जनक्षमता मारून टाकल्याशिवाय त्याची स्वातंत्र्याची तहान संपत नाही. रोगट उत्पादन-व्यवस्थेला जाणारा तडा कसाबसा सांधायचा असेल, पिळवणूक शक्य व्हायची असेल, तर अर्थव्यवस्था, राज्यसत्ता, सामाजिक संस्था — सगळ्यांना विशिष्ट आकार घ्यावा लागतो. त्यांच्यात माणसाचे माणूसपण कसे हरवेल याकडे लक्ष दिले जाते. मालकी हक्क, करार, मालमत्तेचे कायदेकानू किंवा राज्यसत्तेचे अधिकार, लोकशाहीच्या भंकस कल्पना, ‘शांतता आणि सुव्यवस्था’, किंवा धर्म, जात, कुटुंबसंस्था व लग्नसंस्थांचे नीतिशास्त्र-सगळ्यांतून हे साधले जात असते. शिक्षणव्यवस्था व पद्धती याच प्रस्थापिताचा एक भाग आहे, एक एक हत्यार आहे. प्रेताचे कारखाने चालू राहणे हा आजच्या स्मशानवत जगाची एक मूलभूत आवश्यकता आहे.
आणि शिक्षणक्षेत्रात हे राक्षसी चरक अतिशय कार्यक्षमतेने चालणे शक्य असते. कोवळी असहाय मुलेच खायला मिळत असल्याने सगळे सोपे असते. एकतर्फी शिक्षणाने, छातीतली धुगधुग नष्ट करून त्यांना हवा तो आकार देण्याचे मोलाचे काम शिक्षणात केले जाते! एकीकडे प्रस्थापित समाजरचना कायम रहावी म्हणून मेलेले, गैरलागू शिक्षण असर्जनशील तऱ्हेने दिले जाते व माणसाला पोकळ आणि हतबल करण्यात येते. दुसरीकडे त्याला ‘उपयुक्त’ ज्ञान देऊन, आजच्या व्यवस्थेला त्याचा उपयोग करून घेणे शक्य करण्यात येते. शिक्षणातून आज माणसाला ज्ञान मिळते हे कोणी नाकारत नाहीच. फक्त हे ज्ञान केवळ पैशांना जोडलेले असते. शरीराच्या गरजा अन् मनाच्याही खोट्या भुका भागवण्याकरता ते वापरले जाईल असेच असते. त्यामुळे हे ज्ञान ओझे होते. माणसाला आलेले बांडगूळ ठरते. काम ही शिक्षणासारखीच दुःखद गोष्ट ठरते. हे ज्ञान आनंददायी तेव्हाच होईल जेव्हा गरजा भागवणे हा सर्जनशील व स्वतंत्र व्यवहार होईल, रखडपट्टी रहाणार नाही. मग त्यातूनच नव्या गरजा मी निर्माण करू शकेन. अन् त्या अश्या की त्यांचे समाधान हा पुन्हा सर्जनशील व शिकण्याचा अनुभव असेल, पुन्हा नव्या गरजांना जन्म देईल, वगैरे. पण अशी सतत अत्यवस्थ माणसे हा आजच्या व्यवस्थेला सगळ्यात मोठा धोका ठरेल. अशी माणसे निर्माण होऊ नयेत हा शिक्षणाचा आद्य हेतू आहे!
शिक्षणशुद्धी करायची असेल तर हे लक्षात घेतलेच पाहिजे. शिक्षणव्यवस्था व पद्धतीत बदल घडवण्याचा संबंध अपरिहार्यपणे आजचा समाज उलथवून टाकण्याशी लागतो; स्वातंत्र्यावर आधारलेला, पिळवणूकहीन समाज निर्माण करण्याशी लागतो. शिक्षणशुद्धी, सांस्कृतिक क्रांती, अर्थव्यवस्थेमध्ये (खरा) समाजवादी बदल अन् कामगार-शेतकऱ्यांची सार्वभौम राजकीय सत्ता : ही अपरिहार्य साखळी आहे.
आजवर अनेक समित्या नेमून, नवीन नवीन कार्यक्रम आखून, मोठमोठाले शिक्षणतज्ज्ञ अन् प्राध्यापकांनी डोकेफोड करूनही शिक्षणक्षेत्रात मूलभूत शुद्धी आजवर का झाली नाही याचे रहस्य यातच आहे. जणू ‘इतिहास — प्रक्रियेचा कावेबाजपणा’ या तज्ज्ञ मंडळींना आत कुठे तरी सूचना देतो आहे : ज्या फांदीवर बसला आहात ती तोडू नका; किंवा उघडपणेच हे लोक प्रस्थापित कायम रहावे याकरता कळूनसवरून वागत आहेत. असो.
तर शिक्षणशुद्धीची खरोखर निकड वाटणाऱ्यांनी हा संपूर्ण क्रांतीचा संदर्भ सतत लक्षात ठेवलाच पाहिजे. नपेक्षा जुजबी सुधारणा तरी होतील किंवा आणखी भलत्याच मार्गाला शिक्षणव्यवस्था लागेल. वेगळ्या प्रकारचा साचलेपणा, पारतंत्र्य, अन् रेजिमेंटेशन तिच्यात येईल — जसे काही ठिकाणी झालेले आहे.
अगदी पहिल्यांदाच आपण म्हटले की शिक्षण हे दुतर्फी असले पाहिजे. स्वतंत्र व सर्जनक्षम माणूस अशाने निर्माण होईल व असाच माणूस खरे शिक्षण घेऊ शकेल. म्हणजे विद्यार्थ्यांनी, आम्ही सगळ्यांनी, स्वतःत बदल घडवून आणण्याचीही गरज आहे. जे या कारखान्यातून सांगाडे होऊन बाहेर पडलेत — आणि असेच बहुसंख्य — ते सोडले तर बाकीचे बाहेरचे आणि या कारखान्यातल्या कन्व्हेअर बेल्टवर बाटल्यांसारखे सरकणारे अगणित अजून जिवंत असलेले विद्यार्थी, या सगळ्यांनी आधी स्वतःला झाडून घेतले पाहिजे. (शिक्षणात मुलांच्या कोवळेपणामुळे व ताजेपणामुळे अत्याचाराला जेवढी सुलभता असते तेढीच बंडाची शक्यताही असते!) आम्हाला पैसा हवा आहे, गुलामी चालणार आहे, आनंद नसला तरी सुख हवे आहे का आम्ही माणसासारखे जगण्याचा हक्क बजावणार आहोत ते आम्ही ठरवायला पाहिजे. आणि जर हा हक्क – हक्क कसला! आनंद, प्रेम, स्वातंत्र्य मिळविण्याची संधी — आम्हाला हवा असेल तर शिक्षण दुतर्फी आहे हे जाणून आम्ही स्वतःला बदलले पाहिजे. खरे सुशिक्षित व्हायला पाहिजे. या गोष्टीवर भर देण्याची अत्यंत जरूर असून हे केले जात नाही. कुणाही डोळे उघडे ठेवणाऱ्या विद्यार्थ्याला आज एेंशी टक्के विद्यार्थी या ना त्या स्वरूपात कॉपी करतात हे कळल्यासारखे असून त्याबद्दल एक अक्षर मी आजवर ऐकलेले नाही. आम्हा विद्यार्थ्यांच्या मुलींशी होणाऱ्या वागणुकीविरुद्ध काही नाही! चांगल्या, आस्थेने सर्जनशील तऱ्हेने शिकवणाऱ्या (क्वचित मिळणाऱ्या) शिक्षकांना भयंकर त्रास देताना मी मुलांना पाहिलेले आहे. आपण असे का वागतो हे आम्ेही समजून घेतले पाहिजे व सगळी कारणे दूर केली पाहिजेत. त्यातला मोठा भाग शिक्षणसंस्थांचा, पद्धतींचा, अन् बहुसंख्य शिक्षक-प्राध्यापक-तज्ज्ञांचा आहे ही गोष्ट फक्त हेच ढोंगी लोक नाकारतील. पण काही भाग विद्यार्थ्यांचा आहे हेही खरे आहेच. आतून पेटलेली शिस्त, निष्ठा, वाईटाचा संताप (किंवा दुसऱ्या शब्दांत स्वातंत्र्य, उत्फुल्लता व चांगल्याची तहान) या खऱ्या बदलाला, शुद्धीला, क्रांतीला आवश्यक आहेत.
शिक्षणप्रक्रिया दुतर्फी असते याचा दुसरा अर्थ असा : शिकताना जसा मी स्वतंत्रपणे, सर्जन करत असतो तसाच सबंध शिक्षणव्यवस्थेलाही मी ‘शोधले’ पाहिजे, घडवले पाहिजे. दुसऱ्या शब्दात आणि नेहमीच्या शब्दांत, शिक्षण काय व कसे असावे याबद्दल मला अधिकार असले पाहिजेत. एखादे सामुदायिक शेत राबवताना मी स्वार्थी, सौदेबाजी भावनांवर मात केली पाहिजे (कॉपी केली नाही पाहिजे) हे जितके खरे, तितकेच मला या सामुदायिक शेताच्या घडणीवर, कारभारावर, प्रत्यक्ष नियंत्रणात हिस्सा मिळाला पाहिजे हेही. कारण त्याशिवाय आपुलकी अन् हे माझे घरचे शेत आहे, असे मला वाटणार नाही. आणि माणूस घराच्या भिंतीत जेवढा स्वतंत्र व निर्मितिक्षम असतो तेवढा बाहेर नसतो. थोडक्यात, विद्यार्थ्यांना विद्यापीठे, कॉलेजे, शाळा-सगळ्यांच्या कारभारात, शिकवण्याच्या पद्धती ठरण्यात, लागू आणि समावेशक शिक्षणक्रम नेमण्यात, शिक्षक व प्राध्यापकही नेमण्यात (आईबापांनी ठरवलेली लग्ने आता बस्स झाली!) अधिकार मिळाले पाहिजेत. जोपर्यंत सबंध समाज बदलत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांचा हा ‘सहभाग’ व्यवस्थेशी संघर्षाचा, तेढीचाच राहणार हे उघड आहे. पण हे पत्करायचे का नाही, समाजात बदल घडू द्यायचा की नाही – मग तो कुठपर्यंतही आपल्याला घेऊन जावो – हा निर्णय आजच्या प्रस्थापिताने घ्यायचा आहे. लोकशाहीच्या अन् हिरव्या, पिवळ्या, पांढऱ्या क्रांतीच्या ते गप्पाच मारणार आहेत का या संघर्षाला तोंड फुटू देणार आहेत – ते त्यांनी ठरवायचे आहे.
आपल्यापुरते बोलायचे तर, माझ्या मते प्रस्थापिताचा निर्णय कोणता असेल हे ठरलेले आहे! राज्य चालवणारे, धंदा करणारे, युनिव्हर्सिट्या व शाळा चालवणारे लोक मूर्ख असले तरी स्वतःला खलास करण्याइतके मूर्ख नाहीत. म्हणून हे आपणच करायचेय – या प्रेतांच्या कारखान्यातल्या यंत्रांत चिरडल्या जाणाऱ्या प्रत्येकाने. तिथल्या तिथे चक्राला खांदा रेटून, मिठी मारून, लोंबकळून हे यंत्र थांबवण्याचा व उलटे फिरवण्याचा निकराचा प्रयत्न करून. विधायक सूचना करून, नव्या प्रकारच्या शिक्षणाकरता प्रत्यक्ष रोजच्या प्रश्नांना उत्तरे देऊन, प्रयोग करून पहायला सांगून – आणि हे न कराल तर हे यंत्र उध्वस्त करू, बंद पाडू असा लढाऊ पवित्रा घेऊन! या सूचनांचा, ‘विद्यार्थ्यांच्या मागण्यां’चा सहानुभूतिपूर्वक विचार करण्याची आश्वासने हजारो वर्षे आम्ही ऐकत आलो आहोत. पार शंबुकाच्या तपाच्या अधिकाराच्या मागणीपासून ते आजवर. हे असे होणार नाही. सुधारणावाद्यांचा काळ आता गेला आहे. आता समोर सरळ, निर्दय, कठोर संघर्ष आहे. म्हणजे असे : प्रस्थापित तर काही बदलणारे नाहीत, आणि फार तर काही सुधारणा करण्यापलीकडे तर नाहीच. आपली भूक तर ही अशी वाढलेली, संबंध बदलू पहाणारी. मग काय करायचे? वर म्हटल्याप्रमाणे खांदा रक्ताळेपर्यंत चरकाच्या दात्याला रेटत जायचे. सगळ्यांनी एकदम. न हलता-परत, दुसरा दाता, दुसरा चरक. पण हे सगळे आजच्या शिक्षणसंस्थांमध्ये राहूनच, स्वतःला बदलत, घडवत, शिकवत करावयाचे आहे.
जरी अंतिम उद्देश या व्यवस्थेला ‘खांदा देण्या’चा असला तरी आज ते शक्य नाही. म्हणून त्रागा व चिडचिड न करता, थंड, धारदार, संतापी निर्धार जागा ठेवायचा, अन् आजच्या संस्थांमधून लाँग मार्च करत जायचे. मिळेल तिथे हिसडा मारायचा, शक्य तर यंत्र उलटे फिरवायचे, थांबवायचे; शत्रू जोरात आला तर पाय काढता घ्यायचा. वळण घेऊन पुन्हा मार्च सुरू ठेवायचा. या सगळ्याने आमूलाग्र शिक्षणशुद्धी वगैरे होणार नाही हे मात्र पक्के ध्यानात ठेवायला पाहिजे. काहीबाही सुधारणा होतीलही. पण मूळ पाया माणसाला प्रेत बनवण्याची प्रक्रियाच राहील. या लाँग मार्चमधून हळूहळू आपण वाढत जाऊ. बाहेरही सगळीकडे सगळ्या क्षेत्रांत असे लोक वाढतील. कन्व्हेअर बेल्टवरच्या बाटल्या रक्तबंबाळ होतील, पण त्यांच्यात दारू ठासली जाईल. अन् कधी तरी मग स्फोटक हालचाली त्यांच्यात सुरू होतील. कारखाना वाळवीने पोखरल्यासारखा कोसळायला लागेल. दुसरीकडे नवीन निर्माण होऊ लागेल.
सारांश, खऱ्या अर्थी शिक्षणशुद्धी खरोखर तेव्हाच होईल, जेव्हा देव, धर्म, पैशांची गुलामी, अन् हिंसेवर आधारलेले राज्यही कोसळून पडेल. शिक्षणक्षेत्रातला लढा त्यांचयशी निगडित आहे. आणि दुतर्फी आहे : पलीकडचे बदलताना, अलीकडचे ही बदलल्याशिवाय अशक्य आहे. संपूर्ण क्रांतीकरता अक्षरशः अंतर्बाह्य क्रांती आवश्यक आहे.
या सर्व विवेचनातून अनेक मुद्दे, उपमुद्दे पुढे येतात. त्यांचा विचार आणि त्यावर आधारलेल्या मागण्या व लढ्याच्या योग्य पद्धती सर्जनशीलतेने निर्माण करायला लागतील. एरवी आम्ही आजच्या शालेय शिक्षणाने जसे आंधळे झालोय तसे बाहेरच्या पक्षाबिक्षांच्या प्रस्थापितांकडून ‘शिकून’ही आंधळेपणाने वागत राहू. असे आजवरच्या युवक व विद्यार्थी चळवळींचे चाललेले दिसते आहेच. कुठे अवास्तव मागण्या, कुठे मूल्यविचार नसलेल्या, ‘कॉपी करू द्यावी’ यासारख्या भंकस मागण्या, कुठे निरर्थक हसा, तर कुठे शांततामय मार्ग अन् साधनशुचितेचा अनाठायी ध्यास, कुठे पोथीबाज विश्लेषणे व मार्ग, तर दुसरीकडे दिशा अन् कणाच न उरलेल्या गुळगुळीत अन् मुळमुळीत ‘लढाऊ’ संघटना. या सगळ्यात आमची वाताहत होत आहे. ही कोंडी फोडण्याच्या दृष्टीने त्या लेखातील एकंदर शिक्षणाविषयी समज उपयोगी पडेल असे वाटते. मग अनेक सुधारणा व मागण्यांचा आराखडा करता येईल, व सबंध शिक्षणव्यवस्थेचे कुजलेले रहस्य जाणून घेऊन, विशिष्ट परिस्थितीत लढ्याचे मार्गही येतील. उदाहरणार्थ, आपल्या विवेचनात क्रमाने येणाऱ्या मागण्या अशा होऊ शकतात : पुरवणी-वाचन, सहली, समाजकार्य, श्रमकार्य वगैरेंतून प्रत्यक्ष जगाशी व श्रमिकांशी जास्त संबंध; प्रयोग, सिनेमा, इत्यादींवर जास्त भर; घोकंपट्टी आणि स्वतंत्र बुद्धी व सर्जनशीलतेच्या अभावावर आधारलेल्या परीक्षापद्धतीत बदल; केवळ ‘पैसा-उपयुक्त’ ज्ञानाबरोबरच एकंदर जीवनाविषयी-धर्म, जातीयता, समाजवाद, क्रांतिकारक विचार यांविषयी – अभ्यासक्रमात विषय; इंटर-डिसिप्लिनरी आणि इंटिग्रेटेड अभ्यासक्रम; शिक्षक-विद्यार्थ्यांचा मानवी पातळीवर अधिक संबंध, लैंगिक बाबींत व खऱ्या अर्थी शिक्षण; कॉपी वा इतर वाईट गोष्टींबद्दल कडक शिक्षा करण्यासाठी विद्यार्थिसमित्या व त्यांना योग्य अधिकार; अभ्यासक्रम, शिकवण्याच्या व मूल्यमापनाच्या पद्धती व नेमणुका आणि सर्वसाधारण कारभार यात विद्यार्थ्यांना निर्णायक सहभाग; ग्रंथालये व प्रयोगशाळा इत्यादी सोयी व मोफत शिक्षण इत्यादी. आणि मग व्यापक क्रांतीच्या संदर्भात उद्भवणाऱ्या : विद्यापीठांचे स्वातंत्र्य व पावित्र्य, बेकारीविरुद्ध उपाययोजना, राजकारणात भाग घेतल्याबद्दल आकसाला प्रतिबंध, जातीयतेला विरोध, इतर व्यापक सामाजिक, आर्थिक व राजकीय मागण्या इत्यादी.
प्रत्येक ठिकाणची परिस्थिती, विद्यार्थ्यांची व व्यवस्थेची तयारी, त्या गावातले सामाजिक व राजकीय जीवन, इत्यादींची नीट कल्पना करून घेऊन मग मागण्या, संघटनेचे अंतर्गत स्वरूप व लढ्याचे मार्ग, आणि डावपेच तपशीलवार ठरवावे लागतील. पण या पुढच्या गोष्टी, आणि प्रत्यक्षात कृतीने सोडवण्याच्या. या सगळ्यांमध्ये मूळ उद्देशाचे – स्वतंत्र, सर्जनक्षम, आनंदी, माणसासारखा माणूस घडवण्याचे व त्याला अनुरूप अशी व्यवस्था घडवण्याचे – विस्मरण मात्र होऊ देता कामा नये. कारण याच सततच्या सर्वंकष भानातून व झगड्यातूनच एक अफाट बहरलेले स्फोटक स्वप्न अन् थंड, धारदार प्रचंड संतापाची सुरी ही आमची हत्यारे शाबूत रहाणार आहेत. आजच्या शिक्षणामुळे बाकी गमावण्यासारखे काही आपल्याकडे नाहीच.

sudheerbedekar@gmail.com

(हजार हातांचा आक्टोपस मधून साभार)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.