`हैदर’ आणि `डॉ. प्रकाश बाबा आमटे’

सुप्रसिध्द दिग्दर्शक विशाल भारव्दाज यांचा `हैदर’ आणि `समृद्धी’ पोरे यांचा `डॉ. प्रकाश बाबा आमटे’ हे चित्रपट आपल्या समाजापुढील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पुढे आणतात. जरी या चित्रपटांचा हेतू वेगळा असला तरी या चित्रपटांतून या विषयांची मांडणी अतिशय समर्थपणे पुढे येते. एक विषय काश्मीरमधील दहशतवादाचा, जो हैदरमध्ये हाताळला आहे. तर दुसरा नक्षलवादाचा, जो डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटात हाताळला आहे. वर म्हटल्याप्रमाणे हे विषय या चित्रपटांचे मूळ विषय नाहीत. पण चित्रपटाच्या मुख्य विषयांच्या अनुषंगाने हे विषय अपरिहार्यपणे या चित्रपटात दाखल झाले आहेत आणि या प्रश्नांमुळेच या चित्रपटांना गांभीर्य आणि खोली प्राप्त झालेली आहे.
विशाल भारद्वाज यांचे चित्रपट नेहमीच शेक्सपियरच्या नाटकांवर आधारित असतात. या नाटकांची थीम घेऊन भारतीय तपशील त्यात भरून नवीन कलाकृती समोर आणतात. मग तो मकबूल असो, ओंकारा असो अगर आत्ताचा हैदर असो. हैदर शेक्सपियरच्या जगप्रसिध्द हॅम्लेट नाटकाच्या थीमवर बेतलेला आहे. काश्मीरमधील दहशतवादाची पार्श्वभूमी घेऊन त्यांनी ही थीम नवीन स्वरूपात सादर केलेली आहे. काश्मीरमधील दहशतवादाला अनेक पदर आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर चालू असलेल्या मुस्लिम राष्ट्रातील घडामोडी, अफगाणिस्तान, पाकिस्तान, तालीबान यांचे राजकारण, भारतीय लष्कराच्या कारवाया हाही एक पदर त्या दहशतवादाला आहे. जरी असे अनेक पदर काश्मिरी दहशतवादाला असले तरी मूळ मुद्दा आहे काश्मिरी जनतेच्या विकासाचा आणि काश्मीर भारतात सामील होण्यासाठी राजा हरिसिंग बरोबर केलेल्या कराराचा. या सर्वातून काश्मीरमधील परिस्थिती उद्भवली आहे. त्यात भर पडली आहे गेल्या दोन दशकात काश्मीरसाठी असलेल्या 370व्या कलमाला सातत्याने विरोध करणाऱ्या हिंदू धर्मांध शक्तींच्यात होणाऱ्या वाढीची. आज या शक्ती सत्तेवर आहेत. हिंदू धर्मांध शक्ती आणि मुस्लिम धर्मांध शक्ती यांमधील राजकारण नेहमीच परस्परांना पोषक असते आणि त्यात बळी जातो तो दोन्ही बाजूंच्या निरपराध जनतेचा. काश्मीरमधील दहशतवादाला पाकिस्तानची फूस आहे असे सांगून मूळ मुद्दा बाजूला सारण्याचा केंद्र सरकारचा नेहमीच प्रयत्न राहीलेला आहे. त्यामुळे केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून काश्मीरकडे पाहिले जाते आणि तेथे लष्कराला विशेष अधिकार देणारा कायदा लागू केला जातो.
हैदर चित्रपटाच्या पूर्वार्धात या लष्कराच्या विशेष अधिकार कायद्यामुळे दहशतवाद आटोक्यात येण्याऐवजी उलट कसा वाढत जातो याचे प्रत्ययकारी चित्रण करण्यात आलेले आहे. दहशतवादी म्हणून सर्वसामान्य जनतेचालष्कराने जो अमानुष छळ चालवला आहे त्यामुळे लष्कराबद्दलचा अतोनात संताप काश्मीरी जनतेत साठून आहे आणि तो काश्मिरी तरूणांना दहशतवादाकडे ढकलत आहे. एखाद्या दहशतवाद्याला मारले की लष्करी जवानांना, अधिकाऱ्यांना बक्षिस, बढती मिळते. त्यामुळे अनेक तरूणांना मारून त्यांना दहशतवादी ठरवले जाते आणि बक्षिसे मिळविली जातात. हैदरमध्ये भारतीय लष्कराची ही काळी बाजू विशाल भारव्दाज यांनी खूपचगांभीर्याने पुढे आणली आहे. काश्मिरी जनतेला विश्वास देण्याची आणि विश्वासात घेण्याची गरज आहे. दहशतवादाच्या नावाखाली तिथे जे शिरकाण केले जात आहे त्यातून दहशतवाद कधीच संपणार नाही हेच त्यांना यातून सांगायचे आहे.
हैदरचा उत्तरार्ध मात्र पूर्ण घसरलेला आहे. सुरूवातीला सर्व समाजाच्या संदर्भात मांडणी करणारा हा चित्रपट हळूहळू एका कुटुंबावर आणि त्याच्या शोकांतिकेवर घसरत जातो आणि हे घसरणे एखाद्या गल्लाभरू हिंदी चित्रपटाला साजेसे आहे.
समृध्दी पोरे यांचा डॉ. प्रकाश आमटे हा चित्रपट तर सत्यकथाच आहे. त्यामुळे तेथे कल्पनेला वाव नाही आणि तेथे दिग्दर्शकाला स्वत:च्या मनातील काहीही टाकणे शक्यच नाही. डॉ. प्रकाश आमटे यांचे `प्रकाश वाटा ‘ नावाचे आत्मकथनात्मक पुस्तक आहे. या पुस्तकाचा तोच आधार आहे. बाबा आमटे यांच्यासारखेच डॉ. प्रकाश आणि मंदा आमटे हे जिवंतपणीच दंतकथा बनले आहेत. त्यांच्या जिवंतपणीच त्यांची जीवनकथासांगणारा हा चित्रपट जशी त्यांच्या त्यागाची, चिकाटीची, गोरगरीब जनतेबद्दल वाटणाऱ्या प्रेमाची कहाणी आहे तसाच भारतीय स्वातंत्र्याच्या 65 वर्षानंतरही आदिवासी समजल्या जाणाऱ्या जनतेला साध्या आरोग्याच्या सुविधाहीनाहीत, ते जणू भारतीय नागरिकच नाहीत अशी त्यांची आजची अवस्था आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ. प्रकाश आणि मंदा आमटे यांचे कार्य सूर्यप्रकाशासारखे उठून दिसते. सुखासीन जीवनाची संधी नाकारून हे डॉक्टर जोडपे अतिशय खडतर अशा जंगलातील जीवनाशी सामना करीत आदिवासी समाजाला आधार देण्याचे, समाजात जागृती करण्याचे आणि त्याला आधुनिक समजल्या जाणाऱ्या समाज प्रवाहाशी जोडण्याचे काम निस्वार्थ पध्दतीने करीत आहे ही गोष्ट आजच्या चंगळवादी समाजाच्या पातळीवर अतिशय दुर्लभ अशी आहे. बाबा आमटे यांनी समाजाने कचऱ्यासारखे टाकून दिलेल्या कुष्ठरोग्यांना पुन्हा मानवी समाजात प्रतिष्ठा देण्याचे आणि त्यांच्या पूर्ण करपलेल्या जीवनात आनंद फुलविण्याचे काम केले. त्यांचा वारसा डॉ. प्रकाश आणि मंदा आमटे यांनी सार्थपणे पुढे चालविला आहे.
समृद्धी पोरे यांनी ही कथा चित्रपटीय भाषेत अतिशय समर्थपणे सादर केली आहे. कारण अशा कथा या माहितीपट म्हणून पुढे येतात तस त्यांनी होऊ दिलेले नाही. डॉ. प्रकाश आणि मंदा आमटे हे कोणीतरी आकाशातून उतरलेले देवदुत आहेत अशी पूर्णपणे गौरवांकित मांडणी त्यांनी केलेली नाही. तर एक सर्वसामान्य माणूस आणि त्याची जडण घडण, त्याचे प्रेम, राग, लोभ, दु:ख हे सर्व त्यांनी छान टिपले आहे. त्यांच्या या सादरीकरणाला तितक्याच समर्थपणे अभिनयाची झूल चढवली आहे नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांनी. त्यामुळे हा चित्रपट चित्रपट म्हणून देखणा झाला आहे आणि हृदयाला भिडणारा झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी लोकांची जी गर्दी होत आहे ती समाजात अजूनही संवेदनशीलता आणि शहाणपण शिल्लक आहे याची पावतीच आहे. प्रगतीशील मूल्ल्यांच्या आजच्या घसरणीच्या काळात ही गोष्ट आश्वासक आहे.
डॉ. प्रकाश आणि मंदा आमटे यांचे काम भ्रामरागड, गडचिरोली या परिसरात असल्यामुळे त्यांचा नक्षलवाद्यांशी संबंध येणे अपरिहार्य आहे. त्यामुळे चित्रपटात त्याचे संदर्भ येणेही अपरिहार्य आहे. आंध्र प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या या परिसरात माडिया या आदिवासी जनसमुहांची वस्ती आहे.आज जरी त्यांची थोडीफार प्रगती झाली असली तरी ते विकासाच्या अंगाने विकासाच्या मूळ प्रवाहापासून कोसो दूर आहेत. अगदी आदीम म्हणावे असे आयुष्य जगत आहेत. पोलिसयंत्रणा, फॉरेस्ट खाते. तेंदुपत्याचे ठेकेदार यांच्या अमानुष शोषणाची वर्षानुवर्षे शिकार झालेले हे आदिवासी जनसमूह नक्षलवादाची शिकार होणे स्वाभाविकच आहे.
डॉ. प्रकाश आमटे यांच्या सोबत काम करणारे विलास मनोहर यांनी `एका नक्षलवाद्याचा जन्म’ नावाचे एक चांगले पुस्तक लिहिले आहे. आदिवासी जनसमुहांच्या शोषणाचा बारकाईने धांडोळा घेताना त्यांनी सरकारी यंत्रणा नक्षलवादाच्या नावाखाली त्यांचा छळ करून त्यांना नक्षलवादी बनण्यास कशी भाग पाडते याचे चांगले चित्रण केले आहे. त्यामुळे जे लोक सामान्यपणे कष्ट करून आपले आयुष्य जगू इच्छितात तेही सरकारी यंत्रणांच्या विरोधी जाऊन पर्याय म्हणून बंदुक जवळ करतात. एकतर नक्षल समस्या ही कायदा सुव्यवस्थेची समस्या आहे हा सरकारी दृष्टीकोन, आदिवासी जनतेशी संबंधीत खात्याचे असणारे अधिकाऱ्यांचे आदिवासी जनतेबरोबरचे कायम अमानवी वर्तन, अगदी त्यांच्या हक्काचे राशन आदिवासी जनतेला मिळू न देणे, सातत्याने त्यांना अपमानित करून शिवीगाळ करणे यातूनच प्रतिकाराची भावना निर्माण होते आणि मग ते उपलब्ध असलेला नक्षल पर्याय स्वीकारतात. शेजारच्या आंध्र मधून येणारे अण्णा (नक्षल) याचा बरोबर फायदा उठवतात आणि नक्षल चळवळ फोफावते. पोलीस किंवा नक्षलविरोधी पोलीस दल निरपराध आदिवासी तरूणांना नक्षल म्हणून गोळ्या घालून ही चळवळ आणखी वाढवण्यास मदत करतात. जी गोष्ट आपण जम्मू-काश्मीरमध्ये पाहिली आहे.
डॉ. प्रकाश आमटे यांची या प्रश्नावरची भूमिका तटस्थ आहे. अशा स्वरूपाचे काम करताना तशीच भूमिका असणे गरजेचे आहे. पण असे असले तरी त्यांची सहानुभूती पूर्णपणे आदिवासी जनतेला आहे. एका बाजूला सरकार आणि दुसऱ्या बाजूला नक्षल आंदोलन आणि यांच्या कोंडीत आदिवासी जनसमूह अडकलेला आहे. `बाप भीक मागू देईना आणि आई जेवू घालेना’ अशी त्यांची अवस्था झाली आहे. यातूनच तो बंदुकीकडे वळतो किंवा बंदुकीला बळी पडतो. डॉ. प्रकाश आणि मंदा आमटे यांनी त्यांच्यासाठी आरोग्यसुविधांबरोबर शिक्षणाच्या सोयी उपलब्ध केल्या आहेत. अशा प्रकल्पांना सरकारने भरभक्कमपणे मदत करून आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. पण तीही बोंब आहेच. उदा. जंगलात जे प्राणी, पक्षी जखमी होतात असे प्राणी, पक्षी घेऊन आदिवासी लोक डॉ. प्रकाश यांच्याकडे येतात. डॉ. प्रकाश अशा प्राण्यांना औषधोपचार करून जगवतात. असे प्राणी, पक्षी परत जंगलातील जीवन जगू शकत नाहीत. अशावेळी त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी डॉ. प्रकाश यांनीच घेतली. असे अनेक प्राणी त्यामध्ये वाघ, बिबटे, तरस, अस्वल, रानगायी, रानकुत्रे, साप यांचा समावेश आहे. पण याची पार्श्वभूमी लक्षात न घेता सरकारच्या वन खात्याने असे प्राणी-पक्षी पाळण्यास बंदी घातली आहे, असे कारण देऊन ते जप्त करण्याचे ठरविले होते. हे प्राणी, पक्षी वाचविण्यासाठी डॉ. प्रकाश यांना खूपच धडपड करावी लागली होती.
म्हणजे सरकारी कारभाराचा हा एक नमुना आहे. असो. भारतातच नव्हे तर जगभरातच बाबा आमटे, विकास आमटे, डॉ. प्रकाश आमटे, मंदा आमटे अभय बंग, राणी बंग असे किती तरी सहृदयी लोक आहेत की जे संतांचेच कार्य वेगवेगळ्या स्वरूपात करीत आहेत. मानवी विकास सरळ रेषेत जाणारी गोष्ट नाही. या विकासाला मानवी शोषणाची एक भयंकर बाजू आहे, ज्यामुळेच हे सर्व प्रयत्न उभे राहातात. मूळ मुद्दा आहे शोषणरहित विकासाचा, शोषणरहित समाजाचा. जो अंतिम उपाय आहे.
अंतिम ध्येयाच्या या खडतर प्रवासात वरील व्यक्ति मानवी जीवनात जेथे पूर्ण वाळवंट आहे अशा ठिकाणी थोडीफार हिरवळ निर्माण करण्याचे कार्य करतात ते कार्य मोठे आहे. अशा कार्यात आपल्यालाही काही हातभार लावता आला तर आनंदवन निर्माण करणाऱ्यांना हिंमत मिळू शकेल.

‘जीवनमार्ग’ च्या सौजन्याने

kiranm.subhasht@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.