पत्रसंवाद

प्रिय मिलिंद,
कसा आहेस? आज फार अस्वस्थ व्हायला झालं म्हणून तुझ्याशी बोलावस वाटलं…
काल कर्नाटकात डॉ.कलबुर्गी सरांचा खून केला दोघाजणांनी सकाळीच. अगदी डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांना मारलं ना तसच… काही लोक आता त्यांना बदनाम करणारे मेसेज फिरवत आहेत. तुला खर वाटेल त्यांनी संगितलेसं… डॉ. कलबुर्गी हे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक तर होते पण त्या पलीकडे अनेक चांगले विद्यार्थी घडवणारे शिक्षक होते. ते मुलांना विचार करायला, प्रश्न विचारायला आणि समाज चांगला कसा होईल यासाठी कृती करायला शिकवत होते. अगदी डॉ.दाभोलकर आणि पानसरे सारखं…. पण त्यांचा खून केला. कोणी केला हे माहित नसलं तरी …….. तुला कळल ना हे कोण करतय ते …
एखाद्या माणसाचे विचार पटले नाही म्हणून त्याचा खून करायचा हे मान्य आहे का तुला?
नाही ना… मग तू शांत का? त्यांच्या विचारांच्या लढाईत तू का नाहीस…किती दिवस तू असं म्हणणार आहेस की मला काय फरक पडतो… मी काय करू शकतो….असं म्हणशील तर या पृथ्वीच सौंदर्य हे धर्माचा गैरवापर करणारे नष्ट करून टाकतील. खरा धर्म सांगितला पाहिजे आपण…माणुसकी नावाचा फ़क्त….. मी अपघाताने हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख झालो. पण मी आधी माणूस आहे.
माणसाने माणसाला मारणारी विचारसरणी मला मान्य नाही हे बिनधास्त पुढे येऊन बोल रे….नाहीतर उद्या आणखी एक विचारवंत, साहित्यिक हे लोक मारून टाकतील. आणि त्याला बदनाम करतील. तुला गुलाम व्हायच नसेल तर उठ… या गुलामीच्या बेडया तोड आणि चलं पुस्तक हातात घेऊन… लेखणी घेऊन… विचारांची लढाई लढू… यांच्या गोळ्या कमी पडतील आपल्याला संपून टाकायला…हे जग विचारांनी सुंदर होतं….धर्मापलीकडच्या, जातीपलिकड्या…. प्रेमाच्या विचारांनी… बंदूक घेऊन हिंसा आणि द्वेष करणाऱ्या विचारांनी जनावर पण जगत नाही रे!

कुणाल

***

प्रिय कुणाल,
तुझे पत्र वाचले. मीही फार अस्वस्थ झालो. पण कारण वेगळे आहे. तुझे पत्र वाचून दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या खुनाची नैतिक जबाबदारी जणू माझ्यावरच आहे अशी भावना झाली. त्यामुळे मी अस्वस्थ झालो.
एखाद्याचे विचार पटले नाही म्हणून त्याचा खून करणे मलाही मान्य नाही. तरीही मी शांत का? त्यांच्या विचारांच्या लढाईत मी का नाही?
कारण या विचारवंतांचे विचार त्यांच्या खुनानंतरही नीटपणे माझ्यापर्यंत पोहोचलेले नाहीत.
माझा धर्म निवडण्याचा अधिकार माझ्याकडेही नव्हता. मलाही तो इतरांप्रमाणेच मिळाला. लहानपणापासूनच्या स्पून फिडिंगने गणपती, रामायण, महाभारतातील पात्रेही मला आपली, जणू आपल्या घरातीलच वाटू लागली. तसे तुझे विचारवंत कधीच वाटले नाहीत. खोटे सुद्धा सतत बोलत राहीले तर खरे वाटू लागते, त्यामुळे मित्र, नातेवाईक, आई-वडील सभोवतालचे लोक सतत देव-धर्म आणि त्याचे तथाकथित शत्रू यांच्या बद्दल जे बोलतात तेच खरे वाटू लागले. गरम पाणी आणि बेडूक यांचा प्रयोग तुला माहीतच असेल, हळूहळू तापणाऱ्या पाण्याशी बेडूक स्वतःला जुळवून घेत राहिला व शेवटी मेला, पण त्यातून बाहेर पडला नाही.
दाभोलकरांचा खून झाल्यावर तुझे असेच पत्र आले होते. त्यानंतर दोन वर्षांनी आज. धर्मांध लोक रोज त्यांचा प्रचार रेटून करत असतात. रामराज्याचे आश्वासन देत असतात. आपुलकीने बोलत असतात. ‘आपण’, ‘आपले’ असे शब्द वापरतात. आज धर्मप्रसारक शाळेपर्यंत पोहोचले आहेत. मग विवेकवाद्यांकडून असे का घडत नाही? विवेकी विचारवंतांच्या परिचयाच्या, त्यांचे विचार सोप्या भाषेत सांगणाऱ्या पुस्तिका सहज का उपलब्ध नाहीत? मान्य आहे की, धर्मांध लोकांइतका पैसा, लोकबळ विवेकवाद्यांकडे नाही पण आजच्या सोशल मिडियाच्या जमान्यातही ते का शक्य होत नाही? अविवेकी लोक जर सतत स्पून फिडींग करत असतील तर लोक कष्ट करून विवेकाची चव चाखायला कशाला येतील? चव कळण्यापुरते तरी विवेकाचे स्पून फिडींग करायला नको का? हे काम विवेकाच्या वारसदारांनीच करायला हवे ना?
सॉक्रेटीस, कान्ट, दे-कार्त, बर्कले, ह्यूम, हेगेल, स्पेन्सर, रसेल, चार्वाक, केशकम्बल, मक्खली गोसाल, गार्गी ही नावेही आम्ही ऐकली नाहीत. (आता गुगल सर्च करून लिहीली.) महावीर, बुद्ध, नानक केवळ धर्मसंस्थापक म्हणून माहीत आहेत. पण त्यांचे विचार माहीत नाहीत. संत आणि समाजसुधारकांनाही जातींनी वाटून घेतल्याने ते काय म्हणतात हेही माहीत नाही.
माणूस मारल्याने विचार मरत नाहीत, हे मान्य, पण असे म्हणल्याने ते वाढतही नाहीत. घोडा का आडला? भाकरी का करपली? पानें का कुजली? – फिरवली नाही म्हणून. तसेच विचार का खुंटले? याचेही उत्तर तेच आहे- फिरवले नाहीत म्हणून. फेसबुक, व्हाट्सऍपवर सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे, द्वेष पसरवणारे मेसेज फॉरवर्ड केले जातात. पण त्या मानाने विवेकी विचार नगण्यच असतात. ते वाढवण्याचे काम आपल्यालाच करायला हवे. त्यासाठी आपणही अभ्यास करायला हवा. यात तू मला मदत करशील ही अपेक्षा.
इतर कोणाहीप्रमाणे मीही बदलाला घाबरतो. ओळखीच्या वातावरणातच माणसाला सुरक्षित वाटते. विवेकाची बाजूच सत्याची, न्यायाची आहे हे तू माझ्यावर टीका न करता, मला न दुखावता पटवून द्यायला हवे. तू ज्यांना गुलामीच्या बेड्या म्हणतोस त्यांचाच मला आधार वाटतो. विवेकवाद जर मला भक्कम आधाराची खात्री देत असेल तरच मी बेड्या तोडायचे धाडस करीन. हा विश्वास तूच मला द्यायला हवा. हो ना? लढाईच्या वेळी मी त्याचीच बाजू घेणार ना ज्याचा मला विश्वास वाटेल. महाभारतातही कित्येक दिग्गज, विचारी योद्ध्यांना कोणाची बाजू घ्यावी याचा योग्य निर्णय घेता आला नाही. सामान्य माणूस नेहमी न्यायाच्या बाजूनेच असतो, पण विवेकाची बाजूच योग्य आहे. हे तुला पटवून देता यायला हवे. त्याच्या डोक्यात अविवेकी, प्रतिगामी, धर्मांध, जात्यांध विचारांचा सतत भरणा होत आहे. त्याच्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे त्यातले योग्य निवडतो. त्याला निवडीसाठी विवेकीविचार सहज व सोप्या भाषेत उपलब्धच नसतील तर तो काय निवडणार. मी विचार करणारच नाही असे नाही, तू विवेकवाद समजावून देणारे, एकतरी पत्र दर आठवड्याला पाठवशील अशी आशा करतो.
पत्रांची वाट पाहात आहे.

तुझा मित्र

मिलिंद

milind.sontakke@gmail.com