जिकडे पैसा जास्त तिकडे आयाआयटीयन्स

मागच्या आठवड्यात बेंगळुरूमधील आयआयएसच्या पदवीदान समारंभात इन्फोसिसचे एक संस्थापक नारायण मूर्ती यांनी सर्वोत्तम शिक्षणाचा दावा करणाऱ्या आयआयटी व आयआयएम या शिक्षणसंस्थांमधून बाहेर पडणारे विद्यार्थी काय संशोधन करतात, यावर नेमकेपणाने बोट ठेवलं आहे. एकप्रकारे त्यांनी उच्चशिक्षणाचं ऑडिटच केलं आहे. नारायण मूर्ती यांचं म्हणणं बरोबर आहे. त्याची कारणं माझ्या दृष्टिकोनातून अशी आहेत की, आयआयटीमधून बाहेर पडलेले बहुसंख्य विद्यार्थी परदेशात गेले. तिथे त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ज्या नोकऱ्या स्वीकारल्या, त्या सगळ्या रुटीन स्वरूपाच्या होत्या. त्यात स्वतंत्र संशोधनाला फारसा वाव नव्हता. तिथेसुद्धा विद्यापीठांमध्ये फार कमी जण गेले. भारतात जे थोडेफार राहिले, त्यांच्याही नोकऱ्या अशाच स्वरूपाच्या होत्या. रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी हे खातं सरकारच्या अखत्यारित आहे. त्यात पगाराचं कोष्टक आयआयटी पदवीधराच्या दृष्टिकोनातून तेव्हा कमी होतं. याउलट, खासगी कंपन्यांमध्ये सेल्स, मार्केटिंग यात त्यांना जास्त पगाराच्या नोकऱ्या मिळत होत्या. त्यामुळे रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी मध्ये फारसं कुणी दाखल झालं नाही. जे विद्यार्थी जॉइन झाले, त्यांना थोडंफार काम करता आलं. उदा. रॉकेट रिसर्चमध्ये आपण बरंचसं काम केलेलं आहे. परम संगणकामध्ये आपल्याकडे चांगलं काम झालेलं आहे.
आयआयटीला साधारणपणे 1950 पासून सुरुवात झाली. खरगपूर आयआयटी 1953-54 मध्ये सुरू झाली, मुंबई आयआयटी 1957 मध्ये सुरू झाली. म्हणजे साठेक वर्षं तरी नक्कीच झालेली आहेत; पण राष्ट्रीय स्पिरिटचा अभाव, भौतिकतेकडे जास्त कल, यामुळे अनेक जण परदेशात जाणं पसंत करतात. तिकडे गेलेल्यांपैकी संशोधनाकडे फारसं कुणी वळत नाही. परदेशात इझी लाइफस्टाइल मिळते, पगार व्यवस्थित मिळतो, दैनंदिन जीवनातल्या ज्या अडचणी भारतात असतात, त्या तिथे नसतात, म्हणून अनेक जण सॉफ्ट ऑप्शनच्या मार्गाने जातात. त्यामुळे फारसं कुणी चॅलेजिंग काम केलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचंसुद्धा हेच मत आहे.
हरितक्रांती-धवलक्रांती 60 च्या दशकात झाली असली, तरी त्या क्षेत्रात जे मूलभूत संशोधन या देशाच्या तत्त्वज्ञानावर आधारित व्हायला हवं होतं, ते झालेलं नाही. मूलभूत संशोधनाकडे वळण्याची आयआयटीमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या, तिथून पदवीधर होऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची मानसिकता जवळजवळ नसते. वैयक्तिक जीवनात सुखसोयी कशा मिळतील, याकडेच त्यांचा कल असतो. म्हणजे एखाद्या ब्रँचला स्कोप आहे याचा अर्थ काय, तर तिथे जास्त पैसा खेचता येतो असाच घेतला गेला आणि त्यादृष्टीने कामं केली गेली. मूलभूत संशोधन होण्यासाठी राष्ट्रीय अस्मिता लागते. ती पेरली गेली नाही, त्यामुळे ती उगवली नाही. आतासुद्धा तेच दिसतंय. स्वच्छतेचं सांगितलं जात आहे; पण ती आम्ही शाळेत शिकवली का? ते गेल्या साठ वर्षांत झालेलंच नाही. मूलभूत संशोधन सोडून द्या, साधी-साधी शिस्त शिकवलेली नाही. संस्कार-शिस्त दिली गेली नाही. आमचा सुशिक्षित माणूस चौकात सिग्नल लागलेला असला, तरी आपली गाडी दामटवतोच. असे लोक वैयक्तिक चंगळवादामागे जाणार हे उघड आहे. म्हणून नारायण मूर्ती यांचे विचार कटू आहेत; पण सत्य आहेत असं मला वाटतं. मी अनेक वर्षं आयआयटीच्या मुलांना शिकवलं आहे. आयआयटीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन आपल्याला चांगली नोकरी मिळेल असाच असायचा. आम्ही जेव्हा एनडीएसाठीचे वर्ग सुरू केले, तेव्हा त्याला हुशार विद्यार्थी येतच नसत. डिफेन्समध्ये आयआयटीचे पदवीधर फारसे गेलेलेच नाहीत. आर्म्ड फोर्स, एअर फोर्स, नेव्ही यांमध्ये फार कमी प्रमाणात आयआयटी पदवीधर जातात. माझ्या पाहण्यात आयआयटीसाठी निवड झालेला कुठलाच मुलगा पुढे एनडीएकडे वळलेला नाही. रिसर्च अँड डेव्हलपमेंटकडे त्यातलं कुणीच गेलेलं नाही. पदवीनंतर त्यांनी ब्रँच कुठलीही असो, सॉफ्टवेअरमधली नोकरी स्वीकारली. त्यात ते साधंच काम करतात. सॉफ्टवेअरमधलं एखादं डिझाइन कुणीतरी केलेलं आहे. त्या माणसाने क्रिएटिव्हिटी लावली आहे; पण बाकीचे लोक ते फक्त इम्प्लीमेंट करत करतात. त्याला फारसी क्रिएटिव्हिटी लागत नाही. म्हणून कुठलं मूलभूत संशोधन होऊ शकलेलं नाही. त्यासाठी जे स्पिरिट लागतं ना, ते अब्सेंट आहे.
भारतात किंवा परदेशात नोकरी करणारी आयआयटीतली मुलं सॉफ्टवेअरलाच प्राधान्य देतात. कारण त्यात पगार चांगला आहे. एनडीएकडे न वळण्याचं कारण म्हणजे त्यात पगार कमी आहे. रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये कदाचित आता पगार चांगले झाले असले तरी 80-90 च्या दशकात खूपच कमी होते.
जर देशाचा इतिहासच परकीय भाषेतून शिकवला जात असेल, तर राष्ट्रीय अस्मिता कशी उभी राहील? सुरुवातीचं ठराविक शिक्षण मातृभाषेतून असायला हवं होतं. त्यातून एकतेची भावना निर्माण होते; पण इंग्रजीमुळे ती झालेलीच नाही. इंग्रजी माध्यमाकडे जो ओढा आहे, त्यातून व्यक्तीची क्रिएटिव्हिटी फारशी पुढे येत नाही. ज्या भाषेत मी जन्मापासून विचार करतो, जी भाषा मी माझ्या आईवडिलांशी बोलतो, त्या भाषेतून मूलभूत संशोधन हे जास्त चांगलं होईल. मातृभाषेतून शिक्षण झालं असतं, तर विद्यार्थ्यांच्या क्रिएटिव्हिटीची पातळीपण जास्त चांगली झाली असती. चीन-जपानचं, जर्मनी यांचं उदाहरण तसंच आहे; पण आपण त्याकडे दुर्लक्ष करण्याची घोडचूक केलेली आहे. त्यामुळे बौद्धिक क्रिएटिव्हिटी मार खाते. कारण पाठांतर करून शिकण्याची वृत्ती विकसित होते. सरधोपट नोकरीत ते चालून जातं.
आयआयटीमध्ये जी टॉप टॅलेंट शिकली, तीच आयआयटीत शिकवायला फार कमी प्रमाणात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबर आयआयटीमधल्या प्राध्यापकांकडूनही फारसं काही संशोधन झालेलं नाही. प्राध्यापकांमध्येसुद्धा प्रमोशन, पीएफ, निवृत्त झाल्यानंतर किती पैसे मिळणार याची चर्चा जास्त होते. सरकारचंही तसं प्रोत्साहन नसतं. उदा. एअरक्राफ्ट इंडस्ट्रीत तुम्ही विमानाचं डिझाइन करायला लागल्यानंतर ते निर्मितीच्या टप्प्यावर येईपर्यंत विकसनशील देशांना 25 ते 30 वर्षे लागतात. तोपर्यंत आपण केलेलं डिझाइन आउटडेटेड होतं आणि एअरफोर्सचा दबाव असतो की, आम्हाला स्टेट ऑफ दी आर्ट टेक्नॉलॉजी असलेलं पाहिजे. तेव्हा तुम्ही ते परदेशातून विकत घेणंच पसंत करता; पण जेव्हा स्पेस रिसर्चमध्ये आपलं नाक दाबलं गेलं, तेव्हा तोंड उघडलं. उपग्रह अंतराळात पाठवण्यासाठी जे रॉकेट लागतं, ते इतर देशांनी द्यायचं नाकारल्यावर ती डेव्हलपमेंट आपल्याकडे झाली. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी भारतीय शास्त्रज्ञांना विचारलं की, तुम्ही हे करू शकाल का? तेव्हा त्यांनी ते आव्हान पेललं आणि करून दाखवलं. म्हणजे जिथे आपल्याला स्वातंत्र्य दिलं, तिथे आपण पुढेही जाऊ शकलो. म्हणजे केव्हातरी नाक दाबावं लागतं. तेवढा खंबीरपणा जिथे-जिथे दाखवला गेला, तिथे-तिथे आपल्याकडे संशोधनाचं काम झालेलं आहे. उदा. डिफेन्स आणि सॅटेलाइट. आता आपण इतर देशांचे सॅटेलाइट लाँच करतो. त्यातलं संशोधन मूलभूत नाही म्हणता येणार. इतर देशांकडे जे उपलब्ध होतं; पण त्यांनी आपल्याला न दिल्यामुळे आपण संशोधन करून तो मार्ग शोधून काढला. म्हणजे सक्ती झाली, तेव्हा या गोष्टी होऊ शकलेल्या आहेत.
शिकलेल्या लोकांनी ग्रामीण भारतासाठी किंवा संबंध देश पुढे जाईल या पद्धतीने काम केलेलं नाही. त्यांनी परदेशात जाणं पसंत केलं. तिथंही त्यांनी खूप मर्दुमकी गाजवली असंही झालेलं नाही. कारण त्यांनी सॉफ्ट ऑप्शनच निवडले. भारतीय तत्त्वज्ञान चंगळवादाच्या वाटेने जात नाही; पण पाश्चात्त्य तत्त्वज्ञान चंगळवादाकडे जास्त झुकलेलं आहे. त्याचा प्रभाव मुलांवर जास्त पडतो. आम्ही आमचं तत्त्वज्ञान जर का दिलं असतं, तर ही अस्मिता नक्कीच उभी राहिली असती. पाश्चात्त्य देशांत मूलभूत संशोधन झालं; पण सगळा जगभरचा माणूस पुढे जाईल, यासाठी त्याचा किती वापर झालेला दिसतो? उलट, त्याचा उपयोग त्यांनी इतर देशांवर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेला दिसतो. आपल्याकडे चांगलं संशोधन होऊन आपण चांगल्या मार्गाने जाऊ शकलो असतो; पण तो तत्त्वज्ञानाचा पाया आपण हरवला. त्यामुळे क्रिएटिव्हिटीनेही मार खाल्ला. सगळ्याच सावळ्या गोंधळात माणूस त्याला जो मार्ग सोपा वाटतो, तो निवडतो. आमच्या वेळेस जो गोल्ड मेडलिस्ट होता, त्यानेसुद्धा रुटीन जॉब स्वीकारला. त्याच्यानंतरचा जो मुलगा होता, त्याचं क्वॉलिफिकेशन होतं इलेक्ट्रिकल्स इंजिनियरिंगमध्ये. तो बिल्डर झाला. मग, मूलभूत संशोधन होईल कसं?
शिक्षणाचा मूलभूत जो आराखडा आहे, तो बदलणं अत्यंत आवश्यक आहे. गुरुकुल पद्धतीचं शिक्षण सुरू करायला हवं. तिथे समाजातल्या इतर गोष्टींचा विद्यार्थ्यांवर प्रभाव पडणार नाही. नीतिमत्ता, प्रामाणिकपणा, संस्कार, शिस्त या गोष्टींचं महत्त्व ज्यात असेल, अशा पद्धतीची शिक्षणव्यवस्था जेव्हा उभी राहील, तेव्हा आपल्याकडे चांगल्या गोष्टी घडू शकतील. मी इतकी वर्षं शिकवलं. आमच्याकडे बघून आमचे विद्यार्थी निदान प्रामाणिकपणे नोकरी करतील. विद्यार्थी शिक्षकाचं चारित्र्य उचलतात. तो प्रामाणिक असेल, तर तेही प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतात. शिक्षक निर्व्यसनी असेल, तर विद्यार्थी तसं होण्याचा प्रयत्न करतात. एवढा प्रभाव विद्यार्थ्यांवर नक्की पडू शकतो. पूर्ण प्रभाव काही पडत नाही आणि पडलेला प्रभाव फारकाळ टिकतही नाही. म्हणून मला गुरुकुल पद्धती योग्य वाटते. तिथे विद्यार्थी-शिक्षक यांचा सखोल संबंध येतो. त्यातून चांगला विद्यार्थी घडू शकतो.
आपल्याकडे बुद्धिमत्तेचे जे निकष आहेत, त्यात स्मरणावरच जास्त भर आहे, पण बुद्धिमत्तेच्या अनेक कसोट्या असतात. त्यातून त्या-त्या क्षेत्रातल्या व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचा विकास होणं आवश्यक असतं. चांगला मूर्तिकार, चांगला चित्रकार तयार होण्यासाठीही बुद्धी लागते; पण आपण ज्याला बुद्धिमान म्हणतो, त्याची फारफार तर स्मरणशक्ती चांगली असते. मी बोर्डात आलो होतो. त्यामुळे मी हे सांगू शकतो की, त्यासाठी फक्त स्मरणशक्तीच लागत होती. आमच्या क्रिएटिव्हिटीचा कस लागला, असं मी म्हणू शकत नाही.

मी मराठी live (26 जुलै 2015) सौजन्याने

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.