Category Archives: जात-धर्म

महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निमित्ताने…

महाराष्ट्रातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ‘बाबासाहेब पुरंदरे’ यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि त्यानिमित्ताने नुकताच झालेला प्रचंड वाद हा महत्वाचा आहे.
पुरोगामी चळवळ सांस्कृतिक राजकारण कसे करते, आपले डावपेच कसे मांडते- प्रतिपक्षाचे डावपेच कसे जोखते, वादंगाच्या आपल्या व्याख्या कितपत जोरकसपणे लोकांपुढे मांडते या सगळ्या परीप्रेक्ष्यामध्ये काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत – तसे ते घेतले नाहीत तर आपल्या विरोधाची दिशाच चुकते चुकत आली आहे असे मला वाटते. त्यासाठी हे छोटे टिपण.
जातीचा प्रश्न
एकूण या वादामध्ये ब्राह्मणी छावणी (ब्राह्मण नाही) हुशारीने ‘मूळ प्रश्न ‘जातीचा आहे’, ‘पुरंदरेंच्या जातीमुळे त्यांना विरोध’ असे ‘तांडव’ करून आपण किती ‘सोवळे’, ‘जात पात विसरून पुढारलेले’ अशी मुद्द्याला बगल देत आहे. हिंदुत्व हा मुळात त्याचाच व्यापक परिपाक आहे- ब्राह्मणी छावणीच्या जात-विस्मरणातील आटोकाट प्रयत्नांचा. त्याला विरोध म्हणून ‘मराठा-विरुद्ध ब्राह्मण’ असा वाद लागणे हे ब्राह्मणी छावणीसाठी सोयीचे आहे. त्यांच्या मानभावी कारस्थानाला पोषक आहे. पुरोगामी संघटनांनी हा कावा ओळखला पाहिजे.
आता पुरोगामी संघटना हा कावा खरे तर ओळखून आहेतच. त्याला प्रतिक्रिया म्हणूनच तर स्थूलपणे communist आणि समाजवादी संघटना ‘पुरंदरे यांच्या प्रतिगामी इतिहास-दृष्टीलाही विरोध आणि संभाजी ब्रिगेड च्या मराठा केंद्रित राजकारणाला सुद्धा विरोध’ अशी ‘दोन्ही पक्षांपासून एक समान अंतर ठेवणारी’ भूमिका घेतात- मुक्ता दाभोलकर यांच्या ‘लोकसत्ता’ मधील पत्राने हा मुद्दा अधिक स्पष्ट झाला आहेच. खरे तर पुरंदरे यांच्या जेम्स लेन प्रकरणी सुद्धा अशीच भूमिका पुरोगामी संघटनानी घेतली होती. पण कळीचा प्रश्न असा आहे, की या भूमिकेचा राजकीय अर्थ काय निघतो? या भूमिकेतून वादाला काही नवे वळण मिळाले आहे काय? की त्यामुळे केवळ राजकीय नैतिकता जपली जाते? पुन्हा त्या नैतिकतेचा राजकीय फायदा होईल अशी काही संघटनात्मक बांधणी करून लोकांना आपली भूमिका पटवून देणे असाही पवित्रा दिसत नाही.
दुसऱ्या बाजूला विशेष नजरेत भरते तो दलित संघटना, साहित्यिक यांचे मौन. आता त्या मौनाचा अर्थ ‘हा झगडा ब्राह्मण आणि मराठा यांचा सत्ता वर्चस्वाचा आहे. या नागनाथ आणि सर्पनाथ यांच्या लढाई मध्ये आम्ही दलितांनी काय म्हणून पडावे’ असा काहीसा निघतो. म्हणजे दलित, पुरोगामी यांच्या भूमिका समांतर जात आहेत. ‘ह्या दोन बोक्यांच्या लढाई मध्ये आम्ही पडणार नाही. आमची लढाई वेगळी आहे, दुष्काळ, अत्याचार, आरक्षण अशा सामाजिक, आर्थिक म्हणजे ताबडतोबीच्या गोष्टींवर आम्ही लढतो आहोत. आम्ही FTII, आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल अश्या शिक्षणाच्या भगवीकरनाबद्दल जरूर संघर्ष करू. पण उगीच लोकप्रिय इतिहास आणि त्याचे आकलन, त्याचे सांस्कृतिक राजकारण ह्यामध्ये आम्हाला गोवू नका’. असा काहीसा एकूण सूर दिसतो.
प्रश्न संभाजी ब्रिगेड किंवा शरद पवार यांचे आंधळेपणाने समर्थन करायचे का असा नाही. प्रश्न आपल्या राजकीय भूमिकेचा आणि तौलनिकपणाने अधिक घातक शत्रू कोण हे ठरवून त्याप्रमाणे लढण्याचा आहे. आणि एका पातळीवर, आपला इतिहास सांप्रदायिक तऱ्हेने लिहिण्याला आपला विरोध केवळ समान अंतर ठेवून किंवा सोयीस्कर मौन पाळून स्पष्ट होत नाही. केवळ समान अंतर ठेवून ‘शुचिता’ जपता येईल, त्याने राजकारण सिद्ध होणार नाही. होत नाही. त्याने केवळ आपला गोंधळ किंवा आपली क्षीण राजकीय ताकद दिसते.
दुसरा मुद्धा पुरंदरे यांच्या ‘इतिहासाचा’. एका बाजूला त्यांनी आपल्या शाहिरीने महाराष्ट्रातील लोकांना ‘शिवाजी महाराजांची ओळख करून दिली’ असे जे लबाडीने खपवले जाते ते बाजूला ठेवू. फुले, आणि टिळक यांनी ते काम आधीच करून ठेवले होते. पण, पुरंदरे यांनी ‘नव्याने’ ओळख दिली हा भाग खरा आहे आणि fascist इतिहास पुनर्लेखन किती यशस्वी झाले आहे त्याचा पुरावा आहे. आता पुरंदरे यांन्च्याबद्दल ‘प्रतिगामी’ आणि ‘ब्राह्मणी’ अशी विशेषणे वापरताना एक सावधगिरी बाळगली पाहिजे. ‘सामना’ चे संपादकीय, पुरंदरे यांचे लेखन, आणि दर रोजच्या व्यवहारात लोकांचे सांप्रदायिकपण यासाठी एकच एक ‘प्रतिगामी’ असे विशेषण वापरताना त्या प्रत्येक प्रतिगामी व्यवहारात असलेले निराळे संदर्भ, त्यांचे व्यवहारातील वेगळेपण हे लक्षात ठेवले पाहिजे.
पुरंदरे यांचा इतिहास, हिंदुत्वाच्या प्रिय अश्या ‘द्विराष्ट्र’ सिद्धांतावर उभा आहे. यादव, विजयनगर यांच्या पाडावानंतर ३५० वर्षांची काळरात्र होते ती ह्याच ‘हिंदू राष्ट्र’ च्या कल्पनेला धरून. ‘सकळ पृथ्वी आंदोळली ‘धर्म गेला’ असे मंदिरांच्या लुटीचे वर्णन होते. ‘गरीब बिचारे हिंदू (गायीप्रमाणे) परकीय मुस्लीम कसाई राज्यकर्त्यांचे जुलूम सहन करत राहतात, कुणी एखादा अवतारी पुरुष शिवाजीप्रमाणे आला तर हेच हिंदू दगाबाजी करतात, राष्ट्र महान आहे, पण इथले लोक अज्ञ आहेत’ असे १९८० नंतर जोमाने पुढे आलेले राजकीय हिंदुत्व, पुरंदरे यांच्या इतिहासाच्या मशागतीवर उभारलेले आहे. खरे तर त्याला मूळ आधार आहे तो इतिहासाच्या ‘प्राचीन च्या ऐवजी हिंदू, मध्ययुगीन च्या ऐवजी मुस्लीम आणि आधुनिक च्या ऐवजी ब्रिटीश’ अश्या विभागणीचा. अगदी रियासतकार सरदेसाई देखील ह्या ब्रिटीश राजवटीतल्या इतिहासाच्या काळ विभागणीचा आसरा घेतात. ‘हिंदू हे मूळ रहिवासी आणि मुस्लीम हे मूळ आक्रमक‘ अशी ही विभागणी RSS च्या प्रिय सिद्धांताला पोषक आहे. साम्राज्यवादविरोधी लढ्यात फूट पाडणारी आहे. खरी चिंतेची बाब अशी आहे की ‘मूळ निवासी’ हा सिद्धांत लोकप्रिय झाला आहे, लढ्याचा पाया बनला आहे. ब्राह्मणी असो की अब्राह्मणी, दोन्ही छावण्या ‘मूळ निवासी’ ह्या मांडणी ला धक्का देत नाहीत. आणि तसे झाले की अगदी ‘पुरोगामी’ म्हणवणाऱ्या आंदोलनाना देखील कसे प्रतिगामी वळण मिळते हे आपल्या चांगलेच परिचयाचे आहे. त्या अर्थाने दलित- पुरोगामी संघटना ह्या वादापासून का फटकून राहिल्या आहेत हे समजण्याजोगे आहे. पण तितकेच धोकादायक देखील आहे.
अनैतिहासिक इतिहास आणि राजकारण
अखेर ‘उदारमतवादी आणि मानभावी लोकांच्या समजुतीप्रमाणे जुन्या इतिहासकारांनी पुरंदरे यांच्या इतिहासाबद्दल काय म्हटले आहे ते सांगून’ वाद मिटणार नाही, मिटत नसतो. कारण तेव्हा सोयीने पुरंदरे यांची होते ‘शाहिरी’, ‘ललित कला’. मग ‘शहाजी- जिजाबाई विरुध्द रामदास-दादोजी’ असले वर्गीकरण हे आपल्या वर्तमान संघर्षाचे एक rhetorical ऐतिहासिक रूप बनते आणि त्यात कल्पनाविस्तार होतात, ‘आपले विरुध्द त्यांचे’ अशा तऱ्हेने. आता हे कल्पनाविस्तार एका पातळीवर ‘हिंदू विरुध्द मुस्लीम’ असला काल्पनिक संघर्ष देखील त्या काळात होता (शिवाजी- चंद्रराव मोरे, जय सिंग किंवा शिवाजी कुतुब शहा संबंध विसरून), ह्या logic च्या तऱ्हेचे राहतात. इतिहास लेखन म्हणजे आजच्या राजकीय संघर्षाचे विस्तारित रूप असते. ‘identity’ ला मूळ ठेवणाऱ्या राजकारणात असले अनैतिहासिक प्रकार होतच राहणार. जातीचा प्रश्न, इतिहास की शाहिरी असले वाद निव्वळ मानापमानाच्या लढाईत सुटणारे नाहीत. उलट ते जास्त गडद होतात.
‘कुळवाडी भूषण’ शिवाजी आणि राष्ट्रक
तेव्हा ह्या अनैतिहासिक इतिहासाच्या राजकारणात महात्मा फुले- कॉम्रेड पानसरे यांच्या ‘कुळवाडी भूषण’ शिवाजीला मध्यभागी आणायची आवश्यकता आहे. १७व्या शतकात ‘राष्ट्र’ किंवा ‘धर्म’ आजच्या आधुनिक अर्थाने किंवा तऱ्हेने वापरात नव्हते. त्या काळातील उत्पादन संबंध, त्यातील शिवाजीचे योगदान आणि महत्व, जमीनदाराना बसवलेला चाप हे खरे त्या राष्ट्रवादाचे मूळ आहे. नाहीतर, राजपूत राजे कमी ‘हिंदू’ नव्हते. पण महाराष्ट्र हे राष्ट्र बनले, जुलमी पेशवाई मधेही टिकून राहिले, ते शिवाजीच्या ह्या क्रांतिकारक धोरणामुळे. त्यामुळे त्याला एकदम महाराष्ट्रातील लेनिन करायची गरज नाही. (राजवाडे यांनी रामदासाला महाराष्ट्राचा हेगेल म्हटले होते तसे). पण ‘जातिच्या आधारित विरोध आहे’ असे जे म्हणतात त्यांचा प्रतिवाद केवळ जातीसंबंध आणि त्यातील जुलूम, अपमान उलगडून होत नसतो- त्यातील वर्गसंबंध देखील लक्षात ठेवावे लागतात. फुले यांचे मोठेपण त्यासाठीच कि त्यांनी ‘कुळवाडी भूषण’ हे ‘व्यापक जाती-सूचक आणि वर्ग-वाचक’ अभिदान वापरले. आणखी महत्वाचे म्हणजे आजही आपली राष्ट्रक म्हणून जी ओळख आहे ती ‘शिवाजी’शी निगडीत आहे. केवळ प्रतिगामी शक्तींना दोष देऊन, ती ओळख बदलणार नाही. आपले आजचे उत्पादन संबंध, जाती संघर्ष हे विशिष्ट तऱ्हेने व्यक्त होतात आणि त्यासाठी आजही ‘राष्ट्रक’ ही ओळख महत्वाची आहे. कॉम्रेड डांगे, कॉम्रेड पानसरे अश्या communist नेत्यांनी ‘शिवाजी’ ही राष्ट्रक म्हणून महाराष्ट्राची ओळख लक्षात ठेवून ‘शिवाजी आमचा आणि त्यांचा’ अशी रोखठोक ‘लोकांचा राजा शिवाजी’ म्हणून आपली भूमिका मांडली. ‘फुले शाहू आंबेडकर’ यांचा महाराष्ट्र आहेच, पण शिवाजी आणि महाराष्ट्र ही ओळख देखील मूलभूत आहे, तिला पुरेसे महत्व देण्याची गरज आहे. पुरोगामी विचार आणि राष्ट्रवाद याबद्दलचा यशस्वी fascist प्रचार कुठेतरी आपल्या राष्ट्रवादाच्या व्याखेतील त्रुटीचा आणि तिला प्रतिगामी राष्ट्रावादापासून वेगळ्या अशा पायावर उभी न करण्याचा परिपाक आहे. मग एकीकडे ‘सर्वच राष्ट्रवाद घातक’ अशी समजूत होते, किंवा ‘आर्थिक बाबतीत पुरोगामी डावी भूमिका आणि सांस्कृतिक क्षेत्र उजव्या शक्तींना मोकळे’ अशी परिस्थिती होते.
माझ्या माहितीप्रमाणे विद्याधर दाते यांनी आपल्या countercurrents.org मधील लेखात शिवाजीला ‘पुरोगामी, secular, किंवा जमीन महसुलात क्रांतिकारी सुधारणा करणारा लोकप्रिय राजा’ असे ठरवण्याची गरज नाही असे प्रतिपादन केले आहे. प्रश्न असा आहे- की शिवाजीला कोणीही डाव्या पक्षांनी क्रांतिकारक ठरवलेले नाही. पण मग ‘शिवाजी आणि महाराष्ट्र’ असा संबंध कसा वाचायचा? राजकारणाला सतत आर्थिक पाया आणि इमला असे पाहणे किती धोकादायक असते ते नव्याने सांगायला नको. पण शिवाजीच्या लोकप्रियतेचा आणि महाराष्ट्र या राष्ट्रकाच्या उदयाचा आर्थिक संबंध कसा पहायचा ते देखील महत्वाचे आहे. मध्ययुगीन राजावर आधुनिक कल्पनांचे आरोपण नको हे ठीक आहे. पण त्या काळाच्या संदर्भात आणि जमीनदारांशी असलेल्या शिवाजीच्या राजकीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर हा इतिहास मांडला पाहिजे. तरच त्याचा अर्थ लागायला मदत होते.
अखेरीस, लोकप्रिय संस्कृतीमध्ये पुरोगामी विचारांची पीछेहाट काही आजची नाही. त्यात कॉम्रेड पानसरे यांचे बलिदान हे सर्वात ठळक. एकीकडे रेशीमबागेच्या तालावर चालणारे फडणविशी सरकार कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येकडे डोळेझाक करते, आणि दुसरीकडे बाबासाहेब पुरंदरे सारख्याना ‘महाराष्ट्र भूषण’ म्हणून गौरवते हा विरोधाभास नाही. त्यात एक उघड राजकीय सातत्य आहे. कॉम्रेड पानसरे यांच्या लढाईचा खरा अर्थ ह्या ब्राह्मणी छावणीला, इतिहासाच्या विकृतीकारणाला एक सातत्यपूर्ण राजकीय विरोध आहे. ही लढाई शिवाजी चे केवळ banner, sticker किंवा ‘मराठ्याचा अपमान’ असे नारे देऊन जिंकता येणार नाही. ब्राह्मणी छावणीकडे त्याला पुरून उरेल इतका पैसा, वेळ, कावा, चातुरी आणि पुरंदरे आहेत. त्याला शह कसा द्यायचा हा खरा प्रश्न आहे. आणि त्यासाठी पुरोगामी- दलित चळवळीचा हस्तक्षेप महत्वाचा आहे. म्हणूनच ‘केवळ ‘समान अंतर’ ठेवू नका, किंवा मौन पाळू नका, गो. पु. देशपांडे म्हणत तसे ‘धिटाईने वादंगात सहभागी व्हा!’

rahul.democrat@gmail.com,

इस्लामवादी दहशतवाद: पडद्यामागचे राजकारण

 इस्लामच्या नावावर गेल्या अनेक वर्षांपासून जगाने हिंसा आणि दहशतवादाच्या असंख्य घटना झेलल्या आहेत. यातील अनेक इतक्या क्रूर आणि माथेफिरूपणाच्या आहेत की, ना त्या विसरल्या जाऊ शकतात, ना त्यांना माफ करता येते. ओसामा-बिन-लादेनने योग्य ठरविलेल्या 9/11च्या हल्ल्यात 3000 निरपराधी व्यक्तींचे मृत्यू, पेशावरमधील शालेय मुलांवरील हल्ला, बोकोहरमद्वारे केलेले शाळेतील मुलांचे अपहरण, चार्ली हेब्दोवरील हल्ला आणि आयसिसद्वारे केल्या गेलेल्या घृणास्पद हत्या इत्यादी हल्ले यात सामील आहेत. या सर्व घटना घोर निंदा करण्यास पात्र आहेत आणि त्या साऱ्या सभ्य समाजाला शरमेने मान झुकविण्यास बाध्य करणाऱ्या आहेत.
‘इस्लामिक दहशतवाद’ हा नवा शब्दसमूह 9/11च्या हल्ल्यानंतर प्रचलित करण्यात आला. हा शब्द इस्लामला सरळ दहशतवादाशी जोडतो. इस्लामवादी दहशतवाद बऱ्याच काळापासून सुरु आहे आणि साऱ्या जगात कर्करोगासारखा पसरत आहे, हे खरे आहे. इस्लामच्या नावे वारंवार होत असलेले हिंसक आणि दहशतवादी हल्ले होत असल्याने, याचा संबंध इस्लामशी आहे, असे प्रतीत आहे. हीच गोष्ट अमेरिकन प्रसारमाध्यमे अनेक वर्षांपासून प्रसारित करत आली आहेत आणि हळूहळू अन्य देशातील प्रसारमाध्यमांनीही हाच राग आळविणे सुरु केले आहे. एक अगदी साधारणसा प्रश्न हा आहे की, जर या घटनांचा संबंध इस्लामशी आहे, तर या घटना मुख्यत: तेल उत्पादक देशातच का होतात?
या समाजव्याप्त भ्रमाला पुढे नेत, अनेक लेखकांनी इस्लाममध्ये सुधारणा घडवून आणल्यास, या समस्येचे निराकरण होईल असा तर्क केला आहे. इस्लामला अतिरेकी प्रवृत्तींपासून मुक्त करण्यासाठी ‘धार्मिक क्रांतीची’ गरज आहे, असे काहींचे म्हणणे आहे. इस्लामवर, हिंसा आणि दहशतीवर विश्वास असणाऱ्या कट्टरपंथी तत्त्वांचे वर्चस्व स्थापित झाले आहे, असेही म्हटले जात आहे. म्हणून इस्लाममध्ये सुधारणा झाल्यास हिंसा संपून जाईल. प्रश्न हा आहे की, कट्टरपंथियांमागे अशी कोणती ताकद आहे, की ज्या भरवशावर, इस्लाम एक शांतिपूर्ण धर्म, या रूपाने असलेल्या इस्लामची व्याख्या नाकारता येईल. ती ताकद इस्लाम आहे काय? की इस्लामचा मुखवटा घातलेले राजकारण आहे? या काळात जगभरात इस्लामच्या नावे जी हिंसा होत आहे, तो मानवतेच्या इतिहासातील एक कलंकित अध्याय आहे, आणि त्याची केवळ निंदा करून चालणार नाही, तर त्याला मुळातून उखडून टाकण्याचे प्रयत्न व्हायला हवेत, यावर कोणतेही दुमत नाही.
इस्लामवादी दहशतवादी, मानवतेचे शत्रू बनून गेले आहेत. परंतु आपल्याला हे सारे प्रकरण समजून घेण्याची, आणि जे केवळ वरवर दिसते, त्या आधारावर आपले मत न बनविण्याची गरज आहे. यामागे कोणत्या शक्ती आहेत, हे समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. केवळ सैद्धांतिक सुधारणा करून ‘तेलाच्या राजकारणाचा’ सामना करता येवू शकेल – त्या राजकारणाचा, ज्याला चोरून-लपून काही निहित स्वार्थ समर्थन देतात, कारण ते कोणत्याही मार्गाने आपले ध्येय साध्य करू इच्छितात. ज्या राजकारणाने, इस्लामच्या नावावर या प्रकारच्या हिंसक प्रवृत्तींना जन्म दिलाय, ते राजकारण आपण ओळखायला हवे आणि त्याला उघडे पाडायला हवे.
मौलाना वहिदुद्दिन खान, असगर अली इंजिनिअर आणि अन्य व्यक्तींनी, दहशतवाद जगाच्या एका भागातून दुसऱ्या भागात फैलावत असताना आणि अत्यंत क्रूरतापूर्ण व कुत्सित दहशतवादी कारवाया सुरु असताना, इस्लामचा मानवतावादी चेहरा जगासमोर ठेवला. इस्लामची मानवतावादी तत्त्वे मुख्य प्रवाहात का येत नाहीत? कट्टरपंथी लोक इस्लामच्या संस्करणाचा वापर हिंसा आणि अमानवी कार्ये करण्यासाठी करीत आहेत आणि इस्लामचे औदार्यवादी आणि मानवतावादी विचार बाजूला सरकविले जात आहेत. कुराणचा वेगवेगळा अर्थ लावला जात नाही, असेही नाही. आणि तर्कवादी आंदोलने नाहीत असेही नाही. परंतु जगातील तेलाच्या साठ्यावर कब्जा करण्याच्या राजकारणाने दहशतवादाचे उत्पादन करणारे कारखाने स्थापन केले आहेत आणि औदार्यवादी आणि मानवतावादी आवाज पूर्णपणे दाबून टाकला जात आहे. आर्थिक-राजकीय कारवाया सुरु असल्यामुळे इस्लामचे मानवतावादी रूप कमजोर पडले आहे.
वर्चस्ववादी राजकीय शक्ती, त्यांच्या राजकीय आणि आर्थिक कार्यक्रमाला अनुरूप असलेला धर्माचा तो भाग निवडतात आणि त्यावर भर देतात. कुराणच्या त्या आयती संदर्भापासून बाजूला करून इस्लामच्या मुखवट्याआड लपलेले राजकीय उद्देश लपवून ठेवले जातात. काही मुसलमानांना काय म्हणायचे ते म्हणू द्या, परंतु दहशतवाद आणि धन प्राप्त करण्यासाठी इस्लामचा केला जाणारा वापर ही समस्या आहे. आपल्याला, कट्टरवाद आणि दहशतवाद, जो इस्लामच्या नावे औचित्यपूर्ण ठरविला जात आहे, त्याचा उदय आणि त्याच्या मजबूत होत जाण्यामागच्या कारणांना समजावे लागेल. ‘काफिरांना मारून टाकायला हवे’ याची चर्चा चहूकडे सुरु असताना, सर्व माणसे एक-दुसऱ्यांचे भाऊ आहेत आणि इस्लामचा अर्थ शांती आहे, या इस्लामच्या शिकवणुकीला काहीच महत्त्व नाही, याचे काय कारण आहे.
दहशतवादाची पाळेमुळे पश्चिम आशियातील तेल भांडारांवर कब्जा करण्याच्या राजकारणात आहेत. अमेरिकेने अल कायदाला समर्थन आणि उत्तेजन दिले. पाकिस्तानात असे मदरसे स्थापन केले गेले, की त्यात इस्लामच्या वहाबी संस्करणाचा उपयोग जिहादींची फौज तयार करण्यासाठी करण्यात आला, जेणे करून, अफगाणीस्तानातील रशियन सैन्याशी सामना करता यावा. अमेरिकेने अल कायदाला 800 कोटी डॉलर्स आणि 7000 टन हत्यारे उपलब्ध करून दिली, त्यात स्टिंगर क्षेपणास्त्रेही सामील होती. व्हाइट हाउसमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी अल कायदाच्या जन्मदात्यांना अमेरिकेच्या संस्थापकांच्या बरोबरीचे म्हटले होते. इराकमध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेले मोसाडेग सरकार 1953मध्ये उचलून फेकून देण्यात आले. त्याबरोबर घटनाचक्र सुरु झाले. त्याने इस्लामच्या हिंसक रुपाची चर्चा सुरु झाली आणि त्याचा मानवतावादी-उदारवादी चेहरा विसरला गेला. मौलाना रुमींनी, शांती आणि प्रेम, यांना इस्लामच्या सुफी संस्करणाची केंद्रीय तत्त्वे म्हणून निरुपित केली होती. मग असे काय झाले की, आज जगावर इस्लामचे वहाबी रूप लादले गेले आहे? इस्लामचे खलाफी रूप दोन शतकांपासून अस्तित्त्वात होते, परंतु त्याचा उपयोग गेल्या काही दशकांपासून होतोय, याचे काय कारण आहे? विनाकारण हिंसा आणि लोकांचे जीव घेण्यात लिप्त असलेल्या तत्त्वांचा जाणूनबुजून इस्लामच्या या संस्करणात उपयोग केला गेला, कारण त्याने त्यांचे राजकीय उद्देश साध्य व्हावेत.
धर्माचा उपयोग नेहमीच सत्ता मिळविण्यासाठी केला जातो, याला इतिहास साक्ष आहे. राजा आणि बादशहा क्रुसेद, जिहाद, धर्मयुद्ध या नावांनी आपले स्वार्थ साधत आले आहेत. भारतात ब्रिटीश राजवटीत अस्त होत चाललेल्या जमीनदार आणि राजे (हिंदू-मुसलमान दोन्ही धर्मातील) या वर्गाने मिळून युनायटेड इंडिया पॅट्रिअॅटिक असोसिएशनची स्थापना केली आणि याच संस्थेतून मुस्लिम लीग आणि हिंदुमहासभा निर्माण झाली. सांप्रदायिक संस्थांनी घृणा फैलावली. त्यातून सांप्रदायिक हिंसा भडकली. युनायटेड इंडिया पॅट्रिअॅटिक असोसिएशनचे संस्थापक होते ढाक्याचे नबाब आणि काशीचा राजा. आता आपण मुस्लिम लीग, हिंदुमहासभेसारख्या जातीयवादी संघटनांच्या निर्मितीसाठी हिंदू आणि मुस्लिम धर्माला दोषी ठरविणार आहोत?, की ज्या राजकारणासाठी या जमीनदार आणि राजांनी इस्लाम आणि हिंदू धर्माचा वापर केला, त्यांना दोषी ठरविणार आहोत? आपण सध्या, दक्षिण आशियात म्यानमार आणि श्रीलंकेत बौद्ध धर्माच्या नावे गठीत झालेल्या गटांच्या कारवाया पाहात आहोत.
थोडे लक्षपूर्वक पहिले तर आपल्या हे लक्षात येईल, की इस्लामी दहशतवाद, इंडोनेशियासारख्या मोठी मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशात न वाढता, मुख्यतः तेल उत्पादक देशात वाढला आहे. दहशतवादाचे बीज कुण्या धार्मिक नेत्याने पेरलेले नाही, ते तेलाचे भोक्ते असलेल्या महाशक्तींनी पेरले आहे. सौदी अरेबियाच्या वाळवंटात कुठे पडून असलेली मौलाना वहाबींची इस्लामची व्याख्या खोदून काढण्यात आली आणि तिचा उपयोग सध्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी करण्यात आला. राजकीय शक्ती, त्यांच्या हिताला अनुकूल असणारा धर्माचा भाग निवडतात. काही लोक मुलींसाठी शाळा उघडत आहेत. ते असे म्हणतात की, ते ही गोष्ट कुराण ज्ञानाला फार महत्त्व देतो, म्हणून करीत आहेत. दुसरीकडे त्याच कुराणाचा आधार घेवून कुणी शाळेत जाणाऱ्या मुलींवर गोळ्या झाडत आहेत. दहशतवादी समूह, धर्माच्या आपल्या संस्कारणावर ना चर्चा करू इच्छितात ना करू शकतात. त्यांना फक्त त्यांनी निवडलेल्या वचनांशी मतलब आहे, जे त्यांच्या डोक्यात ठोसून दिले आहेत आणि ज्यांनी त्यांना हातात बंदूक आणि बॉम्ब असलेले जनावर बनविले आहे.
हिंदू धर्माच्या नवे गांधीजींनी अहिंसेला आपला मुख्य आदर्श मानले. त्याच हिंदू धर्माच्या नावे गोडसेने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या सर्वात धर्म कुठे आहे? सध्या जगवारचे संकट बनलेल्या इस्लामवादी दहशतवाद्यांना अमेरिकेने स्थापन केलेल्या मदरशांमधून शिक्षण मिळाले आहे. आयसिस अतिरेक्यांमागे अमेरिका असू शकते, अशीही बातमी आहे. साम्राज्यवादाच्या काळातही राजकारणावर वेगवेगळ्या धर्मांची लेबले लागलेली असत. साम्राज्यवादी शक्ती नेहमीच सामंती व्यवस्था जिवंत ठेवीत होती. आता तेल उत्पादक क्षेत्रातील मुख्य रहिवासी मुसलमान आहेत, म्हणून इस्लामचा वापर राजकीय ध्येय प्राप्त करण्यासाठी केला जात आहे. विडंबना ही आहे की, मुसलमान आपल्याच संपदेचे – काळ्या सोन्याचे शिकार होत आहेत.

ram.puniyani@gmail.com

संघ बदलला की दलित विचारवंत?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांना राज्यातील काही दलित साहित्यिकांनी उपस्थिती लावली. अशा कार्यक्रमांमुळे, भाजप-संघ परिवाराची हिंदू राष्ट्रनिर्मितीची संकल्पना स्पष्ट असताना, तेथे जाऊन दलित विचारवंत कुणाचे नि कसले प्रबोधन करतात? दलित लेखक, विचारवंत, वा कवी सांगत असलेला आंबेडकरवाद संघ परिवार स्वीकारतो काय? असे प्रश्न उपस्थित होतात.
केंद्रात आणि राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारे सत्तारूढ झाल्यानंतर संघ आणि संघ परिवाराशी संलग्न असणाऱ्या संघटनांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेमाचा पान्हा फुटलेला पाहावयास मिळतो आहे. उदाहरणार्थ संघ परिवाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची साजरी केलेली जयंती, संघाचे मुखपत्र असलेल्या ‘पांचजन्य’ व ‘ऑर्गनायझर’ने आंबेडकर जयंतीनिमित्त प्रसिद्ध केलेले विशेषांक, ‘ऑर्गनायझर’ व ‘पांचजन्य’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमास; तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या व्याख्यानमालेस दलित समाजातील एक विचारवंत डॉ. नरेंद्र जाधव यांनी लावलेली हजेरी.
केंद्राच्या साहित्य अकादमीला पुढे करून निवडक दलित साहित्यिकांचे दिल्लीत सांस्कृतिक विभागाने घडवून आणलेले चर्चासत्र, राज्य सरकारच्या वतीने गेट वे ऑफ इंडिया येथे साजरी करण्यात आलेली आंबेडकर जयंती वगैरे बाबासाहेबांची जयंती संघ परिवाराने साजरी केली असेल, तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही. कारण बाबासाहेब ही काही कुणाची खासगी मालमत्ता नव्हे. काँग्रेसने आजवर दलितांची मते मिळविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा राजकीय वापर केला. भाजप आता काँग्रेसचाच कित्ता गिरवत असेल, तर नवल नव्हे. मात्र, काँग्रेसपेक्षा संघ परिवाराची खरी अडचण अशी की, त्यांच्याकडे कोणता राष्ट्रीय नायकच नसल्यामुळे त्यांना नाइलाजाने गांधी, डॉ. आंबेडकरांचे नाव घ्यावे लागत आहे. आता मुद्दा असा की, संघ परिवाराने राजकीय सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनाच्या संदर्भात गांधी, डॉ. आंबेडकरांचे विचार कितपत स्वीकारले आहेत? राष्ट्रीय नेत्यांच्या विचारांशी प्रामाणिक मतभेद असणे समजू शकते, पण जिथे परिवर्तनाच्या संदर्भात टोकाचे परस्परविरोधी सैद्धांतिक मतभेद असतात, तिथे भाजप संघ परिवाराने आंबेडकर वा गांधीजींचे नाव घेणे म्हणजे दलित बहुजन समाजाची दिशाभूल करणेच नव्हे काय?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 1980मध्ये आम्ही गांधीवाद स्वीकारला, असे म्हटले होते. पुढे एका वर्षानंतर आम्ही गांधीवाद स्वीकारला नाही, असे संघानेच घोषित केले. आता संघ आयोजित कार्यक्रमातून सांगण्यात येते, की आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्वीकार केला आहे. प्रश्न असा की, संघाने आंबेडकरवाद स्वीकारला म्हणजे नेमके काय केले? संघास बाबासाहेबांचा जातिअंताचा लढा मान्य आहे काय? या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित होतात ते असे.
बाबासाहेबांनी जातीव्यवस्थेच्या इतिहासाची नव्याने मांडणी करताना म्हटले, ‘भारतात समता स्वातंत्र्य, बंधूभावाचा विचार देणाऱ्या बौद्ध धर्माचा उदय ही एक क्रांती होती व बौद्घ धर्माचा पाडाव ही प्रतिक्रांती होती. बौद्ध धर्माला पराभूत करण्यासाठीच रामायण, महाभारत, भगवद्गीता, मनुस्मृती व पुराणे रचली गेली. या प्रतिक्रांतीने वर्ण आणि जातीव्यवस्था जन्मास घतली.’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘जातीव्यवस्था नष्ट करावयाची, तर जाती व्यवस्थेचा आधार असलेल्या धर्मग्रंथाचे पावित्र्य नाहीसे करावे लागेल.’ आता भाजपच्या राज्यात रामायण, महाभारत, गीतेचाच अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा, अशी भाषा जेथे हिंदुत्ववादी परिवाराकडून उच्चारली जाते. तेथे संघ परिवाराने बाबाबसाहेबांचा स्वीकार केला, अशी लोणकढी थाप मारणे म्हणजे शुद्ध लबाडीचे नव्हे काय?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातिअंताच्या बाबत म्हटले, ‘जो हिंदू धर्म माणसाच्या माणुसकीला किंमत देत नाहीत, अस्पृश्यता शिक्षण घेऊ देत नाही, देवळात जाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही, असा हिंदू धर्म नाकारून समता, स्वातंत्र्य बंधुभावाचा पुरस्कार करणारा बौद्ध धर्म स्वीकारल्याशिवाय भारतीय समाजाची जातीव्यवस्थेतून मुक्तता होणार नाही.’ बाबासाहेब आंबेडकरांची ही हिंदू धर्म मिमांसा संघ परिवारास मान्य आहे काय?
संघ परिवाराच्या विश्व हिंदू परिषदेकडून असे सांगण्यात येते की, हिंदू समाजात कोणतीही अस्पृश्यता नाही. आता प्रश्न असा की अस्पृश्यता ही जर हिंदू धर्म संमत नसेल, तर मग एखाद्या हिंदू दलिताची नेमणूक शंकराचार्यांच्या पदावर का केली गेली नाही? बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते, ‘शंकराचार्यांच्या गादीवर एखादा संस्कृत भाषेत तज्ज्ञ असलेला दलित बसविण्याची हिंदू धर्मियांची तयारी असेल, तर मी धर्मांतराचा विचार सोडून देईन.’ धर्मांतर टाळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार संघ परिवार अजूनही कृतीत का आणत नाही?
अस्पृश्यांना सक्षम करण्याची भाषा जेव्हा हिंदूत्वववादी परिवाराकडून होते तेव्हा प्रश्न असा की, आजही जेथे खेडोपाडी दलित समाजावर क्रूर, अमानवी अत्याचार होतात, त्यावेळी संघ परिवार स्वकीयांविरुद्ध का लढत नाही? अमेरिकेत कृष्णवर्णियांना मानवी हक्क मिळावेत, म्हणून गौर वर्णीयही लढले. काळ्यांच्या बाजूने गोऱ्यांनी उभा केलेला लढा हा केवळ शब्दिक बुडबुडा नव्हता, तर काळ्यांच्या मानवी हक्कांसाठी गोऱ्यांनी गोऱ्यांविरुद्ध यादवी युद्ध पुकारले होते. दलितांवरील अत्याचाराबाबत अशी कुठलीही विद्रोही मानवतावादी भूमिका न घेणाऱ्या संघ परिवाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणे म्हणजे दलितांच्या डोळ्यात धूळफेक करणेच नव्हे काय?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे धर्मनिरपेक्षतेचे पुरस्कर्ते होते; पण भाजपच्या राज्यात आज धर्मांध उन्मादी वातावरण निर्माण करण्याचे उपद्व्याप हिंदुत्ववादी परिवाराकडून केले जात आहेत. हिंदू धर्म संकटात असल्यामुळे हिंदूंनी भरमसाठ मुले जन्माला घालावीत. भारत हे हिंदू राष्ट्र आहे. मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घ्यावा, मुसलमानांचा लव्ह जिहाद थोपवावा, मोदींना विरोध असणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे, अल्पसंख्याकांनी दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणून राहावे, साईबाबा हे मुस्लिम असल्यामुळे त्यांची पूजा करू नये, नथुराम गोडसे हा देशभक्त होता, अभ्यासक्रमात हिंदू धर्मग्रंथांचा समावेश करावा, शाळेत सरस्वतीपूजन व्हावे, सूर्यनमस्कार सक्तीचे करावेत, अशी बेछूट धर्मांध भाषा वापरतानाच दुसरीकडे घरवापसीसारखे समाजात दुही पेरणारे कार्यक्रम घेण्यात येऊ लागले आहेत. चर्चवर हल्ले होत आहेत. हिंदुत्ववाद्यांचे हे प्रकार आंबेडकरवादात बसतात, असे संघ परिवारास वाटते काय?
आता थोडेसे दलित साहित्यिक-विचारवंतांविषयी. संघ परिवाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमास डॉ. नरेंद्र जाधव उपस्थित राहतात. इतकेच नव्हे तर संघात आणि दलित समाजात सेतू म्हणून भूमिका बजावण्याची आपली तयारी आहे, असेही सांगतात. दुसरीकडे केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेल्या दलित साहित्यिकांच्या चर्चासत्रास महाराष्ट्रातून काही दलित साहित्यिक उपस्थित राहतात, याचा अर्थ काय?
भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे काही दलित विचारवंत, लेखक जर केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेल्या चर्चासत्रास वा संघ पुरस्कृत संघटनांच्या कार्यक्रमांना हजर राहिले, तर त्यांचे ते स्वातंत्र्य मान्य केले पाहिजे. मात्र, भाजप-संघ परिवाराची हिंदू राष्ट्रनिर्मितीची संकल्पना स्पष्ट असताना, तेथे जाऊन दलित विचारवंत कुणाचे नि कसले प्रबोधन करतात? दलित लेखक, विचारवंत, वा कवी सांगत असलेला आंबेडकरवाद संघ परिवार स्वीकारतो काय? नाही. मग काही दलित लेखक-विचारवंतांचे संघ पुरस्कृत कार्यक्रमास जाण्याचे प्रयोजन ते काय? त्यांचे जाणे निर्हेतूक असते की, सहेतूक असते? पण संघप्रेमी दलित विचारवंत, लेखकांनाच तरी दोष का द्यावा? सर्वांना आज सत्तेची आणि पदांची घाई झाली आहे. दलित नेते म्हणूनच आजवर काँग्रेसच्या नादी होते, आता ते भाजप-सेनेकडे आहेत. काही दलित विचारवंत-लेखकांचेही असेच होत आहे. आंबेडकरी चळवळीची ही पिछेहाटच आहे, दुसरे काय?

महाराष्ट्र टाइम्सच्या सौजन्याने