Category Archives: देव-धर्म

वारीचे अवडंबर

सध्या आषाढीची वारी सुरू आहे, पालख्या पंढरपुरात लवकरच दाखल होतील. पालखीचे किंबहुना वारकरी धर्माचे आजचे स्वरूप काय आणि मूळ वारकरी धर्म काय याचा ऊहापोह अगदी म.फुले यांच्या काळापासून होत आला आहे. आजही होत आहे.

आज काही पुरोगामी संघटनांची मंडळी वारीमध्ये उत्साहाने सामील होऊन आम्हीही तुमचेच सगेसोयरे असे सांगत वारकर्‍यांना खरा वारकरी धर्म समजून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. उपक्रम अनाठायी नाही पण उपक्रमामागील भावना आम्हीही “देवभक्त हिंदू” अशी कांग्रेस पक्षासारखी उसनी आहे. आणि राजकारणात धर्म आणण्याच्या भाजपच्या कारस्थानाला बळी पडण्यासारखी आहे. भारताच्या धर्मनिरपेक्ष राजकारणाला गालबोट लावणारी आहे.

ब्राह्मण्यवादी उजव्या शक्तींनी पुरोगामी लोकांना धर्मविरोधी ठरवून युगे लोटली आहेत. हा सनातन संघर्ष आहे. तो आपल्या देशाच्या इतिहासात ठळकपणे नजरेत भरतो. चार्वाक, बुद्ध, महावीर, कबीर, चक्रधर, बसवेश्वर आणि नामदेव, तुकारामांचा वारकरी धर्म यांनी या ब्राह्मण्यवादी शक्तींना वेळोवळी माती खायला लावली आहे. या शक्तींना तत्त्वज्ञानाच्या आणि नैतिकतेच्या पातळीवर कधीच पुरोगामी शक्तींचा पराभव करता आला नाही. आजही नाही. कपटाचा आणि हिंसेचा वापर करूनच त्यांनी विजय मिळवले. त्यासाठी त्यांना जातिव्यवस्थेच्या श्रमविभागणीचा फायदा झाला. शोषक आणि शोषित जातींतील वर्ग विभागणीला पर्याय देणे अवैदिकांना शक्य झाले नाही. किंबहुना ही आर्थिक बाजू त्यांच्या लक्षात येणे त्या काळाच्या मर्यादेत शक्य नव्हते. मार्क्सने हा मुद्दा ठोसपणे पुढे आणेपर्यंत विचारांच्या, तत्त्वज्ञानाच्या पातळीवर अर्थरचनेचे महत्त्व समजले नव्हते. म.फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी अस्मितेच्या लढ्याला आर्थिक विकासाची जोड देऊन अर्थरचनेला महत्त्व दिले. “आर्थिक समानतेशिवाय इतर कुठल्याही समतेला अर्थ नाही” हे बाबासाहेबांनी म्हणून ठेवले आहे. आज सत्तेवर असलेले सावरकरांच्या आणि गोळवळकरगुरुजींच्या विचारपरंपरेचे पाईक आहेत. आणि त्यांनी ते दडवून ठेवलेले नाही. सावरकरांनी त्यांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या ग्रंथात मांडलेला इतिहास त्यांचा इतिहास आहे. ज्यामध्ये अवैदिक संस्कृतीला बदनाम केले आहे. भारतीय संस्कृतीत नवव्या अवतारात राजकीय हेतूने समाविष्ट करण्यात आलेला बुद्ध सोनेरी पान नाही तर लाखो बौद्धधर्मीयांच्या कत्तली करणारा पुष्यमित्र शुंग सोनेरी पान आहे. स्वराज्याची स्थापना करणारे छ.शिवाजी महाराज सोनेरी पान नाही तर अटकेपार झेंडा रोवणारे राघोबादादा सोनेरी पान आहेत की ज्यांनी सत्तेसाठी आपल्या पुतण्याला हत्तीच्या पायाखाली दिले. आणि त्यासाठी आनंदीबाईंना जबाबदार धरून आपला स्त्रीविरोधी दृष्टिकोन उघड केला. तर आज या विचारांचे वारस सत्तेवर आले आहेत, आणि यामुळे आमचे पुरोगामी गडबडले आहेत. कांग्रेसवाल्यांनी मुस्लिम शब्दच वर्ज केला आहे आणि “आम्हीही हिंदू”चा गजर सुरू केला आहे. तर महाराष्ट्रात काही पुरोगाम्यांनी वारीचा रस्ता धरला आहे. आज जर काँग्रेस सत्तेवर असती तर वरील अतार्किक गोष्टी पुढे आल्या असत्या काय? वारकऱ्यांना ज्ञान देण्याच्या हेतूने कोणी वारीत फिरकले असते काय? “सत्य असत्याशीं मन केलें ग्वाही मानियलें नाहीं बहूमता” हा तुकारामांचा वारसा मग कुठे गेला?

त्यांचे बहुमत झाले म्हणून आपण कमरेचे डोक्याला गुंडाळणे हे हतबल झाल्याचे लक्षण आहे. आपण देवा-धर्माच्या विरोधी नाही हे वारंवार स्पष्ट केले आहे. पण आपण धर्मचिकित्सेच्या बाजूने आहोत, हा आपला दृष्टिकोन कदापि सोडता कामा नये. या धर्मचिकित्सेच्या दृष्टीनेच आज आपण वारीकडे पाहिले पाहिजे. अवैदिक परंपरेचा जागर करत राहणे, तिच्याशी जोडून घेणे आणि तिला आजच्या आधुनिक विचारांची जोड देऊन पुढे घेऊन जाणे हेच आजचे धम्मकर्तव्य आहे. परंतु दलितांनी बौद्धधर्म स्वीकारल्यामुळे आजही हिंदू पुरोगाम्यांना बुद्धाचे नाव घेण्याची लाज वाटते. वारीमध्ये नाचत-नाचत विठोबाचे दर्शन घ्यायला हिंदू नेणिवेच्या पातळीवर आध्यात्मिक आनंद मिळतो की काय?

आज वारकरी परंपरेवर सनातन्यांनी पकड मिळवली आहे. ही अवस्था आपण फार बदलू शकत नाही. याउलट शेतकरी संकटात आहे, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याबद्दल आपण काय केले आहे? दुष्काळाच्या प्रश्नावर आपण काय केले? ते न करता नुसते वारीत नाचून उपयोग नाही. जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणे यापलीकडे आता काहीच पर्याय नाही.

सनातन वैदिकांनी चक्रधर, बसवेश्वर, तुकाराम यांच्या हत्या करूनच विजय प्राप्त केलेले आहेत. हीच परंपरा त्यांनी दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या संदर्भात पण पाळली आहे. ज्यांनी ज्यांनी या धर्मांचा मूळ आशय पुढे आणला त्यांना हिंदुविरोधी ठरवण्यात आले. हे केवळ तात्त्विक पातळीवर घडत नाही, तर वर म्हटल्याप्रमाणे त्याला त्या त्या वेळच्या अर्थकारणाची जोड असते. शेवटी तत्त्वज्ञाने अस्तित्वात येतात ते आर्थिक हितसंबंधांच्या रक्षणासाठीच. नामदेवाने सुरू केलेल्या वारकरीधर्मात विठ्ठलाच्या दर्शनातच सर्व तीर्थे सामावली आहेत. त्यामुळे तीर्थाटनाला विरोध हा वारकरीपंथाचा मूळ गाभा राहिला. तुकारामांनी हाच वारसा चालवत “तिथें धोंडा पाणी देव रोकडा सज्जनीं” असे म्हणून ठेवले आहे. आज सज्जनांचे खून पडत असताना, झुंडशाही मुस्लिमांचे, दलितांचे बळी घेत असताना त्याविरोधी लढा उभारण्याची गरज आहे.

वारीची प्रथा वारकरीधर्माच्या प्रसारासाठी जन्माला आली. आज तिचे स्वरूप कर्मकांडी आणि भांडवली प्रभावामुळे इव्हेंट साजरा करणारे झाले आहे. नामदेवांचे, तुकारामांचे तत्त्वज्ञान व्यवहारातून गायब झाले आहे. ते जागवण्याची गरज आहे. आज ज्ञानेश्वरांचे पसायदान वारकरीधर्माचे तत्त्वज्ञान बनले आहे. ते वारकरीधर्माच्या मूळ गाभ्यालाच नख लावते. धर्मचिकित्सेच्या दृष्टीने या सर्व परिस्थितीची नीट मांडणी करून भिडले पाहिजे. तरच आपण विठ्ठलाच्या तत्त्वज्ञानाचे, जे समतेवर, जातिव्यवस्था विरोधावर उभे आहे आणि म्हणूनच ज्याला अठ्ठावीस युगे विटेवर उभे करून ठेवले आहे त्याची सुटका करू शकतो.

‘योगा’वर दावा कुणाचा?

 भारतासाठी जसे ‘मॅक्डोनाल्ड’ तसे उत्तर अमेरिकेसाठी ‘योगा’. दोन्हीही मूळ स्थानापासून दूर परदेशात पक्के रुजलेले. अमेरिकेतील शहरी आणि ग्रामीण परिसरातील व्यायामशाळा, आरोग्य केंद्रे, चर्चेस अगदी सिनेगॉग्समध्येही योगाचे शिकवणी वर्ग चालू असतात. अमेरिकेतील जवळपास सोळा लाख लोकांच्या दररोजच्या व्यायाम प्रकारात योगाच्या कोणत्या ना कोणता प्रकाराचा समावेश असतोच. त्यामुळे दररोजच अमेरिकेतील लोक योगाबद्दल काही ना काही बोलत असतात, अर्थात व्यायामाच्या अंगाने. त्यांच्या व्यायामात शरीराला ताण देणारे, श्वासोच्छ्वासाचे किंवा आसनाचे हठयोगी व्यायाम प्रकार मुख्यत: असतात. ही आसने शिकविण्यासाठी बी.के.एस. अय्यंगार अथवा शिवानंद यांच्या पद्धतीने शिकविणारे, पट्टाभी जोईस यांचा ‘अष्टांग विन्यासा’ किंवा ‘पॉवर योगा’ शिकविणारे किंवा नुकताच ‘हॉट योगा’चा कॉपीराईट मिळविणारे बिक्रम चौधरी यांच्या पद्धतीने शिकविणारे भारतीय मूळ असलेले शिक्षक असतात. विवेकानंद, शिवानंद यांच्या अनुयायांनी लोकप्रिय केलेला “ध्यानयोग” मात्र फारसा लोकप्रिय नाही. अमेरिकेतील लोकांचा ओढा आसनांकडेच आहे यात काहीच आश्चर्य नाही कारण भारतातही टीव्हीस्टार योगी बाबा रामदेवचे लाखो भक्त आसनाभीमुख योगच शिकतात.
अमेरिकेतील योग उद्योगाने आपल्या योग शिकवणीचा उगम कोठे आहे हे लपवून ठेवलेले नाही. उलट अमेरिकेसारखा जो देश तुलनेने तरुण आहे आणि सतत बदलत जाणारा आहे त्या देशात योगाची मानण्यात आलेली प्राचीनता (5000 वर्षापूर्वीची व्यायाम पद्धती वगैरे), पौर्वात्य अध्यात्मिक परंपराशी असलेला योगाचा संबंध अशा सर्व गोष्टी योगविक्री प्रक्रीयेतील एक भाग बनून गेल्या आहेत. नमस्ते करणे, ओमचे सूरयोजन, संस्कृत मंत्रांचे उच्चार ह्याही गोष्टी अमेरिकेतील योगाच्या भाग होऊन गेल्या आहेत. अमेरिकेतील योगाच्या अनेक स्टुडीओतून भारतीय शास्त्रीय संगीत किंवा कीर्तन संगीताची धून वाजविणे, सुगंधी वास, ओमची चिन्हे अशाप्रकारच्या उपखंडातील छोट्या-मोठ्या वस्तू लावून अध्यात्मिक वातावरण निर्मिती केले जाते. अय्यंगार योगशाळेत त्यांची सत्रांची सुरवात दुसऱ्या शतकात होऊन गेलेल्या योगसूत्रांचा निर्माता ‘पतंजली’ याच्या प्रार्थनेने केली जाते. काही शाळेत पतंजलीची मूर्तीही बसविलेल्या आहेत. हे हिंदूकरण काही तंतोतंत सजवलेले नसते. योग शिकविण्याचा परवाना मिळविण्यासाठी योगशिक्षकांना हिंदू तत्वज्ञानाची आणि धर्मग्रंथांची जुजबी ओळख असणे गरजेचे असते.
अमेरिकेतील हिंदूंना या सगळ्याचा सार्थ अभिमान वाटत असेल, असे एखाद्याला वाटेल. पण अमेरिकेतील हिंदूंची वकिली करणारी संस्था, “हिंदू अमेरिकन फौंडेशन” (Hindu American Foundation, एचएएफ)ला मात्र अभिमान वगैरे काही वाटत नाही. उलट अलीकडेच त्यांनी आरोप केला कि अमेरिकेतील योग उद्योग हिंदुत्वाकडून योगाची चोरी करीत आहे. आपले प्रत्येक ‘आसन’ बौद्धिक मालमत्तेची चोरी आहे हे ऐकून अमेरिकेतील लाखो लोकांना धक्काच बसला. कारण त्यांनी योगाच्या मातृ परंपरेला मान्यता दिलेली नाही. एचएएफचे सहसंस्थापक आणि मुख्य प्रवक्ता असीम शुक्ला हे आता त्यांच्या हिंदू साथीदारांना सांगत आहेत की “योग आपला आहे तो आपल्याकडे ‘वापस’ घ्या आणि अध्यात्मिक परंपरेच्या बौद्धिक मालमत्तेचा दावा ठोका.”
ही ‘योगवापसी’ मोहीम राबवणाऱ्या बहाद्दरांना अमेरिकेतील योग संस्था आणि इतर सांस्कृतिक संस्था, योगातील हिंदू चिन्हे आणि हिंदू कर्मकांडे यांची वाढती दृश्यात्मकता फारशी प्रभावित करू शकलेली नाही. त्यांची जेथे नजर जाते तेथे त्यांना हिंदूबाबतची न्यून भावना दडलेली वाटते. त्यांना वाटते की अमेरिकतील लोकांनी आता योगाचा विचार ‘पातंजलीच्या योगसूत्रा’ संदर्भात आणि हिंदुत्वाचा विचार ‘महान वेदांच्या’ संदर्भात केला पाहिजे. त्यांनी आता हिंदूंच्या संदर्भातील तो जुना पठडीबद्ध जात, गाय आणि आमटी (Indian curry) चा विचार सोडला पाहिजे. शुक्ला यांच्या भाषेत बोलायचे तर “हिंदुत्वाचा संबंध आता पवित्र गायीपेक्षा गोमुखासनाशी (एक कठीण आसन) जास्त तर रंगीबेरंगी आणि भटक्या साधूंपेक्षा अध्यात्मिक प्रेरणा देणाऱ्या पातंजलीशी जास्त आहे.” त्यामुळे ही ‘योग वापसी’ मोहीम ‘योगा’ वगैरेपेक्षा भारतीय मानसिकतेतील बचावात्मकता आणि हिंदू विद्व्तेबद्दलची अतिरंजित भावना यांचे विचित्र मिश्रण, संस्कृताळलेपण – हे जे हिंदू धर्माचे आणि संस्कृतीचे कंगोरे – आहेत त्याबद्दलच असल्याचे दिसून येत आहे.
न्युयॉर्क टाइम्सने आपल्या पहिल्या पानावर “योगावर मालकी कोणाची?” हा मुद्दा घेऊन चर्चा छेडली. त्यामुळे साऱ्या जगाचेच लक्ष याकडे वेधले गेले. पण त्याच्याही वर्षभर आधी या वादाची सुरुवात झाली होती. वाशिंग्टन पोस्टने प्रायोजित केलेल्या ऑनलाईन ब्लॉग वरून एचएएफचे शुक्ला आणि आधुनिक गुरु दीपक चोप्रा यांच्यात हे युद्ध खेळले गेले. शुक्लांची तक्रार होती की हिंदू पद्धती आणि कल्पना यांच्या आधाराने धंदा करत असताना चोप्रा ‘हिंदू’ हा शब्द टाळत आहेत. कारण चोप्रा स्वत:ला हिंदू ऐवजी ‘अद्वैत वेदांती’ असे संबोधतात. चोप्रांनी जाहीर केले की हिंदुत्वाकडे काही योगाचे पेटंट नाही. योगाचा जन्म ‘जाणीवेत आणि फक्त जाणीवेत’ हिंदुत्वाच्या कितीतरी आधी झालेला आहे, ब्रेड आणि वाईन एशु ख्रिस्ताच्या ‘लास्ट सपर’च्याही आधीपासून अस्तित्वात होते. त्यामुळे ‘ब्रेड आणि वाईन’वर ख्रिश्चनांचा जितका दावा आहे तेवढाच हिंदूंचा ‘योगा’वर आहे. शुक्लानी त्यांना हिंदू वारश्याचा आदर न करणारा ‘नफेखोर तत्वज्ञानी’ म्हणून हिणवले तर चोप्रांनी त्यांच्यावर ‘हिंदू मूलतत्ववादी’ असल्याचा आरोप केला.
ना अनादी ना वैदिक
हा संपूर्ण वाद हिंदू इतिहासाच्या दोन सारख्याच मूलतत्ववादी दृष्टीकोनांचे दर्शन घडवितो. 21व्या शतकातील योग पद्धतीला जवळजवळ 2000 वर्षापूर्वीच्या ‘योग-सूत्रां’शी जोडायचे आणि त्या दोन्हीची सांगड 5000 वर्षापूर्वीच्या ‘वेदां’शी घालायची हे या मांडणीचे अधोरेखित उद्दिष्ट आहे. दोन्हीतील फरक फक्त एवढाच आहे की दीपक चोप्रा योग हिंदुत्वाच्याही अगोदर अस्तित्वात होता असे म्हणत आहेत तर शुक्ला आणि एचएएफ संपूर्ण पाच हजार वर्षांचा वापर हिंदुत्वाच्या गौरवासाठी करत आहेत. चोप्रांच्या मते योग हा ‘पूर्वेकडील अमर्याद विद्वत्तेचा’ भाग आहे. तर ‘योग आणि वेद यात भेदच नाही ते अनादी काळापासून एकरूप आहेत’ असे एचएएफचे मत आहे.
पण वस्तुस्थिती ही आहे की, आज ज्याला ‘योगा’ म्हटले जाते ते अनादी काळापासून चालत आलेले नाही किंवा ‘वेदा’च्या अथवा ‘योगसूत्रां’च्या समानार्थीही नाही. उलट, आधुनिक योगाचा जन्मच मुळी 19व्या शतकाच्या शेवटी आणि 20व्या शतकाच्या प्रारंभी झाला. हे हिंदू प्रबोधन काळाचे आणि भारतीय राष्ट्रवादाचे अपत्य आहे. ज्यात विज्ञान, उत्क्रांती, सुप्रजननशास्त्र, आरोग्य आणि शारीरिक तंदुरुस्ती या बद्दलच्या पाश्चिमात्य कल्पनांनी ‘मातृ परंपरा’ म्हणून कळीची भूमिका पार पाडली. या काळात वेगवेगळ्या स्तरांवर प्रचंड सरमिसळ झाली, योग आणि तंत्राचे सुलभीकरण झाले. मूळच्या अमेरिकेतील पण भारतात प्रस्थापित झालेल्या थियासॉफिकल सोसायटीने ‘अध्यात्मिक विज्ञाना’च्या कल्पना भारतात प्रस्तावित केल्या आणि त्या सर्व कल्पना योगात अंतर्भूत करण्याचे काम योग प्रबोधनाचे नेतृत्व करणाऱ्या स्वामी विवेकानंदानी केले.
परिणामी योगाचा जो शारीरिक कंगोरा होता त्याची सरमिसळ कवायत, जिम्नॅस्टिक्स आणि शरीर सौष्ठवाची तंत्रे यात होऊन त्याचा प्रचार स्वीडन, डेन्मार्क, ब्रिटन आणि इतर अनेक पाश्चिमात्य देशात झाला. हीच योगपद्धती 5000 वर्षापासून चालत आलेली आहे हे ठसविण्यासाठी या नवीन बदलांवर सृजनशीलपणे योगसूत्रांचे आरोपण करण्यात आले, ज्या योगसूत्रांचे नेमके वर्णन ऑस्ट्रीयात जन्मलेल्या अघेहानंद भारती या हिंदू तांत्रिकाने, “ज्या लोकांनी ब्राम्हणी तत्वे स्वीकारली आहेत त्यांच्यासाठी बनविलेली सूत्रे” असे केले आहे. एचएएफचा आजचा आग्रह म्हणजे 20व्या शतकात जोरकसपणे चालविल्या गेलेल्या चुकीच्या जाहिरातबाजीच्या मोहिमेचा एक भाग आहे.
जरी ही समजूत सर्वदूर पसरवली गेली असली तरी आज हे आधुनिक गुरु जी आसने शिकवितात त्यापैकी बहुसंख्य आसने प्राचीन शिकवणीत कोठेच आढळत नाहीत. प्रचंड कर्मकांडी स्वरूपाच्या यज्ञाभिमुख असणाऱ्या वेदांना पातजंलीच्या शुद्ध जाणिवानुभवाच्या शोधाशी काहीच घेणे-देणे नव्हते. आणि खरोखरच, ज्या 195 सूत्रांनी योगसूत्र बनले आहे त्यापैकी फक्त तीन छोटी सूत्रे पतंजलीनी आसनांसाठी घेतलेली आहेत. महाभारतात योगाचा उल्लेख 900 वेळा आहे. पण आसनांचा मात्र फक्त दोन वेळा आहे आणि भगवद्गीतेत तर अजिबातच नाही.
योगाच्या आसनकेंद्रित, हठयोग अशा पद्धती अर्थातच आहेत. पण त्याचे प्रणेते आहेत ते जटाधारी, राख फासलेले साधू. ज्यांना एचएएफ पाश्चिमात्यांच्या कल्पनेच्या बाहेर ठेऊ इच्छिते. खरेतर हिंदू परंपरेत या शारीरिक योगाच्या पेटंटवर जर कोणाचा हक्क असेल तर तो या जात धुडकावणाऱ्या, गांजेकस, लैंगिक मुक्ताचारी असणाऱ्या, शिव आणि शक्तीला जादूटोण्यासाठी पुजणाऱ्या, रसायनांची किमया साधणाऱ्या आणि लोहार, कुंभार यांच्यासारखे कौशल्य असलेले जटाधारी व राख फासणाऱ्यांचा! त्यांना काही या भौतिक जगाचा कायापालट करायचा नव्हता. त्यांना आपल्या शरीरावर आणि या भौतिक जगावर ताबा मिळविण्यासाठी जादूई शक्ति “सिद्धी” प्राप्त करून घ्यायच्या होत्या. म्हणूनच त्यांनी इतके सगळे कष्ट, त्रास सोसले, खडतर जीवन स्वीकारले.
मैसूरच्या राजवाड्यातील रहस्य
काही ऐतिहासिक दस्तऐवज आणि तोंडी इतिहासाच्या सहाय्याने केलेल्या नवीन संशोधनाच्या प्रकाशात पट्टाभी जोईस आणि अय्यंगार योगाच्या ‘अष्टांग विन्यासाचा’ सांधा प्राचीनतेशी कितपत आहे याबाबत शंका निर्माण झाली आहे. जोईस (1915-2009) आणि बी.के.एस. अय्यंगार (1918-2014) या दोघांनीही योगाचे शिक्षण मैसूरचे महाराजा कृष्णराज वडेयर चौथा (1984-1940) यांच्या कारकिर्दीत टी. कृष्णम्माचार्य यांच्याकडून घेतले.
हा महाराजा मैसूरच्या गादीवर 1902 पासून त्याच्या मृत्यूपर्यंत होता. त्याच्या कारकिर्दीत त्याने भारतीय सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम बऱ्यापैकी राबविले आणि त्याचबरोबर पश्चिमेकडील काही सकारात्मक कल्पनाही आपल्या सामाजिक कार्यक्रमात समाविष्ट केल्या. शारीरिक शिक्षणाच्या बाबतीत तो खूपच आग्रही होता. त्याच्या कारकिर्दीत शारीरिक शिक्षणाच्या संदर्भात मैसूर हे देशातील एक प्रमुख केंद्र बनले. आपल्या तरूण राजकुमारीला ‘योगा’चे शिक्षण देण्यासाठी त्यांनी कृष्णम्माचार्य यांना बोलावले तसेच त्यांनी कृष्णम्माचार्य व त्यांच्या सहकाऱ्याना देशभरात फिरून योग प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी आणि त्या आधारे योग पुनर्जीवित करून लोकप्रिय करण्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला.
मैसूरच्या राजघराण्याला पूर्वीपासूनच ह्ठ्योगात रुची होती. वडेयर चौथे यांचे पूर्वज मुम्माडी कृष्णराजा वडेयर तिसरे, (1799-1868) यांनी श्रीतत्त्वनिधी नावाचे अतिशय सुंदर चित्रमय पुस्तक लिहिले. त्याचा शोध 1980सालच्या मध्यास नॉर्मन जोमान नावाच्या एका स्वीडिश योग विद्यार्थ्याला मैसूर राजवाड्याच्या ग्रंथालयात लागला. या पुस्तकाचे वैशिष्ट्य हे होते की, यात हठयोगाच्या आसनांचा मेळ भारतीय मल्ल जे व्यायामप्रकार व्यायामशाळेत करीत त्याच्याशी घातला होता. हे नाविन्यपूर्ण होते.
अमेरिकास्थित अभ्यासक जोमान आणि मार्क सिंगल्टन या दोघांनीही 1930 च्या सुमारास म्हणजे मैसूर राजवाड्याच्या भरभराटीच्या काळात, जे राजवाड्याशी व राजघराण्याशी संबंधित होते त्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांच्या मते आधुनिक योगाचे बीज या श्रीतत्त्वनिधी सारख्या नाविन्यपूर्ण पुस्तकात आहे. कृष्णम्माचार्य हेही या पुस्तकाशी परिचित होते. त्यांनीही आपल्या पुस्तकात श्रीतत्त्वनिधी कडून प्रेरणा घेत पूर्वीच झालेल्या पारंपारिक भारतीय कुस्ती, कवायती आणि हठयोगी आसनाच्या सरमिसळीत विविध पाश्चिमात्य जिम्नॅस्टिक्स आणि कवायती यांचा मेळ घालत श्रीतत्त्वनिधी चा हा नाविन्यपूर्ण वारसा पुढे चालविला.
कृष्णम्माचार्य ह्यांना मैसूर राजवाड्यातील पाश्चिमात्य पद्धतीच्या व्यायामविद्येच्या (gymnastics) हॉलमध्ये मुक्त प्रवेश होता. त्यांनी आपल्या दैनंदिन योगामध्ये तेथील वालरोप्स आणि इतर व्यायामासठीची साधनं वापरायला सुरुवात केली. कृष्णम्माचार्यांना पाश्चिमात्य व्यायामविद्येवरील पुस्तके उपलब्ध होती. या पुस्तकातूनच त्यांनी व्यायामविद्येची अनेक तंत्रे अवगत करून घेतली व ती त्यांच्या शिकवणीत उतरली, जी पुढे जोईस आणि बी.के.एस. अय्यंगार यांनी पुढे नेली, असे जोमानचे म्हणणे आहे. उदाहरणार्थ, मांडी घालून केलेले जंपबॅक (jumpback), कमान करणे वगैरे 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या वर्षात नेल्स बख (Niels Bukh 1880-1950) या डेन्मार्कच्या जिम्न्यास्टने कोणत्याही साधनांशिवाय करण्यात येणारी स्वीडिश कवायत आणि दैनंदिन जिम्नॅस्टिक्स विकसित केले. ब्रिटीशानी भारतात ती पद्धत प्रस्तावित केली आणि वायएमसीएने ती लोकप्रिय केली. सिंगल्टनचा असा दावा आहे कि, “बखच्या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीतील जवळ जवळ 28 प्रकारांची पद्धत आणि पट्टाभी जोईस यांच्या अष्टांगयोगातील किंवा बी.के.एस. अय्यंगार यांच्या लाईट ऑन योगातील प्रकारांची पद्धत जवळ जवळ सारखीच आहे.” ही सांधेजोड सांगताना सिंगल्टन म्हणतो, “जिम्नॅस्टिक्स पद्धतीची आसने आणि पारंपारिक पातंजली पद्धत यांच्या आधुनिक सांधेजोडी मागील प्रमुख सूत्रधार कृष्णम्माचार्यच!”
मग आता योगाची मालकी कोणाकडे?
आज आपल्याला माहित असलेला ‘योगा’ म्हणजे प्रचंड प्रमाणावर झालेली सरमिसळ आहे. त्यामुळे “पाश्चिमात्यांनी योगाची चोरी केली” ह्या एचएएफच्या कर्कश आरडाओरड्याला काहीच अर्थ उरत नाही. आजच्या काळातला योग हे एक असे जागतिक पातळीवरील वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आहे की ज्यात पूर्वेकडच्या आणि पश्चिमेकडच्या पद्धती संपूर्ण जगभरासाठी एक मूल्यवान आणि जपून ठेवावी अशी निर्मिती करण्यासाठी एकत्र आल्या आहेत.
हिंदुत्ववाद भले प्राचीन, मध्ययुगीन अथवा आधुनिक असो पण त्याला योगावर दावा सांगता येणार नाही. तशी बढाई मारणे हे केवळ उद्धटपणाचे नाही तर निखालस खोटेही आहे.

अनुवाद: राजीव देशपांडे

निधर्मीपणा – धर्मनिरपेक्षता- सर्वधर्मसमभाव – इहवाद (उत्तरार्ध)

भारतीय धर्मनिरपेक्षतेचा राजकीय आशय
Secularism – धर्मनिरपेक्षता याला भारतात वेगळा अर्थ व त्याचे वेगळे परिणाम आहेत. पाश्चात्याप्रमाणे हा शब्द येथे कार्यान्वित होत नाही. कारण भारत हा एक बहुधार्मिक देश असून याला उपनिषदांचे सर्वधर्मसमभावाचे जबरदस्त अधिष्ठान आहे. याच बरोबर येथील संरंजामशाही राज्य व्यवस्थेमध्ये सर्व धर्मामध्ये समन्वयाची व बंधुभावाची भावना असल्यामूळे धर्म-निरपेक्षतेचा प्रश्नच कधी आला नाही.
पण 19व्या शतकात ब्रिटिश राजवटीत, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पट बदलून गेला. ब्रिटिश राज्यकत्र्यानी फोडा व झोडाची राजनीती स्वीकारली. यामूळे मध्ययुगीन संस्कृतीच्या इतिहासावर परिणाम होऊन नवीनच विस्कळीत इतिहास निर्माण झाला. हिंदू-मुसलमान यांची समभावाने वागण्याच्या वृत्तीत बदल होत गेला. यातून आर्थिक आणि राजकीय चढाओढीचे राजकारण सुरु झाले. यातुन भारतीय कॉंग्रेसने 1885 साली विविध धर्माचा विचार करुन धर्मनिरपेक्षतेचे भारतातील धोरण स्वीकारले. यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरु व महात्मा गांधी यांच्या विचारांचा पगडा दिसून येतो. नेहरु हे संपूर्णपणे पाश्चात्य Secularism चा पाठपुरावा करणारे ज्यांत ऐहिकतेलाच महत्व तर महात्मा गांधी धर्माधिष्ठीत जीवन पध्दती मानणारे.
यातून असे जाणवते कीं, भारतीय धर्मनिरपेक्षता अधिकतर तत्त्वज्ञानापेक्षा राजकीय स्वरुपाची दिसून येते. कारण भारतीय काँग्रेसने धर्मनिरपेक्षता जागतिक तत्त्वज्ञान म्हणून स्वीकारले नाही तर सर्व जमातीसाठी एक राजकीय तडजोड म्हणून स्वीकारलेलं तत्त्व आहे कारण येथे विविध संप्रदाय व जातीचे समूह होते. सत्तेचा बटवारा योग्य होऊ शकत नाही म्हणून हिंदुस्थान – पाकिस्तान निर्माण झाले.
भारताच्या फाळणीनंतर बरेच मुस्लीम भारतात होते. महात्मा गांधी आणि नेहरु यांनी निधर्मी राज्य व्यवस्थेचे समर्थन केले. आणि राज्य शासनास धर्म राहणार नाही पण नागरिकाना त्यांचा धर्म पाळता येईल. अशा तऱ्हेने भारत राजकीयदृष्टया निधर्मी राहिला आणि जनता धार्मिक राहू शकली.
येथे हे लक्षांत घेतले पाहिजे कीं, ब्रिटिश काळापासून भारतात धार्मिकता आणि निधर्मी यांच्यांत भेद नव्हता तर निधर्मी आणि जातीयता यांच्यात होता. पाश्चात्य देशांत मुख्य झगडा हा चर्च आणि राज्य शासन यांच्यात होता किंवा चर्च आणि नागरी संस्था यांच्यात होता. पण भारतात हिंदू किंवा मुस्लीम यांच्यात चर्च सारखे कांही नव्हते. म्हणून येथे निधर्मी व धार्मिकतेत झगडा नव्हता. मुख्य झगडा निधर्मी आणि जातीमध्ये होता. जातीय शक्ती मग त्या हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत त्या सत्तेसाठी वापरण्यात आल्या.
या धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनेमुळे धर्म व संप्रदाय यांची भाषा बंद होऊन व्यवहारांत तात्त्विक संप्रदायाची जागा संख्यात्मक संप्रदायाने घेतली. कारण लोकशाहीमध्ये संख्या बळाला महत्व असते. त्यामुळे समाजास बहुसंख्यात्मक व अल्पसंख्यात्मक रुप प्राप्त झाले. आता अशा निधर्मीपणाचा हा फायदा झाला की तोटा? हा प्रश्न सतत पडत आहे.
भारतीय धर्म निरपेक्षता – सद्यस्थिती
भारतीय धर्म निरपेक्षेतेची कल्पना धार्मिक नियम हे राज्य शासनास बांधील नसून सर्व धर्माशी समभावाचे असतील. भारतीय संविधानाच्या 42व्या सुधारणेमध्ये Secularism – सर्वधर्मसमभाव हा शब्द 1976 साली घालण्यात आला. पण भारतीय संविधान किंवा कायदा हा धर्म/संपद्राय व राज्य शासनाच्या नात्याची व्याख्या करीत नाही. भारत या राष्ट्राला कोणता धर्म नाही. नागरिकांना कोणताही धर्म आचरणात आणता येतो तरी राज्यासमोर सर्व नागरीक समान आहेत. या सर्वधर्माला सारखी वागणूकीच्या प्रयत्नात बरेच प्रश्न भारतासमोर उभे आहेत कारण प्रत्येक धर्माचे नियम वेगवेगळे आहेत. आणि विचारधारा आचारधारा वेगळी आहे.
संविधानाचे 7वे शेडयूल असे सांगते की धार्मिक संस्था, धार्मिक न्यास किंवा धार्मिक धर्मादाय संस्था या Concurrent list या सदराखाली येऊ शकतात. याचा अर्थ असा होते की भारतातील प्रत्येक राज्य आपल्या राज्यातील धार्मिक संस्थाबद्दल त्याचे वेगळे नियम करु शकते. जर केंद्र आणि राज्यातील नियमामध्ये कांही तफावत समोर आणली तर केंद्र सरकारचा या बाबतीतला कायदा ग्राहय धरला जाईल.
एकंदरीत भारतातील निधर्मीपणा हा राज्यशासन व धर्म वेगवेगळे मानीत नाही तर त्याऐवजी सर्वधर्माकडे तटस्थेने पाहतो. यामुळे बराच गोंधळ उडत गेल्याचे जाणवते. त्यामुळे या धर्मनिरपेक्षतेकडे ज्या दृष्टिकोनातून पाहिले जाते यावर त्याची व्याख्या केली जाते. इतकेच नव्हे तर धार्मिक संस्थाना शासनाकडून आर्थिक सहाय्याची तरतूद देखील केली गेली आहे.
सेक्युलॅरिझमचे वास्तव आणि कांही प्रश्न
सेक्युलॅरिझम या शब्दाच्या अर्थानुरुप आचरण भारतीय समाजात फार पूर्वीपासून दिसून येत होते. पण जेव्हा राजकारण या शब्दाला जोडले गेले म्हणजे संविधानात हा शब्द घालण्यात आला आणि नंतर 42वी घटना दुरुस्ती अंमलात आणण्याचा जसा प्रयत्न झाला तसे त्याचे रुप बदलून गेले आणि अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. सर्वधर्मसमभावाची जागा धार्मिक सांप्रदायाच्या कुरघोडीची दिसून येऊ लागली. तरी देखील विचारवंतानी हा संधिकाळ असून यांतून सेक्युलॅरिझमच उदयास येऊन सर्व जण त्याचे पालन करतील येथ पासून आता नवीन घडामोडी, भारताचे सांस्कृतिक वैभवाचे वास्तव व त्याचा वारसा याचा विचार लक्षांत घेऊन सेक्युलॅरिझमची नव्याने व्याख्या करण्याची वेळ आली आहे असे विचार मांडले आहेत. वरील तात्त्विक विवेचन सकृत दर्शनी योग्य वाटत असले तरी व्यवहारात या सेक्युलॅरिझमचे वेगवेगळे रुपे बघायला मिळतात व प्रश्नांची मालिका समोर येते.
समाजशास्त्रज्ञ अथवा विचारवंत यांच्या मते धर्मनिरपेक्षता फक्त राज्यसंस्थेचे धोरण नसावे तर ते समाजव्यवहारांचे साधन बनले पाहिजे. प्रत्येक नागरिकाच्या मानसिकतेत त्याच्या वागण्यात, बोलण्यात ते तत्त्व दिसले पाहिजे तरच देश धर्मनिरेपक्ष बनतो.
धार्मिक विचाराच्या लोकांचे म्हणणे असते कीं, धर्मनिरपेक्षतेचे धोरण हे राज्य शासनाने स्वीकारले आहे. समाजाला त्याच्या मर्जीनुसार कोणते धोरण अमलांत आणावे यांची परवानगी आहे. लोकशाहीमध्ये अशी जबरदस्ती करता येणार नाही. वास्तविक सेक्युलर हा शब्द संविधानात येण्याअगोदर हजारो वर्षापासून येथे सहिष्णूतेचे समाज जीवन कार्यान्वित होत होते. हा शब्द आल्याने धार्मिक सांप्रदायांच्या मानसिकतेत वेगळाच बदल दिसून येत आहे. त्याची परिणीती सेक्युलॅरिझमची व्याख्या नव्याने करण्यापर्यंत होत आहे. धार्मिकता व तिचा आग्रही अतिरेक कर्मकाण्डाच्या रुपांत दिसतो आहे.
श्री. सुरेश व्दादशीवार सारख्या विचारवंताच्या मते येणारा काळ सेक्युलॅरिझमचाच आहे. सुरेश व्दादशीवार, साधना, नोव्हेंबर 2014 या अंकात लिहितात, धर्मांध शक्ती सध्या उधाण आल्याचे दिसत असले तरी ही विझत्या दिव्याची वाढलेली ज्योत आहे. समाजाने वा व्यक्तिने सेक्युलर होणे ही सामाजिक व व्यक्तिगत पातळीवरील मनोव्यापाराची प्रक्रिया आहे आणि तीही बहुसंख्य माणसांबाबत पूर्ण झाली आहे. त्याना धर्माचा वा धर्मांधर्तेचा ज्वर चढविणाऱ्या व्यक्ति राजकीय आहेत, त्या वगळता सारी माणसे माणसासारखीच आहेत. हे ‘माणूसपण वाढविणे,’ हाच सेक्युलॅरिझमचा अर्थ व संदेश आहे. आणि त्याच्या कक्षा दिवसेंदिवस रुंदावत जाणाऱ्या आहेत.
हा फार मोठा आशावाद वाटतो. ‘माणसाचे माणूसपण वाढविणे’ हाच जर सेक्युलॅरिझमचा संदेश असेल तर सेक्युलॅरिझम मधील ऐहिक जीवनशैलीचा विचार करता (ज्याची आसक्ती वाढविव्याची मानसिकता असते) हा संदेश अमलांत आणणे कठिण वाटते. वास्तविक हाच मानवतेचा संदेश उपनिषदकारानी दिला आहे.
श्री. सुरेश व्दादशीवार यांच्या म्हणण्याप्रमाणे सेक्युलरिझमची प्रक्रिया बहुसंख्य माणसांबाबत पूर्ण झाली आहे, हे निरिक्षण फारच आशावादी वाटते. आजही जागतिक स्तरावर% 59 लोक धार्मिक आहेत. धर्मावर विश्वास न ठेवणारे 23 % आहेत तर अगदी निरिश्वरवादी 13% आहेत. हा सर्वे WIN/Gallup International या संस्थेने Global Index of Religion and Atheism यासाठी केलेल्या मत मोजणीतून आढळून येतो. भारताबद्दल या संस्थेच्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की 2005 ते 2012 या काळात धार्मिक लोकांची संख्या 6% ने कमी झाली आहे म्हणजे 2005 साली धार्मिक लोक 87% होते तर 2012 साली ते 81% होते. याच बरोबर हे सर्वेक्षण असेही दर्शविते की निरीश्वरवादी लोकामध्ये 1% कमी झाली आहे. म्हणजे 2005 साली जे 4% अगदी निरीश्वरवादी होते ते 2012 साली 3% झाले. याचा अर्थ असा होतो की लोकांचा ईश्वरावर विश्वास वाढत आहे. हे सर्वेक्षण फक्त जगातील पन्नास हजार लोकांच्या मत चाचणीवर केले गेले आहे ही संख्या जागतिक लोकसंख्येच्या मानाने खूपच कमी वाटते.
यावरून असे जाणवते की, धर्मावर विश्वास न ठेवणाऱ्यांच्या संख्येत जरी वाढ दिसत असली तरी आजही धर्मावर विश्वास ठेवणारे भारतात तरी 81% लोक आहेत. याशिवाय असेही लोक खूप प्रमाणात आढळून येतात जे वरून अज्ञेयवादी किंवा निरीश्वरवादी म्हणतात पण आतून धर्मावर व ईश्वरावर विश्वास ठेवत असतात. याचे द्योतक म्हणजे मंदिरांची वाढती संख्या आणि त्यातील वाढत्या रांगा. तसेच देवस्थानांच्या उत्पनाची वाढती संपत्ती हेच दर्शविते की लोकांचा ओढा धार्मिकतेकडे वाढत आहे. मग तो श्रद्धेपोटी असेल किंवा मानसिक शांतता लाभावी म्हणून असेल. तेव्हा श्री सुरेश व्दादशीवार यांचे सर्वांनी सेक्युलर विचार मनोमन मानला आहे व फक्त काही राजकीय मंडळीमूळे तो पूर्णपणे आपणास दिसत नाही. हे म्हणणे थोडे वेगळे अर्धसत्य वाटते. सेक्युलॅरिझम हीच विचारप्रणाली ऐहिकतेलाच प्राधान्य देत असल्याने भारतीय मनाच्या तात्त्विक व सांस्कृतिकतेला छेद देऊ शकणार नाही. तेव्हा भारतात तरी त्या अर्थाने सर्व सेक्युलर होतील असे वाटत नाही.
सेक्युलॅरिझमची नव्याने व्याख्या?
अस्तित्वात असलेल्या भारतीय धर्मनिरपेक्षतेच्या व्यवहारात व वास्तवात जाणवणाèया त्रुटी व त्याचे देशाच्या दृष्टिने कांही अनिष्ट परिणाम याचा पूनर्विचार करुन बदलत्या परिस्थित धर्मनिरपेक्षतेची नव्याने गतिमान व्याख्या करावी असे कॉग्रेसचे निष्ठावंत नेते व विचारवंत खासदार श्री सरदार करणसिंह याना वाटते व 26.6.2015 च्या इंडियन एक्सप्रेसमध्ये तसे सविस्तर लेखातून त्यानी प्रतिपादले आहे. याचा अर्थ असाही होऊ शकतो की, अस्तित्वात असलेली संविधानातील याबाबतची तरतूद अपुरी आहे किंवा तिचे अपयश आहे.
डॉ. करणसिंह या लेखात म्हणतातः
आपली धर्मनिरपेक्षताही धर्म हा पूर्णपणे वैयक्तिक असून राज्यसंस्थेस त्याचा संबंध नाही. त्यांच्या मते येथे आपली चुकीची समजूत झाली आहे. धर्म व्यक्तिगत असला तरी त्याचा सामुदायिक प्रभाव लक्षांत घेता ती एक सामाजिक शक्ती तयार होते. याची आपल्याला विसरण पडली असावी. कारण धर्माचा सामुदायिक प्रभाव किंवा धार्मिक सांप्रदायातील संघर्ष याची राज्यशासनाला दखल घ्यावी लागते.
दुसरे तत्त्व जे स्वीकारले होते ते म्हणजे आर्थिक व शैक्षणिक सुधारणा झाल्या की, धर्म संकल्पना आपोआप मागे पडेल. पण ही धारणा खोटी ठरली आहे. या उलट सुशिक्षित व अशिक्षित, शहरी वा ग्रामीण समाज प्रथम प्रार्थना मंदिराचा विचार करीत असतो असे एका अभ्यासावरुन दिसून आले आहे. हा विचार सर्व सांप्रदायात जगभर आढळून येतो.
डॉ. करणसिंहाना खटकणारा मुद्दा धर्माच्या नावाखाली, धार्मिक संस्थाना मिळणारे परदेशी अनुदान/निधी याचा राजकीय उद्देशासाठी होणारा वापर. धार्मिक स्वायत्ततेच्या नावाखाली काही सांप्रदायांच्या आचाराला कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवले जाते. आणि त्याचा असा दुरोपयोग होतो असे त्याना वाटते.
या लेखांत शेवटी त्याची एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात ‘जेव्हा एखाद्या राष्ट्राला हजारो वर्षाची वैचारिक व सांस्कृतिक परंपरा असते व त्यांच्या मध्यवर्ती विचारधारेला जर एखादे जुनाट खडकाळ अवशेष समजून चालल्यास तेव्हा त्या राष्ट्राची नवनिर्मितीची क्षमता खुंटते.’
त्यांचा रोख भारताच्या वैचारिक व सांस्कृतिक वारसाबाबत असावा. आणि याचा संदर्भ घेऊन नवीन गतिमान धर्मनिरपेक्षतेची (सेक्युलॅरिझम) व्याख्या करावी असे त्याना वाटते.
आधुनिकता आणि धर्मनिरपेक्षता
धर्मनिरपेक्षतेची जी वेगवेगळी आकलने आहेत जसे पाश्चात्याना वाटते भारतात धर्मनिरपेक्षताच नाही. किंवा धर्मनिरपेक्षता म्हणजे विशिष्ट धार्मिक सांप्रदायताचे तुष्टीकरण तसेच कांही विचारवंताना आधुनिकता विरोधी असलेल्या लोकांचा धर्मनिरपेक्षतेला विरोध असतो आणि धर्मनिरपेक्षता म्हणजेच आधुनिकता असे सूत्रच निर्माण झाल्याचे जाणवते.
अशा या संबधाचा विचार दोन दृष्टिकोनातून होऊ शकतो.
धर्माच्या दृष्टिकोनातून
भारतातील धार्मिक सांप्रदाय, जमाती यांच्या व्यक्तिगत तसेच आर्थिक व सामाजिक विकासावरुन धर्माच्या दृष्टिकोनातून बघता आधुनिकता ही धर्मावर अवलंबून न राहता धर्माच्या बंधनातून सुटून वैज्ञानिक विचारधारेनुसार जीवन जगण्यास प्रवृत्त करते व माणसाला स्वतंत्र बुध्दीने जगण्यास शिकवते. ही आधुनिकतेची व्याख्या पाश्चात्य समाजशास्त्रज्ञांची आहे. पण व्यवहारात आधुनिक जीवनशैलीचे जे चित्र दिसते ज्यांत ‘स्वतंत्र बुध्दीने जगण्याची’ जागा नैतिकतेला फारसे महत्व न देता स्वैराचाराने व चंगळवादी जीवन जगण्यास प्राधान्य दिल्याचे दिसते. न्यूटन, कार्टेसियन यांच्या तत्त्वानुसार व यांत्रिकी पध्दतीने अर्थ लावून व सर्वाची सरळ मिसळ करुन एक नवीन जगण्याची पध्दती बनून जाते. थोडक्यात जीवनाचा असा आराखडा तयार केला जातो. ज्यांत ज्याने आराखडा तयार केला त्याला कोठेच स्थान नसते. म्हणून आईनस्टाईन याने आधुनिक शास्त्रज्ञाचे वर्णन करताना असे म्हटले आहे, ‘ हे लोक लाकडाच्या अशा भागांत छिद्रे पाडीत बसतात जेथे ते सोपे असते. ‘येथे हे लक्षांत घेतले पाहिजे की, आधुनिकतेला विरोध म्हणजे आधुनिकतेच्या नावाखाली होणाऱ्या चंगळवादाला व स्वैराचाराना विरोध असतो. उलट भारतीयांची आधुनिकतेची कल्पना अशी आहे’ ही एक अशी विचारधारा जी गत कालातील कांही संकल्पनांचा त्याग व नविन आशादाई कल्पनांची सुरुवात ज्यामध्ये वैज्ञानिक व मानवतावादी दृष्टिकोन अभिप्रेत असून इतिहासातील कांही संकल्पनांचा विचार केला जातो.
येथे ध्यानांत घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेत धर्म व धर्मनिरपेक्षता एकत्र नांदू शकतात असे आढळून येते. तसेच सेक्युलॅरिझमचे पुरस्कर्ते तत्त्वज्ञ होलीओक यांच्या मूळ कल्पनेत धर्मास बाजूला केले नाही. धर्मास विरोध हा फक्त निरीश्वरवादी व कट्टर इहवादी मंडळीचा असतो. पण बुध्दी प्रामाण्यवाद्यामध्ये किंवा राजकारण्यामध्ये जो आधुनिकतेला विरोध करतो तो धर्मनिरपेक्षतेच्या पण विरोधी असतो. अशी भावना होऊन बसली आहे.
आधुनिकतेच्या अथवा धर्मनिरपेक्षतेच्या विरोधांत जाण्यासाठी व्यक्तिविकास व सामाजिक विकास तितकाच महत्वाचा ठरु पहात आहे. हा विकास फक्त आर्थिक निकषावर अवलंबून नसून सर्वांगीण असून ज्यात ऐहिक व अध्यात्मिक या जीवनाच्या दोन्ही अंगाना महत्व आहे. आधुनिकतेतील ‘आधुनिक’ या शब्दाचे सहचर्य हे विज्ञान आणि मानवतावाद या सुंदर कल्पनाशी निगडीत आहे. विज्ञान निष्ठ मनोवृत्ती आणि मानवतावादी प्रेरकशक्ती यांच्या संयोगामुळेच मानवाची सर्वांगीण उन्तनी साधता येते. तुमचा मानवतावाद विज्ञानाशिवाय असेल तर तो बहुतांशी भावनिक स्वरुपाचा असतो. तुमचे विज्ञान जर मानवतारहित असेल तर त्यामुळे दुर्बल वर्गाची पिळवणूक होईल. असा विचार जर आचरणात आला नाही तर व्यक्ती व समाज त्या आधुनिकतेला व धर्मनिरपेक्षतेला पसंती न देता मूलतत्त्ववादाला कवटाळतो.
वास्तविक सर्वधर्मीयाना आपले व्यक्तिमत्व सुधारण्याची संधी आणि आपल्या क्षेत्रात उच्चपदापर्यंत पोहचण्याची परिस्थिती आणि निःपक्षपणे मतदान करण्यासारखी परिस्थिती ही भारताची मोठीच उपलब्धी आहे. संधीची समानता हे धर्मनिरपेक्षतेचे महत्वाचे तत्त्व आहे. तसे प्रत्यक्षात भारतात दिसून देखील येते.
येथे हे पण लक्षांत घेतले पाहिजे कीं, पहिल्या महायुध्दानंतर अल्पसंख्य आणि बहुसंख्य असे विभाजन झाले. हे जरी रशियात झाले असले तरी त्याचा परिणाम आपल्याकडेही झाला. अल्पसंख्य जमात ही मागास जमात असते ही विचारधारा निर्माण झाली. म्हणून भारतातील अल्पसंख्य मुस्लीम जमात मागास समजली जाऊ लागली. त्याना पुढे येण्यासाठी कांही सवलती देण्यात आल्या तेव्हा ते त्या जमातीचे तुष्टीकरण होत आहे. ही भावना बहुसंख्य समाजात दृढ होऊ लागली. त्याचा परिणाम समान नागरी कायद्याची मागणी होऊ लागली. वरील विश्लेषणावरुन आधुनिकतेला व धर्मनिरपेक्षतेला तात्त्विक विरोध नसून त्यातून निर्माण होणाऱ्या विसंगतीना असतो.
सारांश
वरील सेक्युलर-धर्मनिरपेक्षतेच्या तात्त्विक विवेचनावरुन असे जाणवते की, पाश्चात्य सेक्युलॅरिझम व भारतीय संविधानिक धर्मनिरपेक्षता या संकल्पना भिन्न असून त्या राष्ट्राच्या मूळ विचारधारा व सxस्कृतीचा आधारे निश्चित करण्यात आल्या आहेत. पाश्चात्य देशाप्रमाणे भारताला धर्म व राष्ट्र पूर्णतः वेगळे करता आले नाही. व तसे करणे कठीण आहे. भारतीय धर्मनिरपेक्षतेमूळे निर्माण झालेली बहुसंख्य व अल्पसंख्य विचारप्रणाली व त्यातून निर्माण होणाऱ्या जीवननिष्ठा या राष्ट्रनिष्ठेला तडा देणाऱ्या ठरु शकतील. याची वेळीच दखल घेणे गरजेचे वाटते. स्वार्थी व लघुदृष्टीने राजकारण्यानी भारतीय धर्मनिरपेक्षतेचा वापर चालूच ठेवला तर राष्ट्रीय ऐक्यास धोका निर्माण होऊ शकतो. कांही धार्मिक सांप्रदायाना (Religion) धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली दिल्या गेलेल्या स्वायत्ततेच्या सहुलतींचा पूनर्विचार करुन त्याना मिळणारे परदेशी अनुदान व याच्या नियंत्रणाची कार्यवाही शासकीय पातळीवर होणे गरजेचे आहे.
प्रचलीत धर्मनिरपेक्षेतून अनुभवास आलेल्या काही मर्यादा व धार्मिक सांप्रदायांच्या स्वायत्ततेचा पुर्निविचार यांचा डॉ. करणसिंहानी सुचवल्याप्रमाणे धर्मनिरपेक्षतेची नव्याने व्याख्या/विचार करण्यास हरकत नसावी. कारण व्यवहारात सर्वधर्मसमभाव यामुळे आंतर धार्मिक संबंध टिकून राहतील पण त्याचे रुपांतर राष्ट्रीय ऐक्यासाठी कितपत होईल याचाही विचार करणे गरजेचे वाटते.
हे सर्व साध्य होण्यासाठी आज तरी समोर एकच पर्याय दिसतो आहे ज्याचा सर्वोच्च न्यायालय वारंवार आठवण करुन देत आहे तो म्हणजे राष्ट्रहितासाठी व राष्ट्रासाठी एकच समान नागरी कायदा आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी. यासाठी राष्ट्रनिष्ठ राजकीय इच्छाशक्तीच्या नेतृत्वाची गरज आहे.

…. समाप्त

dr.rapathak@gmail.com