Category Archives: पुस्तक परीक्षण

‘अस्तित्त्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे’

आपल्या भोवतालची संपूर्ण सजीवसृष्टी “आहार, निद्रा, भय मैथुनं च” या चार प्राथमिक प्रेरणांच्या चौकटीत वावरत असते. मानवही त्याला अपवाद नाही. परंतु त्या चौकटीबाहेर पाऊल टाकून आजूबाजूच्या सृष्टीची ओळख करून घेणे विकसनशील बुद्धी असलेल्या मानवालाच जमले आहे. सर्व सृष्टीची माहिती करून घेण्याच्या उत्सुकतेपोटी त्याने अनेक ज्ञानशाखा विकसित केल्या. प्रत्येक शाखा वेगवेगळ्या विषयांचा वेध घेण्याचा प्रयत्‍न करीत असते. अशाच एका ज्ञानशाखेने विषय निवडला, “सजीवांची निर्मिती आणि विकास.” सजीवांच्या उत्पत्तीविषयींचे कुतूहल माणसाला फार प्राचीन काळापासून वाटत आले आहे. अनेक संस्कृतींनी , तत्त्ववेत्त्यांनी, धर्मग्रंथांनी ह्या विषयाचा वेध घेणाचा प्रयत्‍न केला आहे. पण केवळ कल्पनेशिवाय अन्य कोणतेही साधन जवळ नसल्यामुळे त्यांच्या हाती कांही लागले नाही. एक प्रकारची गोंधळाची स्थिती सर्व वैचारिक जगतात होती.
परंतु 1859 साली चार्ल्स डार्विनचा ” दि ओरिजिन ऑफ स्पीसीज” हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आणि सर्वच स्थिती पालटून गेली. नैसर्गिक निवडीच्या आधाराने सर्व सजीवांची उत्क्रांती झाली आहे असा सिद्धान्त डार्विनने मांडला. या सिद्धांताचा पुढे अनेक शास्त्रज्ञांनी सखोल व सप्रयोग अभ्यास करून विस्तार केला. अनेक ग्रंथ जगाच्या सर्वच भाषांतून ह्या विषयावर प्रसिद्ध झाले. मराठीतही बरीच पुस्तके ह्या बाबतीत उपलब्ध आहेत. त्यांतच अलीकडे एका सुंदर पुस्तकाची भर पडली आहे.”गोफ जन्मांतरीचे (अस्तित्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे).” हेच ते पुस्तक. लेखिका आहेत कराडच्या डॉ.सुलभा ब्रह्मनाळकर. विषयाचा सखोल अभ्यास करून, अनेक ग्रंथांचे परिशीलन करून व त्यांना आपल्या तर्कशुद्ध चिंतनाची जोड देऊन डॉ. ब्रह्मनाळकरांनी एक देखणे पुस्तक वाचकांच्या हाती दिले आहे.
अगदी प्रस्तावनेपासूनच पुस्तक वाचकाच्या मनाची पकड घेते. पारंपरिक दृष्टिकोन सोडून जगाकडे पाहण्याचा एक वेगळा परंतु सत्यनिष्ठ दृष्टिकोनही असू शकतो हे प्रस्तावनेमधून वाचकाच्या मनावर ठसायला सुरवात होते.
पुस्तकाच्या सुरवातील डार्विनविषयी वैयक्तिक माहिती, त्याचा जगप्रवास, त्याने केलेला सजीवांचा अभ्यास व मांडलेला सिद्धांत, डार्विनचे समकालीन तसेच त्याच्यानंतर झालेले शास्त्रज्ञ, त्यांनी मांडलेल्या उपपत्ती आणि सिद्धांताचा केलेला विस्तार इत्यादि सर्व गोष्टींचे थोडक्यात पण सर्वस्पर्शी विवेचन लेखिकेने केले आहे. त्याच बरोबर एकाच आदिपूर्वजापासून ते थेट आजच्या मानवापर्यंत सजीवांची उत्क्रांती कशी होत गेली, जीवसृष्टीच्या वंशवृक्षाला वेगवेगळ्या फांद्या कशा फुटत गेल्या, नैसर्गिक निवडीच्या चाळणीतून टिकून राहिलेल्या सजीवांच्या निरनिरळ्या जाती, प्रजाती कशा निर्माण झाल्या याचे सुंदर , सचित्र वर्णन लेखिका करतात.
सूक्ष्मदर्शकासारख्या आधुनिक उपकरणांच्या अभावी डार्विनच्या काळात अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नांची नंतरच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली उत्तरे नेटक्या पद्धतीने लेखिकेने मांडली आहेत. आर्.एन्.ए., डी.एन्.ए., गुणसूत्रे (क्रोमोसोम्स), जनुके(जीन्स), जिनोम आदि पारिभाषिक संज्ञांचे अर्थ उत्कृष्टपणे समजावून सांगितले आहेत. क्रीक-वॅटसन ह्या शास्त्रज्ञांच्या शोधांमध्ये आनुवंशिकतेच्या कणांच्या रेण्वीय रचनेचा अंतर्भाव आहे. तर नीरेन्बर्ग-खुराणांना पेशींमध्ये असलेल्या गुणसूत्रांमधील माहितीचा माग लागला. ह्या गुणसूत्रांमध्येच सजीवाचा संपूर्ण इतिहास दडलेला असतो असे आढळून आले. ह्या इतिहासावर म्हणजेच “जिनोम” वर पुस्तकाचे रूपक कल्पून लेखिकेने ते आपल्या ग्रंथात सर्वदूर खेळविले आहे. त्यामुळे विषय समजणे वाचकांसाठी फारच सोपे झाले आहे. आपल्या नेहमीच्या पुस्तकात ज्याप्रमाणे प्रकरणे, परिच्छेद, वाक्यें, शब्द, अक्षरे असतात तशीच याही पुस्तकात आहेत. फक्त त्यांची भाषा सांकेतिक असते. ही जनुकांची भाषा आहे. अनेक शास्त्रज्ञांनी मोठ्या परिश्रमांनी ह्या संकेतांची उकल करण्यात यश मिळविले. ही उकल होऊन पुस्तकाचे “वाचन ” होताच अलीबाबाच्या गुहेचे दार उघडल्यासारखे झाले. सजीवसृष्टीच्या उत्क्रांतीचा संपूर्ण इतिहास दृष्टिक्षेपात आला. पृथ्वीवरील अणुरेणु आणि त्यांची जोडणी करणारे भौतिक नियम हेच या पुस्तकाचे “लेखक” आहेत. व त्यांतील आज्ञावलींना अनुसरूनच सर्व सृष्टीचे व्यवहार चालतात. अन्य कुणाकडेही सृष्टीचे कर्तृत्व आणि चालकत्व जात नाही. असे डॉ.ब्रह्मनाळकर निक्षून सांगतात. पटवूनही देतात. ह्याच नियमांनुसार डी.एन्. ए. व प्रथिने यांचे रूपांतर सजीवांच्या शरीरात होते असे त्या वैज्ञानिक प्रयोगांचे संदर्भ देऊन सांगतात.
उत्क्रांतीच्या इतिहासाचे फारच मनोज्ञ वर्णन लेखिकेने केले आहे.”ल्यूका” (लास्ट युनिव्हर्सल कॉमन अ‍ॅन्सेस्टर) ते माणूस हा प्रवास कसा झाला हे त्यांनी सुबोध पद्धतीने स्पष्ट करून दाखविले आहे. नैसर्गिक निवडीचे तत्त्व सर्व सजीवांना लागू असून त्याला अनुसरूनच सजीवसृष्टी उत्क्रान्त झाली. ह्या ’चाळणी’तून निवडले गेलेले सजीवच टिकून राहातात. जे निवडले जात नाहीत त्यांच्या जाती-प्रजाती नष्ट होतात याविषयीं असंख्य दाखले लेखिकेने दिले आहेत. प्रत्येक प्रजाती जीवनकलहात टिकून राहण्यासाठी धडपडत असते. ही धडपड, हा संघर्षच उत्क्रांतीचा गाभा आहे. हे अधिक स्पष्ट करून दाखविण्यासाठी लेखिकेने जणू आपले बोट धरून उण्या-पुर्‍या साडेतीन अब्ज वर्षांचा प्रवास घडवला आहे. सामान्यत: आपण “स्थळां”चा प्रवास करतो. लेखिका आपल्याला “काळा” तून घेऊन चालतात. एच्. जी. वेल्स ह्यांनी संकल्पिलेल्या “कालयंत्रा (टाईम मशीन) मधून जात असल्याचा भास होतो. “वाटे”मध्ये विविध जाती-प्रजाती कशा उद्भवल्या व उत्क्रांत झाल्या ह्याचे त्यांनी काही प्रातिनिधिक उदाहरणे देऊन मनोहारी दर्शन घडविले आहे. चाळणीत अडकून पडल्यामुळे पुढे सरकू न शकलेल्या दुर्दैवी प्रजातींचे त्यांनी कारणे दाखवून उल्लेख केले आहेत. एकंदरीत हा प्रवास करीत असताना एखादा अद्भुतरम्य चित्रपट पाहात असल्यासारखे वाटते.
उत्क्रांती एकाएकी एका रात्रीतून घडत नसते. ती एक अतिशय संथपणे घडत जाणारी प्रक्रिया आहे. ज्याप्रमाणे आपण एका उडीत पर्वताचे शिखर गाठू शकत नाही; परंतु तेच एकएक पाऊल पुढे टाकीत, हळूहळू ,चढत गेलो तर शिखरापर्यंत पोचू शकतो हे चपखल उदाहरण देऊन उत्क्रांती ही साठत-साठत जाणारी गोष्ट आहे हे लेखिका सहज पटवून देतात. “ह्या सर्व गोष्टी हळू हळू एक एक पायरीने होत होत हजारो पिढ्यांमध्ये घडल्या” असे सांगतात. “पण घाई कोणाला आहे?” असे काहीसे मिष्कील पण वास्तव असे प्रश्नरूप विधान सुलभाताई करतात. आणि लगेच, “न संपणारा काळाचा पट्टा हे उत्क्रांतीचे बलस्थान आहे.” असे सुभाषितवजा वाक्यही टाकतात.
संपूर्णपणे निसर्गाच्या आज्ञेप्रमाणे होत असलेली उत्क्रांती ही एक हेतुशून्य प्रक्रिया आहे. तिला कोणताही उद्देश नाही, ठरलेले असे गंतव्य नाही. निसर्गावर कोणत्याही भाव भावनांचे आरोप करता येत नाहीत. तो नुसता असतो. तो सुष्ट नाही की दुष्ट नाही, सुरूप नाही वा कुरूप नाही, कनवाळू नाही किंवा क्रूर नाही, त्याला कोणीही कर्ता, चालक वा नियंता नाही हे लेखिका आवर्जून सांगतात.
“मानवी जगा”विषयी चर्चा करण्यासाठी लेखिकेने एक स्वतंत्र विभाग ग्रंथाला जोडला आहे. मानवाचे या सृष्टीतील वैशिष्ट्यपूर्ण स्थान मान्य करूनच त्या ही चर्चा करतात. अर्थात ती करतानाही त्यांनी विज्ञानाचा पदर सोडलेला नाही. उत्क्रांतीच्या मूळ तत्त्वांशी असलेली नाळ तुटू दिलेली नाही. विज्ञानाच्या मध्यवर्ती धाग्याभोवतीच तर त्यांनी हा संपूर्ण गोफ गुंफला आहे. ह्या अथांग कालप्रवाहात उत्क्रांतीच्या तत्त्वाच्या काडीचा आधार घेत वाहात आलेल्या या द्विपादाचे महत्त्वाचे बलस्थान म्हणजे त्याचे भावविश्व.
माणसाचे मन हे परस्पर भिन्न (आणि कित्येकदा तर परस्परविरुद्धही) अशा अनेक भावभावनांची गुंफण आहे. राग, लोभ, दया, करुणा, वात्सल्य, हेवा, मत्सर, सहानुभूती, प्रेम, सहिष्णुता, कृतज्ञता, कृतघ्‍नता, क्रौर्य, आदि किती तरी विकारांनी मानवी मनाचा आश्रय घेतलेला असतो. उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर माणसाला कधीतरी अशा विकारांचा फायदा झाला असावा. आणि म्हणूनच त्या त्या भावना निर्माण करणार्‍या जोडण्या मेंदूत होऊन त्यांच्यात स्रवणारी रसायने उत्क्रांत झाली असावीत. ह्या भावनांना चांगले , वाईट अशी विशेषणे आपण लावतो. निसर्गात त्या फक्त “वृत्ती” असतात. काहींना सद्गुण तर काहीना दुर्गुण ठरविले जाते ते आपल्या त्याविषयींच्या प्रतिक्रियांवरून. ह्या प्रतिक्रियांमधून माणसाचे विचारविश्व विस्तारले. ह्या विस्ताराचेच नाव “संस्कृती”.
माणूस हा “माणूस” म्हणून उत्क्रांत होण्यापूर्वी “स्वार्थ” हाच सर्व सजीव सृष्टीचा पाया होता. (मानवेतर सृष्टीत तो अजूनही तसाच आहे.) परंतु कुठल्यातरी टप्प्यावर स्वार्थाबरोबरच परार्थसुद्धा प्रजाती टिकून राहाण्यासाठी फायद्याचा ठरतो हे उमगले. आणि परार्थ माणसाच्या जीवनात स्थिर झाला. अर्थात स्वार्थ पूर्णपणे सुटला नाही. एका परीने परार्थातही स्वार्थाचा भाग असतोच. ह्यामुळे एक पेच उभा राहिला. माणसाला “दुहेरी अस्तिवाला ” सामोरे जावे लागले. एक स्वत:साठी आणि एक समाजासाठी. एकीकडे तो “स्वतंत्र जीव” आहे. तर दुसरीकडे “समाजाचा घटक” आहे. त्यात त्याच्या भावविश्वाची ओढाताण होते आहे. स्वत:च्या तसेच आपल्या कुटुंबाच्या हिताची चिंता वाहात असतानाच तो समाजाच्या कल्याणाचीही सोय पाहात असतो. समाजासाठी रामराज्य आणण्याचे, महामानव बनण्याचे स्वप्न तो पाहातो आहे. ते पूर्ण होण्यासाठी संस्कृतीच्या प्रवासात विकसित झालेली जीवनमूल्ये टिकून राहणे आवश्यक आहे. कारण ती दिशादर्शकाचे दीपस्तंभ म्हणून कार्य करतात, असा लेखिकेचा निष्कर्ष आहे आणि त्यासाठी त्या “नेचर ” आणि “नर्चर” अशा दोन्हीची आवश्यकता अधोरेखित करतात.
माणसाला हे शक्य आहे. कारण त्याला निसर्गविज्ञानाचा आधार आहे. ह्या आधाराचे मूळ मेंदूत आहे. सजीवाच्या मेंदूवर जनुकांच्या आज्ञावलींचे नियंत्रण असते. परंतु मानवी मेंदू इतर सजीवांप्रमाणे केवळ प्राथमिक अवस्थेत रेंगाळला नाही. त्याच्यात लवचिकता आहे.त्यामुळे तो विकसनशील बनला आहे. त्याच्या ठिकाणी संस्कारक्षमता आली आहे. तो स्वतंत्रपणे विचार करू शकतो. परंतु मेंदूच्या या स्वातंत्र्याचा उपयोग एका मर्यादेतच केला जातो. कारण माणूस हा समाजाचा घटक असतो. ’स्व’ तंत्राने वागण्यापेक्षा ’समाज’ तंत्राने वागणे त्याला सोयीचे व सुरक्षिततेचे वाटत असते. कधीकाळी उत्क्रांतीच्या प्रवासात फायद्याची ठरलेली “टोळीची मानसिकता ” माणसाच्या मेंदूत पक्की रुजली आहे. त्यामुळे लहानपणी मनावर झालेले संस्कार, त्यांतून रूढ झालेल्या समजुती, श्रद्धा, अंधश्रद्धा दृढ होत जातात. घट्टपणे धरून ठेवलेल्या ह्या खुंट्या सोडणे कठीण होऊन बसते. परंतु माणसाच्या स्वातंत्र्याला पडणार्‍या या सांस्कृतिक मर्यादा ओलांडण्याची क्षमताही ह्या मेंदूत आहे. तिचे नाव “विवेक प्रज्ञा “(रीझन).
गेल्या कांही लाख वर्षांत विकसनशील मेंदूत कांही गुंतागुंतीची चक्रे उत्क्रांत झाली आहेत. त्यांतूनच या विवेकप्रज्ञेची प्राप्ती झाली आहे. ही प्रज्ञा मानवाला ’योग्य-अयोग्या’ चा विचार करण्यासाठी मार्दर्शन करते. ज्ञानाचा निकष लावून त्याप्रमाणे कृती करण्याचा आदेश देते. चुकीच्या समजुती, अंधश्रद्धा, जुन्या रूढी यांच्यावर मात करण्याचे बळ देते. थोडक्यात ही विवेकप्रज्ञासुद्धा नैसर्गिकपणे उत्क्रांत झाली असून पूर्णपणे विज्ञानसिद्ध आहे. हे सुलभाताई मोठ्या खुबीने वाचकांना समजावून देतात. “एखाद्या तत्त्वाची, व्यक्तिविरहित चिकित्सा करण्याची क्षमता ही मानवी बुद्धीची फार मोठी झेप आहे.” हे ह्या प्रज्ञेच्या संदर्भात केलेले विधान लेखिकेच्या प्रतिभेचीही झेप दर्शविते.
ग्रंथामध्ये लेखिकेने आपल्या विषयाची अगदी सांगोपांग विस्तृत चर्चा केली आहे. ती करण्याच्या ओघात त्यांनी निसर्गाचे महत्त्व विशद केले आहे. ह्या सृष्टीचा कोणी कर्ता-करविता नाही,कोणी चालक वा नियंता नाही सर्व व्यापार विज्ञानाच्या नियमांनुसार होतात. त्यामुळे ईश्वराचे अस्तित्व, त्याचे सर्वशक्तिमत्व, तसेच व्रत-वैकल्ये , सक्षात्कार, गूढात बोट दाखवून केलेले भविष्यकथन, अंतर्ज्ञान, चमत्कार आदि समजुती निरर्थक असून त्यांना कोणताही शास्त्रीय आधार नाही हे त्या सहजपणे पण निश्चितपणे नमूद करतात. मुख्य म्हणजे त्यात कुठलाही अभिनिवेश नाही. त्यांनी केलेल्या व्यासंगपूर्ण विवेचनाचा तो अगदी सहज, स्वाभाविक निष्कर्ष आहे.
पुस्तकाची भाषा सुबोध आणि रसाळ तर आहेच, शिवाय त्यात लालित्य आहे. लाघव आहे. विज्ञानासारखा काहीसा गद्य विषय सुलभाताईंनी अतिशय प्रसन्न आणि खेळकर पद्धतीने हाताळला आहे. (हे दोन गुण बहुधा लेखिकेच्या व्यक्तिमत्वातच असावेत.) लेखनशैली इतकी वेधक आणि बोलकी आहे की जणु काही लेखिका आपल्या समोर बसून विषय समजावून सांगत आहेत असा सारखा भास होतो. उद्बोधन, प्रबोधन आणि रंजन अशा तीनही गोष्टी सहज साध्य झाल्या आहेत. सहज लक्ष वेधून घेईल असे सुंदर मुखपृष्ठ आणि सुबक छपाई ह्या आणखी दोन जमेच्या बाजू.
थोडक्यात हे एक अप्रतिम पुस्तक असून विज्ञानाची आवड असलेल्या (आणि नसलेल्यासुद्धा) सुशिक्षित वाचकांनी आवर्जून वाचावे अशी शिफारस करणे अनाठायी होणार नाही. अल्पावधीत पुस्तकाच्या चार आवृत्या निघाल्या हे त्याच्या यशस्वितेचे गमक ठरावे. वाचकप्रियतेचेही.
गोफ जन्मांतरीचे
डॉ.सुलभा ब्रह्मनाळकर,
राजहंस प्रकाशन, पुणे.
पृ.सं. 346, किं रु 300

bhalchandra.kalikar@gmail.com

नवे जग नवी तगमगः एक ज्ञानज्योत

कुमार शिराळकर यांनी त्यांच्या चाळीस वर्षांच्या राजकीय वाटचालीत वेळोवेळी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रश्नांबद्दल लिहिलेल्या निवडक लेखांचा संग्रह `मनोविकास प्रकाशना’ने `नवे जग, नवी तगमग’ या शिर्षकाखाली देखण्या स्वरूपात प्रकाशित केला आहे. शिवाय स्वत:बद्दलबढाईखोर सोडाच पण प्रसंगानुरूपसुध्दा न बोलणाऱ्या कुमार शिराळकर यांनी या संग्रहात स्वत:बद्दल दोन लेख लिहिले आहेत. त्यातून त्यांच्या एकंदरच जडण घडणीची कल्पना येते आणि त्यामुळे हा माणूस अधिकओळखीचा आणि आपला होत जातो. धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील जनतेने त्यांना `कुमारभाऊ’ ही दिलेली पदवी अधिकच सार्थ वाटू लागते. त्यातून जनतेशी असणारे त्यांचे जैव नाते प्रकर्षाने पुढे येते.
या लेख संग्रहाला ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांची प्रस्तावना लाभली आहे. या प्रस्तावनेत रावसाहेबांनी देव, धर्म, प्रेम या मार्क्सने प्रतिपादलेल्या संकल्पनांचा आजच्या संदर्भात वेध घेतला आहे. जगभर धर्मवादी राजकारण शिगेला पोहोचण्याच्या का ळात मार्क्सचे हे विचार किती महत्वपूर्ण आणि मार्गदर्शक आहेत हे ठोसपणे मांडले आहे. या प्रस्तावनेत रावसाहेबांनी कुमार शिराळकरांच्या या लेखसंग्रहाबद्दल म्हटले आहे, `कुमार शिराळकरांनी या लेख संग्रहात धर्माबद्दल, जाती अंताबद्दल, जागतिकीकरणाबद्दल, स्त्री-पुरूष समता आणि श्रमिकांच्या चळवळीबद्दल जे लिहिले आहे ते मुळातून वाचले पाहिजे. ही आजच्या भारतीय आणि जागतिक वास्तवाच्या आकलनासाठी लावलेली मराठी भाषेतील ज्ञानज्योत आहे’, ते पुढे म्हणतात, `कार्ल मार्क्स, म.ज्योतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या त्यांच्या का ळात पेटवलेल्या प्रकाशमान ज्ञानज्योतीतून आवश्यक तेवढा प्रकाश घेऊन प्रत्येक प्रदेशाच्या मातृभाषेत एक नवी ज्ञानज्योत पेटवावी लागेल आणि ती आजच्या एकविसाव्या शतकात माणसावरील अतूट प्रेमासाठी, त्याला माणुसपण देण्यासाठी व्यवस्थेतील आमुलाग्र परिवर्तनासाठी कामी लावावी लागेल. कुमार शिराळकर यांचा लेख संग्रह हा त्या प्रयत्नांचाच एक भाग आहे असे मी मानतो. त्यांच्या प्रखर ध्येयवादाला अणि ते जगलेल्या खडतर जीवनाला सलाम करतो.’
रावसाहेबांनी अतिशय समर्पक शब्दात या लेख संग्रहाचे महत्व वरील ओळीतून व्यक्त केले आहे. खरेतर या नंतर या लेखसंग्रहाच्या संदर्भात काही भाष्य करणे गरजेचे नाही. तरी वाचकांसाठी या लेखसंग्रहात कुठल्या कुठल्या स्वरूपाचे लेख आहेत, त्यांचे आजच्या का ळात आणि ज्ञान क्षेत्रात काय महत्व आहे? हे सांगणे गरजेचे आहे.
`ओळख म्हणून’ या शिर्षकाखाली `मागोवा’ गटाचे संस्थापक आणि आधारस्तंभ, मागोवा, तात्पर्य या नियतकालिकांचे संपादक ज्येष्ठ मार्क्सवादी विचारवंत सुधीर बेडेकर यांनी साठ-सत्तरीच्या दशकात मार्क्सवादी विचारांकडे आकर्षित झालेल्या तरूणांसाठी जागतिक आणि भारतीय पातळीवर काय परिस्थिती होती, याचा उहापोह केला आहे. कुमार शिराळकर यांच्या जडणघडणीत या काळाचे महत्व स्पष्ट होते. कुमार शिराळकरांसारखे उच्च शिक्षित मध्यम वर्गीय तरूण त्या समाजवादाने भारलेल्या काळात नोकऱ्या सोडून आदिवासी जनतेच्या मुक्ती लढयात कसे उतरले याची आपल्याला कल्पना येते.
`उठ वेडया तोड बेडया’ ही 1974साली कुमार शिराळकर यांनी लिहिलेली पुस्तिका त्याका ळी खूप गाजली. ही पुस्तिका जणू कुमार शिराळकरांसह त्या काळातील अशा क्रांतिकारी तरूणांचे स्वगतच म्हणावे लागेल. स्वातंत्र्याच्या का ळातील एका कवितेत म्हटल्याप्रमाणे,
भारत माते पुत्र शहाणे अगणित तुला लाभले,
तुझ्या कुशीला परी जन्मली काही वेडी मुले…
भगतसिंग, सुखदेव, राजगुरू सारख्या वेडया मुलांनीच स्वातंत्र्यासाठी बलिदान देऊन स्वातंत्र्य जवळ आणले. ध्येयासक्तीने झपाटलेले असेच जग बदलू शकतात. कुमार शिराळकरांचे हे वेड अजून गेलेले नाही. आजही ते आदिवासी, दलित, श्रमिक जनतेच्या मुक्तिलढयात पाय रोवून उभे आहेत. विचारांनी आणि प्रत्यक्ष कृतीने!
या लेखसंग्रहाचे विषयानुरूप असे पाच भाग केलेले आहेत. पहिला विभाग धर्म, दुसरा विभाग जात, तिसरा विभाग आदिवासी आणि चौथा विभाग अर्थकारण, राजकारण तर पाचवा विभाग व्यक्तिगत स्वरूपांच्या लेखांचा आहे. जवळ जवळ 21 लेखांचा हा संग्रह आहे. विषय आणि त्यांचे स्वरूप पाहाता सर्वच सामजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक प्रश्नांना मार्क्सवादी दृष्टीकोनातून भिडण्याचा प्रयत्न करून त्यातून ठोस निष्कर्ष त्यांनी काढले आहेत. केवळ नव्याने चळवळीत आलेल्या तरूणांसाठीच नव्हे, ते तर आहेच पण मार्क्सवादी विचारातील नैतिकता आणि शुध्दता जपू पाहणाऱ्या आणि तसा व्यवहार करू पाहणाऱ्या प्रत्यक्ष चळवळीत कार्यरत असणाऱ्या सर्वांनाच हा लेख संग्रह मार्गदर्शन करणारा आहे.
`धर्म’ या विभागात कुमार शिराळकरांनी माझी धर्मयात्रा, मार्क्सवादी धर्म चिकित्सा, धार्मिकता आणि धर्मांधता, धर्मांधता आणि दहशतवादी राजकारण, धर्म आणि भारतीय राष्ट्रीयत्वाचे स्वरूप असे पाच लेख लिहिले आहेत. या लेखातून ते स्वत: धर्माच्या प्रभावातून कसे मुक्त होत गेले याचे अनुभव सांगून धर्माचा उदय, त्याची त्या त्या काळातील उपयुक्तता, मार्क्सवादाची धर्मविषयक भूमिका, धर्मचिकित्सेचे महत्व तसेच आजच्या काळाला ग्रासून राहिलेली धर्मांधता, तिचे दहशतवादी राजकारण तसेच हिंदुत्ववाद्यांना सडेतोड उत्तर देणारी भारतीय राष्ट्रीयत्वाची समर्पक मांडणी केली आहे.
`जात’ या विभागात मनुस्मृती, बुध्दाचा धम्म आणि बाबासाहेबांचे कार्य, जातीव्यवस्थेचे बदलते स्वरूप, जाती अंत आणि कम्युनिस्ट चळवळ, जातीय अत्याचार विरोधी लढा, श्रमिक, दलित राजकारणाची दिशा असे पाच लेख आहेत. जाती व्यवस्थेसंदर्भात कुमार शिरा ळकरांची मांडणी हे या लेखसंग्रहाचे वैशिष्ट्ये मांडता येईल. कारण आजवर या प्रश्नांचा इतका चिकित्सक पध्दतीने आणि भावनिक पातळीवर जाऊन कोणी फारसा मागोवा घेतलेला नाही. `कम्युनिस्टांना जातीप्रश्न कळत नाही’ अशी टीका नेहमी होते. या पार्श्वभूमीवर हे लिखाण अत्यंत महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक स्वरूपाचे आहे.
आपल्या देशात दलित जनतेबरोबरच सर्वात शोषित विभाग म्हणजे आदिवासी जनसमूह. या जनसमूहाचे प्रश्न थेट वर्गाय तर आहेतच पण त्याची समृध्द अशी जनसांस्कृतिक परंपरा आहे. ज्या समतावादी न्यायपूर्ण समाज व्यवस्थेकडे आपल्याला जनतेला घेऊन जायचे आहे त्यासाठी आवश्यक ती मूल्ये प्राथमिक स्वरूपात या जनसंस्कृतीत आढळतात. आदिवासी जनतेला मुख्य प्रवाहात आणताना आपल्याला या समृध्द सांस्कृतिक मूल्यांच्या चालीरीतींचा ठेवा जपावा लागेल. त्या दृष्टीने चळवळीची आखणी करणे गरजेचे आहे. कुमार शिरा ळकर यांनी या सर्व बाबींचा उहापोह `भांडवली विकास आणि आदिवासी जनतेचे परीघीकरण’ या लेखात केला आहे. तसेच `महाराष्ट्राच्या इतिहासात स्त्रियांचे योगदान, स्त्री-पुरूष समता आणि कार्यकर्त्यांचा व्यवहार’ या लेखातून स्त्री प्रश्नांची मांडणी पुढे आणली आहे.
`स्त्री-पुरूष समता आणि कार्यकर्त्यांचा व्यवहार’ या लेखात स्वत:ला मार्क्सवादी, पुरोगामी म्हणवणारे कार्यकर्तेही पुरूषी मानसिकतेतून मुक्त झालेले नसतात, त्यामु ळे त्यांचा घरातील व्यवहार पुरूष प्रधानच असतो. त्यामुळे या संदर्भात आपले वर्तन कसे असावे याची परखड मांडणी या लेखात केली आहे.
`अर्थकारण आणि राजकारण’ हा विभाग आजच्या काळातील प्रश्नांचा उहापोह करणारा आहे. `श्रमिक चळवळ: काल, आज आणि उद्या’ या लेखात वास्तववादी दृष्टीने चळवळीचे परिशीलन केले आहे. सोव्हिएत युनियन कोसळल्यांनंतर जी परिस्थिती निर्माण झाली त्या पार्श्वभूमीवर चळवळीचा वेध घेतला आहे. आजच्या साम्राज्यवादी राजकारणाचे स्वरूप आणि त्याचे परिणाम मांडतांना `नफ्याचे खासगीकरण आणि तोटयाचे राष्ट्रीयकरण’ या माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी मांडलेल्या संकल्पनेला विशद करून धनवान देश आणि गरीब यामधील दरी कशी वाढत आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे.
नक्षलवाद ही भारतीय कम्युनिस्ट चळवळीसमोरील एक मोठी गंभीर समस्या बनून राहीली आहे. या चळवळीच्या संदर्भात `नक्षलवाद: रोमँटीक आकर्षण आणि वास्तविक दिवा ळखोरी’ या लेखात या चळवळीचा सांगोपांग आढावा घेतलेला आहे. तिची वैचारीक दिवा ळखोरी अंतिमत: कम्युनिस्ट च ळव ळीला कशी मारक ठरते हे त्यांनी दाखवून दिले आहे. तसेच दुष्काळ, भ्रष्टाचार या संदर्भातील दिशा काय असावी या बद्दल ठोस मांडणी केली आहे.
पाचव्या विभागात व्यक्तिगत स्वरूपाचे दोन लेख आहेत. एक, `नानासाहेब’ आणि दुसरा, `सोमनाथ: जंगलातील भटकंती’. या लेखात कुमार शिराळकरांनी त्यांचे आजोबा (आईचे वडील) नारायण हरी आपटे यांच्या आठवणी सांगितल्या आहेत. नारायण हरी आपटे हे जुन्या जमान्यातील सुप्रसिध्द कादंबरीकार होते. त्यांच्या जवळ जवळ 35 कादंबऱ्या प्रसिध्द झाल्या आहेत. व्ही. शांताराम यांचा गाजलेला `कुंकू’ नावाचा चित्रपट त्यांच्या कादंबरीवरच बेतलेला आहे. अशा सुप्रसिध्द असलेल्या आजोबांचे त्यांच्या बालमनावर जे जे संस्कार झाले ज्यातून कुमार शिराळकरांची जडण घडण कशी झाली ती समजून येते. उदाहरणार्थ, कुमार शिराळकरांनी आजोबांना वेगळ्या पध्दतीने जीवन जगण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी माझी तयारी आहे. असे सांगितले. आजोबा रागावून काहीतरी उपदेश करतील अशी कुमार शिराळकरांची समजूत होती. पण आजोबांनी अगदी स्पष्टपणे सांगितले, `हात्तिच्या!’ एव्हढेच नां, अरे, राजस्थान, पंजाबकडे भटकताना मी भगतसिंगांना भेटलेलो आहे. इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र क्रांती करणाऱ्या तरूणांची निष्ठा आणि धडाडी तू समजून घे. क्रांती भावनांनी नव्हे तर दृढ जाणिवांनी घडते. यशापयशाची खंत गोंजारायची नसते. तू अवश्य तुला जगायचे तसे जग. कार्य कर. पण पथ्ये पाळ. अमिषांना बळी पडू नकोस. व्यसनांपासून दूर राहा. रागालोभाला काबूत ठेव. व्यक्तिगत लाभ हानीचा विचार करू नकोस. समाजासाठी, देशासाठी सर्वस्व वेचण्याची उमेद हरवू नकोस’, कुमार शिराळकरांच्या आयुष्याची आजवरची वाटचाल ज्यांना माहित आहे त्यांना त्यांच्या आजोबांनी जो वरील उपदेश केलेला आहे त्याची जणू तंतोतंत अंमलबजावणी असल्याचे दिसून येईल.
`सोमनाथ: जंगलातील भटकंती’ हा या लेखसंग्रहातील अखेरचा लेख आहे. समाजासाठी काहीतरी करायचे या भावनेने सोमनाथ येथील बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या श्रमिक विद्यापीठात प्रवेश घेऊन कुमार शिराळकरांची बाबा आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता बनण्यास सुरूवात झाली. तेथून ते शहाद्याच्या आदिवासी जनतेत कार्य सुरू करण्याच्या कालखंडापर्यंत त्यांनी लिहिले आहे. यात मुख्यत्वे करून बाबा आमटे यांचे व्यक्तिमत्व, सोमनाथच्या जंगलात भटकतांना आलेले रोमांचकारी अनुभव, आदिवासी जीवनाचे जव ळून झालेले दर्शन तसेच नक्षलवादी समजून पोलिसांनी कसे पकडले याची मनोरंजक हकीगत त्यानी सांगितली आहे. लेखाच्या अखेरीस त्यांनी लिहिले आहे, `सोमनाथचे दिवसही लवकर संपले आणि मी दिनानाथ, विजय, शिवराम जानेवारी 1972मध्ये शहाद्याच्या आदिवासींमध्ये कार्य करण्यास गेला. तिथल्या दोस्तांबरोबर दहशतीचा आणि वर्गसंघर्षाचा दाहक आणि मोहक अनुभव घ्यायला.’
कुमार शिराळकर आजही तसा अनुभव घ्यायला आसुसलेले आहेत. अगदी गेल्या वर्षा खडर्याला झालेल्या दलित अत्याचाराविरोधात जेव्हा `पुणे ते खर्डा’ असा जो लाँग मार्च आयोजित केला होता त्यात ते आघाडीवर होते. प्रत्येक मुक्कामात ते कार्यकर्त्यांचे उत्साहाने अभ्यासवर्ग घेत होते…. त्यांचे हे लिखाण म्हणजे `बोले तैसा चाले’ या तुकारामांच्या उक्तीचा प्रत्ययच आहे.
नवे जग, नवी तगमग
कॉ. कुमार शिराळकर,
मनोविकास प्रकाशन,
पानेः 295, किंमतः रु 350

जीवनमार्गच्या सौजन्याने

देव-धर्मवेड्या समाजाचं व्यंगचित्र

‘देवनगरीत शेजाऱ्यावर प्रेम करणारे कमी आहेत, त्यामानानं शेजाऱ्यांच्या मांजरावर प्रेम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मांजरवेडय़ांना इथे शहाणं समजलं जातं, मात्र अशा या प्रात:स्मरणीय मांजरांना देवनगरीत हमरस्त्यावर यायला बंदी आहे. कारण मांजरं माणसांना आडवं जाऊन त्यांचा खोळंबा करतात, ही सामूहिक श्रद्धा. देवनगरीत एकदा एक माणूस साप चावून मेला. त्याला जिवंत करण्यासाठी इथला सुप्रसिद्ध मांत्रिक लगबगीनं निघाला, पण वाटेवर मांजर आडवं गेलं म्हणून मेलेला माणूस जिवंत होऊ शकला नाही.. कामं उरकण्याचा कंटाळा करणाऱ्या देवनगरीच्या माणसांना मांजरं खूप आवडतात, असंही माझं निरीक्षण आहे..’
‘ईश्वर डॉट कॉम’ या विश्राम गुप्ते यांच्या कादंबरीतला हा एक परिच्छेद. एवढय़ावरून या कादंबरीच्या जातकुळीची, पार्श्वभूमी म्हणून निवडलेल्या परिसराची कल्पना यावी. लेखकानं कल्पनेनं उभे केलेल्या एका जगात आणि एका विशिष्ट समाजात ही कादंबरी आपल्याला नेते. देवनगरी (सिटी ऑफ गॉड) हे या जगाचं नाव. देवनगरीतल्या हालचाली, तिथल्या रहिवाशांचं मानसिक, भावनिक पर्यावरण आणि त्यातून आकारलेलं वैचारिक, सांस्कृतिक आणि चर्चिक नाटय़ हे सारं या कादंबरीत एका फॅण्टसीमय विश्वात खेळतं ठेवण्यात आलं आहे. प्रस्तावनेत लेखकानं मात्र आपली कादंबरी फॅण्टसी आहे हे नाकारलं आहे. ज्या नगरीत देवाची अधिसत्ता चालते ती देवनगरी, असं सांगून तो म्हणतो, ‘आपला भारतच एक देवनगरी आहे. भारतीय देवनगरीतले रहिवासी आहेत.’ त्याच्या मते, ‘ईश्वर डॉट कॉम’ ही कादंबरी म्हणजे देव-धर्म, संस्कृती आणि परंपरेच्या व्यापारीकरणाची धमाल कथा आहे. या चारही गोष्टी आज आपल्या देशातही धमाल कथा-उपकथांना जन्म देत आहेत. तेव्हा लेखकाचा दावा पूर्णपणे असत्य म्हणता येणार नाही. लिखाणाचा बाज विनोदी, भाषा अतिखटय़ाळ. अथपासून इतिपर्यंत खेळकर शैलीत लेखक देवनगरीची कहाणी सांगतो. विनोद निर्मितीतला आवश्यक मानला जाणारा अतिशयोक्ती हा घटक इथं विपुल प्रमाणात आहे. अतिशयोक्तीची अतिशयोक्ती म्हणा ना! लेखकानं या तंत्राचा चतुर उपयोग करून घेतला आहे खरा, पण या तंत्रामुळेच या कथेचे पाय वास्तव भूमीपासून सुटले आहेत. लेखकाच्या आग्रहाशी प्रामाणिक राहून, त्याला सहमती दर्शवून या फॅण्टसीपर कथेचं वर्णन करायचं तर ‘या कथेतलं वास्तव आहे काल्पनिक’ असं म्हणता येईल. एक मात्र खरंय- पुस्तकातले अनेक तपशील आजच्या वातावरणाशी मिळतेजुळते आहेत. समाजाच्या आजच्या मानसिकतेवर भाष्य करण्यासाठी हा लेखनप्रपंच आहे; आणि त्यात लेखकाला कितपत यश आलं आहे हा वादाचा मुद्दा होऊ शकेल. पुस्तक हाती पडल्यावर त्यातलं कोणतंही पान उघडून वाचा, आपण एका आगळ्या दुनियेत येऊन दाखल झालो आहोत असा अनुभव येईल. देव-धर्म संकल्पनेवर विश्वास असणाऱ्यांच्या भाबडेपणानं देवनगरीत टोक गाठलं आहे. आज आपल्या समाजाचा प्रवासही त्याच दिशेनं चालला आहे.
कादंबरीला प्रथमपुरुषी एकवचनी निवेदन लाभलं असलं तरी ‘मी’सह इतर पात्रांनी परस्परांचे विचार, कृती व अंधश्रद्धेनं ग्रासलेल्या देवभोळ्या परंपरावादी समाजावर केलेली अखंड व उलटसुलट चर्चा त्यात आहे. फाजील परंपराप्रेमातून जो चिकित्साशून्य समाज आकाराला येतो, त्याची रेवडी उडवणारं हे खटय़ाळ लेखन आहे. म्हटलं तर चित्र भयावह आहे, पण ते रेखाटण्यासाठी लेखकानं जो कुंचला वापरला आहे तो व्यंगचित्रकाराचा कुंचला आहे. ‘ईश्वर डॉट कॉम’ ही कादंबरी म्हणजे मॉडेल म्हणून समोर एक काल्पनिक समाज उभा करून चितारलेलं श्रद्धाप्रेमानं अंध झालेल्या आजच्या देववेडय़ा समाजाचं व्यंगचित्र आहे.
आजच्या धर्मकल्लोळी वातावरणातले ताजे संदर्भ कादंबरीची वाचनीयता वाढवायला उपयोगी पडले आहेत. ही कादंबरी आपल्याला देवधर्म, श्रद्धा, परंपरा या संकल्पना आणि त्यांनी मानवी व्यवहारात घातलेले घोळ यावर नुसती चर्चा करत नाही; ती त्याकडे आपल्याला उलटसुलट पाहायला लावते. प्रसंगी ती वाचकांचा वैचारिक गोंधळ उडवून देते. लेखकानं अवलंबलेल्या विडंबन शैलीतील भेदकता लक्षात घेता सनातनी लोक हे पुस्तक चार-पाच पानांपलीकडे वाचू शकतील असं वाटत नाही. पुस्तकातली टोकाची उपरोधिक भाषा या आजच्या परंपराप्रिय समाजगटाला औद्धत्यपूर्ण वाटली तर नवल नाही. नास्तिक वाचकांची समस्या आणखी वेगळी. इतका प्रखर सामाजिक विषय अशा प्रकारे थट्टा-मस्करीत मांडला जाणं त्यांना कदाचित रुचणार नाही. आजच्या वास्तव वातावरणावर गंभीर आणि थेट हल्ला केला जावा अशी आपली अपेक्षा असणं ठीक आहे. पण लेखक विश्राम गुप्ते यांनी हा मार्ग अवलंबला असता तर पेरुमल मुरुगन या तमिळ लेखकाचा मराठी अवतार आपल्याला पाहायला मिळाला असता. लेखकानं हे पुस्तक मुद्दामहून धर्म संकल्पनेची थट्टा उडवण्यासाठी लिहिलंय असं म्हणता येणार नाही. पण आपल्याकडल्या भावना-दुख्या जमावाचं काही सांगता येत नाही.
धर्माचे मानवी अन्वय आणि श्रद्धा आणि परंपरा या घटकांनी त्याची लावलेली विल्हेवाट सर्वासमोर खेळकरपणे मांडणं आणि त्या निमित्तानं भाषिक सादरीकरणाचे थोडेफार प्रयोग करू पाहणं, अशी भूमिका या लेखनामागे दिसते. धर्मवादीच धर्माकडे सदोष नजरेनं पाहाताहेत हे सर्वमान्य सत्य पुस्तकातल्या अनेक चर्चा आणि घटनांतून उघड होतं. देव-धर्म संस्कृती अन् परंपरेच्या व्यापारीकरणात हृदयातला ईश्वर हृदयातच हरवतो. उत्तर आधुनिक काळात तरी आपण विवेक हा तारणहार, समता हा ईश्वर अन् प्रेम ही सर्वात टिकाऊ परंपरा ही त्रिसूत्री मानणार आहोत का? असा सवाल पुस्तकाच्या ब्लर्बमध्ये विचारण्यात आला आहे. या कादंबरी लेखनामागील प्रेरणेचं एक अंग या प्रश्नातही सामावलेलं आहे.
विश्राम गुप्ते यांचा आजवरचा लेखन प्रवास नजरेखालून घातला की ठळकपणे एक गोष्ट पुढे येते, ती म्हणजे हा लेखक नवतेचा खंदा पुरस्कर्ता आहे. मराठी वाङ्मयातील प्रायोगिकतेची तो नेहमी जाणीवपूर्वक दखल घेत आला आहे. नव्या प्रयत्नांचं कौतुक करण्यापेक्षा त्यांची चिकित्सा करण्याची भूमिका त्यानं वेळोवेळी अवलंबली आहे आणि या भूमिकेशी प्रामाणिक राहता यावं, म्हणून त्यानं स्वत:ला कंपूबाजीपासून दूर ठेवलं आहे. नव्या लेखनातील अभिनवता समजून घेणे आणि आपल्याला समजलेले वाचकांना समजावून सांगणे हे काम विश्राम गुप्ते व्रतस्थपणे करत आले आहेत. वाचकाभिमुख धोरण न अवलंबता त्यांनी सर्जनशील लेखन केलं आहे आणि समीक्षालेखन केलं आहे. या नव्या मंडळीचा अब्सर्ड रचनेकडे असलेला ओढा सर्वपरिचित आहे. हा आकृतिबंध स्वीकारला की स्वैर संचार करता येतो, मांडणीत लवचीकपणा येतो; चौफेर शेरेबाजी करता येते. ‘ईश्वर डॉट कॉम’मध्ये लेखकाचं अबसर्डिटीचं आकर्षण पानोपानी दिसत राहतं. कादंबरीसाठी त्यांनी निवडलेल्या आशयसूत्राला त्याची गरजही होती. अबसर्डिटीच्या प्रेमप्रवाहात कथाविषय वाहून जाण्याचा धोकाही असतो. गुप्ते यांनी या प्रवाहावर नियंत्रण ठेवण्यात बऱ्यापकी यश मिळवलं आहे.
चिकित्सा या गोष्टीला सर्वाधिक महत्त्व देणाऱ्या लेखकाच्या कोणत्याही कलाकृतीकडे पाहताना आपणही चिकित्सक दृष्टिकोन ठेवायला पाहिजे. या नजरेनं ‘ईश्वर डॉट कॉम’कडे पाहिलं, की काही गडबडी समोर येतात. या कादंबरीत उपरोधाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आशय मांडणीसाठी अत्यंत आवश्यक असा हा घटक आहे, पण कादंबरीत हा उपरोधाचा डोस जरा अतीच झाला आहे हे स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. उपरोधिक विधानांचा अतिरेक आणि जागोजागी विनोदनिर्मिती करण्याचा अट्टहास लेखकानं टाळला असता तर या चच्रेला अधिक गांभीर्य प्राप्त झालं असतं. उपरोधाच्या या माऱ्यामुळे सुरुवातीची पानं वाचताना कादंबरीतील जगाशी समरस होणं कठीण होऊन बसतं. नंतर या भाषेची सवय होऊन जाते हा भाग अलाहिदा.
मीडियाचा प्रतिनिधी असावा म्हणून ज्या वर्तमानपत्राचा वावर या कादंबरीत आहे, त्या वर्तमानपत्राचं नाव ‘दै. भंबेरी’ आहे. वृत्तपत्राच्या नावातून विनोद साधण्याचा प्रकारही खूप ओल्ड फॅशन झाला. अगदी आचार्य अत्र्यांच्या काळातला. हा ढोबळपणा कादंबरीच्या एकूण परिपक्व मांडणीशी विसंगत वाटतो.
धर्म, देव, श्रद्धा, परंपरा यासंदर्भातल्या चच्रेत सहभाग घेणारी या कादंबरीतली पात्रं चच्रेत विभिन्न बाजूंचे विचार यावेत, म्हणून मुद्दामहून नेमलेली वाटतात. अशा नेमणुकीमुळे संवादातील आणि कादंबरीतल्या नसíगक वातावरणाला धक्का पोचतो. रचनाबद्ध आराखडय़ात कादंबरीचा आशय फिरू लागतो. उदाहरणार्थ एक उदारमतवादी हिंदू, दुसरा धर्माला वैज्ञानिक अधिष्ठान द्यायला धडपडणारा कोणीतरी एक दलिताचा नेता असल्याचा दावा करणारा आणि हिंदू धर्माची चिकित्सा करू पाहणारा.. एखाद्या व्यावसायिक नाटकात सापडावीत अशी ही फिल्डिंग आहे. देव-धर्म, परंपरा यावरल्या चिकित्सक चर्चेवर रोख असल्यानं कृत्रिम रचनेतून निर्माण होणाऱ्या साचेबद्धपणाकडे लेखकानं दुर्लक्ष केलं असेल, पण याचे वाचनीयतेवर विपरीत परिणाम झाले आहेत. वाचकाला हा सर्व विशिष्ट विचारसरणी रेटण्यासाठी आयोजलेला खेळ आहे असं वाटू लागतं.
मात्र, काही प्रमाणात साचेबंद रचना असूनही ‘ईश्वर डॉट कॉम’ वाचकांना धरून ठेवते, ती त्यातल्या चच्रेमुळे आणि कादंबरीभर पेरल्या गेलेल्या हुशार, चमकदार विधानांमुळे. सुखवस्तूची व्याख्या स्पष्ट करताना एके ठिकाणी म्हटलंय, ‘सुखवस्तू म्हणजे वस्तू विकत घेऊन ज्यांना सुख मिळतं तो वर्ग. दुसऱ्या एका ठिकाणी विधान येतं- ‘संस्कृती संवर्धन त्रस्त किरकिऱ्या माणसाकडून होणार नाही, त्यासाठी माणूस सुरक्षित आणि सुखवस्तूच हवा,’ अशी अनेक उदाहरणं देता येतील. मात्र अशा चतुर विधानातून लेखक दिसतो. इथं कादंबरीच्या विषयनिवडीतून, आशयामागील भूमिकेतून, प्रसंगातून पात्रांच्या तोंडच्या संवादातून विश्राम गुप्ते हा पुरोगामी आधुनिक विचाराचा लेखक, समीक्षक दिसत राहतो. लेखकाच्या विचारसरणीचं प्रतिबिंब साहित्यकृतीत पडणं हे अटळ असतं. भल्या-भल्यांची यातून सुटका झालेली नाही.
देव-धर्म, परंपरा या प्रतिगामी संकल्पनेबाहेर पडून जे स्वतंत्रबुद्धीनं आपल्या आयुष्याला सामोरे जाऊ पाहताहेत अशा वाचकांना देव-धर्म, परंपरा याची ही गमतीशीर चर्चा केवळ वाचनीय वाटणार नाही तर सुखावून सोडेल. कादंबरीभर विखुरलेली आपल्या विचारांना दुजोरा देणारी विधानं वाचताना त्यांना कादंबरीच्या रचीव स्वरूपाचा, साचेबद्ध पात्रयोजनेचा विसर पडेल आणि अतिरिक्त उपरोधही सुसह्य़ होईल. याला वाचकाभिमुखता म्हणायची का? आणि वाचकाभिमुख म्हटलं तर आजच्या धर्मप्रदूषित वातावरणात असे वाचक किती? समाजप्रबोधनाचं ठाम उद्दिष्ट लेखकासमोर असेल असं वाटत नाही. अभिनिवेश आशयापेक्षा त्याच्या प्रयोगशील मांडणीत आहे. पण तरीही एक शक्यता जाता जाता व्यक्त करावीशी वाटते. कादंबरीच्या आशय-विषयाशी पूर्णत सहमत नसलेला, देव-धर्म पाळणारा पण त्यातल्या पारंपरिक दृष्टिकोनावर आणि कर्मकांडांवर संशय घेणारा मोठा वर्ग आज समाजात आहे. या वर्गाला ही कादंबरी आणि त्यात उभं केलेलं चर्चानाटय़ आकर्षित करू शकले; त्यातून बाहेर येणारा आशय त्यांना नेणिवेच्या पातळीवर अस्वस्थ करून सोडू शकला तर ते विश्राम गुप्ते यांच्या ‘ईश्वर डॉट कॉम’चं मोठं यश म्हणता येईल. या यशापुढं समीक्षक या कादंबरीचं मूल्यमापन कसे करतात, मराठी साहित्यविश्वात या कादंबरीचं योगदान काय, हे प्रश्न बिनमहत्त्वाचे ठरतात.

‘ईश्वर डॉट कॉम’
विश्राम गुप्ते,
राजहंस प्रकाशन, पुणे,
पृष्ठे- ३००, किंमत- ३०० रुपये.

महाराष्ट्र टाइम्सच्या सौजन्याने

awdhooot@rediffmail.com