Category Archives: युवा

देशाला काय हवे- ऐक्य की एकरूपता?

‘एक धर्म, एक वंश, एक भाषा, एक संस्कृती व एक भूप्रदेश’ या घटकांचे मिळून राष्ट्र तयार होते. इटलीचा स्वातंत्र्यसेनानी जोसेफ मॅझिनी याचे हे मत. सावरकरांनी मॅझिनीवर लिहिलेल्या पुस्तकाचा प्रभाव मराठी ब्राह्मण तरुणांवर एकेकाळी फार मोठा होता. हाच वर्ग पुढे हिंदू सभा व संघाच्या माध्यमाने देशभर स्वयंसेवक वा शाखाप्रमुख म्हणून गेला. परिणामी मॅझिनीची भाषा ही संघाची व त्याच्या परिवाराचीही भाषा झाली. त्याआधी भारत हे हिंदू राष्ट्र आहे ही भाषा संघाचे संस्थापक डॉ. के. ब. हेडगेवार यांनीही वापरली होती. संघाच्या आरंभीच्या व नंतरच्याही स्वयंसेवकांना तश्या प्रतिज्ञा त्यांनी दिल्या व घ्यायला लावल्या होत्या. संघाच्या वेगाने व विस्तारानुसार ही भूमिका देशातील ब्राह्मण कुटुंबात व तरुणांतही रुजत गेली. (देशातील ज्या दोन जाती अखिल भारतीय आहेत, त्यांत ब्राह्मण व चर्मकार यांचा समावेश आहे. ही गोष्ट लक्षात घेतली की हा विचार अल्पावधीत देशाच्या अनेक भागांत, एका जातीपुरता का होईना कसा रुजला असावा याची कल्पना येते.)

आपल्या ‘हिंद स्वराज’ या पुस्तकात गांधीजींनीही मॅझिनीविषयी लिहिले आहे. हे पुस्तक त्यांनी इंग्लंडमधून आफ्रिकेला जाताना बोटीवरच्या प्रवासात लिहिले. त्यात त्यांनी मॅझिनीच्या सेनापतिपदाचा व शस्त्रसामर्थ्याचा गौरव करण्याहून त्याच्या लोकशाही प्रेमाला अधिक महत्त्व दिले. ज्या इटलीच्या एकीकरणासाठी तो लढला ते एकीकरण झाल्यानंतर अखेरच्या मानवंदनेच्या लष्करी कवायतीत तो खांद्यावर साधी बंदूक घेऊन सामान्य शिपायासारखा अखेरच्या रांगेत उभा होता. त्याचे तेव्हाचे दुःख होते, ‘एवढे सारे लढून आणि इतक्या सार्‍या सैनिकांचे रक्त सांडून आम्ही इटलीत जनतेचे लोकशाही राज्य आणू शकलो नाही. इटलीची सत्ता पुन्हा राजेशाहीच्याच ताब्यात राहिली.’ मॅझिनीकडे पाहण्याचा गांधींचा दृष्टिकोन सावरकरांच्या व हेडगेवारांच्या दृष्टीहून वेगळा होता हे यावरून स्पष्ट व्हावे. हेडगेवारांना संस्था, संघटना उभारायला, ते स्वातंत्र्यलढ्यापासून दूर राहिल्याने वेळ मिळाला. गांधींना ‘हिंद स्वराज्य’ यापलीकडे त्या क्षेत्रात जाता आले नाही. १९१५ मध्ये भारतात आलेले गांधी १९२० मध्ये देशाचे नेते झाले. १९४८ मध्ये त्यांचा खून झाला. हाती असलेल्या २८ वर्षांतील दहा वर्षे त्यांनी तुरुंगात घालविली. स्वातंत्र्याचा लढा, ब्रिटिशांशी वाटाघाटी, काँग्रेसची उभारणी आणि समाजाला एकत्र ठेवण्यासाठी प्राणार्पणापर्यंत जाण्याची त्यांची तयारी या सार्‍या गोष्टींमुळे त्यांना मॅझिनी व त्यांचा विचार त्याच्या खर्‍या स्वरूपात जनतेपर्यंत पोहोचविता आला नाही. उलट एक विचार, स्वातंत्र्यलढ्यात सहभागी न झाल्याने मिळालेला वेळ व एक जात यामुळे हेडगेवार आणि त्यांचे अनुयायी यांचे काम सोपे व सरळ होते. गांधीजींच्या पश्चात सत्तेवर आलेल्या नेहरूंसमोर राष्ट्रउभारणीचे काम अग्रक्रमाचे होते. शिवाय ते समाजवादी होते आणि काँग्रेसमधील बुजुर्गांना समाजवाद मान्य नसतानाही ते त्या बाजूने उभे होते. स्वातंत्र्यलढा, विविध विचारसरणी, कार्यबाहुल्य आणि तुरुंगवास यांत अडकलेली काँग्रेस आणि एका विचाराच्या प्रसाराखेरीज दुसरी जबाबदारी नसणारा संघपरिवार यांची ही वाटचाल लक्षात घेतली की संघपरिवाराचे आजचे यश व काँग्रेसच्या राजकारणाची एवढ्या वर्षात झालेली उताराची व काहीशी अधोगतीची वाटचाल यांचा परिणाम व त्यातील अंतर लक्षात घेता येते. आजच्या पडत्या काळातही काँग्रेसला स्वातंत्र्यलढ्याचा अभिमान व त्यातील मूल्यांचा गौरव करता येतो. उलट संघाला तो लढा व ती मूल्ये पुसून काढायची असल्याने ते त्यांचा उच्चारही करीत नाहीत. जमलेच तर त्याविषयी ते टवाळखोरीच्या व छद्मी भाषेत बोलताना अधिक दिसतात. यातला दोष ऐतिहासिक वाटचालीचा व तिच्या संस्कारांचा आहे. तेवढाच तो मूळ विचारांमागील भूमिकांचा आहे.

हा काळ कम्युनिस्ट, समाजवादी, हिंदुत्ववादी व आंबेडकरवादी या सार्‍यांचाच, गांधी व त्यांची चळवळ यांवर टीका करण्याचा होता. त्यातल्या हिंदुत्ववाद्यांचा व आंबेडकरवाद्यांचा तर तो त्या चळवळीपासून दूर राहण्याचाही होता. कारणे अनेक होती. गांधी एकटे होते आणि विरोधक विविध मठांत संघटित होते. स्वातंत्र्य हे लक्ष्य आणि त्यासाठी सर्वस्व यावर गांधींचा व त्यांच्या अनुयायांचा भर तर इतरांचा त्यांच्या विचारसरणीवर, जातींच्या उत्थानावर, संघटनांच्या उभारणीवर आणि गांधीजींची चळवळ लहान करून दाखविण्यावर होता. गांधीजींचा खून ही एकच घटना या सार्‍यांवर लख्ख उजेड पाडणारी किंवा काळोख फिरविणारी आहे.

गांधीजी भारतात येण्यापूर्वी वा त्यांचे नेतृत्व भारतात रुजण्यापूर्वी बॅ. जिना व लो. टिळक यांच्यातील लखनऊ करार झाला होता. त्या कराराने मान्य केलेले मुसलमानांचे विभक्त मतदारसंघ हे देश व समाज यात फूट पाडणारे आहेत असे गांधींचे तेव्हापासूनचे म्हणणे होते. परंतु तो करार झाला होता व १९१९ च्या मॉन्टेग्यू-चेम्सफर्ड कायद्यात तो आलाही होता. पुढे पुणे कराराच्या वेळीही ‘दलितांना विभक्त मतदारसंघ देण्याने देशातच नव्हे तर हिंदू समाजात फूट पडेल व ती तशी पाडण्याचा ब्रिटिशांचा डाव आहे.’ असे गांधीजी म्हणाले. त्यांनी विभक्त मतदारसंघाला विरोध करून संयुक्त मतदारसंघाचा पर्याय दिला व तो सर्वमान्य झाला. नंतरच्या काळात प्रत्यक्ष फाळणीच्या वेळी जिनांना सगळा बंगाल व सगळा पंजाब हवा होता. मात्र तसे केले तर बंगालमधील ३९ टक्के हिंदूंवर तो अन्याय होईल आणि पंजाबातील तेवढ्याच शिखांवर व हिंदूंवर पाकिस्तान लादले जाईल असे गांधींचे म्हणणे होते. त्यासाठी त्या दोन प्रांतांच्या विभाजनाची मागणी करून त्यातील हिंदू व शिख या वर्गांना गांधींनी जिनांच्या ताब्यातून मुक्त केले. गांधीजींची हिंदूविषयक भूमिका समजून घ्यायला या गोष्टींचा उल्लेख करणे आवश्यक आहे. ही भूमिका गांधींना हिंदुत्ववादी बनविणारी नाही. हिंदूंवर अन्याय होऊ न देण्याची व त्यांच्याच फूट पडू न देण्याची आहे एवढेच येथे लक्षात घ्यायचे. ही भूमिका हिंदू राष्ट्रवादाची वा हिंदू वर्चस्ववादाची नाही.

मॅझिनीची राष्ट्रकल्पना जगाने व इतिहासाने कधीचीच नाकारली आहे. धर्मवर्णादी गोष्टी समाजात ऐक्य राखू शकणार्‍या असल्या तरी तो म्हणतो तसा एकही देश आज जगात नाही. बहुतेक सारे देश भारतासारखे बहुधर्मी, बहुवर्णी, बहुभाषी व संस्कृतिबहुल आहेत. इंडोनेशिया, फिलिपाईन्स व जपान हे तर शेकडो बेटांवर वसलेले देश आहेत. भारताचीही अंदमान, निकोबार किंवा लक्षद्वीप ही बेटे मुख्य भूमीपासून दूर आहेत. एकधर्मी असणार्‍या देशातही पंथोपपंथांच्या, आर्थिक वर्चस्वाच्या आणि सांस्कृतिक वेगळेपणाच्या बाबी युद्धस्तरावर आहेत. धर्म व भाषा एक असूनही जगात अरब देशांची संख्या एवढी का? किंवा सोव्हियत युनियन हे संघराज्यांचे संघराज्य १५ स्वतंत्र देशांत तुटले का? पाकिस्तानचे दोन तुकडे झाले ते का? आणि कॅनडामध्ये क्युबेकच्या वेगळेपणाची चळवळ का होते? चीनमध्ये झिजियांग प्रांत वेगळेपण का मागतो? अगदी श्रीलंकेसारख्या चिमुकल्या देशात तामिळांची सिंहलींशी लढत कशी होते?

भारताच्या १३२ कोटी लोकसंख्येत १८ कोटी मुसलमान, २ कोटी शीख, २ कोटी ख्रिश्चन व लक्षावधींच्या संख्येने अन्य धर्माचे लोक आहेत. (शिवाय आजच्या जगात ११४ कोटी लोक स्वतःला सेक्युलर म्हणविणारे आहेत आणि त्यांची भारतातील संख्याही मोठी आहे.) या देशात १४ मान्यताप्राप्त भाषा आहेत. सांस्कृतिक व प्रादेशिक वेगळेपण आहे. दर दहा मैलांनी येथे भाषा बदलते असे आपणच म्हणतो. यातील प्रत्येक गट आपली अस्मिता सांभाळणारा व परंपरा जपणारा आहे. त्या सार्‍यांना त्यांचे सारे विसरून हिंदुत्वाच्या झेंड्याखाली आणण्याची संघाची आकांक्षा आहे. तर धर्मासाठी मरू, धर्मासाठी मारू, भाषेच्या वेगळेपणासाठी लढा देऊ, संस्कृती रक्षणार्थ उभे राहू अशी त्यातल्या प्रदेशांची भाषा आहे. या देशात एकाच वेदाचे पठण शतकानुशतके झाले. तीच उपनिषदे सर्वत्र आळवली गेली हे खरे असले तरी हे वेदपठण करणार्‍यांची व उपनिषदांचे वाचन करणार्‍यांची, पोथ्या व पुराणे सांगणार्‍यांची संख्या केवढी होती? त्यातही एकाच जातीची माणसे होती की नाही? हा वर्गही किती टक्क्यांचा होता आणि तो धर्माच्या नावावर हे करीत होता की त्यामागच्या सत्तेच्या आधाराने करीत होता? या प्रश्नांची उत्तरे फार वेगळे सांगणारी आहेत. समाजाचा केवढा वर्ग ते सांगणारा होता, केवढा नुसतेच ऐकणारा होता, केवढा दुर्लक्ष करणारा होता आणि केवढ्यावर ते ऐकू न देण्याचे बंधन होते? शिवाय धर्म एक असला तरी शैवांची आणि वैष्णवांची युद्धे त्यात किती काळ चालली आणि त्यात किती माणसे मारली गेली? हे सारे विसरायला लावण्याचा व समाजाला एका छत्राखाली आणण्याचा प्रयत्न हिंदुत्ववाद्यांचा, तर त्यांना त्यांच्या खर्‍या स्वरूपानिशी बहरू देण्याचा प्रयत्न उदारमतवादी सेक्युलरांचा आहे. समाज व वर्ग इतिहास विसरतो काय? देश स्वातंत्र्यासाठी लढत असतानाही ते स्वातंत्र्य समाजातील वरिष्ठ वर्गांचे असेल, आमचे नसेल असे म्हणणारे वर्ग देशात होते की नाही आणि आज त्यांच्या भूमिका अधिक धारदार झाल्या आहेत की नाही? राजकीय यश म्हणजे सामाजिक ऐक्य नव्हे. तसे ते एका वर्गाचे वर्चस्वही नव्हे. सामाजिक ऐक्याची साधना व समरसताही ती नव्हे.

जगातली किती राष्ट्रे धर्माने एक केली व किती राष्ट्रे याने तोडली? ख्रिश्चन धर्माचे जगात अनेक देश का आहेत? शिवाय त्यात प्रोटेस्टंट व कॅथलिक यांच्यात संघर्ष का आहे? इंग्लंडसारखा अतिप्राचीन देश याच आधारावर तुटून त्यातून आयर्लंड वेगळे झाले. ज्यू धर्माचे लोक जगात सर्वत्र आहेत. पण युरोपात त्यांना जाळणारे ‘पोग्रोम्स’ किती शतके सुरू होते? धर्माने एकत्र केलेले समाज स्वतंत्र किती व कायद्याने धास्तावलेले किती? ‘स्वतंत्र विचार करणारी स्त्री ही चेटकीण असते व प्रत्येक चेटकीण ही वध्य असते.’ असे चौथ्या शतकात सांगणार्‍या पोपनंतर सोळाव्या शतकापर्यंत युरोपात किती स्त्रिया जाळल्या गेल्या? एकट्या बिकानेर या राजस्थानातील शहरात ओसवाल या एकाच जातीची ३६ सतीमंदिरे आहेत. त्यांची बंगालातली व राजस्थानातली संख्या किती? १८व्या शतकापर्यंत स्त्रीला तिचा विचार लिहू न देण्याची सक्ती युरोपातील किती देशात होती? मुसलमान हा धर्म एक, त्याचा संस्थापक व धर्मग्रंथ एक, पण शिया व सुन्नी हे त्यांचे दोन पंथ परस्परात लढले किती आणि त्यात त्यांनी केलेला रक्तपात केवढा? अजूनही अहमदिया पंथाच्या लोकांना मारणे हा धर्माचा अपराध आहे असे तो का समजत नाही? जपानात बौद्ध व शिंटो या धर्मात किती युद्धे झाली? चीनमध्ये लाओत्से आणि कन्फ्युशिअसच्या धर्ममतांशी बौद्धांनी किती लढाया केल्या? श्रीलंकेत सिंहली बौद्ध व तामीळ हिंदू यांच्यात कितीसे सख्य आहे? मॅनमारमध्ये रोहिंग्यांचे बळी कोण घेतो? ख्रिश्चन व मुसलमान या दोन धर्मात सातव्या शतकात सुरू झालेले धर्मयुद्ध सातशे वर्षे चालून चौदाव्या शतकात संपले. भारतावरची इस्लामची पहिली चढाईही सातव्या शतकातली. येथे गादी कायम करायला त्यांना सातशे वर्षे लागली. या सार्‍या धर्मांनी मिळून मध्ययुगातील त्यांच्या लढायांत किती माणसे मारली? हिंदूंनी माणसे मारल्याच्या नोंदी फारशा नाहीत. पण त्यांनी आपल्याच समाजाचा केवढा मोठा भाग अस्पृश्य ठरवून गावकुसाबाहेर राखला.

धर्म व वंश यांच्या श्रेष्ठत्वाचे अहंकार माणसांना माणसांच्या हत्येला सिद्ध करतात, हा मध्ययुगाचा सांगावा आहे. सांस्कृतिक श्रेष्ठत्वाचे अहंकार माणसांना गुलाम करतात हे गोर्‍यांनी काळ्यांबाबत, हिंदूंमधील सवर्णांनी अवर्णांबाबत आणि मुसलमानांमधील अरबांनी जगातल्या अन्य मुसलमानांबाबत दाखविले. ‘निळ्या डोळ्यांचे व सरळ नाकाचे आर्य हेच जगातले सर्वश्रेष्ठ लोक असून त्यांनाच जगावर राज्य करण्याचा अधिकार आहे’ असे हिटलर म्हणाला. रोम म्हणाले, ‘आमची भूमी जगातली सर्वात श्रेष्ठ.’ भारतीय म्हणतात, ‘आमची भूमी ही विश्वगुरूंची भूमी आहे.’ या अहंतांनीही आजवर किती माणसे मारली? या अहंता राजकारणात येतात, त्याला धर्मकारण जोडतात आणि त्यालाच इतरांच्या द्वेषाचीही कडा आणतात. तसे झाले, की त्या हिंस्र होतात.

भाषेचे अहंकारही असेच असतात. आमच्या प्रांतात अन्यभाषिक नकोत. त्यांना नोकर्‍या नकोत. त्यांना आमच्या प्रांताबाहेर घालवा अशा मागण्या आजही देशात होतात की नाही? इंग्रजी राज्याची स्थापना प्रथम बंगालमध्ये कलकत्त्यात झाली. स्वाभाविकच त्या सरकारात बंगाली बाबूंची भरती मोठ्या प्रमाणावर झाली. आणि त्यांनी आपली मनमानीही त्यात केली. या लोकांनी प्रथम आसामी लिपी नाहीशी केली व त्या भाषेचे वेगळेपणही संपविण्याचा प्रयत्न केला. आजही आसामच्या जनतेत त्याविषयीचा बंगाल्यांवर राग आहे. कोणतीही गोष्ट, मग तो धर्म असो वा संस्कृती ती लादण्याचा प्रयत्न प्रतिक्रियांना जन्म देतो. हे सामाजिक वास्तव लक्षात घेऊनच धोरणे आखावी लागतात. देश एकरंगी बनवायचा की आहे बहुरंगी राखायचा आहे? त्याला त्याचे चेहरे राखू द्यायचे की त्यावर एकच एक मुखवटा चढवायचा?

शिवाय हा देश जातींचा आहे. त्यातला आजचा सार्‍यात उपद्रवकारक प्रश्न आरक्षणाचा आहे. आरक्षणाने जातिव्यवस्था मजबूत होते की सामाजिक न्यायाची मांडणी? देशातली प्रत्येकच जात आरक्षण मागत असेल (व ते दिले पाहिजे असे म्हणणारे लोक देशात असतील) तर नोकर्‍याच कमी होत जाणार्‍या या देशात हा विषय वादाचा होईल की संवादाचा? जात, पंथ, वर्ण, भाषा व संस्कृती हे सारे जन्मदत्त विषय आहेत आणि जन्मदत्त विषयांच्या अहंता जन्मभर टिकणार्‍याही आहेत. स्वातंत्र्याचे आंदोलन हे प्रामुख्याने उत्तरेचे व हिंदी लोकांचे आंदोलन आहे असे म्हणत त्याला विरोध करणारी दक्षिणेतील जस्टिस पार्टी १९२० ते १९५२ पर्यंत बहुमतात राहिली. १९५२ च्या निवडणुकीत नेहरूंनी तिचा पराभव केला तेव्हा तिची अहंता ओसरली हा इतिहास आहे. दक्षिणेवर हिंदी लादण्याचे प्रयत्न आजवर फसले. (मुळात हिंदीला विशेष भाषेचा दर्जा तिच्या बाजूने घटनासमितीत एक मत जास्तीचे पडल्यामुळे व काही हिंदीविरोधी सभासदांना गैरहजर ठेवल्यामुळे मिळाले हे कसे विसरायचे?) हिंदीला राष्ट्रभाषा बनविण्याच्या प्रयत्नांविरुद्ध सारा दक्षिणभारत कसा पेटून उठला? केंद्र सरकारने एनसीसीतील आज्ञा हिंदी बनविल्या तेव्हा तामिलनाडूने त्या राज्यातील सारी एनसीसीच बरखास्त केली. याचे स्मरण ठेवायचे की नाही? भाषा प्रादेशिक अहंता जागविते व प्रसंगी केंद्राला त्यापुढे माघारही घ्यावी लागते. याचे एक आणखी उदाहरण पाकिस्तानचे आहे. पाकिस्तान सरकारने पूर्व-पाकिस्तानवर उर्दूचे नियंत्रण लादले तेव्हा तेथील बंगाली मुसलमानांनी तो देश व धर्म विसरून त्याविरुद्ध आंदोलन केले. त्यात लाखो माणसे मेली, लाखो स्त्रियांवर अत्याचार झाले. एक कोटी दहा लक्ष लोक तो देश सोडून भारतात आले. ही घटना तर केवळ साठ वर्षांआधीची.

भारतात भाषावार प्रांतरचना आहे. प्रदेशवार संस्कृतिभिन्नता आहे. धर्म व जातींचे समूह त्यांच्या श्रद्धा-समजुतींचे आग्रह धरून आहेत. जगात एक कोटीहून कमी लोकसंख्या असलेल्या देशांची संख्या शंभरावर जाणारी आहे. लोकसंख्येबाबत फ्रान्स हा देश आपल्या कर्नाटकाएवढा. कॅनडा तेलंगणाएवढा, इंग्लंड महाराष्ट्राएवढा तर रशिया व अमेरिका उत्तरप्रदेशांएवढे. ते छोटे देश आपली एकात्मता कशी राखतात? स्वित्झर्लंडची लोकसंख्या पन्नास लाखांहून कमी असली तरी त्यात २२ प्रांत (कॅन्टन्स) आहेत. जर्मन, फ्रेन्च, इटालियन आणि रोमान्श ह्या चार भाषांना तेथे राष्ट्रीय भाषा म्हणून मान्यता आहे. त्या चारही भाषांतून कायदे प्रसिद्ध होतात. तसे न केल्याने रशियाचे महासंघराज्य तुटले. चीनचा शांघाय विभाग आणि तिबेट यात साम्य किती आणि आपले मिझोरम, मणिपूर आणि मद्रास व महाराष्ट्र यातला वेगळेपणा किती? लोकांचे प्रेम त्यातल्या वेगळेपणावर किती आणि सार्‍यांच्या ऐक्यावर किती? यातली किती राज्ये आपणही लष्कराच्या बळावर ताब्यात ठेवली आहेत? शिवाय ऐक्याला सुरुंग लावण्याचे प्रयत्नही देशात आहेत. जर्नेलसिंगाचा उदय, बाबरी मशिदीचा विध्वंस, ओरिसातील चर्चेसची जाळपोळ, दिल्लीतील शिखांचे हत्याकांड, गुजरातेतील मुसलमानांची कत्तल, मिझोरम व मणिपुरातील अत्याचार आणि काश्मीर? तेथे सामान्यपणे दरमहा पाच ते सात तरुण मारले जातात. गेल्या साठ वर्षात ही संख्या कुठवर गेली असेल? या प्रश्नांची काळजी किती जण करतात आणि त्याला टाळ्या वाजवून शाबासकी किती जणांकडून मिळते?

मिझोरम व नागालँड हे प्रदेश ब्रिटिशांनी १९२६ मध्ये यांदाबुच्या तहाने जिंकून भारताला जोडले. त्यानंतर देशात आलेल्या सायमन कमिशनसमोर त्या प्रदेशाच्या लोकांनी ‘तुम्ही भारत सोडाल तेव्हा आम्हांलाही मोकळे करा.’ अशी मागणी केली. पुढे स्वातंत्र्य आले तेव्हा तीच मागणी त्यांनी माऊंटबॅटनसमोर ठेवली. त्यावर ‘तुम्ही गांधीजींशी चर्चा करा’ असे माऊंटबॅटन यांनी त्यांना समजावले. तेव्हा ‘वीस वर्षे ब्रिटिशांसोबत राहिलात, दहा वर्षे आमच्यासोबत राहा. कदाचित आपण एक होऊ.’ असा दिलासा गांधींनी दिल्यानंतर ते प्रदेश भारतात राहायला राजी झाले. १९५७ मध्ये नागांनी तीच मागणी केली तेव्हा भारताने तेथे सैन्य पाठवून ती दडपून टाकली. १९६७ मध्ये मिझोराममध्येही त्याने तेच केले. तेव्हापासून ते प्रदेश लष्करी कायद्याखाली आहेत. काश्मीरही त्याच कायद्याखाली आहे. शर्मिला इरोम नावाची मुलगी लष्करी अत्याचारांविरुद्ध सोळा वर्षे उपोषण करते तेव्हा त्याचा अर्थ काय होतो? ती निवडणुकीत पराभूत झाली असेल पण दीड दशकांचा तिचा आकांत तेथील लोकांच्या मनात भरून असणारच की नाही? पूर्वी इम्फाळजवळ मनकर्णिका नावाच्या तरुणीवर लष्करी जवानांनी बलात्कार केला व तिचे प्रेत जंगलात फेकून दिले. त्याविरुद्ध मणिपुरातील सार्‍या महिला अधिकार्‍यांनी, प्राध्यापक, पत्रकार, कर्मचारी व महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी जगातला पहिला नग्न निषेध मोर्चा काढला तो कोण कसा विसरेल?

देश एक आहे. त्याची प्रादेशिकता अखंड आहे. मात्र त्यातली माणसे त्याची नागरिक असूनही वेगवेगळ्या प्रकारचे जीवन अनुभवणारी व जगणारी आहेत. त्यांना तसे जगू द्यायचे की त्यांना एका चरकात घालून त्यांचा रस काढायचा? आता तर कित्येक दशके देशात राहिलेल्या व त्याचे नागरिकत्व अनुभवलेल्या लोकांना आसामातून काढायचा प्रयोग हाती घेतला जाणार आहे. तो एखादे वेळी काश्मिरातही केला जाईल. पंजाबात याचे दुष्परिणाम, त्याचा आरंभ कोणीही करो, आपण अनुभवले आहेत. देशात खलिस्तानची चळवळ होती. द्रविडीस्तानची होती. काश्मीरची आहे. मणिपूर-मिझोरमच्या आहेत. या सार्‍या संघर्षरत वर्गात राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे हे आव्हान मोठे आहे.

नुकतेच न्या. रंजन गोगोई म्हणाले, ‘देश म्हणजे सर्वसमावेशकता आणि राज्य म्हणजे न्याय. हा बंधुत्वाचा व्यवहार आहे.’ राज्यात अन्याय असेल, राज्य लोकांच्या भावभावनांचे व वेगळेपणाचे मारक असेल, तर वेगळे काय व्हायचे असते? समाजाचे प्रश्न देवाणघेवाणीतून व त्यातही मोठ्यांनी जास्तीचे सोडूनच यशस्वी होतात. ही वृत्ती कुठे आहे? इथे तर बहुसंख्यच जास्तीच्या मागण्या घेऊन इतरांना त्यांचे मोल मागताना दिसत आहेत. हे चित्र बदलेल. किमान ते बदलावे अशीच सगळ्या राष्ट्रप्रेमींची भावना असेल.

धर्मवंशासारख्या जन्मदत्त श्रद्धाच माणसांना हिंस्र बनवितात असे नाही. विचारांचे कडवेपणही तो हिंसाचार समाजात आणत असते. जगात धर्माने अधिक माणसे मारली की विचारांनी? या प्रश्नाचे उत्तर अजून अभ्यासकांनी शोधले नाही. ऑर्थर पामर या अमेरिकेन राष्ट्रदूताने मांडलेल्या हिशेबात एकट्या विसाव्या शतकात विचारसरणीच्या कडवेपणाने आणि त्यावर स्वार झालेल्या हुकुमशहांनी जगातली सोळा कोटी नव्वद लाख माणसे मारली आहेत. यात हिटलरने दोन कोटी, स्टॅलिनने पाच कोटी तर माओने सात कोटी माणसे मारली वा ती मरतील अशी व्यवस्था केली. (यात युद्धात मारले गेलेल्यांचा समावेश नाही.) याखेरीज ख्मेरूजसारख्या बारीकसारीख व स्थानिक हुकुमशहांनी मारलेल्या माणसांची आकडेवारी टाकली की ही बेरीज पूर्ण होते. तात्पर्य, प्रश्न विचारांचा नाही, मूल्यांचा नाही आणि जन्मदत्त श्रद्धांचाही नाही. तो आहे त्यांच्यात येणार्‍या कडवेपणाचा व अहंतांचा. या अहंता जेव्हा शांत होतात तेव्हाच जगात व समाजात शांतता नांदते. दुर्दैवाने आजचा आपला काळ श्रद्धांना वा अशा अहंतांना धार चढविण्याचाच आहे.

समाज आणि देश यांचे वैविध्य राखून त्यात एकात्मता आणायची की त्याला थेट एकरूपच बनविण्याचा अट्टहास धरायचा? हा प्रश्न आहे. असा अट्टहास कधी यशस्वी होत नाही आणि वेगळेपण राखून एकात्मता आणायची तर ती मूल्यांच्याच आधारे आणता येते. हे वास्तव विस्मरणात गेले की समाज तुटतात आणि देश विखुरतात. याचे भान राखले की देश, समाज व माणूसही समाधानी, स्थिर आणि सुखी होत असतो.

विवाहाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’!

अलीकडे एक चर्चा अचानक उफाळून आली, ती अशी की, विवाह अंतर्गत पतीची शरीरसंबंधाबाबत असणारी पत्नीवरची जबरदस्ती हा ‘बलात्कार’ समजायचा का? मात्र पतीच्या या जबरदस्तीच्या मुद्दय़ावर बोलण्यापूर्वी, पहिल्या प्रथम विवाहाविषयी थोडं प्राथमिक जाणून घ्यायला हवं. स्त्री-पुरुषांना एकमेकांच्या साथीने आणि पुढे आधाराने सहजीवन जगता यावे, म्हणून तरुणपणातच त्यासाठी जी निष्ठेची आणि प्रेमाची बैठक घातली जाते, तिला ‘लग्न’ म्हणतात.
तसं म्हटलं तर, मानवाच्या बाबतीत लग्न म्हणजे फक्त शरीरसंबंध असा अर्थ असू नये. कारण तसे संबंध प्राचीन काळापासून विवाहाशिवायच होत होते आणि आजही होऊ शकतात. ते नैतिक की अनैतिक हा खरंतर निव्वळ ‘मानण्याचा’ भाग आहे. कारण विवाहांतर्गत असोत किंवा विवाहपूर्व असोत, खुशीच्या शरीर संबंधांची स्त्री-पुरुषांची कृती ही एकसारखीच असते. त्यामुळे हे संबंध पापमय आणि ते संबंध पुण्यकारक असं वेगळं काही नसतं, हे आपल्याला माहीत आहे.
स्त्री-पुरुष संबंधांतून पुनरुत्पत्ती होणे, हा निसर्गनियम आहे. सजीव जाती या पुनरुत्पतीतूनच जिवंत राहतात आणि त्यातून निसर्ग जिवंत राहतो. त्यानुसार निसर्गाकडून सर्व प्राणीमात्रांचे जीवनचक्र निश्चित केले जाते. त्यामध्ये प्राण्याचा आहार, निवारा, त्यांच्या प्रणयाराधनेच्या पद्धती, प्रजोत्पादन, अपत्य संगोपनाच्या पद्धती, बाल्यावस्थेचा काळ, मातृ-अवस्थेचा काळ, हे सर्व काही निसर्गाकडून जैविक (biological) यंत्रणेद्वारा नियंत्रित केलेले असते. त्यामध्ये प्राणीमात्रांना स्वतच्या इच्छेने काही बदल करता येत नाहीत. तसे केल्यास त्या प्रजातीचा विनाश ओढवतो. उदा. कावळ्याने पाण्यात अंडी घालण्याचा प्रयत्न करणे, किंवा सशाने झाडावर निवारा शोधणे, यामध्ये त्यांचा विनाश आहे. माणसाबाबतही हेच निसर्ग नियम आहेत. निसर्गाचे ते नैतिक नियम म्हणावे लागतात, आणि त्याचा भंग मानवजातीने केल्यास हा विनाशाचा नियम मानवजातीलाही आहे.
निसर्गाने विशेषतः सस्तन प्राण्यात माता-मादीकडे प्राणीवंशाचे संवर्धन, संरक्षण करण्याचे आपले महत्त्वाचे कार्य सोपवलेले आहे. नरामध्ये हा विचार नाही. सस्तन नर-मादीमध्ये शरीर संबंध त्याकरिताच निसर्गाने मुक्त ठेवलेले असतात. म्हणजे प्रजोत्पादनातील भूमिका दोघांनाही सहजतेने पर पाडता येतात. ना कुणाला कामभावना मारून ठेवून जगावे लागत ना कुणावर संबंधाची जबरदस्ती होत! माता-मादी जेव्हा मातृत्व काळात असते, तेव्हा तिला अपत्यांचे संगोपन करण्यास स्वस्थता मिळावी, वेळ मिळावा, म्हणून त्या काळात पुरेसा हिंस्रपणा तिच्यामध्ये आलेला असतो. ज्यायोगे ती तिच्या नराला तिच्या कुटुंबापासून दूर ठेवून पिल्लांचे रक्षण व संगोपन करीत असते. पण त्या सस्तन नरामध्ये कामवासनेचे हार्मोन (testosterone) हे माता-मादीपेक्षा जास्त प्रमाणात असते. अर्थात मग नराची अतिरिक्त कामभावना त्याला शमविता येण्यासाठी, मुक्त लैंगिक पद्धतीचा त्याला उपयोग होत असतो. जी मादी प्रसवा नसते, तिच्या समवेत तो कामभावना भागवू शकतो. त्यामुळे नरासाठी इतर मादींपर्यंत पोहोचणे हे निसर्गतत्त्व साध्य होते. यामागे एका माता-मादीची पिल्ले काही कारणाने दगावली तर दुसरीकडे पुनरुत्पत्ती होत राहावी आणि त्याकरिता नर हा जास्त कामभावनेचा असण्याची ही निसर्गाची किमया असावी, असं वाटतं.
स्त्री-पुरुष हे सस्तन प्राण्यातून उत्क्रांत झालेले आहेत. शिवाय इतर पशूंमध्ये असणारा समागमासाठीचा ‘हिट पीरियड’ उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर माणसामधून नष्ट झालेला दिसतो. माणूस हा बुद्धीवर चालणारा प्राणी आहे. ही बुद्धी विचाराने वापरल्यासच माणसाची प्रगती आहे, आणि अविचारात माणसाचा विनाश आहे. पण दुर्दैवाने माणूस तसा विचाराने वागलेला नाही किंवा वागत नाही, हे वास्तव आहे. त्याने अनेक निसर्गनियमही धुडकावलेले आहेत. विशेषतः विवाहप्रथा आणून माणसाने स्त्री-पुरुष मुक्त संबंधाचा निसर्गनियम पहिल्याप्रथम धोक्यात आणला. सस्तन पशू मातेप्रमाणे अपत्य संगोपनाचे, संरक्षणाचे काम पुरुषापेक्षा स्त्रीवर जास्त निर्भर असते. त्या मातृत्वाच्या महत्त्वाच्या काळात progesterone, prolactin, oxytocin ही हार्मोन्स स्त्रीमधील अपत्याविषयीची मानसिक-भावनिक गुंतवणूक वाढवतात. मुळात कामभावनेचे हार्मोन कमी असणाऱ्या स्त्रीमध्ये कामवासना त्यामुळे मंदावते. नवजात पिढीसाठी निसर्गाच्या अशा वेगवेगळ्या प्राणीजातीत भिन्न तरतुदी आपल्याला दिसतात. स्त्री ही सस्तन पशू मातेसारखी हिंस्र होऊन पुरुषाला दूर ठेवत नाही. पण तिच्यातील कामभावना मंद करून, तिला अपत्य संगोपनाला वेळ देता यावा अशी सोय निसर्ग करतो. पण पुरुषामधील कामभावनेचे हार्मोन सस्तन नराप्रमाणे, स्त्रीपेक्षा सुमारे वीस पटीने जास्त असते आणि अपत्य त्याचं स्वतःचं म्हणून त्याला समजत असलं तरी पुरुषामध्ये स्त्री इतके हार्मोनल फरक होत नाहीत. त्यामुळे त्याची कामभावना तशीच तीव्र राहते, आणि सस्तन प्राण्याच्या नैसर्गिक नियमानुसार पुरुषसुद्धा पत्नीकडून भागवल्या न जाणाऱ्या कामभावनेसाठी अन्य पर्यायाच्या शोधात राहतो. मात्र अन्य कुणा स्त्रीशी विवाहबाह्य़ संबंध हा व्यभिचार, फसवणूक म्हणून समाजाने ते पाप ठरविले आहे. ते विवाह करणाऱ्यांसाठी योग्यच आहे. परंतु त्यामुळे पुरुषाचा प्रश्न सुटत नाही आणि मग विवाहित पुरुषाला त्याची अतिरिक्त कामभावना शमविण्यासाठी पत्नीवर बळजबरी केल्याशिवाय अन्य मार्ग राहत नाही. या परिस्थितीवर समाज जर कोणताही पर्याय देऊ शकत नसेल, तर मग विवाहांतर्गत स्त्रीवर होणाऱ्या जबरदस्तीला ‘बलात्कार’ म्हणायचा का? अशा रीतीने विवाह हे मानवी समाजात जणू कशाही पद्धतीच्या आणि जबरदस्तीच्या शरीरसंबंधाचे एक ‘ना हरकत प्रमाणपत्र’ झालेलं आहे. जे पुरुष पत्नीवर जबरदस्ती करीत नाहीत, आणि ज्यांचे अन्य कुठेही संबंध नाहीत, ते पुरुष ‘नॉर्मल’ किंवा ‘सभ्य’ अशा विविध व्याख्या आपण करून ठेवलेल्या आहेत.
तरीही स्वतःच्या कामभावनेवर नियंत्रण ठेवू शकणारे अपवादात्मक पुरुष सोडले तर अन्य सभ्य वाटणारे पुरुष घराबाहेर पडल्यावर स्वतःला किती आवरू शकतात, हा मोठा संशोधनाचा विषय ठरावा. गर्दीत पुरुषांकडून होणाऱ्या विनयभंगाला बहुसंख्य स्त्रियांना सामोरे जावे लागते. वास्तविक कामप्रवृत्ती ही एक सहज, स्वाभाविक, नैसर्गिक प्रेरणा आहे आणि या ऊर्मीचे नियंत्रण प्रत्येक स्त्री-पुरुषाच्या मेंदूकडून होत असते. अत्यंत गुंतागुंतीची असणारी ही काम-यंत्रणा बदलून टाकण्यात माणसाला अजून यश आलेले नाही, आणि त्यात भर म्हणून या नैसर्गिक यंत्रणेत अडथळा करणारी विवाहप्रथा माणसाने आणून उभी केलेली आहे. बरं, एवढय़ावरच हे थांबलेलं नाही. तर विवाहामुळे पुरुषाच्या मुक्त कामेच्छेच्या होणाऱ्या कोंडीचा गैरफायदा घेणारी एक पुरुषप्रवृत्ती पुढे सरसावलेली दिसते. मग जे प्रत्यक्षात मिळविण्यात पुरुषाला त्याच्या जीवनात अपयश आहे, त्याला वाट करून देण्यासाठी सेक्स सीन्स, बेडसीन्स, बलात्कार वगैरे प्रसंगांचा चित्रपटांतून वाढत्या प्रमाणात उपयोग केला जातो, जे पाहण्यास पुरुषवर्ग गर्दी करतो. पोर्नफिल्म तयार करण्याचे व पाहण्याचे पुरुषांमधील प्रमाण वाढत चाललेले आहे. आणि आता तर हातात आलेल्या स्मार्टफोनमधल्या इंटरनेटमुळे असे चित्रपट सीन्स बघणं, एकमेकांना क्लिपिंग्सची देवाणघेवाण करणं याचंही प्रमाण वाढलं आहे.
विवाह-चौकटीतील संबंध तेव्हढे नैतिक या संस्कारामुळे विवाहपूर्वसुद्धा काही करता येऊ शकत नाही आणि दुसरीकडे, ही सार्वजनिक कामुक दृश्ये पुरुषांना चिथावत राहतात. त्यातून मानसिक अस्वस्थ झालेले पुरुष (अपवाद वगळता) अन्य स्त्रीच्या मोहात पडतात. पण बरोबरीच्या सन्मान्य स्त्रियांनादेखील समाजाने विवाहाच्या बंधनामध्ये ठेवलेलं असतं. म्हणून मग संधी मिळेल त्याप्रमाणे व तिथे, एकट्या सापडलेल्या स्त्रीवर बलात्कार करू पाहणे, किंवा वेश्येकडे जाणे, संबंधांची दृश्ये पाहणे, किंवा समिलगी संबंधातून लैंगिक समाधानाचा हेतू साध्य करू पाहणे, असे प्रयत्न पुरुषांकडून असहाय्यपणे होत राहतात. मग यापकी नैतिक कशाला म्हणायचं? किंबहुना हे सर्व समाजाच्या भीतीने चोरून चालल्यामुळे, गुन्हेगारी निर्माण होते. त्याबाबत खऱ्या कारणांना सामोरं न जाता आपल्या समाजात ‘स्त्रियांना जबाबदार धरणे’ हा तर काहीही न करता, कारणे देण्याचा सोपा मार्ग आहे. अशा दिशाभूलीतून गुन्ह्य़ांचे प्रमाण वाढत राहाते आणि गुन्ह्य़ांच्या वारंवारतेमुळे त्यात वैविध्य आणण्याची एक विकृती समाजात उद्भवते. म्हणजे एकाच वेळेला परिस्थितीचा राग, सूड, वैफल्य शमवता येऊन दुसऱ्याच्या वेदनेतून, अपमानातून आनंद किंवा समाधान मिळविण्याचा प्रयत्न, अशी ती भयानक विकृती असते. उदा. प्रेमभंगातून प्रेयसीला विद्रूप करणे, लहान मुला-मुलींशी शरीरसंबंध करण्याचा प्रयत्न करणे, स्त्रियांच्या चेंजिंग रूममध्ये कॅमेरे लावून ब्लॅकमेलिंगचा आनंद घेणे, छेडछाडीला विरोध करणाऱ्यांची हत्या करणे, अनाथ, अपंग वा मतिमंद स्त्रीच्या स्थितीचा फायदा उठवून तिच्याशी संबंध करू पाहणे अशा प्रकारे काही पुरुषांकडून होणारे क्रौर्य आणि विकृती हे त्यांचे मनस्वास्थ्य बिघडल्याचे स्पष्ट पुरावे आहेत.
यापैकी काहीही न करणाऱ्या सरळमार्गी पुरुषांची मन:स्थिती सतत तणावाखाली असू शकते. कामभावनेची पूर्तता, अर्धवट पूर्ण होण्यामुळे प्रक्षुब्धता आणि बेचैनीतून त्यांचे चिडचिड करण्याचे प्रमाण वाढू शकते. एकप्रकारची अस्वस्थता त्यांना ग्रासून राहते, जी कशामुळे आहे हे त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना उमगत नाही. थोडक्यात, विवाहप्रथेने निसर्गाच्या स्वयंस्फूर्त कामभावनेला जे आव्हान दिलेलं आहे, त्यामुळे एकतर स्त्रीवर विवाहांतर्गत पतीकडून ‘बलात्कार’ होत राहतील, नाहीतर पुरुषाचे मनस्वास्थ्य बिघडल्याचे परिणाम कुटुंबाला, समाजाला भोगावे लागतील. दोहोंपैकी कोणता दुष्परिणाम आपण पत्करायचा की दोन्ही थोडे थोडे सहन करायचे, हे पूर्णतः आपल्या नाकर्तेपणावर अवलंबून आहे. याबाबत टीव्हीवर वा अन्यत्र होणाऱ्या चच्रेत नेहमीच ‘पुरुषाची मानसिकता बदलली पाहिजे’ असं आवर्जून सांगितलं जातं. ती सूचना जरी रास्त असली तरी, त्याआधी पुरुषाची मानसिकता बिघडविण्याचे प्रयत्न थांबवायला नकोत का? त्याशिवाय ती मानसिकता बदलणार कशी ?
मग यावर उपाय काय? विवाह पद्धतच रद्द करायची का? तर याचे उत्तर ‘नाही’ असं द्यावं लागेल. यापेक्षा समाजाने स्वतःच्या करून घेतलेल्या नैतिकतेच्या कृत्रिम काटेकोर कल्पना थोडय़ा सौम्य आणि सैल करायच्या ठरवलं तरी पुरुषांना मोकळा श्वास घेता येईल आणि त्याबरोबरीने स्त्रियांची, त्यांच्या अवहेलनेतून मुक्तता होण्यास सुरुवात होईल. विवाहाचं वय वाढल्यामुळे आणि वय वर्षे १५ ते ३० या कालखंडात कामभावना तीव्र असल्यामुळे, समजा मुला-मुलींमध्ये विवाहपूर्व शरीरसंबंध जर झालेच तर फार आकांडतांडव न करता त्याकडे बघण्याची दृष्टी ‘सहज’ होईल, असा प्रयत्न समाजाकडून हवा. ज्यावेळेस तरुण मंडळींना आपल्याला विवाहपूर्व हे स्वातंत्र्य मिळू शकते, त्यात काही विशेष साहस किंवा थ्रिल नाही, अशी खात्री वाटू लागेल, तेव्हा त्यातला चोरटेपणा लयास जाईल आणि अशा संबंधांचं प्रमाण आजच्या दडपलेल्या स्थितीत जितकं जास्त आहे, त्यापेक्षा ते आपोआपच कमी होत जाईल. कारण एकतर त्या संबंधांची जबाबदारी मुला-मुलींवर पडेल आणि दुसरे म्हणजे, एखादी गोष्ट करायला मिळणार नाही, या भावनेतून ती चोरून-मारून करून पहावीशी वाटण्याची भावनाच शिल्लक राहणार नाही. तरुणांच्या कामभावनेवर करडी नजर ठेवण्यापेक्षा मुलग्यांनी अधिक जबाबदारीने वागण्यासाठी काय करता येईल, इकडे समाजाने लक्ष दिलं पाहिजे. मुलींच्या शिक्षणावर आणि आर्थिक स्वातंत्र्याबाबत अधिक जागरूक राहिलं पाहिजे. लैंगिक शिक्षणाचा समाजाने सरकारकडे आग्रह धरला पाहिजे. संततीनियमनाचे आणि पालकत्वाचे शिक्षणही दिलं गेलं पाहिजे.
खरंतर, माणसाला त्याच्या स्थैर्यामुळे प्रगती साधता येत असते आणि हे स्थैर्य आपल्याला विवाह करण्यामधून मिळत असते. विशेषतः पुरुषांना मानसिक स्थिरतेसाठी विवाहाइतका चांगला पर्यायच नाही. विवाहाशिवाय मातृत्व मिळण्याचे वरदान स्त्रीला असल्यामुळे, मुलांच्या संगोपनाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना तिला मानसिक एकग्रता साधता येऊन, ती आवश्यक ती स्थिरता मिळवू शकते. विवाह पद्धतीने गेल्या ३-४ हजार वर्षांत पुरुषांमध्ये खूप चांगले बदल आणलेले आहेत. पितृभावनेमुळे तो त्याच्या क्रूर मानसिकतेतून प्रेमळ पालकत्वाच्या भूमिकेत बदललेला आहे. तेव्हा विवाह पद्धत ही चूक नसून तिच्या पावित्र्याचे स्तोम करून विवाहपूर्व संबंधांना अडथळा करणे, त्यांना अनैतिक ठरविणे, इथे ती चूक आहे.
याबाबत पाश्चात्त्य प्रगत देशांनी या परिस्थितीला कसं तोंड दिलं ते मुद्दाम अभ्यासायला पाहिजे. भारतासारख्या जाती, धर्म, प्रदेश अशा भिंती तिथे नसल्यामुळे, आणि शैक्षणिक, आर्थिक समता तिथे बऱ्याच प्रमाणात असल्यामुळे, तिथे बदल आणणं भारताच्या तुलनेने खूप सोपं आहे. शिवाय शरीरशास्त्र, मानसशास्त्र याचा सांगोपांग अभ्यास तिथे झाल्यामुळे, जुन्या परंपरांना ‘आमची उच्च संस्कृती’ म्हणून डोक्यावर न घेता, तिथल्या समाजाने नव्या संशोधनानुसार पहिल्या प्रथम विवाहपूर्व संबंध मान्य केले. त्यासाठी लैंगिक शिक्षण आणि संतती नियमन शिक्षण चालू केलं. अशा संबंधांतून स्त्रीला मूल झाल्यास ते तिला एकटीला सांभाळता येणे शक्य व्हावे म्हणून स्त्रियांसाठी नवे कायदे व सुविधा तिथल्या सरकारांनी आणल्या. थिओडोर रुझवेल्ट सारखे प्रागतिक विचाराचे अध्यक्ष त्या काळात अमेरिकेला लाभले. ‘मदर्स ओन्ली फॅमिली’ ही कल्पना मध्यवर्ती धरून अमेरिकेमध्ये १९३२ च्या काळात ‘मदर पेन्शन लॉ’ आणताना परित्यक्त मुले-मातांबरोबर अविवाहित मातांनाही त्यांच्या मुलांसमवेत सामील करून घेतलं गेलं. अमेरिकी समाजानेसुद्धा आणि त्यांच्या मुलांवर ‘अनैतिक’ असा शिक्का न मारता त्यांचा स्वीकार केला. साहजिकच स्त्रियांबद्दलच्या योनिशुचीतेच्या कल्पना आणि स्वतःच्या बीजाचे मूल किंवा कुळाला वारस अशा जखडलेल्या कल्पना पुरुषांना सोडून द्याव्या लागल्या. (यालाच पुरुषांमधील मानसिक बदल म्हणावे लागतील.) अशा प्रकारचे मुक्त संबंध किंवा ‘लिव्ह इन रिलेशन’ तिथे साधारणपणे वयाच्या चाळीशीपर्यंत सर्व स्त्री-पुरुषांमध्ये होत राहतात. पण म्हणून विवाहाचे महत्त्व ते कमी लेखत नाहीत. चाळिशी ओलांडणाऱ्या पुरुषांमध्ये (अपवाद वगळता) हळूहळू कामभावनेच्या हार्मोनचा प्रभाव किंवा जोर कमी होऊ लागतो. १५व्या वर्षांपासून पुढील वीस-पंचवीस वर्षे मुक्त जीवनाचा अनुभव घेतल्यानंतर पाश्चात्त्य पुरुषांना प्रौढ जीवनात स्थैर्याची आस लागते. स्त्रियांनासुद्धा आपली मुले सांभाळण्यासाठी मदतीच्या गरजेतून पुरुषाची साथ हवीशी वाटते. मग त्यावेळी आपल्या आंतरिक सुरांशी सूर जुळणारे स्त्री-पुरुष एकत्र येऊन लग्न करतात. ‘लिव्ह इन’चे पूर्वीचे अनुभव तेव्हा कामी येतात. अशा वेळेस त्या स्त्रियांची मुले लहान असल्यास त्यांच्यासह पुरुष त्यांचा स्वीकार करतो. विवाहानंतर या स्त्री-पुरुषांनी निष्ठेचे आयुष्य जगणे अभिप्रेत असते. कारण पाश्चात्य संस्कृतीत पती-पत्नीपैकी कोणीही दुसऱ्याला फसवून ‘अफेअर’ करणे, हे फार आक्षेपार्ह समजलं जातं, त्यापेक्षा घटस्फोट हा प्रामाणिक आणि उचित समजला जातो. म्हणूनच प्रौढविवाह जेव्हा विचारपूर्वक होतात, तेव्हा ते टिकवण्याचा प्रयत्न तिथे जास्त असतो.
अशा रीतीने विवाहपूर्व स्त्री-पुरुष संबंधांबाबत नैसर्गिक दृष्टिकोन स्वीकारल्यानंतर युरोप-अमेरिकेतील पहिल्या तरुण पिढीला आणि त्यांच्या पालकांच्याही पहिल्या पिढीला जुन्या नैतिक मानल्या गेलेल्या परंपरा सोडतांना अडचणी आल्या, त्यांच्या चिंता वाढल्या. पण सुमारे वीस वर्षांनी त्याचे चांगले परिणाम दिसून येऊ लागले. याचा अर्थ युरोपात आता कोणतेच गुन्हे नाहीत किंवा प्रत्येक कुटुंबात अगदी आलबेल आहे, असं नाही. परंतु लैंगिकगुन्हे, त्यांची वारंवारता, आणि त्यासंदर्भातील सामाजिक विकृती याचे प्रमाण तिथे खूप घटलेले आढळते. स्त्री शरीराचे आकर्षण असणे आणि म्हणून त्यातून त्यांची छेडछाड करण्याचा आनंद घ्यावासा वाटणे, असे वास्तव तिथे दिसत नाही, ते मुक्त स्त्री-पुरुष संबंधांच्या मान्यतेमुळे, असे आता म्हणावे लागेल. मुक्त शरीर संबंधांचा परवाना अगदी तरुण वयातच त्यांना उपलब्ध झाल्यामुळे, विवाहानंतर प्रथमच मुलगे-मुली शरीरसंबंधांना सामोरे जात आहेत, असेही तिथे नाही आणि मग इतके वर्ष मी कामपूर्तीपासून वंचित आहे, तेव्हा घाईने आणि कशाही प्रकारे तो आनंद मी आता मिळवीन, अशी परिस्थिती तिथे आता राहिलेली नाही. आधीच्या संबंधांच्या अनुभवातून आणि सेक्स एज्युकेशनमुळे स्त्री-पुरुषांनी एकमेकांचा सन्मान करण्याचे महत्त्व त्यांना समजलेले असते. त्यामुळे विवाह हे नाते तिथे असे उरलेले नाही की शरीरसंबंधाबाबत सरसकटपणे ते जबरदस्तीचे किंवा अन्यायाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र ‘ म्हणून वापरले जावे.
भारतात ‘लिव्ह इन’ द्वारे असे विवाहपूर्व संबंध उच्च शिक्षित किंवा उच्च आर्थिक वर्गात चालू झालेले आहेत. पण एकूण समाजात शैक्षणिक, आर्थिक, जातीय आणि स्त्री-पुरुष विषमता तीव्र असल्यामुळे असे विवाहपूर्व संबंध मान्य होण्यात खूप अडचणी आहेत, हेही तितकंच खरं!

लोकसत्ताच्या सौजन्याने(३० मे २०१५)

mangala_samant@yahoo.com

नेटिझन्स इतक्या उर्मटपणाने का वागतात?

संगणक (यात संगणकाशी संबंधित मोबाइल फोन, इंटरनेट, लॅपटॉप, वाय फाय, नेटबँकिंग, मोबाइल बँकिंग व इतर सर्व माहिती तंत्रज्ञान सुविधांचा समावेश आहे.) माणसांना चांगली माणसं बनण्यासाठी मदत करतात, हे संगणक क्षेत्रातील एका तज्ञाचे विधान आहे. परंतु निदान ब्लॉगोस्फेरमधील अनुभवावरून तरी नेटवरील माणसं उदात्त, शहाणे, संवेदनशील झाले आहेत, याबद्दल शंका घ्यावीशी वाटते. आपण कल्पनाही करू शकणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात संगणक आपल्या आयुष्याला व्यापलेले आहे. संगणक निरक्षरता हद्दपार होत आहे. नेट आता प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनत आहे. तरीसुद्धा नेटवर वावरणाऱ्यांसाठी काही नीती – नियम, आचारसंहिता वा स्वनियंत्रण असे काहीही नसल्यासारखे नेटिझन्सचे वर्तन असते.
नेटवरील माहिती संकलन व होत असलेले विनिमय यांचे विश्लेषण केल्यास १६.८ कोटी डीव्हीडी भरतील एवढ्या माहितीचे देवाण घेवाण एका दिवसात होत आहे. प्रती दिवशी २९४०० कोटी ई-मेल्स पाठवल्या जात असतात. रोज २० लाख ब्लॉगपोस्टवर मजकूर चिटकवला जात असतो. या ब्लॉगपोस्टवरील मजकुरांची मुद्रित प्रत काढल्यास ६०-६४ पानाच्या साप्ताहिकाला पुढील ७७० वर्षे पुरेल एवढा मजकूर उपलब्ध होऊ शकेल. १७.२ कोटी नेटिझन्स फेसबुकला भेट देतात. यासाठी ४७० कोटी मिनिटं खर्ची घातल्या जातात. रोज २५ कोटी फोटो अपलोड होतात. या अपलोड झालेल्या फोटोंचे प्रिंट्स काढून एकावर एक ठेवल्यास ८० एफेल टॉवर्स इतकी उंची होईल. नेटवरून रोज २.२ कोटी तास जुने चित्रपट व सिरियल्स बघण्यासाठी खर्ची घातला जातो. रोज ८६४००० तासाचे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केल्या जातात. एकट्यानेच रोज, २४ तास, हे सर्व बघायचे ठरविल्यास 98 वर्षाचा काळ सहजपणे निघून जाईल. रोज १.८७ कोटी तास संगीत ऐकले जाते. प्रती दिवशी १२८८ अप्लिकेशन्स अपलोड होतात व ३.५ कोटी अप्लिकेशन्स डाउनलोड होतात.
इतक्या मोठ्या प्रमाणात ब्लॉगोस्फेर व इतर गोष्टी आपल्या जीवनाचा ताबा घेत असल्यामुळे आपण सर्व संगणक, इंटरनेट व इतर माहिती तंत्रज्ञानाच्या सोई – सुविधांची गुलामी करत आहोत की काय असे वाटू लागले आहे. सिटीझन्सचे रूपांतर नेटीझन्समध्ये झपाट्याने होत आहे. यानंतरच्या पुढच्या पिढीच्या दिवसाची विभागणी झोप व ऑनलाइन अशीच करावी लागणार आहे. झोपेतून उठल्या उठल्या मोबाइल कानाशी व लॅपटॉप समोर अशा अवस्थेतून ही पिढी जाणार आहे. गंमत अशी आहे की कुणीही उठावे व लाइक/डिसलाइक वर क्लिक करत रहावे अशी स्थिती आता आहे. विकिपिडियातील पानांचाही यातून सुटका नाही. हातात माउसचे बटन आहे, व नेट कनेक्ट आहे एवढ्याच भांडवलावर या गोष्टी सर्रासपणे होत आहेत. त्याचप्रमाणे सोशल नेटवर्कसुद्धा नेटिझन्सच्या मनमानीपणातून सुटलेले नाही.
ब्लॉग, फोरम, वा फेसबुक वरील प्रतिसाद/प्रतिक्रिया वाचत असताना चर्चेसाठीच्या धाग्याबद्दल (उगीचच्या उगीच) उलट – सुलट, टोकाचे व काही वेळा कुत्सित मत प्रदर्शन करत असल्याचे प्रमाण वाढत आहे. मराठी नेटवर जरी हे काही प्रमाणात कमी वाटत असले तरी इंग्रजीतील – विशेषकरून राजकीय, आर्थिक व सामाजिक विषयावरील – धाग्यांच्या संदर्भात नेटिझन्सचा भावनोद्रेक प्रकर्षाने जाणवतो. आपण केलेली विधाने, आपण लिहिलेले लेख लोकांनी जसेच्या तसे स्वीकारावे, त्याचे संदर्भ, अधिक माहिती विचारू नये असा एक नवा प्रवाह दिसतो. विशेषतः जेथे भावनांना हात घातला जातो. (ज्योतिष, वैद्यक, अस्मिता, इतिहास) तेथे हा प्रवाह अधिक दिसतो. क्षुल्लक विधानावरून तावातावाने भांडत असल्याचे चित्र बघायला मिळते. काही वेळा शिवराळ भाषा वापरली जाते. काहींना साधे लिहितानाही शिव्याची पेरणी करण्याचा सोस असतो. त्यांना साधे लिहिता येत नाही. साधे व सरळ लिहिल्यास आपल्याकडे कोणाचे लक्ष जाणार नाही, असा त्यांचा समज असतो. व अशा ट्रॉल्सच्या (trolls) संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडत आहे.
परंतु मानसतज्ञांच्या दृष्टीने नेटिझन्सची ही वर्तणूक सवयीत बदलल्यास सामाजिक व संबंधित व्यक्तीच्या मानसिक आरोग्यास इजा पोचू शकते. म्हणूनच वेळीच जागे होऊन अशा गोष्टीवर अंकुश ठेवण्यासाठी काही निर्बंध घालण्याचे आग्रह ते धरू लागले आहेत.
मुळात अशा नेटिझन्सच्या बहुतेक प्रतिक्रिया केवळ आक्रमक या सदरात मोडतात. त्यातून काहीही अर्थबोध होत नाही. आपले म्हणणे कुणीच ऐकत (वाचत) नाही म्हणून ते वैतागलेले असतात. मानसतज्ञांच्या मते आपल्या प्रतिक्रिया वा प्रतिसाद यात इतकी भावनिक गुंतवणूक करणेसुद्धा हानिकारक ठरणार आहे. गंमत अशी आहे की जेव्हा नेटिझन्स थंड डोक्याने विचार करू लागतात तेव्हा हे सर्व चुकीचे होते हेही त्यांना कळत असते.
तरीसुद्धा ही मंडळी असे का वागतात?
अनेक घटक एकाच ठिकाणी जमत असल्यामुळे उर्मटपणा, उद्धटपणा, आक्रमतकता इत्यादींचा विस्फोट होत असावा असे तज्ञाना वाटत आहे. मुळात प्रतिसाद देणारे व धागाकर्ते बिनचेहऱ्याचे, मुखवटे चढवलेले व एकमेकांना ओळखत नसल्यामुळे चिखलफेक करण्यात कुणालाही संकोच वाटत नाही. संताप व्यक्त करणारे कुठे तरी दूर असण्याची शक्यता असल्यामुळे आपले कुणीही वाकडे करणार नाही, आपल्याला शारीरिक इजा होणार नाही, याची त्यांना खात्री असते. समोरासमोर असल्यास अशा प्रकारची टीका टिप्पणी ते कधीच करणार नाहीत. याशिवाय प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा काही तरी लिहिणे अगदी सोपे असते. मुळात ब्लॉग, फोरम, ई – मेल अकौंट, लॉगइन, पासवर्ड इत्यादीसाठी आर्थिक वा तांत्रिक अशी कुठलिही अडचण नसल्यामुळे जाता जाता पिंक मारणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
प्रतिसाद लिहिणाऱ्यांकडे भरपूर वेळ असणे हेसुद्धा एक कारण असावे. व एका प्रकारे ते त्यांचे स्वगत भाषणच असते. या स्वगत भाषणात कुठलिही टोकाची भूमिका घेतली तरी त्यांना जबाबदार धरता येत नाही. माणसं प्रत्यक्ष संवाद साधत असताना एकमेकांच्या देहबोलीनुसार आक्रमकता कमी जास्त करतात. कुठे थांबावे, कुठे रेटावे, याची कल्पना दोघांनाही असते. राग आला तरी ते व्यक्त करण्यात थोडीशी सुसंकृतता त्यात असते. त्यामुळे रागाच्या भरात दोन शब्द जास्त उच्चारले तरी काही वेळातच राग शांत होऊन संवाद मूळपदावर येऊ शकतो.
याचबरोबर आपण काही तरी भव्य दिव्य करत आहोत अशा पवित्र्याने नेटवरील प्रतिक्रिया लिहिली जात असते. मुळात हा पवित्रा तद्दन खोटा, अविचारी व अविवेकी असतो. दुसरे म्हणजे सुरक्षित ठिकाणी बसून काहीही खरडायला फार मोठे बुद्धीकौशल्यही लागत नाही. उपदेशाचे डोज पाजणे, सल्ला देत राहणे, प्रसंगाची चिरफाड करणे, मूळ मुद्दा सोडून कुठल्यातरी क्षुल्लक गोष्टीवर भाष्य करणे यातच ते स्वत:ला धन्य समजतात. त्यामुळे धाग्यावरील चर्चा भरकटत जाते व हाती काही लागत नाही.
अजून एका तज्ञांच्या मते नेटिझन्सच्या या उर्मटवृत्तीला काही अंशी इलेक्ट्रॉनिक माध्यम जबाबदार आहे. टीव्हीसारख्या माध्यमावरील चर्चेत भाग घेणाऱ्यासांठी आपण कसे बोलावे, कसे वागावे याबद्दल कुठलिही आचारसंहिता नाही. चर्चेपूर्वी कुणी तरी जबाबदार व्यक्ती काही ब्रीफिंग देत असेल की नाही याची कल्पना नाही. चर्चेच्या दरम्यान टोमणे मारणे, एकमेकाचे उखाळे पाखाळे काढणे, नको त्या गोष्टी उकरून काढणे, विषयाशी धरून न बोलणे इत्यादी गोष्टी न्यूज व इतर चॅनेल्सवर बघून सवय झालेले नेटिझन्स जेव्हा संधी मिळते तेव्हा झोडपून काढण्याच्या पावित्र्यात असतात. माध्यमं जर जबाबदारीने, संयमितपणे चर्चेचे संयोजन करत असते तर कदाचित नेटिझन्स एवढे आक्रमक झाले नसते.
एक मात्र खरे की इतर कुठल्याही माध्यमापेक्षा इंटरनेटचा वापर यानंतर मोठ्या प्रमाणात होणार आहे, हे मात्र नक्की. त्यामुळे नेटिझन्सच्या विधानांना गंभीरपणे घेण्याकडे कल वाढत जाणार. अशा वेळी काहीतरी पोरकट विधान करून स्वत:चे हसे करून घेण्यात हशील नाही, हे आता नेटिझन्सना कुणी तरी सांगण्याची गरज आहे. नेटवरील चर्चा सुरळितपणे चालावी ही संयोजकांची जबाबदारी असते. चर्चेतून काही तरी निष्पन्न होणे अपेक्षित असते. काही नवीन माहिती, माहितीत भर, नवीन मुद्दे, यामुळे चर्चा रंगू शकते. येथे मात्र त्याचीच उणीव भासत आहे. दुसऱ्या नेटिझन्सचे काहीही ऐकायचे नाही हाच अजेंडा पुढे ठेऊन सर्व जण आक्रमकपणे चर्चेत भाग घेत असतात. आक्रमकतेने एखादा चांगला मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केल्यास वाचकांचे लक्ष मुद्याकडे न जाता आक्रमकतेकडेच जास्त जाते. त्यामुळे जे काही पटवून द्यायचे असते ते बाजूला राहते. व चर्चा भलत्याच ठिकाणी वाहवत जाते.
नेटिझन्सनी टीव्हीसारख्या माध्यमाचा कित्ता गिरवला पाहिजे अशी काही अट नाही. संयमितपणे व विचारपूर्वक केलेले भाष्य चर्चा पुढे नेण्यास मदत करत असते. त्यामुळे ब्लॉग्स व फोरमच्या चालकानी वेळीच दखल घेऊन अशा उर्मट नेटिझन्सना दूर ठेवण्यासाठी काही तंत्रज्ञान विकसित करण्याची वा नियमाची चौकट तयार करण्याची गरज भासत आहे.

pkn.ans@gmail.com