Category Archives: विवेक विचार

ठाम आणि निश्चित भूमिका असणारे लेखन

इंग्रजी राजवटीच्या आगमनानंतर भारतीय समाजजीवन क्रमाक्रमाने बदलू लागले. पऱ्यायाने एकोणिसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकापासून महाराष्ट्रातही बदल सुरू झाले. यातील महत्वाचा बदल म्हणजे भारतीय माणूस मध्ययुगीन सरंजामी मानसिकतेकडून आधुनिकतेकडे येऊ लागला. त्याचे कारणही यंत्रयुगाचे आगमन आणि अर्थव्यवस्थेने घेतलेले भांडवलदारी वळण हे होते. परिणामी आतापर्यंत मूक असणारे समाजघटक जाती घटक मुखर होऊ लागले. ते व्यवस्थेला प्रश्न विचारू लागले. संतांनी जातीमुळे होणाऱ्या कुचंबनेचा निर्देश केला होता. परमेश्वराच्या दृष्टीने कोणी श्रेष्ठ नाही की कोणी कनिष्ठ नाही हे ठासून सांगितले होते. परंतु वास्तव जीवनामध्ये मात्र श्रेष्ठ कनिष्ठ भाव होताच. भगवतभक्त अस्पृश्यांना मंदिरामध्येप्रवेश नव्हताच, ही वस्तुस्थिती होती. साने गुरूजींच्या उपोषणापर्यंत पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश नव्हता. याचा अर्थ संतांच्या कार्याचे काहीच महत्व नाही, असे मात्र नाही.
इंग्रजी राजवटीबरोबर आधुनिकतेचा प्रारंभ झाला आणि भारतीय माणसाचे मध्ययुगीन मानसिकतेतून हळूहळू सुटका होऊ लागली. ते शिकू लागले. विचार करू लागले. मुख्य म्हणजे प्रश्न विचारू लागले. आतापर्यंत कधीही न विचारले गेलेले प्रश्न ते विचारू लागले. विशेषत: जातीच्या उतरंडीबद्दल प्रश्न विचारू लागले आणि ही उतरंड उद्धवस्त केली पाहिजे असे बोलू लागले. असे मध्ययुगात फारसे झाले नव्हते. म.बसवेश्वर यांचा मात्र अपवाद आहे. त्यांनी जी भूमिका तात्विक पातळीवर घेतली ती त्यांनी प्रत्यक्षातही राबविली. या जातींच्या उतरंडीला संरक्षण देणाऱ्या धर्मसंस्थेला प्रश्न विचारू लागले. प्राचीन काळात अवैदिक परंपरेने हे केले होते. हे प्रथमत: घडत होते.
मध्ययुगामध्ये शूद्रातिशूद्र जाती दारिद्र्यामुळे आणि सरंजामी धर्मव्यवस्थेने इतके पिचून गेले होते, की ते धर्मालाच काय, कोणालाच प्रश्न विचारू शकत नव्हते. आता इंग्रजी सत्तेमध्ये ते प्रश्न विचारले जाऊ लागले. म्हणूनच सनातऩ्यांचा आणि देशवासीयांचा सर्वाधिक राग इंग्रजांवर आणि आधुनिकतेवर आहे. म्हणजे आधुनिकतेचे सर्व फायदे आयुष्यात उपभोगायचे आणि मध्ययुगीन मानसिकतेचा देशीवाद सांगायचा अशी ही देशीवाद्यांची रीत आहे. तर मानव मुक्तीचा विचार मांडणारा प्रत्येक माणून आपला शत्रू आहे, असे सनातनी मानतात. सनातनी आणि देशीवादी परस्परांना पूरकच आहेत, कारण सनातन्यांना तात्विक बळ देशीवादी पुरवतात, सनातनी कृती करतात. म.गांधींच्या खुनापासून या कृतीला प्रारंभ झाला.
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर महाराष्ट्रात सनातनी वृत्तीला आव्हान देणे सुरू झाले. बंगालमध्ये थोडे पूर्वी राजा राममोहन रॉय यांच्या रूपात हे झाले होते. लोकहितवादींच्या पाठोपाठ म.फुले यांनी जाती व्यवस्थेतील कठोर शोषण फार तीव्र शब्दात व्यक्त केले. आणि महाराष्ट्रात एक विचार मंथन सुरू झाले. किंबहुना असे विचार मंथन प्रथमत:च होत होते. या विचार मंथनातून सारा देश ढवळून निघाला. महाराष्ट्र ढवळून निघाला. या विचार मंथनाचा आविष्कार जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात दिसायला लागला. शूद्रातिशूद्रांचे आणि स्त्रियांचे शिक्षण सुरू झाले. त्यांच्या गुलामीविरूद्ध हुंकार उमटायला लागला. साहित्याचे क्षेत्र बदलायला लागले. साहित्यक्षेत्रातील पहिला सशक्त बदल अविष्कृत झाला तो निबंध या गद्य लेखनप्रकारातून. किंबहुना 19व्या शतकातील गद्य लेखन-निबंध लेखन हे मराठी साहित्याचे मोठेच वैभव आहे. या निबंध लेखनाचा परिणाम पुढे क्रमाने साहित्याच्या इतर प्रकारांवर होऊ लागला. किंवा असेही म्हणता येईल की परिवर्तनाचा पहिला वहिला आविष्कार निबंधातून झाला आणि नंतरच इतर साहित्य प्रकार बदलू लागले.
एकंदरीत काय की मराठी गद्याची एक समर्थ परंपरा सुरू झाली. अत्यंत बुद्धिमान आणि मूलगामी विचार करणारी मंडळी लेखनाच्या क्षेत्रात आली. अर्थशास्त्र, समाजशास्त्रांपासून धर्मशास्त्रांतील विसंगतीपर्यंत आपापली मते व्यक्त करू लागली. कडी निकडीचे वाद झडू लागले. मत मतांतरे व्यक्त होऊ लागली. त्यातून महाराष्ट्राची वाटचाल मानवतेच्या दिशेने होऊ लागली. ही प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही. ही प्रक्रिया जेव्हा पूर्ण होईल त्या दिवशी महाराष्ट्र आणि आपला देशही सामंती मध्ययुगीन मानसिकतेतून मुक्त होईल. हे घडू नये म्हणून सनातनी आणि देशीवादी देशाचे तोंड पुन्हा एकदा विषमतेच्या दिशेने वळवू पाहात आहेत. असे सगळे घडत असताना त्यांना प्रतिवाद फारसा केला जात नाही. परिणामत: मराठी निबंध क्रमाने निस्तेज होत गेला. मराठी वैचारिक साहित्याची धार बोथट होत गेली. भारतीय स्वातंत्र्यांनंतर तर ते वेगाने घडत गेले. म्हणजे लोकहितवादी-म.फुले यांच्यापासून सुरू झालेले धारदार निबंध लेखन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत येऊन थांबले. यानंतर काही लेखक आहेत, नाही असे नाही. विनोबा भावे, पु.ग.सहस्त्रबुद्धे, श्री.म.माटे, जावडेकर, शरद पाटील, रा.ना.चव्हाण असे काही विचारवंत आणि कृतीशील लेखक आहेत. आणखी काही लेखकांचा निर्देश करता येईल. पण ही यादी फारशी वाढणार नाही. म्हणूनच 1960 नंतर महाराष्ट्राच्या विचारविश्वाला ग्रहण लागले अशी चर्चा सुरू झाली. वाद विवाद थांबले. आज तर महाराष्ट्राच्या विचारविश्वात केवळ बोटावर मोजता येतील एवढेच लोक उरले आहेत. जे निर्भिडपणे आणि ठामपणे जीवनमूल्यांच्या बाजूने बोलणारे आहेत.
स्वातंत्र्यानंतर खरे म्हणजे शिक्षणाचे प्रमाण वाढले. इतर भौतिक सुधारणाही होऊ लागल्या. एका नव्या देशाची घडण व्हावी या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. हे सगळे होताना मात्र विचार विश्वाला वाळवी लागली. खरा प्रश्न असा की, असे का झाले असावे? या प्रश्नाचे नेमके आणि एकच एक उत्तर देणे कठीण आहे. तरीही काही घटनांचा निर्देश करता येईल. स्वातंत्र्य मिळाले आणि म.गांधी यांचा खून झाला. त्यातून देश थोडा सावरतो न सावरतो तोच आणीबाणीसारखी घटना घडली. आणीबाणीमध्ये कार्यकर्ते आणि स्वतंत्र विचार करणाऱ्यांना कैदेत टाकण्यात आले. दमनसत्र सुरू झाले. याचा फायदा घेऊन म.गांधींना मारणाऱ्या शक्ती अधिक उजळ माथ्याने वावरू लागल्या. जनसामर्थ्य धार्मिक भावनेला फुंकर घालून स्थान मिळवू लागल्या. बाबरी मशिदीच्या उद्ध्वस्तीकरणानंतर उसळलेल्या प्रचंड दंगली देशाच्या उरात धडकी भरवून गेल्या. हा प्रवास चालूच आहे, याची खूण म्हणजे दाभोलकर, पानसरे यांचा खून. दरम्यानच्या काळात समदूर हाशमी, शंकर नियोगी, कृष्णा देसाई यासारखे असंख्य कार्यकर्ते संपविण्यात आले. ही यादी आणखीही वाढेल.
असा सगळा भोवतीच्या सामाजिक, राजकीय दहशतवाद असताना या परिस्थितीला येथील बेछूट भांडवलदारी आणि चंगळवादी व्यवस्थेने हातभारच लावला. या व्यवस्थेचा परिणाम असा झाला की, मूठभर लोक संपत्तीधारक झाले, वाटेल तशी चंगळ करू लागले आणि सत्तेपासून शिक्षण, प्रसिद्धी माध्यमांपर्यंत सारेच आपल्या ताब्यातच आले पाहिजे यासाठी धोरणे आखू लागले. मोर्चे बांधणी करू लागले. परिणामत: भारतातील सत्तर टक्के लोकांचे रोजचे उत्पन्न केवळ रू.वीस एवढेच झाले. त्यांना जगण्यासाठी असंख्य कसरती कराव्या लागतात. ग्रामीण भाग तर उद्ध्वस्तच झाला आहे. म्हणजे स्वातंत्र्य प्राप्त झाले तेव्हा सामाजिक आणि आर्थिक विषमता होतीच. ती क्रमाने वाढत गेली. विशेषत: 1990 नंतर तर ती कमालीच वाढली. दलित, शोषितांवरील हल्ले वाढले. त्याची बाजू घेऊन बोलणारे कोणी फारसे उरले नाहीत. कारण साधारणत: ज्यांना आपण मध्यमवर्गीय म्हणतो, ते तीव्र स्पर्धेमध्ये सहभागी झाले. आपले करिअर आणि अंतिमत: अमेरिकेत स्थायिक होणे अशी त्यांची स्वप्ने उरली. त्यांचे समाजाशी काही देणेघेणे उरले नाही. समाजाबद्दल विचार का करायचा असे त्यांना वाटू लागले. शिवाय भोवतीचा सारा माहोल चंगळ करण्यात रमलेला. प्रसिद्धी माध्यमे-कुणाची तरी म्हणजे भांडवलदारांची अगर सत्ताधाऱ्यांच्या मालकीची झालेली. यातून समाजामध्ये एकीकडे तीव्र नैराश्य तर दुसरीकडे स्वयंकेंद्रितता तसेच तुच्छताही विकसित झाली. विचार करणे, विशेषत: समाजाबद्दल विचार करणे वेडेपणाचे लक्षण वाटू लागले. अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये विचार करणारे आणि समाजासाठी विचार करणारे फार थोडे लोक उरले. शरद पाटलांसारखे काही लोक कालवश झाले.
तेव्हा एक प्रश्न उपस्थित होतो की, समाजासाठी व्यापक विचार करणाऱ्या व्यक्तींना कुठलेच संरक्षण उरले नाही. तसेच सहानुभूतीदारही फारसे उरले नाहीत. ते जगण्याच्या स्पर्धेत उतरले. अशा परिस्थितीत व्यापक समाज हिताचा विचार करणारे लेखन कसे विकसित होईल? अर्थात समाजासाठी व्यापक विचार करणाऱ्यांना तसे कधीच संरक्षण नव्हते. म.फुले आणि आगरकर यांना कुठले संरक्षण होते? पण सहानुभुतीदार मात्र होते. अर्थात या दोघांनाही किती यातना सहन कराव्या लागल्या ते पुन्हा सांगण्याची गरज नाही. आज प्रतिकूल परिस्थिती अधिकच वाढलेली दिसते. अशा परिस्थितीत व्यापक सामाजिक हिताचा विचार करण्यासाठी ठाम भूमिका लागते. जातीपुरता विचार करणाण्यांसाठी याची गरज नसते. उलट देशीवादी म्हणून प्रतिष्ठा मिळते. ते निर्भयपणे मांडण्याची हिंमत लागते. वाट्याला विपरितच येणार आहे, याची तयारी ठेवावी लागते. या सगळ्या गोष्टी तर हव्यातच पण निश्चित अशी भूमिका असणे आवश्यक असते. भूमिका नसणारी माणसे केवळ वर्णनाच्या किंवा वृत्तांकनाच्या पातळीवरच थांबत असतात. भूमिका असणारी माणसे त्यापुढे जातात. तर्काधिष्ठित अशी कारणमीमांसा देऊ शकतात. त्यासाठी अर्थातच बौद्धिक सामर्थ्यही हवे असते. याचा अर्थ असा की, कुठल्या तरी विचारांची किंवा तत्वज्ञानाची बैठक तुमच्या व्यक्तिमत्वाला असणे गरजेचे असते. म्हणजे तुम्ही नेमके कोण आहात ते स्पष्टपणे पुढे आले पाहिजे. आणि येथेच लोक घाबरतात. कारण त्यांना काही लाभांपासून त्यांना वंचित व्हावे लागते. किंवा काही धोके पत्करावे लागतात. म्हणजे समर्थ वैचारिक लेखनासाठी ठाम अशी भूमिका हवी असते. ती जाहीर करण्याची तयारीही पाहिजे असते.
मराठी साहित्यातील बहुसंख्य लेखक आणि साहित्यिक आपल्याला अशा भूमिकेची गरजच नाही, असे घोषित करण्यात धन्यता मानतात. याचा अर्थ असा की, अशी निश्चित दृष्टी असणे, भूमिका असणे म्हणजेच ‘अन्वेषण दृष्टी’ असणे गरजेचे असते. आणि त्या आधारे समोरच्या घटितांचा अर्थ लावण्याची तयारी असणेही आवश्यक असते. किंबहुना त्यामुळेच तुमचे लेखन वृत्तांकनाच्या पुढे जात असते. प्रश्नाच्या गाभ्यापर्यंत जात असते. जशी अन्वेषण दृष्टी महत्वाची त्याप्रमाणेच हेतुची स्पष्टताही महत्वाची असते. म्हणजे आपण कशासाठी लिहित आहोत त्याची स्पष्टता निदान वैचारिक लेखन करणाऱ्या लेखकाकडे तरी असलीच पाहिजे. म्हणजे स्वत:साठी लिहितो आहोत की केवळ आपल्या धर्मापुरते लिहितो आहोत की जातीपुरते इत्यादी. असा मर्यादित हेतू वैचारिक स्वरूपाच्या लेखनाला विकसित होऊ देत नाही. त्यासाठी एकूण मानव जात जर लेखकाच्या दृष्टीसमोर असेल तर ते खऱ्या अर्थाने वैचारिक स्वरूपाचे लेखन असते. म्हणूनच म.फुले असोत की, डॉ.आंबेडकर असोत, त्यांनी कधीही कुठल्या जातीच्या विरोधात लिहिले नाही. त्यांनी व्यवस्थेचे विच्छेदन केले, आणि म्हणूनच ते व्यापक झाले. मूलगामी झाले. एकूण मानव जातीचा विचार करणारे झाले.
याचा अर्थ असा की, ज्याच्याजवळ व्यापक समाजहितैषी दृष्टी, भूमिकेचा ठामपणा, त्यानुसारची अन्वेषण दृष्टी असते, त्यालाच वैचारिक स्वरूपाचे लेखन करता येते. शिवाय प्रतिकूल परिस्थितीतही विचार व्यक्त करण्याची निर्भिडताही त्याच्याकडे असली पाहिजे. अर्थात कुठल्याही काळात असे लोक फार थोडेच असतात. चंगळवादी उन्मत भांडवलदारी व्यवस्थेमध्ये त्यांची संख्या खूपच कमी होते.
अतिशय आक्रमक चंगळवादी अर्थव्यवस्थेमुळे समाजातील संघर्ष तीव्र झाले आहेत. त्यामुळे जाती जातींमधील संघर्ष वाढले आहेत. परिणामी सर्वसामान्य लोकांना आपल्या संरक्षणासाठी पुन्हा जातीची कवचे धारण करणे गरजेचे वाटू लागले आहे. म्हणजे आपल्याला जाती नष्ट केल्या पाहिजेत असे वाटते, परंतु व्यवहारात मात्र जाती अधिक घट्ट होत आहेत. कधी काळी जाती आणि व्यवसाय यांचे एक नाते होते. त्यातून शोषणही होत असे. आज यांत्रिकीकरणामुळे आणि समाजात झालेल्या इतर बदलांमुळे हे नाते शिल्लक राहिलेले नाही. तरीही लोक जातींच्या आश्रयाला जात आहेत. आर्थिक अस्थैर्य हे त्याचे कारण आहे. त्यातून जातींच्या संघटनांचा उदय होत आहे. त्यातून जातींचा अभिमानही निर्माण होतो आहे. या अभिमानापोटी अर्थहीन प्रथा परंपरांचेही रक्षण करावे, असे लोकांना वाटत आहे. मौंजी बंधन, जानवे घालणे इ. प्रथांचे समर्थन त्यातूनच होत आहे. बुद्धिवादी दृष्टिकोन आणि परंपरा असा संघर्ष निर्माण झाला आहे. परंतु पारंपरिक मनोवृत्तीचे लोक बुद्धिवादी दृष्टिकोन न स्वीकारता कसे हास्यास्पद वर्तन करीत आहेत.
शोषित जाती शोषणमुक्तीचा एक मार्ग म्हणून जातीच्या छत्राखाली संघटीत होत आहेत, तर उच्चभ्रू जाती आपले वरचे स्थान टिकविण्यासाठी आणि पुन्हा शोषण करण्यासाठी जातींच्या संघटना काढत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. खरा प्रश्न जाती कशा घालवायच्या हाच आहे. त्या दृष्टीने उत्पादन साधनांवरील मालकी बदलणे हा एक महत्वाचा मार्ग सांगितला आहे. आणकी एक मार्ग डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला आहे. आणि तो म्हणजे आंतरजातीय विवाहांचा. हा मार्ग निश्चितच महत्वाचा असला तरी अंतिम मार्ग मात्र नाही.
आज आपल्या देशात आणखी एक प्रयत्न सुरू आहे. आणि तो म्हणजे हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचा. त्यासाठी वेगळी राष्ट्रवादाची संकल्पना तयार करावी लागते आणि तीही प्रक्रिया प्रकट-अप्रकटपणे सुरू आहे. परंपराभिमानी काही म्हणत असले तरी आपला देश स्वातंत्र्यापूर्वी महाराष्ट्र नव्हता ही वस्तुस्थिती आहे. राष्ट्रवादाची जाणीव आपल्या लोकांना एकोणिसाव्या शतकात होऊ लागली. त्यासाठी आधार शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यात प्रामुख्याने दोन प्रकारच्या विचारधारा पुढे आल्या. त्यापैकी एक म्हणजे धर्माधिष्ठित राष्ट्रवादी विचारधारा आणि दुसरी म्हणजे ‘एकमय लोक’ होणे. म.जोतिबा फुले त्यांनी ‘एकमय लोक’ ही अवस्था निर्माण झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माण होणार नाही असे म्हटले होते. भारतीय राज्यघटनेनेही स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्ङ्माय या बाबी केंद्रस्थानी ठेवल्या आहेत. म्हणजे एका अर्थाने ‘एकमय लोक’ व्हावेत अशीच त्यामागे धारणा आहे. परंतु शतकानुशतके धर्माधारे जे शोषण करीत होते, त्यांचा या राष्ट्रवादाला विरोध हवा आहे.
ज्यांना सामाजिक स्थिती गतीचा आणि संघर्षांचा अन्वयार्थ लावायचा असतो, चिंतन करावयाचे असते आणि त्यातून काही मार्ग निघावा असे वाटत असते, त्यांना दोन बाबी कराव्या लागतात. त्यापैकी एक म्हणजे पूर्वपरंपरेतील आपले पूर्वसुरी शोधणे आणि दुसरे म्हणजे परंपरांमधील उदार प्रतिकांचा शोध घेणे. त्यादृष्टीने पंढरपूरचा विठ्ठल हा सर्व जातीजमातींचा देव आहे. वारीच्या निमित्ताने जातीवर मात करण्याची प्रक्रिया घडू शकते, घडते हे त्यांचे म्हणणे मान्य करावेच लागते. शिवाय वारकरी संप्रदायाचे उदारमतवादी तत्वज्ञान प्रकट करणारे विपुल साहित्य आहेच.
परंपरेमध्ये परिवर्तनासाठी उपयुक्त ठरणारी जशी प्रतिके सापडतात, त्याप्रमाणेच पूर्वसुरींपैकी काही महनियांना परिवर्तनवादी आवश्यक असणारी कृती केलेली असते. तसेच काही चिंतनही केलेले असते. म्हणजे त्यांनी काही पाऊलवाटही आखलेली असते. या दृष्टीने म.फुले, रा.शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी केलेले कार्य आणि चिंतन अतिशय मूलगामी आहे. किंबहुना परिवर्तनाच्या चळवळींची बैठकच तयार झालेली आहे,
समता प्रस्थापन आणि त्यासाठीचा संघर्ष केंद्रवर्ती सूत्र आहे. जात, धर्म, धर्माधिष्ठीत राष्ट्रवाद, जातीयवादी संघटना इ.साऱ्याच गोष्टी समता निर्माण होऊ देत नाहीत. बंधुतेच्या त्या अडसर होत. म्हणूनच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य प्राप्त झाले असे होत नाही. अंधश्रद्धाही समता निर्मितीच्या आड होणारीच गोष्ट आहे. कारण पुष्कळदा अंधश्रद्धांच्या आडून शोषण केले जाते. शिवाय माणसाला अंधश्रद्धा दुबळ्या बनवतात. बुद्धीचा वापर करू देत नाहीत. तसेच अंधश्रद्धांचा संबंध धर्माशी जोडून त्यांना संरक्षण मिळविले जाते आणि प्रश्न अधिकच गुंतागुंतीचे बनत जातात. या सगळ्यांमधून मार्ग काढण्यासाठी अंधश्रद्धा दूर करणे एवढाच उपाय शिल्लक राहतो. त्यासाठी डॉ.नरेंद्र दाभोलकरांनी आयुष्य वाहिले. शेवटी सनातन्यांनी त्यांना संपविलेच.

साभारः सुभाष थोरात यांच्या ‘वर्तमानाची बखर’
या आगामी पुस्तकासाठीच्या प्रस्तावनेचा संपादित भाग

विवेकवाद विकसित करण्यासाठी…

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या होण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी भारतीय विवेकवादाचं मुख्य स्वरूप सातत्यानं लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी संकुचित भूमिका घेतली म्हणून दुसऱ्या संकुचितांनी त्यांच्यावर हल्ला केला असं अजिबात नाही. त्यांनी व्यापक भूमिका घेतली. ती सहन न झाल्यामुळे जी संकुचित विचारांची मंडळी आहेत, त्यांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे भारतीय विवेकवादाचं व्यापक स्वरूप लक्षात घेताना याची उभी विभागणी करण्याची जी पद्धत आहे, ती मुळातून तपासली पाहिजे. उभ्या विभागणीत विवेकवादी एकीकडे आणि अविवेवकवादी दुसरीकडे किंवा अमूक एक परंपरा एकीकडे आणि दुसरी परंपरा दुसरीकडे अशी विभागणी केली जाते. त्यातून प्रतिगामी किंवा संकुचित विचार बळकट होण्याला बळ मिळत जातं. भिंत उभारण्याचा कार्यक्रम हा अर्थातच संकुचित मंडळींचा असतो. त्यामुळे आपण भारतीय विवेकवादाचं मुळातलं व्यापक स्वरूप काय आहे, विवेक आणि अविवेक यांच्यात सतत चाललेला संघर्ष व देवघेव याचं स्वरूप काय आहे हे बघायला पाहिजे.
दोन-तीन उदाहरणं पाहू. पहिलं म्हणजे भारतीय विवेकवादाला केवळ भारतीयच नव्हे तर जागतिक आयामसुद्धा आहे. अजित केशकंबल किंवा गौतम बुद्ध आपलं तत्त्वज्ञान मांडत होते, त्याच्याआधीपासून ग्रीक आणि भारतीय समाज, चिनी आणि भारतीय समाज, यांच्यात सातत्याने देवघेव होती. ती जशी वस्तूंच्या पातळीवरची होती, तशीच मिथ्यकथा, पुराणकथा, तत्त्वज्ञानं आणि सांस्कृतिक बाबी अशा सर्व प्रकारची देवघेव होती. ग्रीकांकडून भारतीयांनी फलज्योतिष्य आणि मूर्तीकला घेतली. दुसऱ्या बाजूला भारतीय तत्त्वज्ञानातून काही ग्रीकांकडे जाणं आणि ग्रीकांकडून अणुवादासारखं तत्त्वज्ञान भारतात येणं अशा काही गोष्टी घडलेल्या दिसतात. विज्ञानातही पायाभूत तत्त्वंविज्ञान आणि विवेकवाद, विज्ञान आणि संस्कृती, विवेक आणि भावना, या सगळ्यांना एकत्र आणणं आणि त्यांची फारकत करणं, या दोन्ही गोष्टी आधुनिक काळात मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या.
विज्ञान हे मूल्यनिरपेक्ष, त्याला विवेक असेलच असं नाही. ते भावना निरपेक्ष. विवेक हा मूल्यांचा, तत्त्वांचा विचार करणारा भाग मानणं आणि मानवी भावना कला-संस्कृतीचा भाग मानणं. मग म्हणायचं की, भावनेपेक्षा विवेकाला महत्त्व दिलं पाहिजे. विज्ञानाला आपण विवेकाची जोड देऊ या. ही एक मोठी समस्या आहे. याचं कारण आधुनिक काळात युरोपात विज्ञान आलं, त्याच्याशी जोडून विवेकवाद आला, त्याची पहिली लढाई ख्रिश्चन धर्माबरोबर, चर्चबरोबर होती. मुळात विज्ञानाचा पहिला उगम चर्चच्या पोटातून झालेला आहे. त्यामुळे त्यांना नंतर असं सांगावं लागलं की, विज्ञान हे स्वायत्त आहे. ते धर्मनिरपेक्ष आहे असं म्हणणं शक्य नव्हतं. हीच संकल्पना नंतर भांडवली विकासाला पोषक ठरली. भांडवलशाहीला न-नैतिक गोष्टीच हव्या असतात. खरं म्हणजे विज्ञानात असं असू शकत नाही. गेल्या दोनशे-अडीचशे वर्षांत आणि विशेषत: विसाव्या शतकातल्या आधुनिक विज्ञानाचा प्रवास बघितला, तर निसर्गविज्ञानातसुद्धा पायाभूत तत्त्व म्हणून तत्त्वज्ञानात्मक आणि मूल्यांच्या गोष्टी दडलेल्या दिसतात. त्या उकरून बाहेर काढाव्या लागतात. हे लक्षात घेतलं तर विज्ञानाची संकल्पना, वैज्ञानिक दृष्टिकोनाची संकल्पना आणि विवेकाची संकल्पना आजच्या युगात रि-डिफाइन करायची गरज निर्माण होते. या तिन्हींच्या पोटात मानवी भावभावना, मूल्य, या समग्र दृष्टिकोनावर आपण भर देण्याची गरज आहे. त्यावर जगभर प्रयत्न सुरू आहेत. भारतीय परंपरेतसुद्धा ही समग्रपणे विचार करण्याची धडपड आपल्याला दिसत आलेली आहे. अर्थात त्यातही विवेकानं, विज्ञानिक दृष्टिकोनातून पाहावं लागतं. कारण त्यात गूढवाद, जातिव्यवस्था, पुरुषप्रधानता या गोष्टी मिसळलेल्या असतात. त्यामुळे समग्रता पकडत असताना विज्ञानाचा विवेकावर आणि विवेकाचा विज्ञानावर आणि संस्कृतीचा विज्ञान-विवेकावर आणि त्यांचा संस्कृतींवर असा सतत दबाव संघर्ष आणि देवघेव होत असते. त्यातून सर्जनशील गोष्ट पुढे येऊ शकते, हे लक्षात घेण्याची गरज आज आहे. नाहीतर आपण कप्प्यांत अडकतो आणि नकारात्मक भूमिका घेतो.
चिंतनाचा आणि कामाचा भागसंस्कृती नावाची जी गोष्ट असते, त्यातल्या बारकाव्यात जाण्याची आता गरज निर्माण झालेली आहे. ती वास्तवात आपण करतो आहोत, पण वैचारिक पातळीवरही नीट करायला पाहिजे. भारतीय उत्सवांमध्ये वेगवेगळे पैलू आहेत. एक आहे- माणसांची उत्सवप्रियता, दुसरा- कृषी आणि उत्पादन चक्राशी संबंधित भौतिक भाग, तिसरा- कर्मकांडं व श्रद्धा, चौथा- लोकांना लागणारी सर्जनशील आणि आनंदाची आऊटलेट्स. या गोष्टींमुळे उत्सवांबाबत सरधोपट भूमिका न घेता, त्या उत्सवातला जेवढा गूढवादी, संकुचित, अविवेकी भाग कसा बाजूला होईल किंवा विवेकी पर्याय कसे उभे होतील यातलं काहीतरी आपल्याला करावं लागेल. त्यामुळे तो सगळा भाग हा आपल्या आस्थेचा, चिंतनाचा आणि कामाचा भाग असला पाहिजे. उदा. अंनिसने होळी आणि पोळीच्या संदर्भात किंवा गणपती विसर्जनाबाबत घेतलेली भूमिका. भारत ज्ञान-विज्ञानने २००१मध्ये फटाके नको, पुस्तके हवी अशी भूमिका घेतली होती. उत्सवातला चुकीचा, अनावश्यक, प्रदूषणकारी, अविवेकी भाग बाजूला कसा होईल आणि उरलेला भाग लोक एन्जॉय कसा करू शकतील हे पाहावं लागेल.
थोडक्यात तर-तम करणं, बारकारईने पाहणं आणि खोलात जाणं. विवेक-अविवेकाची जी ढोबळ घोषणावजा विभागणी केली जाते, त्याच्यापलीकडे जाण्याची गरज आहे. धर्माकडे पाहण्याची नवी दृष्टी हवीमहात्मा फुले, न्या. रानडे, महात्मा गांधी, वि.रा.शिंदे, बाबासाहेब आंबेडकर, पं. नेहरू, भगतसिंग या सगळ्या मंडळींनी धर्माबाबत जी भूमिका घेतली आहे, तीसुद्धा बारकाईने पाहण्याची गरज आहे. भारतात धर्मांध, अविवेकी धर्मवादी आणि धर्मनिरपेक्ष अशी नुसती उभी फूट करणं हे पुरेसं विवेकी, वैज्ञानिक नाही. सामाजिक-सांस्कृतिक जीवनात व्यापक स्तरावर बघत असताना या दोन्ही विभागण्यांच्या पलीकडे जाण्याची गरज आहे.
धर्माबाबत चार-पाच भाग करता येतील.पहिल्या प्रवाहातली माणसं धार्मिक वा धर्मश्रद्ध आहेत किंवा गांधीजी म्हणतात त्या अर्थाने सनातनी आहेत. (अर्थात सनातन प्रभात छाप नव्हे). ही जुनी, प्राचीन, सनातनी मूल्य मानतात. ही धार्मिक पुनरुज्जीवनवादी आहेत. दुसऱ्या प्रवाहात धर्मसुधारक, नवधर्मप्रणेते आहेत. मग तो महात्मा फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म असेल वा बाबासाहेबांचा नवबौद्ध धर्म असेल. आज ते भारतात मोठ्या प्रमाणावर नाही, पण उद्या ते भारतात येणारच नाही असं म्हणता येत नाही, ते म्हणजे लिबरेशन थिऑलॉजी. ती लॅटिन-अमेरिकेत आहे. पोप फ्रान्सिस त्या भाषेत थोडे थोडे बोलतात. म्हणजे धर्म आधाराला घेऊन मुक्ती करणं किंवा संघर्ष करणं किंवा समाज बदलणं.तिसऱ्या प्रवाहात, धर्मनिरपेक्ष, निधर्मी, नास्तिक किंवा धर्मातीत मानवतावादी आहेत… जे केवळ नास्तिक होऊन थांबत नाहीत. ते म्हणतात, धर्माने दिलेली जी मूल्ये आहेत त्याला उच्चस्तरावर नेणारे आम्ही मानवतावादी आहोत. चौथा प्रवाह आहे, धर्मांध, धार्मिक दहशतवादी, धर्मवेडे, धार्मिक अतिरेकी यांचा. या प्रवाहातले जे नेतृत्व आणि गड्डे आहेत, त्यांच्याबद्दल अत्यंत परखड स्पष्ट भूमिका घेणं अत्यावश्यक आहे. पण या प्रवाहातली अनेक मंडळी अशी आहेत की, त्यांच्यातला विवेक जागा करण्याची गरज आहे. त्यांच्याशी नातं कसं जोडणार हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. उदा. परवा मुंबईत इसिसकडे जाणाऱ्या चार मुलांना पोलिसांनी पकडलं.
कुठल्याही धर्मातल्या अतिरेकी संघटनांकडे वळणाऱ्या माणसांशी संवाद करणं आणि विवेकातून त्यांना बदलायचा प्रयत्न करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ती केवळ हिंसेला हिंसा वा शस्त्रबळाच्या जोरावर होणारी गोष्ट नाही. एवीतेवी पोलिस गुन्हेगारांना फारसं पकडू शकत नाहीत. पानसरे-दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना तर ते पकडूच शकलेले नाहीत. तेव्हा पोलिसांनी अशा वाट चुकलेल्यांशी विवेकी संवाद करून त्यांना धर्मांध मार्गापासून परावृत्त करावं. मला असं वाटतं की, एका प्रगत समाजात पोलिसांचं काम केवळ लॉ अँड ऑर्डर चं नसून समुपदेशन आणि संवादाचंही असतं. अर्थात हा सामाजिक संघटनांच्या समोरचाही प्रश्न आहे.
सुरुवातीचे जे तिन्ही प्रवाह आहेत, त्यात प्रचंड जागा आहे. कोट्यवधी लोक त्या प्रवाहांच्या कुठल्या ना कुठल्या छटेमध्ये वावरत आहेत. त्यांच्याशी सतत नातं जोडणं आणि त्यांना तर-तम करायला शिकवणं, धर्माच्या पोटातसुद्धा विवेकाकडे जाणाऱ्या जागा कोणत्या आहेत, हे काम करणाऱ्या ज्या सगळ्या चळवळी, संस्था, संघटना असू शकतात ते आपले दोस्त कसे बनतील, ते अधिकाधिक धर्मनिरपेक्षतेकडे आणि विवेकवादाकडे कशी वाटचाल करतील हा आपला सततचा कार्यक्रम असला पाहिजे. आज वाईट परिस्थिती असताना स्वप्नं पाहावीत की नाहीत असा अनेकांना प्रश्न पडतो. प्रत्येकाजवळचं छोटं स्वप्न आणि कष्टकरी वर्गाचं, आम जनतेचं, देशाचं असं मोठं स्वप्न तयार होणं आणि ते वैज्ञानिक, विवेकी दृष्टिकोनाच्या आधारे प्रत्यक्षात आणण्याची धडपड करणं असा एक प्रदीर्घ कालखंड येऊ घातलेला आहे. त्यामध्ये विवेक विकसित होऊ शकेल, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होईल. आपली संस्कृतीही विकसित होईल… आणि आपली स्वप्नं प्रत्यक्षात येतील.

dattakdesai@gmail.com

‘अस्तित्त्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे’

आपल्या भोवतालची संपूर्ण सजीवसृष्टी “आहार, निद्रा, भय मैथुनं च” या चार प्राथमिक प्रेरणांच्या चौकटीत वावरत असते. मानवही त्याला अपवाद नाही. परंतु त्या चौकटीबाहेर पाऊल टाकून आजूबाजूच्या सृष्टीची ओळख करून घेणे विकसनशील बुद्धी असलेल्या मानवालाच जमले आहे. सर्व सृष्टीची माहिती करून घेण्याच्या उत्सुकतेपोटी त्याने अनेक ज्ञानशाखा विकसित केल्या. प्रत्येक शाखा वेगवेगळ्या विषयांचा वेध घेण्याचा प्रयत्‍न करीत असते. अशाच एका ज्ञानशाखेने विषय निवडला, “सजीवांची निर्मिती आणि विकास.” सजीवांच्या उत्पत्तीविषयींचे कुतूहल माणसाला फार प्राचीन काळापासून वाटत आले आहे. अनेक संस्कृतींनी , तत्त्ववेत्त्यांनी, धर्मग्रंथांनी ह्या विषयाचा वेध घेणाचा प्रयत्‍न केला आहे. पण केवळ कल्पनेशिवाय अन्य कोणतेही साधन जवळ नसल्यामुळे त्यांच्या हाती कांही लागले नाही. एक प्रकारची गोंधळाची स्थिती सर्व वैचारिक जगतात होती.
परंतु 1859 साली चार्ल्स डार्विनचा ” दि ओरिजिन ऑफ स्पीसीज” हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आणि सर्वच स्थिती पालटून गेली. नैसर्गिक निवडीच्या आधाराने सर्व सजीवांची उत्क्रांती झाली आहे असा सिद्धान्त डार्विनने मांडला. या सिद्धांताचा पुढे अनेक शास्त्रज्ञांनी सखोल व सप्रयोग अभ्यास करून विस्तार केला. अनेक ग्रंथ जगाच्या सर्वच भाषांतून ह्या विषयावर प्रसिद्ध झाले. मराठीतही बरीच पुस्तके ह्या बाबतीत उपलब्ध आहेत. त्यांतच अलीकडे एका सुंदर पुस्तकाची भर पडली आहे.”गोफ जन्मांतरीचे (अस्तित्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे).” हेच ते पुस्तक. लेखिका आहेत कराडच्या डॉ.सुलभा ब्रह्मनाळकर. विषयाचा सखोल अभ्यास करून, अनेक ग्रंथांचे परिशीलन करून व त्यांना आपल्या तर्कशुद्ध चिंतनाची जोड देऊन डॉ. ब्रह्मनाळकरांनी एक देखणे पुस्तक वाचकांच्या हाती दिले आहे.
अगदी प्रस्तावनेपासूनच पुस्तक वाचकाच्या मनाची पकड घेते. पारंपरिक दृष्टिकोन सोडून जगाकडे पाहण्याचा एक वेगळा परंतु सत्यनिष्ठ दृष्टिकोनही असू शकतो हे प्रस्तावनेमधून वाचकाच्या मनावर ठसायला सुरवात होते.
पुस्तकाच्या सुरवातील डार्विनविषयी वैयक्तिक माहिती, त्याचा जगप्रवास, त्याने केलेला सजीवांचा अभ्यास व मांडलेला सिद्धांत, डार्विनचे समकालीन तसेच त्याच्यानंतर झालेले शास्त्रज्ञ, त्यांनी मांडलेल्या उपपत्ती आणि सिद्धांताचा केलेला विस्तार इत्यादि सर्व गोष्टींचे थोडक्यात पण सर्वस्पर्शी विवेचन लेखिकेने केले आहे. त्याच बरोबर एकाच आदिपूर्वजापासून ते थेट आजच्या मानवापर्यंत सजीवांची उत्क्रांती कशी होत गेली, जीवसृष्टीच्या वंशवृक्षाला वेगवेगळ्या फांद्या कशा फुटत गेल्या, नैसर्गिक निवडीच्या चाळणीतून टिकून राहिलेल्या सजीवांच्या निरनिरळ्या जाती, प्रजाती कशा निर्माण झाल्या याचे सुंदर , सचित्र वर्णन लेखिका करतात.
सूक्ष्मदर्शकासारख्या आधुनिक उपकरणांच्या अभावी डार्विनच्या काळात अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नांची नंतरच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली उत्तरे नेटक्या पद्धतीने लेखिकेने मांडली आहेत. आर्.एन्.ए., डी.एन्.ए., गुणसूत्रे (क्रोमोसोम्स), जनुके(जीन्स), जिनोम आदि पारिभाषिक संज्ञांचे अर्थ उत्कृष्टपणे समजावून सांगितले आहेत. क्रीक-वॅटसन ह्या शास्त्रज्ञांच्या शोधांमध्ये आनुवंशिकतेच्या कणांच्या रेण्वीय रचनेचा अंतर्भाव आहे. तर नीरेन्बर्ग-खुराणांना पेशींमध्ये असलेल्या गुणसूत्रांमधील माहितीचा माग लागला. ह्या गुणसूत्रांमध्येच सजीवाचा संपूर्ण इतिहास दडलेला असतो असे आढळून आले. ह्या इतिहासावर म्हणजेच “जिनोम” वर पुस्तकाचे रूपक कल्पून लेखिकेने ते आपल्या ग्रंथात सर्वदूर खेळविले आहे. त्यामुळे विषय समजणे वाचकांसाठी फारच सोपे झाले आहे. आपल्या नेहमीच्या पुस्तकात ज्याप्रमाणे प्रकरणे, परिच्छेद, वाक्यें, शब्द, अक्षरे असतात तशीच याही पुस्तकात आहेत. फक्त त्यांची भाषा सांकेतिक असते. ही जनुकांची भाषा आहे. अनेक शास्त्रज्ञांनी मोठ्या परिश्रमांनी ह्या संकेतांची उकल करण्यात यश मिळविले. ही उकल होऊन पुस्तकाचे “वाचन ” होताच अलीबाबाच्या गुहेचे दार उघडल्यासारखे झाले. सजीवसृष्टीच्या उत्क्रांतीचा संपूर्ण इतिहास दृष्टिक्षेपात आला. पृथ्वीवरील अणुरेणु आणि त्यांची जोडणी करणारे भौतिक नियम हेच या पुस्तकाचे “लेखक” आहेत. व त्यांतील आज्ञावलींना अनुसरूनच सर्व सृष्टीचे व्यवहार चालतात. अन्य कुणाकडेही सृष्टीचे कर्तृत्व आणि चालकत्व जात नाही. असे डॉ.ब्रह्मनाळकर निक्षून सांगतात. पटवूनही देतात. ह्याच नियमांनुसार डी.एन्. ए. व प्रथिने यांचे रूपांतर सजीवांच्या शरीरात होते असे त्या वैज्ञानिक प्रयोगांचे संदर्भ देऊन सांगतात.
उत्क्रांतीच्या इतिहासाचे फारच मनोज्ञ वर्णन लेखिकेने केले आहे.”ल्यूका” (लास्ट युनिव्हर्सल कॉमन अ‍ॅन्सेस्टर) ते माणूस हा प्रवास कसा झाला हे त्यांनी सुबोध पद्धतीने स्पष्ट करून दाखविले आहे. नैसर्गिक निवडीचे तत्त्व सर्व सजीवांना लागू असून त्याला अनुसरूनच सजीवसृष्टी उत्क्रान्त झाली. ह्या ’चाळणी’तून निवडले गेलेले सजीवच टिकून राहातात. जे निवडले जात नाहीत त्यांच्या जाती-प्रजाती नष्ट होतात याविषयीं असंख्य दाखले लेखिकेने दिले आहेत. प्रत्येक प्रजाती जीवनकलहात टिकून राहण्यासाठी धडपडत असते. ही धडपड, हा संघर्षच उत्क्रांतीचा गाभा आहे. हे अधिक स्पष्ट करून दाखविण्यासाठी लेखिकेने जणू आपले बोट धरून उण्या-पुर्‍या साडेतीन अब्ज वर्षांचा प्रवास घडवला आहे. सामान्यत: आपण “स्थळां”चा प्रवास करतो. लेखिका आपल्याला “काळा” तून घेऊन चालतात. एच्. जी. वेल्स ह्यांनी संकल्पिलेल्या “कालयंत्रा (टाईम मशीन) मधून जात असल्याचा भास होतो. “वाटे”मध्ये विविध जाती-प्रजाती कशा उद्भवल्या व उत्क्रांत झाल्या ह्याचे त्यांनी काही प्रातिनिधिक उदाहरणे देऊन मनोहारी दर्शन घडविले आहे. चाळणीत अडकून पडल्यामुळे पुढे सरकू न शकलेल्या दुर्दैवी प्रजातींचे त्यांनी कारणे दाखवून उल्लेख केले आहेत. एकंदरीत हा प्रवास करीत असताना एखादा अद्भुतरम्य चित्रपट पाहात असल्यासारखे वाटते.
उत्क्रांती एकाएकी एका रात्रीतून घडत नसते. ती एक अतिशय संथपणे घडत जाणारी प्रक्रिया आहे. ज्याप्रमाणे आपण एका उडीत पर्वताचे शिखर गाठू शकत नाही; परंतु तेच एकएक पाऊल पुढे टाकीत, हळूहळू ,चढत गेलो तर शिखरापर्यंत पोचू शकतो हे चपखल उदाहरण देऊन उत्क्रांती ही साठत-साठत जाणारी गोष्ट आहे हे लेखिका सहज पटवून देतात. “ह्या सर्व गोष्टी हळू हळू एक एक पायरीने होत होत हजारो पिढ्यांमध्ये घडल्या” असे सांगतात. “पण घाई कोणाला आहे?” असे काहीसे मिष्कील पण वास्तव असे प्रश्नरूप विधान सुलभाताई करतात. आणि लगेच, “न संपणारा काळाचा पट्टा हे उत्क्रांतीचे बलस्थान आहे.” असे सुभाषितवजा वाक्यही टाकतात.
संपूर्णपणे निसर्गाच्या आज्ञेप्रमाणे होत असलेली उत्क्रांती ही एक हेतुशून्य प्रक्रिया आहे. तिला कोणताही उद्देश नाही, ठरलेले असे गंतव्य नाही. निसर्गावर कोणत्याही भाव भावनांचे आरोप करता येत नाहीत. तो नुसता असतो. तो सुष्ट नाही की दुष्ट नाही, सुरूप नाही वा कुरूप नाही, कनवाळू नाही किंवा क्रूर नाही, त्याला कोणीही कर्ता, चालक वा नियंता नाही हे लेखिका आवर्जून सांगतात.
“मानवी जगा”विषयी चर्चा करण्यासाठी लेखिकेने एक स्वतंत्र विभाग ग्रंथाला जोडला आहे. मानवाचे या सृष्टीतील वैशिष्ट्यपूर्ण स्थान मान्य करूनच त्या ही चर्चा करतात. अर्थात ती करतानाही त्यांनी विज्ञानाचा पदर सोडलेला नाही. उत्क्रांतीच्या मूळ तत्त्वांशी असलेली नाळ तुटू दिलेली नाही. विज्ञानाच्या मध्यवर्ती धाग्याभोवतीच तर त्यांनी हा संपूर्ण गोफ गुंफला आहे. ह्या अथांग कालप्रवाहात उत्क्रांतीच्या तत्त्वाच्या काडीचा आधार घेत वाहात आलेल्या या द्विपादाचे महत्त्वाचे बलस्थान म्हणजे त्याचे भावविश्व.
माणसाचे मन हे परस्पर भिन्न (आणि कित्येकदा तर परस्परविरुद्धही) अशा अनेक भावभावनांची गुंफण आहे. राग, लोभ, दया, करुणा, वात्सल्य, हेवा, मत्सर, सहानुभूती, प्रेम, सहिष्णुता, कृतज्ञता, कृतघ्‍नता, क्रौर्य, आदि किती तरी विकारांनी मानवी मनाचा आश्रय घेतलेला असतो. उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर माणसाला कधीतरी अशा विकारांचा फायदा झाला असावा. आणि म्हणूनच त्या त्या भावना निर्माण करणार्‍या जोडण्या मेंदूत होऊन त्यांच्यात स्रवणारी रसायने उत्क्रांत झाली असावीत. ह्या भावनांना चांगले , वाईट अशी विशेषणे आपण लावतो. निसर्गात त्या फक्त “वृत्ती” असतात. काहींना सद्गुण तर काहीना दुर्गुण ठरविले जाते ते आपल्या त्याविषयींच्या प्रतिक्रियांवरून. ह्या प्रतिक्रियांमधून माणसाचे विचारविश्व विस्तारले. ह्या विस्ताराचेच नाव “संस्कृती”.
माणूस हा “माणूस” म्हणून उत्क्रांत होण्यापूर्वी “स्वार्थ” हाच सर्व सजीव सृष्टीचा पाया होता. (मानवेतर सृष्टीत तो अजूनही तसाच आहे.) परंतु कुठल्यातरी टप्प्यावर स्वार्थाबरोबरच परार्थसुद्धा प्रजाती टिकून राहाण्यासाठी फायद्याचा ठरतो हे उमगले. आणि परार्थ माणसाच्या जीवनात स्थिर झाला. अर्थात स्वार्थ पूर्णपणे सुटला नाही. एका परीने परार्थातही स्वार्थाचा भाग असतोच. ह्यामुळे एक पेच उभा राहिला. माणसाला “दुहेरी अस्तिवाला ” सामोरे जावे लागले. एक स्वत:साठी आणि एक समाजासाठी. एकीकडे तो “स्वतंत्र जीव” आहे. तर दुसरीकडे “समाजाचा घटक” आहे. त्यात त्याच्या भावविश्वाची ओढाताण होते आहे. स्वत:च्या तसेच आपल्या कुटुंबाच्या हिताची चिंता वाहात असतानाच तो समाजाच्या कल्याणाचीही सोय पाहात असतो. समाजासाठी रामराज्य आणण्याचे, महामानव बनण्याचे स्वप्न तो पाहातो आहे. ते पूर्ण होण्यासाठी संस्कृतीच्या प्रवासात विकसित झालेली जीवनमूल्ये टिकून राहणे आवश्यक आहे. कारण ती दिशादर्शकाचे दीपस्तंभ म्हणून कार्य करतात, असा लेखिकेचा निष्कर्ष आहे आणि त्यासाठी त्या “नेचर ” आणि “नर्चर” अशा दोन्हीची आवश्यकता अधोरेखित करतात.
माणसाला हे शक्य आहे. कारण त्याला निसर्गविज्ञानाचा आधार आहे. ह्या आधाराचे मूळ मेंदूत आहे. सजीवाच्या मेंदूवर जनुकांच्या आज्ञावलींचे नियंत्रण असते. परंतु मानवी मेंदू इतर सजीवांप्रमाणे केवळ प्राथमिक अवस्थेत रेंगाळला नाही. त्याच्यात लवचिकता आहे.त्यामुळे तो विकसनशील बनला आहे. त्याच्या ठिकाणी संस्कारक्षमता आली आहे. तो स्वतंत्रपणे विचार करू शकतो. परंतु मेंदूच्या या स्वातंत्र्याचा उपयोग एका मर्यादेतच केला जातो. कारण माणूस हा समाजाचा घटक असतो. ’स्व’ तंत्राने वागण्यापेक्षा ’समाज’ तंत्राने वागणे त्याला सोयीचे व सुरक्षिततेचे वाटत असते. कधीकाळी उत्क्रांतीच्या प्रवासात फायद्याची ठरलेली “टोळीची मानसिकता ” माणसाच्या मेंदूत पक्की रुजली आहे. त्यामुळे लहानपणी मनावर झालेले संस्कार, त्यांतून रूढ झालेल्या समजुती, श्रद्धा, अंधश्रद्धा दृढ होत जातात. घट्टपणे धरून ठेवलेल्या ह्या खुंट्या सोडणे कठीण होऊन बसते. परंतु माणसाच्या स्वातंत्र्याला पडणार्‍या या सांस्कृतिक मर्यादा ओलांडण्याची क्षमताही ह्या मेंदूत आहे. तिचे नाव “विवेक प्रज्ञा “(रीझन).
गेल्या कांही लाख वर्षांत विकसनशील मेंदूत कांही गुंतागुंतीची चक्रे उत्क्रांत झाली आहेत. त्यांतूनच या विवेकप्रज्ञेची प्राप्ती झाली आहे. ही प्रज्ञा मानवाला ’योग्य-अयोग्या’ चा विचार करण्यासाठी मार्दर्शन करते. ज्ञानाचा निकष लावून त्याप्रमाणे कृती करण्याचा आदेश देते. चुकीच्या समजुती, अंधश्रद्धा, जुन्या रूढी यांच्यावर मात करण्याचे बळ देते. थोडक्यात ही विवेकप्रज्ञासुद्धा नैसर्गिकपणे उत्क्रांत झाली असून पूर्णपणे विज्ञानसिद्ध आहे. हे सुलभाताई मोठ्या खुबीने वाचकांना समजावून देतात. “एखाद्या तत्त्वाची, व्यक्तिविरहित चिकित्सा करण्याची क्षमता ही मानवी बुद्धीची फार मोठी झेप आहे.” हे ह्या प्रज्ञेच्या संदर्भात केलेले विधान लेखिकेच्या प्रतिभेचीही झेप दर्शविते.
ग्रंथामध्ये लेखिकेने आपल्या विषयाची अगदी सांगोपांग विस्तृत चर्चा केली आहे. ती करण्याच्या ओघात त्यांनी निसर्गाचे महत्त्व विशद केले आहे. ह्या सृष्टीचा कोणी कर्ता-करविता नाही,कोणी चालक वा नियंता नाही सर्व व्यापार विज्ञानाच्या नियमांनुसार होतात. त्यामुळे ईश्वराचे अस्तित्व, त्याचे सर्वशक्तिमत्व, तसेच व्रत-वैकल्ये , सक्षात्कार, गूढात बोट दाखवून केलेले भविष्यकथन, अंतर्ज्ञान, चमत्कार आदि समजुती निरर्थक असून त्यांना कोणताही शास्त्रीय आधार नाही हे त्या सहजपणे पण निश्चितपणे नमूद करतात. मुख्य म्हणजे त्यात कुठलाही अभिनिवेश नाही. त्यांनी केलेल्या व्यासंगपूर्ण विवेचनाचा तो अगदी सहज, स्वाभाविक निष्कर्ष आहे.
पुस्तकाची भाषा सुबोध आणि रसाळ तर आहेच, शिवाय त्यात लालित्य आहे. लाघव आहे. विज्ञानासारखा काहीसा गद्य विषय सुलभाताईंनी अतिशय प्रसन्न आणि खेळकर पद्धतीने हाताळला आहे. (हे दोन गुण बहुधा लेखिकेच्या व्यक्तिमत्वातच असावेत.) लेखनशैली इतकी वेधक आणि बोलकी आहे की जणु काही लेखिका आपल्या समोर बसून विषय समजावून सांगत आहेत असा सारखा भास होतो. उद्बोधन, प्रबोधन आणि रंजन अशा तीनही गोष्टी सहज साध्य झाल्या आहेत. सहज लक्ष वेधून घेईल असे सुंदर मुखपृष्ठ आणि सुबक छपाई ह्या आणखी दोन जमेच्या बाजू.
थोडक्यात हे एक अप्रतिम पुस्तक असून विज्ञानाची आवड असलेल्या (आणि नसलेल्यासुद्धा) सुशिक्षित वाचकांनी आवर्जून वाचावे अशी शिफारस करणे अनाठायी होणार नाही. अल्पावधीत पुस्तकाच्या चार आवृत्या निघाल्या हे त्याच्या यशस्वितेचे गमक ठरावे. वाचकप्रियतेचेही.
गोफ जन्मांतरीचे
डॉ.सुलभा ब्रह्मनाळकर,
राजहंस प्रकाशन, पुणे.
पृ.सं. 346, किं रु 300

bhalchandra.kalikar@gmail.com