अध्यात्म की विज्ञान

आधुनिक विज्ञान हे अध्यात्माच्या जवळ चालले आहे असे मत अनेक वेळा प्रदर्शित करण्यात येते; अशा अर्थाची काही पुस्तकेही प्रसिद्ध झाली असून काही पाश्चात्त्य वैज्ञानिकांनीही या विधानाचे समर्थन केले आहे. परंतु खरोखर अशी वस्तुस्थिती आहे काय याविषयी आज विचार करणे आवश्यक झाले आहे.
अध्यात्मातील काही संकल्पना :अध्यात्म म्हणजे आत्म्याचा शोध! त्याचे प्रयोजन म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांचे तादात्म्य प्राप्त करणे, व अशा रीतीने मोक्ष मिळविणे. या ध्येयाला मुक्ती प्राप्त करणे, निर्वाणाप्रत जाणे, साक्षात्कार होऊन परमेश्वराची प्राप्ती होणे, अशा विविध प्रकारे व्यक्त करण्यात येते. अध्यात्माचा मार्गही ठरलेला आहे व तो म्हणजे मनाचे सतत केंद्रीकरण करून (म्हणजे विचारांना निश्चित दिशा देऊन) चिंतन, मनन आणि ध्यान करणे. या मार्गाने जाणार्‍या साधकांना जिवाशिवाची भेट होऊन अतीव विलक्षण उत्कट आनंदाचा अपूर्व अनुभव येतो. याला साक्षात्कार म्हणतात. हा साक्षात्कार साधकाच्या वैयक्तिक आराध्यदैवताचाच होतो असे आढळते. उदा. समर्थांना प्रभू रामचंद्राचे तर तुकाराम महाराजांना विठोबाचे साक्षात् दर्शन होत असे. साक्षात्कारप्रसंगी दुःखाची निवृत्ती होऊन आत्यंतिक सुखाची प्राप्ती होत असते. साक्षात्कार हा एक आगळाच अनुभव आहे! या अनुभवाला ज्ञान म्हणावे काय? असे मान्य केले की या भावोत्कटतेच्या प्रसंगी ज्ञानदेखील मिळते तर हे ज्ञान कशाबद्दल? कोणाबद्दल? संतांना आपल्या वैयक्तिक आराध्य दैवताचाच साक्षात्कार होतो हे पाहिल्यास अध्यात्ममार्गाने जाण्यासाठी ज्या जड, भौतिक वस्तूंच्या विचारांचा त्याग केला त्या जड भौतिक विश्वाविषयी त्यांना ज्ञानप्राप्ती होत नसावी असे वाटते. ब्रह्मजिज्ञासेचा अहर्निश ध्यास घेणार्‍यांना जड मायास्वरूपी विश्वाच्या ज्ञानाची काय आवश्यकता?
साक्षात्कारप्रसंगी होणारे आत्मज्ञान हेच ब्रह्मज्ञान व हेच विश्वज्ञान असेही म्हणतात. ही नित्यसमिका (identity) मान्य केल्यास आत्मा, ब्रह्म आणि विश्व अभिन्न आहेत असे मानावे लागेल. यांतील ‘ब्रह्म आणि ‘विश्व या शब्दांमागे कोणती संकल्पना अभिप्रेत आहे हे पाहणे आवश्यक आहे. ऋग्वेदात हा शब्द मंत्र, देवतास्तवन, प्रार्थना, गूढशक्ती यासंबंधी वापरला आहे. उपनिषदांत विश्वाचे आद्यकारण, परतत्त्व, विश्वाच्या विविधतेच्या मुळाशी असलेले परतत्त्व अशी ब्रह्माची कल्पना असून त्याच्याशी पावित्र्य आणि गूढता निगडित आहेत. छांदोग्यात भूक नसलेला, तृष्णा नसलेला, सत्यकाम, सत्यसंकल्प असे ब्रह्माचे वर्णन आहे. रामानुजाचार्यांच्या मते ब्रह्म अनंत कल्याणगुणांनी युक्त असून ते जगाचे कर्तृत्व, जीवांचा शास्ता आणि नियामक आहे. सर्वांच्या कानी असलेले ‘नेति नेति’ हे वर्णन बृहदारण्यकामध्ये आहे. इतर प्राचीन साहित्याचे परिशीलन केले तर ब्रह्माची परस्परविरोधी वर्णनेही आढळतात; ब्रह्मावर मानवी गुणांचे आरोपण केलेले आढळते. अनेक प्रसंगी ब्रह्म, ईश्वर, परमेश्वर, देव, परमात्मा, प्रभू, पुरुष (प्रकृतीच्या संदर्भात) हे शब्द एकाच अर्थाने वापरण्यात येतात. विश्वाचा कोणी निर्माता असणे ही कल्पना केवळ सेमेटिक (ख्रिश्चन) धर्मातच नाही; आपल्या धर्मात ही ब्रह्मा-विष्णु-महेश या त्रयीतील ब्रह्म्याला विश्वनिर्माता मानतात. एकंदरीत ब्रह्माच्या संकल्पनेत काही सुसंबद्धता आढळत नाही तेव्हा सर्वच वर्णने खरी मानून ज्या प्रसंगी जो अर्थ आपल्या प्रतिपादनासाठी उपयोगी पडेल तो खरा मानणे अशा सोप्या पळवाटा अध्यात्मवाद्यांना उपलब्ध आहेत!
याचप्रमाणे विश्व कशाला म्हणावे यासाठी प्राचीन साहित्य पाहिले तर त्यात विश्व, ब्रह्मांड, प्रकृती, सृष्टी जग हे शब्द समानार्थी वापरले जातात. विश्वाचे दर्शनभगवान श्रीकृष्णांनी बालपणी यशोदेला आणि नंतर अर्जुनाला घडविले. गीतेमधल्या विश्वरूपदर्शनातील अद्भुतरंसात्मक काव्य बाजूला सारले तर असे म्हणता येते की त्यावेळच्या विश्वाच्या कल्पनेत पृथ्वी, तीवरील सजीवनिर्जीव पदार्थ, सूर्य, चंद्र, नक्षत्रे, तारे एवढीच असावी. साध्या डोळ्यांनी दिसणार्‍या देवयानी दीर्घिकेचा (Andromeda Galaxy) उल्लेखही कोठे आढळत नाही यावरून वरील विधानाला पुष्टी मिळते.
आत्मज्ञान याविषयी विचार करता त्याचा अर्थ स्वतः विषयीचे ज्ञान असा होतो. ब्रह्मज्ञान होण्यासाठी ‘मी’ चा विस्तार करून त्यास एवढे विशाल करावे की ते अखिल विश्व व्यापून टाकील असे म्हटले जाते. हा मी म्हणजे शरीर आणि मन (मन = मेंदूची विचारप्रक्रिया) युक्त वस्तू (entity). मनाच्या विस्तारणाच्या प्रक्रियेमध्ये मनुष्याला विश्वातील सजीव पदार्थांच्या (उदा. मानव समाजाच्या काम, क्रोधादि गुण, हर्ष, खेद, शोक इत्यादि भावना) संवेदना-भावना यांचे आकलन व समरसता होणे शक्य आहे कारण हे तादात्म्य मानसिक अथवा भावनिक पातळीवर आहे परंतु विश्वातल्या जड निर्जीव वस्तूंच्या (उदा. पर्वत, समुद्र, नद्या, खडक, माती) बाबतींत ही समरसता कशी होऊ शकेल?
वैज्ञानिक शब्दांचे अर्थ
नवविवेकवादाच्या आवश्यकतेबद्दलच्या लेखात ज्या संकल्पनांच्या आधारे विज्ञानाचे अध्यात्माशी साम्य दर्शविले आहे. त्या संकल्पनांचा वैज्ञानिक अर्थ समजल्यावाचून विज्ञान आणि अध्यात्मामधील तथाकथित साम्याचा फोलपणा समजणार नाही. त्यातला ऊर्जा-अक्षय्यतेचा (conservation of energy) उल्लेख विश्वामध्ये काही तरी कायम अविनाशी स्वरूपाचे आहे अशा संदर्भात वापरला असावा, असे वाटते. पूर्वी ऊर्जा-अक्षय्यता आणि वस्तुमान यांच्या अक्षय्यतेचा वेगवेगळा विचार करीत असत; पण किरणोत्सारण (radioactivity) आणि सापेक्षता-सिद्धांताच्या शोधानंतर दोहोंचा साकल्याने विचार करतात. परंतु वस्तुमान – ऊर्जा अक्षय्यतेखेरीज भौतिकशास्त्रात रेखीय संवेगाची (linear momentum), कोणीय संवेगाची (angular momentum) आणि प्रभाराची (charge)अक्षय्यता हे नियम आहेत. याशिवाय आणखीही तीन अक्षय्यता – नियम असे एकूण सात अक्षय्यता नियम आहेत. यावरून भौतिकशास्त्र अध्यात्माच्या बरेच पुढे गेले आहे असे का म्हणू नये?
Singularity म्हणजे एक तत्त्व नव्हे. त्याला योग्य प्रतिशब्द ‘संविशेषता आहे. विशिष्ट परिस्थितीत एखाद्या राशीची किंमत अनंत झाली तर त्या परिस्थितीला Singularity म्हणतात. उदा. वस्तुमान स्थिर ठेवून आकारमान कमी करीत गेले तर घनता = (वस्तुमार्ने आकारमान) वाढत जाते. अखेरीस आकारमान शून्य केले तर घनता अनंत होईल. ही एक संविशेषता झाली. ही सर्वस्वी गणितीय संकल्पना आहे. भौतिकशास्त्रात अनेक प्रसंगी गणितात अशा संविशेषतांना तोंड द्यावे लागते. त्याला एक तत्त्व म्हणणे सर्वथैव चुकीचे आहे. असाच चुकीचा अर्थ Zero size विषयी लावला आहे. Zero size म्हणजे शून्य आकारमान! शून्य अवस्था नव्हे!!
अशीच गफलत कण-प्रतिकण आणि ब्रह्म-माया यांमध्ये साम्य शोधण्यात झाली आहे. कण-प्रतिकण यांची अनेक उदाहरणे देता येतात. सर्वात सोपे म्हणजे इलेक्ट्रॉनपॉझिट्रॉन. दोहोंचेही वस्तुमान (mass) आणि प्रभार (charge) समान असतात. फरक एवढाच की एकावरचा प्रभार ऋण आहे तर दुसर्या)वर धन प्रभार आहे. प्रोटॉन आणि प्रतिप्रोटॉन हे असेच कण-प्रतिकण आहेत. कण-प्रतिकणांचा प्रमुख गुणधर्म असा की ते एकत्र आले तर परस्परांचे नाशन (annihilation) करतात व त्यापासून प्रारण (radiation) निर्माण होते. याच्या उलट अभिक्रियादेखील होत असते. प्रारण विशिष्ट तीव्रतेपेक्षा (intensity) जास्त असले तर त्याच्यापासून कण-प्रतिकण जोडी निर्माण होते. या सर्व घटनांचा अभ्यास करून त्याच्या गणिताचा पडताळाही घेण्यात आला आहे. या संकल्पनेचाआणि ब्रह्म-माया यांमध्ये साम्य एवढेच की या दोन्ही शब्द-जोड्या आहेत. विश्वामध्ये कण (म्हणजे ब्रह्म म्हणावे काय?) विपुल प्रमाणात आढळतात पण प्रतिकण (याला माया समजावे काय?) अल्पांशाने, जवळजवळ नगण्यच आढळतात. असे का हा प्रश्न अजून वैज्ञानिकांना सुटला नाही. अध्यात्माने त्याचे उत्तर दिल्यास वैज्ञानिक प्रगती वेगाने होईल.
वैदिक गणितात प्रगत गणितशास्त्राचे विवेचन आढळत नाही. उपलब्ध साहित्यावरून गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, चतुर्थघात, चतुर्थमूळ या पलीकडे ते जात नाही असे दिसते. प्रगल्भ गणिताचे श्रेय भास्कराचार्यांना दिले पाहिजे. काही वेदज्ञात्यांचे तर असे म्हणणे आहे की वैदिक गणितात ज्या सूत्रांचा आधार घेतात ती वेदांमध्ये नाहीत. ब्रह्म्याचा दिवस आणि ब्रह्म्याचे वर्ष ही काल मोजण्याची मापे आहेत. ब्रह्म्याचा एक दिवस ८.६४ अब्ज मानवी वर्षांएवढा येतो. पण प्रकाशवर्ष, प्रकाशदिवस ही काल मोजण्याची मापे नसून अंतर मोजण्याची मापे आहेत. एक प्रकाशवर्ष २५.९२ अब्ज किलोमीटर होते.
प्रदूषणाची समस्या अध्यात्माने कशी सुटणार? या समस्येवर उत्तर विज्ञानानेच मिळू शकते!
विश्वरचनेविषयीचे सिद्धान्त :
आधुनिक दृष्टीने विश्वरचनेविषयी तीन सिद्धांत आहेत. (१) महास्फोट सिद्धांत (big bang) (२) स्थायी अवस्था (Steady state) अथवा सतत निर्मिती सिद्धान्त (३) दोलनकारी विश्व, प्राचीन साहित्यात या तिन्ही मतप्रवाहांसाठी पुरावे आढळतील. उदा. (१) प्रत्येक वस्तूला कोणीतरी निर्माता असतो. त्याप्रमाणे विश्वाचा कुणीतरी निर्माता असला पाहिजे. अर्थात् ज्यावेळी त्याने विश्वरचना केली त्यावेळी विश्वाची उत्पत्ती असते (२) दृष्टीस पडणार्‍या तार्‍यांच्या पलीकडे काय असावे? तार्‍यांच्या पलीकडे अमर्याद पोकळी असावी. म्हणजे विश्व अनादि अनंत असावे (३) ज्याप्रमाणे सर्व सृष्टीला आदि, मध्य, अंत असतो आणि मृत्यूनंतर पुनर्जन्म असतो (पुनरपि जननं पुनरपि मरणम्) त्याच न्यायाने अखिल विश्वाचा सतत पुनर्जन्म आणि मृत्यू होतो. प्राचीन विचारांमधून (किंवा अध्यात्मातून) या तीन उपपत्तीपैकी कोणती खरी हे सांगता येणार नाही. १९२९ सालीहबल-नियमाच्या शोधामुळे अनिर्णायक चर्चेच्या क्षेत्रातून ही समस्या विज्ञान क्षेत्रात आली. आणि निरीक्षणांच्या पुराव्यामुळे महास्फोट सिद्धांताला मान्यता मिळाली आहे. ही महास्फोट प्रतिकृती (big bang model) संविशेषतेनंतर १ अब्जांश सेकंद ते ३ लक्ष वर्षापर्यंत उपयोगी आहे. पण एक अब्जांश सेकंदापूर्वी काय आणि कसे घडले याविषयी वैज्ञानिकांनी गणित आणि तर्क केले आहेत. त्यामुळे १० (१ भागिले १ वर४४ शून्ये) सेकंदापर्यंत माहिती उपलब्ध आहे.
विज्ञानाची भूमिका:विज्ञानाला कल्पनाविलासाचे वावडे नाही, परंतु त्या कल्पनांना सतत पडताळ्याच्या कठोर कसोटीला तोंड द्यावे लागते. इलेक्ट्रॉन कोणीही पाहिला नाही. ही संकल्पना म्हणजे एक प्रतिकृती (model) आहे, व तिला काही गुणधर्म दिले आहेत. ही प्रतिकृती गृहीत धरून तिच्या आधारे भिन्न भिन्न क्षेत्रातील घटनांबद्दल भाकित केले तर त्यांचा अचूक पडताळा मिळतो. यामुळे वैज्ञानिक इलेक्ट्रॉनला खरी भौतिक वस्तू (real physical entity) मानतात. विज्ञानात पराकोटीचे ज्ञान संपादन करणार्‍या व्यक्ती मोजक्याच असतात. परंतु आपले संशोधन तर्कासह गणित-स्वरूपात स्पष्ट शब्दांत व्यक्त करतात. आध्यात्मिक शब्दांसारखा भोंगळपणा वैज्ञानिक संज्ञांत नसल्यामुळे त्या संशोधनाचा नक्की अर्थ शेकडो शास्त्रज्ञांना कळतो आणि ते पुढे संशोधन करतात. आरंभी आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद. फारच कमी लोकांना समजला असेल पण त्या सिद्धांताच्या विकासाला आज दरवर्षी शेकडो शास्त्रज्ञ शोधनिबंधाद्वारे योगदान करीतआहेत.
वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे नवी साधने आणि उपकरणे सिद्ध करण्यात येतात. ती संकल्पित रीतीने कार्य करतात हा वैज्ञानिक कार्यपद्धतीचा विजयच आहे. ज्ञान सर्वांना मुक्त असल्यामुळे तंत्रज्ञानाची भराभर प्रगती होऊन नवी क्षेत्रे विज्ञानाच्या अभ्यासाच्या क्षेत्रात येतात. तसेच वैज्ञानिक निष्कर्ष अधिकाधिक अचूकपणे पडताळून पाहता येतात. संशोधन-प्रवास सदैव चालू असल्यामुळे विज्ञानात अंतिम असे काहीही नाही. नव्या ज्ञानप्राप्तीनंतर जुन्या कल्पनांमध्ये मोकळेपणाने सुधारणा, बदल करण्याची प्रक्रिया देखील सतत चालू असते. वैज्ञानिकांना या सर्व मर्यादा माहीत असून ते त्या मान्य करतात, पण त्यांचा विश्वास असा की जसजशी विज्ञानाची प्रगती होईल तसतशा या मर्यादा विस्तार पावतील.
याउलट अध्यात्म सर्व सृष्टीला नश्वर आणि माया मानून तथाकथित अंतिम सत्याचा (म्हणजे काय?) शोध घेते. अतएव दृश्य विश्वाला वगळून प्राप्त झालेले ज्ञानदेखील सर्वस्वी एकांगी, अपुरे आणि मर्यादित स्वरूपाचे म्हणावे लागेल. हे ज्ञान अभिव्यक्त करताना एकच शब्द भिन्न भिन्न संकल्पनांसाठी अथवा वेगवेगळे शब्द एकाच संकल्पनेसाठी वापरल्याने अर्थामध्ये नेमकेपणा नसतो. त्यामुळे हे ज्ञान अतिशय अनिश्चित/मोघम स्वरूपाचे असते. त्यात एकवाक्यता नसते. भारतीय अध्यात्माचा पाया म्हणजे आत्मा, पुनर्जन्म आणि ईश्वर यांवर विश्वास या संकल्पना विवाद्य आहेत. ईश्वरानेसृष्टी निर्माण केली अर्थात् त्याने मानवांचीही निर्मिती केली ही भूमिका अध्यात्माची आहे. वास्तविक पहाता ईश्वराने मनुष्य निर्माण केला नसून मनुष्यानेच स्वतःच्या समाधानासाठी ईश्वर निर्माण केला आहे! सामान्य माणसांना आधुनिक विज्ञान भारतीय अध्यात्मशास्त्राच्या निकट आले आहे असे वाटण्याचे कारण वैज्ञानिक शब्दांमागील संकल्पनांचे सुस्पष्ट आकलन न होणे हे आहे. परंतु एखादा वैज्ञानिक जेव्हा या दोहोंचा संबंध प्रस्थापित करू लागतो तेव्हा ज्या स्टीफेन हॉकिंगचा उतारा सदरहू लेखात दिला आहे. त्याचेच खालील विधान उत्तर म्हणून देता येईल.
“The universe of Eastern mysticism is an illusion. A physicist who attempts to link it with his own work has abandoned physics’.

गीता – ज्ञानेश्वरी आणि वर्णव्यवस्था

गीता आणि ज्ञानेश्वरी या दोन्ही ग्रंथसंहिता, सामाजिक विषमतेवर आधारलेल्या जन्मजात वर्णव्यवस्थेचा निखालस पुरस्कार करणार्‍या आहेत. या दोन्ही संहितांमध्ये ठायीठायी आढळणारा या संदर्भातला पुरावा स्पष्ट आहे.
गीता आणि ज्ञानेश्वरी या दोन्ही ग्रंथसंहितांतील पहिल्याच अध्यायामध्ये अर्जुन या महाभारतकार व्यास यांच्या पात्राने काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांमध्ये कुलक्षयानंतरचा स्त्रियांमधील स्वैराचार या नैतिक प्रश्नाबरोबरच त्यालाच जोडून येणारा पुरातन जातिधर्म, कुळधर्म उत्सन्न होऊन वर्णसंकर होईल हा अत्यंत महत्त्वाचा सामाजिक प्रश्न दोनही ग्रंथसंहितांच्या मुखाध्याया’मध्येच उपस्थित केला आहे. अर्जुन या पात्राच्या मुखाध्यायातील सर्वच प्रश्नांची रीतसर उत्तरे देण्यासाठी पुढील १७ अध्यायांचा प्रपंच आहे. पात्रनिर्मिती व त्यामधील संवादांतून करावयाचे तत्त्वचिंतन ही खास वेधक ‘व्यासशैली आहे. गीतेबरोबरच महाभारतभर या तत्त्वचिंतनपर व्यासशैलीचे दर्शन खूप ठिकाणी घडते. असो.
वर उद्धृत केलेला ‘वर्णसंकरा चा (अर्थात् जन्मजात) प्रश्न व त्याचे गीताज्ञानेश्वरीतील ‘अवतारी श्रीकृष्ण’ या पात्राकरवी व्यासाने देऊ केलेले उत्तर हा या टिपणाचा मर्यादित विषय आहे.
‘कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः।’ त्यामुळे ‘प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः।’आणि त्यातून जायते वर्णसंकरः।’ही अवतरणे गीतासंहितेतील आणि ‘आद्य धर्म जाय।’ ‘अधर्मचि आरोपे कुळामाजी।”वंशजधर्म लोपे’ त्यातून ‘व्यभिचार घडती कुळस्त्रियांसी”उत्तम अधर्मी संचरती। ऐसे वर्णावर्ण मिसळती।’आणि त्यामुळे तेथेच ‘समूळ उपडती जातिधर्म’ ही बोलकी अवतरणे ज्ञानेश्वरी संहितेतील.
या ठिकाणी पुरातन प्रस्थापित दृढमूल जन्मजात वर्णधर्म वंशजधर्म, जातिधर्म-जन्मजात वर्णव्यवस्था टिकावी आणि ‘वर्णसंकरा’ सारखे भयप्रद परिवर्तन घडू नये हा त्यामधील अभिप्राय स्पष्ट आहे. ‘प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः’यातून ‘जायते वर्णसंकरः’ या अनुबंधातून जन्मजात वर्णाच्या संकराचे अर्जुनाचे भय सुस्पष्ट आहे. मी युद्ध केल्याने असा जन्मसंबंधित वर्णसंकर होईल हे अर्जुनाला दिसणारे भयप्रद भविष्यकथन आहे.
अर्जुन या पात्राकरवी उपस्थित केलेला हा जन्मजात वर्णव्यवस्थेचा प्रश्न केवळ उपस्थित करून व्यासमुनीने सोडलेला नाही. जन्मजात हा भाग गाळून केवळ वर्णव्यवस्थेबाबत अर्धवट उत्तर त्याने दिलेले नाही. या दोन्ही ग्रंथसंहितांमध्ये जी तत्त्वज्ञानविषयक भाष्ये येतात त्या ठिकाणी जन्मजात वर्णव्यवस्थेचे स्पष्ट समर्थन व्यासमुनी करीत राहतात. ‘अवतारी श्रीकृष्ण या पात्राकरवी त्या प्रश्नाचा गंभीरतेने स्वीकार करून अगदी गंभीरपणे प्रस्थापित जन्मजात वर्णव्यवस्थेला ईश्वरी असक शिक्कामोर्तब करून व्यासमुनी ती स्थापित करतात.
गीता-ज्ञानेश्वरी-संहितांमध्ये ब्रह्म-परब्रह्म, मोक्ष, पुनर्जन्म, संचित, परलोक, स्वर्ग, नरक या बहुशः अनुभवजन्य नसणार्‍या व पडताळून पाहता न येणार्‍या कल्पना आहेत. त्यांमध्ये लौकिकापेक्षा पारलौकिकाचा अमूर्त विचार प्रकर्षाने आला आहे. असे असूनही कर्मसिद्धांताचे निरूपण करताना त्या पारलौकिक कल्पनांची इहलोकातील वर्णसापेक्ष धर्माशी – वर्णसापेक्ष कर्माशी घातलेली सांगड ही तीमधील विलक्षणता आहे. या दोनही संहितांमधील महत्त्वाचे विचारसूत्र म्हणजे ब्रह्म-परब्रह्म, आत्मा, मोक्ष, पुनर्जन्म इ. कल्पना-संकल्पना, त्या अनुरोधाने येणारा कर्मसिद्धांत आणि वर्णसापेक्ष धर्मकर्म यांच्या सांगडीमध्येच आहे याचा प्रत्यय अभ्यासकाला या दोन्ही ग्रंथसंहितांमध्ये ठायीठायी येतो. हा दोहोंचा अनुबंध हीच या उभय संहितांतील जन्मजात विषमतेचा पुरस्कार करणारी मेख आहे. ‘चातुवर्यं मया सृष्टम् ….’ या केवळ एका श्लोकांशाशी तिची मर्यादा नाही. हा जन्मजात विषमतेचा पुरस्कार या दोनही संहितांमध्ये ग्रंथभर पसरलेला आहे. किंबहुना उपनिषदांपासून गीता-ज्ञानेश्वरीपर्यंत आणि तदनंतरही वेदान्तदर्शनातील कर्मविपाक सिद्धांत आणि वरील कल्पना यांचा पुरस्कार करणार्‍यांत सर्व ग्रंथांत जन्माधिष्ठितचातुर्वण्र्यव्यवस्थेचा पुरस्कार केला जात असतो. याची तात्त्विक जाणीव होत राहते.
ब्रह्म, आत्मा, मोक्ष, पुनर्जन्म, संचित आणि वर्णसापेक्ष स्वधर्मकर्म यांच्या अनुबंधाची तार्किक संगती या दोनही ग्रंथसंहितांच्या आधारे पुढीलप्रमाणे लागते.
आपल्याला जो आजचा वर्ण मिळाला आहे. तो आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मसंचिताचे फळ होय. अर्थात हे या जन्मीच्या वर्णाचे फळ अगदी जन्मापासून उभ्या जन्मर मिळणार! तेव्हा आपले या जन्मीचे जन्मजात गुण-कर्मासहितचे स्त्रीशूद्रत्व हा आपल्या पूर्वजन्मीच्या कर्माचा भोग आहे. (‘जन्मजात स्त्रीत्व याला पर्यायच नाही. वावदूकपणाला पळवाट नाही!) आता या जन्मी स्त्रीशूद्रकर्माचा दुःखभोग भोगणे हा आपला स्वधर्म आहे. प्रयत्नाने, बंडाने, विद्रोहाने हे जन्मजात वर्णसापेक्ष दुःखब्रह्म झुगारणे म्हणजे पारलौकिक परब्रह्मरूप मोक्षप्राप्ती तर नाहीच, पण पुढील जन्म याहीपेक्षा आत्यंतिक दुःखब्रह्माचा ठरेल असा या दोनही ग्रंथसंहितांतील जीवन भाष्याचा धाक आहे.
या जन्मजात वर्णसापेक्ष स्वधर्मकर्ममय अशा दुःखभोगाखेरीज निदान पुढील जन्मीच्या उच्चतर फळासाठी या जन्मी या स्त्रीशूद्र वर्णकर्मात राहून काही वेगळे पुण्यकर्म करता येईल काय? याच कर्मसिद्धांताच्या आधारे – याच जीवनभाष्याच्या आधारे या स्त्रीशूद्रांना या जन्मी नाहीच पण पुढील जन्मी तरी पुण्यशील असे जन्मजात ब्रह्मकर्म आणि ऐश्वर्यशील असे जन्मजात क्षात्रकर्म करता येईल काय?त्यांना पुढील जन्मीच्या पुण्यशील, ऐश्वर्यशील संचितासाठी कर्मस्वातंत्र्य – कर्तृत्वस्वातंत्र्य आहे काय?
वरील प्रश्नाचे उत्तर दोनही संहितांमध्ये बहुशः नकारात्मकच मिळते.
तार्किकदृष्ट्या अगोदरच्या म्हणजेच पूर्वजन्मकर्मसंचितानुसार त्यांना स्त्रीशूद्रत्व हे जन्मतःच जन्मभरच्या भोगासाठी लाभले आहे. त्याच पूर्वसंचितानुसार शूद्रांना जन्मजात तामसी गुण मिळणार. या पूर्वजन्मसंचित-आधारित जन्मजात तामसी गुणांनुसार हे शूद्र जन्मभर तामसी आहार घेत राहणार (त्यांच्या उष्ट्याशिळ्या कुजट तामसी आहाराची समाजव्यवस्था उदारपणे व्यवस्था करणार) या तामसी आहारानुसार त्यांचे व्यक्तिमत्त्व आणखीच तामसी होत जाणार आणि त्यामुळे त्यांच्या हातून याही जन्मी तामसीच कर्मे घडत राहणार (तार्किकदृष्ट्या त्यांची पुण्यसंचितासाठी ‘सत्त्वशीलतेशी कधी गाठच पडणार नाही. या शूद्रांची सत्त्वरज यांपासून या जीवनभाष्याने कायमची फारकत करून त्यांची ‘तामसी बरोबर जन्मोजन्मीची गाठ बांधून टाकली आहे.) आणि तार्किक संगतीनुसार या शूद्रांना जन्मोजन्मी जन्मतःच तेच तामसी शूद्रगुण तोच शूद्र वर्ण, तेच शूद्रकर्म आणि इहलोकीचे तेच दुःखब्रह्म अशा रहाटगाडग्यातून अनंत काळपर्यंत फिरत राहावे लागणार असाच निष्कर्ष या दोन्ही ग्रंथसंहितांतील संबंधित जीवनभाष्यांतून निघत असतो, अशी जाण या दोनही संहिता वाचताना येत राहते.
(या दोनही ग्रंथसंहितात एकत्रित संबोधिलेल्या ‘स्त्रीशूद्र’ यांपैकी स्त्रीलाही थोड्याफार फरकाने वरील विवेचन लागू पडते.)
या साऱ्या प्रतिक्रिया या दोनही ग्रंथसंहितांचा काल, आणि तत्कालीन परिस्थिती याबाबतच्या मर्यादा लक्षात घेऊनही द्याव्या लागत आहेत.
गीतारहस्यकारांच्या कालगणनेनुसार गीतासंहितेचा काल इ.स.पूर्व पाचवे शतक असा आहे. (पाश्चात्त्यांच्या मते हा काल इ.स. पहिल्या शतकाच्या आगेमागे आहे.) आणिज्ञानेश्वरीसंहितेचा काल इ.स. १२९० असा स्वीकारण्यात आला आहे. या दोहोंच्या काळापूर्वीही म्हणजे इ.स.पूर्व सहाव्या शतकात ब्रह्म, आत्मा, मोक्ष, पुनर्जन्म आणि जन्मजात वर्णाश्रित धर्मकर्म याबाबतचे लक्षणीय वैचारिक मंथन होऊन गेले आहे. इ.स.पूर्व सहाव्या शतकाच्या सुमारास ब्रह्म, आत्मा, मोक्ष, पुनर्जन्म, वर्ण-कर्म याबाबतचे बंडखोर विचार मांडणारी बौद्ध दर्शने आणि प्रत्यक्ष आचारपंथही होऊन गेले आहेत. आजच्या जडवादी वैज्ञानिक दृष्टिकोणाला जवळचे असे ‘लोकायत दर्शन या कालाच्या आसपासचे आहे. ज्ञानेश्वरीसंहितेला समकालीन महानुभावपंथ हा वर्णविचाराबाबत बराचसा उदार आणि सर्वसमावेशक ठरतो. हे सर्व लक्षात घेता त्या दोन्ही ग्रंथसंहितांच्या कालाबद्दलच्या आणि तत्कालीन परिस्थितीबाबतच्या मर्यादांचा मुद्दा विचारात घेण्याचे कारण दिसत नाही. किंबहुना या उभय संहितांच्या आगेमागे वर्णसंबंधित समतासंमुख विचार मांडले जात असता सर्व वर्णसंबंधित समताधिष्ठित आचारपंथही अस्तित्वात असताना या दोन्ही संहितांनी मात्र विषमतेचा पुरस्कार करणार्‍या चातुर्वण्याचा (जन्मजातच) पुरस्कार केला या अनुदारतेचे आश्चर्य वाटते.
आणखी एक मुद्दा असा की ‘मनुस्मृती ही गीता-ज्ञानेश्वरी या दोनही ग्रंथसंहितांच्या बरीचशी अगोदरची आहे. ‘मनुस्मृती’ मधील जन्मजात स्त्रीशूद्रांना दिलेले. पशुतुल्य स्वधर्मकर्म हे गीता-ज्ञानेश्वरी संहितांच्या उभय संहिताकारांना माहीत आहे. या पाश्र्वभूमीवर या उभय संहिताकारांनी मानवी मूल्यांचे अवमूल्यन करणार्‍या तसल्या स्मृतिप्रणीत स्वधर्माचे, जन्मजात वर्णसापेक्ष कर्माचे प्रतिपादन करावे याचे संतापजनक आश्चर्य वाटते.
शिवाय गीता-ज्ञानेश्वरी या दोन्ही ग्रंथसंहितांच्या निर्मितिकाळात गुणाधिष्ठित वर्णव्यवस्था नसून जन्माधिष्ठित वर्णव्यवस्था दृढमूल झालेली होती. (गुणांवरच आधारित अशी अशक्यप्राय तथाकथित आदर्श चार्तुवर्यव्यवस्था कधीच नव्हती – असणे शक्यच नाही. आणि गीता ज्ञानेश्वरी काळात तर ती नव्हतीच नव्हती.) म्हणजे हे दोनही संहिताकार स्वधर्म-सूर्याचा जयजयकार करताना तत्कालीन जन्माधिष्ठित वर्णधर्मकर्माचावर्णव्यवस्थेचा पुरस्कार करतात हे कालसापेक्षता लक्षात घेता स्पष्ट होते.
या सर्व गोष्टींना अपवाद आणि उत्तर म्हणून या उभय ग्रंथसंहितांतील नववा अध्याय सांगितला जातो.
‘स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् ।’ अशी गीता स्त्रीशूद्रांना ‘परां गतिम् सांगते आणि ‘भक्ति गा एथ सरे। जाति अप्रमाण ।…. म्हणोनि कुळजाति वर्ण । हे अवघेचि अकारण। असे जातिवर्णाचे श्रेष्ठकनिष्ठत्व नाकारून यापरी पापयोनी ही अर्जुना। वैश्य शुद्र अंगना । मातें भजतां सदना।माझिया येती ।। असे म्हणून ज्ञानेश्वरीसंहिता जाति-वर्ण लक्षात न घेता शूद्रांना व स्त्रियांना भगवंतांच्या घरात प्रवेश देते.
पण हे सारे फक्त पारलौकिक खर्याशखोट्या मोक्षासाठी आणि तेही भक्तिमार्गापुरतेच मर्यादित आहे. बाकी इहलोकीच्या सर्व प्रापंचिक व्यवहारांतजातिवर्णसापेक्ष धर्मानुसारच शूद्राने सेवाकर्म करावयाचे आहे. तेच इहलोकीचे जन्मजात दुःखब्रह्म भोगावयाचे आहे. किंबहुना ती एक आवश्यक अशी अट आहे.
शूद्र हा कितीही मोठा साधुसंत, ज्ञानी, भक्त, जितेंद्रिय, दैवी गुणालंकृत, निष्काम कर्मयोगी, गुणातीत इ. झाला (गीता ज्ञानेश्वरीतील जीवनभाष्याच्या तार्किक संगतीनुसार ते अशक्य असले तरी प्रत्यक्षात कुठल्याही वर्णातील ‘मदायत्तं तु पौरुषम्’ ला ते शक्य आहेच.) तरी, त्याने वरिष्ठांची सेवा करावयाची आहे. त्याचे पुढील जन्माचे संचित या ‘शूद्रकर्माखेरीज या ‘स्वधर्मा खेरीज ठरावयाचे नसते.
या ठिकाणी आणखी एक नोंद महत्त्वाची. ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरीसंहिता ही जाति अप्रमाण, कुळजाति वर्ण अकारण असे म्हणते, त्याच ठिकाणी ही संहिता ‘वैश्य शूद्र – अंगना यांना पापयोनी म्हणते आणि तेथेच ब्राह्मण या जातिवर्णाचा मात्र मोठ्या गौरवाने भरभरून महिमा गाते.अगदी आतील उभाळ्याने आणि केवढ्या उत्फुल्ल, प्रसन्न रूपकात्म काव्यसुंदर शैलीने!
‘ब्राह्मण म्हणजे वर्णामधले छत्रचामर, मंत्रविद्येचे माहेर, पृथ्वीतळीचे देव, यज्ञांचे आश्रयस्थान, मंगलतेचे निधान, तपश्चर्येचे अवतार, तीर्थक्षेत्रांचे सुदैव, महासिद्धीचे प्राप्तव्य, स्वर्ग हीच त्यांची निर्वाहभूमी आणि सामर्थ्याच्या दृष्टीने प्रलयकाळाच्या रुद्रदेवतेचे वसतिस्थान असे पुण्यपूज्य ब्राह्मण!’म्हणजे या ठिकाणी स्थितप्रज्ञ, ज्ञानी योगी भक्त यांच्यातील सर्व गुणधर्माचा अर्क म्हणजे ‘ब्राह्मण असे हे वर्णन.
आणि मग असल्या ब्राह्मण – पुराण’वर्णनकाव्याच्या धबधब्यात आताच म्हटलेले ‘जाति अप्रमाण । जातिवर्ण अकारण’। या समतासूत्राचा परिणाम मुळापासून वाहून जातो – पूर्णपणे पुसून टाकला जातो.
आणखी एक पुढील नोंद म्हणजे ज्ञानेश्वरी संहिता ही स्वधर्मकर्म म्हणजे स्वतःच्या वर्णाचे (तत्कालीन व ग्रंथातील जीवनभाष्याला अभिप्रेत असलेला जन्मजातच) कर्म न करणार्‍यांना स्मृतिकारांप्रमाणेच कडक पाशवी दण्ड सांगते;
म्हणोनि स्वधर्म जो सांडील। तैयारों काळु दंडील।
चोरू म्हणोनि हारील। सर्वस्व तेयाचें ।।
तैसीं त्रिभुवनीचीं दुःखें । आणिक नाना पिसें ।
दैन्यजात जें तुझें । तेथेचि वसे ॥
असा दंड भोगावा लागू नये म्हणून –
तरी स्वाधिकाराचेनि नावें । जे वाटें आलें स्वभावें
ते आचरिजे गौरवें । शृंगारोनि
असा हा वर्णाश्रित (जन्मजातच) स्वधर्मकर्माचा धाकयुक्त पुरस्कार आहे.
गीता – ज्ञानेश्वरी या दोन्ही संहितांमध्ये ब्रह्म, आत्मा, मोक्ष, पुनर्जन्म, कर्मसिद्धांत आदि कल्पना – संकल्पना आणि त्यांची जन्मजात वर्णसापेक्ष धर्मकर्माशी घातलेली दृढ सांगडस्पष्ट आहे. पण या अनुबंधावर कळस चढविला गेला आहे, चवथ्या अध्यायात ‘चातुर्वर्य मया सृष्टं गुणकर्मविभागशः।’ या व्यासमुनींच्या भगवत्प्रणीत सूत्राने. गीता-ज्ञानेश्वरी संहितेत ‘भगवंताच्या प्रत्यक्ष मुखातील या सूत्राने जन्मजात चातुर्वर्ण्यव्यवस्थेवर ईश्वरी शिक्कामोर्तब केले गेले.
वरील सूत्र ‘धर्मसंस्थापना आणि ‘अवतारकल्पना या नेमक्या मोक्याच्या ठिकाणी येते. वस्तुतः ‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् … संभवामि युगे युगे।’ याआठव्या श्लोकातील भगवंताच्या विश्वकल्याणमय सत्कर्मरक्षक अशा समाजधारणाविषयक हेतूचा व कार्याचा मनावर यथायोग्य मूल्याधिष्ठित असा नैतिक संस्कार होतो न होतो तोच ते प्रसिद्ध सूत्र लगोलग तेराव्या श्लोकात अचानकपणे येते आणि तशा अवस्थेतील मानसिकतेवर कोसळते आणि फार मोठा प्रतिकूल आणि विपरीत असाआघात करते. ज्ञानेश्वरीसंहिताही याबाबत फारसे वेगळे बोलत नाही.
‘साधूंचा मानु गिवशी ।दैत्यांची कुळे नाशी ।।’
‘मग पापाचा अचलू फिटे।पुण्याची पहाट फुटे ।’
त्यासाठी ‘अवतरें मी युगयुगीं।।या सत्तावन्नाव्या ओवीतील नैतिक मूल्याधिष्ठित सत्कर्मरक्षक असा संस्कार आपल्या पुलकित मानसिकतेवर होतो. पण अगदी लगोलग ७७/७८ या ओव्या अगदी वेगळेच विपरीत सांगत पुढे येतात. आता याचपरी जाण । चारही आहेत हे वर्ण। सृजिल्या म्यां गुण -। कर्मविभागें ।।’आणि वरील प्रमाणेच तशा मूल्याधिष्ठित अवस्थेतील मानसिकतेवर तेच आशयसूत्र कोसळते आणि तसाच फार मोठा प्रतिकूल आणि विपरीत असा आघात करते.
आणि मग गीता-ज्ञानेश्वरीतील भगवंताचा अवतार कोणत्या स्वरूपाच्या धर्मस्थापनेसाठी आहे याबाबत प्रश्न निर्माण होतो. पण ‘अवतारकल्पना आणि ‘धर्मकल्पना यामधील येथील लगोलगचा अनुबंध संदेहाला फारशी जागा ठेवीत नाही.
धर्मसंस्थापना आणि भगवंताचा अवतार यांचा अनुबंध जोडताना भगवंताचा हा अवतार चातुर्वर्यप्रणीत धर्मस्थापनेसाठीच होत असतो असे स्पष्ट सूचित इतिहासाचार्य राजवाडे यांनी केले आहे. मग ब्राह्मण कोण या लेखाच्या शेवटी हा अनुबंध ते स्पष्ट करतात.
‘तात्पर्य प्राचीन काळी पाच हजार वर्षांपूर्वी सुसंस्कृत जगात सगर राजापर्यंत सर्वत्र चतुर्वर्णात्मक समाजव्यवस्था प्रचलित होती’. तिचा आज पाच हजार वर्षे संकोच होत होत एकट्या हिंदुस्थानात तेवढी ती राहिली आहे. ह्यापुढे ती समूळ नाहीशी होणार किंवा पुनः सर्व जगभर पुढील पाच हजार वर्षांत पसरणार त्याचा निर्णय भविष्यकाल ठरवील.‘धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे।’ अशी भगवदुक्तीही आहे.
गीतारहस्यकारांनी ‘धर्म’ या शब्दाचे तीन अर्थ सांगितले (१) पारलौकिक धर्म – मोक्षधर्म, (२) नीतिधर्म, (३)ऐहिक चातुर्वण्र्याचे धर्म. या तीनपैकी ‘नैतिक मूल्यावस्था’ या दुसर्या, अर्थाला त्यांनी महत्त्व दिले आहे. पण ‘चातुर्वर्यव्यवस्था हे ‘धर्मरूप ही तेमहत्त्वपूर्ण मानतात आणि पुढे धर्मस्थापनेशी अनुबंध जोडीतच भगवंत प्रणीत चातुर्वर्ण्य निर्मितिपर श्लोकाचा अर्थ सांगतात.
भारतीय तत्त्वज्ञानकार कॉ. सरदेसाई यांनी तर गीतेतील सर्व उतार्यांंत कर्म व धर्म या शब्दांचा स्पष्ट अर्थ चातुर्वर्ण्यविहित कर्म आणि धर्म असा आहे, असे स्पष्ट म्हटले आहे.
वरील तीन वेचक संदर्भावरून चातुर्वर्ण्यधर्मसंस्थापनेसाठी भगवंत युगायुगातून अवतार घेत असतात या अभिप्रायाला यथार्थ बळकटी लाभते.
मूळ दोन्ही संहितांमध्येही धर्म म्हणजेच वर्णाधारित कर्म या अभिप्रायाला हवा तेवढा पुरावा उपलब्ध आहे.
स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धि लभते नरः।।
श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् ।।
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः।।
गीतेतील या वेचक सूत्रांमध्ये धर्ममोक्ष यांचा अनुबंध विषमताधारित वर्णसंबंधित कर्माशीच जोडल्याचे स्पष्ट आहे.
ज्ञानेश्वरीसंहितेतही धर्म-मोक्षाचा संबंध अशाच विषमताधारित वर्णसंबंधित कर्माशीच जोडल्याची उदाहरणे अनेक आहेत :
तुम्हां वर्णविशेषवशें । आम्हीं हा धर्म विहिला असे ।
यातें उपासा मग आपैसे । काम पुरती ।।
देखे अनुक्रम आधार”। स्वधर्म जो आचर।
तो मोक्षु तेणें व्यापारें । निश्चित पावे ।।
स्वधर्मे राहाटतां । सकळ काम पूर्तता ।।
स्वधर्मु एक आहे । तो सर्वथा त्याज्य नोहे ।।
स्वधर्म जो बापा । तोचि नित्य यज्ञ जाण पा।
स्वधर्मुचि सुखाडु । पारत्रिकीचा ।।
आता या सूत्रातील संगती विसंगतीबद्दल खास लिहिण्यासारखे. गीता बद्ध आणि ‘ज्ञानेश्वरी’ अनुवादित त्या सूत्राचा अर्थ स्पष्ट आहे. चार वर्ण मी निर्माण केले असे उभय संहितांतील भगवंत सांगतात, पण त्याच ठिकाणी गुण व कर्म यांच्या भेदाप्रमाणे असे तेच भगवंत सुटकाही करून घेताना दिसतात. पण अशी सुटका होणे शक्य नाही. ही एक प्रकारची (निदान अर्थ लावणारांची) बनवाबनवी ठरते. विसंगती नक्कीच.
या ठिकाणी प्रश्न असा की माणसाच्या ठिकाणी हे गुण कोणी दिले? शूद्राच्या ठिकाणी तमोगुण आणि ब्राह्मणाच्या ठिकाणी सत्त्वगुण हे कोणी दिले? सर्व विश्वाचा निर्माता या नात्याने ते गुण या भगवंतांनेच दिले असल्यास तोच संपूर्णपणे जन्माधिष्ठित वर्णव्यवस्थेचा निर्माता आहे. हेच प्रतिपादन येथे सिद्ध होते. आणि हे ‘भगवंत’ तर माणसाच्या ठिकाणचे असे पक्षपाती गुणनिर्माते नसतील, तर माणसाच्या ठिकाणचे हेगुण, उभय संहितांतील कर्मसिद्धांतानुसार मागील जन्मातील कर्मसंचितामुळे येतात हे मान्य करावे लागते आणि मग पूर्वजन्मकर्मानुसार या जन्मीचा गुण व त्यानुसार या जन्मीचा वर्ण म्हणजे जन्मसिद्ध वर्णव्यवस्था भगवंताना मान्य आहे हेच प्रतिपादन येथे सिद्ध होते.
दोन्ही संहितांमधील पूर्वजन्मकर्मफलसिद्धांतानुसार मागील जन्मीचे जे कर्मसंचित, त्यानुसार या जन्मीचा जन्मापासूनचा – जन्मसिद्ध गुणकर्मासहितेचा वर्ण ठरतो आणि विषमताधारित जन्मजात वर्णव्यवस्था जन्माला येते. या ठिकाणी वास्तविक काल्पनिक ‘भगवंताचे साहाय्य घेण्याचे व्यासमुनींना काहीच कारण नव्हते.
येथेही मुद्दा संपत नाही, या कर्माचे रहाटगाडगे अनादि जन्मापर्यंत भिडविले – ज्यापूर्वी जन्म नाही व म्हणून अगोदरच्या जन्माचे कर्मही नाही. त्यामुळे अगोदरच्या जन्माचे पूर्वसंचितही नाही. तर मग या पहिल्या जन्माला गुण कोणी दिले? त्या पहिल्या जन्मात असलेल्या गुणानुसार कर्म घडले असणार. तमो गुणांचे शूद्रकर्म, सत्त्वगुणींचे ब्राह्मणकर्म इत्यादी. आता या पहिल्या वहिल्या जन्मीचे गुण जर त्या विश्वनिर्मात्या ‘भगवंतानेच दिले असतील तर ‘चातुर्वण्र्यं मया सृष्टं हा अहंकार बरोबर. पण मग गुणकर्मविभागशः। या फसव्या अर्थनिर्णयाला वाव देणार्‍या उत्तरार्धाला काही अर्थ उरत नाही. जन्मतःच त्या – त्या वर्णांना गुण व कर्म मीच दिले व त्यानुसार चातुर्वर्ण्य मीच निर्माण केले हाच अर्थ येथे स्पष्ट होतो आणि गीताज्ञानेश्वरी या उभयसंहितांचा जन्माधिष्ठित चार्तुवर्यव्यवस्थेचा पुरस्कार ही स्पष्ट होतो. तोही ‘भगवंता’ च्या नावाने जाहीरनामा काढून.
एकूण निष्कर्ष असाच उभय संहितांतील कर्मविपाकसिद्धांतानुसार पूर्वजन्मसंचितानुसार गीता ज्ञानेश्वरीतील चातुर्वर्यव्यवस्था जन्माधिष्ठितच ठरते आणि ‘गुणकर्मविभागशः ‘ म्हटले असले तरीही त्यातील त्या सिद्धांतानुसार या उभय संहितांमधील चातुर्वर्त्यव्यवस्था जन्मजातच शिवाय ईश्वरनिर्मित ठरते.
‘व्यासं’ रचित गीता ही ‘व्यास’ रचित महाभारताचा एक भाग आहे. हे लक्षात घेऊन ‘गुणकर्मविभागशः’ चातुर्वर्ण्यनिर्मिती या सूत्रासंबंधीचे महाभारतात इतरत्र असलेले चिंतन पाहण्यासारखे आहे हा अनुबंध काही गोष्टी स्पष्ट होण्यास साहाय्यभूत ठरावा.
गुणानुसार कर्म आणिकर्मानुसार वर्ण अशी व्यवस्था महाभारतीय समाजात दिसते का? प्रत्यक्षात तर ती तशी नव्हतीच. ब्राह्मण, क्षत्रिय, सूत, किरात, आभीर, राक्षस, यक्ष, किन्नर हे सारे विविध गुणकर्मी जन्मजातच होते. व्यास, धृतराष्ट्र, पंडु, पंचपांडव, घटोत्कच, विदुर हे वर्ण-संकराचे असूनही त्यांना विशिष्ट वर्ण विशिष्ट योनिसंभवाने जन्मजातच मिळाले. एकलव्याची दुर्दशा त्याच्या जन्मजात वर्णामुळे झाली. कर्णाचा जन्मजात वर्ण समाजज्ञात नसल्याने त्याचीही दुर्दशा झाली.
ही झाली वस्तुस्थिती, तत्त्वचर्चा काय आहे? गुण-कर्म-वर्ण यांच्या परस्पर संबंधाबाबतची महाभारतात इतरत्र तत्त्वचर्चा काय आहे?
व्यासांच्या त्या व्यासशैलीतील-संवादशैलीतील काही संदर्भ एकत्रित करून मांडण्यासारखे आहेत.
(अ) (१) ‘चातुर्वर्यं भगवता पूर्व सृष्टं स्वयंभुवा । (अनुशासन पर्व-अध्याय १३१ उमामहेश्वरसंवाद) असे उमेने म्हटलेले आणि महेश्वराने न खोडलेले वचन आणि असृजब्राह्मणानेव पूर्वं ब्रह्मा प्रजापतिः। ब्राह्मणाः क्षत्रियाः वैश्याः शूद्राश्च द्विजसत्तम। ये चान्ये भूसंघानां संघास्तांश्चापि निर्ममे’ (शांतिपर्व अध्याय १८१ भृगु भरद्वाज संवाद) या दोन्ही उक्ती म्हणजे ‘चातुर्वण्र्यं मया सृष्टं चेच वेगळ्या शब्दांतील ईश्वरी शिक्कामोर्तब असलेले निरूपण.
पण येथे ‘गुणकर्मविभागशः’ अशी पळवाटेला फारसा वाव ठेवलेला नाही बनवाबनवीचा वेगळा अर्थ लावण्यास फारसा अवसर ठेवलेला नाही. उपरोक्त शांतिपर्वातील ‘भृगु उवाच मध्ये ब्रह्म्याने या चार वर्णातील ब्राह्मणांना निर्माण करताना आपल्या तेजाने सुर्य आणि अग्नीसारखे प्रकाशगुण दिले हे स्पष्ट केले आहे. आत्मतेजाभिनिर्वृत्तान्भास्कराग्निसमप्रभान् । असृजदुब्राह्मणानेवे …. असे म्हणून प्रकाशगुणासहित ब्राह्मण वर्ण निर्माण केला असा जन्मजात गुणासहित वर्णाचा ईश्वरी पुरस्कार केला आहे. या ठिकाणी या ब्रह्म्याने या चारही वर्णाना शरीराचे रंगगुण दिल्याचे स्पष्ट झाले आहे.‘निर्ममे। ब्राह्मणानां सितो वर्णः क्षत्रियाणां तु लोहितः।वैश्यानां पीतको वर्णः शूद्राणामसितस्तथा।’ या उक्तीत ते दिसून येते.
म्हणजे चारही वर्णाची जन्मापासूनची गुणरंगवर्णासहितची विषमताधिष्ठित निर्मिती त्या ब्रह्याची आहे, असे हे व्यासमुनीचे महाभारतीय ‘ईश्वरी प्रतिपादन आहे. ”
(अ) (२) पण प्रत्यक्षात काय दिसते याचे भान व्यासमुनींना आहे. त्यांना समोर जन्माधिष्ठित असे चार वर्ण दिसतात. पण त्या वर्णामध्ये गुणांचा तर संकर झालेला आढळतो. जन्मजात वर्षांत गुणसंकराची झालेली वस्तुस्थिती अशी दिसतेः
काम क्रोधो भयं लोभः शोकश्चिताक्षुधाश्रमाः।
सर्वेषां नः प्रभवति ….।। (शांतिपर्व अध्याय १८१ भृगुभरद्वाजसंवाद)
‘सत्यं दानं क्षमाशीलमानृशंस्यं दमोघृणा’ हे गुण ब्राह्मणाचे असूनही तेच शूद्रात ही दिसतात.
शुद्रष्वापि च सत्यं च दानमक्रोध एव च।
आनृशंस्यमहिंसा चे घृणा चैव …॥
त्यामुळे –
जातिरत्र महासर्प मनुष्यत्वे महामते।
संकरात्सर्ववर्णानां दुष्परीक्ष्येति मे मतिः।। (वनपर्व अध्याय १७७ नहुषधर्म-संवाद) असा हा सर्व वर्णात गुणसंकर आहे, त्यामुळे जाती ओळखणे कठीण असे म्हणावे लागलेआहे.
आणि मग आज आपण डॉ. आंबेडकरांना ते जन्माने शूद्र असून ही ब्राह्मण म्हणतो (ते ब्राह्मण असत नाहीत.) तसे व्यासमुनींच्या भारद्वाजांना (शांतिपर्व अध्याय १८२) आणि युधिष्ठिराला (वनपर्व अध्याय १७७) म्हणावे लागले आहे.
शुचैतद्भवेल्लक्ष्यं द्विजे तच्च न विद्यते।
न वै शूद्रो भवेच्छूद्रो ब्राह्मणो न च ब्राह्मणः ।। (शांतिपर्व व वनपर्व)
यत्रैतल्लक्ष्यते सर्पवृतं सब्राह्मणः स्मृतः ।।
यत्रैतन्न भवेत्सर्प तं शूद्रमिति निर्दिशेत् ।। (वनपर्व)
या ठिकाणी व्यासमुनी वेदान्त-स्मृति-पुरस्कृत जन्मजात चातुर्वर्ण्य पुसायला निघाले नाहीत तर वर्णामधील गुणसंकराची वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्यांना म्हणावे लागले आहे की जन्माने ब्राह्मण असूनही जो दुराचारी असेल तो खरा ब्राह्मण नाही आणि जन्माने शुद्र असूनही तो सदाचारी असेल तर तो ब्राह्मणाच्या (योग्यतेचा) आहे. (दोघेही जन्माने व जन्मभर शूद्र आणि ब्राह्मण असेच राहणार.)
पण अशा ब्राह्मणाच्या योग्यतेच्या पण जन्माने शूद्र असलेल्या व्यक्तीला प्रस्तुत जन्मी व्यामुनींच्या स्वधर्मकर्मात ‘शूद्रकर्म टळत नाही. अनुशासनपर्वातील (अध्याय १३१) व्यासमुनींचा महेश्वर उमेला ईश्वरी अधिकारवाणीने शूद्रजन्माचे जन्मभरचे शूद्रकर्म सांगतो आहे.
शूदकर्माणि सर्वाणि यथान्याय यथाविधि।
शुश्रूषां परिचर्यां च ज्येष्ठे वर्णे प्रयत्नतः।
कुर्यादविमनाः शूद्रः सततं सत्पथे स्थितः।
शेषान्नकृतभोजनः ……
असे जर तो शूद्रजन्मा या प्रस्तुत जन्मी करील तर पुढील जन्मी तो शूद्र ‘वैश्यत्वमृच्छति।’ असे येथे व्यासमुनी ग्रेसमार्कदेऊन शूद्राला थोड्या वरच्या अशा वैश्य वर्णात मोठ्या मुष्किलीने ‘प्रमोट करण्याचे (नसलेल्या) पुढील जन्मीचे भविष्यकथन करतात. (आम्ही प्रारंभी विवेचन केलेल्या तार्किक संगतीनुसार हे अशक्यच.)
(ब) ‘कर्मविभागशः चातुर्वर्यं मया सृष्टं।’ असा अर्थ लावीत, व्यक्तीच्या कर्मस्वातंत्र्याला वाव आहे, त्याच्या कर्मानुसार वर्ण ठरतात असे जे प्रतिपादन केले जाते, त्याला विरोधी जाणारे संदर्भ व्यासमुनींच्या महाभारतात इतरत्र दिसतात.
शांतिपर्व अध्याय ६० धर्मभीष्मसंवादामध्ये वर्णाच्या योग्यतेनुसार त्याचे कर्मही जन्माबरोबरच ब्रहम्याने दिलेले असते असे म्हटले आहे असे दिसून येते. धर्मः ‘सृष्टो ब्राह्मणा त्रिषु वर्णेषु दुष्टः।’म्हणजे तीन वर्षांसाठी ब्रह्म्याने त्यांच्या योग्यतेनुसार योग्य ते धर्म (कर्म) पाहून निर्माण केले असा अर्थ स्पष्ट होतो. याच अध्यायातील याच धर्मभीष्मसंवादामधील
‘तस्माद्वर्णा ऋजवो जातिधर्माः संसृज्यन्ते।’ या उक्तीचा याच दिशेने अर्थ लागावा.
जन्माबरोबरच येणारे कर्माचे सूचन खालील उक्तीतून ध्वनित होते.
प्राङ्नाभिवर्धनात्पुंसो जातकर्म विधीयते।। (वनपर्व अध्याय १७९)
जातकर्मादिभिर्यस्तु संस्कारैः संस्कृतः शुचिः। (शांतिपर्व अध्याय १८२)
वरील संदर्भातील ‘जातकर्म हे लक्षणीय स्वरूपाचे आहे. व्यासमुनींच्या महाभारतातील ‘जातकर्म जवळ जवळ महाभारतकालीन (म्हणून त्यांना ज्ञात असणार्याव) आश्वलायन ते द्राह्यायण या दहाही गृह्मसूत्रकारांनी शूद्रवर्णाला दिलेले नाही. जन्मतःच मध, गाईचे तूप आणि पित्याच्या हाताच्या बोटातील सुवर्णागुलीयकाचे उगाळलेले आठ दहा सुवर्ण फेरे जे जन्मभरच्या मेधाजनन बुद्धितत्त्वासाठी आहेत असे जन्मतःच केले जाणारे अपत्याबाबतचे जातकर्म शूद्र अपत्यासाठी नाही. (त्याच्या पित्याजवळ मध, तूप, सुवर्णागुलीयक नाहीच. ते त्याला नाकारलेले!) यावरून जन्माबरोबरचा शूद्राचा मेधाजननावरील बुद्धितत्त्वावरील भविष्यकालीन कर्माधिकार व्यासमुनी त्याला जन्मतःच नाकारून ठेवीत आहेत हेच ध्वनित होते.
महाभारतातील वर्णव्यवस्थेसंबंधित वरील संदर्भ पाहता व्यक्तीच्या गुणानुसार कर्म आणि त्या कर्मानुसार वर्ण अशी संगती राखून चातुर्वण्र्यं मया सृष्टं।। असे दिसत नसून गुणकर्मासहित जन्माधिष्ठित ‘चातुर्वण्र्यं मया सृष्टं।’ असेच हे हे प्रतिपादन आहे हे स्पष्ट व्हावे. आणि या सर्वाचे Essence घ्यावयाचे तर गुणही बाजूला राहतात. आणि जन्माधिष्ठित विषमताधारित वर्ण आणि त्यानुसारच कर्म अशीच व्यवस्था प्रजापतीने, ब्रह्म्याने, कृष्णाने निर्माण केली आहे असेच स्थापितांना पोषक संरक्षक तत्त्वज्ञान व्यासमुनीने गीतेसहित महाभारतभर मांडले आहे असे दिसून येते.
———— ———— —————— —————
भारतीय प्रमुख दर्शनांतून गीता-ज्ञानेश्वरीत आलेली ही तथाकथित आदर्श वर्णव्यवस्था; तिची अशास्त्रीयताही या छोट्या टिपणात जाता जाता उघड होणे आवश्यक आहे. त्यासाठी याबद्दलच्या काही ज्ञात्यांच्या प्रतिक्रिया नोंदविण्यासारख्या :
या सत्त्वरजतम जैगुणाधिष्ठित कृत्रिम अशा चार मानवी समाजगटाबद्दलची डॉ. आंबेडकरांची प्रतिक्रिया आधुनिक मानसशास्त्राच्या कसाला उतरेल अशी आहे. त्यांची प्रतिक्रिया अशी :
‘मानवी समूहाचे असे वेगळे गट करून पृथक्करण करणे हा मानवी शक्तीबद्दलचा उथळ दृष्टिकोण आहे,….प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा असा एक वेगळा वर्ग असतो.. प्रत्येक व्यक्तीमध्ये अनेक प्रकारच्या मिश्र वृत्ती असतात.
याचे उत्तम उदाहरण गीता-ज्ञानेश्वरीतील श्रीकृष्णाचेच देता येईल. याचा संभव क्षात्रयोनीतला. संस्कार शूद्राघरचे (गवळी). तो लढाया क्वचितच मारतो. डिप्लोमसी (ब्रह्मकर्म की क्षात्रकर्म) हे त्याचे आवडते क्षेत्र! भारतीय युद्धात तो सारथ्य (शूद्रकर्म) करतो. तोंडाने तत्त्वज्ञान (ब्रह्मकर्म) सांगतो. भीष्मावर चालून जाताना सुदर्शनचक्र हाती घेतो (क्षात्रकर्म).त्यानेच ज्याचा आग्रह धरला त्या ‘स्वधर्माचे त्याच्याच बाबतीतकाय झाले? त्याचा स्वधर्म कोणता? त्याचे स्वधर्मकर्म कोणते? त्याचे जन्मजात गुण कोणते? त्याचा वर्ण कोणता?
अलीकडे वसंत पळशीकर यांनी उपस्थित केलेले प्रश्नही निरुत्तरित राहणारे. तेअसे; प्रत्येक व्यक्ती जन्मतः बिनवर्णाची असे. आणि प्रौढपणी तिने स्वतःच्या अंगचे गुण प्रकट केल्यानंतर वा ती करीत असलेली ‘कर्मे विचारात घेऊन तिचा योग्य वर्णात समावेश केला जात असे असा काळ कोणता? व तो समाज कोणता? कोण कोणत्या वर्णाचा हे कोण ठरवीत असे व कसे ठरत असे?
दि. य. देशपांडे यांचे फेब्रुवारी अंकातील ऐतिहासिक निरीक्षण असेच महत्त्वपूर्ण ते असे; चातुर्वर्ण्य कोणीही निर्माण केले नाही ही वस्तुस्थिती आहे ते जर परमेश्वराने निर्माण केलेले असते तर ते फक्त हिंदुस्थानातच आढळले नसते, तर सर्व जगभर दिसले असते. हिंदुस्थानच्या सारखी जन्मजात चातुर्वर्यव्यवस्था हिंदुस्थानाखेरीज कुठेही नव्हतीआणि नाही.
——— ———– ——— ————
वरील सर्व विवेचन लक्षात घेतले तर जन्मजात गुण, कर्म, वर्ण यांची संगती कुठेच लागत नाही असाच निष्कर्ष निघतो. तरीही गुणकर्माचा आधार देतघेत प्रतिपादन केलेली ही चातुर्वर्यव्यवस्था कृत्रिम, अशास्त्रीय, अनैतिहासिक व अन्यायकारक असूनही आदर्श समाजरचना म्हणून तिचा आग्रह धरला गेला आहे. गीता ज्ञानेश्वरी या दोन्ही संहितांमध्ये तिला ‘ईश्वरी पुरस्कार दिला गेला आहे. या दोनही संहितांमधील या विषमतेचा पुरस्कार करणार्‍या व्यवस्थेला ‘ईश्वरी करणी’ असे स्वरूप देण्याच्या प्रयत्नांची नोंद फसवे समर्थन न देता धिक्कारासहितच झाली पाहिजे.
एवढेच नव्हे तर ‘चातुर्वर्यं मया सृष्टं।’ म्हणजे जन्मजात स्थापित उच्चवर्णीयांना शोषणाचे हक्क देणारा आणि जन्मजात शूद्रांना दासत्व देणारा, व्यासमुनीने ईश्वराच्या नावाने काढलेला पक्षपाती, समताविरोधी, पर्यायाने मानवताविरोधी जाहीरनामाच आहे. शूद्रांच्या दृष्टीने तर तो काळा हुकूमनामाच आहे, असेच म्हटले गेले पाहिजे.

आता नवविवेकवादाची गरज आहे

‘आजचा सुधारक’च्या फेब्रुवारी १९९२ च्या अंकात प्रा. दि. य. देशपांडे यांच्या गीतेवरील लेखांवर आक्षेप घेणारा माझा ‘हे विवेकवादी विवेचन नव्हे!’ हा लेख व त्यावरील प्रा. देशपांडे यांचा मर्यादित खुलासा प्रसिद्ध झाला आहे.
ह्या मर्यादित खुलाशातही मी उपस्थित केलेल्या मुद्यांना सोयीस्कर कलाटणी देण्यात आली आहे. उदाहरणार्थ, मोक्षशास्त्र हे बुद्धीच्या आवाक्यापलीकडे आहे असे मी म्हटलेले नाही. उलट, विज्ञान मोक्षशास्त्रालाही बुद्धीच्या आवाक्यात आणीत आहे याची उदाहरणे मी दिली आहेत. हा प्रयत्न पुरेसा निर्णायक होईपर्यंत मोक्षशास्त्राबद्दल पूर्णविश्वास किंवा पूर्ण अविश्वास व्यक्त न करणे हेच विवेकवादाशी सुसंगत होईल असे मी म्हटले आहे.
अशीच सोयीस्कर कलाटणी गीतेतील नीतिशास्त्राच्या माझ्या मुद्द्यालाही देण्यात आली आहे. लोकसंग्रह, धारणा, साधूचे परित्राण, धर्मरक्षण इ. शब्दांद्वारे गीतेतील नीतिशास्त्र सूचित होते असे मी म्हटले आहे. ह्या संदर्भात मी चातुर्वण्र्याचा उल्लेख केलेला नाही. परंतु चार्तुवण्र्याचे नैतिक समर्थन होत नाही असा युक्तिवाद करून प्रा. देशपांडे यांनी वरील शब्दांकडे दुर्लक्ष केले आहे. वस्तुतः गीतेत जागोजागी आलेला ‘धर्म’ शब्द ह्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा आहे. धर्म हा मोक्षाहून वेगळा असा पुरुषार्थ आहे. त्यामुळे धर्मसाधना ही मोक्षसाधनेहन भिन्न आहे. ‘धर्म हा रिलिजन’ ह्याच्याशी समानार्थी शब्द नव्हे. त्यात अभ्युदयाचे सामाजिक लक्ष्य अभिप्रेत आहे. गीतेतील नीतिशास्त्राचा तो महत्त्वाचा निकष आहे. तेव्हा ‘गीतेत नीतीचा विचार प्रायः नाहीच’ असे म्हणता येणार नाही.
समाजसुधारणेच्या बाबतीत जुन्यातील दोषांवर घणाघाती आघात करून जुन्या श्रद्धास्थानांना नष्ट करण्याच्या मार्गापेक्षा जुन्यातील चांगल्याला अधिक विकसित करून दोषांना तेवढे निष्प्रभ करण्याचा मार्ग अधिक श्रेवस्कर व यशोदायी आहे असे मी माझ्या लेखात म्हटले आहे. ह्यावर टीका करून प्रा. देशपांडे ‘संतांनी गेल्या ८०० वर्षात काय प्रगती केली?’ अशी पृच्छा करतात व महात्मा फुले, आगरकर, डॉ. आंबेडकर यांच्या कठोर प्रहारांमुळेच सुधारणा झाल्या आहेत असे प्रतिपादन करतात. ह्यावर मला असे म्हणावयाचे आहे की मोगली आक्रमकतेमुळे स्वसंरक्षणासाठी जुन्या कर्मठ रूढींना चिकटून राहण्याची गरज निर्माण झाली नसती तर संतांनी आध्यात्मिक क्षेत्रात सुरू केलेला समतेचा सुधारकी विचार इतर क्षेत्रांतही हळूहळू पण दृढपणे झिरपत गेला असता. तसेच महात्मा फुले, आगरकर, डॉ. आंबेडकर इ. सुधारकांनी ज्या वर्गाचा तेजोभंग न करता व त्यांचा आत्मविश्वास जोपासून त्यांच्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला त्या वर्गापुरतेच ते मुख्यतः यशस्वी झाले. इतर वर्गामध्ये जागृती करण्याचे पूरक कार्य तशाच विधायक पद्धतीने विवेकानंद, वा. म. जोशी, टिळक, सावरकर व महात्मा गांधी यांनी केले. आज जी थोडीबहुत सुधारणा दिसते ती ह्या दोन सुधारक वर्गाच्या प्रयत्नांचा संयुक्त परिणाम आहे. उलट, उपरोक्त सुधारणाकार्यात जेथे जेथे मर्यादेच्या बाहेर ‘कठोर टीका’ झाली तेथे कटुता वाढत गेली व त्या कटुतेचे परिणाम आजही आपणास दिसतात.
परंतु वरील मुद्दे माझ्या लेखांतील आनुषंगिक मुद्दे होते. माझा मुख्य आक्षेप प्रा. देशपांडे यांच्या तथाकथित ‘विवेकवादी विवेचना’ वर होता. ह्या संदर्भात प्रा. देशपांडे यांनी मला आजचा सुधारक मधून त्यापूर्वी आलेले काही लेख काळजीपूर्वक वाचण्याची व त्यात दोष दिसल्यास आक्षेप घेण्याची सूचना केली आहे. त्याप्रमाणे मी ते लेख वाचून काढले आहेत. ते वाचल्यावरही मला मी उपस्थित केलेल्या मुद्द्यांत बदल करावा असे वाटत नाही. त्याची कारणे व त्या लेखांतून सुचलेले विचार पुढे देत आहे. ह्या लेखांतील प्रा. देशपांडे यांच्या आजचा सुधारक मधील प्रतिपादनांचा संदर्भ त्या त्या ठिकाणी कंसात दिला आहे.
१८ व्या व १९ व्या शतकांत आधुनिक विज्ञानाने अभूतपूर्व अशी प्रगती केली. तीमुळे विचारी जग स्तिमित झाले व विज्ञानाने स्वीकारलेली विवेचन-पद्धती हीच ज्ञानसंपादनाची व विवेचनाची एकमेव प्रमाण पद्धती आहे अशी धारणा दृढमूल झाली. यातूनच आधुनिक विवेकवादाचा जन्म झाला. ह्यात ‘इंद्रियानुभव हा ज्ञानाचा अंतिम निकष’ मानला गेला ; ( नोव्हें. १९९० पृ. ३ ) व ‘विश्वाचे ज्ञान मिळविण्याचे वैज्ञानिक पद्धतीहून अन्य साधन मानवाजवळ नाही असा विज्ञानाचा दावा आहे’ अशी समजूत रूढ़ झाली. हे विश्व कसे निर्माण झाले? दिक्कालातीत काही आहे काय? इत्यादी अंतिम प्रश्नांची उत्तरे विज्ञान देऊ शकत नाही आणि म्हणून ती देण्याच्या भानगडीत ते पडत नाही, ( पूर्वोक्त, पृ. ४) विज्ञान हेच विश्वासार्ह आहे, ( फेब्रु. १९९१, पृ.८) ज्ञानाच्या क्षेत्रात विज्ञानाला जे अज्ञेय असेल ते अन्य कोणालाही ज्ञेय असू शकत नाही, (जुलै, १९९१,पृ. ३) उद्गामी व निगामी पद्धतीने वैज्ञानिक ज्ञान मिळते; व ते इंद्रियानुभवावर आधारलेले असते, (फेब्रु.१९९१,पृ.६-७) विज्ञान म्हणजे सर्वमान्य अशा निश्चित ज्ञानाचा सतत वाढत जाणारा एक विशाल संचय आहे.
(जुलै १९९०,पृ १२) आणि अशा वैज्ञानिक प्रक्रियेनुसार म्हणजे पेंद्रिय अनुभव व सुसंगत तर्क या प्रमाणावर जे सत्य ठरेल तेच आम्ही स्वीकारू अशी भूमिका म्हणजे विवेकवाद होय, असे विचार रूढ झाले.
ह्या दृष्टीने अध्यात्म हे विज्ञान नाही, (नोव्हें. १९९०,पृ.४) अध्यात्म म्हणजे मानवाला अनुकूल असे निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न; हा पूर्णपणे निराधार असून तो इच्छापूर्तीच्या ( Wish-fullfilment) स्वरूपाचा असतो. (पूर्वोक्त,पृ.१०) अध्यात्मातील ज्ञान दोन साधनांनी मिळते. (१) शब्दप्रमाण किंवा आप्तवचन आणि (२) साक्षात्कार व ही दोन्ही साधने अनिर्णायक आणि अविश्वसनीय आहेत, (नोव्हें.१९९० पृ.७) विज्ञानात आप्तवचन नावाची गोष्ट नाही, (जुलै १९९१,पृ.६) साक्षात्कार म्हणजे ‘ज्ञेय वस्तूचे साक्षात ज्ञान, ते निर्मध्यस्थ ज्ञान’ असते, (पूर्वोक्त,पृ४-५) साक्षात्कारी मनुष्याची मनःस्थिती साधारण ( normal) नसते, ती विसाधारण (abnormal) असते, साक्षात्काराची जी साधना आहे तिचे स्वरूप बरेचसे स्वसंमोहनाचे (self hypnosis) आहे, (जुलै, १९९०,पृ. १६) त्यामुळे साक्षात्कारी प्रामाणिक असले तरी त्यांचा साक्षात्कार ‘खरा’ असत नाही. (पूर्वोक्त,पृ. १५) शिवाय साक्षात्कारातून प्रतीत होणारे वास्तव साक्षात्कारागणिक भिन्न असते, त्यात एकमत नसते, जशी श्रद्धा असेल तसा साक्षात्कार होतो व त्यामुळे ते ज्ञानप्राप्तीचे साधन ठरत नाही. (पूर्वोक्त पृष्ठ १६) अशी विवेकवादाने भूमिका घेतली.
१८ व्या व १९ व्या शतकातील विज्ञानाच्या प्रभावाने निर्माण झालेला विवेकवाद वरील प्रकारचा आहे व प्रा. देशपांडे आजही त्याच प्रभावाखाली आहेत असे दिसते,
परंतु २० व्या शतकात विज्ञानाच्या स्वरूपात व महत्त्वात बरेच बदल झाले आहेत. त्यांची प्रा. देशपांडे यांनी दखल घेतलेली दिसत नाही.
विज्ञानाची अध्ययनपद्धती विश्लेषणात्मक असते. तीत एखाद्या वस्तूला किंवा तिच्या भागाला इतर सर्व वस्तूंपासून किंवा वस्तूच्या भागांपासून अलग करून त्याचे परीक्षणकेले जाते. अशा अध्ययनातून होणारे ज्ञानं खरे असले तरी पूर्णाशाने यथार्थ राहत नाही. त्यामुळे अशा ज्ञानाच्या उपयोजनेतून घातक पार्श्वपरिणाम (side effects) निर्माण होतात. यांचा संकलित परिणाम म्हणून सर्वसंहारक अशा पर्यावरण-संतुलन-नाशाचे-महाभयानक संकट मानवजातीपुढे उभे ठाकले आहे. अध्यात्मजनित संकटांपेक्षाही हे संकट अतिभयानक आहे. विज्ञानात मूल्यांना महत्त्व नाही. आणि वैज्ञानिक ज्ञान हेच खरे ज्ञान मानले गेल्यामुळे मूल्यांचा व्हास होत आहे. त्यामुळे मानवजातीच्या भौतिक विनाशाबरोबरच नैतिक विनाशाचेही संकट निर्माण झाले आहे.
विज्ञानामुळे वस्तुजाताचे यथार्थ ज्ञान होते ह्या श्रद्धेलाही तडा जाऊ लागला आहे. सगळे कावळे काळे आहेत असे आपण म्हणतो कारण पृथ्वीभोवतालच्या प्रकाशकिरणांच्या ज्या आवरणात आपण त्यांना पाहतो त्यात ते आपणाला काळे दिसतात हे होय. हे आवरण वेगळ्या प्रकाशकिरणांचे असते तर कावळे आपणांस वेगळ्या रंगाचे दिसले असते. त्यामुळे कावळ्यांचा खरा रंग कोणता हा प्रश्न अनिर्णित राहतो. विज्ञानाची जशी जशी प्रगती होत जाईल तसेतसे ह्या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट होत जाईल असे कदाचित म्हणता येईल. परंतु विज्ञानाच्या अंगभूत मर्यादा लक्षात घेता सर्वच बाबतींत असे म्हणता येणार नाही.
वरील सर्व कारणांमुळे १९व्या शतकात विज्ञानावर प्रमाण ज्ञानाचे एकमेव साधन म्हणून जेवढा विश्वास होता तेवढा २० व्या शतकात राहिला नाही. पूर्णाच्या ज्ञानाशिवाय अपूर्णाचे म्हणजे पूर्णाच्या भागाचे- ज्ञान परिपूर्ण होत नाही आणि जीवनाचे ज्ञान मूल्यांच्या ज्ञानाशिवाय अर्थपूर्ण होत नाही म्हणून
विज्ञानाच्या विश्लेषणपद्धतीला साकल्याने विचार करणार्‍या अध्यात्माच्या संश्लेषणपद्धतीची व मूल्यांसहित अंतिम अतएव परिपूर्ण ज्ञानाचा वेध घेऊ पाहणार्‍या अध्यात्माची जोड देण्याचा विचार पुढे येऊ लागला आहे. विश्वाचे ज्ञान मिळविण्याचे साधन हा जसा विज्ञानाचा दावा आहे तसाच तो अध्यात्माचाही आहे. हा दावा निव्वळ भ्रम आहे की त्यात काही तथ्य आहे हे योग्य पद्धतीने पडताळा पाहिल्यानेच समजेल. त्यात तथ्य असेल तर विज्ञानाच्या विकासला त्याची मदतच होईल. अध्यात्माच्या क्षेत्रातील सगळ्याच व्यक्तींना विशेषतः उच्च बौद्धिक पातळी असणार्‍या तज्ज्ञांना अगदीच अविश्वसनीय मानण्याचे कारण नाही. विज्ञानातील उणीवा व त्या दूर करण्याचे संभाव्य मार्ग इतरांपेक्षा वैज्ञानिकांनाच अधिक स्पष्टपणे जाणवू शकतात. तेव्हा वैज्ञानिक-निदान श्रेष्ठ दर्जाचे वैज्ञानिक- जेव्हा अध्यात्माचीही भाषा बोलतात तेव्हा ते सामान्यजनाप्रमाणेच भ्रमिष्टपणे किंवा अगतिकतेने बोलतात असे सरसकट मानण्याचे कारण नाही. परंतु आईन्स्टीनसारख्या अव्वल दर्जाच्या व जगन्मान्य वैज्ञानिकाच्या आध्यात्मिक वक्तव्यांची अवैज्ञानिकांच्या वक्तव्यांप्रमाणेच प्रा. देशपांडे धोपटमार्गी वासलात लावतात. (जुलै १९९१ पृ.७) त्यांच्या वक्तव्यात काही विवेकवाद असू शकेल अशी शंकाही त्यांच्या मनाला शिवतनाही. राजापेक्षाही अधिक राजनिष्ठ अशी त्यांची भूमिका दिसते. त्यामुळेच १९व्या शतकातील कथाकथित विवेकवादाला ते घट्ट चिकटून आहेत.
‘हे विश्व कसे निर्माण झाले?’ इ. अंतिम प्रश्नांची उत्तरे विज्ञान देऊ शकत नाही आणि म्हणून ती देण्याच्या भानगडीत ते पडत नाहीत ह्या प्रा. देशपांडे यांच्या विधानावरूनही ( नोव्हें. १९९०, पृ.४) हेच दिसून येते. वस्तुतः २० व्या शतकात विज्ञान ह्या भानगडीत जोराने पडले आहे व त्याचे कही टप्पेही त्याने गाठले आहेत. विशेष म्हणजे ह्या प्रयत्नांत ते अध्यात्माच्या – विशेषतः भारतीय अध्यात्माच्या – बरेच जवळ येत आहे. खगोलभौतिकी ( Astrophysics) व विश्वविज्ञान (Cosmology) ह्या ह्या संबंधीच्या विज्ञानातील नवीन शाखा आहेत. ह्या विषयावर ‘A Brief History of Time’ नामक सुबोध ग्रंथ स्टीफन हॉकिंग नामक प्रख्यात वैज्ञानिकाने लिहिला आहे.आइन्स्टीननंतरचा अतिबुद्धिमान सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ (The most brilliant theoretical physicist since Einstein) असा लेखकाचा ग्रंथात परिचय देण्यात आला आहे. भारतीय अध्यात्मशास्त्राचा लेखकाने अभ्यास केला आहे असा ग्रंथात कोठेही पुरावा मिळत नाही. त्यांनी केलेले विवेचन पूर्णतः वैज्ञानिक आहे. तरीदेखील भारतीय अध्यात्मशास्त्राशी विलक्षण साम्य असलेले अनेक सिद्धान्त ह्या ग्रंथात दिसतात. त्यांतील महत्त्वाचे सिद्धान्त पुढीलप्रमाणे आहेत. ह्या ग्रंथाच्या १९८८ च्या आवृत्तीतील संदर्भस्थळांचे पृष्ठक्रमांक कंसात दिले आहेत.
विज्ञानाच्या ‘conseravation of energy’ ह्या नियमानुसार कोणतीही वस्तु म्हणजे ऊर्जा किंवा तत्सम वस्तुमान याची नवनिर्मिती किंवा विनाश होत नाही. (पृ.१९४) विश्वाच्या आरंभी एकच तत्त्व (Singularity) होते. ते स्थलातीत व कालातीत असे शून्य अवस्थेत (Zero size) होते. त्या एकतत्त्वाचा मोठा उद्रेक (Bigbang) होऊनच अनेकांची उत्पत्ती झाली. सर्व विश्व सूक्ष्म कणांचे (particles) किंवा (waves) बनले आहे. (पृ. ९-१० व प्रकरण ८) अनिश्चितता तत्त्वानुसार ( UncertaintyPrinciple) ह्या प्राथमिक अवस्थेतील कण कोणते स्थान व कोणता वेग घेतील हे निश्चित नसते ( पृ. ५८५९).यदृच्छेने होणार्‍या  त्यांच्या भिन्न भिन्न संयोगाने सृष्टीतील समस्त वस्तुजात निर्माण होत जाते. त्यात ( ब्रह्म-माया जोडीप्रमाणे ) प्रत्येक कणाला किंवा वस्तूला प्रतिकण किंवा प्रतिवस्तू (Particle antiparticle pair) निर्माण होते. ( पृ.७३, ८१ व ११३ ) अशा तर्हेeने विश्वाचा विस्तार ( Expansion) होत होत अशी अवस्था येते की त्याचा विस्तार थांबून संकोच होत जातो व तेपुन्हा एकतत्त्वाच्या अवस्थेत ( Big crunch) येते. (प्रकरण ८)
विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती व लयासंबंधीचे हे सिद्धांत हॉकिंगने गणिताच्या आधारे मांडले. हे सिद्धांत प्रयोगाद्वारे सिद्ध होणारे नाहीत. परंतु हे सिद्धांत खरे असतील तर वर्तमान काळाकरिता गणिताने अनुमानित केलेले त्यांचे परिणाम आजही इंद्रियजन्य ज्ञानसाधनांद्वारे प्रत्यक्ष पाहता येतील व ते तसे आढळले तर त्यांचा आधार असलेलेपूर्वसिद्धान्त ह्या उलट्या प्रक्रियेने खरे सिद्ध करता येतील. ह्या पद्धतीने वरील सिद्धांन्तांचे वैज्ञानिक यथार्थत्व बर्याकच प्रमाणात सिद्ध झाले आहे असे हॉकिंगचे म्हणणे आहे. हॉकिंगने पुढे असेही म्हटले आहे की, “ मात्र, विश्व त्याच्या प्रारंभसमयी अमुकच स्थितीत असले पाहिजे याबद्दल (विज्ञानाचे ) नियम काहीही सांगत नाहीत. त्यामुळे (विश्वाचे ) कालयंत्र गुंडाळणे (किंवा बंद करणे ) आणि हवे तसे सुरू करणे परमेश्वराधीन राहू शकेल (असे मानता येईल ) जो पर्यंत (विज्ञानानुसार) विश्वाला प्रारंभ (आदी) होता, तोपर्यंत त्याला निर्माता आहे हे मानणे शक्य होते. परंतु जर विश्व खरोखरच पूर्णपणे आत्मनिर्भर असेल, त्याला मर्यादा किंवा कडा नसेल, तर त्याला आदि किंवा अंत राहणार नाही ; ते निव्वळ सत् असेल. अशा स्थितीत निर्मात्याला काय स्थान राहणार?” (However, the laws do not tell us what the universe should have looked like when it started – It would still be up to God to wind up the clockwork and choose how to start it off. So long as the universe had a beginning, we could suppose it had a creator. But if the universe is really completely self-contained, having no boundary or edge, it would have neither beginning nor end: it would simply be, what place, then, for a creator? – पृ. १४९)
वरील अवतरण हे दर्शविते की ज्या काळी (म्ह. १९ व्या शतकात ) विश्वाला प्रारंभ आहे असा वैज्ञानिक सिद्धान्त होता त्या काळी विश्वाचा निर्माता म्हणजे देव असण्याची शक्यता विज्ञानाला नाकारता येणे शक्य नव्हते. परंतु आता (म्ह. २० व्या शतकात) विश्व हे पूर्णमिदं व अनादि आणि अनंत असे विज्ञानाला दिसू लागले आहे व त्यामुळे विश्वाच्या बाहेर असलेल्या कुणी देवाने ते निर्माण केले हे मानणे, ठामपणे नसले तरी बर्यााच प्रमाणात, शक्य नाही.
हॉकिंगने उपरोक्त विवेचन सेमेटिक – विशेषतः ख्रिश्चन – धर्माच्या संदर्भात केलेले आहे हे उघड आहे. त्या धर्मात विश्वाच्या बाहेर असलेल्या देवाने विश्वाची निर्मिती केली अशी संकल्पना आहे. भारतीय अध्यात्मशास्त्रात सनातन ब्रह्माची कल्पना आहे. हे सत् आहे, चित् आहे (आणि आनंदही आहे). ते पूर्ण आहे आणि शून्यही आहे. ते ‘अणोरणीयान’ व ‘महतो महीयान्’ आहे. आणि त्यातूनच ‘एकोहं बहुस्याम्’ ह्या तत्त्वानुसार संपूर्ण विश्व निर्माण झाले, व त्यानेच ते व्यापले आहे. आणि शून्यातून विस्तारलेले हे जग पुन्हा शून्याकडे जाऊ लागते. हॉकिंगने सांगितलेले आधुनिक विज्ञानाचे स्वरूप अशा रीतीने भारतीय अध्यात्मशास्त्राच्या जवळ आले आहे.
जेम्स वॅलेस नावाचा आधुनिक विज्ञानाचा व भारतीय अध्यात्मशास्त्राचा पाश्चात्त्य अभ्यासक तर ह्यापुढे गेला आहे. त्याने ‘Brahman —> E = Mc२(c-sq.)’ ह्या शीर्षकाचा ग्रंथ लिहून आधुनिक विज्ञान व भारतीय अध्यात्मशास्त्र यांतील साम्य स्पष्ट केले आहे.
हे साम्य वरवरचे असणे जितके शक्य आहे तितकेच ते तसे नसणेही शक्य आहे. त्याची काही सबळ कारणेही आहेत.
आधुनिक विज्ञान अंतिम प्रश्नांचा विचार गणिताच्या साह्याने करते. भारतीय अध्यात्मशास्त्राचा मूलस्रोत असलेल्या वेदांमध्ये अत्यंत प्रगत अशा गणितशास्त्राचे विवेचन आहे असे त्या क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. क्लिष्ट गणित सुलभ करणार्‍या शून्य संख्येचा व दशमान पद्धतीचा उगम भारतातच झाला आहे. प्रचंड अंतरे मोजण्यासाठी खर्व, निखर्व, महापद्म इत्यादी संख्याही येथे निर्धारित करण्यात आल्या. तसेच आधुनिक प्रकाश-दिवस, प्रकाश-वर्ष ह्यासारख्या ब्रहम्याचा दिवस, ब्रहम्याचे वर्ष अशा संज्ञाही येथे प्रचलित झाल्या. गणिताचा प्रचंड व्याप दर्शविणार्‍या ह्या संख्या व संज्ञा गरजेशिवायच निर्माण झाल्या असतील असे म्हणता येणार नाही. तेव्हा वैदिक गणिताचा जसाजसा अभ्यास वाढेल तसा तसा भारतीय अध्यात्मशास्त्राला गणिताचा वैज्ञानिक आधारआहे काय हे स्पष्ट होत जाईल.
विश्वाचे सत्यज्ञान मिळविण्याचा साक्षात्कारहाही मार्ग भारतीय अध्यात्मशास्त्रात सांगितला आहे. कावळ्याचा रंग काळा आहे हे व्यावहारिक सत्य असले तरी अंतिम दृष्टीने ते अज्ञानच आहे हे आधुनिक विज्ञानालाही मान्य व्हावे. इंद्रियजन्य सर्व ज्ञानाबद्दल असेच म्हणता येईल. अशा अज्ञानाच्या आवरणामुळे सत्यज्ञान झाकले गेले आहे असे भारतीय अध्यात्मशास्त्राचे प्रतिपादन आहे. योगसाधनेच्या द्वारे चित्तवृत्तिनिरोध करून साधकाला निलेंपता (Unconditioning) प्राप्त होऊ शकते व अशा निर्लिप्त अवस्थेत साधकाला होणारे ज्ञान हे पूर्णतया वस्तुनिष्ठ(Objective) आणि सत्य ज्ञान असते असा योगशास्त्राचा दावा आहे. हाच साक्षात्कार होय. विज्ञानाने मिळणार्‍या ज्ञानात नाही म्हटले तरी आत्मनिष्ठतेचा व अभ्यासविषयाच्या मायास्वरूपाचा ( म्ह. अयथार्थ स्वरूपाचा ) काहीतरी अंश राहतोच. एखाद्या वस्तूच्या एका प्रकाराने मिळालेल्या ज्ञानाचा त्याच व अन्य प्रकारांनी वारंवार पडताळा घेऊन इंद्रियजन्य ज्ञान अधिकाअधिक वस्तुनिष्ठ करण्याचा विज्ञान प्रयत्न करते व त्यात त्याला बरेच यशदेखील येते. परंतु अखेरीस विज्ञानाला मर्यादाआहेतच. योगशास्त्रज्ञ म्हणतात त्याप्रमाणे साधक स्वतःला पूर्णपणे निर्लेप जर करू शकला तर सत्यज्ञान मिळविण्याचा तो विश्वसनीय मार्ग होऊ शकेल. आणि सर्वं खल्विदं ब्रह्म असल्यामुळे साक्षात्काराने होणारे आत्मज्ञान हे ब्रह्मज्ञान म्हणजेच विश्वाचे अंतिम ज्ञान असू शकेल.
विज्ञान असो की अध्यात्म असो, त्यात पराकोटीचे ज्ञान संपादन केलेल्या तज्ज्ञांची संख्या बोटावर मोजण्याइतपतच असणार. आईन्स्टीनच्या सिद्धांतांचे परिपूर्ण आकलन असणार्‍यांची संख्या एकेकाळी फक्त तीनच होती असे म्हणतात. आजही ती फार जास्त असण्याचा संभव नाही. अध्यात्माच्या क्षेत्रातही गीता म्हणते त्याप्रमाणे हजारो मनुष्यांमधून एखादाच योगसिद्धीचा प्रयत्न करतो आणि असा यत्न करणच्या हजारो सिद्धांमधून एखादाच अंतिम ज्ञान प्राप्त करू शकतो. तेव्हा दोन्ही क्षेत्रांत सामान्यजनांना आप्तवचनांच्या आधारानेच आपला विवेक निर्धारित केला पाहिजे.
मात्र विज्ञानापेक्षा अध्यात्माच्या क्षेत्रात विवेक निर्धारित करणे बरेच कठीण आहे. विज्ञानात इतर वस्तूंवर प्रयोग होतात व त्यामुळे त्यात वस्तुनिष्ठता येण्याचा संभव जास्तअसतो. उलट, अध्यात्मात स्वतःवरच प्रयोग केले जातात त्यामुळे त्यात आत्मसापेक्षता येण्याचा मोठा धोका असतो. विज्ञानाचे निष्कर्ष प्रयोग, निरीक्षण इ. माध्यमांच्या द्वारे इतर व्यक्तींकडे संक्रामित करणे सुलभ असते. अध्यात्मातील अनुभव तसे संक्रामित करता येत नाहीत. समान अनुभूतींच्या द्वारे ते संक्रामित करावे लागतात. परंतु साधकाची जी अवस्था असेल तिला अनुसरुन त्याच्या अनुभूतीचा स्तर असतो. त्यामुळे निरनिराळ्या साधकांच्या निरनिराळ्या अनुभूती असू शकतात व त्यात एकवाक्यता निर्माण होणे कठिण जाते. त्यामुळे खरा कोण खोटा कोण हे ठरविणे सहजशक्य नसते. अध्यात्माच्या आत्मकेंद्रित साधनापद्धतीमुळे साधक जागरूक नसेल तर अधिकाअधिक निर्लिप्त ( Objective) होत जाण्याऐवजी स्वसंमोहनाच्या जाळ्यात अडकून तो अधिकाअधिक लिप्त (Subjective) होत जाण्याचाही त्यात संभव असतो. त्यामुळे अध्यात्माच्या नावाखाली इच्छापूर्तीचा किंवा स्वतःला अनुकूल असे निष्कर्ष काढण्याचा प्रकारही त्यात होतो. श्रद्धा ही ज्ञानमार्गातील पहिली पायरी आहे, परंतु तिचा अतिरेक होऊन शब्दप्रामाण्यावरच भर दिला जातो. तीच गोष्ट देवदेवतांची व मूर्तिपूजेची. अव्यक्ताची साधना सहज शक्य नसल्यामुळे प्रारंभी एखाद्या देवतेवर किंवा मूर्तीवर ( ती कोणतीही चालेल ) लक्ष केंद्रित करून साधनापद्धतीचा सराव करावयाचा व नंतर तिचे लक्ष्य व्यक्तकडून अव्यक्ताकडे सगुणाकडून निर्गुणाकडे वळवावयाचे ही त्यामागील भूमिका आहे. ब्रह्माला ब्रह्म न म्हणता राम, कृष्ण, अल्ला, गॉड किंवा काहीही नाव देऊन साधना केली तरी त्यामुळे फरक पडण्याचे वस्तुतः कारण नसते. काही समाजधारणेची तत्त्वेही त्यांचेशी निगडित आहेत. परंतु ह्यात साधनालाच साध्य मानण्याची गल्लत होत असते. सर्वांत महाभयंकर म्हणजे अंधश्रद्धा, लपवाछपवी, फसवाफसवी यांच्या साह्याने चतुर लोक अध्यात्माचा धंदाही करू शकतात.
अध्यात्मक्षेत्रातील ह्या दोषांचे समर्थन होऊ शकत नाही. सुदैवाने ह्या उणीवा दूर करण्याचे बरेच सामर्थ्य विज्ञानाला प्राप्त झाले आहे. त्यांच्या साह्याने हे दोष नष्ट केले पाहिजेत. सच्च्या अध्यात्मवाद्यांनीही हे दोष दूर करण्याचे उपाय शोधले पाहिजेत.
परंतु वरील दोषांमुळे सगळे अध्यात्मशास्त्रच बाद ठरत नाही. ‘अथातो ब्रह्मजिज्ञासा’ ही त्यामागची प्रेरणा आहे, त्यासाठी त्याची विशिष्ट खडतर साधना आहे व आज मान्य होण्यासारखी त्याची काही उपलब्धीही आहे. २० व्या शतकात विज्ञानाला जे गवसले ते २० पेक्षाही अधिक शतकांपूर्वी अध्यात्माने शोधले होते असे आता दिसू लागले आहे.
ही उपलब्धी तत्त्वज्ञानाची आहे, अध्यात्माची नव्हे असे म्हणण्यात अर्थ नाही. निदान भारतीय अध्यात्मशास्त्रात तसा भेद करता येणार नाही. हॉकिंगच्या उपरोक्त पुस्तकात त्याने एका मजेदार घटनेचा उल्लेख केला आहे. तो व इतर वैज्ञानिक एकदा पोपला भेटावयास गेले असता पोपने त्यांना असा सल्ला दिला की वैज्ञानिकांनी विश्वाच्या उत्पत्तीच्या प्रश्नांसंबधी विचार करू नये कारण ते ईश्वराचे क्षेत्र आहे. ह्याउलट, विज्ञान व अध्यात्मशास्त्र यांच्यात कसलाही संघर्ष असण्याचे कारण नाही असे भारतीय अध्यात्मशास्त्रज्ञम्हणतात. त्यांच्या ह्या विधानाला ‘थाप’ किंवा ‘प्रौढी’ समजण्याचे कारण नाही. सारांश, विज्ञान व भारतीय अध्यात्मशास्त्र आज जवळ येत आहेत. दोन्हीही सत्यान्वेषणाचे पथिक आहेत. त्यांची स्पर्धा परस्परांना पूरक ठरू शकेल अशी आशा बाळगण्यास हरकत नाही.
त्यामुळे १९ व्या शतकातील विज्ञानावर आधारलेला विवेकवाद आता कालबाह्य झाला आहे. २० व्या शतकातील विज्ञानावर आधारलेल्या नवविवेकवादाची आज गरज आहे. त्याचे स्वरूप काय असावे ह्याचे दिग्दर्शन ‘आजचा सुधारक’च्या फेब्रु. १९९२ च्या अंकातील माझ्या लेखात केले आहे.