आर्टिकल १५ – जातिव्यवस्थेचे व नोकरशाहीचे योग्य चित्रण

बड़े बड़े लोगन के महला-दुमहला
और भइया झूमर अलग से
हमरे गरीबन के झुग्गी-झोपड़िया
आंधी आए गिर जाए धड़ से
बड़े बड़े लोगन के हलुआ पराठा
और मिनरल वाटर अलग से
हमरे गरीबन के चटनी औ रोटी
पानी पीएं बालू वाला नल से
कहब त लगीजाइ धक से

डाव्या कम्युनिस्टांच्या या गाण्यानेच चित्रपटाची सुरुवात होते व लगेचच दिग्दर्शक अनुभव सिन्हा फारसा वेळ न दवडता दोन लहान दलित मुलींवरील अत्याचाराची दृश्ये दाखवून चित्रपट वेगवान असल्याची जाणीव करून देतो व प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतो. उत्तरप्रदेशातील उन्नाव येथील सामूहिक बलात्कारांनंतर झाडावर टांगून फाशी दिलेल्या दोन दलित मुलींच्या हत्याकांडाच्या सत्यघटनेवर हा चित्रपट बेतलेला असला तरी हा सिनेमा जात-वास्तव, पोलीस दलातील जातीयवाद, गृहसचिव व सीबीआय, अश्या घटनांतील मिडियाची भूमिका, अत्याचाराविरुद्ध आवाज उठविणाऱ्या दलित नेत्याचे एनकाउंटर इत्यादी अनेक विषयांना वेगाने व नेमकेपणाने हात घालतो. त्यामुळे हा चित्रपट संपल्यानंतरही तुम्हांला अस्वस्थ करत राहील. अनेक प्रशिक्षित कलावंतांच्या अभिनयाने चित्रपट अधिकच उठावदार झाला आहे. अतिशय कौशल्यपूर्ण चित्रीकरणसुद्धा दृश्यांमध्ये श्वास ओतते. डुक्कर-तलावात पूजाला शोधण्यास उतरलेल्या समूहाचे चित्रीकरण तर अप्रतिम असेच आहे. परंतु यात संवादांचे सुद्धा मोठे योगदान आहे, ज्यात मुख्य नायक, अतिरिक्त SP म्हणतात, “आम्हां ब्राह्मणांनाही कधीतरी या चिखलात उतरावे लागणार आहे.”

आमचे मार्गदर्शक व थोर विचारवंत जस्टीस पी.बी.सावंत अनेक वर्षांपूर्वीच म्हणाले होते की सर्वत्र “पोलीस राज” निर्माण झालेले आहे. याचा प्रत्यय हा सिनेमा पाहिल्यावर जरूर येईल. आम्हांला पोलिसांचे नको तर कायद्याचे राज्य हवे आहे याची जाणीव सध्याच्या सत्ताधाऱ्यांना व वरिष्ठ नोकरशहांना वारंवार करून द्यावी लागत आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे, विचारसरणीचे असो – पोलिसांनी कायद्यानुसारच वागले पाहिजे. परंतु असे सहसा दिसत नाही. वरिष्ठ नोकरशहांनी ठरवले तर व्यवस्थेत ते जरूर चांगले बदल घडवून आणू शकतात. हा योग्य संदेशही हा चित्रपट आपल्याला देतो.

आपण हरिजन किंवा बहुजन लगेच बनतो, परंतु जन बनून “जन गण मन”चा भाग कधी बनणार? गेल्या सत्तर वर्षात घटनेने आपल्याला नेमके काय दिले आणि ‘घटने’शी सुरू असलेला हा ‘भारता’चा संघर्ष संपण्याच्या दृष्टिपथात आहे की नाही? सीमेवर मरणाऱ्या जवानांपेक्षा जास्त SC/ST गटर साफ करताना मरतात, परंतु त्यांच्यासाठी कुठे श्रद्धांजली वाहिली जात नाही. ‘रावण’फेम दलित नेत्याचे हे प्रश्न मुख्य भूमिका साकारणाऱ्या अतिरिक्त SP, आयुष्यमान खुरानाला निरुत्तर करतात. सव्वादोन तासांच्या चित्रपटात दोन विनोद सोडले तर त्यातील प्रत्येक मिनिट आपल्याला देशातील अधिकाधिक भीषण जात-वास्तवाकडे नेत राहते. जातिव्यवस्थेची व पोलीस-नोकरशाहीची गुंतागुंत अतिशय चांगली दाखवली आहे. हेच या चित्रपटाचे मोठे यश आहे. आर्टिकल १५ अधिक धाडसाने कुठेही बटबटीतपणा न करता, अतिशयोक्ती न करता अगदी मुळावर योग्य तर्‍हेने प्रहार करताना दिसतो. भारत देश संविधानानुसारच चालेल याची सकारात्मक हमी हा सिनेमा देतो. घटनेचे एक कलम १५ इथल्या जातीयवाद्यांना पचत नाही हेच युपी-बिहारमधील त्यांच्या विरोधावरून दिसते. मग जस्टीस सावंत म्हणतात त्याप्रमाणे “संविधानाची प्रभावी अंमलबजावणी हीच पर्यायी व्यवस्था आपण राबवायला सुरू केली तर काय गहजब करतील हे खरे अतिरेकी?”

जीपवर आगीचा गोळा फेकला जातो त्याच्या तपासात अतिरिक्त पोलिस अधीक्षक निषाद आपली प्रेयसी गौराला विचारतो तेव्हा ती म्हणते, “बहिर्‍यांना ऐकवण्यासाठी मोठ्या आवाजाची गरज असते हे भगतसिंगनी १९२९ सालीच म्हटले होते” हे मी नवव्या वर्गात नागरिकशास्त्रात वाचले आहे. परंतु निषादने जरा जास्तच वाचले आहे. याचा अर्थ त्याला हिंसेची गरज केव्हा भासते व तिचा वापर कसा करावयाचा याचे चांगले ज्ञान आहे. परंतु सरकार पुरस्कृत (नोकरशाही पुरस्कृत) हिंसाचार व दहशतवाद यावर भाष्य राहून गेले आहे.

घटनेचे कलम १५ सांगते की आपण जात, धर्म, जन्मस्थान, लिंग याबाबतीत कोणत्याही प्रकारे भेदभाव करता कामा नये. तीच चर्चा अख्ख्या चित्रपटात सुरू राहते आणि चित्रपट संपल्यानंतरही आपल्या मनात चालू राहते. संवेदनशील मनाला कृतिशील बनण्यास भाग पाडणारा, स्वतःला विचारी म्हणवणाऱ्यांना नव्याने चर्चेत ओढणारा आणि आपल्या स्वार्थी सुखासीन आयुष्यात व ‘अच्छे दिन’ची अफू पिऊन धुंदीत मग्न असलेल्यांना एक जोरदार कानाखाली वाजवून जागे करणारा हा चित्रपट आहे. ‘जात’ विषय केंद्रस्थानी असलेली कथा व उत्तम दिग्दर्शन यासाठी लेखक-दिग्दर्शकाचे अभिनंदन करावे तितके कमीच आहे.

सामाजिक-राजकीय नाट्य या जातकुळीत मोडणारा हा चित्रपट एका तरुण पोलिस अधिकाऱ्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला दिसतो. सुखासीन उच्चभ्रू असा हा तरुण IPS युरोपात शिकलेला असतो व दिल्लीत गृहसचिवांशी (Home Secretary) झालेल्या किरकोळ शाब्दिक चकमकीने बदली होऊन उत्तरप्रदेशातील एका गावात येतो. आतापर्यंत ज्या भारताबद्दल अभिमान बाळगला होता, ज्या भारतात येण्याची स्वप्ने पाहिली होती, तो भारत हाच का, असे वाटून शरमिंदा होण्याचे प्रसंग क्षणोक्षणी त्याच्या वाट्याला येतात. अंगावर सावलीही पडू न देणारे, अस्पृश्यता पाळणारे आणि “वो लोग” म्हणजे जणू दुसऱ्या ग्रहावरील लोक आहेत अशाप्रकारे दलितांना संबोधणाऱ्यांचा हा देश समजायला त्याला थोडा काळ लागतो. त्याला कळत नाही की आजच्या जमान्यात दोन हजार वर्षांपूर्वीचा भारत कसा काय वसलाय? त्यातील एक दृश्य खूप गमतीशीर आहे – त्यात त्याच्याच पोलीस ठाण्यातील वेगवेगळ्या पदावरील अधिकारी आणि सहाय्यक वर्ग हे आपण कुठल्या जातीचा आणि तो खालचा की वरचा, कोण कोणाच्या खाली व कोणाच्या वर अशी चर्चा घडते. ती केवळ दलित, ब्राह्मण आणि मंडलपुरती उरत नाही तर दलित, निम्नवर्गातील विविध स्तरांपर्यंत जाते आणि तेवढेच लोक भारताचेच प्रातिनिधिक रूप बनतात.

काही दृश्ये खरोखरच मनःपटलावरून पुसल्या गेलेल्या माहितीला जागवण्याचे कार्य करतात. बसप आणि भाजप यांची हातमिळवणी, आदित्यनाथांचे दलितांसोबत सहभोजनाचे ढोंगी प्रदर्शन, दलित नेत्यांसोबत हिंदू ऐक्याच्या नावावर केलेल्या मोहिमा, जातीवर होणारे मतदान, प्रत्येक समूहातील जातीय उच्च-नीचता या सर्व बाबींवर चित्रपट माहिती जागवणारे भाष्य करतो. हे वास्तव बदलण्यावर उत्तर काय, तर चित्रपट सांगतो संविधानाचे ‘आर्टिकल १५’.

भारतीय समाजात भिनलेली जातीय आणि धार्मिक विकृती सर्वांनाच त्रासदायक ठरून भारतीयत्व आणि माणुसकीचा कसा बळी घेते हे भाष्य कुठलेही आढेवेढे न घेता हा सिनेमा करतो. भारतीय म्हणून हा सिनेमा पाहिला तर आपल्या देशातील सडलेल्या जातीय आणि धार्मिक वास्तवाची लाज वाटून अस्वस्थ व्हायला होते. हा सिनेमा भारतीय समाजाला आरसा दाखवून आपली सत्यस्थिती नेमकेपणाने दाखवतोय. या सत्यस्थितीचे चटके सर्वांनाच बसतात हे भीषण वास्तव आहे. जो देश जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहतो आहे, तेथे जर आजही आर्टीकल १५ चा अर्थ समजून घेऊन लोक जगत नसतील तर आपण कधी आणि कसे भारतीय बनणार हा प्रश्न आहे. मानवी जीवनाला दिशा देणाऱ्या समतावादी, विवेकी तत्त्वज्ञानाचा हा देश आहे. या मानवीय मूल्यांचा जर पराभव केला तर सर्वांचेच जगणे सर्वार्थाने कठीण होणार आहे हे ध्यानात ठेऊन आपल्या जीवनात आर्टीकल १५ चा वापर करावा यातच सर्व भारतीयांचे हित सामावलेले आहे.

सिनेमात एक पात्र आहे निषाद, जी उत्तरभारतात दलितांची एक जातसुद्धा आहे. चंद्रशेखर आझादच्या समकक्ष हे पात्र. बंदुकीच्या जोरावर त्याचे अपहरण केले जाते तेव्हा तो म्हणतो, “मला काही झाले, तर तुम्हाला क्रोध येईल. त्याच क्रोधाला शस्त्र बनवायचं, परंतु त्याव्यतिरिक्त कोणतंही शस्त्र आड येता कामा नये मित्रांनो! कारण ज्या दिवशी आपण लोक हिंसेच्या मार्गावर वाटचाल करू, तेव्हा आपल्याला मारणं त्यांना आणखी सोपं होईल.” (व्वा, एक नंबर!) एका वर्षापूर्वी काश्मीरमधील युवकांना आपले लष्करप्रमुख अगदी असेच बोलले की दगड सोडून बंदूक हाती घ्या मग मजा येईल (तुम्हांला गोळया घालायला) – हाच सरकार पुरस्कृत दहशतवाद आहे.

‘तुमची जात कोणतीही असू द्या, परंतु ही हिंदूंनी एकत्र येण्याची वेळ आहे… आणि खरा शत्रू ओळखण्याचीही वेळ आहे’ असे महंत सांगतो तेव्हा त्याच्याबरोबर दलितांचे गद्दार राजकीय पुढारीही असतात (आठवले, पासवान, उदितराज यांसारखे). एका दृश्यात नायक सीबीआय अधिकार्‍याला विचारतो, “हिंसा कोण करत आहे, सर? कधी कधी बाहेर दिसणार्‍या हिंसेमागे एक अशी हिंसा असते जिच्याबद्दल कोणीही बोलत नाही. ती आमच्या संस्कृतीचा भाग बनते. तिला आम्ही हिंसा म्हणत नाही… सामाजिक व्यवस्था म्हणतो.” “आग लागली असेल तर तटस्थ राहण्याचा अर्थ होतो की आपण त्यांच्यासोबत उभे आहोत जे आग लावत आहेत.” “तुमच्या कमोड्समध्ये आता जेट स्प्रे लागलेत…परंतु ‘ते लोक’ आजही सफाईसाठी मेनहोलमध्ये नग्न उतरतात.” असे कितीतरी संवाद प्रेक्षकांना सुखावतात. असे वास्तव मांडणारे चित्रपट फार कमी पाहण्यात आले, परंतु हा चित्रपट नक्कीच वेगळा आहे याचे समाधान प्रेक्षकाला मिळते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या BBC ला दिलेल्या ऐतिहासिक मुलाखतीत स्पष्टपणे म्हणतात, (युट्युब वर आहे) की ‘सर्व मार्ग बंद होतील तेव्हा “कम्युनिझम” हाच शेवटचा पर्याय (देशातील दलितांना) असेल’. परंतु आजचा बहुतांश दलित समाज या कम्युनिझमला समजून घ्यायलाच तयार नाही. केवळ दलितच नाही तर सर्व देशातील सर्व समस्यांवर केवळ फुले-शाहू-आंबेडकर-अण्णाभाऊ-शिवाजी-सावित्री यांच्या विचारांचा कम्युनिझम (यालाच काही जण समाजवाद ही म्हणतात) हेच एकमेव उत्तर आहे. त्यांनी सांगितलेल्या आंतरजातीय विवाहाच्या माध्यमातून जातीअंत (Annihilation of Caste) हाच भारतातील कम्युनिझमचा मुख्य पाया धरून आपण यावर काम केले पाहिजे.

एकदा भेटीत नायक निषादला बाबासाहेबांच्या उल्लेखासह संवैधानिक तरतुदींचा गौरव करतो तेव्हा “त्याच बाबासाहेबांनी ‘हे संविधान जाळणारा मी पहिला माणूस असेन’, हे सुद्धा म्हटलेलं आहे” असं निषाद म्हणतो. नायकाची उच्चवर्णीय बायको एकदा त्याच्याबरोबर चॅट करते, हिरो बनण्याची गरज नाही, पण अशी वेळ हवी की लोकांनी हिरोची वाटच पाहू नये.

स्वतःचे निवेदन, आशय, अभिव्यक्ती आणि सौंदर्य घेऊन चित्रपट पुढे जातो. कोणत्याही प्रकारे विषयाला भिडताना आडपडदा ठेवलेला नाही. नेमके भाष्य, थेट मुद्याला हात आणि आव न आणता वास्तवाला भिडण्यावर भर दिलेला आहे. हा चित्रपट पाहताना एकाच वेळी संतापाने रक्त तापते आणि हताशपणे डोळ्यांत पाणीही उभे राहते. एकाच वेळी लाजही वाटते आणि त्याचवेळी आपला खूप मोठा माणूस म्हणून, भारतीय नागरिक म्हणून झालेल्या पराभवाने मान खालीही जाते.

नायक, अतिरिक्त SP ह्याचे पोस्टिंग होते तेव्हाच दोन तरुण दलित मुलींवर केवळ दोन रुपये अतिरिक्त मजुरी मागितली व दिली नाही म्हणून दुसरीकडे कामाला गेल्या म्हणून कंत्राटदार गुंड व त्याचे साथीदार सामूहिक बलात्कार करून त्यांना भर रस्त्यावर लटकवले जाते आणि तिसरी मुलगी गायब असते. सगळे पोलीस सोयीस्करपणे विसरत असताना तो मात्र त्या तिसऱ्या मुलीला शोधण्याचा प्रयत्न करतो, ही त्याची कथा आहे. ते शोधत असताना, एका गावातील ‘संतुलित’ जातिव्यवस्थेपासून सर्व पातळीवर एकमताने ‘मान्य केलेली’ आणि ‘सामंजस्याने’ प्रस्थापित केलेली गल्लीपासून दिल्लीपर्यंतची व्यवस्थाही आपल्याला दिसते आणि या चित्रपटातील नायकासह आपणही दिङ्मूढ होऊन जातो. नायक अयान रंजन आणि त्याची पत्नी अदिती यांची दोन वेगळी जगे आपसूक दिसतात. तो गावातील घाण कचरा टाकलेल्या रस्त्यावरून चालत असतो, त्यावेळी त्याची मैत्रीण सिमेंटने बांधलेल्या जॉगिंग पार्कमध्ये धावत असते. तसेच त्यातील वर्गसंघर्षाला कचर्‍याची आणि गटारांची घाण या प्रतीकांतून दाखवलेले आहे. हरवलेल्या मुलीच्या छोट्या पोस्टरला विशाल राजकीय, धार्मिक पोस्टरने झाकणे हेही मोठे भाष्य आहे.

हा चित्रपट कोणत्याही प्रकारे कृत्रिम नाट्यमयता निर्माण करण्यासाठी वा भीषण जातवास्तवाचे भांडवल न करता नेमका आशयाला हात घालून त्यातल्या कथेला आवश्यक असलेल्या चौकटीत परंतु कथाविषयाच्या खोलवर जाऊन भाष्य करत राहतो. या अत्यंत गडद, दुःखद, उदास आणि काही प्रमाणात नैराश्य देणाऱ्या चित्रपटाला असलेली सकारात्मक बाजू म्हणजे असा चित्रपट आजच्या प्रतिक्रांतीच्या काळात बनू शकतो आणि या विषयावरची चर्चा नव्याने व उघडपणाने होऊ शकते ही आहे. सगळ्यांची कामगिरी उत्कृष्ट आहे हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. अन्यथा अश्या कलाकृती घडत नाहीत. त्यामुळे हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावा! राज्यसरकारने व केंद्रसरकारने हा सिनेमा करमुक्त करून खरे भारतीय जातवास्तव तसेच नोकरशाहीचे वास्तव जनतेसमोर आणण्यासाठी मदत करावी ही अपेक्षा!!

ॲड. सचिन गोडांबे
मुक्त पत्रकार, पुणे

अभिप्राय 1

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.