करोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल !

२०१९ च्या नोव्हेंबरमध्ये संपूर्ण जगात करोना विषाणूचा उद्रेक झाला आणि जगाबरोबरच आपल्या देशातसुद्धा जानेवारी, फेब्रुवारी २०२० दरम्यान त्याची चाहूल लागू लागली. यापूर्वीसुद्धा जगात आणि आपल्या देशातसुद्धा महाभयंकर साथींचा उद्भव झाला होता आणि त्या त्या वेळी त्या रोगांमुळे अपरिमित मनुष्यहानीही झाली होतीच. पण त्या काळात त्या साथींचा उद्रेक एकाच वेळी संपूर्ण विश्वात कधीही झालेला नव्हता. पण आता हा करोनाचा उद्रेक एकाच वेळी संपूर्ण जगात झाला आणि अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे संपूर्ण विश्वात हाहाकार माजला. बरे या रोगाचा उद्भव नैसर्गिक जीवाणूमुळे नाही तर कृत्रिम विषाणूमुळे झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यावर औषधोपचार काय करायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला. या विषाणूंचा प्रसार सुरुवातीला हवेतून होत नव्हता, तर स्पर्शातून होत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे जनसंपर्क टाळणे, एकमेकांपासून दूर राहणे आणि कोणत्याही बाहेरील वस्तूला स्पर्श न करणे आवश्यक होऊन बसले. परिणामी होता होईतो लोकांनी घराबाहेर न पडणे आवश्यक होऊन बसले. लोकांना घराबाहेर पडण्यापासून रोखण्यासाठी सरकारी पातळीवर टाळेबंदी घोषित करणे भाग पडले.

पण त्यामुळे गरीब आणि ज्यांचे पोट रोजच्या आवकीवरच अवलंबून होते अशा लोकांची पंचाईत झाली. घराबाहेर पडून कामधंदा केला नाही तर खाणार काय? ही समस्या उद्भवली. अश्या परिस्थितीत गरीब लोकांना घराबाहेर पडणे अनिवार्य होऊन टाळेबंदी शंभर टक्के यशस्वी होऊ न शकल्याने काही लोकांचा एकमेकांशी संपर्क होऊ लागला. त्यामुळे करोनाचा प्रसार पूर्णपणे रोखणे अशक्य होऊन बसले. परिणामी, आपल्या देशात करोनाचा प्रसार होतच राहिला. जगात अनेक देशातसुद्धा लोकांनी टाळेबंदी गांभीर्याने न घेतल्याने तेथे मोठ्या प्रमाणात या रोगाचा प्रसार होऊन अपरिमित मनुष्यहानी झाली. पण आपल्या देशात बहुतांश लोकांनी टाळेबंदीला प्रतिसाद दिल्याने आपल्या देशांतील आवाढव्य लोकसंख्येचा विचार करता जास्त लोकांपर्यंत करोनाचा प्रादुर्भाव पोहोचू शकला नाही आणि त्यामुळे आपल्या देशात जगाच्या तुलनेत मनुष्यहानीचे प्रमाण खूपच कमी होते ही जमेची बाजू म्हणावी लागेल.

२०१७ पासून आपल्या देशातील मृत्यूचे सरासरी प्रमाण ७ ते ७.५० टक्के होते, ते करोना काळातसुद्धा तेवढेच होते. त्यामुळे करोनामुळे आपल्या देशात मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली असे म्हणणे योग्य होणार नाही. पण राजकारणी लोकांनी आणि प्रसारमाध्यमांनी अतिरंजित वृत्ते प्रसारित करून जनतेच्या मनात करोनासंबंधी भीती उत्पन्न करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. 

वर म्हटल्याप्रमाणे टाळेबंदी शंभर टक्के यशस्वी होऊ न शकल्याने, करोनाचा प्रादुर्भाव वाढतच राहिल्याने टाळेबंदीची मुदत वाढवणे भाग पडत गेले. त्याचा अनिष्ट परिणाम उद्योगांवर, व्यवसायांवर होऊ लागला. त्याचा जास्त परिणाम गरीब, रोजंदारीवर कामे करणाऱ्या मजुरांवर झाला. गरिबांची उपासमार होऊ लागली. सरकारने जरी गरिबांना अन्नपुरवठा करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला मर्यादा होतीच. अनेक सामाजिक संस्थांनी, गुरूद्वारांनी लंगर सुरू करून गरीब बेरोजगारांना अन्नपुरवठा करण्याचा प्रयत्न केला. परप्रांतातून आलेले मजूर, कामगार कामे उपलब्ध नसल्याने मुंबईहून, महाराष्ट्रातून आपापल्या प्रांतात परतण्याचा प्रयत्न करू लागले. पण करोनामुळे रेल्वेसेवा बंद असल्यामुळे त्यांचे हाल झाले. काहींनी तर आपले प्राणही गमावले.

तोपर्यंत खेड्या-पाड्यात करोनाचा प्रसार झालेला नव्हता. पण पुढे देव-देवतांच्या यात्रा, गणपती उत्सव, लग्नसराई यानिमित्ताने झालेल्या गर्दीत पुरेशी काळजी न घेता लोक आपापल्या गावांत गेल्याने खेड्या-पाड्यातसुद्धा करोनाचा प्रसार होऊ लागला. मुख्यतः राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या कौटुंबीक लग्नात स्वतःचा बडेजाव मिरवण्यासाठी करोनाकाळात लागू करण्यात आलेले निर्बंध न पाळण्याचा निष्काळजीपणा केल्याने करोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्यास मदतच झाली. त्यातच कुंभमेळ्यासारखे धार्मिक सोहळे आणि काही राज्यांत झालेल्या विधानसभेच्या निवडणूक-प्रचारात झालेल्या गर्दीमुळे करोनाच्या प्रसाराला चालना मिळाली, असे म्हणणे वावगे ठरू नये.

करोनाचा प्रादुर्भाव वाढतच राहिला. जगात, तसेच आपल्या देशातसुद्धा करोनाविरोधी लसनिर्मितीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. पूर्वी अशा प्रकारच्या साथींच्या काळात लसनिर्मितीत यश मिळण्यास वर्षोनवर्ष थांबावे लागत असे. पण अलिकडच्या वैज्ञानिक क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे पाश्चिमात्य देशांतच नाही तर आपल्या देशातसुद्धा वैज्ञानिकांच्या प्रयत्नांना यश येऊन लसनिर्मिती होऊ लागली.

करोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी केलेल्या टाळेबंदीमुळे औद्योगिक उत्पादन ठप्प होऊन देशाची आर्थिक घडी विस्कटून आर्थिक मंदीसदृश परिस्थिती उद्भवली. काही आस्थापनांनी संगणकावरून होऊ शकणारी कार्यालयीन कामे घरून करण्याची अनुमती त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिल्याने त्यांच्या नोकरीवर गदा आली नाही. टाळेबंदीमुळे उद्भवलेल्या आर्थिक मंदीला आळा घालण्यासाठी जेथे जेथे करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला, तेथे तेथे टाळेबंदी शिथिल करून उद्योगांना, व्यवसायांना चालना देण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू करण्यात आले. आपल्या पंतप्रधानांनी तर आत्मनिर्भर भारताची घोषणा करून उद्योगधंद्यांना चालना देण्यास प्रोत्साहन दिले.

आपल्या देशात मोठ्या प्रमाणात गरीबी ही गेली कित्येक दशके आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरीही रुंदावत आहे. पूर्वी टाटा, बिर्ला आणि इतर काही हाताच्या बोटांवर मोजण्यासारखे धनाढ्य लोक होते. त्यात आता अंबानी आणि आदानी यांची भर पडली आहे. ही दरी वाढवण्यास कारणीभूत भ्रष्टाचार गेल्या कित्येक दशकांपासून बोकाळतोच आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सर्व आर्थिक व्यवहार आधारकार्डाशी निगडित केल्यामुळे आणि डिजिटल व्यवहारांना चालना दिल्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांच्या नाड्या नक्कीच आवळल्या गेल्या.

करोनाकाळात सरकारने आरोग्यसेवा पुरवण्याची व्यवस्था केली होती. पण अचानक उद्भवलेल्या या आपत्तीमुळे सुरुवातीच्या काळात ती पुरेशी नव्हती. हळूहळू त्यांत बऱ्यापैकी वाढ करण्यात आली. लसउत्पादन सुरू करण्यात आले. सुरुवातीला चाचणी प्रयोगशाळांची संख्या फक्त एक होती, ती २४६३ पर्यंत वाढवण्यात आली. ५०,००० कृत्रिम श्वसनयंत्रांची (व्हेंटीलेटर्स) निर्मिती देशातच करण्यात आली. प्राणवायूचा पुरवठा १५,००० मेट्रिक टनपर्यंत वाढवण्यात आला. अतिदक्षता विभागातील बेड्सची संख्या २१६८ वरून ८१००० पर्यंत वाढवण्यात आली. केंद्रसरकारने सर्व प्रकारची खबरदारी घेतली. सरकारी, म्युनिसिपल हॉस्पिटलमधील डॉक्टर्सनी, नर्सेसनी, इतर कर्मचाऱ्यांनी जीवाचे रान करून, धोका पत्करून रुग्णसेवा पुरवली. पण उडदामाजी काळे गोरे या न्यायाने काही कर्मचाऱ्यांनी वाहत्या गंगेत हात धुऊन घेण्याचा प्रयत्न केलाच. करोनारुग्णांना सेवा पुरवण्यातही भ्रष्टाचार करण्यात येऊ लागला. काही खाजगी रुग्णालयांनी या परिस्थितीचा गैरफायदा उठवून गरजवंत रुग्णांना लुटण्याचे उद्योग केले. लाखो रुपयांची बिले करून रुग्णांना नाडले. करोनासंबंधित औषधांचा काळाबाजार करण्यात येऊ लागला. सर्वसामान्य लोक डॉक्टरना परमेश्वर मानतात. पण काही डॉक्टरांची वागणूक सैतानालाही लाज वाटावी अशी होती. तर पोलिसयंत्रणा, म्युनिसिपल सफाई-कर्मचारी अशा अनेकांनी करोनाकाळात मानवतेचे दर्शन घडवले.

करोनामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे शाळा, कॉलेजेस बंद ठेवणे भाग पडले. पण त्यातूनही मार्ग काढून आंतरजालाच्या (इलेक्ट्राँनिक नेटवर्कची सुविधा) मदतीने शिक्षण चालू ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. पण अशी सुविधा खेड्या-पाड्यात उपलब्ध नसल्याने खेड्या-पाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागले. तरीही काही गावांतील जिद्दी शिक्षकांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. आपल्या देशातील बहुतांश लोकांना राष्ट्रीयभावना असल्याचे दिसून आले. आंतरजालाच्या मदतीने शिक्षण जरी चालू ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला, तरी परीक्षा आयोजित होऊ शकल्या नाहीत. दहावी, बारावीच्या महत्त्वाच्या परीक्षाही न घेताच विद्यार्थ्यांना पुढील वर्गात ढकलण्यात आले.

आता लोकांनी आपली मानसिकता बदलून फक्त कार्यालयात नोकरी मिळण्याची वाट बघत न बसता लहान, मोठे व्यवसाय करण्याची प्रवृत्ती अंगी बाणणे आवश्यक आहे. करोनामुळे परप्रांतीय कामगार आपापल्या प्रदेशात परतल्यामुळे जेंव्हा काही व्यवसाय सुरू झाले, तेंव्हा मजुरांची कमतरता भासू लागली होती, त्यावेळी स्थानिक लोकांनी त्याचा लाभ उठवणे आवश्यक होते. पण तसे होताना दिसले नाही. आता हळूहळू लसीकरण वाढून करोनाला आळा बसेल. हळूहळू करोनाचा उद्रेक पूर्णपणे नष्ट झाल्यावरसुद्धा जेथे जेथे शक्य आहे अशा आस्थापनांनी करोनाकाळात अवलंबलेली घरून काम करण्याची (वर्क फ्रॉमहोम) पद्धत चालूच ठेवली, तर कर्मचाऱ्यांचा कार्यालयात जाण्याचा व घरी परतण्याचा वेळ वाचू शकेल. रेल्वेमधील, सार्वजनिक बसेसमधील गर्दीला आळा बसेल. कार्यालयात जाण्यासाठी व परतण्यासाठी खाजगी वाहनांचा वापर कमी होऊन रस्त्यावरील वर्दळ कमी होईल. इंधन बचत होईल, त्याचप्रमाणे वाहनातून निघणाऱ्या कार्बनमोनाक्साईडचे प्रदूषण कमी होईल. आस्थापनांचा कार्यालयीन सुविधांवर होणारा खर्च कमी होईल. या दृष्टीकोनातून विचार करता करोना भविष्यात इष्टापत्तीच ठरू शकेल.

करोनाची आपत्ती नष्ट झाल्यावर विरोधी पक्षांनी राजकारण करत न बसता आणि जनतेनेही फक्त सरकारला दोष देत न बसता या आपत्तीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला तरच आपला देश पुन्हा सावरू शकेल.

सिलिकॉन एन्क्लेव्ह, टिळक गणेश को.हौ.सो. टिळक नगर, चेंबूर, मुंबई, ४०००८९ 
मो. 7039070719 

अभिप्राय 1

  • कोरोना साथ तेव्हाच इष्टापत्ती ठरेल जेव्हा शहरामध्ये कामाच्या ठिकाणी जवळपास कामगार व नोकरांची राहण्याची व्यवस्था होईल .शहर नियोजन त्यात खुल्या जागा बागा क्रीडांगणे असतील , शहर केन्द्री व्यवस्थेत बदल करू .जंगल टिकवणे वर्धन करणे हेही महत्वाचे आहे म्हणजेच विकासाच्या कल्पना बदलाव्या लागतील ……..पण हे आपल्या देशात होणे अशक्य वाटतेय .या लेखात कठोर विश्लेषण टाळले असे माझे मत झाले

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.