मृत्यूनंतर
लेखक: शिवराम कारंत. अनुवादक: केशव महागावकर, नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया. चौथी आवृत्ती, मूल्य ११.५०
मृत्यूनंतर काय, ही महाजिज्ञासा आहे, नचिकेत्याची होती. माझीही आहे. तुमचीही असावी. मी तिच्यापोटी थोडेबहुत तत्त्वज्ञान पढलो. पण तत्त्वज्ञान हे बरेचसे पांडित्यपूर्ण अज्ञान आहे अशीच माझी समजूत झाली. निदान या असल्या महाप्रश्नांपुरती तरी. शाळकरी वयात वाटे-आपण संस्कृत शिकू, वेद-उपनिपदे वाचू. यम-नचिकेता संवाद मुळातून वाचू. थोडेसे संस्कृत शिकलो. भाष्यकारातें वाट पुसत ठेचाळण्याइतके. पण दुसरे एक अनर्थकारक ज्ञान झाले.ते असे की, शब्द आणि शब्दार्थ, वाक्ये आणि वाक्यार्थ सर्वांसाठी सारखेच नसतात.