परीक्षाकेंद्रित शिक्षणपद्धती
हल्ली मुलांना मूल्यशिक्षण दिले जात नाही, त्यांच्यावर नीट संस्कार केले जात नाहीत, त्यांच्या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविला जात नाही असे वारंवार ऐकू येते. गोष्ट खरी आहे. परंतु यामागचे नेमके कारण शोधून त्यावर उपाय करण्याचे फारसे कुणी मनावर घेतांना दिसत नाही. समाजातील अशिक्षित वर्गाचे एकवेळ समजले जाऊ शकते. पण सुशिक्षित वर्गाचे काय? वास्तविक, याच वर्गाने इतरांना मार्गदर्शन करायला हवे. पण उलट त्यांनाच वळण लावण्याची आवश्यकता जाणवत आहे. हे वळण शिक्षणातून मिळायल३ हवे. पण आपली शिक्षणपद्धतीच मुळात सदोष आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनाचेच उदाहरण घेऊ. केवळ विज्ञानविषयांचे शिक्षण घेतले म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजतोच असे नाही.विज्ञानाचे पदवीधर,उच्चपदवीधर, डाॅक्टर्स,इंजिनीअर्स शास्त्रज्ञ म्हणून गौरविले जाणारे तंत्रज्ञ अशा कितीतरी लोकांच्या ठिकाणी हा दृष्टिकोन आढळत नाही. शाळेत आर्किमिडीजचा Law of bouyancy शिकविणारे शिक्षक घरी येताच सोवळे नेसून साधुवाण्याची नौका तरंगणे वा बुडणे प्रसाद खाण्यावर वा न खाण्यावर अवलंबून असते ही सत्यनारायणाच्या पोथीतील भाकडकथा भक्तिभावाने श्रवण करतात. काॅलेजात खगोलशास्त्र शिकविणारे प्राध्यापक घरी ग्रहशांती करतांना दिसतात. ह्या विसंगतीचे मूळ आपल्या शिक्षणपद्धतीत शोधावे लागते.
आपली शिक्षण पद्धती संपूर्णपणे परीक्षाकेंद्रित आहे. तीत फक्त पाठ्य पुस्तकांवर भर दिला जातो. स्वतंत्रपणे विचार करायची सवयच लावली जात नाही. पाठ्यपुस्तकांचा घोटूनघोटून अभ्यास करायचा,उत्तम गुण मिळवून वरच्या श्रेणीत परीक्षा उत्तीर्ण करायची व शिकलेली विद्या व पुस्तके कपाटात बंद करून हाती आलेले प्रमाणपत्र घेऊन चांगल्यापैकी नोकरीधंदा शोधीत फिरायचे एवढेच ध्येय विद्यार्थ्यांपुढे ठेवले जाते. पैसा, सुखसमृद्धी ह्यांच्यामागे पिसाटासारखे धावणे यातच आयुष्याची इतिकर्तव्यता मानली जाते. ज्ञानार्जनाचा उद्देश कधीच नसतो. शिक्षणाकडे केवळ उपजीविकेचे साधन म्हणून पाहिले जाते. महाकवी कालिदासाचे एक वचन ह्या ठिकाणी आठवते. कालिदास म्हणतो –
” यस्यागम: केवलं जीविकायै तं ज्ञानपण्यं वणिजं वदन्ति। ” ( ज्याची विद्या ही केवळ उपजीविकेसाठी असते त्याला ज्ञानाचे दुकान मांडून बसलेला वाणी म्हणतात.) ही वणिग्वृत्ती सुटल्याशिवाय आपल्या समाजाचे उत्थान अशक्य आहे. विवेकाची कास धरून व तर्कनिष्ठ असा वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाणवून शिक्षणाकडे बघणे हेच हिताचे आहे. अशा दृष्टिकोनातून मिळविलेले ज्ञान हेच ख-या अर्थाने ज्ञान ठरेल. परंतु त्यासाठी परीक्षापद्धतीत आमूलाग्र सुधारणा करणे आवश्यक ठरते. नाहीतर आपण सुप्रसिदध विचारवंत डाॅ. पु.ग. सहस्रबुद्धे हयानी ‘ नरोटीची उपासना ‘ ह्या त्यांच्या गाजलेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे आतले खोबरे टाकून देऊन केवळ नरोटीचीच पूजा करीत राहू.
– भालचंद्र काळीकर
9975456587
लेखक आणि आजचा काळ
(दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये 1 नोव्हेंबर रोजी बुद्धिजीवी, व्यावसायिक, साहित्यिक, पत्रकार, कलाकार अशा संवेदनशील व्यक्तींनी देशातील वाढती हिंसा व असहिष्णुता याचा निषेध व विरोध व्यक्त करण्यासाठी प्रतिरोध ही सभा आयोजित केली होती. या प्रसंगी ज्येष्ठ इतिहासकार रोमिला थापर यांनी भाषण केलं. त्यांनी सध्या पुरस्कार परत करणाऱ्यांवर होणारे आरोप खोडून काढत विवेकाचा विचार जागृत ठेवला. त्यांच्या भाषणाचा संपादित अंश..)
माझं वय आता 84 वर्षं आहे. 28 वर्षांची असल्यापासून मी एक शिक्षिका आहे. भारतातल्या अनेक महाविद्यालयांत मी व्याख्यानं दिली आहेत. इतरही अनेक ठिकाणच्या सर्वोत्तम विद्यापीठांत मी व्याख्यानं दिली आहेत. मागच्याच आठवड्यात मी मुंबईतील एका महाविद्यालयात व्याख्यान दिलं. आयुष्यात पहिल्यांदाच व्याख्यानापूर्वी पोलिसांनी मला फोन केला आणि पोलीस संरक्षण देण्याचा आग्रह धरला. स्वातंत्र्य मिळून 68 वर्षं होऊनही एका शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासक व्यक्तीला धर्मनिरपेक्षता या विषयावर शैक्षणिक व्याख्यान देणं पोलीस संरक्षणाशिवाय शक्य नाही! एक राष्ट्र आणि एक समाज म्हणून आपण स्वत:ला किती कमी करून घेतलं आहे! ही काय अभिमान वाटण्यासारखी बाब आहे?
वाढती हिंसा आणि असहिष्णुतेचा प्रश्न मांडणाऱ्या लोकांच्या निषेधाला सत्ताधारी पक्षाकडून टोमणे मारले जाताहेत. याला ते जाणीवपूर्वक रचलेला कृत्रिम विद्रोह असं म्हणताहेत. रचना करणं म्हणजे हातांनी बनवणं. आणि जे असं बनवलेलं असतं ते अस्तित्वात असतं आणि खरं असतं. हा निषेध असा अचानक वाढलेला नाही. आपला समाज आणि मूल्यं सध्या ज्या रीतीनं चिरडले जातायत, ते ज्यांना पसंत नाही अशा अनेक भारतीयांची ही उत्स्फूर्त वेदना आहे. विविध व्यवसायांतील लोकांकडून हा निषेध देशात सगळीकडं नोंदवला गेला आहे, नोंदवला जात आहे. केवळ डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून नव्हे, तर अगदी मोठमोठे उद्योगपती, रिझर्व्ह बँकेने गव्हर्नरही तो नोंदवतायत. अरुण जेटली जसं निषेध करणाऱ्यांचं वर्णन करतायत तसे हे लोक नाहीत. कल्पना कितीही ताणली तरी यांना पक्के भाजपविरोधी म्हणता येणार नाही. म्हणूनच तेसुद्धा आजच्या काळाला आत्यंतिक अस्थिर नागरी समाज असं का म्हणतायत हे सरकार त्यांना का विचारत नाही? त्यांना विद्रोही म्हणणं याला केवळ विचित्र असंच म्हणता येईल. विद्रोह म्हणजे शासनाच्या अस्तित्वाविरुद्ध एक चळवळ असते. आमची मागणी अशी आहे की भारतीय समाजाला ग्रासून टाकणाऱ्या हत्या आणि अराजक संपवण्यासाठी योग्य असं प्रशासकीय नियंत्रण असलं पाहिजे. शासनाचे प्रमुख या नात्यानं राष्ट्रपतींकडे आम्ही ही विनंती करतो आहोत.
रोमिला थापर
मराठी भाषांतर : मेघा पानसरे
( आपले वाङ्मय वृत्त मासिकाच्या नोव्हेंबर 2015च्या अंकातून)
ईश्वराचा दहशतवाद
दिवस फार कठीण आले आहेत यात संशय नाही. ते पुन्हा सोपे होतील अशी आशा स्वप्नाळू लोकही बाळगीत नाहीत. ‘अच्छे दिनां’ वाटेकडे आशाळभूतपणे डोळे लावून बसलेला समाज निराशाग्रस्त झाला आहे. सर्व मानवी क्षमता बोथट झाल्या आहेत. सामर्थ्ये लुळी पडली आहेत. अशावेळी मानवबाह्य जगात एखादा आसरा मिळतो का ह्याचा समाज शोध घेत असतो. (मी जेव्हा ‘ समाज’ म्हणतो तेवहा मला बहुसंख्य समाज अभिप्रेत असतो. तुलनेने कमी संख्येत असलेल्या विवेकशीलांना असा कुठलाही आसरा नसतो हे माहीत असते.) आणि असा काल्पनिक आसरा परंपरेने त्याला उपलब्ध करून दिला आहे. तो म्हणजे ‘ईश्वर’ किंवा ‘देव’. भाबडा, अगतिक समाज अपसूकच त्याला शरण जातो. ह्या देवाची आणि समाजाची गाठ घालून देण्यासाठी त्याचे व्यापारी प्रतिनिधी (एजंट्स्, फ्रॅंचाइसिज्, दलाल इ.) टपलेलेच असतात. अनेक गुरु, महाराज, बाबा, बापू, माताजी, देवीजी प्रकट होतात व व समाजाला वारेमाप आश्वासने देऊन आपल्या गळाला लावतात. भोळे आणि लाचार लोक अशांच्या भूलथापांना बळी पडतात आणि स्वत:ची नागवणूक करून घेतात. शिवाय, फलज्योतिष, वास्तुतंत्र, (ह्यांना मी ‘शास्त्र’ म्हणायला तयार नाही. तो ‘शास्त्र’ शब्दाचा अपमान आहे.), रेकी, प्राणिक हीलिंग इ. छद्मविज्ञानांची (Pseudo-sciences ) दुकाने मोहक आश्वासनांची आकर्षक सजावट करून खुणावत असतातच. धूसरतेचे, गूढगहन गोष्टींचे स्वभावत: आकर्षण असलेला समाज त्यांच्या कच्छपी लागतो.
हे सर्व आजच घडते आहे असे नाही. दु:ख, दारिद्र्य, जीवनातील अस्थिरता ह्या गोष्टी अनादि काळापासून मानवाचा पिच्छा पुरवीत आल्या आहेत. आणि त्याच्या अगतिकतेचा लाभ उठवणारे लबाड भामटेही तेव्हापासूनच उपलब्ध आहेत. परंतु त्यांची आजच्याएवढी प्रसिद्धी होत नसे. एखादा बाबा, एखादा महाराज,एखादा फलज्योतिषी एखाद्या भागात प्रकट होई व तेवढ्या पंचक्रोशीत आपली दुकानदारी चालवी. पण आज प्रसारमाध्यमांचा सुकाळ झाल्यामुळे ह्या भोंदू लफंग्यांना आपोआप प्रसिद्धी मिळते आहे. वृत्तपत्रांमधून तथाकथित ‘जागृत’ दैवतांच्या, फलज्योतिषांच्या वास्तुतंत्र्यांच्या, प्राणिक हीलिंगवाल्यांच्या जाहिराती सतत झळकत असतात. काही मोजके अपवाद सोडल्यास अशी एकही दूरचित्रवाहिनी नसेल की जिच्यावर असे भंपक कार्यक्रम दाखविले जात नसतील. एक प्रकारचे इंद्रजाल समाजमनावर पसरविले जात आहे.
हे असे का होते? याचे कारण आपला समाज हा स्थितिशील आहे. गती त्याला मानवत नाही. शारीरिक आळसाबरोबरच बौद्धिक आणि वैचारिक आळसही त्यात भिनला आहे. सखोल चिंतन करणे, प्रश्न विचारणे, शंका उपस्थित करणे, चिकित्सा करणे तर्कबुद्धी वापरणे इत्यादी बौद्धिक ‘कियां’चा त्याला मनस्वी कंटाळा आहे. हजारो वर्षांपपूर्वी आपल्या ‘ऋषिमुनींनी’ साठवून ठेवलेल्या विचारधनावर त्याची गुजराण सुरू असते. ऋषिमुनींच्या काळानंतर ज्ञानात काही भर पडली आहे हे मान्य करायला त्याची तयारीच नसते. विचारांच्या बाबतीत तो दुर्बल झाला आहे. आणि ह्या विचारदौर्बल्याचीच सतत सोबत करीत असते ते म्हणजे भय. ह्या भयापायी मनुष्य हबकून गेला आहे. आणि म्हणूनच, ईश्वराची उपासना-आराधना केल्यास तो आपले मनोरथ पूर्ण करील ही आशा आणि तसे न केल्यास तो आपला सत्यानाश करील ही भीती ह्या दोन, आणि दोनच, गोष्टींपोटी माणूस देवाला भजत असतो. बाकी सर्व आध्यात्मिक ग्रंथ आणि त्यांमधील पोकळ चर्चा ही केवळ शब्दांची जंगले आहेत. ह्याविषयी माझा एक अनुभव थोडक्यात सांगतो.
मी नुकताच नोकरीला लागलो होतो. माझे वय त्या वेळी पंचवीस वर्षांचे असेल. गावातील पोस्टमास्तरांची नुकतीच ओळख झाली होती. अतीशय सच्छील सज्जन व पोक्त वयाचे असे ते गृहस्थ होते. एके दिवशी त्यांनी मला जेवायला बोलावले. त्यांच्याकडे कसलेतरी उद्यापन होते. मी ठरल्या वेळी गेलो. पूजा आटोपली होती. एक पंधरासोळा वर्षांचा मुलगा पाटपाण्याची तयारी करीत होता. उदबत्ती लावणे, रांगोळी काढज्ञे वगैरे गोष्टी तो भराभर उरकीत होता. त्यांच्या पत्नी ताटे वाढीत होत्या. जेवणे आटोपली. त्यांच्या त्या मुलाने पानसुपारी आणून दिली. मोठा चुणचुणीत दिसला मुलगा. बोलता बोलता मी सहज विचारले,” साहेब, आज कुठलाही सण वगैरे नाही. मग हे उद्यापन कसे? काही नैमित्तिक कारण?” ते एकदम गंभीर झाले. नंतर सावरून म्हणाले,” काळीकर, आम्हाला तुमच्यासारखेच दोन मुलगे होते. एक पंचविसाचा दुसरा तेविसाचा. मोठ्याला नोकरी होती. दुस-याला लागणारच होती. त्याला नोकरी लागली की दोघांचेही विवाह उरकून घ्यायचे अशी सुखस्वप्ने आम्ही उभयता रंगवीत होतो. तेवढ्यात काळाचा घाला आला आणि देवाने किरकोळ आजारांचे निमित्त करून दोघांनाही पंधरा दिवसांच्या अंतराने आमच्यापासून ओढून नेले.” त्यांच्या डोळ्यांमधील अश्रू स्पष्ट दिसत होते. माझेही डोळे पाणावल्यावाचून राहिले नाहीत. आणि माझ्या तोंडून प्रश्न निघूनच गेला. मी म्हटले,” साहेब, तुमच्यावर एवढा वज्राघात होऊनही तुम्ही देवधर्म, व्रतवैकल्ये करता हे कसे?” त्यांनी दिलेले उत्तर आठवले की अजूनही अंगावर काटा उभा रहातो. ते म्हणाले,” देवाच्या इच्छेपुढे कुणाचे चालले आहे? त्याने दोघांना नेले. आता तिस-याला तरी आमच्यापाशी राहू द्यावे म्हणून त्याची करुणा भाकतो आहोत. हा व्रत खटाटोप त्यासाठीच आहे.” मी हे ऐकून सुन्न झालो. त्यंच्या मनात देवाविषयी दहशत निर्माण झाली होती.
आज ती घटना आठवली की मन विचार करू लागते. ईश्वराच्या अस्तित्वावर इतका पराकोटीचा अंधविश्वास कसा असू शकतो? अध्यात्मवाद्यांशी ईश्वराच्या अस्तित्वाविषयी युक्तिवाद करायला आम्ही विवेकवादी नेहमीच तत्पर असतो. कारण, ईश्वर हेच सर्व अंधश्रद्धांचे मूळ कारण आहें. परंतु तो दीर्घकालीन लढा आहे. आजच्या घटकेला तरी समाजाच्या मनात ठाण मांडून बसलेल्या निष्फळ आशावाद आणि त्याच्याविषयीची दहशत यांना हद्दपार करणे फार गरजेचे आहे.
– भालचंद्र काळीकर
लोक पुरोगाम्यांकडे कसे पाहतात?
– सुरेश सावंत
(साभारः आंदोलन शाश्वत विकासासाठी, ऑक्टोबर २०१५)
मांसाहार, व्यक्तिस्वातंत्र्य आणि जीवो जीवस्य जीवनम्
महाराष्ट्रातल्या गोहत्याबंदी कायद्याचा विसर पडतच होता तोवर पर्युषणा दरम्यान मांस बंदी कायदा आणून फडणवीसांनी पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांना रसरशित खाद्य पुरवले. त्याचा वणवा महाराष्ट्राबाहेरही पसरला आणि बरेच पूर्वग्रहदूषित “विचारवंत” पेटून उठले. एका विशिष्ट धर्माच्या मतदारांवर डोळा ठेऊन हे केले जात असल्याचे उघड होते. मांसाच्या व्यवसायात असलेल्या खाटीक, मच्छीमार इत्यांदींनी साहजिकच ह्यास विरोध नोंदवला. त्याचबरोबर बुद्धीप्रामाण्यवाद्यांनीही व्यक्तिस्वातंत्र्याची बाजू उचलून धरली आणि एकूण चर्चेला “धर्म विरुद्ध व्यक्तिस्वातंत्र्य” असे स्वरूप प्राप्त झाले. ज्याप्रमाणे कुठल्याही एकांगी (धार्मिक अथवा इतर) विचारधारेची सक्ती नाकारणे बुद्धीप्रामाण्यवादास पायाभूत आहे, त्याच प्रमाणे आपल्या विचारांचे निरंतर अवलोकन करत रहाणे देखील तितकेच महत्वाचे आहे. आणि नेमकी हीच पायरी ह्या चर्चे मध्ये सामील झालेल्या ‘विचारवंतां’नी गाळल्याचेदिसून आले. “मांसाहार करणे (अथवा न करणे) हा केवळ व्यक्तिस्वातंत्र्याचा विषय होऊ शकतो का?” ह्या प्रश्नाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण झाले नाही.
लोकतंत्रात काही जबाबदाऱ्यांच्या चौकटित राहुनच व्यक्तिस्वातंत्र्याचा उपभोग घेता येतो. उदा. मी कोणत्या रंगाचा शर्ट घालावा किंवा मी किती वाजता जेवावे हा निर्णय माझा वैयक्तिक असू शकतो आणि असलाच पाहिजे. परंतु मला आवडणाऱ्या रंगाचा शर्ट दुसऱ्याकडे असताना तो चोरणे किंवा जरा टोकाचे म्हणजे त्याचा खून करून त्याचा शर्ट घेण्याचे स्वातंत्र्य मला नाही. माझ्या कृत्याने दुसऱ्या संवेदनक्षम जीवास (sentient being) जोवर इजा पोहोचत नाही तोवर ते कृत्य करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य मला आहे आणि असेलच पाहिजे. ह्या उलट, माझ्या कृत्याने जेंव्हा दुसऱ्या संवेदनक्षम जीवास इजा पोहोचते तेंव्हा मात्र मी माझ्या व्यक्तिस्वातंत्र्याची सीमा ओलांडलेली असते. म्हणूनच खून, चोरी, बलात्कारा सारखी कृत्ये चुकीची व व्यक्तिस्वातंत्र्याच्या परिघाबाहेर असल्याचे आपण मानतो.
वरील तर्कानुसार मांसाहार करणे ही सुद्धा व्यक्तिस्वातंत्र्याच्या बाहेरील कृती असल्याचे सिद्ध केले जाऊ शकते. मी करत असलेल्या मांसाहारासाठी काही मनुष्येतर प्राण्यांची कत्तल झालेली असते. ही कत्तल जरी माझ्या अपरोक्ष झालेली असली, तरी ‘मागणी तसा पुरवठा’ ह्या साध्या नियमानुसार मीच त्या कत्तलीस जबाबदार असल्यामुळेमाझी मांसाहार करण्याची कृती केवळ व्यक्तिस्वातंत्र्याचा विषय उरत नाही. ह्या तर्काच्या विरुद्ध प्रामुख्याने पुढील दोन विचार मांडले जातात.
पहिल्या विचारानुसार “खून, बलात्कार इत्यादी मध्ये माणसांनवर अत्याचार होतात. त्याची तुलना जनावरांशी केलीजाऊ शकत नाही.” अश्या अर्थाचा युक्तिवाद केला जातो. परंतु त्यात एका मुख्य गोष्टीकडे दुर्लक्ष्य केलेले असते. मनुष्येतर प्राण्यांच्या संवेदनांचे स्वरुप नक्कीच वेगवेगळे आहे. मनुष्य जरी इतर प्रजातींच्या तुलनेत अधिक ज्ञानी व विकसित प्राणी असला तरी वेदनेप्रति असलेल्या संवेदनशिलते बाबत त्याची व मनुष्येतर प्राण्यांची तुलना होऊ शकते. बकरीला माणासांसारखा मतदानाचा हक्का देणे जरी मूर्खपणाचे होणार असले, तरी मानेवरून सुराफिरवताना दोघांनाही समप्रमाणात वेदना होणार हे खरे आहे. उपयुक्ततावादाचे जनक आणि प्रसिद्ध ब्रिटिश तत्वज्ञजेरेमी बेंथम ह्यांच्या शब्दात “”The question is not, ‘Can they reason?’ nor, ‘Can they talk?’ but rather, ‘Can they suffer?’.” अर्थात “मुख्य प्रश्न ‘त्यांस (मनुष्येतर प्राण्यांस) विचार करता येतो का?’ किंवा’त्यांस बोलता येते का?’ असा नसून ‘त्यांस वेदना होऊ शकते का?’ असा असला पाहिजे.”
दुसऱ्या विरोधी विचारामध्ये नैसर्गिक नियमांचा आधार घेतला जातो. “जीवो जीवस्य जीवनम्” हा निसर्गाचाच नियम आहे. निसर्गात अनेक प्राणी इतर प्राण्यांची शिकार करुन खातात. तेंव्हा मनुष्याने इतर प्राणी मारून खाण्यात काहीच गैर नाही. ह्या विधानात दोन मुख्य त्रुटि आहेत. एक तर बाजारात मिळणारे मांस, हे मनुष्येतर प्राण्यांची”नैसर्गिक” शिकार करून आणलेले नसते. कमितकमी किमतित जास्तीत जास्तं नफा कमावणाऱ्या व प्राण्यांच्या संवेदनांचा यत्किंचितही विचार न करता त्यांस केवळ उपभोग्य वस्तु म्हणून जन्मास घालून जगवणाऱ्या अतिशयक्रूर प्रक्रियेतून त्यांचा प्रवास होतो. दूसरे म्हणजे निसर्गात चोऱ्या, बलात्कार आणि खून मुबलक प्रमाणात आढळतात. सिंहांनी केलेली शिकार कित्येकदा संख्याबळावर तरसं चोरून नेतात. अनेक माद्या आपल्या ताब्यातठेऊन त्यांच्या बरोबर स्वतःच्या मर्जीने समागम करणे, व इतर नरांपासून होणारी आपत्ये जीवे मारणे ही कित्येक माकडांच्या प्रजातितील रीत आहे. अश्या अनेक क्रूर चालीरीतींनी तथाकथित “निसर्ग” ओतप्रोत भरलेला आहे. परंतु वर म्हणल्या प्रमाणे मानवी समाजात मात्र असे वर्तन व्यक्तिस्वातंत्र्याच्या कक्षेबाहेर असल्याचे मानले जाते.तेंव्हा केवळ निसर्गाकडे पाहुन आपल्याला नैतिकतेची पट्टी ठरवता येत नाही.
शाकाहारामध्येही वनस्पतींचा बळी जातो, त्यामुळे शाकाहारही तितकाच अनैतिक असल्याचा काहींचा दावाअसतो. वनस्पती जरी जीवित असल्या, तरी त्यांमध्ये वेदना होण्याची क्षमता नसते हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर, केंद्रीय मज्जासंस्था (central nervous system) त्यांत नसल्यामुळे त्यांना वेदनाहोऊ शकत नाहीत. अगदी काही मिथ्यशास्त्रांवर विश्वास ठेऊन त्यांस वेदना होतात असे जरी गृहीत धरले तरी, मांसाहारासाठी वाढवलेल्या प्राण्यांना खायला लागणाऱ्या वनस्पतींच्या संख्येच्या तुलनेत शाकाहारात लागणाऱ्या वनस्पतींची संख्या खुप कमी असते ज्यामुळे शाकाहार हाच अधिक नैतिक पर्याय होतो.
तस्मात धार्मिक कारणांसाठी मांसाहारावर बंदी घालणे जरी चुकीचे असले तरी मांसाहार करणे हा ज्याचा त्याचा”वैयक्तिक” निर्णय होऊ शकत नाही, हे व्यक्तिस्वातंत्र्याचा निरंतर टाहो फोडणाऱ्या प्रसार माध्यमांनी, आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या राजकारण्यांनी आणि अन्नाखेरीज प्राण्यांचा कधीही विचार न करणाऱ्या व केवळ सेलिब्रिटी स्टेटसचा वापर करून आडवीतिडवी मते व्यक्त करणाऱ्या सिनेसृष्टितल्या तथाकथित दिग्गजांनी लक्षात घेतले पाहिजे.
तेजस गोखले
डॉ.आंबेडकरांचा गौरव – संघाची मजबुरी
राज्यात व केंद्रात सत्तेत असलेल्या आर.एस.एस.संचालित भाजप सरकारने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 125 वे जयंती वर्ष अत्यंत धुमधडाक्यात साजरी करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी केंद्र सरकार 125 रूपयाचे खास नाणे चलनात आणणार आहे. या नाण्याच्या एका बाजूवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र छापणार आहेत. 1920 साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर राहत असलेले लंडनमधील घर नुकतेच महाराष्ट्र सरकारने विकत घेतले असून विदेशातील ते त्यांचे स्मारक करणार आहेत. पंतप्रधान मोदी ऑक्टोबरमध्ये मुंबई येथील इंदु मिलमधील त्यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपान येथे जाउन कोयासन विद्यापिठात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण करून ही गौरवाची व अभिमानाची बाब असल्याचे सांगितले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जवळून संबंध आलेल्या ठिकाणांना पर्यटनस्थळे म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि आर.एस.एस. यांचे आर्थिक, सामाजिक व धार्मिक विचार परस्परविरोधी असतांना या दोन्ही सरकारांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा इतका पुळका का बरे आला असावा?
कॉ. भीमराव बनसोड
इहवाद विरुद्ध दांभिक-धार्मिकता
(स्युडो-रिलिजिऑसिटी).
मुसलमानांमधील शिक्षणाचे प्रमाण कमी आहे, मध्ययुगीन कल्पनांचा पगडा त्यांच्यावर अधिक घट्ट आहे. तरीही एकमुखाने फतवा काढून ‘आयसिस’ला विरोध करण्यात आला हे ध्यानात घेतले पाहिजे. त्यांचा आर्थिक स्तर तुलनेने कनिष्ठ पातळीवर आहे. आर्थिक-सामाजिक मागासलेपणामुळे धास्तावलेपणा येणे स्वाभाविक आहे. धास्तावलेल्या व्यक्तिला विश्वासात घेऊन या विकृतीतून दूर करणे आवश्यक असते. परंतु अल्पसंख्यकांच्या धास्तावलेपणातून हिंदुंमध्येसुद्धा भयगंड निर्माण करुन सत्तेचा सोपान गाठण्याच्या प्रताप आक्रमक हिंदुत्त्ववादी संघटना आणि पक्ष करीत आहेत. त्यामुळेच जेथे धर्मियांचा उद्दामपणा थांबविण्याचे सनदशीर मार्ग उपलब्ध असतात तेथेसुद्धा पायबंद घातला जात नाही. या संघटनांचा दुटप्पीपणा उघडा करणे निकोप समाजस्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. भाजप आणि त्यांचे (नावेमध्ये स्वेच्छेने उडी घेणारे तसेच अनिच्छेने फरफटत आलेले) सह-प्रवासी यांच्या भूमिका आणि कृति यांचा उल्लेख करणे संयुक्तिक होईल.
‘अल्लाना रोड’वरील नमाजामुळे होणाऱ्या उपद्रवाला पायबंद घालण्यासाठी प्रसिद्ध पत्रकार डॉम मोरेस यांना न्यायालयात धाव घ्यावी लागली. पण तेथेसुद्धा शिवसेना-भाजपच्या अधिपत्याखालील मुंबई महानगरपालिकेने नमाजावर निर्बंध घालण्यास आणि वाहतूकीसाठी रस्ता मोकळा ठेवण्यास विरोधच केला. “रस्त्याच्या रूंदीच्या एक चतुर्थाश, किंवा अरुंद रस्त्यावर जास्तीत-जास्त अमूकएक रुंदी, यापेक्षा रस्त्याचा अधिक भाग कोणत्याही कार्यक्रमासाठी किंवा मिरवणूकीसाठी अडविता येणार नाही” असा सर्व-धर्म-सम(अलिप्तता)-भाव प्रशासनाने आतातरी अमलात आणावा.
भावनिक आवाहन करणारे लोक इतर धर्मियांच्या कर्मकांडाच्या उपद्रवाविरुद्ध कोणतेच सनदशीर उपाय करीत नाहीत. एक बागुलबुवा म्हणून राजकीय लाभ उकळण्यासाठी हा ‘उपद्रव’ त्यांना लाभदायक आणि उपकारकच (ब्लेसिंग इन डिस्गाईज) असतो. त्यामुळेच उपद्रवाबद्दल नुसता सात्विक संताप व्यक्त करणे, बोटे मोडणे, माझ्यावरील अन्याय दुसऱ्याच कोणीतरी दूर करावा असा ‘जांभूळ-लोटेपणा’ करणे धर्मवादाआडून सत्ताकारण करणाऱ्यांना लाभदायक असते.
धार्मिक तेढ वाढविण्याचा अजून एक मुद्दा म्हणजे ‘समान नागरी कायदा’. एकतर राज्यसभेत बहुमत नसले तरी संयुक्त अधिवेनाच्या साध्या बहुमताने या कायद्यास मंजूरी मिळू शकते. दुसरे म्हणजे असा कायदा करण्याचे संविधानाचेच तत्त्व असल्यामुळे वाजवी तरतूदींना न्यायालयातही आव्हान देता येत नाही. परंतु ‘समान नागरी कायदा’ करण्याची मागणी करणे हा निर्लज्ज ढोंगीपणा असावा, अन्यथा अशी मागणी अनेक दशके करणाऱ्या पक्षांनी या कायद्याचा त्यांना अपेक्षित असणारा मसुदा प्रसिद्ध केला असता. प्रिय असणाऱ्या तत्त्वांचा जप करावयचा परंतु प्रत्यक्ष कृतिची वेळ आली की ढोंगीपणाने मौन पाळावयाचे अशी वृत्ती “इट प्रव्होकेथ डिझायर बट टेकेथ अवे दी परफॉर्मन्स’ अशा धुंदीपेक्षा कितीतरी घातक आहे. ‘समान नागरी कायदा’ याचा मूलभूत आराखडा नेमका कसा असावा ? याची कल्पना नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा मोहन भागवत यांना तरी आहे काय ? याची शंका आहे. या कायद्याचा त्यांना अपेक्षित असणारा मसुदा प्रसिद्ध करावा असे भाजपला आवाहन आहे. त्यांनी हे आव्हान जरुर पेलावे.
भाजपच्या उपद्व्यापांचे वर्णन ‘जिंदाल स्कूल ऑफ गव्हर्नमेंन्ट अॅन्ड पब्लिक पॉलिसी’मधील प्रा. शिव विश्वनाथन हे ‘दांभिक-धार्मिकता (स्युडो-रिलिजिऑसिटी)’ असे करतात ते सार्थ वाटते. (‘स्युडो-रिलिजिऑसिटी ऑफ बीजेपी’, ‘दी हिंदू, 15 सटेंबर 2015)
दुटप्पीपणाच्या अशा वर्तनामुळे अजून एक समस्या उभी राहते. शासकीय कर्मचाऱ्यांना संघाचे सदस्यत्व स्वीकारण्याची परवानगी देण्याचा प्रसंग आला की संघ ही एकदम “सांस्कृतिक” संघटना होते, पण सत्ता गाजविण्याची संधि असेल त्यावेळी ती सरकारच्या धोरणात आणि प्रशासनात ढवळाढवळ करु लागते. परंतु या मतलबीपणातून संविधानिक पेचप्रसंग उभा राहू शकतो. शासकीय कर्मचाऱ्यांवर मंत्रीमंडळाचे नियंत्रण असणे संविधानिक दृष्ट्या वाजवी आहे. त्यांचे वेतनमान, त्यांच्या कार्याची दिशा आणि प्राथमिकता, त्यांच्या बदलीचे ठिकाण असे अनेक निर्णय मंत्र्यांनी घेणे अपरिहार्य असते. पण समजा एक (किंवा अनेक) असे कर्मचारी संघ कार्यरिणीत उच्च पदस्थ झाले तर ते मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेणार, याचा अर्थ असा की उदा. 10 ते 5 असे दिवसाचे 7 तास मंत्री हे कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवणार आणि दिवसाच्या उरलेल्या 17 तासात संघाच्या माध्यमातून कर्मचारी हे मंत्र्यांचे निर्णय फिरवू शकणार. यामुळे संविधानिक पेचप्रसंग तर निर्माण होईलच पण संविधानाबाहेरील सत्तेचे केंद्र निर्माण होईल. सत्तेचा समतोल राखण्यासाठी भाजपने या मुद्द्यावर नि:संदिग्ध भूमिका घेणे तातडीचे आहे.
असुरक्षिततेमुळे आक्रमता येऊ शकते. त्यामुळे असुरक्षितता कमी करणे याला प्राधान्य असावे. परंतु भाजप आणि सहप्रवासी ही असुरक्षितता कमी न करता उलट अधिक तीव्र करीत आहेत इतकेच नव्हे ते जे आजवर सुरक्षितता अनुभवत होते त्यांना असुरक्षित बनवित आहेत. भाजपची ही दांभिकता लोकांपुढे मांडणे आवश्यक आहे.
-राजीव जोशी
थांबवा हे हत्यासत्र
नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे आणि आता कलबुर्गी. हे हत्यासत्र थांबणार तरी केव्हा? या हल्लेखोरांना कुणाचे भयच उरलेले दिसत नाही. ना शासनाचे, ना पोलिसयंत्रणेचे, ना समाजाचे. समाजसुद्धा अशा हत्यांच्या बाबतीत उदासीनच दिसतो. वैयक्तिक वैमनस्यातून, भाऊबंदकीतून, मालमत्तेच्या वादांतून, प्रेमप्रकरणातून वगैरे अनेक खून पडत असतात. त्यातलाच हाही एक असे समजून थोडी हळहळ व्यक्त करून लोक अशा घटना विसरून जातात. कित्येकदा तर हळहळही व्यक्त होत नाही. वास्तविक, हे विवेकवादी विचारवंत आपल्याच हितासाठी झटत असतात, दांभिक बुवाबाबांकडून होणारी आपली पिळवणूक थांबावी म्हणून आटापिटा करीत असतात, समाजाचे प्रबोधन व्हावे, त्याच्यामधील अंधश्रद्धा दूर व्हाव्यात म्हणून जिवाचे रान करीत असतात याचे भान ठेवून समाजाने त्यांचे ऋणी असावयास पाहिजे. दाभेळकर तर समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी प्रसंगी सायकलवरूनसुद्धा खेडोपाडी जाऊन विवेकवादाचा प्रचार करीत. काय गरज होती त्यांना? कुठला स्वार्थ साधायचा होता? समाजहिताची तळमळ हेच एकमेव उद्दिष्ट त्यांच्या समोर होते ना? मग समाजाने त्यांच्या कार्याची बूज ठेवायला नको? लोकांच्या अशा उदासीनतेमुळे व शासनयंत्रणांच्या अकार्यक्षमतेमुळे अशा पिसाट हल्लेखोरांचे फावते.
वास्तविक, विवेकवादी विचार पटत नसतील तर त्यांचा वैचारिक पातळीवरूनच सामना करावयास पाहिजे. परंतु तो करण्यासाठी लागणारी बौद्धिक कुवत प्रतिगामी सनातन्यांपाशी नसल्यामुळेच ते विवेकवाद्यांच्या जिवावर उठतात. हे सगळे कुठेतरी व केव्हातरी थांबले पाहिजे. समाजातील सुशिक्षित व संवेदनशील विचारवंतानी पुढाकार घेऊन शासनाला जागे करून झालेल्या हत्यांचा छडा लावण्यास व पुन्हा घडणार नाहीत याची दक्षता घेण्यास भाग पाडले पाहिजे.
पण हे कसे घडून येणार? सगळीकडे दाट काळोख पसरलेला दिसतो आहे. ‘ थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला ‘ ह्या काव्यपंक्ती आठवतात. लोकांना काळोखाची केवळ सवयच झाली असे नाही तर तो त्यांना आवडतो असा दिसतो आहे. प्रकाशापेक्षा अंधार बरा वाटणे, ज्ञानाऐवजी अज्ञानात सुख वाटणे, स्पष्टतेपेक्षा धूसरता अधिक आवडणे, स्वच्छ विचारांच्या जागी गूढ, गहन, अनाकलनीय अशा विचारांचे आकर्षण वाटणे, आकारापेक्षा निराकारात रमावेसे वाटणे हे वैचारिक क्षेत्रातील फार मोठे विरोधाभास आहेत.
काही मान्यवरांना वाटते की विवेकवाद्यांना जुन्या श्रद्धा, परंपरा, रूढी इत्यादी मोडून त्या जागी नवीन श्रद्धा, परंपरा, रूढी इ. स्थापन करावयाच्या आहेत. हे चूक आहे. विवेकवाद्यांना ह्या संकल्पनाच मान्य नाहीत. कारण, नवीन का असेनात, पण श्रद्धा इ. एकदा स्थापन झाल्या की त्या पुढीलांसाठी पूर्वग्रहच निर्माण करून ठेवतात.( जसे आजच्यांच्यासाठी आधीच्या श्रद्धा इ. चे झाले आहे.) असे पूर्वग्रह पुसून टाकण्यासाठी पुन्हा नव्याने विवेकवादाची चळवळ उभारावी लागेल. विवेवेकवाद्यांचे वधसत्र पुन्हा सुरू होण्याची भीती निर्माण होईल. कारण, कोणत्याही पूर्वग्रहाला विवेक सहन होत नसतो.
भालचन्द्र काळीकर
मोबाइल 9975456587
पटेल उद्रेकापर्यंत का गेले?
गुजरातच्या विकास प्रारूपात नेमका कोणाचा फायदा झाला, हा प्रश्न पटेलांच्या आंदोलनाने अधोरेखित केला आहे. एका अर्थाने ही केवळ गुजरातचीच नव्हे तर महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक अशा सर्वच तथाकथित प्रगत आणि आर्थिकदृष्टय़ा संपन्न राज्यांची शोकांतिका आहे. गुजरातमधील पाटीदारांप्रमाणेच; त्या त्या राज्यातल्या राजकारणाच्या; समाजकारणाच्या आणि अर्थकारणाच्याही मुख्य वाहक असणाऱ्या जाती आरक्षणाची; मागास दर्जाची अगतिक मागणी का करीत आहेत? त्यांच्या अगतिकतेचे कारण विकासातून निर्माण होणाऱ्या आर्थिक विषमतांमध्ये दडलेले आहे. गुजरातच्या आर्थिक विकासाविषयी तज्ज्ञांमध्ये पुष्कळ मतमतांतरे आहेत. ती क्षणभर बाजूला ठेवली तरीदेखील निव्वळ गुजरातमध्येच नव्हे तर गुजरातसारख्या इतर राज्यांत भांडवली, औद्योगिक विकासाचा परिणाम म्हणून शेती क्षेत्राकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले; औद्योगिक उत्पादक क्षेत्रदेखील संकुचित आणि काही जिल्ह्य़ांपुरते मर्यादित राहिले आणि त्याचा परिणाम म्हणून एक भणंग शहरी अर्थव्यवस्था या राज्यांमध्ये उभी राहिली हे वास्तव नाकारण्यासारखे नाही. या वास्तवाचा फटका आता पटेलांसारख्या मातब्बर जातींनाही बसू लागल्याने गुजरातमधील ‘सर्वाच्या साथीने’ चालणाऱ्या विकासाच्या राजकारणाला त्यांनी घरचा आहेर दिला आहे.
राजेश्वरी देशपांडे
(लोकसत्ता (27 ऑगस्ट 2015)च्या सौजन्याने)
Rajeshwari.deshpande@gmail.com
महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निमित्ताने
महाराष्ट्रातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ‘बाबासाहेब पुरंदरे’ यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि त्यानिमित्ताने नुकताच झालेला प्रचंड वाद हा महत्वाचा आहे.
पुरोगामी चळवळ सांस्कृतिक राजकारण कसे करते, आपले डावपेच कसे मांडते- प्रतिपक्षाचे डावपेच कसे जोखते, वादंगाच्या आपल्या व्याख्या कितपत जोरकसपणे लोकांपुढे मांडते या सगळ्या परीप्रेक्ष्यामध्ये काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत-तसे ते घेतले नाहीत तर आपल्या विरोधाची दिशाच चुकते चुकत आली आहे असे मला वाटते. त्यासाठी हे छोटे टिपण.
राहुल वैद्य
संथारा वा संलेखना
जैन धर्मातील संथारा वा संलेखना हे व्रत बेकायदा ठरविण्याच्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा धार्मिक रूढी, परंपरा, कायदे आणि आधुनिक कायदे यांतील संघर्ष ऐरणीवर आला आहे. याबद्दल सध्या हलक्या आवाजात ज्या प्रतिक्रिया येत आहेत, त्यावरून अनेकांना हा निर्णय म्हणजे न्यायव्यवस्थेने धार्मिकबाबतीत केलेला हस्तक्षेप वाटत आहे. कोणत्याही धर्माबाबत अशा प्रकारचे आधुनिक निर्णय आले की त्या धर्माचे अनुयायी तातडीने एक सवाल उपस्थित करतात. तो म्हणजे, ‘त्या’ दुसऱ्या धर्माबाबत असे निकाल का दिले जात नाहीत? तो दुसरा धर्म म्हणजे हिंदूू, मुस्लीम, शीख, इसाई असा कोणताही असू शकतो. आताही जैन धर्मीयांना हा निकाल अन्याय्य वाटत असून, त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारीही सुरू झाली आहे. अर्थात या गोष्टी भारतात नव्या नाहीत. सतीप्रथेपासून संमती वय, अस्पृश्यता अशा अनेक कायद्यांबाबत असे प्रकार घडले आहेत. येथे मूळ मुद्दा असा येतो की, कोणत्याही धर्माच्या बाबींमध्ये राज्यव्यवस्थेचा हस्तक्षेप योग्य आहे की अयोग्य? प्रश्न सनातन आहे. मात्र आधुनिक काळामध्ये त्याचे उत्तर ‘योग्य’ असेच आहे. धर्माची एक व्याख्या ‘धारयति स: धर्म:’ अशी केली जाते. आधुनिक काळात धर्माचे हे समाजाची धारणा करण्याचे कार्य राज्यघटनेकडे आपणच दिले आहे. तेव्हा अंतिमत: कायदा चालणार तो घटनेचाच. भारतात समान नागरी कायदा असावा या मागणीला हा आधार आहे. ते केवळ येथील अल्पसंख्याकांना डिवचण्याचे हत्यार नाही. तेव्हा ज्या धार्मिक बाबी किंवा प्रथा घटनेच्या चौकटीत बसत नसतील त्या दूर करणे हे राज्य आणि न्यायव्यवस्थेचे कार्य आहे.
राजस्थान न्यायालयाने तेच केले आहे. दुसरा मुद्दा येतो तो संथाराच्या अर्थाचा. जैन धर्मीयांच्या धारणेनुसार संथारा हा मोक्षप्राप्तीचा एक मार्ग आहे. या व्रतामध्ये व्यक्ती खाणे-पिणे सोडून देहत्याग करतात. येथे प्रश्न असा येतो की, कोणताही धर्म एखाद्या व्यक्तीस आत्महत्या करण्याची परवानगी देतो का? याची उत्तरे वेगवेगळी आहेत. मोक्षप्राप्तीकरिता जिवंत समाधी घेणे, प्रायोपवेशन करून, संथारा व्रत करून प्राणत्याग करणे, पतीबरोबर सती जाऊन देवतेचा दर्जा प्राप्त करणे हे जेथे धर्ममान्य मानले जाते, तेथेच परमेश्वराने दिलेले जीवन संपविण्याचा मनुष्यास कोणताही अधिकार नाही, किंबहुना ते पाप आहे असेही धर्म- त्यात जैन धर्मही आला- सांगत असतो. तेव्हा धर्मात याबाबत एकमत नाही. जैन मुनी संथाराला आत्महत्या मानत नाहीत. ते त्याकडे आध्यात्मिक नजरेने पाहत असल्याने तसे असेल, परंतु साधारणत: वृद्ध जैन व्यक्ती संथारा व्रत घेतात आणि तिळातिळाने देहत्याग करतात याचा भौतिक जगतात अर्थ आत्महत्या असाच आहे. या आत्महत्येला काही सामाजिक परिमाणेही आहेत. जैन धर्मीयांनी खरे तर त्याची चर्चा करावयास हवी. सतीप्रथेच्या धार्मिक अवडंबराखाली अनेक अबलांना आपले प्राण गमवावे लागले आणि त्याची कारणे संपत्तीच्या वाटपात होती हे केव्हाच स्पष्ट झालेले आहे. रूढी, परंपरांच्या नावाखाली असा एक जरी प्रकार घडत असेल, तरी त्याचा कायद्याने बंदोबस्त केलाच पाहिजे. राजस्थान न्यायालयाच्या निर्णयाची चर्चा या मुद्दय़ावर झाली पाहिजे.
-लोकसत्ता (12 ऑगस्ट 2015)
निलॉय चक्रबर्ती
बांगला देशात गेल्या सहा महिन्यांत चार ब्लॉगर्सचे कोयत्याने तुकडे करण्यात आले, त्यात पहिले अविजित रॉय, नंतर अनंता बिजॉय दास, वशीकुर रहमान आणि आता निलॉय चक्रबर्ती. इस्लामी मूलतत्त्ववाद्यांच्या ठार मारण्याच्या यादीत असे ८४ ब्लॉगर्स आहेत. त्यांचा गुन्हा एकच आहे की, ते निधर्मी आहेत. ते स्त्रियांच्या स्वातंत्र्याला महत्त्व देतात. बांगला देश युद्धातील गुन्हेगारांविरोधात लिखाण करतात. हिंदूंवर देशात होणाऱ्या अत्याचारांवर बोलतात. बांगला देशात राहण्यासाठी सध्या अनेक अलिखित शर्ती आहेत, त्यात म्हणजे तोंड बंद ठेवणे, लेखणी मोडणे, मेंदू काढून कचऱ्याच्या डब्यात फेकून देणे..
पण या भीतीच्या छायेतही इस्लामी मूलतत्त्ववाद्यांशी सामना करीत निलॉय चक्रबर्तीने उत्तर गोरहान येथे भरदुपारी पावणेदोन वाजता घराच्या चौथ्या मजल्यावर अल्ला हो अकबरचा पुकारा करीत आलेल्या तिघा-चौघांचे कोयत्याचे वार झेलले. निलॉय हा तत्त्वज्ञानातला पदवीधर होता, त्यामुळे मेंदू बाजूला ठेवून वागणे त्याला मृत्यूची टांगती तलवार असूनही जमत नव्हते, हीच त्याची चूक. निलॉय नील या टोपणनावाने तो इश्टेशन (द स्टेशन) हा ब्लॉग लिहीत होता व अविजित रॉय यांच्या मुक्तो मोना (फ्री थिंकर) या ब्लॉगवरही त्याने लिहिले होते. तो गणजागरण मंचचा सदस्य होता. सायन्स अॅण्ड रॅशनॅलिस्ट असोसिएशन ऑफ बांगला देशचा तो संघटक होता. युद्ध गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे त्याचे मत होते. त्याने जातीयवाद व मूलतत्त्ववाद याच्याविरोधात आवाज उठवल्याने त्याला ठार मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्याने फेसबुकवरील त्याचे छायाचित्र काढले व राहण्याचे ठिकाण कोलकाता दाखवले होते, पण तरीही मरण चुकले नाहीच. जर तुमच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याला मर्यादा घालता येत नसतील तर आमच्या कोयत्याचे स्वातंत्र्य झेलण्यासाठी छाती रुंद करून ठेवा, असे अल कायदाशी संबंधित मूलतत्त्ववाद्यांचे म्हणणे आहे. त्यांना घाबरून काही ब्लॉगर्स इतर देशांत गेले, पण तो उपाय नाही. निलॉयनेही पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनीच त्याला देश सोडायला सांगितले होते. बांगला देशी ब्लॉगर अनन्या आझाद आता जर्मनीत आहेत. त्यांच्या मते नील चांगला ब्लॉगर होता. त्याने काही फक्त इस्लामवर टीका केली नव्हती, हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन अशा सर्वच धर्मातील रूढींवर तो टीका करीत होता. त्यानेच आपल्याला परदेशात जाण्याचा सल्ला दिला आणि आता त्याच्याच मृत्यूची करुण कहाणी ऐकून हादरायला होतेय.
– -लोकसत्ता (11 ऑगस्ट 2015)
त्यांचा खेळ (आणि धंदा) होतो …
‘हॉरर शो’चे ‘भूत’
अंधश्रद्धा आणि जादूटोण्याला प्रोत्साहन देणाऱ्या टीव्हीवरील ‘हॉरर शो’ने मन:स्वास्थ्य किती बिघडते, याचा अनुभव केईएममधील डॉक्टरांनी नुकताच घेतला. असाच एक हॉरर शो पाहून एका व्यक्तीने सीरिअलमधील पात्राप्रमाणेच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आपल्या मृत्यूनंतर आपला आत्मा आपल्याला छळणाऱ्याचा नायनाट करील, असे अजब तर्कट लढवणाऱ्या व्यक्तीच्या मानगुटीवरील अंधश्रद्धेचे ‘भूत’ अखेर मानसोपचार तज्ज्ञांनी उतरवले.
टीव्ही सीरिअलमधील चांगल्या-वाईट गोष्टींचे प्रतिबिंब समाजात नेहमीच उमटत राहाते. त्याचे उदाहरण केईएम हॉस्पिटलच्या मानसोपचार विभागात अलीकडेच दिसले. एका चॅनेलवर रात्री हॉरर शो दाखवला जातो. या सिरिअलमधील एका पात्राला आसपासचे व परिचयातील अनेक जण छळत असतात. या सर्व छळाला कंटाळून तो आत्महत्या करतो. आत्महत्येनंतर त्याचा आत्मा त्रास देणाऱ्यांचा नायनाट करतो, असे या सीरिअलचे कथानक आहे. ही सीरिअल पाहिल्यावर मुंबईतील सुरेशला (नाव बदलले आहे) ती त्याचीच कथा वाटू लागली. त्या सीरिअलमधील पात्राप्रमाणे आपणही आत्महत्या करावी, मृत्यूनंतर आपला आत्मा आपल्याला छळणाऱ्यांचा नायनाट करील, असे तो समजू लागला. त्यातून सुरेश विचित्र वागू लागला. त्याने आत्महत्येचा प्रयत्नही केला. अखेर त्याला कुटुंबीयांनी केईएमच्या मानसोपचार विभागात आणले. डॉक्टरांनी सुरेशला बोलते केले, तेव्हा टीव्ही सीरिअल पाहून आपणही तसेच वागण्याचा प्रयत्न केल्याचे त्याने सांगितले. सुरेशची मानसिक अवस्था पाहून अखेर त्याला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याची प्रकृती आता सुधारत आहे.
दैवी शक्तीची ‘केस’
केईएममध्ये यापूर्वी एक केस आली होती. एक मुलगी स्वतःच्या डोक्यावरचे केस उपटून दुसऱ्याला देत होती. तिच्यात दैवी शक्तीचा संचार असल्याचा साक्षात्कार तिच्या घरच्यांना झाला. अनेक जण तिने दिलेला केस ‘देवाचा केस’ म्हणून घरी नेऊ लागले. अखेर या मुलीच्या शेजारी राहणाऱ्या एका जागरूक महिलेने केईएमच्या मानसोपचार विभागात फोन केला. विभागातील डॉक्टरांनी मुलीच्या घरी जाऊन तिला उपचारांसाठी हॉस्पिटलध्ये आणले आणि उपचार केले.
टीव्ही सीरिअलचा समाजावर पगडा पडतो. संबंधित पेशंटला आम्ही अॅडमिट करून घेतले. अशा पेशंटवर वैद्यकीय व मानसोपचारांची गरज असते. त्यातून पेशंट बरे होतात.
– डॉ. शुभांगी पारकर, मानसोपचार विभागप्रमुख
महाराष्ट्र टाइम्स (5 जुलै 2015) च्या सौजन्याने
काळाची चक्रे उलटे फिरवणाऱ्या संस्कृतीकरणाकडे
- शिक्षणक्षेत्रात गोंधळ घालत सेन्सॉरशिपचे जे अचाट प्रयोग करत आहेत त्यामागचे संस्कृतीकरण आता सुजाणांच्या लक्षात येऊ लागले आहे, आणि तीच भीती एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांच्या मनात आहे.
- ब्रिटिश राजवट येण्याआधी भारताचे जगात जे स्थान होते, त्या स्थानावर त्यांना भारताला न्यायचे आहे.
याचाच दुसरा अर्थ निघतो, तो म्हणजे आम्हाला काळाची चक्रे उलटी फिरवायची आहेत. या अर्थाने ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी भाजपमधील अनेक बोलघेवडे खासदार प्रयत्न करत असल्याचे गेले काही महिने दिसते आहेच.
अशी स्थिती आलीच आहे. पण या धोरणातील चुका उघड करताना, ‘असे का होत आहे ?’ ते जाणून घ्यावयाचा प्रयत्नसुद्धा झाला पाहिजे.
‘(यांत्रिकी) उत्पादन युगातून माहिती तंत्रज्ञान अवतरल्यामुळे नीतिमूल्यांमध्ये उलथापालथ होत आहे’, असेही विचार योशिहिरो फ्रान्सिस फुकुयामा (Yoshihiro Francis Fukuyama) यांनी मांडले. अर्थात मूल्यनिर्मितीवर आर्थिक आणि इतर भौतिक घटकांचा मोठा प्रभाव असतो हा साम्यवादी पाया असलेला विचार संयुक्तिक / रास्त / वाजवी आहे असेच दिसून येते.
बॅलिबर (Étienne Balibar) यांच्या मते ‘राष्ट्राची नेमकी सुरुवात कधी झाली हे सांगणे किंवा आजच्या राष्ट्राचे नागरिक हे पूर्वापार राष्ट्राचेच वंशज आहेत असे मानणे अशक्य असते’. कोणत्याच राष्ट्राला वंशीय पाया नसल्यामुळे वंशीय परंपरांचा आभास निर्माण करुन स्थैर्य मिळविणे ही प्रत्येका राष्ट्र-राज्याची गरज असते. विभागीय, वर्गीय आणि वांशिक तणाव कमी करण्यासाठी वांशिक एकात्मता भासविणाऱ्या आख्यायिका आणि दंतकथा निर्माण केल्या जातात’.
क्लॉडे लिफोर्ट (Claude Lefort) यांनी विचार मांडले की, ‘समाजातील तणावांचे लोकशाहीत संस्थाकरण होते. विसंगत आणि परस्परविरोधी धारणा आणि हितसंबंध मान्यताप्राप्त आणि संयुक्तिक मानले जातात. नेतृत्व ही राजकीय संस्था न राहता समान हितसंबंध असणाऱ्या गटांमध्ये, कधीकधी पाळीपाळीने, वाटून दिलेली जागा होते. सत्तेचे सामर्थ्य आणि दबदबा हे विजयी होणाऱ्या गटाकडे तात्पुरती सुपूर्द होतात’. लोकशाही माध्यमातून काय मिळविता येईल ? त्याला मर्यादा असतात.
अशा विचारमंथनामुळे सद्यस्थितीवर काहीसा प्रकाश पडतो. वेदकालिन आणि वेदान्ती तत्त्वज्ञाने विभिन्न आर्थिक-सामाजिक हितसंबंधांखाली निर्माण झाली. प्रामुख्याने वेदान्ती विचारांच्या प्रभावाखालील असणाऱ्या समाजाला वेदकालीन विचारधारेशी देणेघेणे नसते. परंतु त्यांच्यात वांशिकच नव्हे तर वैचारिक एकात्मता दाखविण्याचा प्रयत्न होतो. उज्वल भारतीय परंपरांचा उद्घोष करताना ‘इंद्राने अहिल्येवरील अत्याचार करणे; नल हा अधिक सुयोग्य वर असतानासुद्धा इंद्र, अग्नी, यम आणि वरुण यांनी दमयंतीच्या प्राप्तीची अभिलाषा ठेवणे, नलाशी कपटी डाव खेळणे; आणि अशी पार्श्वभूमी असलेल्यांनी मेनकेला पुढे करुन विश्वामित्राला नापास करणे (आख्यायिका आणि दंतकथांच्या संशोधनात पूर्वापार केलेले व्यापक आणि व्यापमं घोटाळे आढळले तर जाज्वल्ल्य परंपरांच्या पाईकांचा अभिमान द्विगुणित होईल !)’ अशा पुराण कथा या झाकून ठेवल्या जातात, एकलव्य, शंबुक यांच्या कथांमधील अन्यायाचे उदात्तीकरण होते. आर्य ‘येथील’च आहेत आणि आर्य आणि अनार्य यांच्यात आदिम काळापासून एकात्मता होती असे दाखविण्याचा, खांडव वनातील किंवा जनमेजयाच्या यज्ञातील नागसंहाराच्या कथांचे समर्थन करण्याचा आटापीटा होतो. याच्या जोडीने उन्मादी होणे आणि आदर्शवादी तत्त्वे झुगारुन देणे, उद्दाम आणि असहिष्णु वृत्ती जोपासल्या जाणे असे वाढत आहे. अशा अनेक घटनांची संगती लागते.
माहिती तंत्रज्ञान, जागतिकीकरण, उपभोगवाद, लोकशाहीच्या अंगभूत मर्यादा इत्यादी अनेकविध घटकांच्या प्रभावाचा अधिक अभ्यास व्हावा. ‘अधिक संशोधनाची आवश्यकता आहे’ ही बॉटम लाईन’ / तळटीप बघता ही चर्चा व्यापक होऊन अजून पुढे गेली पाहिजे
डॉ. राजीव जोशी
अमेरिकेत वाढतेय निधर्मींची संख्या
जन्माने ख्रिश्चन असलो, तरी आपण विचारपूर्वक कोणताही रूढ धर्म प्रमाण मानत नसल्याचे आणि म्हणून आपली नोंद निधर्मी अशी करावी असे सांगणाऱ्या नागरिकांची अमेरिकेत संख्या वाढलेली आहे. केवळ गेल्या सात वर्षांत अमेरिकेतील ख्रिश्चनांची संख्या आठ टक्क्यांनी घटली असल्याचे एका पाहणीतून समोर आले आहे. मात्र याचा अर्थ त्या देशात अन्य धर्मियांची संख्या वाढल्यामुळे तुलनेने ही कमी झाली असा नाही. किंवा ख्रिश्चनांनी त्या देशातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले अशीही वस्तुस्थिती नाही.
प्यु रिसर्च सेंटर (Pew Research Centre) या संस्थेने अलीकडेच एक अभ्यासपाहणी केली होती. तुलनात्मक अभ्यास करता त्यांना असे आढळले, की २००७मध्ये ७८ टक्के अमेरिकनांनी आपला धर्म ख्रिश्चन असल्याचे नमूद केले होते, मात्र २०१४मध्ये हे प्रमाण ७१ टक्क्यांवर आले आहे. याच कालावधीत निधर्मी नागरिकांची संख्या १६वरून २३ टक्क्यांवर गेली आहे. सुमारे पाच कोटी ६० लाख अमेरिकन आपण कोणत्याही धर्माचे पालन करत नसल्याचे म्हणत आहेत. ही संख्या ‘एव्हांजेलिकल्स’ म्हणजे बायबल प्रमाण मानणाऱ्या कडव्या लोकांच्या जवळपास आहे. दक्षिणेकडील प्रांतांत निधर्मींची टक्केवारी १९ टक्के, ईशान्येकडील राज्यांत ती २५ टक्के तर पश्चिमेकडील राज्यांत ती २८ टक्के इतकी आहे.
अमेरिकेत अन्यधर्मियांचे प्रमाणही अर्थातच आहे. मात्र असे असले, तरी अमेरिका हाच आज सर्वाधिक ख्रिश्चन लोकसंख्या असलेला असा देश आहे हेही वास्तव आहे. ख्रिस्ती धर्माच्या कोणत्या ना कोणत्या शाखेशी अथवा पंथाशी नाते सांगणाऱ्या माणसांची संख्या दर दहांमध्ये सात इतकी आहे आणि एकूण ख्रिश्चनांची टक्केवारी ७०.६ टक्के आहे. प्यु रिसर्च सेंटरने २००७मध्येही अशी पाहणी केली होती. तेव्हा आणि २०१४मध्ये केलेल्या पाहणीत त्यांना असेही आढळले आहे, की प्रॉटेस्टंट आणि कॅथॉलिकांबरोबर अन्य धर्मातील उदारमतवादी लोकांच्या संख्येतही संथपणे पण निश्चित घसरण आहे. हे काहीसे संभ्रमात टाकणारे आहे. याचा एक सारांश असाही निघू शकतो, की एका बाजूला धर्म मानणारे तुलनेने अधिक धार्मिक होत चालले होत आहेत तर दुसरीकडे विवेकवादच मानवजातीला तारक ठरेल यावर विश्वास असणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. या पाहणीच्या दरम्यान अभ्यासकांना असे आढळले, की जगभरच धार्मिक उन्माद, वंशवाद पराकोटीला जात असल्याने निर्माण झालेल्या भयाण वास्तवाने अंतर्मुख होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. शिवाय जागतिक नागरिकत्वाची संकल्पनाही नव्या पिढीला आकर्षित करते आहे. जागतिकीकरणामुळे भिन्न धर्मांचे आणि वंशांचे नागरिक परस्परांच्या सान्निध्यात येत आहेत, त्यांच्यात नातेसंबंधही निर्माण होत आहेत, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे पारंपरिक समजुतींच्या मर्यादा अधिकच स्पष्ट होत चालल्या आहेत. अशा स्थितीत केवळ एखाद्या विशिष्ट धर्मात जन्माला आलो, म्हणून तो धर्मच श्रेष्ठ असे मानून त्याचे पालन करत राहणे किंवा त्या धर्मातील विशिष्ट समजुतींमधील फोलपणा लक्षात येऊनही त्याचे समर्थन कसे करावे असे वाटणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ होत आहे.
विशेष म्हणजे धर्म न मानणाऱ्या अमेरिकनांनी आपले गट आणि संघटनाही स्थापन केल्या आहेत. त्यामार्फत विवेकी विचारांचा प्रसार मोठ्या प्रमाणावर व्हावा या हेतूने विविध उपक्रम ते राबवत असतात. केवळ सामाजिकच नव्हे, तर या मंडळींनी राजकीय व्यासपीठेही निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका हे फेडरल रिपब्लिक आहेच, राज्यव्यवस्थेचा भर सेक्युलर तत्वांवरच आहे. या गटांनी आता धर्म ही व्यक्तिगत बाब असून ती सार्वजनिक जीवनापासून लांबच ठेवलेली बरी या विचारांच्या प्रसाराची मोहीम हाती घेतली आहे. आस्ते आस्ते राजकीय दबावगट निर्माण करणे आणि पुढेमागे राजकीय व्यवस्थेमध्ये आपले स्थान निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे सेक्युलर कोअॅलिशन फॉर अमेरिका या संघटनेच्या केली डॅमरो यांनी अलीकडेच बीबीसीला मुलाखत देताना सांगितलेही आहे. जवळपास प्रत्येक बाबतींत अमेरिकेकडे पाहणाऱ्या भारतीयांनी दखल घ्यावी अशा या घडामोडी आहेत.
– महाराष्ट्र टाइम्स ( ३० मे २०१५)
अनंता बिजॉय दास
तो नास्तिक होता.. खुलेपणाने मते मांडत होता.. एवढाच त्याचा गुन्हा होता. आधिभौतिकतावाद व तर्कशास्त्र यावर त्याचे ब्लॉगलेखन होते, पण तो एका कर्मठ मानसिकता असलेल्या देशात जन्माला आलेला होता, त्यामुळे मागच्या दोघांचे जे झाले तेच त्याचेही झाले. बांगलादेशातील सिल्हेट जिल्ह्य़ात तो सकाळी कार्यालयात निघाला असताना कोयत्याने वार करून अनंता बिजॉय दास या ब्लॉगरचा खून करण्यात आला.
त्याआधी तेथील कर्मठ मुस्लिमांनी अविजित रॉय या अमेरिकी ब्लॉगरची हत्या केली होती. त्यानंतर त्यांनी वशीकुर रेहमान या ब्लॉगरला याच पद्धतीने मारले होते, त्यांच्या हिट लिस्टवर निधर्मी असलेले ८४ ब्लॉगर आहेत व त्यातील एकेक मुक्त आवाज हळूहळू शांत होत आहे. ‘डिफेन्डर्स ऑफ इस्लाम’ या संघटनेने ही कृत्ये चालवली आहेत. अनंता बिजॉय दास हा ब्लॉगर अविजित रॉय यांनी सुरू केलेल्या मुक्तो मोना (मुक्त विचारवंत) या ब्लॉगमध्येच लेखन करीत होता. इस्लाम व इतर धर्मातील मूलतत्त्ववाद्यांवर तो टीका करीत असे. ‘ज्युक्ती’ या स्थानिक विज्ञान मासिकाचे संपादन तो करीत होता व त्याने चार्लस डार्वनिसह अनेक विषयांवर पुस्तके लिहिली होती. २००६ मध्ये त्याच्या ब्लॉग लेखनाला विवेकवादाचा पुरस्कार देण्यात आला होता. त्याच्या ‘मुक्तो मोना’ या ब्लॉगवर त्याने बंडखोर बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांच्यावर कविता लिहिली होती. अविजित रॉय यांच्या एका पुस्तकाला त्याने प्रस्तावनाही लिहिली होती. अनंता हा शाजालाल विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर एका खासगी बँकेत काम करीत होता. शाजालाल विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठाच्या एका शिक्षकाला जाहीर फटके मारले पाहिजेत असे एका सत्ताधारी पक्षाच्या खासदाराने म्हटले होते, त्यावर अनंताची शेवटची पोस्ट होती.
मागील दोन ब्लॉगर्सच्या खुनाबाबत काय झाले, असा सवाल त्याने परवाच फेसबुकवर केला होता.. नास्तिक मुस्लिमांना समाजातच अशी वागणूक मिळते असे नाही तर कुटुंबापासूनही ते दूर जातात, ही मोठी शोकांतिका आहे. एकदा स्वीडिश सरकारने अनंता दासला स्वीडिश पेन कार्यक्रमासाठी बोलावले असतानाही तो परत बांगलादेशात जाऊ शकणार नाही म्हणून व्हिसा नाकारला होता. अनंताच्या हत्येनंतर त्याचे फेसबुक पेज निषेधांनी भरून गेले, पण तो जिवंत असतानाही नास्तिक म्हणून अनेक मरणे झेलत होता. अनंतासारख्यांच्या हत्या या बाकीच्या खुल्या आवाजांना इशारा असतो, तुमचीही वेळ भरत आलीय.. हे सांगणारा.
‘व्यक्तिवेध’ लोकसत्ता
Published: Thursday, May 14, 2015