मनोगत

सुधारक’च्या ऑक्टोबरच्या अंकासाठी मूळ प्रश्नांना हात घालणारे, काही उपाययोजना सुचविणारे तर काही नव्या विचारांना प्रवृत्त करणारे लेख यावेत यासाठी आम्ही केलेल्या आवाहनाला ‘सुधारक’ परिवाराच्या अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘सुधारक’ला मिळणारा प्रतिसाद आमचा उत्साह वाढवतो आहे. बरोबरीनेच एका मोठ्या जवाबदारीची जाणीवही करून देत आहे.

सुधारक’मध्ये प्रकाशित होणार्‍या लेखांमधील विचारांशी आम्ही सहमत असूच असे नाही. परंतु, अशा लेखांच्या निमित्ताने विविध विषयांवर साधकबाधक चर्चा सुरू होऊ शकते असा आम्हांला विश्वास वाटतो. अश्या चर्चा एखाद्या विषयावरील आपल्या धारणा अधिक पक्क्या करण्यात किंवा जुन्या धारणा अयोग्य वाटल्यास त्या बदलण्यात मदतच करतात. ह्या अंकातील ३७० कलमाविषयीचे दोन लेख किंवा ‘जैविक वा रासायनिक’ याविषयीचा सामान्यांच्या मनातील गोंधळ कमी करण्याचा प्रयत्न करणारे दोन लेख हे ह्या दृष्टिने महत्त्वाचे वाटतात.

मतांतरांचे स्वागत हे ‘सुधारक’चे अलिखित धोरण आहे. मागील तीनही अंकातील लेखांवर आलेल्या प्रतिक्रिया त्या त्या लेखांखाली आम्ही लगेचच प्रकाशित केल्या. प्रतिक्रियांचे स्वरूप चिंतनपर परीक्षणाचे असावे असे प्रकर्षाने वाटते. तसे झाले तरच विचारांना चालना मिळून आपण अधिकाधिक विवेकवादी विचार करण्यास प्रवृत्त होतो.

सुधारक’ला कोणताही विषय वर्ज्य नाही. ‘सुधारक’च्या माध्यमातून काही नवनवीन विचार पुढे यावेत, विविध समूहांतील अनिष्ट प्रथांविषयी बोलले जावे. असे सातत्याने होत गेले तर कदाचित आपण सर्व मिळून एका नव्या समाजाची स्वप्ने बघू आणि तेथवर पोहोचण्याचे सामूहिक प्रयत्न चालू करू अशी आशा वाटते.

आभार.
समन्वयक : प्राजक्ता अतुल
aajacha.sudharak@gmail.com