पत्रव्यवहार

संपादक
‘नवा सुधारक’ यांस,
आपण म्हणता त्याप्रमाणे, व आगरकरही म्हणतात त्याप्रमाणे, विश्वासावलंबी कल्पनांची जागा विवेकवादाने घेणे इष्ट आहे हे उघडच; पण सर्वसाधारण माणसास विवेकवाद हे आपल्या अपकृत्यांचे समर्थन करण्याचा मार्ग वाटू नये. मी खून केला तर मला त्याचे प्रायश्चित्त मिळेल ही भावना माणसास खून न करण्यास प्रवृत्त करते. विवेकवादाने जर खून करणार्‍यांपैकी ९०% लोक पुराव्याअभावी निर्दोष सुटतात है। सिद्ध केले तर (व तसे सहज शाक्य आहे) खून करण्याची प्रवृत्ती वाढेल. पाप व पुष्प या कल्पना विवेकवादाच्या कसोटीवर उतरत नाहीत, परंतु ८०-९०% लोकांच्या मनावर या कल्पनांचा पगडा असल्यामुळे ते चांगले वागण्याचा प्रयत्न करतात. या वृत्तीमुळे भारतात घटस्फोटांचे प्रमाण खूप कमी आहे. याचा अर्थ या अंधश्रद्धांचा मी पुरस्कार करतो असे नव्हे. चांगले वागणे हे नीतिमत्तेस धरून आहे हे लोकांच्या मनावर ठसले पाहिजे. पण आपल्या लोकांना बडगा दाखवल्याशिवाय चांगले वागणे माहीत नाही. नाहीतर सार्वजनिक ठिकाणी जी घाण दिसते ती दिसलीच नसती.
विवेकवादानुसार वैज्ञानिक सिद्धान्त तर्काच्या कसोटीवर घासून घेता येतात. एखादा सिद्धान्त (उदा. न्यूटनचा) प्रस्थापित होतो याचे कारण त्यानुसार अनेक वास्तवांचा उलगडा करता येतो किंवा काही वास्तवे सिद्ध करता येतात. उदा. पृथ्वी गोल आहे म्हणून त्या वास्तवाचा स्वीकार करणे इष्ट. परंतु यापुढे जाऊन पृथ्वी गोलच का आहे? या प्रश्नाचे उत्तर विज्ञान देऊ शकत नाही; म्हणून त्याची कारणे शोधणे अयोग्य नाही. E = mc^2 हा सिद्धांत आइन्स्टाइनने मांडला; परंतु हे असे का होते यावर मात्र त्याला यापलीकडे कुठली तरी दाक्ती आहे व तिच्या नियंत्रणाने या गोष्टी घडतात असे म्हणावे लागले. आइन्स्टाइनने असे उद्गार काढले याचा अर्थ तो अंधश्रद्ध होता असा तर घेता येणार नाही. एकाच प्रकारच्या मातीत, एकाच परिस्थितीत लावलेल्या १०० बीजांपैकी ५० च उगवतात व ५० उगवत नाहीत. पन्नास का उगवतात याचे उत्तर विज्ञान देते; पण ५० च का उगवतात याला मात्र त्याला हात वर करावा लागतो. त्याहीपुढे जाऊन तीच ५० का उगवतात हा प्रश्न तर आणखीच अवघड आहे. १०० फूट दरीत गाडी कोसळून किंवा हजारो फुटांवरून विमान कोसळून सर्वच्या सर्व माणसे मरतात व एखादा मात्र अगदी सहीसलामत सुटतो याचे कारण काय?
स्टॅटिस्टिक्सला विवेकवादानुसार दाख म्हणता येते. त्यानुसार हवामानाचे अंदाजच असले तरी विवेकवादी ते मान्य करतो. (अनेकवेळा ते खोटे ठरले तरी.) मात्र भविष्य सांगणाच्याचा तो उपहास करतो. भविष्य सांगणारयाने जर स्टॅटिस्टिक्सच्या आधारे भविष्य सांगितले तर तेही हवामानाच्या अंदाजाइतकेच बरोबर वा चूक ठरण्याची शक्यता आहे.
विज्ञानाने एखादी गोष्ट सिद्ध करणे शक्य नसेल तर ती विवेकवादी मान्य करत नाही; पण ती गोष्ट प्रत्यक्ष अस्तित्वात असली तर विवेकवादी ती अमान्य करणार की काय? उदा. १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिणे ही गोष्ट कुठल्याच वैज्ञानिक निकषावर बसणार नाही. ज्ञानेश्वरीचे उदाहरण फार जुने झाले. अगदी अलीकडे The world this week या कार्यक्रमात वयाच्या पाचव्या वर्षी अतिशय उत्कृष्ट पियानो वाजवणारा मुलगा दाखविला होता. किंवा भारतातच एक मुलगा वयाच्या ८व्या वर्षी अनेक वैज्ञानिक व गणिती प्रमेये मांडतो. त्याला भारतातील कुठल्या ठित प्रवेश मिळत नाही अशी बातमी मध्यंतरी होती. या गोष्टींची उपपत्ती कशी लावायची?
माझ्या मते अध्यात्म ही विवेकवादाच्या पुढची पायरी आहे. ज्यावेळी सर्व प्रश्नांची उत्तरे वैज्ञानिक व तर्कसंगत पद्धतीने माणूस लावत जातो व तो अशा एका ठिकाणी येतो की त्यापुढची उत्तरे त्याला देता येत नाहीत, तेथे अध्यात्माची सुरवात होते. त्यामुळे विवेकवादाच्या सुरवातीसच अध्यात्म खोडून काढण्याचा प्रयत्न करणे योग्य नव्हे. कमीतकमी अध्यात्म दारुड्याला दिसणाच्या गुलाबी उंदराइतके cheap नाही येवढी तरी जाणीव ठेवावी असे मला वाटते. असो.
माझे विचार अधिक सुस्पष्टपणे मांडण्याइतका माझा सराव राहिला नाही. तरीही त्यातील भावार्थ आपण जाणून घ्याल अशी आशा आहे.
आपला,
श्याम कुळकर्णी
यमाई, तंत्रनगर, जवाहर कॉलनीजवळ, औरंगाबाद ४११००१

चौसाळकरांचा संताप असमर्थनीय
‘जातिविग्रहाच्या मयांदा व धोक’ या लेखात (नवा सुधारक ऑक्टः १०/१५ ) श्री. अशोक चौसाळकर यांनी समाजवाद्यांवर बरीच आगपाखड केली आहे.
मंडल–निर्णयाच्या विरुद्ध विशेषत: उत्तर भारतात जे आंदोलन झाले त्यान आत्मदहनाच्या घटना घडल्या त्या लक्षात घेऊन आंदोलनकारी विद्याथ्र्यांशी चर्चा करायला हवी होती व तो निर्णय स्थगित सुध्दा करायला हवा होता. पण तसे न करता विशेषत: डॉ. आंबेडकर व डॉ. लोहियांच्या अनुयायांनी ताठर भूमिका घेतली. याबद्दल चौमाळकरांनी त्या अनुयायांना व विशेषत: प्रमिला दंडवते, मृणाल गौर, मधु लिमये, ना. ग. गोरे यांना दोष दिला आहे.
चौसाळकरांची चीड, संताप व तळमळ समजण्यासारखी आहे. पण त्यांनी याच मुद्यांची गल्लत केली आहे. त्या आंदोलनात तरुण पदवीधर विद्यार्थी – विद्यार्थिनींचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता हे खरे आहे. पण आंदोलनाचे नेतृत्व किंवा संचालन कोण करीत होते हे कधीतरी स्पष्ट झाले होते का? सरकारी यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी व भाजप आणि काँग्रेस या पक्षांचे कार्यकर्ते हेच त्या आंदोलनाचे खरे सूत्रधार होते ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. पण या मंडळींनी चळवळीची जबाबदारी घेतली नाही.
त्यामुळे चर्चा व वाटाघाट करणे फारच अवघड होते. तरीही सुरेंद्र मोहनांनी अ.भा.वि.प. चे काही नेते व इतर काही विद्यार्थी यांच्याशी संपर्क साधला होता. (मृणाल गोरे किंवा ना.ग. गोरे दिल्लीत राहात नाहीत. त्यांनी आंदोलनकारी विद्याथ्र्यांशी संपर्क का साधला नाही हा प्रश्न योग्य आहे का?) तत्कालीन प्रधानमंत्री विश्वनाथ प्रताप सिंग यांनी दोन-तीनदा जाहीरपणे सांगितले की आंदोलनकारी विद्याथ्र्यांशी मी चर्चा करू इच्छितो. पण आंदोलनकारांकडून प्रतिसाद आला नो असा — आधी मंडल निर्णय स्थगित करा. मगच बोलणी होतील. ही निवेदनेमुध्दा कुणा नेत्याने केली नाहीत. समता मंच, इक्वॉलिटी फ्रंट व अँटीमंडल ऊंट अशा अंत्यत तात्कालिक व अस्थायी संघटनांच्या नावाने ती जाहीर झाली. बहुसंख्य वृत्तपत्रे मंडल–निर्णयाच्या विरोधी असल्याने निवेदनावर कुणाची श्रध्दा आहे – वगैरे गोष्टींविषयी कोणी खातरजमा करून घेण्याची तसदी घेतली नाही.
आत्मदहनाच्या ज्या घटना घडल्या त्यातल्या काही अत्यंत दांकास्पद आहेत. सात, तेरा किंवा सतरा वर्षाच्या मुलामुलींनी आत्मदहन किंवा अन्यप्रकारे आत्महत्या केल्या हे वर. त्यांनी प्रश्नाचा नीट अभ्यास केला होता का? लोकांसमोर आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला का तरीही आत्मदहन करणारी मुले माझीच मुले आहेत, त्यांचे जीवन अकाली संपले याबद्दल मला अतिशय वेदना होत आहेत असे वि.प्र. सिंगांनी दोनतीन वेळा सांगितले.
चौसाळकरांना नेमके काय म्हणायचे आहे हे त्यांनी आता तरी शांतपणाने परत लिहावे. आपला राग्र कुणावर तरी व्यक्त करायचा ही पद्धत बरोबर नाही.
पन्नालाल सुराणा
दैनिक ‘मराठवाडा’, सन्मित्र कॉलनी, औरंगाबाद, ४३१००१

‘श्री. दिवाकर मोहनींना उत्तर’ (‘नवा सुधारक’, मे २०) या लेखात श्री. के.रा. जोशी, सुरुवातीलाच असे प्रतिपादतात की “हिंदू म्हणून करावयाची कर्तव्ये कोणती, या प्रश्नाचे उत्तर निश्चित ठरले तर, ती कर्तव्ये न करताही एखाद्याला हिंदू म्हणवून घेता येईल का, हा प्रश्न निकालात निघतो.” परंतु, त्यांच्या सबंध लेखात ही कर्तव्ये कोणती याचा उल्लेख आढळत नाही. अहिंसा, सत्य, अस्तेय इ. ज्या सद्गुणांचा त्यांनी उल्लेख केला आहे, ते सर्व धर्मांना समान आहेत, असे तेच मान्य करतात, मग हिंदुविशिष्ट अशी कर्तव्ये कोणती? हिंदुसमाज हा स्वाभाविकपणे ज्या गुणांकडे झुकणारा आहे, असे ते म्हणतात, त्यातील सहिष्णुता हा गुण बराच विवाद्य आहे, असे मला वाटते. परधर्मीयांशी सहिष्णुतेने वागणारा हा समाज स्वधर्मीयांशी मात्र किती पराकाष्ठेच्या असहिष्णुतेने वागला, याची उदाहरणे पुरात, इतिहासात हवी तेवढी आहेत. तसे नसते तर स्वा. सावरकरांसाररव्या द्रष्ट्या पुरुषाला या वृत्तीविरुध्द आयुष्यभर मोहीम उघडावी लागली नसती व डॉ. आंबेडकरांसारख्या दुसर्‍या एका महामानवाला आपल्या लक्षावधी अनुयायांसह इतर करायची पाळी आली नसती!
आपला,
य.ज. महाबळे
डॉ.एस.एस. रिसबूड यांचे घर, एस.टी. स्टॅडजवळ,
नायगाव बाजार, ता, बिलोली, जि. नांदेड, ४३१ ७००

आपला ‘नवा सुधारक’ मला फार आवडतो. सप्टेंबरचा अंक उत्कृष्ट आहे. मॉक्रटिमचा संवाद, विवेकवाद छान आहे. एवढेच नाही तर आपण अशिष्ट पत्राला दिलेले शिष्ट उत्तर फार महत्त्वाचे आहे….
दुर्गा भागवत
राजेन्द्र विहार,गिल्डर लेन, मुंबई ८

अभिप्राय 1

  • संपादक, नवा सुधारक’ यांस,
    नोव्हेंबरच्या अंकातील औरंगाबादचे प्रा. श्याम कुलकर्णी यांचं पत्र आणि त्या पत्राला तुम्ही दिलेलं ‘काहीसं सविस्तर उत्तर दोन्ही वाचली. ती वाचल्यानंतर न तथा आंदोलिकादंडः यथा ‘बाधति बाधते अशी माझी अवस्था झाली. मी काही कुणी प्रोफेसर नाही. विज्ञानाचाही नाही किंवा तुमच्या त्या तत्त्वज्ञानाचाही नाही. पण तरीसुद्धा माझ्या अल्पमतीला असं वाटतं की तुम्ही एक फार मोठी चूक करीत आहात. आणि कदाचित तुम्ही एकटेच नव्हे तर सर्वच आंग्लविद्याविभूषित तत्त्वज्ञानी ही चूक करीत असावेत. आणि म्हणून हे पत्र लिहीत आहे. कृपया याला उत्तर द्यावं अशी विनंती आहे. शक्य झाल्यास ‘नवा सुधारक’ मध्येच दोन्ही मांडावीत. त्यामुळे जिज्ञासू वाचकांचाही कदाचित् लाभ होईल. जसं जमेल तसं करावं.

    प्रथमच सांगतो की मी आपला एक चाहता आहे. आपली बहुतेक पुस्तकं मी फार चवीनं वाचतो. ती वाचताना ‘हृष्यामि च मुहुर्मुहुः’ अशी माझी स्थिती होते. तरीही प्रस्तुत ‘अध्यात्म आणि विज्ञान या तुमच्या लेखात एक प्रचंड घोटाळा झाला आहे अशी माझी समजूत आहे. कोणता तो बघाः

    तुम्ही म्हणता, ‘विज्ञानाची ज्ञान प्राप्त करण्याची पद्धत…अनुभवानुसारी म्हणजे जिला empirical म्हणतात ती असून तिच्यात इंद्रियानुभव हा ज्ञानाचा अंतिम निकष मानला जातो. या पद्धतीत इंद्रियांनी मिळणाऱ्या विशिष्ट (अनुभवजन्य) विधानांवरून सामान्य… विधानांची प्रस्थापना केली जाते. आणि त्या विधानांची जुळणी किंवा मांडणी जिला व्यवस्थित (systematic) म्हणतात त्या पद्धतीने केली जाते’.मग उदाहरण म्हणून तुम्ही पुढं असं म्हणता की, ‘जर सर्व कावळे काळे आहेत’ हे खरे असेल तर तेवढ्यावरुन “नागपुरातील कावळे काळे आहेत” हे खरे असले पाहिजे’ वगैरे.

    इथं मुख्य मुद्दा हा आहे की प्रत्यक्ष इंद्रियानुभवावरून – तो मर्यादित असल्यामुळे – अमर्याद अशा वस्तूंबद्दल ‘जर – तर’ सारखी भाषा वापरून अनुमानं केली जातात. वेदान्ताच्या परिभाषेत, अपरोक्ष अनुभवावरून परोक्ष ज्ञानाची – शब्दज्ञानाची – बुद्धिगत मांडणी केली जाते. प्रश्न असा आहे की शाब्दिक किंवा बौद्धिक अनुमानं अथवा त्यांची मांडणी म्हणजे ‘ज्ञान’ म्हणायचं का? ‘ ज्ञान ‘ म्हणजे काय? तुमची ‘ज्ञाना’ ची व्याख्या काय?

    याहूनही मोठा घोटाळा तुम्ही ‘आत्मा’ या संकल्पनेसंबंधानं करून घेतलेला आहे. तुम्ही म्हणतः ‘आत्मा म्हणजे प्रत्येक मनुष्य ज्याला “मी”… म्हणतो तो’. याच्यापुढे तुम्ही सांगता, ‘आपला प्रत्येकाचा आत्मा हा विश्वाचाच एक भाग आहे. विश्वात जसे ग्रह, तारे, पर्वत, नद्या आहेत, तसेच सर्वांचे आत्मेही आहेत ‘… माफ करा देशपांडेसाहेब, हे ठार चुकीचं आहे. ‘आत्मा’ ही वस्तू इंद्रियगोचर नाही. त्यामुळे विश्वात ‘जसे ‘ ग्रह तारे, पर्वत, नद्या आहेत तसेच ‘ आत्मे असूच शकत नाहीत. तुम्हीच पुढं म्हणता की, ‘आपल्या अनुभवाला येणारे आत्मे म्हणजे शरीरी आत्मे. अशरीरी आत्म्याचा आपल्याला कसलाही अनुभव नाही.’ इथंही पुन्हा एक वेगळाच घोटाळा आहे. आपल्याला इतरांची फक्त ‘शरीरंच दिसतात. ‘आत्मे’ दिसतच नाहीत. आणि ‘मी आहे’ हा जो अनुभव मला येतो तो अशरीरीच नाही काय ? देशपांडे यांना ‘मी आहे’ हा जो आत्मानुभव आहे त्याची कोटी पर्वत, नद्या इत्यादी वस्तूंच्या अनुभवाच्या कोटीसारखीच आहे काय ? इंद्रियानुभव-पर्वत, नद्या इत्यादी – आणि इंद्रियातीत (किंवा इंद्रियनिरपेक्ष) अनुभव – ‘मी आहे – यांची जात एक नव्हे ! पण हा घोटाळा सर्वच तत्त्वज्ञानाचे प्रोफेसर करीत आले आहेत. प्रचंड बहिर्मुखता हाडीमांसी खिळल्याचा हा परिणाम आहे. ‘आत्मा’ हा या तथाकथित जड विश्वाचा भाग होऊच शकत नाही. ‘घटद्रष्टा घटादभिन्नः’ ! सवाल प्रा. श्याम कुलकर्णी अथवा स्वामी धर्मव्रत यांच्या आत्म्याचा नाही. सवाल आहे दि. य. देशपांडे यांना आत्मा आहे का? त्याचा त्यांना अनुभव आहे का ? आणि हा अनुभव इंद्रियसापेक्ष आहे की इंद्रियनिरपेक्ष आहे ? आणि म्हणूनच कदाचित प्रा. श्याम कुलकर्णी असं म्हणत असावे की ‘जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्माची सुरुवात होते.’ जिथे इंद्रियानुभव थबकतात आणि अतींद्रियाची चाहूल लागते, तिथं बहिर्मुखता संपते आणि आपण अंतर्मुख होतो. ‘मी’, ‘मी’, ‘मी’ ! कोण हा ‘मी’ ? काय स्वरूप आहे याचं ! कस्त्वं कोऽहं ? कुत आयातः?’ ही जिज्ञासा उत्पन्न होणं हे मनुष्यजन्माचं सर्वश्रेष्ठ भाग्य होय. ‘क्षण आला भाग्याचा तो हा. इथं विशफुल थिंकिंगचा काय संबंध ? अध्यात्माची मूलप्रेरणा तत्त्वजिज्ञासा हीच आहे. शंकराचार्य, रमण महर्षी, कृष्णमूर्ती, रजनीश – सर्वांचा रोख ‘देंट विच इज’ हाच आहे. अथातो ब्रह्मजिज्ञासा’ असा जिज्ञासाच शब्द वापरला आहे. नुसत्या भावतृप्तीला कोण भीक घालतो? तुम्ही म्हणता, ‘भारतातील तत्त्वज्ञान, काही तुरळक अपवाद सोडले तर, प्रामख्याने इच्छापर्तीच्या स्वरूपाचे आहे. पण हे विधान बरोबर नाही. वस्तस्थिती अशी आहे की ‘भारतातील तत्त्वज्ञान. काही तरळक अपवाद सोडले तर, प्रामख्याने जिज्ञासातप्तीच्या स्वरूपाचे आहे. गौडपदाचार्यांच्या कारिका, अष्टावक्रगाता, ज्ञानेश्वरीची चांगदेव पासष्टी, मुकुंदराजांचं परमामृत किंवा रजनीशांचा साक्षीभाव यांच्या मुळाशी तत्त्वजिज्ञासेचीच मूल प्रेरणा आहे.

    तुमच्या तर्कशास्त्रावरील पुस्तकात तुम्ही एके ठिकाणी असं म्हटलं आहे की, ‘तत्त्वज्ञानाचे वर्णन logical grammar of language असेच करण्यात येते. शिवाय भाषेचा उपयोग वर्णनात्मक व मूल्यनात्मक (descriptive आणि evaluative) असा दोन प्रकारांनी मुख्यतः होतो, असंही तुम्ही म्हणता. सारांश, हा सर्व तार्किक कौशल्याचा किंवा शब्दाचा खेळ म्हणजेच जर तत्त्वज्ञान असेल तर ‘अनुभव घेणं किंवा त्याचं आदानप्रदान करणं या बाबतीत असल्या तत्त्वज्ञानाला वंध्यामैथुनाखेरीज दुसरं काहीच म्हणता येणार नाही. ‘चिरगुटे घालोनी वाढविले पोट आणि गर्भार बोभाट जनामध्ये’, एवढाच तत्त्वज्ञानाचा महिमा समजायचा असं दिसतं. देकार्तवरील आपल्या पुस्तकात पृ. ४ वर तुम्ही मार्मिकपणे व प्रांजलपणे असं कबूल करता की ‘मूल विधाने स्वयंसिद्ध असतात आणि म्हणून सत्य असतात असे आजचे गणितज्ञ मानत नाहीत… मूल विधानांच्या सत्यतेसंबंधी ते आग्रह धरत नसल्यामुळे प्रमेयांच्या सत्यतेचाही ते आग्रह धरत नाहीत.’ म्हणजे सगळी निगामी व्यवस्थाच तत्त्वजिज्ञासा पुरी करण्यास असमर्थ आहे हाच त्याचा अर्थ नव्हे काय? आणि सत्याविषयी आग्रह न धरणाऱ्या या निगामी व्यवस्थेला व्यवस्था असं तरी कशासाठी म्हणायचं ? आणि असल्या या व्यवस्थेला ‘भारतीय तत्त्वज्ञान हे इच्छापूर्तीच्या स्वरूपाचे आहे असा शेरा शहाजोगपणे मारण्याचा तरी काय अधिकार आहे?

    तुम्ही लिहिताः ‘देकार्त म्हणतो की (मला येणारा अनुभव खराच आहे याची शाश्वती काय ?) याला निर्णायक पुरावा काहीही देता येत नाही. अर्थात ऐंद्रियज्ञानाच्या क्षेत्रात आपल्याला हवे असलेले संशयातीत ज्ञान सापडण्याची आशा नाही (पृ.५)… प्रा. श्याम कुलकर्णी यांच्या म्हणण्याचा अर्थ तरी दुसरा काय आहे ? ‘जिथं विज्ञान संपते तिथं अध्यात्माची सुरुवात होते. म्हणजे इंद्रियानुभव हे reliable नाहीत हे एकदा लक्षात आल्यावर विज्ञानसुद्धा तत्त्वप्राप्तीच्या किंवा सत्यप्राप्तीच्या कामी व्यर्थ ठरतं. म्हणजे inferential acrobatics करण्यात धन्यता मानणाऱ्या तत्त्वज्ञानाचा जो आधार – मूलविधानं- तोच कोलवून लावल्यावर सत्याचा शोध – देकार्त म्हणतो त्याप्रमाणे तेअन्यत्र शोधले पाहिजे (पृ. ५). अन्यत्र म्हणजे.पर्वत, नद्या वगैरे अन्यत्र नसून ‘मी आहे हेच ते द्वार होय. रमण महर्षीही हेच म्हणत नाहीत काय ? ‘The concept of I am -ness is by usage known as अहंवृत्ति, but it is not really a वृत्ति, like the other वृत्तीs of the mind. Without the stafa there can be no other afai, But the अहंवृत्ति can subsist by itself without depending on any other वृत्ति or mind. The 3T6qfo is therefore fundamentally different from other वृत्ति S.’ (Maharshi s Gospel, 1957, P.8) दुसऱ्या शब्दांत असं म्हणता येईल की ‘मी आहे ही एक अविच्छिन्न अनुभवाची अखंड धारा आहे. तर इतर सर्व विचार हे क्षणिक आहेत. त्यांना उदयास्त असतात. ‘मी आहे हे आत्मभान अबाधित असंच राहतं. निस्संशयपणे हा अनुभवाचा विषय आहे, existential आहे, केवळ inferential नाही. तुम्ही म्हणता, ‘विज्ञानाची ज्ञान प्राप्त करण्याची पद्धत…अनुभवानुसारी, empirical असून तिच्या इंद्रियानुभव हा ज्ञानाचा अंतिम निकष मानला जातो’ पण इंद्रियानुभव हे वैध किंवा reliable नाहीत हा अनुभव तुम्हाला ज्या क्षणी येतो तेव्हा तुम्ही गुलाबी उंदीर बघणारे दारुडे ठरू शकत नाही ! विज्ञान कदाचित गुलाबी उंदीर म्हणता येईलही, पण तत्त्वज्ञानाचे शाब्दिक खेळ – परोक्षज्ञान म्हणा – मात्र चक्क, अनुमानाच्या पिपात मेलेले ओले उंदीरच म्हणावे लागतील ! आत्मानुभवाची प्रेरणा ही सत्याच्या ओढीतूनच जन्माला येते. मनुष्याला दिलासा किंवा आश्वासन मिळावं ही प्रेरणा तर शाब्दिक तत्त्वज्ञान निर्माण करताना दिसते. मृत्यूचं भय निवारण्याचा मुद्दाच इथं गैरलागू आहे. मृत्यू, ईश्वर किंवा जग हा अध्यात्माचा विषयच मुळी नव्हे. ‘मी कोण?’ हा अध्यात्माचा विषय आहे. या ‘मीचं स्वरूप काय हाच एकमात्र authentic प्रश्न आहे.

    ‘इंद्रियानुभवाचा आधार त्यागल्यामुळे अध्यात्माला स्वैर तर्ककरण्यावाचून गत्यंतर नसते असं तुम्ही म्हणता त्याचंही आश्चर्य वाटतं. कारण असा तर्क करण्याचा धंदा तर तत्त्वज्ञान करीत असतं ! काही मूलविधानं घेऊन- मग ती खोटी का असेनात! – त्यावरून निगामी पद्धतीनं अन्य प्रमेयं निष्पन्न होतात, हा धंदा तर तत्त्वज्ञानच करीत आहे ! अध्यात्माच्या दृष्टीनं हा धंदा निकामीच म्हटला पाहिजे. इंद्रियानुभवांचा आधार टाकल्यावर स्वैर तर्कन करत बसता ‘मी’ च्या उगमाशी जाण्याची साधना करणं हेच एक मात्र मनुष्याचं कर्तव्य ठरत नाही काय? पण अंतर्मुखच तुम्ही होऊ शकत नाही ना ! ‘मी कोण? हे ज्याला कळत नाही त्याचं सगळं तत्त्वज्ञान फुकट आहे. अनुभवाची कास न धरता अनुमानाची निकामी कास धरणाऱ्यांचं शब्दपांडित्य हे – एका साधुवचनाप्रमाणे – न्हाव्यानं भादरून टाकलेल्या केसाइतक्याही किंमतीचं नसतं.

    प्रिय देशपांडेसाहेब, परोक्ष शब्दज्ञान आणि अपरोक्षानुभूति यांचे मार्गच भिन्न आहेत. बहिर्मुखता टाकून अंतर्मुख होणं हाच सत्यज्ञानाचा मार्ग आहे. ‘यस्य भासा सर्वमिदं भाति…’ पण ज्ञानलालसा ही तरी खरी की तीही बेइमानीच?

    २६/८१३ वर्तक नगर, ठाणे – ४००६०६ स्वामी धर्मव्रत

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.