आता नवविवेकवादाची गरज आहे

‘आजचा सुधारक’च्या फेब्रुवारी १९९२ च्या अंकात प्रा. दि. य. देशपांडे यांच्या गीतेवरील लेखांवर आक्षेप घेणारा माझा ‘हे विवेकवादी विवेचन नव्हे!’ हा लेख व त्यावरील प्रा. देशपांडे यांचा मर्यादित खुलासा प्रसिद्ध झाला आहे.
ह्या मर्यादित खुलाशातही मी उपस्थित केलेल्या मुद्यांना सोयीस्कर कलाटणी देण्यात आली आहे. उदाहरणार्थ, मोक्षशास्त्र हे बुद्धीच्या आवाक्यापलीकडे आहे असे मी म्हटलेले नाही. उलट, विज्ञान मोक्षशास्त्रालाही बुद्धीच्या आवाक्यात आणीत आहे याची उदाहरणे मी दिली आहेत. हा प्रयत्न पुरेसा निर्णायक होईपर्यंत मोक्षशास्त्राबद्दल पूर्णविश्वास किंवा पूर्ण अविश्वास व्यक्त न करणे हेच विवेकवादाशी सुसंगत होईल असे मी म्हटले आहे.
अशीच सोयीस्कर कलाटणी गीतेतील नीतिशास्त्राच्या माझ्या मुद्द्यालाही देण्यात आली आहे. लोकसंग्रह, धारणा, साधूचे परित्राण, धर्मरक्षण इ. शब्दांद्वारे गीतेतील नीतिशास्त्र सूचित होते असे मी म्हटले आहे. ह्या संदर्भात मी चातुर्वण्र्याचा उल्लेख केलेला नाही. परंतु चार्तुवण्र्याचे नैतिक समर्थन होत नाही असा युक्तिवाद करून प्रा. देशपांडे यांनी वरील शब्दांकडे दुर्लक्ष केले आहे. वस्तुतः गीतेत जागोजागी आलेला ‘धर्म’ शब्द ह्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा आहे. धर्म हा मोक्षाहून वेगळा असा पुरुषार्थ आहे. त्यामुळे धर्मसाधना ही मोक्षसाधनेहन भिन्न आहे. ‘धर्म हा रिलिजन’ ह्याच्याशी समानार्थी शब्द नव्हे. त्यात अभ्युदयाचे सामाजिक लक्ष्य अभिप्रेत आहे. गीतेतील नीतिशास्त्राचा तो महत्त्वाचा निकष आहे. तेव्हा ‘गीतेत नीतीचा विचार प्रायः नाहीच’ असे म्हणता येणार नाही.
समाजसुधारणेच्या बाबतीत जुन्यातील दोषांवर घणाघाती आघात करून जुन्या श्रद्धास्थानांना नष्ट करण्याच्या मार्गापेक्षा जुन्यातील चांगल्याला अधिक विकसित करून दोषांना तेवढे निष्प्रभ करण्याचा मार्ग अधिक श्रेवस्कर व यशोदायी आहे असे मी माझ्या लेखात म्हटले आहे. ह्यावर टीका करून प्रा. देशपांडे ‘संतांनी गेल्या ८०० वर्षात काय प्रगती केली?’ अशी पृच्छा करतात व महात्मा फुले, आगरकर, डॉ. आंबेडकर यांच्या कठोर प्रहारांमुळेच सुधारणा झाल्या आहेत असे प्रतिपादन करतात. ह्यावर मला असे म्हणावयाचे आहे की मोगली आक्रमकतेमुळे स्वसंरक्षणासाठी जुन्या कर्मठ रूढींना चिकटून राहण्याची गरज निर्माण झाली नसती तर संतांनी आध्यात्मिक क्षेत्रात सुरू केलेला समतेचा सुधारकी विचार इतर क्षेत्रांतही हळूहळू पण दृढपणे झिरपत गेला असता. तसेच महात्मा फुले, आगरकर, डॉ. आंबेडकर इ. सुधारकांनी ज्या वर्गाचा तेजोभंग न करता व त्यांचा आत्मविश्वास जोपासून त्यांच्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला त्या वर्गापुरतेच ते मुख्यतः यशस्वी झाले. इतर वर्गामध्ये जागृती करण्याचे पूरक कार्य तशाच विधायक पद्धतीने विवेकानंद, वा. म. जोशी, टिळक, सावरकर व महात्मा गांधी यांनी केले. आज जी थोडीबहुत सुधारणा दिसते ती ह्या दोन सुधारक वर्गाच्या प्रयत्नांचा संयुक्त परिणाम आहे. उलट, उपरोक्त सुधारणाकार्यात जेथे जेथे मर्यादेच्या बाहेर ‘कठोर टीका’ झाली तेथे कटुता वाढत गेली व त्या कटुतेचे परिणाम आजही आपणास दिसतात.
परंतु वरील मुद्दे माझ्या लेखांतील आनुषंगिक मुद्दे होते. माझा मुख्य आक्षेप प्रा. देशपांडे यांच्या तथाकथित ‘विवेकवादी विवेचना’ वर होता. ह्या संदर्भात प्रा. देशपांडे यांनी मला आजचा सुधारक मधून त्यापूर्वी आलेले काही लेख काळजीपूर्वक वाचण्याची व त्यात दोष दिसल्यास आक्षेप घेण्याची सूचना केली आहे. त्याप्रमाणे मी ते लेख वाचून काढले आहेत. ते वाचल्यावरही मला मी उपस्थित केलेल्या मुद्द्यांत बदल करावा असे वाटत नाही. त्याची कारणे व त्या लेखांतून सुचलेले विचार पुढे देत आहे. ह्या लेखांतील प्रा. देशपांडे यांच्या आजचा सुधारक मधील प्रतिपादनांचा संदर्भ त्या त्या ठिकाणी कंसात दिला आहे.
१८ व्या व १९ व्या शतकांत आधुनिक विज्ञानाने अभूतपूर्व अशी प्रगती केली. तीमुळे विचारी जग स्तिमित झाले व विज्ञानाने स्वीकारलेली विवेचन-पद्धती हीच ज्ञानसंपादनाची व विवेचनाची एकमेव प्रमाण पद्धती आहे अशी धारणा दृढमूल झाली. यातूनच आधुनिक विवेकवादाचा जन्म झाला. ह्यात ‘इंद्रियानुभव हा ज्ञानाचा अंतिम निकष’ मानला गेला ; ( नोव्हें. १९९० पृ. ३ ) व ‘विश्वाचे ज्ञान मिळविण्याचे वैज्ञानिक पद्धतीहून अन्य साधन मानवाजवळ नाही असा विज्ञानाचा दावा आहे’ अशी समजूत रूढ़ झाली. हे विश्व कसे निर्माण झाले? दिक्कालातीत काही आहे काय? इत्यादी अंतिम प्रश्नांची उत्तरे विज्ञान देऊ शकत नाही आणि म्हणून ती देण्याच्या भानगडीत ते पडत नाही, ( पूर्वोक्त, पृ. ४) विज्ञान हेच विश्वासार्ह आहे, ( फेब्रु. १९९१, पृ.८) ज्ञानाच्या क्षेत्रात विज्ञानाला जे अज्ञेय असेल ते अन्य कोणालाही ज्ञेय असू शकत नाही, (जुलै, १९९१,पृ. ३) उद्गामी व निगामी पद्धतीने वैज्ञानिक ज्ञान मिळते; व ते इंद्रियानुभवावर आधारलेले असते, (फेब्रु.१९९१,पृ.६-७) विज्ञान म्हणजे सर्वमान्य अशा निश्चित ज्ञानाचा सतत वाढत जाणारा एक विशाल संचय आहे.
(जुलै १९९०,पृ १२) आणि अशा वैज्ञानिक प्रक्रियेनुसार म्हणजे पेंद्रिय अनुभव व सुसंगत तर्क या प्रमाणावर जे सत्य ठरेल तेच आम्ही स्वीकारू अशी भूमिका म्हणजे विवेकवाद होय, असे विचार रूढ झाले.
ह्या दृष्टीने अध्यात्म हे विज्ञान नाही, (नोव्हें. १९९०,पृ.४) अध्यात्म म्हणजे मानवाला अनुकूल असे निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न; हा पूर्णपणे निराधार असून तो इच्छापूर्तीच्या ( Wish-fullfilment) स्वरूपाचा असतो. (पूर्वोक्त,पृ.१०) अध्यात्मातील ज्ञान दोन साधनांनी मिळते. (१) शब्दप्रमाण किंवा आप्तवचन आणि (२) साक्षात्कार व ही दोन्ही साधने अनिर्णायक आणि अविश्वसनीय आहेत, (नोव्हें.१९९० पृ.७) विज्ञानात आप्तवचन नावाची गोष्ट नाही, (जुलै १९९१,पृ.६) साक्षात्कार म्हणजे ‘ज्ञेय वस्तूचे साक्षात ज्ञान, ते निर्मध्यस्थ ज्ञान’ असते, (पूर्वोक्त,पृ४-५) साक्षात्कारी मनुष्याची मनःस्थिती साधारण ( normal) नसते, ती विसाधारण (abnormal) असते, साक्षात्काराची जी साधना आहे तिचे स्वरूप बरेचसे स्वसंमोहनाचे (self hypnosis) आहे, (जुलै, १९९०,पृ. १६) त्यामुळे साक्षात्कारी प्रामाणिक असले तरी त्यांचा साक्षात्कार ‘खरा’ असत नाही. (पूर्वोक्त,पृ. १५) शिवाय साक्षात्कारातून प्रतीत होणारे वास्तव साक्षात्कारागणिक भिन्न असते, त्यात एकमत नसते, जशी श्रद्धा असेल तसा साक्षात्कार होतो व त्यामुळे ते ज्ञानप्राप्तीचे साधन ठरत नाही. (पूर्वोक्त पृष्ठ १६) अशी विवेकवादाने भूमिका घेतली.
१८ व्या व १९ व्या शतकातील विज्ञानाच्या प्रभावाने निर्माण झालेला विवेकवाद वरील प्रकारचा आहे व प्रा. देशपांडे आजही त्याच प्रभावाखाली आहेत असे दिसते,
परंतु २० व्या शतकात विज्ञानाच्या स्वरूपात व महत्त्वात बरेच बदल झाले आहेत. त्यांची प्रा. देशपांडे यांनी दखल घेतलेली दिसत नाही.
विज्ञानाची अध्ययनपद्धती विश्लेषणात्मक असते. तीत एखाद्या वस्तूला किंवा तिच्या भागाला इतर सर्व वस्तूंपासून किंवा वस्तूच्या भागांपासून अलग करून त्याचे परीक्षणकेले जाते. अशा अध्ययनातून होणारे ज्ञानं खरे असले तरी पूर्णाशाने यथार्थ राहत नाही. त्यामुळे अशा ज्ञानाच्या उपयोजनेतून घातक पार्श्वपरिणाम (side effects) निर्माण होतात. यांचा संकलित परिणाम म्हणून सर्वसंहारक अशा पर्यावरण-संतुलन-नाशाचे-महाभयानक संकट मानवजातीपुढे उभे ठाकले आहे. अध्यात्मजनित संकटांपेक्षाही हे संकट अतिभयानक आहे. विज्ञानात मूल्यांना महत्त्व नाही. आणि वैज्ञानिक ज्ञान हेच खरे ज्ञान मानले गेल्यामुळे मूल्यांचा व्हास होत आहे. त्यामुळे मानवजातीच्या भौतिक विनाशाबरोबरच नैतिक विनाशाचेही संकट निर्माण झाले आहे.
विज्ञानामुळे वस्तुजाताचे यथार्थ ज्ञान होते ह्या श्रद्धेलाही तडा जाऊ लागला आहे. सगळे कावळे काळे आहेत असे आपण म्हणतो कारण पृथ्वीभोवतालच्या प्रकाशकिरणांच्या ज्या आवरणात आपण त्यांना पाहतो त्यात ते आपणाला काळे दिसतात हे होय. हे आवरण वेगळ्या प्रकाशकिरणांचे असते तर कावळे आपणांस वेगळ्या रंगाचे दिसले असते. त्यामुळे कावळ्यांचा खरा रंग कोणता हा प्रश्न अनिर्णित राहतो. विज्ञानाची जशी जशी प्रगती होत जाईल तसेतसे ह्या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट होत जाईल असे कदाचित म्हणता येईल. परंतु विज्ञानाच्या अंगभूत मर्यादा लक्षात घेता सर्वच बाबतींत असे म्हणता येणार नाही.
वरील सर्व कारणांमुळे १९व्या शतकात विज्ञानावर प्रमाण ज्ञानाचे एकमेव साधन म्हणून जेवढा विश्वास होता तेवढा २० व्या शतकात राहिला नाही. पूर्णाच्या ज्ञानाशिवाय अपूर्णाचे म्हणजे पूर्णाच्या भागाचे- ज्ञान परिपूर्ण होत नाही आणि जीवनाचे ज्ञान मूल्यांच्या ज्ञानाशिवाय अर्थपूर्ण होत नाही म्हणून
विज्ञानाच्या विश्लेषणपद्धतीला साकल्याने विचार करणार्‍या अध्यात्माच्या संश्लेषणपद्धतीची व मूल्यांसहित अंतिम अतएव परिपूर्ण ज्ञानाचा वेध घेऊ पाहणार्‍या अध्यात्माची जोड देण्याचा विचार पुढे येऊ लागला आहे. विश्वाचे ज्ञान मिळविण्याचे साधन हा जसा विज्ञानाचा दावा आहे तसाच तो अध्यात्माचाही आहे. हा दावा निव्वळ भ्रम आहे की त्यात काही तथ्य आहे हे योग्य पद्धतीने पडताळा पाहिल्यानेच समजेल. त्यात तथ्य असेल तर विज्ञानाच्या विकासला त्याची मदतच होईल. अध्यात्माच्या क्षेत्रातील सगळ्याच व्यक्तींना विशेषतः उच्च बौद्धिक पातळी असणार्‍या तज्ज्ञांना अगदीच अविश्वसनीय मानण्याचे कारण नाही. विज्ञानातील उणीवा व त्या दूर करण्याचे संभाव्य मार्ग इतरांपेक्षा वैज्ञानिकांनाच अधिक स्पष्टपणे जाणवू शकतात. तेव्हा वैज्ञानिक-निदान श्रेष्ठ दर्जाचे वैज्ञानिक- जेव्हा अध्यात्माचीही भाषा बोलतात तेव्हा ते सामान्यजनाप्रमाणेच भ्रमिष्टपणे किंवा अगतिकतेने बोलतात असे सरसकट मानण्याचे कारण नाही. परंतु आईन्स्टीनसारख्या अव्वल दर्जाच्या व जगन्मान्य वैज्ञानिकाच्या आध्यात्मिक वक्तव्यांची अवैज्ञानिकांच्या वक्तव्यांप्रमाणेच प्रा. देशपांडे धोपटमार्गी वासलात लावतात. (जुलै १९९१ पृ.७) त्यांच्या वक्तव्यात काही विवेकवाद असू शकेल अशी शंकाही त्यांच्या मनाला शिवतनाही. राजापेक्षाही अधिक राजनिष्ठ अशी त्यांची भूमिका दिसते. त्यामुळेच १९व्या शतकातील कथाकथित विवेकवादाला ते घट्ट चिकटून आहेत.
‘हे विश्व कसे निर्माण झाले?’ इ. अंतिम प्रश्नांची उत्तरे विज्ञान देऊ शकत नाही आणि म्हणून ती देण्याच्या भानगडीत ते पडत नाहीत ह्या प्रा. देशपांडे यांच्या विधानावरूनही ( नोव्हें. १९९०, पृ.४) हेच दिसून येते. वस्तुतः २० व्या शतकात विज्ञान ह्या भानगडीत जोराने पडले आहे व त्याचे कही टप्पेही त्याने गाठले आहेत. विशेष म्हणजे ह्या प्रयत्नांत ते अध्यात्माच्या – विशेषतः भारतीय अध्यात्माच्या – बरेच जवळ येत आहे. खगोलभौतिकी ( Astrophysics) व विश्वविज्ञान (Cosmology) ह्या ह्या संबंधीच्या विज्ञानातील नवीन शाखा आहेत. ह्या विषयावर ‘A Brief History of Time’ नामक सुबोध ग्रंथ स्टीफन हॉकिंग नामक प्रख्यात वैज्ञानिकाने लिहिला आहे.आइन्स्टीननंतरचा अतिबुद्धिमान सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ (The most brilliant theoretical physicist since Einstein) असा लेखकाचा ग्रंथात परिचय देण्यात आला आहे. भारतीय अध्यात्मशास्त्राचा लेखकाने अभ्यास केला आहे असा ग्रंथात कोठेही पुरावा मिळत नाही. त्यांनी केलेले विवेचन पूर्णतः वैज्ञानिक आहे. तरीदेखील भारतीय अध्यात्मशास्त्राशी विलक्षण साम्य असलेले अनेक सिद्धान्त ह्या ग्रंथात दिसतात. त्यांतील महत्त्वाचे सिद्धान्त पुढीलप्रमाणे आहेत. ह्या ग्रंथाच्या १९८८ च्या आवृत्तीतील संदर्भस्थळांचे पृष्ठक्रमांक कंसात दिले आहेत.
विज्ञानाच्या ‘conseravation of energy’ ह्या नियमानुसार कोणतीही वस्तु म्हणजे ऊर्जा किंवा तत्सम वस्तुमान याची नवनिर्मिती किंवा विनाश होत नाही. (पृ.१९४) विश्वाच्या आरंभी एकच तत्त्व (Singularity) होते. ते स्थलातीत व कालातीत असे शून्य अवस्थेत (Zero size) होते. त्या एकतत्त्वाचा मोठा उद्रेक (Bigbang) होऊनच अनेकांची उत्पत्ती झाली. सर्व विश्व सूक्ष्म कणांचे (particles) किंवा (waves) बनले आहे. (पृ. ९-१० व प्रकरण ८) अनिश्चितता तत्त्वानुसार ( UncertaintyPrinciple) ह्या प्राथमिक अवस्थेतील कण कोणते स्थान व कोणता वेग घेतील हे निश्चित नसते ( पृ. ५८५९).यदृच्छेने होणार्‍या  त्यांच्या भिन्न भिन्न संयोगाने सृष्टीतील समस्त वस्तुजात निर्माण होत जाते. त्यात ( ब्रह्म-माया जोडीप्रमाणे ) प्रत्येक कणाला किंवा वस्तूला प्रतिकण किंवा प्रतिवस्तू (Particle antiparticle pair) निर्माण होते. ( पृ.७३, ८१ व ११३ ) अशा तर्हेeने विश्वाचा विस्तार ( Expansion) होत होत अशी अवस्था येते की त्याचा विस्तार थांबून संकोच होत जातो व तेपुन्हा एकतत्त्वाच्या अवस्थेत ( Big crunch) येते. (प्रकरण ८)
विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती व लयासंबंधीचे हे सिद्धांत हॉकिंगने गणिताच्या आधारे मांडले. हे सिद्धांत प्रयोगाद्वारे सिद्ध होणारे नाहीत. परंतु हे सिद्धांत खरे असतील तर वर्तमान काळाकरिता गणिताने अनुमानित केलेले त्यांचे परिणाम आजही इंद्रियजन्य ज्ञानसाधनांद्वारे प्रत्यक्ष पाहता येतील व ते तसे आढळले तर त्यांचा आधार असलेलेपूर्वसिद्धान्त ह्या उलट्या प्रक्रियेने खरे सिद्ध करता येतील. ह्या पद्धतीने वरील सिद्धांन्तांचे वैज्ञानिक यथार्थत्व बर्याकच प्रमाणात सिद्ध झाले आहे असे हॉकिंगचे म्हणणे आहे. हॉकिंगने पुढे असेही म्हटले आहे की, “ मात्र, विश्व त्याच्या प्रारंभसमयी अमुकच स्थितीत असले पाहिजे याबद्दल (विज्ञानाचे ) नियम काहीही सांगत नाहीत. त्यामुळे (विश्वाचे ) कालयंत्र गुंडाळणे (किंवा बंद करणे ) आणि हवे तसे सुरू करणे परमेश्वराधीन राहू शकेल (असे मानता येईल ) जो पर्यंत (विज्ञानानुसार) विश्वाला प्रारंभ (आदी) होता, तोपर्यंत त्याला निर्माता आहे हे मानणे शक्य होते. परंतु जर विश्व खरोखरच पूर्णपणे आत्मनिर्भर असेल, त्याला मर्यादा किंवा कडा नसेल, तर त्याला आदि किंवा अंत राहणार नाही ; ते निव्वळ सत् असेल. अशा स्थितीत निर्मात्याला काय स्थान राहणार?” (However, the laws do not tell us what the universe should have looked like when it started – It would still be up to God to wind up the clockwork and choose how to start it off. So long as the universe had a beginning, we could suppose it had a creator. But if the universe is really completely self-contained, having no boundary or edge, it would have neither beginning nor end: it would simply be, what place, then, for a creator? – पृ. १४९)
वरील अवतरण हे दर्शविते की ज्या काळी (म्ह. १९ व्या शतकात ) विश्वाला प्रारंभ आहे असा वैज्ञानिक सिद्धान्त होता त्या काळी विश्वाचा निर्माता म्हणजे देव असण्याची शक्यता विज्ञानाला नाकारता येणे शक्य नव्हते. परंतु आता (म्ह. २० व्या शतकात) विश्व हे पूर्णमिदं व अनादि आणि अनंत असे विज्ञानाला दिसू लागले आहे व त्यामुळे विश्वाच्या बाहेर असलेल्या कुणी देवाने ते निर्माण केले हे मानणे, ठामपणे नसले तरी बर्यााच प्रमाणात, शक्य नाही.
हॉकिंगने उपरोक्त विवेचन सेमेटिक – विशेषतः ख्रिश्चन – धर्माच्या संदर्भात केलेले आहे हे उघड आहे. त्या धर्मात विश्वाच्या बाहेर असलेल्या देवाने विश्वाची निर्मिती केली अशी संकल्पना आहे. भारतीय अध्यात्मशास्त्रात सनातन ब्रह्माची कल्पना आहे. हे सत् आहे, चित् आहे (आणि आनंदही आहे). ते पूर्ण आहे आणि शून्यही आहे. ते ‘अणोरणीयान’ व ‘महतो महीयान्’ आहे. आणि त्यातूनच ‘एकोहं बहुस्याम्’ ह्या तत्त्वानुसार संपूर्ण विश्व निर्माण झाले, व त्यानेच ते व्यापले आहे. आणि शून्यातून विस्तारलेले हे जग पुन्हा शून्याकडे जाऊ लागते. हॉकिंगने सांगितलेले आधुनिक विज्ञानाचे स्वरूप अशा रीतीने भारतीय अध्यात्मशास्त्राच्या जवळ आले आहे.
जेम्स वॅलेस नावाचा आधुनिक विज्ञानाचा व भारतीय अध्यात्मशास्त्राचा पाश्चात्त्य अभ्यासक तर ह्यापुढे गेला आहे. त्याने ‘Brahman —> E = Mc२(c-sq.)’ ह्या शीर्षकाचा ग्रंथ लिहून आधुनिक विज्ञान व भारतीय अध्यात्मशास्त्र यांतील साम्य स्पष्ट केले आहे.
हे साम्य वरवरचे असणे जितके शक्य आहे तितकेच ते तसे नसणेही शक्य आहे. त्याची काही सबळ कारणेही आहेत.
आधुनिक विज्ञान अंतिम प्रश्नांचा विचार गणिताच्या साह्याने करते. भारतीय अध्यात्मशास्त्राचा मूलस्रोत असलेल्या वेदांमध्ये अत्यंत प्रगत अशा गणितशास्त्राचे विवेचन आहे असे त्या क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. क्लिष्ट गणित सुलभ करणार्‍या शून्य संख्येचा व दशमान पद्धतीचा उगम भारतातच झाला आहे. प्रचंड अंतरे मोजण्यासाठी खर्व, निखर्व, महापद्म इत्यादी संख्याही येथे निर्धारित करण्यात आल्या. तसेच आधुनिक प्रकाश-दिवस, प्रकाश-वर्ष ह्यासारख्या ब्रहम्याचा दिवस, ब्रहम्याचे वर्ष अशा संज्ञाही येथे प्रचलित झाल्या. गणिताचा प्रचंड व्याप दर्शविणार्‍या ह्या संख्या व संज्ञा गरजेशिवायच निर्माण झाल्या असतील असे म्हणता येणार नाही. तेव्हा वैदिक गणिताचा जसाजसा अभ्यास वाढेल तसा तसा भारतीय अध्यात्मशास्त्राला गणिताचा वैज्ञानिक आधारआहे काय हे स्पष्ट होत जाईल.
विश्वाचे सत्यज्ञान मिळविण्याचा साक्षात्कारहाही मार्ग भारतीय अध्यात्मशास्त्रात सांगितला आहे. कावळ्याचा रंग काळा आहे हे व्यावहारिक सत्य असले तरी अंतिम दृष्टीने ते अज्ञानच आहे हे आधुनिक विज्ञानालाही मान्य व्हावे. इंद्रियजन्य सर्व ज्ञानाबद्दल असेच म्हणता येईल. अशा अज्ञानाच्या आवरणामुळे सत्यज्ञान झाकले गेले आहे असे भारतीय अध्यात्मशास्त्राचे प्रतिपादन आहे. योगसाधनेच्या द्वारे चित्तवृत्तिनिरोध करून साधकाला निलेंपता (Unconditioning) प्राप्त होऊ शकते व अशा निर्लिप्त अवस्थेत साधकाला होणारे ज्ञान हे पूर्णतया वस्तुनिष्ठ(Objective) आणि सत्य ज्ञान असते असा योगशास्त्राचा दावा आहे. हाच साक्षात्कार होय. विज्ञानाने मिळणार्‍या ज्ञानात नाही म्हटले तरी आत्मनिष्ठतेचा व अभ्यासविषयाच्या मायास्वरूपाचा ( म्ह. अयथार्थ स्वरूपाचा ) काहीतरी अंश राहतोच. एखाद्या वस्तूच्या एका प्रकाराने मिळालेल्या ज्ञानाचा त्याच व अन्य प्रकारांनी वारंवार पडताळा घेऊन इंद्रियजन्य ज्ञान अधिकाअधिक वस्तुनिष्ठ करण्याचा विज्ञान प्रयत्न करते व त्यात त्याला बरेच यशदेखील येते. परंतु अखेरीस विज्ञानाला मर्यादाआहेतच. योगशास्त्रज्ञ म्हणतात त्याप्रमाणे साधक स्वतःला पूर्णपणे निर्लेप जर करू शकला तर सत्यज्ञान मिळविण्याचा तो विश्वसनीय मार्ग होऊ शकेल. आणि सर्वं खल्विदं ब्रह्म असल्यामुळे साक्षात्काराने होणारे आत्मज्ञान हे ब्रह्मज्ञान म्हणजेच विश्वाचे अंतिम ज्ञान असू शकेल.
विज्ञान असो की अध्यात्म असो, त्यात पराकोटीचे ज्ञान संपादन केलेल्या तज्ज्ञांची संख्या बोटावर मोजण्याइतपतच असणार. आईन्स्टीनच्या सिद्धांतांचे परिपूर्ण आकलन असणार्‍यांची संख्या एकेकाळी फक्त तीनच होती असे म्हणतात. आजही ती फार जास्त असण्याचा संभव नाही. अध्यात्माच्या क्षेत्रातही गीता म्हणते त्याप्रमाणे हजारो मनुष्यांमधून एखादाच योगसिद्धीचा प्रयत्न करतो आणि असा यत्न करणच्या हजारो सिद्धांमधून एखादाच अंतिम ज्ञान प्राप्त करू शकतो. तेव्हा दोन्ही क्षेत्रांत सामान्यजनांना आप्तवचनांच्या आधारानेच आपला विवेक निर्धारित केला पाहिजे.
मात्र विज्ञानापेक्षा अध्यात्माच्या क्षेत्रात विवेक निर्धारित करणे बरेच कठीण आहे. विज्ञानात इतर वस्तूंवर प्रयोग होतात व त्यामुळे त्यात वस्तुनिष्ठता येण्याचा संभव जास्तअसतो. उलट, अध्यात्मात स्वतःवरच प्रयोग केले जातात त्यामुळे त्यात आत्मसापेक्षता येण्याचा मोठा धोका असतो. विज्ञानाचे निष्कर्ष प्रयोग, निरीक्षण इ. माध्यमांच्या द्वारे इतर व्यक्तींकडे संक्रामित करणे सुलभ असते. अध्यात्मातील अनुभव तसे संक्रामित करता येत नाहीत. समान अनुभूतींच्या द्वारे ते संक्रामित करावे लागतात. परंतु साधकाची जी अवस्था असेल तिला अनुसरुन त्याच्या अनुभूतीचा स्तर असतो. त्यामुळे निरनिराळ्या साधकांच्या निरनिराळ्या अनुभूती असू शकतात व त्यात एकवाक्यता निर्माण होणे कठिण जाते. त्यामुळे खरा कोण खोटा कोण हे ठरविणे सहजशक्य नसते. अध्यात्माच्या आत्मकेंद्रित साधनापद्धतीमुळे साधक जागरूक नसेल तर अधिकाअधिक निर्लिप्त ( Objective) होत जाण्याऐवजी स्वसंमोहनाच्या जाळ्यात अडकून तो अधिकाअधिक लिप्त (Subjective) होत जाण्याचाही त्यात संभव असतो. त्यामुळे अध्यात्माच्या नावाखाली इच्छापूर्तीचा किंवा स्वतःला अनुकूल असे निष्कर्ष काढण्याचा प्रकारही त्यात होतो. श्रद्धा ही ज्ञानमार्गातील पहिली पायरी आहे, परंतु तिचा अतिरेक होऊन शब्दप्रामाण्यावरच भर दिला जातो. तीच गोष्ट देवदेवतांची व मूर्तिपूजेची. अव्यक्ताची साधना सहज शक्य नसल्यामुळे प्रारंभी एखाद्या देवतेवर किंवा मूर्तीवर ( ती कोणतीही चालेल ) लक्ष केंद्रित करून साधनापद्धतीचा सराव करावयाचा व नंतर तिचे लक्ष्य व्यक्तकडून अव्यक्ताकडे सगुणाकडून निर्गुणाकडे वळवावयाचे ही त्यामागील भूमिका आहे. ब्रह्माला ब्रह्म न म्हणता राम, कृष्ण, अल्ला, गॉड किंवा काहीही नाव देऊन साधना केली तरी त्यामुळे फरक पडण्याचे वस्तुतः कारण नसते. काही समाजधारणेची तत्त्वेही त्यांचेशी निगडित आहेत. परंतु ह्यात साधनालाच साध्य मानण्याची गल्लत होत असते. सर्वांत महाभयंकर म्हणजे अंधश्रद्धा, लपवाछपवी, फसवाफसवी यांच्या साह्याने चतुर लोक अध्यात्माचा धंदाही करू शकतात.
अध्यात्मक्षेत्रातील ह्या दोषांचे समर्थन होऊ शकत नाही. सुदैवाने ह्या उणीवा दूर करण्याचे बरेच सामर्थ्य विज्ञानाला प्राप्त झाले आहे. त्यांच्या साह्याने हे दोष नष्ट केले पाहिजेत. सच्च्या अध्यात्मवाद्यांनीही हे दोष दूर करण्याचे उपाय शोधले पाहिजेत.
परंतु वरील दोषांमुळे सगळे अध्यात्मशास्त्रच बाद ठरत नाही. ‘अथातो ब्रह्मजिज्ञासा’ ही त्यामागची प्रेरणा आहे, त्यासाठी त्याची विशिष्ट खडतर साधना आहे व आज मान्य होण्यासारखी त्याची काही उपलब्धीही आहे. २० व्या शतकात विज्ञानाला जे गवसले ते २० पेक्षाही अधिक शतकांपूर्वी अध्यात्माने शोधले होते असे आता दिसू लागले आहे.
ही उपलब्धी तत्त्वज्ञानाची आहे, अध्यात्माची नव्हे असे म्हणण्यात अर्थ नाही. निदान भारतीय अध्यात्मशास्त्रात तसा भेद करता येणार नाही. हॉकिंगच्या उपरोक्त पुस्तकात त्याने एका मजेदार घटनेचा उल्लेख केला आहे. तो व इतर वैज्ञानिक एकदा पोपला भेटावयास गेले असता पोपने त्यांना असा सल्ला दिला की वैज्ञानिकांनी विश्वाच्या उत्पत्तीच्या प्रश्नांसंबधी विचार करू नये कारण ते ईश्वराचे क्षेत्र आहे. ह्याउलट, विज्ञान व अध्यात्मशास्त्र यांच्यात कसलाही संघर्ष असण्याचे कारण नाही असे भारतीय अध्यात्मशास्त्रज्ञम्हणतात. त्यांच्या ह्या विधानाला ‘थाप’ किंवा ‘प्रौढी’ समजण्याचे कारण नाही. सारांश, विज्ञान व भारतीय अध्यात्मशास्त्र आज जवळ येत आहेत. दोन्हीही सत्यान्वेषणाचे पथिक आहेत. त्यांची स्पर्धा परस्परांना पूरक ठरू शकेल अशी आशा बाळगण्यास हरकत नाही.
त्यामुळे १९ व्या शतकातील विज्ञानावर आधारलेला विवेकवाद आता कालबाह्य झाला आहे. २० व्या शतकातील विज्ञानावर आधारलेल्या नवविवेकवादाची आज गरज आहे. त्याचे स्वरूप काय असावे ह्याचे दिग्दर्शन ‘आजचा सुधारक’च्या फेब्रु. १९९२ च्या अंकातील माझ्या लेखात केले आहे.