आरक्षण आणि गुणवत्ता (जात-आरक्षणविरोधी ‘द्रोणाचार्य’ मानसिकता)

मोहन हा मध्यमवर्गीय सुखवस्तु कुटुंबातील मुलगा आहे. त्याचे पालक सुशिक्षित आहेत. शहरातील चांगल्या शाळेत तो शिकतो. त्याला घरी अभ्यासाकरिता स्वतंत्र खोली आहे. अभ्यासात त्याला आई-वडील मदत करतात. घरात रेडिओ, टीव्ही संच, पुस्तकं आहेत. अभ्यास व व्यवसायाभिमुख निवडीमुळे पालक-शिक्षकांचे त्याला मार्गदर्शन मिळते. त्याचे बहुतेक मित्र याच पार्श्वभूमीचे आहेत. त्याला स्वतःच्या पुढील आयुष्याविषयी, करीअरविषयी स्पष्ट कल्पना आहे. त्याचे अनेक नातेवाईक मोक्याच्या जागी नोकऱ्या-व्यवसाय करत आहेत. त्यांची योग्य शिफारस व सहाय्य त्याला मिळू शकते.

याउलट बाळू हा खेड्यातला मुलगा आहे. त्याचे दलित पालक खेड्यात १-२ एकर जमिनीच्या तुकड्यावर व शेतमजुरी करून गुजराण करतात. कुटुंबातील ५-६ जण १-२ खोल्यांच्या झोपडीत कसेबसे राहतात. गावात फक्त प्राथमिक शाळा आहे. माध्यमिक शाळेच्या शिक्षणासाठी नजीकच्या गावात ३ कि.मी. रोज चालत जावे लागते. पुढील शिक्षणासाठी तालुक्याच्या गावी काका-मामाकडे पाठवण्यासाठी त्याला वडिलांचे मन वळवावे लागते. त्याला शिक्षणकाळात कुठलेही मार्गदर्शन मिळाले नाही. त्याचे मित्र माध्यमिक स्तरानंतर शिकले नाहीत. त्याचा सांस्कृतिक वातावरणाशी संबंध आला नाही. कॉलेज शिक्षणसुद्धा कुठल्याही प्रोत्साहनाविना पूर्ण झाले. ग्रामीण पार्श्वभूमीमुळे बाळू खेडवळ वाटतो. उच्चार स्पष्ट नसतात. वागण्यात आत्मविश्वास नसतो.

कल्पना करा की मोहन व बाळूमध्ये त्यांच्या जन्माच्या वेळी आनुवंशिकतेने एकाच पातळीची बुद्धिमत्ता आहे. परंतु नंतरच्या वाढीच्या काळातील सामाजिक, सांस्कृतिक व भौगोलिक परिस्थितीमुळे फार मोठा फरक पडला आहे. त्यामुळे मोहन, बाळूला स्पर्धात्मक परीक्षेत सहजपणे हरवू शकेल. निवड केवळ प्रवेश परीक्षा व/वा मुलाखतीवर असल्यास बाळूला अजिबात वाव नाही व मोहन कुठल्या कुठे पोचेल.

‘मेरिट माय फूट’: व्ही.टी.राजशेखर
समजा एका समाजात योद्ध्यांच्या वर्गाचा सभासद असण्यात खूप प्रतिष्ठा आहे असे मानण्यात येते. आणि योद्ध्याची कर्तव्ये पार पाडण्यासाठी फार मोठ्या शारीरिक बलाची आवश्यकता असते. समजा, पूर्वी ह्या वर्गात सभासदभरती कित्येक श्रीमंत कुटुंबातून करण्यात येत असे, पण पुढे समतावादी सुधारकांनी बदल घडवून आणले व बदललेल्या नियमांनुसार योद्ध्यांची भरती करण्यासाठी एक उचित स्वरूपाची स्पर्धा घेण्यात येऊ लागली. आता तिच्या निकालावर समाजाच्या सर्व विभागांतून योद्ध्यांची भरती करण्यात येते. पण ह्याचा परिणाम असा होतो की अजूनही बहुतेक सर्व निवडलेले योद्धे ह्या श्रीमंत कुटुंबातीलच असतात; कारण इतर लोक गरिबीमुळे इतके भुकेकंगाल असतात की श्रीमंत आणि चांगले पालनपोषण असलेल्या व्यक्तींच्या तुलनेने त्यांचे शारीरिक बल निकृष्ट ठरते. ह्या परिस्थितीचा सुधारक निषेध करतात; समानसंधी अजून प्रस्थापित झालेली नाही, असे त्यांचे म्हणणे असते. श्रीमंतांचे ह्याला उत्तर असे, की वस्तुतः समान संधी प्रस्थापित झालेली आहे ; गरिबांना आता योद्धे बनण्याची संधी प्राप्त झालेली आहे; चाचणीत यशस्वी होण्यासारखी गुणवैशिष्ट्ये त्यांच्या अंगी नसतात, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. ते असे म्हणू शकतील की “गरीब आहे ह्या कारणासाठी आपण कुणाला वगळत नाही; आपण जेव्हा माणसांना वगळतो तेव्हा ती अशक्त आहेत म्हणून वगळतो आणि जे गरीब असतात ते अशक्तही असतात, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.’

जी समतेची संधी आहे असे मानण्यात येत आहे ती पोकळ आहे; किंबहुना तिला अधिक प्रभावी, परिणामकारक बनविता येणे शक्य आहे, हे आपल्याला माहीत आहे. गरीब असणे आणि शरीराने दुबळे असणे ह्यांच्या दरम्यान कार्यकारणसंबंध आहे हे आपल्याला माहीत आहे. शिवाय आपल्या कल्पित समाजाच्या आर्थिक परिस्थितीच्या मर्यादेत का होईना; पण त्यातील संपत्तीच्या वाटणीच्या व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणणेही काही प्रमाणात शक्य असते. हे सर्व ध्यानात घेता श्रीमंत जेव्हा गरिबांच्या ‘दुर्दैवा’चा हवाला घेतात तेव्हा ते अप्रामाणिकपणाचे द्योतक ठरते.