पत्रचर्चा

सुधाकर कलावडे, ए-९/१, कुमार पद्मालय, न्यू डी पी रोड, स. नं. १६०/१, औंध, पुणे ४११ ००७. फोन (०२०) २५८९७३५९
लंकाधिपति-सम्राट-रावणाशी युद्ध करण्यासाठी समुद्राचे उल्लंघन आवश्यक होते. त्यासाठी रामेश्वर व लंका यांच्यामधील महासागरावर सेतू बांधावा लागला. रामाने वानरांच्या साह्याने पाच दिवसांत महासागरावर पाषाण, वृक्ष टाकून सेतू बांधला अशी कथा आहे. हा रामसेतू रामायण प्रत्यक्ष घडल्याचा पुरावा म्हणून दिला जातो व त्यावरून प्रतिपादन केले जाते. डॉ. भावे यांनी संशोधन करून हा सेतू रामाने प्रत्यक्षात बांधला होता असा दावा केला आहे. रामसेतू (हनुमान सेतू) वरून वानरसेनेने लंकेत प्रवेश केल्यावर शत्रूने पळून जाण्यासाठी अथवा अन्य कारणासाठी त्याचा उपयोग करू नये म्हणून रामाने एक बाण मारून सेतू महासागरात बुडवून टाकला व त्याचेच अवशेष आज दिसताहेत. धनुष्यकोडी ते लंका हे अंतर साधारणतः ६८ किलोमीटर आहे. इतका लांबलचक पाषाणसेतू एका बाणात बुडविला जाईल हे बुद्धीला पटणारे नाही. रामनामाने पाण्यावर तरंगणारे पाषाण अद्याप तरी मिळाले नाहीत. जनमानसांत रामाच्या दिव्यशक्तीविषयी श्रद्धा आहे. त्यामुळे रामसेतू ऐतिहासिक व खरा आहे अशी त्यांची भावना आहे पण श्रद्धा व लोकभावना या ऐतिहासिक पुरावा कधीच होऊ शकत नाहीत.
रामसेतूचे अस्तित्व होते याला बळ मिळाले नासाच्या छायाचित्रांचे. नासाच्या उपग्रहाने पाल्क समुद्रधुनीची काही छायाचित्रे घेतली. त्या छायाचित्रात पाल्क समुद्रधुनीच्या पाण्याखाली ठरावीक जाडीचा एक खडकाचा पांढरा पट्टा दिसतो. हा रामाने बाणाने बुडविलेला भाग आहे, असे म्हटले गेले. अमेरिकेतील इंटेलिक कॉम वैष्णव न्यूज नेटवर्कने असा दावा केला की नासाच्या छायाचित्रातील अवशेष पौराणिक रामसेतूचे आहेत. नासाने याचा अधिकृतपणे इन्कार केला आहे. हा भाग मानवनिर्मित नाही असे म्हटले आहे. खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकरांनी त्या अवशेषांच्या रामसेतूशी संबंध जोडण्यास अमान्य केले आहे. विख्यात इतिहासकार डॉ. आर. एन. शर्मांनीही असा संबंध जोडण्यास विरोध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “The oldest evidence of Ramayan is around 400 B.C.’ दिल्ली विद्यापीठातील, प्राध्यापक डी.एन.झा म्हणतात की, “What had been captured by Nasa’s camera was a geological formation. This is not history [Times of India, Nov. 2002]’ सदरची भिंत वर्षांपूर्वी ही भिंत समुद्रपातळीवर होती आणि तेथे बांधकामाची कोणतीही खूण नाही. अशीच खडकाळ भिंत आस्ट्रेलियाच्या पूर्वेस आहे व ती Great Barrier Reef म्हणून ओळखली जाते. नैसर्गिक घडामोडी अजब असतात. फ्रान्सला जोडणाऱ्या ब्रिटनच्या टेकड्या (ब्रिटन यापूर्वी द्वीपकल्प होते) या प्रलंयकारी महापुरांनी चोवीस तासांत वाहून गेल्या व ब्रिटन हे बेट (आयलंड) बनले. ही घटना २ ते ४ लाख वर्षांपूर्वी घडली. हे सर्व अत्याधुनिक सोनार यंत्राने चॅनेलच्या सागरतळाशी असलेल्या गाळाचे निरीक्षण करून शास्त्रज्ञांना सापडले. पृथ्वीवरील हा एक महाप्रचंड शक्तिशाली असा जलप्रलय होता असे लंडनचे हिस्टरी म्युझियमचे प्रमुख प्रा. ख्रिस स्ट्रिंगर (Chris Stringer) म्हणाले.
पृथ्वीच्या भूखंडांचे महाकाय प्रचंड पृष्ठभाग बेबंद रीतीने सातत्याने स्वैर भटकत असतात. आपला भारत हा भूखंड पूर्वी दक्षिण गोलार्धात अंटार्क्टिका खंडाला चिकटून होता. वीस कोटी वर्षांमध्ये हा भारत भूखंड नऊ हजार किलोमीटर मजल मारून दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात पोहचला. त्याचा उत्तरेकडे प्रवास सुरू झाला. त्याने दक्षिण आशिया खंडाच्या दक्षिणेला एक जबरदस्त धडक मारली. त्यामुळे हिमालयाचा जन्म झाला. अशा अनेक अतर्व्य घडामोडी पृथ्वीच्या पोटात चालू असतात. पाण्याच्या ठिकाणी पर्वत व पर्वताच्या ठिकाणी पाणी असे रूपांतर होत असते. उदा.पाण्यातून वर आलेला हिमालय पर्वत. महासागराच्या तळाशी भूकंप होऊन कसे बदल होतात हे आपण ‘सुनामी’ मुळे अनुभवले आहेच. निसर्गात पृथ्वीचे भूखंड व जलराशी यांची सतत नवनवीन रचना व मांडणी चालू असते. लाखो वर्षांपूर्वी अशीच एखादी अतयं महासागरांतर्गत भागात श्रीलंका व भारत यांना जोडणारा एक लांबलचक खडकांचा पट्टा वर आला असावा किंवा निर्माण झाला असावा. तेव्हा हा एक निसर्गचमत्कार आहे.
आणखी वाल्मीकि-रामायण/दंतकथा, लोककथा, रामोपाख्यान, रामकथेची मौखिक परंपरा यांच्या आधारावर वाल्मीकीने रामायण लिहिले आहे. एक मत असे आहे की अयोध्येची रामकथा, किष्किंधेची सुग्रीव हनुमानाची कथा व लंकेच्या सम्राट रावणाची कथा, या तीन कथा स्वतंत्र रूपांत प्रचलित होत्या हे जर खरे असेल तर रामसेतूचा प्रश्नच उद्भवत नाही. वाल्मीकीने या तीन कथा महाकाव्यात गुंफित केल्या. त्यावेळेस वाल्मीकीला महासागर ओलांडण्यासाठी काहीतरी क्लृती करावी लागली. आणि त्याने रामसेतूची कल्पना केली. महाकाव्यात विराट जीवनाचे दर्शन घडविणे जसे आवश्यक असते तसेच नवरसांचेही वर्णन करावे अशी अपेक्षा असते. अद्भुतरसासाठी वाल्मीकीने ‘रामसेतू’, ‘पुष्पक विमान’ यांची कल्पना केली. कवी कुसुमाग्रजांनीही पृथ्वीचे प्रेमगीत यात भौगोलिक सत्यावर पृथ्वी सूर्याभोवती फिरते यावर प्रियतमा पृथ्वी ही प्रियकर सूर्याभोवती फिरते अशी कल्पना केली आहे. त्यात अद्भुतरस नाही पण वाल्मिकीच्या अद्भुत कल्पनेला सत्य मानून रामसेतू हा रामानेच बांधला हे वास्तव मानले जाऊ लागले. आणि रामाबरोबर रामसेतूविषयीही अपार श्रद्धा निर्माण झाली. पण या श्रद्धा अंधश्रद्धा बनून मानवी जीवनाच्या विकासाला अडथळा बनत असतील तर त्यांची दखल घेणे आवश्यक आहे. प्रसंगी त्यांना दूर सारून विकास साधला पाहिजे ही अपेक्षा आहे. र. वि. पंडित, १०२ उत्कर्ष-रजनीगंधा, खरे टाऊन, धरमपेठ, नागपूर-४४० ०१०.
दूरभाष : ०७१२-२५२८०२१

रामसेतू (अॅडम्स ब्रिज) ही भौगोलिक रचना मानवनिर्मित नसून नैसर्गिक आहे एवढेच मी विशद केले होते. ही नैसर्गिक रचना मोडून, जलपरिवहनासाठी तेथे कालवा खोदावा अथवा नाही हा सर्वस्वी वेगळा विषय आहे. माझ्या मते असा कालवा (डशर लहरपपशश्र) मुळीच खोदू नये. याचे कारण धार्मिक संवेदनशीलता हे नसून, आंतर्राष्ट्रीय व्यवहार व भारताची सुरक्षा हे आहे.
जगात सुवेझ व पनामा ही, दोन समुद्र जोडून जलपरिवहन सुलभ करण्यासाठी, मानवाने खोदलेल्या कालव्याची प्रमुख उदाहरणे आहेत. या दोन कालव्यांचा इतिहास अभ्यासल्यावर असे लक्षात येते की या दोन्ही ठिकाणी (विशेषतः सुवेझ) कालव्याची मालकी, नियंत्रण व वहिवाटीचा अधिकार यावरून संघर्ष झालेले आहेत व तेथील राज्यसत्ता उलथून पाडण्यात आलेल्या आहेत, कारण “ज्याचे हाती काठी, त्याची म्हैस” हा दादागिरीचा न्याय नहमीच प्रभावी असतो.
रामसेतूचा खडकाळ दांडा हा जसा भारताच्या प्रभुसत्तेच्या (Sovereignty = 20 Km from coastline) आहे. तसाच तो श्रीलंका या स्वायत्त राष्ट्राच्याही अधिकारक्षेत्रात येतो. तेव्हा या प्रस्तावित कालव्यावर या दोन्ही राष्ट्रांची प्रभुसत्ता राहणार. श्रीलंका हे राष्ट्र सदैव भारताचे मित्रराष्ट्र राहील याची मुळीच हमी नाही. त्यामुळे भारत सरकारने मोठा खर्च करून बांधलेल्या या कालव्यावरील नियंत्रणात श्रीलंकेची काय भूमिका राहील हे अनिश्चितच राहील. कालव्यावर १००% भारताचेच नियंत्रण कायमचे राहणार असेल तरच हा खडकाळ दांडा तोडून कालवा खोदणे शहाणपणाचे ठरेल.
हा नियोजित कालवा किमान ५०० मीटर रुंद (दोपदरी वाहतुकीसाठी) व ३० ते ४० मीटर खोल खणणे आवश्यक आहे. त्याखेरीज या कालव्यातून मोठी जहाजे संचार करू शकणार नाहीत. एवढा रुंद व खोल कालवा खणला तरच त्यातून मोठी तेलवाहू व नौसेनेची जहाजे आणि पाणबुड्या जाऊ शकतील. त्यामुळे पाल्क व मान्नार या समुद्रातील मासेमारी संपुष्टात येईल. विशेषतः मान्नारच्या आखातात प्राचीन काळापासून चालत आलेला, नैसर्गिक मोती गोळा करण्याचा पारंपरिक व्यवसाय नष्ट होईल. याखेरीज मोठ्या जहाजांच्या वर्दळीमुळे समुद्राचे प्रदूषणही मोठ्या प्रमाणावर होईल.
हा कालवा जरी केवळ भारताच्या मालकीच्या नौकानयनासाठीच (याविषयी सरकार मूक आहे!) वापरला जाईल असे जरी सरकारचे मंत्री सांगत असले तरी भविष्यात येणारे राज्यकर्ते आंतर्राष्ट्रीय दबावाला (आणि लाचलुचपतीला) बळी पडून हा कालवा सर्वांसाठी मोकळा करण्याची शक्यता आहे. भारताच्या पूर्वेला चीन, इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार व बांगलादेश व पश्चिमेला पाकिस्तान, इराण, सौदी ही मित्रराष्ट्रे नसलेली राष्ट्रे आहेत. अमेरिका तर सातासमुद्रांवर अनभिषिक्त सत्ता गाजवतेच आहे. तेव्हा या राष्ट्रांच्या जहाजांना हा कालवा खुला झाला तर पोरबंदर, जामनगरपासून मुंबई, कारवार, कोच्ची, चेन्नई, विशाखापट्टन, पारदीप, हल्दिया या सर्व प्रमुख बंदरांना धोका उत्पन्न होईल. शत्रुपक्षांच्या पाणबुड्या व लढाऊ जहाजे भारतीय प्रभुसत्तेच्या सागरात अनिर्बंध संचार करू शकतील हे सर्व धोके लक्षात घेऊन भारताने हा सेतुकालवा प्रकल्प तात्काळ रद्द करणे भारताच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे. एकूण भावनिक कारणासाठी नाही पण व्यावहारिक व सुरक्षा कारणासाठी, रामसेतू ही हल्लीची भौगोलिक रचना, तशीच कायम ठेवणे भारत राष्ट्राच्या हिताचे आहे.
[या विषयावरील चर्चा बंद करण्यात येत आहे. सं.]
ब्रिजमोहन हेडा, ३३ ब, समर्थ कॉलनी, अमरावती ४४४६०६.
E_Mail : bbheda@yahoo.com

(१)विजय वर्षा यांचा लैंगिकता पवित्रच आहे! (मार्च २००८) हा लेख वाचला. लैंगिकता ही शारीरिक क्रिया आहे आणि तिच्यामागे कामभावनेची प्रेरणा असते. माणसाच्या कोणत्याही भावना पवित्र वा अपवित्र नसतात. त्या असतात एवढेच म्हणता येईल. त्यांना मूल्यव्यवस्थेने जोखता येत नाही. त्यांना नैतिकतेचे मानदंड लावता येत नाहीत. त्या भावनांची परिपूर्ती जेव्हा होते तेव्हा तिच्या परिपूर्तीच्या पद्धतीला नैतिकतेचे मानदंड लागू होतात. जसे भूक लागणे ही गोष्ट नैतिकही नाही आणि अनैतिकही नाही. ती न-नैतिक आहे. ती शारीर गरज आहे. परंतु ती आपण कशी भागवतो यावरूनच तिच्याबद्दल आपण नैतिकतेचा वा अनैतिकतेचा शेरा मारू शकतो. कामक्रीडा दाखवणाऱ्या कलाकृती पवित्र ठिकाणी आहेत. यावरून त्यांचे पावित्र्य सिद्ध होते असे म्हणणे म्हणजे अतिव्याप्ती होते. एक तर कलाकृतींना सौंदर्याचे मानदंड लागतात. नैतिकतेचे नाहीत. परंतु काही कलाकृती या जशा कलाकृती असतात तशाच त्या सामाजिक आशयही व्यक्त करत असतात. असा सामाजिक आशय जेव्हा व्यक्त होतो तेव्हाच केवळ त्या आशयाला अनुषंगून नैतिकता-अनैतिकतेचा, पवित्रता-अपवित्रतेचा प्रश्न उपस्थित होतो, त्याआधी नाही.
एके काळी प्रजोत्पादन पवित्र मानण्यात आले होते. ज्या काळात लोकसंख्या कमी होती त्या काळात अनेक मुले होणे ही गरज होती. त्यामुळे ‘अष्टपुत्रा सौभाग्यवती भव’ असा आशीर्वाद दिला जाई. आज हा आशीर्वाद पवित्र ठरेल काय? आणि प्रजोत्पादन पवित्र मानले तरी प्रत्येक ठिकाणची लैंगिकता पवित्र म्हणणारा युक्तिवाद मला तरी अनाकलनीय आहे. प्रजोत्पादन पवित्र म्हणून लैंगिकता पवित्र असे म्हणणे म्हणजे साध्यावरून साधनांची शुचिता ठरवणे होय. साधनांमुळे साध्याची शुचिता अशुचिता एक वेळा ठरवता येईल, परंतु साध्यावरून साधनांची शुचिता कोणत्या तर्कशास्त्रात बसते? ही तर्कपद्धती मान्य केली तर जगात कोणतीही गोष्ट पवित्र आहे असे सिद्ध करता येईल.
समाजाच्या गरजांप्रमाणे अनेक नीतिनियम बदलले आहेत आणि आजही बदलत आहेत आणि यापुढेही बदलत राहणार आहेत. विवाहसंस्थेचा विचार केला तर ही गोष्ट कळायला अडचण जाऊ नये. त्यामुळे पवित्र मानल्या गेलेल्या ठिकाणी असलेली प्रत्येक गोष्ट, तिचा संदर्भ न पाहता, पवित्र आहे असे आपण मानले तर अडचणीची परिस्थिती निर्माण होईल. शंकराची पिंड का निर्माण झाली, तिचा अर्थ काय हे विजय वर्षा जे म्हणतात ते काही नवीन नाही. परंतु केवळ एवढ्यामुळे लैंगिकता पवित्र मानायची तर देवदासींची रूढी, सतीप्रथा, बळी देणे, अस्पृश्यता, जातिव्यवस्था यांनाही पवित्र मानायचे काय?
(२) दिनांक २१ डिसेंबर २००७ ला एन.डी.टी.व्ही.वरील बातमीप्रमाणे श्रीमती तस्लिमा नसरीन यांना कोलकाताला परतण्याकरिता परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यांचे काही सामानसुमान कोलकाताला राहिले आहे. निदान ते आणण्याकरिता तरी मला कोलकाताला जाऊ द्या अशी विनंती त्यांनी केली असता भारत सरकारच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने तीही नाकारल्याचे नसरीन यांनी मुलाखतीत सांगितले. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रात अशा प्रकारचा निर्णय व्हावा ही फार खेदाची बाब आहे. धर्म ही अफूची गोळी आहे असे शिकवणाऱ्या साम्यवादी पक्षाच्या राज्यात अशा प्रकारच्या निर्णयाला पाठिंबा मिळावा ही तर अजूनच खेदाची बाब आहे. लोकमताची पर्वा न करता तत्त्वनिष्ठ राहणारा साम्यवादी पक्ष हा एकमेव पक्ष आहे असे मी मानत होतो. परंतु बंगाल सरकारच्या या निर्णयाने माझ्या धारणेला फार मोठा धक्का लागला हे कबूल करणे भाग आहे.
नसरीन यांच्या पुस्तकप्रकाशनाच्या समारंभाच्या वेळी त्यांच्यावर हैद्राबादमध्ये हल्ला झाला होता तेव्हा त्यासंबंधी बोलताना काश्मीरचे मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद म्हणाले होते की धर्मासंबंधी लिहिताना लोकांनी फार सावधगिरी बाळगली पाहिजे. परंतु अभिव्यक्ति-स्वातंत्र्याची ग्वाही देणाऱ्या घटनेची यामुळे गळचेपी होते तिचे काय? धर्मावर टीका केली की धार्मिक भावना दुखावल्या जाण्याचा आरोप करण्यात येऊन बोलणाऱ्यांचे तोंड बंद करण्यात येते; जणू धर्मावर श्रद्धा ठेवणारांनाच केवळ भावना असतात आणि विवेकवाद्यांना भावना वगैरेंचा स्पर्शही झालेला नसतो. सर्वच धर्म टीका सहन करण्याच्या बाबतीत आज अतिशय असहिष्णू झालेले आहेत. परंतु इस्लाममधील ही असहिष्णुता आज पराकोटीला पोहोचते आहे. तिचा वेळीच प्रतिकार केला नाही तर त्या गोष्टीच्या प्रतिक्रियेमुळे इतर धर्मांमधील असहिष्णुता अजूनच वाढल्याशिवाय राहणार नाही.
आज जगाला अतिरेक्यांचा प्रश्न भेडसावत आहे. आणि त्यातही इस्लामचे कट्टरपंथीय हिंसक मार्गाकडे अधिकच तीव्रतेने वळलेले आहेत. त्यांचे हल्ले परधर्मातील टीकाकारांवरच होत नाहीत तर स्वधर्मीयांवरही होत आहेत. कुणी इस्लामवर टीका केली की काढा त्याला मारण्याचा फतवा. अशा प्रकारचा फतवा नसरीन विरुद्ध निघाला आहे, रश्दीविरुद्ध निघाला होता, आयन हिरसी अलींविरुद्ध निघाला, नवल सदवाई यांच्याविरुद्ध निघाला. या सर्वांचा अपराध एवढाच होता की त्यांनी इस्लामवर वा महम्मद पैगंबरवर टीका केली होती.
वास्तवात आपण लक्षात ठेवले पाहिजे की अखेरीस धर्म हाही एक विचार आहे. ज्या धर्मातील विचार श्रेष्ठ असतील, अत्युच्च कोटीचे असतील तोच धर्म मोठा असे म्हणावे लागेल. परंतु असे करायचे तर धर्मांच्या विचारांची चिकित्सा करण्याचे स्वातंत्र्य मान्य केले पाहिजे. शिवाय कोणत्याही धर्मातील सर्व विचार सारखेच चांगले नसतात. काही विचार, काही प्रथा कालबाह्य झालेले असतात. धर्माची वा धर्मसंस्थापकांची चिकित्सा करण्याचे स्वातंत्र्य नसेल तर अशी चिकित्सा संभवणार नाही. आपण रामाची, कृष्णाची अशी चिकित्सा करू शकतो तर महम्मद पैगंबरांची अशी चिकित्सा का करता येऊ नये? तस्लिमा नसरीन, आयन हिरसी अली, नवल सदवाई, सलमान रश्दी ही मंडळी अशांपैकीच आहेत. अन्याय्य रूढींचा पुरस्कार करणारे धर्मग्रंथ जर कोणत्याही प्रतिबंधाशिवाय प्रकाशित होऊ शकतात तर या विचारवंतांचे साहित्य प्रकाशित करण्यावर बंदी का असावी? याचा अर्थ असा नाही की या मंडळींचे विचार प्रत्येकाने मान्य केले पाहिजे. परंतु विचारांवर बंदी नको. धर्मनिष्ठांना धार्मिक जशा भावना असतात तशाच तीव्र भावना धर्मावर विश्वास न ठेवणारांच्याही असू शकतात याची जाणीव प्रत्येक प्रगतिशील शासनाने ठेवली पाहिजे.
धर्मावर टीका केली म्हणून मारा; आम्ही अमुक अमुक बक्षीस देऊ अशा प्रकारचे काही फतवे भारतातही निघाले होते. भारतात असे फतवे काढणाऱ्यांत जसे इस्लाम धर्मातील लोक आहेत तसेच हिंदू कट्टरपंथीयही आहेत. आणि असे फतवे काढणाऱ्यांवर काही विशेष कार्यवाही झाल्याचे माझ्या तरी माहितीत नाही. जर असे फतवे काढणारांवर कार्यवाही करायची नसेल तर भारतातील न्यायालये बंद करावी व न्यायव्यवस्था मुल्ला-पंडित यांच्यावरच सोपवावी हेच बरे.
वास्तवात धर्मसंस्थापकांनीसुद्धा तत्कालीन धर्मव्यवस्थेवर टीका केली होती. तत्कालीन धर्मातील उणिवा त्यांनी जनतेला सांगितल्या होत्या आणि नवीन धर्माची संस्थापना केली होती. मग जे स्वातंत्र्य राम, कृष्ण, बुद्ध, महावीर, येशू, महम्मद आदि धर्मसंस्थापकांनी घेतले तेच स्वातंत्र्य त्या धर्माचे अनुयायी आज इतरांना कसे नाकारू शकतात? या सर्व महापुरुषांना त्यावेळी जे ज्ञान उपलब्ध होते त्यापेक्षा आजच्या पिढीला अधिक ज्ञान उपलब्ध आहे. कृष्णाला गीता उपलब्ध नव्हती, येशूला बायबल उपलब्ध नव्हते, महम्मदाला कुराण उपलब्ध नव्हते. आज आम्हाला हे ग्रंथ उपलब्ध आहेत. शॉच्या शब्दांत सांगायचे तर आही आमच्या पूर्वसुरींच्या खांद्यावर उभे आहोत म्हणून आम्ही त्यांच्यापेक्षा अधिक दूरवर पाहू शकतो. त्यामुळे आज आपली पिढी विचक्षणपणे धर्मांकडे पाहत असेल तर त्याला विरोध करण्यात येऊ नये. त्यातील जे चांगले असेल ते टिकेल, जे टाकण्यासारखे असेल ते नष्ट होईल. केवळ मतांच्या राजकारणासाठी पुरोगामी म्हणविणाऱ्या पक्षांनी तरी धर्मावर टीका करणारांची मुस्कटदाबी करणारांना प्रश्रय देऊ नये.