पत्रचर्चा

देवयानी बुचे
आसु च्या ऑगस्ट २००८ अंकांतील “परमसखा मृत्यू किती आळवावा’ हा लेख वाचला. मी एक फिजिशियन असून गंभीरपणे आजारी असलेल्या रुग्णांची चिकित्सा (शरीशपीं) करते. अशा प्रकारचा वृद्ध रुग्णांची चिकित्सा करताना तीसुद्धा अत्यंत महागडी, क्लिष्ट आणि सरकारी खर्चाने देताना “”Critical care for whom?’ हा प्रश्न मला वारंवार भेडसावतो.
लेखिकेने म्हटल्याप्रमाणे पस्तीस वर्षे नोकरी आणि पंचेचाळीस वर्षे पेन्शन बरोबरीस पंचेचाळीस वर्षे सतत औषधोपचार आणि शेवटी आठवडेच्या आठवडे आय.सी.सी.यु.मध्ये Intensive treatment हा कुठला हिशेब? शिवाय ट्रीटमेंटनंतर परावलंबी आयुष्य आणि तेसुद्धा रिटायर झालेल्या वयस्क मुलांकडून! भारतासारख्या विकसनशील देशाच्या सरकारने हा खर्च करणे आवश्यक आहे काय ? दुसरा मुद्दा मांडावासा वाटतो तो, ‘पुरेसे जगून झाल्यावर इच्छामरण” ह्या उपलशी चा. कितीशा लोकांना आपले पुरेसे जगून झाले आहे असे जाणवते ? आम्हाला तर आज काय गणपती, उद्या काय नवरात्र, दिवाळी, नातसुनेचे डोहाळजेवण, पणतूची मुंज ह्यातून कुणी बाहेर येताना दिसत नाही. तेव्हा पुरेसे जगणे म्हणजे काय हा प्रश्नच पडतो.
‘मृत्यू हे पूर्णसत्य आहे आणि तो प्रत्येकाला येणारच’ हे समजतच नाही. जेव्हा “डॉक्टर, इतके पैसे लावले, आमचा पेशंट ठीक व्हायलाच हवा अथवा असे कसे सुधरत नाही” असे पंच्याहत्तर वर्षांच्या आप्तांबद्दल क्रिटिकल युनिटच्या बाहेर विचारतात तेव्हा काय उत्तर द्यावे समजत नाही. असे वाटते बाळाचा जन्म होताना जसे आजकाल पित्याला समोर ठेवण्याची पद्धत रूढ होते आहे तसेच आपल्या आप्तस्वकीयांच्या जवळ शांत शुद्ध वातावरणात ईश्वराचे नामस्मरण/शांत संगीत ऐकत मृत्यू येणे योग्य ना? की दवाखान्यात शिपीळश्र»ी अथवा पळी च्या गराड्यात येणे योग्य ?
अर्थात हे सर्व मी ज्यांचे पुरेसे जगून झाले आहे, ज्यांनी सरासरी आयुष्याची मर्यादा ओलांडली आहे आणि ज्यांना परावलंबी आयुष्य जगावे लागते आहे त्यांबाबतच लिहिते आहे, ह्याची नोंद घेणे आवश्यक आहे, अन्यथा गैरसमज होईल. खरेतर आज गरज आहे ती विचार करण्याची स्वतः आणि समाजाचा. लोक काय म्हणतील? म्हणून म्हाताऱ्या आईवडिलांना जगवण्यासाठी कर्जबाजारी होणारी, घरदार विकणारी आणि शेवटी आईवडिलांनाही गमावणारी मुले आम्ही पाहतो. पुरेसे जगून झाल्यावर इच्छामरण हा विचार अतिशय चांगला आहे परंतु तो खऱ्या अर्थाने अंमलात आणायला समाजात वैचारिक प्रगल्भता, सर्वमान्य कायदा लागेल आणि डॉक्टरमंडळींना व्यावसायिकतेच्या मानसिकतेतून निघून निरपेक्षपणे, सचोटीने निर्णय घेण्याची क्षमता आणि वृत्ती अंगी बाणवावी लागेल. सध्या ह्या सर्व गोष्टींची वानवा आहे. एक अभ्यासपूर्ण आणि चिंतनीय लेख लिहिल्याबद्दल मंजिरी घाटपांडे ह्यांचे अभिनंदन!