पत्रसंवाद

सुनेत्रा आगाशे, २६१, शनिवार पेठ, सातारा, फोन २१६२२३२००५८
जातिनिर्मूलनः
तुकाराम, कबीर वगैरे कैक थोर संतांच्या वेळेपासून या जातीच्या राक्षसाला हरवण्याचे बरेच प्रयत्न झाले; पण या बलदंड राक्षसापुढे सर्वांनी हात टेकले. आता तर मतांच्या राजकारणाने त्याला आणखीच बळकट केले आहे. जातीच्या अभिमानाचा इतका मोठा प्रभाव आहे की देशासाठी बलिदान द्यायला तयार होणार नाहीत पण जातीच्या इज्जतीसाठी काहीही करायला तयार होतील. जातीबाहेर लग्न करणे हा तर फार मोठा गुन्हा ठरतो. त्यासाठी शिक्षा एकदम देहदंडाचीच. हरयाणा, उत्तरप्रदेश, पंजाब अगदी आपला पुरोगामी महाराष्ट्रसुद्धा या राज्यांमध्ये हा जात्याभिमान फारच जाज्वल्य असल्याचे दिसते. या प्रांतांमध्ये अशा मुला-मुलींना स्वतः त्यांचे आई-वडीलही मारून टाकण्याइतके क्रूर होऊ शकतात अशी उदाहरणे समोर येतच असतात.
या जाति-उपजाती बाह्य उपचारांनी नामशेष होतील याची अजिबात शाश्वती नाही. आपापसातील विवाह होऊन संकर होत होत अत्यंत संथपणे कधीतरी भविष्यकाळी त्याची तीव्रता कमी होईल असे वाटते. पण असे आंतरजातीय विवाह होण्यासाठी सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक समानता येणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे. सवर्णांमध्ये आजकाल पारंपरिक पद्धतीने स्थळे बघूनसुद्धा अशा तहेने कायस्थ, सारस्वत, ब्राह्मण सर्व पोटजाती, यांच्यामध्ये विवाह होऊ लागले आहे. क्वचित प्रसंगी मराठा जातीतही असे विवाह होतात. या जातींमध्ये हे शक्य होऊ लागले आहे कारण त्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व आर्थिक या सर्व बाबींमध्ये बरेच साधर्म्य आहे. असे विवाह होण्यासाठी बाकी सर्व मागास जातींचे हे वास्तव बदलणे ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे. शिक्षण हीच त्याची सर्वप्रथम पायरी आहे. शिक्षणाने नोकरीधंदा यांच्या संधी मिळणे शक्य होते, आर्थिक स्थिती सुधारू शकते व समान आर्थिक स्तरावर असलेल्या समाजात मिसळणे शक्य होते. एकमेकांशी बोलणे, वागणे, चालीरीती यातही बदल होऊ शकेल व बह्वशी एकसंध समाज होऊ शकेल.
प्राथमिक शिक्षणासाठी सरकारी प्रयत्न आजवर बरेच झाले आहेत. पण एकूणच सरकारी खाक्यामुळे त्याबाबतीत फारशी प्रगती झाली नाही. वास्तविक सरकारचा बराच पैसा यासाठी खर्च होतो पण राजीव गांधींच्याच उक्तीप्रमाणे त्यातला खरा कारणी किती लागतो हा संशोधनाचाच विषय ठरेल. शिवाय सध्या गाजत असलेला राखीव जागांचा विषयही जातींमधली तेढ आणखी वाढवण्याचेच काम करत आहे.
काही वर्षांपूर्वी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात स्वामिनाथन् अंक्लेसरिया अय्यर या अर्थतज्ज्ञाचा लेख वाचण्यात आला होता. त्यात त्यांनी एक अतिशय मूलगामी व व्यावहारिक कल्पना मांडली होती. जात हे वास्तव स्वीकारणे अपरिहार्य आहे व त्याच्या निर्मूलनासाठीही हे वास्तव समोर ठेवूनच उपाय शोधावा लागेल. त्यांनी असे म्हटले होते की जातींच्या उत्थानासाठी म्हणून जे कार्यक्रम राबवले जातात थोडक्यात म्हणजे त्यासाठी जो पैसा खर्च केला जातो तो खर्च करण्याची, ते कार्यक्रम राबवण्याची जबाबदारी त्या त्या जातीतील लोकांवरच टाकावी. म्हणजे मदत सरकारची पण जबाबदारी ज्यांची त्यांची. त्यायोगे दुसऱ्या कोणी मुद्दाम हे काम केले नाही, बिघडवले, पैसे हडप केले अशा तक्रारींना जागा राहू नये.
हा प्रयोग शिक्षणाच्या बाबतीत करणे उचित ठरेल. शाळांच्या इमारती वगैरे पायाभूत सुविधा, शिक्षकांचे पगार इ. खर्च सरकारने करावा पण शाळा चालवणे व विद्यार्थ्यांची प्रगती ही जबाबदारी पूर्णपणे जातीजातींतील नेतेमंडळी, जाणती मंडळी यांच्यावरच सोपवावी.
आपली प्रगती करणे आपल्याच हाती असल्याचे त्यांना समजून त्यासाठी इतरांना दोष देता येणार नाही, याची त्यांना जाणीव होईल व त्यांच्याकडून त्यासाठी प्रयत्न होतील. गरज पडेल तेव्हा मदतीचा हात देणे हे कर्तव्य इतरांचे असेलच. अशा शाळांमध्ये राखीव जागांपेक्षा लायक शिक्षक नेमणे जास्त महत्त्वाचे आहे. अपात्र शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये मोठाच अडसर आहे. शिवाय संघटनांमुळे अपात्र शिक्षकांनाही मिळणारे अभयदान हाही चिंतेचा विषय आहे. शिक्षकी पेशा हे नुसते पोट भरण्याचे साधन नव्हे. वर्गातल्या सर्व मुलांचे भवितव्य त्यांच्यावर अवलंबून असते. या पेशाबद्दल स्वाभाविक आवड असणे, मुलांबद्दल प्रेम व आत्मीयता असणे, विषयांचे नीट ज्ञान असणे, ते ज्ञान मुलांपर्यंत चातुर्याने पोचवता येणे, व त्या मुलांना नुसते पुस्तकी ज्ञान न देता चांगले जीवन जगणे, चांगले नागरिक बनवणे या बाबींचेही अनौपचारिक शिक्षण देणे या सर्व गुणांची आवश्यकता आहे. शिक्षक बनू पाहणाऱ्यांमध्ये हे गुण, क्षमता आहेत की नाही याची काटेकोर चाचणी होणे आवश्यक आहे. – या सर्वांची आपल्याकडे ना जाण आहे ना त्याची कुणाला आवश्यकता भासते, त्यामुळेच शिक्षणाचा बोजवारा उडालेला दिसतो.
प्राथमिक शिक्षणाप्रमाणेच पुढील सर्व टप्प्यांवर माध्यमिक, उच्च माध्यमिक, कॉलेज व व्यावसायिक शिक्षणसंस्था याही जर जातीनिहाय उभ्या राहिल्या तर त्या जास्त प्रामाणिकपणे आपल्या जातीतील मुलांना जास्तीतजास्त सक्षम बनवण्याचा प्रयत्न करतील अशी आशा करायला हरकत नाही. कसोटी परीक्षा मात्र सर्वांना समान हवी. अशा समान पातळीवर जेव्हा सगळे विद्यार्थी येतील तेव्हा उच्चनीचतेची भावना लयाला जाईल. कोणकोणाचे जावई वगैरे भाषा संपेल. हे सर्व व्हायला खूप काळ कदाचित आणखी २-३ पिढ्याही जातील. पण ही प्रगती होईल, तेव्हाच जातींमधली सामाजिक दरी मिटेल. अशा समान पातळीवर आंतरजातीय विवाह रोखणे आईवडिलांना शक्यही होणार नाही व याची जरूरीही वाटणार नाही. मग हळूहळू संकर होऊन जाती अगदी गेल्या नाहीत तरी त्यातली तेढ, उच्चनीचता, अवहेलना या कटु गोष्टींना आळा बसेल अशी खात्री आहे. बाहेरून मलमपट्टी करून, धाकदपटशा, जबरदस्ती, चढाओढ, कायद्याचा बडगा या कोणत्याच उपायांनी जे साध्य होणार नाही ते या सामाजिक बदलांमुळे शक्य होईल.

दादाजी ज. वांढरे, अहेरी, ता. राजुरा, जि. चंद्रपूर.
सप्टेंबर २००८ च्या अंकातील अनंत जोग व श्री. वि. सहस्त्रबुद्धे या जन्माने ब्राह्मण असलेल्या व ब्राह्मणी प्रवृत्ती सोडलेल्या दोन वाचकांची पत्रे वाचली. ब्राह्मणांच्या नावाने बहुजन समाज खडे का फोडतो याचा विचार उभयतांनी केल्यास बरे होईल. जातीची मुळाक्षरे शिकविणारे ‘शिक्षक’ कोण आहेत ? शिक्षकांनी जर चुकीचे शिक्षण दिले, तर प्रथम शिक्षकांनी बदलले पाहिजे. हजार पाचशे रुपये मदत करणे, आणि बंधुभाव जोपासणे याचा सहसंबंध जोडणे हास्यास्पद वाटते. वास्तविक वंचिताचा विचारच प्रामाणिक सुधारक करू शकतो. कालच्या सुधारकांची चिकित्सा करूनच पुढे जावे लागेल, तेव्हाच नवीन पिढ्यांत, नव्या जाणिवा, नवे विचार उद्भूत होतील, हेही वास्तव नाकारता येत नाही.