बाबा, नका देऊ मला इतक्या दूर
जिथं मला भेटायला यायला
तुम्हाला घरातील बकऱ्या विकाव्या लागतील.
नका करू माझं लग्न त्या देशात
जिथं माणसापेक्षा जास्त
ईश्वरच राहतात.
नसतील जंगल नदी डोंगर
तिथं नका करू माझी सोयरीक
जिथल्या रस्त्यांवरून
मनापेक्षाही जास्त वेगाने धावतात मोटारी,
आहेत जिथं उंच उंच घरं आणि
मोठ मोठी दुकानंच नुसती
त्या घराशी नका जोडू माझं नातं
जिथं मोठं मोकळं अंगण नाही
कोंबड्याच्या आरवण्यानं होत नाही
जिथली सकाळ अन् संध्याकाळी मावळणारा सूर्य दिसत नाही.
नका निवडू असा वर
जो पारावर अन् गुत्त्यात असेल कुंबलेला
सतत कामचुकार, ऐदी
जो चतुर असेल जत्रेत पोरी फिरविण्यात
असा वर नका निवडू माझ्यासाठी.
नवरा म्हणजे, काही ताट वाटी तर नाही
वाटेल तेव्हा बदलता येईल अन् घेता येईल
नवा चांगला-खराब झाल्यावर.
जो शब्दाशब्दाला गोष्ट करतो
लाठ्या काठ्यांची काढतो तीर, धनुष्य, कु-हाड
जेव्हा वाटेल तेव्हा जाईल जो बंगाल,
आसाम वा काश्मिर, असा वर नकोय मला.
अन् त्याच्या हातात देऊन नका माझा हात
ज्या हातांनी कधी लावलं नाही कोणतं झाड
पीक नाही काढलं ज्या हातांनी
ज्या हातांनी केली नाही कधी कुणाची साथ
एखाद्याचं ओझं उचलण्यासाठी.
त्यातल्या त्यात, ज्या हातांना ठाऊक नाही लिहिणं ‘ह’ हाताचा
त्याच्या हातात कधी देऊ नका माझा हात !
द्यायचं असेल तर तिथं द्या
जिथं सकाळी जाऊन
संध्याकाळी तुम्ही परतू शकाल.
मी जर दुःखाने रडले या घाटावर
तर त्या घाटावर नदीत स्नान करणारे तुम्ही
येऊ शकाल ऐकून माझा करुण विलाप.
खारीक, गूळ पाठवीन ; पाठवू शकेन
संदेश तुमच्यासाठी
तिकडे येणाऱ्या जाणाऱ्याच्या हातानं
पाठवू शकेन करंज्या, लाडू, शेवया
वेळोवेळी बबलीसाठी.
जत्रा-यात्रा बाजाराला येता जाता
भेटेल कुणी आपला
जो सांगू शकेल घर नि गावाचा हाल-हवाल
सोन्या गाईच्या विण्याची बातमी
देऊ शकेल कुणी तिकडून येणारा
अशाच जागी द्या मला!
त्या देशात द्या
जिथं ईश्वर कमी अन्
माणसं अधिक राहतात
शेळी आणि वाघ
एकाच घाटावर पाणी पितात
तिथंच द्या मला!
त्याच्याशी लावा लग्न
कबुतराची जोडी आणि पण्डुक पक्ष्यांप्रमाणे
राहील जो कायम सोबत
घरी-बाहेर शेतात काम करण्यापासून
रात्री सुख-दुःखाच्या वाटणीपर्यंत.
निवडा असा वर
जो वाजवितो बासरी सुरेल
आणि ढोल-मृदंग वाजविण्यात
असेल तरबेज.
वसंताच्या दिवसांत जो आणू शकेल रोज
माझ्या वेणी माळायला फुलं पळसाची
ज्याचा घास उतरणार नाही घशाखाली
माझ्या उपाशी असण्याने
बाबा, त्याच्याशीच करा माझं लग्न !
‘नगाडे की तरह बजाते शब्द’ मूळ हिंदी कविताः निर्मला पुतुल, अनु. राजेंद्र गोणारकर [ बायजा मासिकावरून साभार ]