‘यू टर्न’च्या निमित्ताने

आनंद म्हसवेकर लिखित ‘यू टर्न’ ह्या नाटकाचा १४३ वा प्रयोग नुकताच पहिला. या नाटकाविषयी, कथानकाविषयी, प्रयोगाविषयी पूर्वी वाचलेलेच होते. त्यामुळे प्रत्यक्ष प्रयोग पाहण्याची उत्सुकता होती व तशी संधी मिळाली म्हणून ती सोडली नाही. नाटकाच्या तांत्रिक बाबींविषयी मी लिहिणार नाही कारण त्याविषयी मी पूर्णपणे अनभिज्ञ आहे. मला फक्त कथानकाविषयी व त्यात मांडणी केलेल्या समस्येविषयी काही लिहायचे आहे.

नाटकाचे कथानक म्हटले तर अभिनव आणि म्हटले तर ते तसे नाहीही. कारण यापूर्वी ह्याच कथानकाच्या आशयाचे ‘दुर्गी’ हे नाटक पाहिल्याचे मला आठवते आहे. कोणी लिहिले, कोणी दिग्दर्शित केले हे आज आठवत नाही. परंतु अरविंद देशपांडे आणि सुधा करमरकर ह्या ज्येष्ठ अभिनेत्यांची त्यात प्रमुख भूमिका होती व ते सुखान्त होते.

‘यू टर्न’चा विषय हा आजचा बदललेल्या सामाजिक पर्यावरणाशी अगदी सुसंगत आहे. मेजर वैद्य घटस्फोटित, मुलगी विवाह होऊन सासरी गेलेली म्हणून घरात एकटे! तर रमा गोखले ह्या पोलिस खात्यात असलेल्या गोखले ह्यांच्या निधनामुळे व मुलगा परदेशी असल्यामुळे एकट्या! या दोन्ही एकट्या जीवांची योगायोगाने भेट होते. रमाची मैत्रीण-नली-ही मेजर वैद्य ह्यांची शेजारी. रमा तिच्याकडे पुण्याहून आलेली, ती घरी नाही म्हणून शेजारी असणाऱ्या मेजर वैद्यांच्या घराची कॉल बेल वाजवते आणि दोघांची भेट होते. मेजरने ‘कम्पॅनिअन हवी’ म्हणून दिलेली जाहिरात, हळूहळू मेजर व रमा ह्यांच्यात निर्माण झालेला जिव्हाळा, स्नेह, दोघांनाही आपण परस्परांना आवडतो ह्याची झालेली जाणीव आणि त्यांनी एकत्र राहणे हे सर्वच खूप छानपणे दाखविले आहे. परंतु भेडसावणाऱ्या एकटेपणाच्या समस्येवर शोधून काढलेला हा मार्ग ना रमाच्या मुलाला-साहिलला-आवडत ना मेजरच्या मुलीला-मधूला ! त्याचा निषेध म्हणून रमाचा मुलगा तिला आमंत्रण न देताच परदेशी विवाह करतो व फक्त समारंभाचे फोटो पाठवतो आणि मधू बाळंतपणाला वडिलांकडे येण्याचे नाकारते. परिणामी रमा मनातून दुखावते व खचते आणि मेजरपासून दूर जाऊन पुन्हा एकटीनेच आयुष्याचा प्रवास करण्याचा निर्णय घेते.
एकटेपणाची समस्या आज विभक्त कुटुंबामुळे, कुटुंबाचा आकार लहान असल्यामुळे तीव्रपणे जाणवते हे खरे! परंतु एकत्र कुटुंबातही ती होतीच. ज्या व्यक्तीला मानसिकदृष्ट्या एकटे राहावे लागत असेल तिलाच ते जाणवतही असेल. परंतु आज ती एक जशी सामाजिक समस्या म्हणून अधोरेखित झालेली आहे तशी ती तेव्हा नव्हती असे वाटते. कम्पॅनियनशिप, पुनर्विवाह हे कदाचित् काही प्रमाणात एकटेपणाच्या समस्येचे उत्तर होऊ शकेल. अर्थात् ह्यात दोन्ही पक्षी भूतकाळातील ताण-तणाव असू शकतात. पण ते कालांतराने निवळून सहजीवन सुखकर होऊ शकते.

परंतु शेवटी प्रत्येक व्यक्ती एकटीच असते हे चिरंतन सत्य जर स्वतःच स्वतःला समजावले तर मला वाटते वरील उपायांपेक्षा एकटीने प्रवास करणे कधीही हितावह राहणार ! शेवटी गर्दीतही माणूस एकटाच असतो ना! एकटे राहण्यात नात्यांचे ताण नाहीत, सतत ह्या ना त्या पातळीवर करावे लागणारे समायोजन नाही. जे करावेसे वाटत होते परंतु काही कारणाने करता आले नाही ते करण्याची ह्या सारखी नामी संधी नाही. अर्थात् हे सर्व उत्तम स्वास्थ्य असणे ह्या गृहीतावर अवलंबून आहे.

वय जसे जसे पुढे सरकते तशी तशी व्यक्ती भावनिकदृष्ट्या दुबळी होते. मग कोणी काही नकळत जरी बोलले तरी दुखावली जाऊ शकते. अशा परिस्थितीत आपले कोणीतरी जिव्हाळ्याचे जवळ असावे असे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु आज परिस्थिती अशी आहे की मुले जवळ नाहीत, त्यांची ज्येष्ठांची सेवा करण्याची इच्छा नाही (अपवाद सोडून), आई-वडिलांची त्यांना संसारात अडगळ वाटते अन् मग त्यांची रवानगी वृद्धाश्रमात केली जाते.

वृद्धाश्रम ही संकल्पना आपण अजून पुरतेपणाने स्वीकारू शकलो नाही. एकीकडे मुलगा/सून ह्यांनी आपले करावे ही स्वाभाविक इच्छा व वर्तमान परिस्थिती ह्यात तफावत आहे. वृद्धाश्रम म्हणजे घरात ज्यांचे करण्याचा कंटाळा तरुण पिढीला आला आहे अशा ज्येष्ठ व्यक्तींच्या राहण्याचे ठिकाण असा अर्थ सामान्यपणे केला जातो. त्यामुळे भावनिक पातळीवर हे सर्व स्वीकारणे जड जाते. पण जर आपण असा विचार केला की समविचारी व्यक्तींनी, आपला भार तरुणांवर पडू नये म्हणून एकमेकांच्या आधाराने राहण्याचे ठिकाण म्हणजे वृद्धाश्रम होय तर मला वाटते उर्वरित आयुष्य समाधानाने व्यतीत करता येईल. अर्थात् हे शेवटी ज्याच्या त्याच्या मनाच्या कलावर (bent of mind) अवलंबून आहे.

सर्वच तरुण पिढी ही सरसकट बेजबाबदार आहे, आपले कर्तव्य करण्याचे टाळते आहे असे नाही. परंतु त्यांनी आनंदाने जीवन जगावे ह्या विचाराने ज्येष्ठ नागरिकच जर स्वतःहून दूर झाले तर मला वाटते दोन्ही पक्षी होणारी भावनिक कुतरओढ कमी होईल. आपण पाश्चात्त्यांचा व्यक्तिवाद स्वीकारला पण त्याबरोबर येणाऱ्या प्रश्नांचा विचार केला नाही. त्यामुळे हा एका अर्थाने संक्रमणाचा काळ आहे. आपण ना पूर्णपणे पाश्चात्त्य विचारसरणीचे ना धडपणे भारतीय विचारसरणीचे. आपल्याच विचारातील धरसोड आपल्याला नीट कळत नाही. त्यामुळे एकटेपणाची समस्या अधिकच तीव्र, टोकदार झाल्यासारखी वाटते. या संदर्भात मिलिंद बोकील ह्यांच्या एकम् ह्या पुस्तकाची शिफारस मला करावीशी वाटते. प्रत्येकाने ते जरूर वाचावे.

कर्मयोग, धनतोली, नागपूर ४४० ०१२.