नैतिकतेची वैश्विकता

मार्क हॉसर हे नामवंत मानसतज्ज्ञ असून मन, मेंदू व वर्तणूक यांविषयी विशेष अभ्यास करत आहेत. त्यांच्या मॉरल माइंड्स (Moral Minds: How Nature Designed Our Universal Sense of Right and Wrong) या पुस्तकात नीतिमत्तेच्या वैश्विक स्वरूपाबद्दल विस्तृतपणे चर्चा केली आहे. या पुस्तकाच्या अनुषंगाने केलेल्या काही प्रश्नोत्तरांतून नैतिकतेविषयी त्यांना काय म्हणायचे आहे ते अधिक स्पष्ट होईल. माणसांमध्ये नीतिमत्ता उपजतच असते असे विधान आपण करत आहात. आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे?

Photo by Sigmund on Unsplash

सर्वांत प्रथम नीतिमत्तेचे मूळ कुठे असेल याचा विचार करायला हवा. बरोबर वा चूक असे निकाल देत असताना त्यामागील मानसिक प्रक्रिया कोणती असेल? सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपण देत असलेला निर्णय व आपण प्रत्यक्षपणे करत असलेली कृती यांत काही ताळमेळ आहे का, याकडे लक्ष पुरविले पाहिजे. काही वेळा आपली कृती व आपला निर्णय यांची सांगड घातलेली दिसेल. परंतु बहुतेक वेळा ती सुसंगत नसेल. नीतिमत्ता उपजत असू शकते यासाठी आपण आपल्यातील भाषाज्ञानाविषयीचा मागोवा घेणे इष्ट ठरेल. नोम चोम्स्की या भाषातज्ज्ञाच्या मते जगभरातील माणसे हजारो प्रकारच्या बोली बोलत असली तरी या सर्व बोलींचे मूळ माणसाच्या जनुकीय इतिहासात कुठेतरी असायला हवे. कालांतराने त्या भाषा वेगवेगळ्या झाल्या असतील. चोम्स्कींचे म्हणणे असे नाही. वाक्यरचनांचे नियंत्रण करण्याची प्रणाली सर्वच मानवांमध्ये असते, असे त्यांचे म्हणणे आहे. भाषांचे मूळ एकच होते, असे त्यांनी म्हटलेले नाही.-सं. परंतु या सर्वांना बांधून ठेवणारे एखादे समान सूत्र असले पाहिजे. भाषेप्रमाणेच नीतिमत्तेसंबंधीसुद्धा अशाच प्रकारचे विधान करणे शक्य आहे. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हापासूनच – भाषाज्ञानाप्रमाणे – नैतिकतेचे व्याकरणसुद्धा त्याच्या मेंदूत भिनलेले असते. सर्व मानवप्राण्यांना सामावून घेणाऱ्या एखाद्या अबोध अशा तात्त्विक चौकटीत राहूनच आपली नैतिक वैचारिक पद्धती विकसित झाली असण्याची शक्यता आहे. त्यातूनच इतरांना मदत करायची की त्रास द्यायचा हे ठरत असावे. मात्र प्रत्येक संस्कृतीचे काही स्वतंत्र नियम असून त्यानुसारच कुणाला त्रास द्यायचा व कुणाला मदत करायची हे ठरवले जात असावे.

नीतिविषयीच्या आपल्या निर्णयामागे एखादी अबोध तत्त्वप्रणाली असू शकते, याला काही आधार आहे का?
आपण एक-दोन उदाहरणे घेऊन ही चर्चा पुढे नेऊ या. एक ढकलगाडी (ट्रॉली) रेल्वेच्या रुळावरून वेगाने येत आहे अशी कल्पना करा. त्यामुळे रुळाच्या मध्यभागी खेळत असलेल्या पाच मुलांच्या जिवाला धोका आहे. धोका टाळण्यासाठी ढकलगाडीला दुसऱ्या रुळावर ढकलू शकणाऱ्या झडप यंत्रणेपाशी आपण उभे आहात. दुसऱ्या रुळाच्या मध्यभागीसुद्धा एक मुलगी एकटीच खेळत आहे. आपण रूळ बदलल्यास त्या मुलीचा जीव जाईल. या प्रसंगात आपण काय कराल? पाच मुलांचा जीव वाचविण्यासाठी एका मुलीला बळी देणार, की पाच मुलांना तसेच वाऱ्यावर सोडून देणार? आपल्यापैकी बहुतेकांचा कल पाच जीव चविण्यासाठी एकीचा जीव घेतला तरी चालेल, असा असेल. अजून एक उदाहरण घेऊ या. एक सुदृढ व्यक्ती हॉस्पिटलच्या आवारात शिरताना बघून ड्यूटीवरील नर्स आपल्या वरिष्ठ डॉक्टरांना फोनवर सांगू लागली. “सर, आपल्या येथे आता पाच अत्यवस्थ रुग्ण आहेत. त्यांच्यातील निकामी अवयव काढून अवयवारोपण केल्याशिवाय त्यांना वाचवणे अशक्य आहे. एकाला मूत्रपिंड, दुसऱ्याला लिव्हर, तिसऱ्याला फुफ्फुस…. असे लागणार आहेत. आताच आपल्या हॉस्पिटलच्या आवारात एक धष्टपुष्ट अशी व्यक्ती शिरत आहे. जर तिला मारून तिचे अवयव काढून या रुग्णांवर शस्त्रक्रिया केली तर हे पाचही जीव वाचतील. कृपया आपण त्या व्यक्तीला मारण्यास अनुमती द्यावी.” जर तुम्ही डॉक्टरांच्या जागी असता तर तुमचे उत्तर काय असू शकेल?
वरील दोन्ही प्रसंगांमध्ये पाच जीव वाचण्याची शक्यता आहे. परंतु पहिल्या प्रसंगात एकाला मारून पाच (कोवळे) जीव वाचवण्यासाठी आपली पूर्ण संमती असेल. दुसऱ्या प्रसंगात मात्र पाच जीव वाचवण्यासाठी एकाला जिवानिशी मारण्यास आपला ठाम नकार असेल. सामान्यपणे जगभरातील बहुतांश लोकांचा निर्णय आपल्यासारखाच असेल. धर्म, भाषा, संस्कृती, शिक्षण, वय, लिंग, सामाजिक वा आर्थिक स्तर, करत असलेला व्यवसाय, इ.इ. कुठल्याही गोष्टीचा या प्रकारच्या निर्णयाला अडसर येणार नाही. तसा विचार करू लागल्यास या प्रकारच्या निकालाला कुठलाही तार्किक आधार नाही. आपण असे निर्णय का देत आहात, या प्रश्नाला आपल्यापाशी उत्तर नाही. म्हणूनच आपण सर्व एका अबोध अशा तत्त्वप्रणालीशी जखडलेलो आहोत. हीच तत्त्वप्रणाली आपल्या वर्तनावर सातत्याने नियंत्रण ठेवत असते. लहानपणापासूनच मेंदूमध्ये नैतिकतेचे धडे सामावलेले असतील, याला काही पुरावा आहे का?

खरे पाहता अजूनही आपण त्या निष्कर्षापर्यंत पोचलेलो नाही. परंतु पंधरा महिन्याचे मूलसुद्धा इतरांच्या खऱ्याखोट्या निष्ठेविषयी संवेदनशील असू शकते, असे एका अभ्यासाचे निष्कर्ष आहेत. नैतिकतेच्या संदर्भातील हा एक महत्त्वाचा दुवा आहे. इलियट टुरियल या जाणीवविषयक संशोधकाच्या मते सामाजिक प्रथा व नैतिक नियम यांच्यातील फरक लक्षात घेणे गरजेचे ठरेल. तीनचार वर्षांच्या मुलामध्येसुद्धा ही जाण असू शकते. यासाठी त्यांनी केलेले निरीक्षण मजेशीर आहे.

पहिलीच्या वर्गाचे शिक्षक वर्गात आल्या आल्या “आजपासून कुणाला काही प्रश्न विचारावेसे वाटल्यास हात वर करण्याची गरज नाही. उभे राहून पटकन प्रश्न विचारू शकता.” मुले “हो” म्हणाली. “वर्गात प्रश्न विचारण्यापूर्वी आपण नेहमी हात वर करतो. परंतु शेजारच्या राज्यातले तसे करत नाहीत. हे बरोबर आहे का?” मुले “असेल”, असे पुटपुटली. शिक्षकांचा शिस्तीचा बडगा, त्यांचा अधिकार व मुले ज्या संस्कृतीत वाढली ती, यांचा एकत्रित परिणाम मुलांच्या प्रतिक्रियेत उमटला असावा. अशा प्रतिक्रियेमागे कुठलेही तत्त्व नसेल. कदाचित सामाजिक परंपरा पाळण्याची ती एक रीत असेल. दुसऱ्या दिवशी तेच शिक्षक वर्गात आल्यानंतर म्हणाले, “तुमच्या शेजारी बसलेला मुलगा तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही त्याला खुशाल मारा. धक्काबुक्की करा.” मुले चपापली, घाबरली. शिक्षक असे काही सांगू शकतात याचे त्यांना आश्चर्य वाटले. शिक्षकाने ‘शेजारच्या राज्यातील मुलं असेच करतात’ असे म्हटल्यावर “ती मुले वेडी आहेत व शिक्षक असे सांगणार नाहीत’ अशी मुलांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. यावेळी शिक्षक म्हणून त्यांचा अधिकार मुले मान्य करत नाहीत. सामाजिक बंधन असल्यास त्याचे पालन करण्यास विरोध करतील. इतक्या लहान वयात नैतिक काय, अनैतिक काय याची जाण कशी येत असेल? मुळातच यात नैतिकता कुठली व सामाजिक रूढी कुठली हे त्यांच्या लक्षात कसे काय आले? मुलांच्या मेंदूत नेमके काय घडत असावे याचा अंदाज घेणे फार कठीण आहे. आपल्या मेंदूमध्ये उपजतच असलेले नीतिमत्तेचे संकेत (मॉरल कोड) उत्क्रांतीतील नैसर्गिक निवडीला कसे मदत करू शकले?

नीतिमत्तेसाठी अशा तत्त्वांचे पालन होत असण्याची शक्यता फार कमी आहे. सामाजिक सलोखा टिकून राहण्यासाठी व आपल्या अस्तित्वावरच गदा येऊ नये यासाठी म्हणून नीतिमत्तेकडून उसन्या घेतलेल्या या गोष्टी असाव्यात. मुळात नैतिकता सामान्यपणे काय करते? जाणते-अजाणतेपणा कुठून आला? जसा भाषेत येऊ शकतो तसा तो येथे आला आहे.

आपण दर वेळी माझ्याशी संवाद साधताना नाम, क्रियापद, कर्ता, कर्म, विशेषण, इत्यादी व्याकरणातील बारकाव्यांचा विचार करत वाक्यरचना करू लागल्यास एकच वाक्य बोलण्यासाठी कित्येक तास लागतील व आपल्यातील हा संवाद संपण्यासाठी १०-१२ वर्षे लागतील. परंतु आपल्या अजाणतेपणे भाषाज्ञान असल्यास आपल्याला जे सांगायचे आहे ते मेंदूला जास्त ताण न देता कसे तरी सांगून आपण मोकळे होतो. संवाद घडणे, आपल्याला जे सांगायचे ते दुसऱ्यापर्यंत पोचवणे, हे महत्त्वाचे असते. नैतिकतेविषयीसुद्धा असेच काही तरी घडत असावे. प्रत्येक नैतिक पेचप्रसंगी तर्क लढवत बसल्यास आपण कुठल्याही निर्णयाप्रत पोचू शकणार नाही. परंतु उपजत असलेली नीतिमत्ता अजाणतेपणाने मदतीला येऊन निर्णय घेण्यास भाग पाडते. यात विचार, तर्क इत्यादी गोष्टी बहुशः नसाव्यात. एक मात्र खरे की नैतिकतेतील हा लवचीकपणा मानवी समूहगटांना एकत्रितपणे बांधून ठेवण्यात काही मर्यादेपर्यंतच यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे जनुकीय लवचीकपणापेक्षा तो विशिष्ट समूहगट आपल्याला कितपत साथ देतो, यावर नैतिकतेची भिस्त असते. तुमच्याभोवती विरोधी गट असल्यास तुमच्या नैतिकतेला संधी मिळणार नाही. परंतु अनुकूल असलेल्या जनसमूहात तुमच्या नैतिक अधिष्ठानाला वजन प्राप्त होईल.

नोम चोम्स्कीच्या वैश्विक व्याकरणाच्या सिद्धान्ताचा आधार घेत वैश्विक नीतिसंकेतांच्या संकल्पनेची मांडणी आपण करत आहात. परंतु आपल्याच पुस्तकात वेगवेगळ्या संस्कृतींचे वेगवेगळे नीतिसंकेत असतात, असा उल्लेख आहे. उदाहरणार्थ काही समूहगट स्वतः ठरवलेल्या लैंगिक नीतिनियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्त्रियांना जिवे मारण्यास अनुमती देतात, सन्मानापायी हत्येची भलावण करतात, हे कसे काय?

आपण प्रथम प्रतिष्ठेपायी प्राण घेण्यावर लक्ष केंद्रित करू या. अमेरिकेचेच उदाहरण घेतल्यास भिन्नभिन्न संस्कृतीतून आलेल्या स्थलांतरित समूहगटांना सामावून घेतलेले हे राष्ट्र आहे. वेगवेगळ्या देशप्रदेशांतून हे समूह आले. वसाहती करून राहू लागले. स्कॉटिश व केल्टिक लोक, ज्यांचा पोटापाण्याचा मुख्य व्यवसाय गुरे राखण्याचा होता, अमेरिकेच्या दक्षिण भागात राहू लागले. उत्तरेकडील भूप्रदेशात बटाट्याच्या पिकावर गुजराण करणारे जर्मन वंशज राहू लागले. प्रत्येक वसाहतीची वेगवेगळी मानसिकता विकसित होत गेली. दक्षिणेकडील राज्यातील लोक त्यांची गुरे कुणी पळवल्यास आक्रमक होऊन गुरे चोरणाऱ्यांना मारून टाकण्यास सरसावत होते. परंतु तेथे बटाट्याची चोरी झाल्यास त्याचे काहीही वाटायचे नाही. उत्तरेत मात्र परिस्थिती वेगळी होती. शेतीचे उत्पन्न ही त्यांची संपत्ती होती. येथे बटाट्याची चोरी क्षुल्लक बाब नव्हती.

हीच मानसिकता (वा आक्रमकता!) एखाद्या संस्कृतीत स्त्रियांच्या बाबतीत असण्याची शक्यता असते. एखादा तिहाईत आपल्या बायकोबरोबर दिसल्यास त्या स्त्रीला जिवे मारण्यास समाजमान्यता असते. एवढेच नव्हे तर तशी सक्ती असते. मध्यपूर्वेतील देशांत व्यभिचारासाठी जबरदस्त किंमत मोजावी लागते. त्याचा संबंध सन्मानापायी खून याच्याशी जोडला जाऊ शकतो. यात त्या अपराधी स्त्रीला कोण मारतो, हा सर्वस्वी वेगळा प्रश्न आहे. बहुतेक वेळा व बहुतेक ठिकाणी हे कृत्य नवरा किंवा नवऱ्याचे नातेवाईक करत नसून त्या स्त्रीच्या माहेरचे कुटुंबीयच पुढाकार घेत असतात. प्रत्येक समाजगटाचे याप्रकारच्या क्रूरतेविषयी काही आखीव (नीती!) नियम असतात व अशा मुक्त परवान्याच्या चौकटीत कोण कुणाला मारतो हा प्रश्न अगदीच क्षुल्लक वाटू लागतो.

व्यभिचाराविषयी आपण भाष्य करत आहात. काही वेळा स्त्री एखाद्या अनोळखी व्यक्तीशी नुसती बोलली तरी प्रतिष्ठेपायी तिचा बळी घेतला जातो. उदार वातावरणात वाढलेल्या युरोप अमेरिकेतील स्त्रियांना हे अनाकलनीय वाटते. परंतु सन्मानापायी बळी घेण्याच्या संस्कृतीत ती हत्या नैतिकतेची ठरते. असे का? आपण पुन्हा एकदा भाषाज्ञानाचेच उदाहरण घेऊ या. आपण सर्व एक विशिष्ट भाषा बोलत असतो. उदाहरणार्थ आपली भाषा इंग्रजी आहे. इंग्रजी भाषेत सर्व निर्जीव वस्तूंचा उल्लेख नपुंसकलिंगी करतात. परंतु फ्रेंच भाषेत (व मराठीत) सजीवाप्रमाणे निर्जीव वस्तूसुद्धा लिंगसापेक्ष असतात. (मराठीत… तो तांब्या, ते ताट, ती वाटी… ) फ्रेंच भाषेतील हा लिंगभेद इंग्रजी भाषिकांना हास्यास्पद वाटतो. फ्रेंच भाषा विचित्र वाटू लागते. परंतु फ्रेंच (वा मराठी) भाषा खरोखरच विचित्र भाषा आहे का? नाही. फक्त ती एक वेगळी भाषा आहे.

भाषेचे हे उदाहरण चर्चित विषयाला तंतोतंत लागू होऊ शकेल. ‘व्यभिचार वा बेईमानीसाठी एखाद्याचा बळी घेणे हे अमानुष संस्कृतीचे लक्षण आहे.’ हे विधान ‘फ्रेंच भाषा अगदीच विचित्र भाषा आहे’ असे म्हटल्यासारखे होईल. इंग्रजी भाषिक फ्रान्स येथे जाऊन “मूर्ख फ्रेंच माणसांनो, निर्जीव वस्तूंमध्ये लिंगभेद करणे हा निव्वळ मूर्खपणा ठरेल. तुम्ही आता तुमची भाषा सुधारून आमच्यासारखी करा.” असे म्हणू लागल्यास फ्रेंच भाषिकांना काय वाटेल? ऐतिहासिक काळापासून एक संस्कृती दुसऱ्या संस्कृतीला दोषी ठरवत आली आहे. “सुंता करू नये, योनिशुचितेचा आग्रह धरावा, सैलसर कपडेच घालावेत. दाढी वाढवू नये, अमुक करावे, अमुक करू नये… जर तुम्ही असे काही करत असल्यास याद राखा, आमच्याशी गाठ आहे.’ अशी दमबाजी करण्याचा प्रकार अजूनही टिकून आहे. हे सर्व सांगण्यामागील उद्देश आपल्या लक्षात आले असेलच. वर्णनात्मक पातळी व आदेशात्मक पातळी यात फार मोठा फरक आहे. एखाद्या विशिष्ट संस्कृतीत वाढलेली माणसे ज्या प्रकारे वागतात — व त्या वर्तणुकीसाठी जीवशास्त्राचा आधार घेत असतात — ती पद्धत व त्यांनी असेच वागायला हवे, यासंबंधीचे आपले विचार, या दोन्ही अत्यंत भिन्न गोष्टी आहेत. भाषेतील बदलाप्रमाणे अशा गोष्टी असू शकतात, हे मान्य करायला हवे. * भाषेभाषेतील बारकावे व वेगवेगळ्या समाजांची (संस्कृतींची) खुनाची व्याख्या यांचा संबंध कसा काय जोडला जाऊ शकतो? खुनाची व्याख्या ही माणसाच्या वर्तणुकीतील अत्यंत मूलभूत अशी एक संकल्पना आहे. फ्रेंच भाषेतील लिंगभेदाचा अतिरेक वा इंग्रजी भाषेचा सोपेपणा यापेक्षा खून हा प्रकार गंभीर बाब आहे.

प्रत्येक समाजगटाची संवाद साधण्यासाठी एखादी भाषा असते. त्याचप्रमाणे प्रत्येक समूहाची स्वतंत्र अशी एक नैतिक व्यवस्था असते. प्रत्येक भाषेत व्याकरणाचे काही नियम असतात. कर्ता, कर्म, क्रियापद इत्यादी गोष्टी असतात. त्यांचा वापर कसा, कुठे करावा याबद्दल काही प्रथा ठरलेल्या असतात. तशाच प्रकारे समूहाच्या नैतिक व्यवस्थेत स्वतःचे काही नियम असतात. समूहाच्या अस्तित्वाच्या लढाईतून त्यांचा उगम व विकास झालेले असतात. कुणाला त्रास द्यायचा. कुणाच्या मदतीसाठी धावायचे, कुणाचा अपवाद करायचा, इत्यादींची रूपरेषा डोळ्यांसमोर असते. या गोष्टी भाषेतील कर्ता, क्रियापद इत्यादींप्रमाणे नैतिक व्यवस्थेत कार्य करत असतात.

माझ्या मते या गोष्टी अजूनही गृहीतकाच्या पातळीवर आहेत. यांविषयी संशोधन करण्यास भरपूर वाव आहे. निश्चित असे अजून आपण सांगू शकत नाही. एक मात्र खरे की अजून फार खोलात जाऊन विचार करण्याची गरज आहे. नैतिकता भाषेसारखीच आहे असे ठामपणे म्हणता येत नसले तरी एक रूपक (रपरश्रेसू) म्हणून त्याकडे बघता येईल. मुळात नीतिमत्ता ही एक सर्वस्वी वेगळी व्यवस्था आहे. या व्यवस्थेत काही अबोध, सुलभपणे हाती येऊ न शकणारे, तत्त्व असून त्याचा संबंध नीतिमत्तेशी जोडता येईल. हा काही प्राथमिक शिक्षणाचा विषय होऊ शकत नाही. परंतु मुलांना जसा भाषेचा खजिना उपजतच मिळत असतो, तशाच प्रकारे नैतिकतेचा खजिना मिळत असावा. हा खजिना उपजतच नसता तर मात्र प्रत्येक नैतिक पेचप्रसंगातून बाहेर पडण्यासाठी त्याच गोष्टीचा विचार करत बसावा लागला असता. इतर काहीही करायचे नाही अशी अवस्था झाली असती. * सर्व समाजगटांना सामावून घेऊ शकणारी सर्वसमावेशक अशी एखादी नैतिकप्रणाली असू शकेल का?

चांगल्याला चांगले व वाईटाला वाईट हा ‘जशास तसे’चा नैतिक नियम कदाचित सर्व संस्कृतीत सापडेल. “तुमच्याशी कुणी चांगले वागत असल्यास तुम्ही पण त्यांच्याशी चांगले वागा’ हा परस्पर सहकारभाव सगळ्या समाजगटांत प्रकर्षाने जाणवतो. “मला कुणी त्रास देत असल्यास त्याचा सूड घेणे’ ही प्रत्येकाची मानसिकता असते. दुसऱ्याने काही चांगले केल्यास आपणही त्याची परतफेड करावी, ही मानसिकतासुद्धा आपल्यात असते. कदाचित या गोष्टी माणूस उत्क्रांत होत असतानाच आलेल्या असाव्यात. काही प्राण्यांच्यामध्येसुद्धा परस्पर-सहकाराची भावना आढळते. मग ‘दुसऱ्यांना मारू नये’ ही गोष्ट जनुकीय असेल का? निश्चितच नाही. कारण यासाठी काही अटींचे पालन करावे लागते. आपण काहींना मारतो. सर्वांना नाही. या प्रकारच्या अटींकडे प्रत्येक समाजगटाचे अंतर्गत व/वा बाह्य वैशिष्ट्य म्हणून बघितले जाते. * नैतिक वर्तणुकीत धर्माचा सहभाग कितपत असू शकतो?

धर्माच्या पुरस्कर्त्यांना नेहमीच धर्म व नीतिमत्ता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे वाटत आले आहे. नास्तिकांना नीतिमत्ता नसते, ही त्यांची ठाम समजूत आहे. परंतु यात काही तथ्य नाही. या जगाच्या कल्याणासाठी नास्तिकांनीही खस्ता खाल्ल्या आहेत. त्यांचाही सहभाग फार मोठा आहे. यासंबंधात एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो. धार्मिक व नास्तिक यांच्यातील नैतिकतेच्या आकलनाची पातळी वेगवेगळी असू शकते का? याचे उत्तर निश्चितच ‘नाही’ असे असेल. * धार्मिक व नास्तिकांच्यातील नैतिक चिकित्सेची वस्तुनिष्ठ चाचणी घेतल्यास सामान्यपणे दोघांच्या उत्तरात फार फरक असणार नाही असे तुम्हाला वाटते का?
दोघांचीही उत्तरे सारखी असतील याविषयी मला शंभर टक्के खात्री आहे. यासंबंधी ज्यूडी थॉम्सन या तत्त्वज्ञानाच्या संशोधिकेने केलेली चाचणी मला आठवते. ‘आईच्या शरीरावर भ्रूणाचा हक्क असतो का?’ हा प्रश्न तिला सतावत होता. त्याच्या चाचणीसाठी तिने एक विचित्र अशा प्रसंगाची मांडणी केली होती. सकाळी झोपेतून जागे होत असताना हॉस्पिटलमध्ये एका प्रौढ स्त्रीला आपल्या शेजारी एक परपुरुष अर्धवट मूर्च्छितावस्थेत झोपला आहे हे लक्षात आले. तितक्यात एक डॉक्टर “मॅडम, आय अॅम व्हेरी सॉरी, तुमच्या शेजारी झोपलेला हा माणूस मोठा गायक आहे. परंतु त्याचे दोन्ही मूत्रपिंड खराब झाले आहेत. हा रुग्ण अत्यवस्थ असल्यामुळे आपली परवानगी न घेता रुग्णाला तुमच्या किडनीशी जोडून आम्ही तूर्तास त्याला जिवंत ठेवलेले आहे. तुमची हरकत नसल्यास पुढील नऊ महिने असेच ठेवणार आहोत.

त्यानंतर तो पूर्णपणे बरा होऊ शकेल.’ याविषयी लोकांना ‘हे नैतिकतेला धरून आहे का’ असे विचारल्यास “क्रेझी, अशी कधीच कुणावरही सक्ती करू नये’ असेच म्हणतील व ही कल्पनाच धुडकावून टाकतील. परंतु त्या स्त्रीने “मला या गायकाचे गाणे फार आवडते. आपण त्याला वाचवायला हवे. माझ्या किडनीशी खुशाल जोडा.” असे म्हटल्यास आपल्याला नक्कीच समाधान वाटेल. फक्त आपण तिच्यावर सक्ती करू नये एवढाच आपला आग्रह असतो.

दोनेक महिन्यानंतर ती स्त्री “हे मला झेपत नाही, मला त्रास होतो” असे म्हणत जोडलेले मूत्रपिंड काढून टाकण्यास भाग पाडते. आता मात्र लोकांची प्रतिक्रिया अगदीच वेगवेगळी असेल. ‘तिने तसे करू नये’, वा ‘तिने केलेले अगदी योग्य’, ‘अगोदर होकार का दिला’, ‘नऊ महिने भर्रकन निघून जातील’, ‘२७० दिवस…. का म्हणून सोसावे….’ असे अगदीच टोकाचे मतप्रदर्शन लोक करू लागतील. याच मंडळींना गर्भपाताच्या नैतिकतेविषयी विचारल्यास ‘भ्रूणहत्या निषिद्ध आहे’ असे म्हणू लागतील. परंतु अत्यंत वेगळ्या परिस्थितीतील वास्तव प्रसंगाची मांडणी करत त्यांच्या मनाचा वेध घेतल्यास कदाचित सगळ्यांची उत्तरे तीच असतील. यात धार्मिकतेचा प्रभाव अगदीच नगण्य असेल. * शेवटचा प्रश्न, माणसाव्यतिरिक्त इतर प्राण्यांमध्ये नैतिकतेची फॅकल्टी असू शकेल का?

दया, सहकार, उपचार, काळजी घेणे या गोष्टी काही प्राण्यांमध्ये नक्कीच आढळतील. परंतु प्रश्न असा आहे की प्राण्यांना याची जाणीव असते का? अशा गोष्टी ते जाणून बुजून करत असतात का? या प्राण्यांना इतर प्राणी चुकतात हे कळत असेल का? याचा शोध घेणे कितपत शक्य आहे, कसा घेता येईल, याची मला अजिबात कल्पना नाही.

[वरील दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरातील उदाहरणांपैकी एक उदाहरण मागे आसुत तपशिलात मांडले गेले आहे (जाने २००७, अंक १६.१० नैतिकतेचा अवयव, लेखक रॉबर्ट विन्स्टन). पण मार्क हाँसरची इतर मांडणी उद्बोधक आहे. – सं.] संदर्भ : डिस्कव्हरी, ऑक्टोबर २००७ ८, लिली अपार्टमेंट, वरदायिनी स.गृ.र.संस्था, पाषाण सूस रोड, पाषाण, पुणे ४११ ०२१.