पत्रसंवाद

प्रसन्न दाभोलकर, सातारा
आ.सु.च्या २००९ च्या अंकात श्री. कृ.अ.शारंगपाणी यांनी माझ्या लेखाबाबत दोन मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांचे उत्तर –
१) ‘माझ्या लेखात “मी आहे आणि माझे अनुभव आहेत.” हा व्यक्तिगत अनुभव ज्यामुळे शक्य होतो ते चैतन्यस्वरूप ब्रह्म’ असे वाक्य आहे. ‘हेही कळले नाही.’ असे श्री. शारंगपाणी लिहितात.
माझी भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो.
श्री. शारंगपाणी यांनी ‘हेही कळले नाही’ या वाक्याचा कर्ता दिलेला नाही. तो अर्थातच गृहीत आहे – ‘मी’. म्हणजे पूर्ण वाक्य ‘हेही मला कळले नाही’ असे होते. आता शारंगपाणींनी लेख वाचणे, त्यावर विचार करणे आणि त्यातला काही भाग कळला नाही या निष्कर्षावर येणे’ येथपर्यंतच्या क्रिया त्यांच्या मेंदूत घडल्या आहेत. परंतु त्यांचा अनुभव ‘मला कळले नाही’ असा आहे. किंबहुना आपल्या मेंदूची व त्यात रेणू आणि पेशीपातळीवर काही क्रिया त्यावेळी घडत होत्या या दोन्हींचीही जाणीव त्यांना नव्हती. हे सर्वच मानवांच्या बाबत घडते. माणसाच्या प्रत्येक अनुभवाशी त्याच्या मेंदूची एक स्थिती निगडित असते. परंतु माणसाला मेंदूच्या स्थितीची अजिबात जाणीव नसते तर ‘मला एक विशिष्ट अनुभव येत आहे’ अशी त्याला जाणीव असते. (उदा. मेंदूत दुःखाच्या संबंधित स्थिती निर्माण होते तेव्हा ‘मला दुःख होते.’) माणूस मेंदूपासून ‘मी’ ही उडी कशी मारतो असा प्रश्न आहे.
याची दोन मुख्य उत्तरे आहेत. पारलौकिक न मानणारे याचे उत्तर, ‘मज्जासंस्थेच्या विकासाच्या एका टप्प्यावर ‘मी’ ही जाणीव निर्माण होते; त्यासाठी भौतिक जगापेक्षा वेगळे काही मानण्याची गरज नाही’ असे देतात. ‘ब्रह्म’ या संकल्पनेचा (? वस्तुस्थिती) वापर करून हे उत्तर अधिक चांगल्या प्रकारे देता येते असाही दावा केला जातो. या दुसऱ्या दाव्याचे विवेचन उत्क्रांतिवादाच्या पार्श्वभूमीवर करण्याचा प्रयत्न माझ्या लेखात आहे.
२) चैतन्यस्वरूप नसणारे ब्रह्मही असते काय ? – नसते.