पत्रसंवाद

यमन गोखले, नागपूर.
आज आपण सर्व एकविसाव्या शतकात जगत आहोत. आजच्या विकसित तंत्रज्ञानामुळे आपले जगणे अधिकाधिक सुकर होत चालले आहे. ह्या तंत्रज्ञानाची आणि देववादाची सांगड भावनिक पातळीवर घालण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो. जसे एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला लागलेल्या विमानाचा शोध म्हटले तर आपला भारतीय म्हणतो, “ते काय सांगता ? त्या अमक्या तमक्या पुराणात देवाने विमानाचा वापर केला होता की!’ अशी धार्मिक ग्रंथांची उदाहरणे देऊन आधुनिक तंत्रज्ञानाला जणू काही आह्वानच दिले जाते. आणि तंत्रज्ञान आणि ज्ञान ही काय चीज आहे हे जाणून घेण्याचा मार्गच कुंठित केला जातो. तसेच डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धान्ताबाबतही घडते. अशीच बिनबुडाची उदाहरणे देऊन “तुमचा डार्विन आमच्या धर्मग्रंथासमोर काहीच नाही!” अशी मांडणी केली जाते, तेव्हा हसावे की रडावे असे कोणत्याही सुज्ञ माणसाला झाल्यावाचून राहणार नाही. आधुनिक राज्यकर्त्यांना भासेल की नाही हेही सांगता येत नाही.
येथील माणसाच्या मनावर परंपरागत विचारांचा जबरदस्त प्रभाव असल्यामुळे येथे विवेकवाद टिकत नाही. आगरकर, फुले, आंबेडकर, महर्षी कर्वे नाव घेण्यापुरते चालतात. त्यांची वैचारिकता येथे स्वीकारली जात नाही. स्वीकारणाऱ्यांचे प्रमाण फार नगण्य असेच आहे. वैज्ञानिक आणि वैचारिक ह्या गोष्टी एका विशिष्ट वर्गासाठी आहेत. तो त्यांचा प्रांत त्यांनी सांभाळावा आम्ही मात्र आमचा देव आणि पुराणवादी धार्मिकता यापलिकडे जाऊ शकत नाही. ह्या वास्तवतेमुळे आज आपल्या देशाचे केवढे मोठे नुकसान होत आहे हे आपल्या लक्षातच येत नाही असे नाही. परंतु असे वैचारिक क्रांतीला, विवेकवादाला वाहून घेतलेले बोटावर मोजण्याइतके आहेत. ते रस्त्यावर उतरू शकत नाहीत कारण ती त्यांची प्रवृत्ती नाही.
आशा एवढीच आहे, जे आपण थोडेथोडके आहोत त्यांनी आपली संख्या वाढवण्याचे प्रयत्न निरपेक्ष भावनेतून करावेत. सारी बंधने आणि पूर्वग्रह सोडून नीरक्षीरबुद्धीने समाजातून आपल्या रांगेत बसणाऱ्यांना निवडावे. त्यांना योग्य प्रशिक्षण द्यावे. आपला वसा पुढच्या पिढीत कालानुरूप संक्रमित करता येईल अशी व्यक्तिमत्त्वे घडवावी, अशी आशा आपणाकडून अपेक्षिते.