कसोटीचा दगड…… पाठराखा

“आपले मतभेद आहेतच, कधी तपशिलाचे, कधी तात्त्विक. तसे मतभेद तर असणारच, कारण दोघेही आपापल्या अनुभवांच्या, आकलनाच्या आधाराने मते घडवत आहोत. पण हे मतभेद संवादाला बाधा आणत नाहीत. उलट तपशीलवार संवादातून मतैक्य कुठेकुठे आहे, एकमेकांना पूरक भूमिका आहेत का, हे सारे प्रश्न सोडवता येतील. कृतीच्या पातळीवर ज्यात (भाषणे, लेखन हेही आलेच) तर नक्कीच मतैक्य भेटेल. तर तेवढी कृती एकत्र करू या; आणि ती करत असताना संवादही करत राहू या.”

भोळेसर आणि आजचा सुधारक चा छोटेखानी परिवार, यांच्या संबंधांचा पाया वरील परिच्छेदात आहे. त्यामुळेच तर भोळेसर आम्हाला सल्लागार म्हणून, विश्वस्त म्हणून, लेखक म्हणून, विशेषांकांचे अतिथि-संपादक म्हणून लाभत राहिले. फायदा बहुशः आमचाच!
वेगवेगळ्या विचारधारांमधला एकमेकांना पूरक भाग ठसवण्यावर भोळेसरांचा आग्रह कसा असायचा, आणि ते त्यासाठी कोणत्या दाचा, सचोटीचा व्यासंग वापरत, हे किशोर बेडकिहाळांच्या लेखात (आ.सु. फेब्रु.२०१०) उत्तम प्रकारे मांडले आहे. सामाजिक प्रक्रिया (ज्यांत विचारधारा घडणेही आले) नेहेमी चल, वूपराळल असतात; त्या कधीही स्थिर परिस्थितींना जन्म देत नाहीत, ही भोळेसरांची भूमिका तर मला आतपासून पटत असे. ते त्या भूमिकेपर्यंत मानव्यविद्यांच्या अभ्यासातून आलेले, तर मी कोलाहलशास्त्र-व्यामिश्रताशास्त्र या वाटेने आलेला; पण हीच भूमिका विवेकी आहे, हे दोघांनाही पटलेले होते.

तर गेली वीसेक वर्षे कसोटीचा दगड, पिवळपस लेरीव म्हणून ज्यांना आम्ही वापरत असू, ते भोळेसर अकालीच गेले. काही महिन्यांपूर्वीच त्यांना ‘औपचारिक विश्वस्तपद घेता का?’ असे विचारले. ते म्हणाले, “अरे? मी नाही आहे का, विश्वस्त?”. तर या पातळीचे भावनिक-वैचारिक ऐक्य साधलेला आमचा एक स्नेही, हितचिंतक, पाठराखा गेला.