आरोग्य आणि अंधश्रद्धा

आपण प्रत्येक घटनेचे कारण शोधतो. नको असलेल्या घटना टाळून हव्या असलेल्या घटना वारंवार घडविण्यासाठी ती पहिली पायरी आहे. घटनेच्या कारणशृंखलेतील आपल्या कुवतीचे दुवे शोधून त्यांवर नियंत्रण करण्याची आपली इच्छा असते. हे वर्णन विज्ञानाचे असले तरी उत्क्रांतीमुळे ते आपल्या स्वभावातच मुरले आहे.

अर्थात, उत्क्रांतीने मिळालेल्या इतर गुणांप्रमाणेच, कारण शोधण्याची कलासुद्धा अगदी प्राथमिक आहे. कुत्र्यांना अन्न देण्याच्या वेळेआधी इवान पावलॉव यांनी एक घंटानाद करण्याची सवय केली. रोज असा घंटानाद ऐकल्यानंतर निव्वळ घंटानाद ऐकूनच कुत्र्यांना लाळ सुटे. याचा अर्थ असा की सत्य सापडले नसले तरी वारंवार घडणाऱ्या काकतालीय न्यायावर (post hoc, ergo propter hoc) ठाम विश्वास ठेवण्याची सजीवांना सवय आहे. घटनेचे कारण इंद्रियगम्य नसले की उपजत सवयीने इतर कोणत्याही घटनेला कारण समजले जाते. त्यातून अंधश्रद्धेचा उगम होतो. कबुतरांना धान्याचा एकएक दाणा नियमितपणे देणारे एक यंत्र बी. एफ. स्किनर यांनी बनविले. दाणा मिळण्याच्या वेळेस कबूतर जी काही कृती करीत असे, तीच कृती कबूतर वारंवार करी. त्या कृतीच्या अपयशाच्या अनुभवांकडे कबूतर बरेचदा दुर्लक्ष करी. यास counting the hits and ignoring the misses ही सवय कारणीभूत आहे. नवस बोलूनही फायदा न झालेले लोक नशिबाला दोष देतात, पण फायदा झालेले लोक जाहिरात करतात, तसाच हा प्रकार आहे.

अंधश्रद्धा आणि चुकीच्या समजुती यांमध्ये थोडा फरक आहे. समजूत चूक असल्याची शक्यता नाकारणे, चर्चेस उत्सुक नसणे आणि तिला चूक ठरविणारा पुरावा सापडल्यानंतरसुद्धा समजूत न बदलणे, म्हणजे अंधश्रद्धा होय. परंतु, माहितीच्या महापुरात सर्वच पुरावा स्वतः तपासणे शक्य नाही. म्हणूनच, ‘प्रस्थापित’ विज्ञानाशी विपरीत अशा सर्व समजुतींना अंधश्रद्धा म्हटले पाहिजे. बंडखोर मत शास्त्रीय असल्याचे सिद्ध करण्याची संधी प्रत्येकाला देण्यात येते. परंतु, तसे मत योग्य विकल्प नसताना आपोआप (लू-वशषरीश्रीं) चूक ठरवून, सिद्ध करण्याचे ओझे (लीीवशप ष शीष) त्याच्या कैवाऱ्यांवर टाकले पाहिजे. पुरावा तपासून निष्कर्ष काढण्याची लोकांची क्षमता वेगवेगळी असू शकते. म्हणूनच, या लेखात अंधश्रद्धा आणि चुकीची समजूत या भेदाकडे दुर्लक्ष केलेले आहे.

अन्नग्रहण आणि पुनरुत्पादन यांच्याही आधी, स्वसंरक्षण हे सजीवांचे तातडीचे ध्येय असते. कदाचित म्हणूनच, अनेक अंधश्रद्धा या इजा, मृत्यू यांविषयी असतात. मोठ्या शत्रूपासून असलेला धोका (उदा. आग, दरी, शिकारी प्राणी, इ.) आपल्या उपजत वृत्तीला समजतो. घटनांची कारणे सूक्ष्म पातळीवरील असल्यास (उदा. रोगजंतू) मात्र ती हल्लीच इंद्रियगम्य झाली आहेत. म्हणूनही आरोग्यविषयक अंधश्रद्धांची व्याप्ती मोठी आहे (याच धर्तीवर एका सर्वेक्षणानुसार, मेकॅनिकल इंजिनिअरपेक्षा इलेक्ट्रिकल इंजिनिअर अधिक धार्मिक असतात १ि,२,३. बल, गति, तरफ, गुरुत्वाकर्षण, इ. नियम आपल्याला उपजतच समजतात. उलट, विद्युत्चुंबकीय शास्त्राचे, सापेक्षतेचे, पुंज यामिकीचे नियम ळपीळींळेपरश्र वाटत नाहीत. कदाचित त्यामुळेच त्यांना श्रद्धा ठेवण्याची सवय अधिक लागते का?). शिवाय, जीवशास्त्रात व्यामिश्रता असते. मर्यादित निरीक्षणांतून सुटसुटीत नियम बनविणे तेथे शक्य नसते. मर्यादित विचारक्षमता आणि स्मरणशक्ति वापरणाऱ्यांना सत्याऐवजी बटबटीत अंधश्रद्धाच हाती लागतील. रसायनशास्त्राचे नियम कमी व्यामिश्र असल्यामुळे लोकांनी स्वीकारले आहेत, रासायनिक किमयांचे (अल्केमी) मध्ययुगीन प्रयत्न आज कोणी गंभीरपणे घेत नाही. परंतु वैद्यकशास्त्राविषयी आजही अज्ञानजन्य भीती आहे. ‘पारंपरिक’, ‘नैसर्गिक’, ‘होलिस्टिक’, अशा जुनाट (किंवा आधुनिकोतर) संकल्पनांचे आकर्षण लोकांना आहे. अशा प्रकारे स्वभावाची घडण अंधश्रद्धांना पोषक आहे.

मानवी मेंदूवर संस्कृतीचासुद्धा पगडा बसू शकतो. रिचर्ड डॉकिन्स यांनी म्हटले आहे की इतरांवर, विशेषत: वडीलधाऱ्यांवर नि:शंक विश्वास ठेवणे हीसुद्धा एक उपजत प्रेरणा आहे. ‘नदीत मगरी आहेत’, ‘एवढ्या उंचीवरून उडी मारल्यास पाय मोडेल’, अशा विधानांची खुल्या मनाने तपासणी करणे लहान बाळाला परवडणार नाही. सर्वच मानवसदृश प्राण्यांना सरिसृपांचा तिरस्कार वाटत असला तरी नागांची आर्थिक उपयुक्तता निर्माण झाल्यावर (खांडववन जाळण्याच्या ‘शौर्य’गाथेकडे दुर्लक्ष करून) शेतकरी समाजांनी नागाची पूजा (प्रति अंधश्रद्धा) सुरू केली! मताविषयी शंका विचारण्यास बंदी करण्यासाठी परंपरा आणि धर्म या शब्दांचा फायदा होतो. म्हणूनच, गायत्री मंत्राच्या ध्वनिलहरींचे आरोग्यासाठी फायदे, तुळशीतून मिळणारा प्राणवायू, गोवऱ्यांचा धूर, शिवांबू, गोमूत्र, श्रावणीच्या दिवशीचे शेण खाणे, अशा दाव्यांवर लोक लगेच विश्वास टाकतात. डॉ. अंजली सोमण यांनी म्हटले आहे की “अंधश्रद्धांची जंत्री समाजापुढे टाकून चालणार नाही. समाज बुद्धिप्रामाण्यवादी झाला नाही तर जुन्या अंधश्रद्धा जातील आणि नव्या अंधश्रद्धा निर्माण होतील.” अतिदक्षता विभागात मोबाईल फोन वापरणे आधुनिक उपकरणांना अडचणीचे नसते याची माहिती अनेक डॉक्टरांनासुद्धा नसते. अल्पवयीन कुमारिकेशी संबंध ठेवल्यामुळे एचआयव्ही बरा होते ही नवी आफ्रिकन समजूत निर्माण होण्याचे कारण तर अनाकलनीय आहे.

‘खुल्या मनाने शंका घेणे’ या मनोवृत्तीस प्रतिष्ठा देणारी परिस्थिती निर्माण झाल्यावरही समाज चुकीच्या दिशेला जाऊ शकतो. आधुनिकोत्तरवादी स्टीव्ह फुलर यांच्या मते डॉक्टरांवर श्रद्धा ठेवण्यापेक्षा वैयक्तिक मते बाळगावी. त्यांच्या मते पुरावाधिष्ठित वैद्यक ही संकल्पना फसवी आहे कारण वैज्ञानिकांना सापडलेला पुरावा तपासूनही वैज्ञानिकांपेक्षा भिन्न निष्कर्ष काढण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. येथे ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर’ या वृत्तीचा हास होतो आहे असे मला वाटते. ‘प्रस्थापित मतांवर अविश्वास दाखविणे’ या भूमिकेतून कॉन्स्पिरसी सिद्धांत आणि छद्मविज्ञान इतके वाढले आहेत की ‘मेंदू बाहेर पडेल इतके खुले मन नसावे’ असे वैज्ञानिकांना म्हणावे लागत आहे. हि. गेल्या शतकात खऱ्या रेडियमने रंगविलेली रात्री चमकणारी घड्याळे लोकांनी वापरली. वापरकर्त्यांना याचा फारसा त्रास झाला नाही परंतु घड्याळाचे काटे आणि आकडे हाताने रंगविणाऱ्या कारागिरांना विषबाधा झाली कारण रंगाचे ब्रश ते (बहुधा स्त्रिया) जिभेने ओले करीत. आज दुसऱ्या टोकाला लोक मोबाईल फोनच्या ‘किरणोत्सर्गाला’आणि जनुकीय अभियांत्रिकीने बनविलेल्या वनस्पतींना घाबरतात तसेच फ्लू, मॅड काऊ, इ. रोगांच्या साथी आल्या की करोडो खाद्य-प्राण्यांना मारून टाकून देतात.

काही पुरोगामी लोकांच्या मते अंधश्रद्धा उपयुक्त असू शकतात. उदा. ‘तिळगुळामधून पुष्कळ ऊर्जा मिळते (उष्ण पदार्थ हे याच्याशी निगडित एक उपखूळ आहे) म्हणून मकर संक्रांतीला तिळगूळ खाण्याची प्रथा पाळावी.’ ते स्वतः वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगतात परंतु समाजाचे भले करणाऱ्या अंधश्रद्धांना त्यांची अनुमती असते. परंपरांच्या मर्यादा आणि नवीन ज्ञानानुसार बदलत राहण्याची गरज तिळगुळाच्या तथाकथित वैज्ञानिक प्रथेतून जाणवते. ज्यांनी संक्रांत साजरी करण्याची प्रथा पाडली ते पृथ्वीच्या परांचन गतीविषयी अनभिज्ञ होते. साधारण दर ७२ वर्षांनी मकर संक्रांत एक दिवस (ऋतुसापेक्ष आणि म्हणूनच ग्रेगोरिअन कॅलेंडरसापेक्ष) पुढे सरकते. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात संक्रांत १० जानेवारीस होती. पाच हजार वर्षांपेक्षा कमी काळात सनातनी लोकांना उन्हाळ्यात तिळगूळ खावा लागेल. त्याच धर्तीवर, आदिवासींची सर्वोच्च देवी दंतेश्वरी हिच्या नावे पत्रके काढून डॉ. बंग आरोग्यविषयक संदेश देतात. परंतु श्रद्धा हे फारच बेभरवशाचे हत्यार आहे. दंतेश्वरीच्या आदेशामुळे लसीकरणाला तयार होणाऱ्या आदिवासींना उद्या दंतेश्वरी देवी किंवा बिरसा मुंडा (स्वातंत्र्यसैनिक आणि ‘प्रेषित’) यांच्याकडून लोहमार्गातील फिशप्लेट काढणे, विजेच्या पायलॉन पाडणे, भूसुरुंग पेरणे, इ. आदेशसुद्धा मिळू शकतात. बाल आरोग्य अपत्यांच्या आरोग्याविषयी पालक विशेष चिंतित असणे स्वाभाविक आहे. म्हणूनच बाल आरोग्याविषयक अंधश्रद्धा खूप आहेत. काविळीसाठी चटके देणे, गाठींची माळ गळ्यात घालणे किंवा लोणावळ्याला जाऊन नाकात दोन थेंब औषध टाकणे पिं, मनोरुग्णांना भूतबाधा काढण्यासाठी नेणे, श्वान किंवा सर्पदंश यांवर मंत्र टाकणे, दम्यासाठी जिवंत मासा गिळणे, पोलिओच्या रुग्ण मुलाला कमरेपर्यंत उकिरड्यात पुरणे, इ. अंधश्रद्धा बऱ्याच प्रचलित आहेत. आरोग्यविषयक अंधश्रद्धा सुशिक्षितांमध्ये सुद्धा असतात. मानवी शरीररचना मांसाहारास अनुकूल असल्याचे नाकारणे, काविळीच्या रुग्णाला स्निग्ध पदार्थ न देणे किंवा विषमज्वराच्या रुग्णाची उपासमार करणे असे प्रकार सुशिक्षितांमध्येसुद्धा होतात. ‘लहान मुलांना प्रथिनांची गरज असते’ एवढीच माहिती असलेले सुशिक्षित लोक सकस आहाराऐवजी महागड्या डब्यांतील चमचाभर प्रथिने दुधात घालतात. सूर्यग्रहणाला लोक घाबरतात, विशेषतः त्याच्या गर्भावरील परिणामांबाबत अत्यंत भीती आहे. गोवर, गालगुंड, रुबेला यांच्याविरुद्ध दिल्या जाणाऱ्या एका लसीमुळे ऑटिझम होत असल्याचा चुकीचा निष्कर्ष १९९८ साली एका सर्वेक्षणाने बारा मुलांच्या अभ्यासातून काढला. त्यास प्रसिद्धिमाध्यमांनी प्रचंड महत्त्व दिले. परिणामतः पाश्चात्त्य देशांमध्ये लाखो लोकांनी ही लस नाकारली. फॅमिली डॉक्टरांनी खात्री देऊनसुद्धा लोकांनी त्यांच्या अंतर्मनाच्या शंकांना दुजोरा देणाऱ्या प्रसिद्धिमाध्यमांवर विश्वास ठेवला. २००८ साली डांग्या खोकल्याविरुद्धच्या लसीविषयी अशाच अफवा पसरल्या होत्या दि. मरीआई किंवा ‘देवी’ला घाबरणाऱ्यांपेक्षा हे लोक श्रेष्ठ कसे?

लाख रुपयांच्या चुंबकीय गादीच्या साखळी पद्धत विक्रीतंत्रातील गैरव्यवहाराच्या बातम्या येतच असतात. नीलगिरी आणि तुळस स्वाईन फ्लूवर उपयोगी असल्याच्या अफवा ई-मेल आणि एसएमएसद्वारे राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्राच्या नावे पसरल्या होत्या Gि. अशा अफवा पसरवणे अंधश्रद्धेचे लक्षण असले तरी त्या तयार करणे हा पद्धतशीर खोडसाळपणा आहे आणि त्यामागे धार्मिक बांधिलकी दिसते.
पुस्तके अति वाचनाने आणि विशेषत: पुस्तके डोळ्याजवळ धरल्यामुळे चष्मा ‘लागतो’ अशी समजूत आहे. वस्तुस्थिती अशी आहे की ज्या मुलांची दृष्टी अधू असते ती मुले खेळ टाळून पुस्तके वाचण्यास सुरू करतात. डोळ्याजवळ पुस्तके धरून वाचल्यामुळे ‘चाळिशी’ प्रकारचा चष्मा लागण्याची शक्यता वाढते हे मात्र खरे आहे.

वैद्यकक्षेत्र
‘आज कमी रुग्ण येत आहेत’ अशा अर्थाचे वाक्य उच्चारल्यास गुंतागुंतीच्या समस्या असलेले अनेक रुग्ण येतात असे पाश्चात्त्य देशांत रात्रपाळी करणाऱ्या अनेकांना वाटते. ‘काम कमी येईल’ अशा अपेक्षेने पुस्तके किंवा गाणी ऐकण्याची तयारी केल्यास खूप काम येते, स्टेथोस्कोप, रुग्णांच्या गाद्या, इ. शुभाशुभ असू शकतात असेही त्यांना वाटते. रात्रपाळीत झोपेसाठी कमी वेळ मिळतो म्हणून काहीजण स्वत:ला कमनशिबी समजतात. असे डॉक्टर कमी कार्यक्षम किंवा कमी निष्काळजी असल्यामुळे नेहमीचीच गर्दी तपासण्यासाठी त्यांना अधिक वेळ लागतो.

चंद्राच्या कलांचा सजीवांवर परिणाम होतो हे निर्विवाद आहे. परंतु, ‘मासिक’ पाळी २९ दिवसांची असते याचे मूळ चंद्राशी संबंधित होते की नाही याची अजून खात्री नाही, आणि मानसिक रोगांचा चंद्राच्या कलांशी संबंध नसल्याचे सिद्ध झालेले आहे. शहरांमधील अपघातांचा पौर्णिमेशी संबंध नसल्याचे सिद्ध होऊनसुद्धा तशी समजूत अनेक परिचारिकांना असते .

रक्तदानाविषयी लोकांना भीती वाटते हे जरी सत्य असले तरी रक्तदानाचा प्रचार करणाऱ्या पत्रकांमध्ये “it proves to be a healthy habit that helps blood renewal” असा दावा करून सरकार लोकांची फसवणूकच करते . पोटातील कृमींविषयी जगभर अंधश्रद्धा आहेत. गोड पदार्थांनी जंत होतात असे जगभरात अनेक लोकांना वाटते, तर सातवा मुलगा रेबीजपासून जंतांपर्यंत सर्व रोग बरे करू शकत असल्याचे आयरिश परंपरेमध्ये मानतात. जंतांमुळे अपस्माराचे झटके येण्याची शक्यता अगदीच कमी असली तरी भारतात अनेक सुशिक्षित पालक आणि डॉक्टरसुद्धा अपस्मारासाठी जंत ही शक्यता मानून त्यावर उपचारात वेळ घालवतात.

काचेच्या वातानुकूलित इमारतीमध्ये चकचकीत फरश्या घातलेल्या आधुनिक खोल्यांमध्ये बसणारे सुटाबुटातील डॉक्टर इतरांपेक्षा अधिक चांगले असतात, हीसुद्धा अंधश्रद्धाच आहे. डॉक्टरांची आणि रुग्णांची वागणूक शक्य तेथे सामाजिक मनोवृत्तीनुसार बदलते आणि औषधे, शस्त्रक्रिया, शुश्रूषा, अशा सर्वच क्षेत्रांत खर्च वाढतो पण अतिरिक्त उपचारांच्या दुष्परिणामामुळे आरोग्य खालावते. रुग्णालयाच्या नफ्यामध्ये डॉक्टरांचे आर्थिक हितसंबंध असले की अशी शक्यता वाढते .पंचवीस लाख रुपयांची पदवी, एक कोटी रुपयांचे पदव्युत्तर शिक्षण आणि काही कोटी रुपयांचे पॉलिक्लिनिक अशी गुंतवणूक करणारा ‘रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट’ बघणारच !

वैकल्पिक उपचार
वैकल्पिक उपचार या नावाखाली अनेक अंधश्रद्धा संघटित झालेल्या आहेत. वैकल्पिक उपचारपद्धतींच्या लोकप्रियतेचे एक कारण म्हणजे प्लॅसिबो परिणाम आहे. एखाद्या रुग्णावर विश्वासातील व्यक्तीने किंवा पांढऱ्या कपड्यांतील रुबाबदार व्यक्तीने औषधोपचार करण्याचा किंवा आधुनिक दिसणाऱ्या एखाद्या उपकरणाने ‘शस्त्रक्रिया’ करण्याचा देखावा केला तरीसुद्धा रुग्णाला ‘बरे वाटते’.अशिक्षित लोकांना सुई टोचली तरी आनंद होतो. अर्थात, कोणाचा तुटलेला अवयव उगवत नाही, परंतु वेदना, दमा, आम्लपित्त’, उच्चरक्तदाब, इ. समस्यांचे थोडेफार शमन होते. प्लॅसिबो परिणाम होण्याचा एक मार्ग म्हणजे विश्वासामुळे मेंदूमध्ये निर्माण होणारी अफूसारखी रसायने होय.

वैकल्पिक पद्धतींविरुद्ध जेव्हा प्लॅसिबो परिणामाचा वापर करण्याचा दावा करण्यात येतो तेव्हा प्रतिवाद केला जातो की ‘जर रुग्णाला बरे वाटत असेल, तर या उपचारांचा वापर करण्यात अडचण काय आहे ?’ परंतु, प्लॅसिबो फायदा होतो असे बहुतेक सर्व रोग क्षुल्लक आहेत. दुसरी अडचण म्हणजे प्लॅसिबो परिणामासाठी रुग्णाला अज्ञ ठेवणे आवश्यक असते. न्यायवैद्यकीय नियमांनुसार, रुग्णावरील उपचारांची सर्व माहिती रुग्णाला देणे आवश्यक आहे, परंतु प्लॅसिबो औषध वापरल्याची जाणीव रुग्णाला झाल्यास प्लॅसिबो परिणाम बंद पडतो. उदा. प्लॅसिबो उपचार स्वत:वर करता येत नाहीत. तिसरा धोका असा की प्लॅसिबो परिणाम उलट दिशेलासुद्धा होऊ शकतो. ख्रिश्चनधर्मी टेम्पलटन प्रतिष्ठानाला असे आढळले की ज्या ख्रिश्चन हृद्रोग्यांना बरे वाटावे अशा आशयाची प्रार्थना देवाकडे करण्यात आली त्यांच्या शस्त्रक्रियेत गुंतागुंत होण्याची शक्यता इतर रुग्णांपेक्षा अधिक होती. यावर भाष्य करताना मायकेल शर्मर यांनी अशी शक्यता वर्तविली की ‘माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करण्याची वेळ आली याचा अर्थ माझे आरोग्य खूपच खराब असेल’ अशा विचाराने रोग्यांवर नोसिबो परिणाम झाला. चौथा मुद्दा असा की शास्त्रीय औषधपद्धतीमध्ये कोणत्याही औषधाचा परिणाम मोजताना रुग्णांवरील प्लॅसिबो परिणाम वजा करण्याची योजना असते. ज्या औषधाचा परिणाम मोजावयाचा असेल ते औषध काही रुग्णांना देण्यात येते तर काही रुग्णांना रिकामी औषधे देण्यात येतात. कोणत्या रुग्णाला खरी औषधे दिली ते रुग्णांची प्रगती मोजणाऱ्या डॉक्टरांनासुद्धा माहिती नसते. अशा रीतीने प्लॅसिबो परिणामाला शून्य मानून (षषीशी) शास्त्रीय औषधांचा परिणाम मोजला जातो. प्लॅसिबो आणि वास्तव औषध यांच्या किमतीतील फरक जर त्यांच्या परिणामरूपी फायद्यांतील फरकापेक्षा कमी असेल तरच औषधांनाच मान्यता मिळते. प्रेमळ डॉक्टरमुळे जो शुद्ध प्लॅसिबो परिणामरूपी फायदा होत असेल त्यापेक्षा कितीतरी अधिक फायदा प्रेमळ डॉक्टरने दिलेल्या वास्तव औषधाचा होईल. डॉक्टरने प्रेमाने वागावे ही मागणी रास्त असली तरी प्लॅसिबो परिणामासाठी त्याचा पुरस्कार करणे चूक आहे.
वैकल्पिक वैद्यकाला पारंपरिक वैद्यक असेसुद्धा संबोधिले जाते. गंमत म्हणजे परंपरा हा शब्दच अपरिवर्तनीयता आणि पर्यायाने अशास्त्रीयता दर्शवितो. ‘पारंपरिक ते चांगले’ ही अंधश्रद्धा आहे. वैकल्पिक उपचारपद्धतींचे दुष्परिणाम नसतात असा दावा करण्यात येतो. परंतु आयुर्वेद किंवा युनानी वैद्यकामध्ये सांगितलेल्या एरंड (ली), धोतरा आणि जमालगोटा (लौंप) सारख्या जालीम विषांमुळे अनेकांचा जीव गेलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार जगातील ८० टक्के लोक रोगप्रतिबंधासाठी वैकल्पिक उपचारपद्धती वापरतात. प्रत्येक समाजामध्ये पारंपरिक उपचारपद्धति असते. त्यांपैकी प्रमुख प्रकारांची ओळख करून घेऊ.

आयुर्वेद, योग, प्राणायाम, निसर्गोपचार, इ.
आयुर्वेद या विषयावर मी सप्टेंबर २००६ च्या सुधारकच्या आरोग्य विशेषांकामध्ये सविस्तर लिहिले आहे. त्या विशेषांकाच्या अतिथी संपादकांनी माझ्या विचारांवर टीका करण्यासाठी जे लेख आमंत्रित केले होते ते माझा लेख नीट न वाचताच लिहिलेले होते. म्हणून माझा लेख आणि त्यावरील टीकेचा प्रतिवाद यांचा काही भाग येथे देत आहे.

औषधशास्त्र हे वैद्यकशास्त्रावर अवलंबून असते. आयुर्वेदामध्ये नमूद काही उपचारांचे आयुर्वेदामध्ये नमूद उपयोग सिद्ध झाले तरी त्या आयुर्वेदिक पद्धती शास्त्रीय ठरत नाहीत. (मुडदूस झालेल्या बाळाला देवळाबाहेर ठेवल्यामुळे त्याचा मुडदूस बरा झाला तर श्रेय सूर्यप्रकाशाला मिळावे, मांत्रिकाला नव्हे). शरीरप्रक्रियाप्रणाली (physiology), रोगोद्भवाची कारणे आणि मार्ग, औषधांचा परिणाम होण्याची पद्धत, इ. अनेक आयुर्वेदिक गृहीतके चूक आहेत. दोष, धातु, रस इ. काल्पनिक संकल्पनांचे अस्तित्वसुद्धा सिद्ध झालेले नाही. त्यामुळे औषधे आयुर्वेदिक सिद्धांतांना अनुसरून परिणाम करीत असल्याचा पुरावा मिळणे शक्य नाही. औषधांच्या शोधाचे श्रेय देण्यास ऐतिहासिक, भावनिक, आर्थिक महत्त्व असले तरी वैज्ञानिक महत्त्व नाही. क्रोसिनला ग्लॅक्सोस्मिथक्लाइनिक किंवा सिप्रोला सिप्लिक म्हणत नाहीत (ग्लॅक्सोस्मिथक्लाइन व सिप्ला ह्या कंपन्यांना श्रेय दिले जात नाही). आयुर्वेदामध्ये नमूद पदार्थांचे आयुर्वेदामध्ये नमूद नसलेले उपयोग सिद्ध झाले तर त्याचे श्रेयसुद्धा आयुर्वेदाला नसावे. ‘आयुर्वेदाचा मुघल आणि ब्रिटिशांमुळे ह्रास झाला’ असे रडगाणे गाणारे विसरतात की आयुर्वेदाला राजाश्रय होता तेव्हासुद्धा लोकांचे (आणि राज्यकर्त्यांचे) सरासरी आयुष्यमान ३५ वर्षे होते. सत्ताधीशांच्या विरोधाला झुगारून विज्ञानाने प्रगती केली. उपयुक्तता असती तर आयुर्वेदाचासुद्धा प्रसार झाला असता.

केईएम रुग्णालयामध्ये वैज्ञानिक पद्धतींनी आयुर्वेदिक औषधांचा अभ्यास करतात. त्यांना २७ टक्के औषधांमध्ये मानवनिर्मित स्टीरॉईड सापडली. विषारी धातूंचा तपास करताना त्यांना असे आढळले की ८० टक्के औषधांमध्ये शिसे, ७४ टक्के औषधांमध्ये पारा आणि ७६ टक्के औषधांमध्ये आर्सेनिक होते १ि. डॉ. शरदिनी डहाणूकर आणि डॉ. रवि बापट या आयुर्वेदप्रेमी वैज्ञानिकांनी स्थापलेल्या संस्थेचे हे आकडे आहेत. आयुर्वेदानुसार, पाप्म या प्रकारचे रोग पूर्वजन्मातील पापांची शिक्षा म्हणून होतात. त्यांचा उपचार करणे हे देवाच्या इच्छेला आव्हान ठरेल. कदाचित म्हणूनच त्या रोगांवर आयुर्वेदात इलाज सांगितलेला नाही. तुकारामाने म्हटले आहे की ‘पूर्वजन्मती पापें ती येती रोग रूपें न जाती वैद्याचेनी बापें१ि२. कर्मविपाक सिद्धांत समाजाला निराशावादी बनवितो.

आयुर्वेदातील पुंसवन विधीने म्हणे गर्भाचा लिंगबदल होतो. गर्भसंस्कारासारख्या निराधार विधीच्या सी.डी. डॉ. स्नेहलता देशमुख बनवितात. दुसऱ्या टोकाला, काही स्त्रीवादी लिखाणात असा दावा केला जातो की मुलगी होण्यात पतीचा दोष असतो कारण ‘य’ गुणसूत्र पुरविण्याची जबाबदारी त्याची असते. परंतु पहिला मुद्दा असा की या युक्तिवादाने ‘मुलगी जन्मणे’ ही वाईट घटना असल्याच्या पुरुषकेंद्री दाव्याला मान्यता मिळते. दुसरे म्हणजे वास्तविकरीत्या पुरुष दोन्ही प्रकारचे शुक्राणू पुरवितो. अंडाणूपर्यंत सर्वप्रथम कोणत्या प्रकारचा शुक्राणू पोहोचेल ते यदृच्छेने ठरत असले तरी ते स्त्रीच्या शरीरात घडते. ‘य’ गुणसूत्रधारी शुक्राणू अधिक वेगवान असतो. शुक्राणूंना ‘धावायला’ अधिक अंतर पुरविल्यावर ‘य’ गुणसूत्रधारी प्रकारच्या शुक्राणूद्वारे फलन घडण्याची शक्यता वाढल्यास आश्चर्य नसावे. शुक्राणूंवर गर्भाशयातील स्राव, आम्लता, इ. स्त्रीशरीरातील घटकांचा परिणाम घडतो. स्त्रीवाद्यांना विरोध करणे हा येथे हेतु नसून मुद्दा असा आहे की कोणताही इतर वाद आला की बुद्धिप्रामाण्यवादाकडे दुर्लक्ष होते.

प्रत्येक नवे वैज्ञानिक औषध शोधण्यासाठी अब्जावधि रुपये खर्च येतो. औषधकंपन्यांच्या स्वार्थामुळे वैज्ञानिक वैद्यक महाग आहे हे अर्धसत्य आहे. झंडू, डाबर, रामदेव, हिमानी, विप्रो, हिमालया, अशा सर्वांचे ध्येयसुद्धा भरमसाठ नफाच आहे. तेसुद्धा शाहरुख, बच्चन यांना घेऊन जाहिरातींचा झगमगाट करतात. आयुर्वेदात नमूद नसलेल्या औषधांवर ‘आयुर्वेदिक’ असा शिक्का मारून करांतून सवलत मिळविली जाते.

योग या शब्दाचा संबंध आत्मा आणि ब्रह्म यांच्या एकरूपतेशी आहे. आज योगाचे दोन प्रकार प्रचलित आहेत. पतंजलीच्या अष्टांग योगामध्ये आसन आणि प्राणायामाचा उल्लेख असला तरी सर्व भर संयम, यम, नियम, ध्यान, धारणा आणि समाधी यांद्वारे मानसिक समाधान मिळविण्यावर आहे. विचार न करण्याची ती स्थिती अनेकांना आवडते. आत्मा ही संकल्पनाच निराधार असल्यामुळे योगाचे सर्वच सिद्धांत आणि दावे गैरलागू आहेत. श्वसनाच्या व्यायामांमुळे श्वसनाचे स्नायू बळकट होतात तसेच सर्वच स्नायूंना कमी ऑक्सिजनमध्ये काम करण्याची क्षमता मिळते. परंतु ध्यानामुळे मिळणारे मानसिक समाधान हा बहुतांशी प्लॅसिबो परिणाम आहे. शांत बसून थोडीफार विश्रांतीसुद्धा मिळते. आजची लोकप्रिय आसने आणि प्राणायाम पंधराव्या शतकामध्ये नाथ संप्रदायाने लिहिलेल्या हठ योगामध्ये सापडतात. ध्यानासाठी (किंवा हल्ली केवळ आरोग्यासाठी) शरीर ‘शुद्ध’ करणे हे त्याचे ध्येय आहे. त्यासाठी षट्कर्म, आसने, चक्रे , नाडी, कुंडलिनी, शक्ति, अशा अनेक निराधार संकल्पनांची माहिती दिली आहे. आसने करून शरीरास लवचिकता मिळते परंतु त्यासाठी लागणारी ऊर्जा कमी असल्यामुळे फारसा व्यायाम होत नाही. काही आसने निरुपयोगी आहेत तर काहींमुळे शरीरास इजा सुद्धा पोहोचू शकते.
श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यक्रमात सुदर्शन क्रिया नावाचा प्राणायामाचा प्रकार शिकविला जातो. बहुतेकांना पहिल्या प्रयत्नातच तीव्र भावना, हातापायांना मुंग्या येणे, भान हरपणे, शरीराचे स्नायू आखडणे, इ. विस्मयकारक अनुभव येतात. वेगाने श्वासोच्छ्वास करण्याचा अंतर्भाव असलेल्या या क्रियेमुळे शरीरातील कर्बद्विप्राणिल वायूचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मेंदूचा रक्तपुरवठा कमी होतो तसेच रक्तातील कॅल्शियम निष्क्रिय बनून मज्जासंस्था उद्दीपित होते. या अनुभवाचे काहीजणांना व्यसन लागते. परंतु सुदर्शन क्रियेचा काहीही उपयोग सिद्ध झालेला नाही. उलट आजारपणाच्या काठावर असलेल्यांना ती घातक ठरू शकते. नवरात्रीत घागरी फुकतात त्यामागचे स्पष्टीकरणही असेच आहे.

निसर्गोपचार या नावाने उपचार करणाऱ्या अनेक पॅथी आहेत. पाश्चात्त्य नॅचरोपॅथीमध्ये मानवनिर्मित औषधांचा वापर टाळण्यावर भर असतो. परंतु शरीराच्या नैसर्गिक क्षमतेने बरे होण्यासाठी डॉक्टरला पैसे कोण देईल ? म्हणून निसर्गोपचाराच्या तत्त्वांसोबत होमिओपॅथी, रोमाथेरपी, अॅक्युपंक्चर, ओझोन थेरपी (अतिनील किरणांना अडविण्यासाठी उंच आकाशात ओझोन आवश्यक असला तरी फुप्फुसांसाठी तो एक प्रदूषक वायू आहे), इ. वाटेल ते उपचार केले जातात. भारतीय सरकारपुरस्कृत निसर्गोपचार पद्धतीच्या मते कोणत्याही रोगाचे मूळ कारण जीवाणू नसून ते जमणे हे रोगी शरीराचे एक लक्षण आहे २ि.! या पद्धतीमध्ये पाणी, आहार, हवा, उष्णता, माती, लोहचुंबक, रंगीत प्रकाश, यांचा वापर केला जातो. पारंपरिक ते चांगले अशी अनेकांची ठाम समजूत असते. आशिया खंडातील ९० टक्के लोकांना दुग्धशर्करा पचत नाही हे आर्यसंस्कृतीचा अभिनिवेश असणाऱ्यांना माहिती नाही. दूध आणि मासे, दूध आणि केळे अशा अनेक जोड्यांचे सेवन न करण्याची समाजात पद्धत आहे. आहाराचे सात्त्विक, तामसिक असे प्रकार असतात. पाश्चात्त्य लोक आयुष्यभर ब्रेड खातात. मैद्याची रोटी मैद्याच्या ब्रेडपेक्षा चांगली कशी? सिगरेटवर धोक्याचा इशारा छापण्याची मागणी करणारे चीज आणि लोण्यामुळे होणाऱ्या हृद्रोगजन्य मृत्यूंकडे दुर्लक्ष करतात. शिवाय भारतीय संस्कृतीमध्ये तेलापेक्षा अधिक प्रतिष्ठा संपृक्त अशा तुपाला आहे. उपवास या शब्दाचा मूळ अर्थ आहे ‘देवाच्या जवळ जाणे’. परंतु ‘पचनसंस्थेला विश्रांतीची गरज असते’ हे मत साशंकतेला विश्रांती दिल्यामुळे स्वीकारले जाते. उपासाच्या नावाखाली साबुदाणा, भुईमूग आणि बटाटा अशा परदेशी पदार्थांचे सेवन केले जाते, तर एरवी औषधी समजले जाणारे लसूण आणि हळद वर्ण्य असतात.

शीतपेयांमध्ये कीटकनाशके सापडल्याच्या बातम्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. शीतपेय-निर्मात्या कंपन्या जाणूनबुजून बाटलीमध्ये कीटकनाशके घालीत असण्याचा संशय घेण्याचे काही कारण नाही. शीतपेयांसाठी उचललेल्या पाण्यात कीटकनाशके नसल्याची काळजी न घेणे हा त्यांचा निष्काळजीपणा जरूर आहे. परंतु तसलेच दोन तीन लिटर पाणी दररोज पिण्यामुळे शीतपेय कारखान्यांच्या आसपासच्या रहिवाशांना जो त्रास होत असेल त्यापेक्षा शीतपेये सुरक्षितच राहतील. शीतपेयांची भीती इतकी पराकोटीला गेली होती की फाऊंटन शीतपेये (ज्यांचे पाणी शहरातीलच असते) पिणेसुद्धा लोक टाळत असत. त्याऐवजी फळांचे रस विकणारी दुकाने उघडली गेली. परंतु फळांच्या रसात आरोग्यदायक काय आहे? कीटकनाशकांची शक्यता फळबागेतसुद्धा आहे. किंबहुना, जैविक संपृक्तीकरण (लळे-रलीजीश्ररींळेप) या प्रक्रियेमुळे अन्नसाखळीमध्ये कीटकनाशकांचे प्रमाण वाढत जाते. पाण्यापेक्षा वनस्पतींमध्ये (आणि वनस्पतींपेक्षा प्राण्यांच्या दुधात) कीटकनाशके वाढतात म्हणून डीडीटी सारख्या ‘सर्वांत सुरक्षित’ रसायनावर निर्बंध आले. फळांच्या रसांत शीतपेयांच्या एक ते दीडपट साखर असते. फळांतून आतड्यांना सारक तंतू मिळतात, तसे फळांच्या रसांतून मिळत नाहीत. फळांच्या रसांतून ब आणि क जीवनसत्त्वे तसेच क्षार आणि अॅन्टिऑक्सिडंट मिळतात परंतु निरोगी लोकांना सामान्य आहारातून ती पुरेशी मिळतात. (दोन वेळा नोबेल पुरस्कार विजेते लायनस पॉलिंग यांनी उतारवयात, सर्दीपासून कर्करोगपर्यंत अनेक रोगांसाठी क जीवनसत्त्वाच्या ‘मेगा’ डोस देण्याच्या खुळाचा पुरस्कार केला.) गर्भवती आणि इतर काही अवस्थांमध्ये या पदार्थांची गरज वाढत असली तरी त्यासाठी फळांचे रस पिण्यापेक्षा गोळ्या गिळणे स्वस्त पडते अॅन्टिऑक्सिडंट्स मिळावी म्हणून कोणी लाल वाईन पीत नाही. शीतपेयांचा सामू (कि) २.५ ते ३.५ असल्याला कुप्रसिद्धी मिळते परंतु फळांच्या रसांचा सामूसुद्धा ३ ते ४ असाच असतो. शीतपेयांतील कर्बद्विप्राणिल वायू उडून गेल्यावर त्यांची आम्लतासुद्धा फळांच्या रसासारखीच होईल. संत्र्याच्या रसात फॉस्फेटचे प्रमाण कोलाएवढेच असते. रस्त्याच्या कडेला मिळणारे फळांचे रसही शीतपेयांपेक्षा अधिक महाग असतात. स्वच्छतेची काळजी घेणारे लोक त्याहीपेक्षा महाग खोक्यातील रस पितात. त्यामध्ये अतिरिक्त पोषणमूल्ये घालण्याच्या नादात फॉस्फेटचे प्रमाण पाचपट होते.

होमिओपॅथी
होमिओपॅथीविषयी झालेल्या संशोधनात आजवर तरी होमिओपॅथी खोटी पडल्याची समग्र माहिती सुधारकच्या जुलै १९९२ अंकात आहे. १) रोगाच्या लक्षणांसारखी लक्षणे निरोगी व्यक्तींमध्ये निर्माण करणाऱ्या पदार्थांच्या सेवनाने रोग बरा होतो आणि २)औषध विरल केले की त्याची शक्ति वाढते, अशी गृहीतके असणारी होमिओपॅथी अतार्किक आहे. होमिओपॅथीच्या औषधांमध्ये वांछित पदार्थांचे एवढे विरलीकरण केले जाते की वांछित पदार्थाचा एक रेणू सेवन करण्यासाठी पृथ्वीवरील सर्व पाण्याएवढे औषध पिणेसुद्धा कमी पडेल. औषधांमध्ये वांछित पदार्थाचा एकही रेणु नसतो हे होमिओपॅथीच्या पुरस्कर्त्यांनासुद्धा मान्य असते. वांछित पदार्थाचे गुणधर्म विरलीकरणाच्या खास पद्धतींमुळे द्रावकाच्या स्मृतीमध्ये जातात असा त्यांचा दावा असतो. एक निराधार गृहीतक झाकण्यासाठी दुसरे निराधार विधान करण्याचा सर्वच अंधश्रद्धांचा प्रयत्न असतो. कितीही ठिगळे लावली तरी होमिओपॅथीची गृहीतके आज ज्ञात विज्ञानामध्ये समाविष्ट होऊ शकत नाहीत. होमिओपॅथी सत्य असण्याची सैद्धांतिक शक्यता नाकारणे अवैज्ञानिक आहे, परंतु होमिओपॅथी सत्य असल्याचा दावा करणाऱ्यांना संपूर्ण रसायनशास्त्र नव्याने लिहावे लागेल.

होमिओपॅथीच्या समर्थनार्थ लसीकरणाचे (vaccination) उदाहरण दिले जाते. लसीकरणाच्या काही प्रकारांमध्ये, खच्चीकरण केलेले जिवंत जंतू किंवा त्यांची विषे निर्बल करून (toxoid) शरीरात सोडण्यात येतात. रोगाचा सौम्य हल्ला झाल्यामुळे शरीराच्या प्रतिकारयंत्रणेला त्या रोगाविरुद्ध रसायने शोधण्यासाठी वेळ मिळतो. खऱ्या रोगाचा प्रादुर्भाव होताच प्रतिकारयंत्रणेच्या पेशींच्या स्मरणशक्तीमुळे त्या रोगाविरुद्ध कार्य तातडीने सुरू होते. वरवर पहाता सौम्य रोग निर्माण करून खरा रोग टाळणे असाच हा प्रकार दिसतो. परंतु पांढऱ्या रक्तपेशींची स्मरणशक्ती वैज्ञानिक संशोधनामध्ये सिद्ध झालेली आहे. निर्जीव द्रावकाच्या स्मरणशक्तीविषयी असा पुरावा नाही.

पुणे येथील सोसायटी फॉर एन्हॅन्समेंट अॅण्ड रिसर्च इन क्लासिकल होमिओपॅथी (सर्च) या संस्थेने प्रस्तुत अंधश्रद्धाविशेषांकाच्या संपादकांचा होमिओपॅथीविरोधी मते मांडण्याचा हक्क ‘शैक्षणिक पात्रता नसल्यामुळे’ नाकारला होता. या संस्थेने वैज्ञानिक चाचण्या केल्याचा दावासुद्धा केला होता. परंतु ‘माहितीची, रुग्णांची व निष्कर्षांची देवाणघेवाण’ केवळ ‘होमिओपॅथीमधील योग्य प्रशिक्षित आणि पात्रता असलेल्या व्यक्तीशीच’ करण्यास ही संस्था तयार आहे. म्हणजेच होमिओपॅथीच्या धंद्याला शरण न गेलेल्यांशी चर्चा करण्यास त्यांची तयारी नाही. होमिओपॅथीचे सिद्धांत खोटे ठरण्याजोगे (फॉल्सिफाएबल) असूनही त्यांची वैज्ञानिक तपासणी करण्यास होमिओपॅथीचे पुरस्कर्ते तयार नसतात.

सिद्ध
सिद्ध या तामिळ उपचारपद्धतीविषयी सरकारी संकेतस्थळावर असे लिहिले आहे की देवाने मानववंशाची सुरुवात भारतात केली रि?! अल्केमिस्टांचे एक ध्येय असलेला परीस सुद्धा त्यांना HIEDI Etat: In Siddha system chemistry had been found well developed into a science auxillary to medicine and alchemy. It was found useful in the preparation of medicine as well as in transmutation of basic metals into gold”(sic). परंतु तातडीचे उपचार करणे जमत नसल्याची कबुलीसुद्धा तेथे आहे.

युनानी तिब्ब
पौर्वात्य आणि पाश्चात्त्य प्राचीन ज्ञानाचे (आणि खुळ्या समजुतींचे) मध्ययुगात अरबांनी जतन केले. इब्न झकारिया राझी, इब्न सिना, इब्न अल नफीस, अबु अल कासिम इत्यादींनी ग्रीक चतुर्दोष सिद्धांतावर आधारित वैद्यकात स्वत:ची भर घातली. प्राचीन भारतीय वैद्यकाचीसुद्धा त्यांना माहिती होती. त्याला युनानी तिब्ब वैद्यक म्हणतात. आयुर्वेदाच्या दैवी ज्ञानाच्या दाव्याच्या तुलनेत इस्लामी राजवटीतील वैद्यक कालसापेक्ष वैज्ञानिक म्हणावे लागते. परंतु हिप्पोक्रॅटिस आणि गॅलेन यांचे बहुतेक सिद्धांत आज वैज्ञानिक वैद्यकाने त्यागले आहेत. गंमत अशी की सर्पगंधा या वनस्पतीमध्ये वैज्ञानिकांना रिसर्पिन हे औषध सापडल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी आयुर्वेदिक आणि युनानी या दोन्ही पद्धती पुढे आल्या. या दोन्ही पद्धतींच्या उद्गात्यांनी प्रयोग करणे व चुका त्यागणे (ट्रायल अॅण्ड एरर) पद्धतीने औषधी गुण असलेल्या अनेक पदार्थांची नोंद करून ठेवली असली तरी त्या पदार्थांचा परिणाम वैज्ञानिक पद्धतीने होत असल्यामुळे या उपचारपद्धती कोणत्याही प्रकारे वैज्ञानिक वैद्यकापेक्षा उच्च नाहीत. त्यांचे सिद्धांत निराधार असल्यामुळे सैद्धांतिक संशोधनसुद्धा त्यांच्यामध्ये शक्य नाही. त्यांच्या औषधांच्या वैज्ञानिक चाचण्या होतच असतात. या उपचारपद्धतींचे जे दावे चाचण्यांमध्ये सिद्ध होतात ते वैज्ञानिक वैद्यकाचा भाग बनतातच.

अॅक्युपंक्चर आणि चिनी वैद्यक
गर्भामध्ये तयार झालेले काही अवयव आपली जागा बदलतात, उदा, पीयूषिका ग्रंथीचा अर्धा भाग घशामध्ये तयार होऊन नंतर मेंदूत जातो, मूत्रपिंडे वर सरकतात, तर हृदय आणि वृषणे खाली सरकतात. सामान्यतः, एखाद्या अवयवाच्या नसा आणि त्या अवयवावरील त्वचेच्या नसा सामायिक असतात. म्हणूनच, जागा बदललेल्या अवयवांच्या वेदना मूळ जागीच्या त्वचेवर होतात. त्वचेला स्पर्श केल्यास अंतर्गत अवयवांच्या वेदना कमी होतात हेसुद्धा एक सत्य आहे. परंतु अॅक्युपंक्चर शास्त्राच्या समर्थनार्थ स्थान बदललेल्या वेदनांचा (रिफर्ड वेदनांचा) संदर्भ देणे म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठणे आहे. अॅक्युपंक्चरशास्त्रामध्ये नमूद वेदनाबिंदू आणि अवयवांच्या जोड्या गर्भविकासशास्त्राला धरून नाहीत. अॅक्युपंक्चरशास्त्रानुसार, शरीरात सुया टोचून ची (ळिं) ऊर्जेचे नियमन करून सर्व प्रकारचे रोग बरे करता येतात. उपचारामागचा सिद्धांत चूक असला तरी उपचाराच्या परिणामाचे शास्त्रीय कारण सापडल्यास तो उपचार वापरावा, या विचाराने अॅक्युपंक्चरला थोडा वैज्ञानिक पाठिंबा आहे. परंतु रुग्णाच्या नकळत हे उपचार करणे शक्य नसल्यामुळे त्यांचा शास्त्रीय अभ्यास करून उपयुक्तता ठरविणेच कठीण आहे. चिनी पारंपरिक वैद्यकाचा महत्त्वाचा भाग म्हणविणाऱ्या अॅक्युपंक्चरशास्त्राचा मुख्य भर रिफर्ड बिंदूंवर आहे. अशा बिंदूंचा सिद्धांत चीन आधी ग्रीक आणि अरबांनीसुद्धा मांडला होता. हे शास्त्र फारसे पारंपरिकसुद्धा नाही. ख्रिस्तपूर्व काळात त्याचा उल्लेख आढळत नाही. बिंदूची जागा आणि ची उर्जेच्या प्रवाहाचे रेखांश यांविषयी विविध प्राचीन लिखाणांमध्ये एकमत नाही. आज अॅक्युपंक्चरसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रकारच्या सुया बनविणे ४०० वर्षांपूर्वी शक्य नव्हते. चिनी पारंपरिक वैद्यकाचा मोठा भाग गेल्या शतकात चिनी अस्मितेसाठी बनविला गेला.

भारतीय कायद्यानुसार, अॅक्युपंक्चरशास्त्राची प्रमाणपत्रे मिळवून उपचार करण्याची अनुमति केवळ वैद्यकीय व्यावसायिकांनाच आहे. तरीही इंदिरा गांधी विद्यापीठाने सामान्य जनतेसाठी अॅक्युपंक्चरचा पदविका अभ्यासक्रम सुरू केलेला आहे .

रेकी
रेकी या जपानी उपचारपद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे भारतात या उपचारपद्धतीला मान्यता नाही. १९२२ साली सुरू झालेल्या रेकीला परंपरासुद्धा नाही. अॅक्युपंक्चरप्रमाणेच, परंपरा असल्याचा निराधार दावा मात्र आहे). भारतात इतक्या उपचारपद्धती असताना अजून एक पद्धत स्वीकारण्याची लोकांना गरज नव्हती. तरीही शहरांमध्ये रेकी उपचारांच्या जाहिराती दिसतात. शरीरातील उर्जेचे संतुलन करून स्पर्शाद्वारे सर्व रोग बरा करण्याचा रेकी पद्धतीचा दावा असतो. प्राण्यांना रेकी देण्यासाठी वेगळे तज्ज्ञसुद्धा असतात. करमणूक क्षेत्रातील अनेक तारे या खुळाचेसुद्धा बळी असल्यामुळे वर्तमानपत्रांतील गुळगुळीत पुरवण्यांमध्ये रेकीतज्ज्ञांच्या मुलाखतवजा जाहिरातीसुद्धा प्रसिद्ध होतात.
वैकल्पिक उपचारपद्धतींच्या पाठीराख्यांच्या निरीक्षणातून असे दिसते की या उपचारपद्धतींचे पाठीराखे एकमेकांवर टीका करीत नाहीत. वास्तविक पाहता आयुर्वेद आणि होमिओपॅथीमध्ये समान तत्त्व नाही. तरीही वैकल्पिक उपचारपद्धती एकमेकांच्या कुरणांचा आदर राखताना दिसतात. रुग्णांमध्येसुद्धा एकाच उपचारपद्धतीवर निष्ठा असल्याचे क्वचितच दिसते. बिल माहर या विनोदकाराच्या शब्दात सांगायचे झाले तर / लरपी लीर िरश्रश्र शिी अगुळप, रपव शा लशश्रश्र ीशीशरीलह रपव सश्रेलरश्र रीळपस, रपव हिशप लाश लीरुश्रळपस लरलज्ञीलळशपलश हशप रपी ढराळषी; हरीी षी गीळपपशीी. विज्ञानामध्ये उत्क्रांत होण्याची सोय असल्यामुळे वैज्ञानिक विचारसरणीची ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर’, ‘आमच्याशी फारकत घेणे चूक’ही भूमिका योग्य आहे. कदाचित आजच्या अनिश्चित जीवनशैलीत असा विश्वास ठेवण्याची लोकांना सवय नाही. दीडशे वर्षांपूर्वी असाध्य असलेले अनेक रोग वैज्ञानिक वैद्यकामुळे बरे होतात, अनेक गंभीर रोगांची तीव्रता सुसह्य झाली आहे, लोकांचे आयुष्यमान दुप्पट झाले आहे, शिवाय जगण्याची धडपड भौतिक प्रगतीमुळे सोपी होऊन छंद आणि खुळे जोपासण्यासाठी फावला वेळ, पैसा मिळतो आहे. म्हणूनच अविवेकी वागणूक करणे लोकांना परवडते आहे. विज्ञानाचे फायदे लाभले असले तरी समाजाने वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारलेला नाही. अशा परिस्थितीत अंधश्रद्धा-निर्मूलन सतत आवश्यक आहे.

संदर्भ:
1. http://socrel.oxfordjournals.org/cgi/content/abstract/70/2/101
2. http://www.anatheist.net/2009/07/religion-us-professors
3. http://en.wikipedia.org/wiki/Salem_hypothesis
4. http://www.faktoider.nu/openmind_eng.html
5. http://www.indianexpress.com/oldStory/64945/
6. http://lefarkins.blogspot.com/2008/12/medical-superstition-has-consequences.html
7. http://nirmukta.com/2009/08/13/swine-flu-nilgiri-oil-and-the-faux-sms
8. http://www.docgurley.com/2007/09/13/superstitious-doctors-part-i
9. http://findarticles.com/p/articles/mi_mOFSL/is_5_81/ai_n13793208
10. http://www.straightdope.com/columns/read/1348/whats-the-link-between-the-moon-and-menstruation
11. http://www.mahasbtc.com/index.php?option=com_content&task=view&id=34&Itemid=244
12. http://www.scielo.br/scielo.php?pid=S0074-02762001000300004&script=sciarttext
and http://memorias.ioc.fiocruz.br/963/4151dis.html
13. http://www.island.lk/2009/07/02/features2.html
14. http://archpedi.highwire.org/cgi/content/summary/88/3/294
15. http://www.springerlink.com/content/p85q1w054612w776
16. http://www.newyorker.com/reporting/2009/06/01/090601fa_fact_gawande
17. http://www.whywontgodhealamputees.com
18. http://kem.edu/dept/ayurvedic/services_offered.htm
19. Patrika Nov 2002, Auth: V B Athawale, Pub: Marathi Vidnyan Parishad
20. http://indianmedicine.nic.in/naturopathy.asp
21. http://indianmedicine.nic.in/siddha.asp
22. http://www.drspinello.com/altmed/acuvet/acuvet_files/frame.htm
23. http://www.skeptic.com/eskeptic/08-10-08#feature
24. http://timesofindia.indiatimes.com/city/ludhiana/IGNOU-offering-course-in-unrecognized-field/articleshow/5453722.cms