इ.स.१८७५-७६ दरम्यान निबंधमालेतून विष्णुशास्त्री चिपळूणकर ह्यांनी आपला दृष्टिकोण मांडला आहे. त्यांनी वापरलेला अंधश्रद्धेसाठीचा पर्यायी शब्द ‘लोकभ्रम’ हा अधिक वादातीत वाटतो. त्यांची ह्याबाबतची भूमिकासुद्धा आक्रमक, ब्राह्मणद्वेषी अथवा धर्मावर आगपाखड करणारी नाही. भूत नाहीच असे ठामपणे म्हणण्याऐवजी ते म्हणतात, ‘सृष्टीतील अद्भुत चमत्कार पहायची ओढ सर्वसामान्य माणसाप्रमाणे आम्हाला पण आहे. ह्या विषयी आमची कुणी पक्की खात्री करून दिली तर ती आम्ही फार खुशीने घेऊ.’ ‘वाजे पाऊल आपुलें, म्हणे मागे कोण आले’ ह्यांसारखी बुद्धिवादी संत रामदासांची वचने ते सविस्तरपणे उद्धृत करतात. ‘स्वयंपाकघरात चूल बांधण्यापासून मोठ्या मोहिमेवर जाण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत शकुन-अपशकुन, ग्रहानुकूलता ह्याचा विचार होतो’ ह्यावर तुटून पडताना ते पुढे म्हणतात, ‘अशा त-हेचा अनुभव हा केवळ काकतालीय न्यायाचा भाग आहे.’ ‘विधवा, परधर्मीय ह्यांना अशुभ मानणे हा माणसाच्या अंगभूत मूर्खपणाचा आणि उद्धटपणा कळस आहे’ असे ते म्हणतात.
प्राचीन काळी ग्रहनक्षत्रादींच्या शुभाशुभतेवर लोकांचा दृढ विश्वास होता. कारण याबाबत ते पूर्णपणे अनभिज्ञ होते. हळू हळू हे सर्व ज्योतिष, मुहूर्त ह्या स्वरूपात धर्मात आणि लोकव्यवहारात उतरले. ‘हिंदुस्थानात शनी लोकांच्या राशी लागतो तर इंग्लंडमध्ये तो निष्प्रभ ठरतो.’ ‘ज्योतिष्याला जर भविष्य बिनचूक कळते तर त्याच्यावर संसारातील संकटे का गुदरतात ?’ असा बिनतोड युक्तिवाद ते करतात. शब्दप्रामाण्यविरोधात ते म्हणतात, ‘पुरा कस लाविल्याखेरीज सोन्याचा सोनेपणा धरू नये तसेच कोणी लौकिकाने मोठा एवढ्यावरच जाऊन त्याच्या वचनाचे जे प्रामाण्य मानावयाचे त्यापेक्षा आपण स्वतः होईल तितकी यथातथ्य परीक्षा करून नंतर कोणाचेही मत ग्राह्य की अग्राह्य ते ठरवावे.’
‘लोकभ्रम’ शीर्षकाखाली लिहिलेल्या निबंधमालेतील तीन लेखांतून विष्णुशास्त्री चिपळूणकर ह्यांची पूर्वग्रह आणि अंधश्रद्धा ह्यांपासून मुक्त असलेली चिकित्सक दृष्टी दिसून येते. १३० हून अधिक वर्षे जुनी अशी ही विचारसरणी आजही आधुनिक वाटते.