सावरकर – आंबेडकर : इतिहासलेखनातील द्वन्द्व

वि.दा. सावरकर आणि डॉ. आंबेडकर यांनी इतिहास लेखनाच्या क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण असे योगदान दिलेले आहे. १९३६ साली ‘अॅनिहिलेशन ऑफ कास्ट’ मध्ये डॉ. आंबेडकरांनी असे मत व्यक्त केले की, ‘हिंदूंचे जीवन ही सततच्या पराभवांची मालिका आहे. सत्याच्या बाजूने कबुली देण्यास न घाबरणाऱ्या कोणत्याही सूज्ञ हिंदूस लाज वाटेल असे ते जगणे आहे.” हे वक्तव्य वि.दा.सावरकरांचा ब्राह्मणी दंभ दुखावणारा संघर्षबिंदू ठरेल असेच म्हणावे लागेल कारण उपर्युक्त उद्धरण आपल्या ग्रंथात उद्धृत करताना सावरकरांनी ठळक केलेला भाग गाळला आहे व त्यावर दिलेली प्रतिक्रिया अशी आहे –

‘डॉ.आंबेडकरांचे हे विधान असत्य, उपमर्दकारक आणि दुष्ट हेतूंनी केलेले असून त्यांचा प्रतिकार करणे हे स्वराष्ट्राभिमानाच्या दृष्टीनेच नव्हे तर ऐतिहासिक सत्याच्या दृष्टीनेही अत्यंत आवश्यक आहे.” ही भूमिका स्वीकारूनच सावरकरांनी ‘हिंदुस्थानच्या इतिहासातील सहा सोनेरी पाने’ हा ग्रंथ लिहिला. सावरकरांचा हा ग्रंथ आणि डॉ. आंबेडकरांचा ‘रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन इन एन्शन्ट इंडिया” या ग्रंथांमध्ये सावरकरांनी आणि डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धम्म आणि मौर्य शुंगकालीन इतिहासाची व जातिसंस्थेची जी चर्चा केली आहे. त्यातून दोघांचा इतिहासाकडे बघण्याचा परस्परविरोधी दृष्टिकोण आणि इतिहासलेखनातील तीव्र असा वैचारिक संघर्ष स्पष्ट होत जातो. त्याबरोबरच त्यांचे राष्ट्रवादासंबंधीचे भिन्न आकलन आणि दृष्टिकोणांचाही अभ्यास करता येतो.

इतिहासमीमांसा
वि.दा. सावरकर हे संघटित आणि सामर्थ्यसंपन्न अशा हिंदुराष्ट्रनिर्मितीच्या ध्येयाने प्रेरित होऊन इतिहासलेखन करीत असल्याने ‘हिंदुत्वाचा इतिहास म्हणजे भारताचा इतिहास’ या गृहीतकावर त्यांची नितांत श्रद्धा होती. ते म्हणतात, ‘हिंदुत्व हा काही साधा शब्द नव्हे, तर ती एक परंपरा आहे! तो एक इतिहास आहे… केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक इतिहासच नव्हे, तर सर्वसंग्रही इतिहास आहे.”

सावरकरांनी तमाम हिंदुत्ववादी इतिहासकारांना हिंदुराष्ट्रहित लक्षात घेऊन इतिहासाचा वापर करण्याचे आवाहन केले होते. मौर्य-शुंगकालीन इतिहासाविषयी सावरकरांचे निरूपण असे आहे की, आर्यचाणक्याच्या नेतृत्वाखाली चंद्रगुप्ताने मोठे राजकीय षडयंत्र रचले व त्यानुसार नंदांचा आणि सेल्युकस निकेटरचा पराभव करून भारतीय साम्राज्य निर्माण केले. तसेच चाणक्यनीतीनुसार साम्राज्यनिर्मिती आणि ‘साम्राज्यसंवर्धनाबरोबरच शत्रूंचा बंदोबस्त करण्यासाठी ‘दंडशक्ती’ व ‘क्षात्रधर्मा’चा अवलंब केला. बुद्धाचे अहिंसावादी विचार आणि अशोकाची धम्मनीती मात्र ‘राष्ट्रघातकी’ व ‘हिंदुराष्ट्रावरील संकट’ होय असे सावरकरांचे म्हणणे आहे. पुष्यमित्र शुंग याने एका मोठ्या राज्यक्रांतिकारक कारस्थानानुसारच शेवटचा मौर्य राजा बृहद्रथ याची हत्या करून ‘राष्ट्रीय कर्तव्य’ पार पाडले असल्याचे त्यांचे मत आहे. वैदिक ब्राह्मणी धर्माचे रक्षण करणे म्हणजेच ‘राष्ट्रीय कर्तव्य’ अशी त्यांची धारणा होती. पुष्यमित्राने मौर्यांची बौद्ध राजवट नष्ट करून सामवेदी ब्राह्मण असणाऱ्या शुंग राजवंशाची स्थापना केली… मिन्यांडरचे परकीय आक्रमण परतवून लावले… अश्वमेध यज्ञ केला. याचा ‘राष्ट्रीय विजयोत्सव’ असा गौरव सावरकरांनी केला आहे. आपल्या राष्ट्रीय क्रांतीचाच एक भाग म्हणून पुष्यमित्राने बौद्धधम्माविरुद्ध हिंसक वंशसंहार आरंभिला. बौद्धांच्या स्तूप-विहारांचा विध्वंस करून बौद्धभिक्षू व बौद्ध लोकांची सर्रास कत्तल करण्याचे आदेश दिले. सावरकरांनी या हिंसक वंशसंहाराच्या मोहिमेस वैदिक धर्मशास्त्र व राष्ट्रनिष्ठेच्या कसोटीवर न्यायोचित ठरवले आहे. पुष्यमित्र शुंगाने ‘राजकर्तव्य’ व ‘धर्मकर्तव्य’ पार पाडले अशी प्रशस्तीही ते देतात.  हा इतिहास चित्रित करत असताना सावरकरांनी चंद्रगुप्त, ब्राह्मण आर्यचाणक्य आणि सामवेदी ब्राह्मण पुष्यमित्र यांची शूरवीरपराक्रमी हिंदू सुपरमॅन अशी प्रतिमा उभारली आहे.

भारतातील पारंपरिक ब्राह्मणी इतिहासलेखन हे शुद्ध ठोकळेबाज – यांत्रिक स्वरूपाचे असून आपण त्याविषयी असमाधानी असल्याचे मत व्यक्त करून इतिहासाची पुनर्मांडणी करण्याची भूमिका डॉ.आंबेडकर घेतात.१० स्त्री-शूद्रातिशूद्रांच्या सर्वांगीण शोषणमुक्तीच्या प्रेरणेतून त्यांनी इतिहासलेखनाचा प्रपंच मांडला. हिंदुत्वाचा एकजिनसी इतिहास नाकारताना त्यांनी प्राचीन भारताची (१) ब्राह्मणी-अनीतिमान, (२) बौद्ध-समतावादी (३) हिंदू- प्रतिक्रांतिवादी अशा तीन कालखंडांत विभागणी केली.११ या बरोबरच प्राचीन भारताच्या इतिहासातील प्रमुख अंतर्विरोध म्हणून ब्राह्मणवाद विरुद्ध बौद्धवाद यांच्यातील ‘मरणांतिक संघर्ष’१२ अधोरेखित केला.

भारताच्या इतिहासातील स्वातंत्र्याचा, गौरवाचा, आणि वैभवाचा एकमेव कालखंड म्हणून ते समतावादी मौर्य साम्राज्याचा उल्लेख करतात.१३ विशेष म्हणजे त्यांनी मौर्यघराण्याचे अनार्यनाग घराण्याशी नाते सांगितले आहे. त्यांनी बुद्धाच्या वर्ण-जाती-पुरुषसत्ताविरोधी सामाजिक क्रांतिकारकत्वावर१४ आणि वैश्विक मानवी नीतिमूल्यांवर१५ विशेष भर दिला आहे. हिंदू समाज क्षतिग्रस्त आणि पराभूत होण्याला बुद्धाचे अहिंसावादी विचार किंवा बौद्ध अनुयायी नव्हेत तर ‘चातुर्वर्ण्याचा ब्राह्मणी सिद्धान्त’ जबाबदार आहे अशी मांडणी ते करतात.१६ स्त्री-शूद्रतिशूद्रांना ज्ञान, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा आणि आत्मसंरक्षणाची साधने म्हणजेच बहुसंख्यक समाजाला शास्त्र आणि शस्त्रे यापासून वंचित ठेवणाऱ्या ब्राह्मणशाहीनेच खऱ्या अर्थाने राष्ट्रघात केला आहे असे त्यांचे म्हणणे होते. बुद्धाच्या अहिंसेसंदर्भात डॉ. आंबेडकरांनी केलेले विवेचन त्याची व्यापकता सांगणारे आणि सावरकरांच्या आक्षेपांचे परस्पर खंडन करणारे आहे. ते म्हणतात, बुद्धाच्या दृष्टिकोणातून, ‘सत्य आणि न्यायाच्या बाजूने नाही तोवर युद्ध अनिष्ट आहे१७ … बुद्ध हिंसाविरोधी होता. परंतु तो न्यायाच्या बाजूनेसुद्धा होता आणि जिथे न्याय प्रतिष्ठापित करण्याची आवश्यकता असेल तिथे तो बळाचा वापर करण्यास परवानगी देतो…. माणूस जेव्हा न्यायासाठी व सुरक्षिततेसाठी लढतो तेव्हा त्याच्यावर अहिंसाविरोधी म्हणून दोषारोपण करता येत नाही… युद्ध झाले तरी चालेल परंतु ते स्वार्थसिद्धीकरिता नसावे… सर्जनशील, विधायक कार्यासाठी केवळ ऊर्जा म्हणून तो बळाचा वापर करण्यास मान्यता देतो१८. ‘ त्यांच्या मते बुद्धविचारांतील ‘अहिंसा’ हा कायदा किंवा नियम नसून ते एक मूल्य किंवा तत्त्व होय.१९ हिंसा आणि अहिंसेचा विचार ते मानवी नीतिमूल्य, सत्य आणि न्यायाची कसोटी लावून करतात. पुढे त्यांचे म्हणणे असे आहे की, सम्राट अशोकाने बौद्ध धम्माला राज्याचा धर्म बनविले आणि ब्राह्मणांचे वर्चस्व धोक्यात आले. यज्ञविधी, प्राणिहिंसा बंद केल्याने पौरोहित्याचा धंदा संकटात आला. ब्राह्मणांच्या दृष्टीने प्रतिकूल अशा परिस्थितीत पुष्यमित्राने बृहद्रथाची ‘राजहत्या’ व बौद्धांचे शिरकाण करून ब्राह्मणशाहीची पुनःस्थापना केली२०. यालाच डॉ. आंबेडकर ‘प्रतिक्रांती’ असे म्हणतात. या ब्राह्मणी प्रतिक्रांतीचाच एक भाग म्हणून पुष्यमित्राने मनुस्मृतीला कायद्याचा दर्जा दिला.२१ अशाप्रकारे डॉ.आंबेडकरांनी इतिहाकालातील ब्राह्मणवादाच्या विजयाचे क्रूर, हिंसक, आणि शोषक स्वरूप उघड करण्याचा प्रयत्न केला आहे.

जातिमीमांसा
सावरकरांनी आपल्या लेखनात आणि हिंदुत्वाच्या पूर्ण चर्चेत जातिसंस्थेच्या शोषण शासनाच्या यंत्रणेसंदर्भात कमालीचे मौन पाळले आहे. जातिसंस्थेच्या विकासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या ‘अनुलोम’ आणि ‘प्रतिलोम’ विवाहपद्धतीच्या ब्राह्मणी सिद्धान्तास ते उचलून धरतात२३. त्यांनी स्त्रीदास्य व जातिव्यवस्थाक शोषण संपुष्टात यावे याकरिता विचार आणि कृतीच्या पातळीवर प्रयत्न केल्याचे एकही उदाहरण नाही. त्यांनी इतर ठिकाणी ‘बेटी बंदी तोडून जाती जोडण्याचा आणि हिंदुराष्ट्र संघटित करण्याचा विचार मांडला असला तरी अखेरीस त्यांचे उद्दिष्ट ब्राह्मणी वर्चस्वप्रधान ‘हिंदुराष्ट्रसंघटन’ हे असल्याने त्यांच्या बेटीबंदी तोडण्याच्या विचारांना फारसे महत्त्वच राहत नाही. कारण जातिजन्य शोषण-विषमता दूर करण्यासंदर्भात ते कुठेच काही भूमिका घेताना दिसत नाहीत.२४ याउलट परकीय रक्तमिश्रण होण्यापासून हिंदूंचे रक्त शुद्ध ठेवण्याचे ऐतिहासिक कार्य जातिसंस्थेमुळे साध्य झाले, असे जातिसंस्थेचे उदात्तीकरण मात्र त्यांनी केले आहे.२५ जातिसंस्थासमर्थक मनुस्मृतीचेही ते उदात्तीकरण करतात२६, तर वर्णजातिव्यवस्थाविरोधी बुद्धविचारांना राष्ट्रघातकी ठरवतात. त्यांच्या लेखी वर्णजातिव्यवस्थाक शोषणयंत्रणेचे रक्षण म्हणजेच ‘राष्ट्रीय कर्तव्य’ होय असे म्हणता येणार नाही का?

डॉ.आंबेडकरांनी जातिसंस्थेच्या मीमांसेतून जातिसंस्थेचे राष्ट्रविरोधी स्वरूप प्रकाशात आणले. ते म्हणतात, ‘ब्राह्मणांच्या विरुद्ध कृती होऊ नये या उद्देशाने ब्राह्मणशाहीने ब्राह्मणेतरांना पांगळे करून सोडले… परंतु जातीच्या विषाचा परिणाम असा झाला की ते ब्राह्मणशाहीबरोबरच परकीयांच्याविरुद्ध कृती करण्यासदेखील असमर्थ ठरले. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ब्राह्मणशाहीने नेमून दिलेल्या जातिव्यवस्थेने राष्ट्रवादाच्या विकासाच्या विरोधात फार मोठा अडथळा निर्माण केला.२७” डॉ. आंबेडकरांनी वर्ण-जातींची शोषणसंस्था आणि ब्राह्मणीमूल्यपरंपरा राष्ट्रविरोधी आहे हे स्पष्ट करतानाच बौद्ध धर्मविचारांना-मूल्यांना आधुनिक भारताच्या राष्ट्रवादाच्या निर्मितिसंदर्भात महत्त्वाचा स्रोत मानले आहे. ‘बुद्धधर्मातील समता आणि बंधुतेचा संदेश, त्यात मानवप्राण्याविषयी असणारा आदरभाव, त्याची वैश्विक नीतिमूल्ये आणि त्याचा करुणेवर असणारा विशेष भर डॉ. आंबेडकरांना बुद्धधर्माकडे आकर्षित करून घेणारा ठरला.’ डॉ.एम.एस. गोरे यांचे हे प्रतिपादन वस्तुस्थितिनिदर्शक असेच आहे. डॉ. आंबेडकरांच्या मते, राष्ट्र हे शस्त्रबळावर नव्हे तर सामूहिक ऐक्यभावनेतून व बंधुत्वभावनेने एकत्र राहण्याच्या इच्छेतून निर्माण होते.२९ प्राचीन काळात अशी सामूहिक ऐक्याची व बंधुतेची भावना निर्माण होण्यास अनुकूल असणारा समाज बुद्धाच्या क्रांतीने अस्तित्वात येऊ शकला असे त्यांना वाटते. म्हणून त्यांनी आपल्या इतिहासलेखनातून बुद्ध आणि बुद्धाच्या काळाचा आदर्श प्रस्थापित केला. आधुनिक भारतातील राष्ट्रवाद बळकट होण्यासंदर्भात बौद्धधम्मनीतीचे म्हणजेच लोकशाही मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता.

राष्ट्रवाद
सावरकरांच्या इतिहास आणि जातिमीमांसेतून त्यांच्या राष्ट्रवादाचा आकृतिबंध समोर येतो. भारताला ‘पितृभू’ – ‘पुण्यभू’ मानणाऱ्या हिंदूंचे सर्व जाती, पंथ, वंश, प्रांत हिंदुराष्ट्रात एकजीव झाले आहेत. हे गृहीतक त्यांच्या हिंदुराष्ट्रवादाच्या पायाशी आहे. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आणि हिंदुराष्ट्रहित हेच सर्वश्रेष्ठ हित ही तत्त्वे त्यांच्या राष्ट्रवादाच्या केंद्रस्थानी आहेत. अखिल हिंदूंचे सैनिकीकरण, दंडशक्तीचा व क्षात्रवृत्तीचा पुरस्कार, ब्राह्मण हिंदू, सुपरमॅनचे एकचालकानुवर्ती नेतृत्व; वैदिक धर्म, संस्था, मूल्ये, संस्कृति श्रेष्ठत्वाचा अभिमान; ब्राह्मणी कर्तृत्वाच्या इतिहासाचा अभिमान, गौरवीकरण आणि पुनरुज्जीवनाची मनीषा ही त्यांच्या हिंदुराष्ट्रनिर्मितीची प्रमुख साधने होती. तर ‘स्वतंत्र- अखंड हिंदुस्थान’ आणि जागतिक महासत्ता बनण्याचे सामर्थ्य असणारा ‘हिंदू राष्ट्रवाद’ हे अंतिम साध्य होते. ते प्राप्त होण्याच्या मार्गातील अडसर असणारे राष्ट्रशत्रू नष्ट करण्याची सूचनादेखील त्यांनी दिली आहे. सावरकरांनी आपल्या राष्ट्रवादाला वैदिक दंडनीती, चाणक्यनीती, मनुस्मृती तसेच नाझीवाद व फॅसिझमचे३० वैचारिक अधिष्ठान दिले आहे. ब्राह्मणी राष्ट्रवादाच्या याच चौकटीशी प्रामाणिक राहून ते एकात्म हिंदुत्वाचा भ्रामक इतिहास रेखाटताना प्राचीन काळातही भारत हे एक ‘राष्ट्र’ होते असे गृहीत धरतात. वस्तुतः नेशन (Nation) या अर्थी राष्ट्र ही संकल्पना आधुनिक आहे. वैदिक साहित्यात ‘राज्य’ आणि ‘राष्ट्र’ या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे आणि तो स्टेट (State) असाच आहे. प्राचीन साहित्यात नेशन (Nation) ही कल्पनाच नाही.३१ चंद्रगुप्त मौर्य आणि पुष्यमित्र प्राचीनकाळात हिंदुराष्ट्रसंरक्षणार्थ लढले या सावरकरांच्या प्रतिपादनात कालविपर्यासाचा दोष स्पष्ट दिसतो. कारण त्याकाळी ‘राष्ट्र’ अस्तित्वातच नव्हते.

डॉ. आंबेडकरांच्या इतिहासमीमांसेतून आणि जातिमीमांसेतून त्यांचे राष्ट्रवादविषयक विचार सुस्पष्ट होतात. डॉ. आंबेडकरांच्या दृष्टीने ‘राष्ट्रवाद’ हे अंतिम साध्य नसून ‘साधन’ होते. आणि ‘जाति-अंत’ हे त्यांच्या राष्ट्रवादाचे तातडीने गाठावयाचे प्रमुख उद्दिष्ट होते. कारण भारतामध्ये जाति-अंताशिवाय ‘सर्वांगीण शोषण अंताचा मार्ग’ प्रशस्त होणार नव्हता. सर्वांगीण शोषण अंत अर्थात ‘समताधिष्ठित – लोकशाही समाज’ हे त्यांच्या जीवन, विचार आणि कार्याचे अंतिम उद्दिष्ट होते. तर नैतिकता, सत्य, न्याय, समता- स्वातंत्र्य-बंधुत्व, ज्ञानमुक्ती ही लोकशाही मूल्ये त्यांच्या विचारसरणीत पायाभूत होती व वैश्विक मानवतावाद हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. भारतातील तमाम शोषित समाजघटकांना मुक्तीची, स्वातंत्र्याची वाट दाखविणारा इतिहास आणि राष्ट्रवादाचा आकृतिबंध डॉ. आंबेडकरांनी निर्मिलेला आहे याविषयी दुमत असू शकत नाही.

उपसंहार
सावरकर आणि डॉ. आंबेडकर दोघेही आपल्या राजकीय विचार-कृतीला पूरक ठरेल अशाच प्रकारचे इतिहासलेखन करण्याची भूमिका घेतात. दोघांच्याही लेखन उपयोगिता मूल्य लक्षात घेऊन तथ्यांची, घटनांची, व व्यक्तींची निवड केली असल्याने इतिहासनिर्मितीच्या प्रक्रियेतील उत्पादनसंबंधाचे स्थान व इतर प्रेरक शक्तींची दखल गेतली गेली नाही असे दिसते. केवळ ठळक घटना, ठळक व्यक्ती यांनाच इतिहासाचा विषय बनविले आहे. त्यांच्या इतिहासलेखनातील ही मर्यादा मान्यच करावी लागले.

इ.स.पू. सहाव्या शतकानंतर गंगेच्या खोऱ्यात झालेल्या कृषिक्रांतीने आणि बुद्धाच्या क्रांतीने मौर्यांच्या विशाल साम्राज्याची पायाभरणी केली होती. या क्रांतीने नवीन उत्पादनसंबंधांना जन्म दिला. शेती-व्यापार कारागिरीचे उद्योग व लष्करीकरणातून वर्णव्यवस्थेखाली दडपलेल्यांना नवीन उत्पादनप्रणालीत स्वतःस प्रतिष्ठापित करता आले. कनिष्ठ वर्णजातीयांना उत्पन्नाचे विविध स्रोत प्राप्त झाले. कारागिरीचे उद्योग-व्यवसाय, व्यापारातील प्रगती, मोठ्या प्रमाणावर जंगलतोडीच्या माध्यमातून लागवडीखालील जमीनींचे क्षेत्र विकसित झाले. परिणामी एकूण भौतिकं उत्पादन वाढले. विशाल सैन्य उभे राहिले हे केवळ वर्णव्यवस्थेची बंधने गळून पडल्याने शक्य झाले. ही अनुकूलता निर्माण करून देणाऱ्या बौद्ध धम्माला सर्वसामान्य जनतेने म्हणजे कनिष्ठ वर्णजातीयांनी पाठिंबा देणे स्वाभाविक होते. तत्कालीन इतिहासाचीही भौतिक पार्श्वभूमी लक्षात न घेताच दोघांनीही इतिहासलेखन केले आहे. रोमिला थापर म्हणतात, जे सामाजिकदृष्ट्या हीन मानले जात असत अशांना बौद्धधम्माने पुरस्कारलेली सामाजिक समता अतिशय आकर्षक वाटणे साहजिकच होते.३२ बौद्ध धम्माने हे सामाजिक क्रांतिकारकत्व डॉ. आंबेडकरांनाही आकर्षित करणारे ठरले. प्राचीन भारतात बुद्ध-अशोकाने ब्राह्मणशाही विरुद्धच्या वर्णजातीविरोधी लढ्यात भाग घेतला. हे डॉ. आंबेडकरांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले. ते स्वतः आधुनिक भारताच्या राजकारणात जातीविरोधी लढ्याचे प्रणेते होते. म्हणून ते दास्यविमोचनाच्या हेतूने इतिहासलेखन करतात व ब्राह्मणी गौरवाचे खंडन करतात. सावरकर मात्र शोषक उच्चवर्णजातीचे प्रतिनिधित्व करीत ब्राह्मणी श्रेष्ठत्वाच्या अहंकारातून इतिहासलेखन करतात व ब्राह्मणी वर्चस्वाखालील हिंदू राष्ट्रवादाचे तत्त्वज्ञान मांडतात. चाणक्य, पुष्यमित्र या ब्राह्मणी प्रतीकांचा गौरव करताना ब्राह्मणी संस्कृतीचे वर्चस्व बळकट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तेव्हाच ते ब्राह्मणांच्या विशेषाधिकारांचेही समर्थन करतात. ब्राह्मणी हितसंबंध सुरक्षित राहावेत म्हणून प्रस्थापित व्यवस्थेला धक्काही न लागू देता ते सामर्थ्यसंपन्न हिंदुराष्ट्र निर्माण करू इच्छितात. त्यांच्या लेखी बहुसंख्यक शोषित कष्टकरी दलितांच्या हितापेक्षा राष्ट्राच्या हितास अग्रक्रम आहे. खरे म्हणजे राष्ट्राचे हित हे बाह्यावरण होय. तर उच्चवर्गजातींच्या हितसंबंधाचे रक्षण हे त्याचे खरे रूप होय. म्हणूनच दंडशक्ती, छात्रवृत्ती/छात्रधर्म, लष्करीकरण या जनतेचे दमन करण्यास सहाय्यभूत ठरणाऱ्या साधनांचा पुरस्कार सावरकरांनी केला आहे. देशात बहुसंख्येने असणारा स्त्री-शूद्रातिशूद्र-दलित- आदिवासींचा समाज पराकोटीच्या विपन्नावस्थेत गुलामगिरीचे जीवन जगतो आहे, त्याच्या मुक्तीचा किंचितसाही विचार सावरकरांच्या इतिहासलेखनातून किंवा राष्ट्रवादाच्या मांडणीतून पुढे येत नाही हे त्यांच्या संकुचित ब्राह्मणी हितसंबंधाचेच द्योतक आहे असे नाइलाजास्तव म्हणावे लागेल.

संदर्भ आणि टीपा :
(हा शोधनिबंध म्हणजे इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे ६३ वे अधिवेशन (अमृतसर दि. २८-३० डिसें.२००२) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादच्या इतिहास आणि प्राचीन भारतीय संस्कृती विभागाने आयोजित केलेल्या ‘न्यू ट्रेंडस् इनहिस्टोरियोग्राफी’ (१९-२१ फेब्रुवारी २००२) या चर्चासत्रातील माझ्या निबंधावर आधारित संक्षिप्त व संस्कारित स्वरूपातील मजकूर आहे. चर्चासत्राचे संयोजक आणि चर्चेत सहभाग घेणाऱ्यांचा मी आभारी आहे – प्रा. देवेंद्र इंगळे)

१) मून वसंत (संपा.), डॉ.बाबासाहेब आंबेडकर रायटिंग्ज अँड स्पीचेस (BAWS), महाराष्ट्र शासन, एज्युकेशन डिपार्टमेंट, मुंबई १९८९, व्हॉल्युम १, पृ.६६ आणि सावरकर वि.दा., समग्र सावरकर वाङ्मय (ससावा), समग्र सावरकर संकलन समिती, महाराष्ट्र प्रांतिक हिंदू सभा, पुणे, प्रथम आवृत्ती,१९६५, खंड ४, पृ. ६८७)
२) ससावा, खंड, पृ. ५८६
३) BAWS, खंड ३
४) सावरकर वि.दा., (अनु. पटवर्धन वि.वि.), हिंदुत्व, प्रकाशक ग.वि.दामले, मुंबई, आ.पहिली,१९४७
५) ससावा, खंड पृ. ४२७
६) ससावा, खंड, पृ. ६२३
७) ससावा, खंड पृ. ६३९
८) ससावा, खंड, पृ. ६४४
९) ससावा, खंड पृ. ६४९
१०) BAWS, खंड ३, पृ. २७५
११) BAWS, खंड ३, पृ. ४१९-२०
१२) BAWS, खंड ३, पृ. २७५
१३) BAWS, खंड 3, पृ. ७१
१४) Gore M.S., The Social Context of an Ideology, Sage, New Delhi, P. 294
१५) Gore M.S., ibid, P. 252
१६) BAWS, खंड ३, पृ.
१७) BAWS, खंड ३, पृ.
१८) BAWS, खंड ३, पृ.
१९) Ambedkar B. R., Buddha and His Dhamma, P. 346-47
२०) BAWS, खंड ३, पृ. २६९
२१) BAWS, खंड ३, पृ. २७१
२२) BAWS, खंड ३, पृ. २७५
२३) सावरकर वि.दा., हिंदुत्व, पृ. ८२
२४) कसबे, रावसाहेब, हिंदू-मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदू राष्ट्रवाद सुगावा, पुणे,१९९४, पृ. ३०१
२५) सावरकर, हिंदुत्व, पृ. ८२
२६) ससावा, खंड ५, पृ. २५४
२७) BAWS, खंड ३, पृ. ३०४
२८) Gore M.S., ibid, P.252
२९) BAWS, खंड ३, पृ.
३०) आता हे पुराभिलेखीय पुराव्यांनिशी सिद्ध झाले आहे. पाहा – मार्झिया कॅसोलरी यांचा लेख, ‘हिंदुत्वाज् फॉरेन टाय-अप इन दी नायन्टीन थर्टीज् आर्कायव्हल इव्हिडन्सेस’, इपीडब्ल्यू, जाने. २२, २०००, पृ. २१८२२८
३१) थिटे गणेश यांचा लेख, संशोधक, डिसें. १९९५ वर्ष ६३, अंक ४, पृ. २९
३२) थापर रोमिला, (अनु. शिरगावकर शरावती), अशोक आणि मौर्याचा हास, म.रा.सा.सं.मं., १९८८, मुंबई, पृ. १९७.
३३) Aloysious G., Nationalism Without A Nation In India, OUP, New Delhi, P.154
३५) विवेकानंदनगर, जळगाव – ४२५००२. भ्र. ध्व.:

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.