[पुस्तके व इतर ललित-वैचारिक कलाकृतींचा परिचय व समीक्षा करणारे हे सदर आपण गेल्या तीन महिन्यांपासून चालवीत आहोत. ह्यामध्ये अनेक विषयांवरच्या कलाकृतींचा अंतर्भाव होईल. साहित्य अर्थातच त्याला अपवाद नसेल.
स्त्री-पुरुष नाते त्यांच्या (विशेषतः स्त्रीच्या) रूपावर अवलंबून असावे का ह्या आदिम प्रश्नाचा वेध एका मिथक कथेच्या व त्यावर आधारित टागोरांच्या नाटकाच्या निमित्ताने ह्या लेखात घेतला आहे. ह्या प्रश्नाशी असलेला (आजच्या आपल्या) मानवी वर्तनाचा संबंध ध्यानात घेऊन कृपया हा लेख वाचावा – संपादक ]
भारतीय साहित्यपरंपरा विलक्षण समृद्ध आहे. भारतातील विविध प्रदेश, विविध भाषा, विविध वैशिष्ट्यांनी समृद्ध झालेली संस्कृती, लोकजीवन, लौकिकासोबत पारलौकिकाची अनुभूती, येथे स्थापन झालेले, विकसित झालेले व बाहेरील जगतातून येऊन येथील प्रवाहात मिसळलेले धर्म व दर्शने अनेकविध विद्याशाखा, असंख्य विचारप्रणाली, वेद-उपनिषदे, बुद्ध-चार्वाक यांच्या तत्त्वज्ञानापासून ते आजच्या तंत्रज्ञानापर्यंत झालेला भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास या साऱ्यांचे यथार्थ प्रकटीकरण भारतीय साहित्य करीत आलेले आहे. भारतीय साहित्य परंपरा वेद-उपनिषदे महाकाव्ये यांपासून ते आजच्या उत्तराधुनिक साहित्यापर्यंत चालत आलेली आहे. सर्जनशील साहित्यकृतींनी समृद्ध होत आलेली आहे. या परंपरेतील आधुनिक परंतु तरीही ऋषितुल्य असा कवी म्हणजे म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर.
भारतीय साहित्यात आजवर रवींद्रनाथांसारखी अलौकिक विविधांगी, साहित्याची अफाट भर क्वचितच कुणी घातलेली असावी. ह्या योगदानामुळेच अखिल विश्वात रवींद्रनाथांची ओळख ही भारतीय संस्कृतीचे एक सर्वंकष दिव्य प्रतीक म्हणून निर्माण झाली.
रवींद्रनाथ मूलतः कवी म्हणूनच ओळखले जातात. कारण अगदी स्वाभाविक आहे – रवींद्रनाथांची कविता हा एक मानवी हुंकार आहे, आणि जे-जे मानवी असते, ते वैश्विक असते. रवींद्रनाथांच्या काव्यरचना अलौकिक तर आहेच, मात्र त्यांची नाटके, कादंबरी, कथा आदी साहित्यरचनादेखील तितक्याच ताकदीच्या आहेत. रवींद्रनाथांचे सारेच साहित्य पारलौकिक कल्पनाशक्ती, आत्यंतिक संवेदनशीलता, निखळ जीवननिष्ठा यांचे प्रतिबिंब आहे. पु.ल.देशपांडे म्हणतात तसे प्रेम, सुंदरता व स्वातंत्र्य यांच्यावर रवींद्रनाथांची अढळ श्रद्धा आहे. या साऱ्यांचे यथार्थ दर्शन रवींद्रनाथांच्या साहित्य-कृतींमध्ये होते.
‘चित्रा’ रवींद्रनाथांचे एक आगळे-वेगळे नाटक. ते आगळेवेगळे दोन अर्थांनी. तर ते मिथक नाटक आहे; आणि दुसरे म्हणजे ते स्त्री-वादी नाटक आहे. आजच्या काळात मिथक नाटके किंवा स्त्रीवादी नाटके अगदी अपवादात्मक आहेत असे नव्हे. मात्र १८९४ साली आलेले ‘चित्रा’ (चित्रांगदा) हे नाटक मिथक नाटक असून, काळाच्या पुढचे आहे. या नाटकातील आधुनिकताही त्या नाटकाची विषयवस्तू, पात्रे व दृष्टिकोण यांमुळे आहे. त्यातून त्यांनी ते सरळपणे न मांडता मिथकरूपात मांडलेले आहे. ‘चित्रा’ हे रवींद्रनाथांचे एकमेव मिथक-नाटक आहे. ते उपलब्ध मिथकांचा वापर न करता ते नवीन-मिथके निर्माण करतात. मिथक-अभ्यासक राजीव नाईक म्हणतात त्याप्रमाणे नाटकात नवीन मिथके निर्माण करणारे फारच कमी लेखक आहेत. डब्ल्यू.बी. यीटस् हे पाश्चात्त्य आणि पु.शि.रेगे हे भारतीय अशी इतर दोन उदाहरणे देता येतील. ‘चित्रा’ मिथक नाटकाचा विचार करण्यापूर्वी आपण मिथक या प्रकाराची थोडी ओळख करून घेऊ या.
मिथके बहुधा प्राचीन काळातीत असतात. ती जो मानवी अनुभव व्यक्त करतात, तो सर्वस्पर्शी, चिरंतर व सार्वकालिक असतो. एनसायक्लोपीडिआ ब्रिटॅनिकाच्या मते, “मिथके ही सूचित केलेली वर्णने असतात. ती अधिकारवाणीने मांडलेली असतात. सर्वसामान्य मानवी जगापलीकडे जाऊन ती घटिते आणि स्थितीबद्दल बोलतात. वर्णन केलेली घटिते जेव्हा घटतात, तो काळ मानवी अनुभवील सर्वसाधारण ऐतिहासिक काळापेक्षा वेगळा असतो. कथनातील पात्रे ही बहुधा देव किंवा अतिमानवी जीव असतात. मानवी भावविश्वात युद्ध आणि शांती, जीवन आणि मृत्यू, सत्य आणि असत्य, शिव आणि अशिव ह्यांसारखे कळीचे मुद्दे समजून घेण्याकरता लागणाऱ्या ज्ञानाचे मिथक-जग हे कायमचे स्रोत ठरते.” एकूणच मानवी जीवनाचे अस्फुट प्रकटीकरण मिथकांद्वारे होत असते. असाच अनुभव रवींद्रनाथांचे ‘चित्रा’ वाचताना येतो.
‘चित्रा’ नाटकाचा विषय हेदेखील एक सर्वस्पर्शी, सार्वकालिक असे मिथक आहे. स्त्री-पुरुषसंबंध अन् संबंधातील स्त्री-पुरुषांचे एक व्यक्ती म्हणून स्वतंत्र अस्तित्व यांच्याशी हे मिथक निगडित आहे. प्रत्येक व्यक्ती एका शोधात असते. हा शोध कधी जाणतेपणाने होत असतो, तर कधी अजाणतेपणाने. तो शोध असतो स्वत्वाचा शोध. ‘स्वत्वाचा शोध’ हे मिथक अनेक रूपांत भारतीय साहित्यात सापडते. व्यासांच्या महाभारतात तर ते पुनःपुन्हा प्रकटते. रवींद्रनाथांचे ‘चित्रा’ हे नाटकदेखील महाभारतातील एका छोट्याश्या उपकथानकावर आधारित आहे. परंतु ते सरळधोट पौराणिक नाटक न राहता, त्यातील ‘स्वत्व जाणीव व शोध’ या मिथकामुळे काव्यात्मक आकृतिबंधातील एक आधुनिक नाटक बनते. नाटकाचे वैशिष्ट्ये असे की, ते एकाच वेळी काव्यात्म आणि वास्तववादीदेखील आहे. या नाटकाची मांडणी, त्यातील संवाद, व्यक्तिरेखा, त्यातील दृश्ये आदि साऱ्या गोष्टी उत्कट, प्रत्ययकारी आहेत. एखाद्या मिथक नाटकात असायला हवेत ते सर्व घटक त्यात आहेत. परंतु नायिका चित्रांगदाची स्वत्व-जाणीव व आत्मभान, त्या नाटकाला अर्वाचीन बनवतो.
महाभारतात सांगितलेली ‘अर्जुनाच्या आणखी एका लग्नाची गोष्ट’ रवींद्रनाथांच्या प्रतिभास्पर्शाने व ‘काल्प-सहसंवेदनेमुळे (Imaginative Sensibility) स्त्रीच्या स्वत्व- जाणीवेच्या आदिम कळकळीचे प्रतीक बनली आहे. या नाटकात नाद आहे, काव्य आहे, रम्याद्भुतता आहे. त्यामुळे हे नाटक रोमॅण्टिक आहे. त्याचबरोबर मानवी मनाच्या सूक्ष्मातिसूक्ष्म आंदोलनाच्या चित्रणामुळे ते रिअॅलिस्टिकदेखील आहे.
‘चित्रा’ या नाटकातील ‘चित्रांगदा’ ही मणिपूरची राजकन्या आहे. आपल्या या एकुलत्या एका मुलीला राजा चित्रवाहनाने मुलासारखे वाढवलेले आहे. चित्रा हीच राज्याची उत्तराधिकारी आहे. राज्याचे, प्रजेचे शत्रूपासून रक्षण करता यावे, यासाठी आवश्यक असलेले सारे प्रशिक्षण, युद्धकलेचेदेखील, तिला देण्यात आलेले आहे. एकूणच चित्रा ही वागण्यात, बोलण्यात, दिसण्यात स्त्रीसारखी सुकोमल नाही. तिचा पेहराव, तिचा अभिनिवेश हा पुरुषीच आहे. या तरुण चित्राची महत्त्वाकांक्षादेखील विलक्षण आहे, ती म्हणजे धनुर्विद्येत पांडवकुलीन अर्जुनाशी दोन हात करून त्याला पराभूत करण्याची. हाच अर्जुन योगायोगाने त्रिदंडी संन्यासाच्या निमित्ताने मणिपूरच्या वनात वास्तव्य करत आहे. या अर्जुनाला वनात पाहताच चित्रा त्याला ओळखते अन् प्रथमदर्शनीच त्याच्या प्रेमात पडते. त्याक्षणी, आयुष्यात पहिल्यंदा ‘तिला ती ‘स्त्री’ असल्याची जाणीव होते. पण विपरीत असे की समोर आलेल्या चित्राची मुळीच दखल न घेता अर्जुन तेथून निघून जातो. एकीकडे प्रथमदर्शनी झालेले प्रेम अन् दुसरीकडे अर्जुनाने तिच्याकडे केलेले दुर्लक्ष यात चित्रा होरपळून निघते. पण वसंत आणि मदन हे दोन देव चित्राच्या मदतीला येतात आणि एका वर्षासाठी तिला अनुपम सौंदर्य बहाल करतात.
पुढच्या भेटीत मात्र अर्जुन त्या सुंदर चित्राच्या प्रेमात पडतो. तेथून त्या दोघांचा प्रणयरम्य सहवास सुरू होतो, मात्र त्याचबरोबर चित्राच्या मनात घालमेलही सुरू होते. जे वास्तवतेचे भान अर्जुनाला नाही, ते तिला आहे. जे सौंदर्य तिचे स्वतःचे नाही. तिच्या मूळ रूपाबद्दल तो अनभिज्ञ आहे. चित्राचा खरा पिंड कर्तृत्व गाजवण्याचा आहे. केवळ छान दिसण्याचा नाही. पराक्रम गाजवणे, प्रजेचे रक्षण करणे ह्यात तिचे सार्थक आहे. पण ज्यावर प्रेम केले त्याला मिळवण्यासाठी हे गुण नव्हे तर सुंदर-सुकोमल असणेच आवश्यक आहे!
चित्रा अस्वस्थ आहे. वरदानात मिळालेले सौंदर्य वर्षभरानंतर नाहीसे होईल, तेव्हा काय? चित्राची खंत अशी की अर्जुन ‘चित्रावर’ नव्हे, तिच्या रूपावर प्रेम करतोय. चित्राची खरी ओळख त्या सौंदर्याच्या आवरणात हरवलीय. तिला स्वत्वाची जाण आहे. ती स्त्रीत्वाची अनुभूती तिने अर्जुनाच्या प्रेमात पडून अनुभवलीय पण त्याचबरोबर ‘माणूस’ म्हणून तिचे जे स्वत्व, अस्तित्व आहे, त्याचे काय? अर्जुनाला प्राप्त करण्यासाठी तिने उसने सौंदर्य मिळवले खरे, पण स्वत्वाची जाणीव न गमावी; आणि उसन्या सौंदर्याच्या बळावर मिळालेले प्रेम, नाते किती दिवस टिकणार? चित्राच्या मानसिकतेत, स्त्रीचा आदिम संघर्ष, जो आजच्या काळातही तेवढाच, कदाचित अधिकच तीव्र आहे, प्रतिबिंबित झाला आहे. स्त्री कशी असावी हे पुरुषप्रधान समाज ठरवतो. ती आहे तशी स्वीकारली जात नाही.
प्रणयधुंदीतून भानावर आलेला अर्जुन मणिपूरची पराक्रमी राजकन्या चित्रांगदा हिच्याबद्दल ऐकलेल्या कहाण्यांनी तिला भेटायला उत्सुक होतो. तिच्या पराक्रमाबद्दल, तिच्या पुरुषासारख्या कर्तृत्वाबद्दल त्याला कुतूहल वाटू लागते. चित्रा आणि अर्जुन यांची तुलना करून स्त्री-पुरुष स्वभावाच्या परस्परविरोधी पैलूंवर प्रकाश टाकला आहे. प्रणयाच्या धुंद सहवासात चित्राचे आत्मभान क्षणभरही सुटत नाही. अर्जुन मात्र आपला तथाकथित संन्यास, त्याचे कर्तव्य यांना विसरून तिच्या सहवासात सारे आयुष्य घालवू इच्छितो. त्याची तशी इच्छा ऐकून आपल्या कर्तव्याशी दिन-रात निष्ठावान असलेली चित्रा, अर्जुनाच्या या इच्छेचा व ती पूर्ण करण्यात आड येणाऱ्या सौंदर्याचा धिक्कार करते.
चित्राचे आत्मभान मात्र सदैव जागृत असणे, हेच तिच्या दुःखाचे कारण आहे. स्वत्वाचा त्याग करून मिळवलेले प्रेम तिला सुख देऊ शकत नाही. प्रेमाची परिपूर्ती जिवलगाच्या स्वत्वाच्या परिपूर्ण स्वीकारात असते. चित्रा ही मणिपुरी नायिका आहे आणि हा विलक्षण योगायोग आहे. आजही मणिपूर (ईशान्य भारतीय राज्य) स्त्री-प्रधान समाजासाठी ओळखले जाते. मणिपुरी वाङ्मयात, नाटकांत ‘सामर्थ्यशील स्त्री’, ‘लढणारी स्त्री’, ‘सोसणारी आई’ ही मिथके वारंवार डोकावतात. ‘टिकेंद्रजीत’ या एका मणिपुरी नाटकातील एक स्त्रीपात्र ‘मैपाकी’ राज्यरक्षणासाठी हाती तलवार घेऊन सेनापतीला सांगते की ‘स्त्रीचे सौंदर्य साजशृंगारामुळे नाही तर तिच्या कर्तृत्वामुळे आहे. राज्यातील घराघरात माझ्यासारख्या मैपाकी आहेत.’ मणिपूर नाटकांमध्ये स्त्रीचे सामर्थ्य, मानवी सामर्थ्याचाच भाग आहे. चित्रा याच परंपरेतील स्त्री आहे.
अर्जुन जेव्हा ‘राजकन्या चित्रांगदेस भेटावे अशी इच्छा चित्राजवळ व्यक्त करतो तेव्हा ती त्याला स्पष्टपणे सांगते की, पुरुषांसाठी सजणे, हसणे, रडणे, त्याच्यासाठी जगणे अशीच स्त्री पुरुषाला हवी असते. आता या क्षणी अर्जुनाला त्या पराक्रमी स्त्रीचे आकर्षण वाटत असले, तरी ती चित्रांगदा (चित्रा) तिच्या खऱ्या स्वरूपात अर्जुनाला भावलीच असती असे नव्हे. (नाटकाच्या सुरुवातीला हे प्रत्यक्षात घडलेच होते.) स्त्रीचे रूप-बाह्य सौंदर्य तिच्यासाठी पिंजरा ठरतो. तो कितीही हवासा वाटला, आकर्षक वाटला तरी त्यात केवळ जीवघेणी घुसमटच होऊ शकते.
या नाटकाचा आजच्या काळाच्या संदर्भात विचार करताना एक वेगळा अन् क्रांतिकारी दृष्टिकोण रवींद्रनाथ मांडताना दिसतात. तो दृष्टिकोण केवळ दृष्टिकोण न राहता एक तत्त्व म्हणून समोर येतो. ते तत्त्व म्हणजे ‘कर्तृत्व हे लिंगनिरपेक्ष असते’ आणि त्यापुढे जाऊन ‘सुंदरता ही केवळ शारीरिक बाब असू शकत नाही. मेरी वालस्टोन क्राफ्टपासून सिमोन दी बोहा, आणि सिमोन दी बुलोवापासून आजच्या कुठल्याही स्त्रीवादी विचारवंतांचे विचार यापेक्षा फार वेगळे असणार नाहीत. ‘स्वत्वाचे भान’ हे व्यक्तीच्या आयुष्यातील अटळ असा प्रगतीचा टप्पा असतो हे मान्य केले जाते खरे, पण हा टप्पा स्त्रीच्या आयुष्यात येऊ शकतो, हे मात्र सहजपणे नजरेआड केले जाते. आजच्या ‘मार्केट इकॉनॉमी बेस्ड समाजरचनेत ‘स्त्री’च्या आत्म-भानापेक्षा, तिच्या ‘माणूस’ म्हणून अस्तित्वापेक्षा तिचे ‘स्त्री म्हणून असलेल्या वैशिष्ट्यांना’ अधिक महत्त्व मिळतेय; अर्थात ही विसंगती असली तरी स्वत्वाची जाण होऊ घातलेल्या, असलेल्या स्त्रियांची संख्या खचितच वाढतेय. ‘चित्रा’ या स्त्रियांची प्रतिनिधी आहेच. पुढे जाऊन ती आधुनिक स्त्री’चा आदर्श उभा करते. स्वतः कर्तृत्ववान होऊन आपल्या प्रेमाच्या (शरीराच्या नव्हे) बदल्यात प्रेम मिळावे अशी आस असणारी चित्रा आधुनिक नव्हे काय?
‘चित्रा’च्या व्यक्तिरेखेच्या तुलनेत विचार करता अर्जुन हा पुरुषीच ठरतो, आणि आजच्या स्त्रीच्या तुलनेत आजचा पुरुषही तेवढाच ‘अर्जुन’ ठरतो. आजही शारीरिकतेच्या पलिकडे जाऊन स्त्रीचा ‘माणूस’ म्हणून स्वीकार करणे पुरुषाला कुठे जमतेय? नाटकातील अर्जुनाला शय्येला स्त्री, मृगयेला हरिण लागते. त्याचे पुरुषीपण कर्तृत्वावर कमी, इतरांच्या अबलापणात, असहायपणात अधिक ठरतेय.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस, भारतीय समाज अजून मध्ययुगीन ग्लानीत असताना रवींद्रनाथांची मनोरंजक संस्कृत नाटकांच्या परंपरेला छेद देऊन एक उत्तर-आधुनिक नाटक संस्कृत नाटकाच्या परिवेशात मांडले, ही केवढी तरी क्रांतिकारी घटना होय. व्यासांच्या महाभारतातील एक उपकथानक, त्यातील मिथकाचे नाट्यरूपात रवींद्रनाथाी केलेले विश्लेषण व त्याचा वास्तवाशी जोडलेला धागा, हे या नाटकाला-‘चित्राला’ – एक कालातीत कलाकृती बनवून जातात.
शिरपूर (धुळे)