मूळ लेखक : नीता देशपांडे
काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशच्या एका खेड्यात स्वयंसेवक म्हणून काम करताना तिथल्या दोन हसऱ्या किशोरींनी एक दिवस मला जेवायला बोलावलं. त्या तेव्हा रोज दुपारी शाळेत येऊन हिन्दी वर्णाक्षरे शिकायचा चिकाटीने प्रयत्न करीत असत. मी जेवायला बसले तसा एक प्रश्न माझ्या मनात आला, जो शहाण्या मुलींनी विचारायचा नसतो हे मला माहीत होतं. ते जेवणात भाजी खात नाहीत काय? काही दिवसांतच मला त्याचं उत्तर मिळालं. त्या दिवशी मुलींनी वरण केलं होतं, म्हणून भाजी नव्हती. ज्या दिवशी त्या भाजी करायच्या, त्या दिवशी वरणाला सुटी असायची. रोजचं संपूर्ण जेवण म्हणजे त्यांच्यासाठी चैनीची गोष्ट होती. इतर हजारो-लाखो भारतीयांप्रमाणे, मीरा आणि गुड्डा उपाशी वा अर्धपोटीच झोपत असत. त्यांची जगण्याचीच पद्धत होती ती. तिच्याबद्दल विचार काय करायचा?
स्वातंत्र्यानंतर सहा दशके उलटून गेली आहेत. महासत्तेच्या गोष्टी मोठमोठ्याने करत असताना भारताने एका बाबतीत तरी उर्वरित जगाला मागे टाकले आहे, ती म्हणजे भूक! जगातले सर्वाधिक भुकेले लोक आपल्या देशात आहेत. द रिपब्लिक ऑफ हंगर ह्या आपल्या निबंधात अर्थशास्त्री उत्सा पटनाईक ह्यांनी नमूद केल्याप्रमाणे, भारतात आणखी एक आफ्रिका आहे. दरडोई कॅलरी सेवनावरील वर्ष 1999-2000 मधील नॅशनल सँपल सर्व्हेच्या आकडेवारीनुसार, पटनाईक ह्यांच्या मते, आपल्या ग्रामीण भागातील चाळीस टक्के लोकसंख्येची अन्न-अवशोषणाची पातळी दक्षिण आफ्रिकी राष्ट्रांइतकी कमी आहे. ह्या वाक्यावर बसलेला हादरा आणि लज्जा थोडी रोखून ठेवा, कारण आपल्या असहायतेची गोष्ट त्याच्याही पलीकडे जाते. लाखो भारतीयांसाठी जीवनावश्यक अन्न मिळणे हे तर मृगजळ आहेच, पण ह्याच नाण्याची दुसरी बाजू अशी की इ.स. दोन हजार मध्ये तीन कोटी भारतीयांना एक अशा प्रकारचा मधुमेह झाला होता, जो स्थूलता, निःसत्त्व अन्न आणि बैठी जीवनशैली ह्यांच्याशी संबंधित आहे. जगभराची आकडेवारी पहायला गेलो, तर ती संभाव्यतेच्या परिघात येत असलीच तर, अधिकच चक्रावून टाकणारी आहे. जगात ऐंशी कोटी भुकेले आणि एक अब्ज अतिवजनाचे लोक आहेत. अतिवजनाचे लोक भुकेलेल्यांपेक्षा जास्त होण्याची वेळ जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच आली आहे. इतका दुर्दैवी प्रसंग आपल्यावर का आला? ‘ह्या दुर्गतिसाठी कोण जबाबदार आहे? शेवटचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण त्याबाबत काय करू शकतो? राज पटेल ह्यांनी स्टफ्ड् ऍड स्टाव्हर्ड् ( ठासून भरलेले आणि भुकेले) घालणारे हे पुस्तक आपल्याला ह्या प्रश्नांच्या गाभ्यात शिरून त्यांचे उत्तर शोधायला भाग आपल्या पुस्तकात वरील प्रश्नांचा ऊहापोह केला आहे. डोळ्यांत झणझणीत अंजन पाडते. आहार, आरोग्य, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र ह्यांच्यामधील परस्परसंबंध उलगडून लेखक देशदेशांतरीच्या कृषिविषयक कॉर्पोरेशन्स, जेनेटिकली मॉडिफाईड पिके, आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था आणि मुक्त व्यापार, सुपरमार्केट्स् आणि तंत्रज्ञान, शासकीय धोरणे आणि ह्या सगळ्यामध्ये पडलेले आजच्या भीषण अन्नसंकटाचे प्रतिबिंब आपल्याला दाखवतो. पुस्तकाच्या साध्या-सरळ निवेदनामध्ये अनेक गोष्टीही गुंफल्या आहेत. खूप मोठ्या भौगोलिक प्रदेशात हिंडवून, काळाच्या परिमाणात मागे-पुढे नेऊन लेखक आपल्याला आपण काय खावे, कसे राहावे आणि अगदीच थेट शब्दांत सांगायचे तर आपल्यापैकी काहींनी का मरावे हे सर्व मुद्दे कॉर्पोरेट कंपन्याच कसे ठरवतात ह्याचे एक सुस्पष्ट चित्र आपल्यापुढे उभे करीत आहे. पुस्तकात आपल्याला युगांडामधील कॉफी उत्पादक लॉरेन्स सेगुया भेटतो. त्याला नाईलाजाने आपले उत्पादन स्थानिक मध्यस्थाला चौदा अमेरिकी सेंट्स् प्रति किलो दराने विकावे लागते. दुसरीकडे इंग्लंडमधील सुपरमार्केट्स् तीच कॉफी भाजून व प्रक्रिया करून 26.40 डॉलर्सला म्हणजे सेगुयाला मिळणाऱ्या किंमतीच्या 200 पटीने अधिक किंमतीला विकतात. पार्वती मसायाचे दुःख आपल्याला हेलावून टाकते, जिचा हैदराबाद नावाच्या विलासी शहरापासून केवळ पाच तासांच्या अंतरावर राहणारा पती किस्तैया लहरी पाऊस आणि जीवघेण्या कर्जाचा विळखा ह्यामधून सुटका मिळवण्यासाठी भारतातील हजारो शेतकऱ्यांप्रमाणेच कीटकनाशक पिता झाला. ब्राझिलचा सोय किंग ब्लाइरो मॅगी हा जगातील सोयाबीनचा सर्वाधिक मोठा एकटा उत्पादक ऍमेझॉनच्या वर्षा वनातील व ब्राझिलच्या गवताळ प्रदेशातील प्रचंड वृक्षतोडीस कसा कारणीभूत ठरला तेही ह्यात वाचायला मिळते. जगातील सर्वात मोठे कॉर्पोरेशन असलेल्या वॉल मार्ट च्या कर्मचाऱ्यांच्या किंकाळ्याही आपल्याला ऐकू येतात. तेथे बाल कामगारांकडून रात्री उशीरापर्यंत काम करून घेतले जाते, कर्मचाऱ्यांना जेवणाची सुटी घेता येत नाही, लघवीलाही जाता येत नाही आणि हे सर्व कशाकरता तर दैनंदिन कमी किंमती ठेवता याव्यात म्हणून.
विविध गोष्टी एका सूत्रात गुंफून लेखकाने सर्वदूर पसरलेली भूक आणि स्थूलता ह्या मानवतेला काळिमा फासणाऱ्या विकृती आजच्या कॉर्पोरेट अन्नव्यवस्थेने आणल्या आहेत. त्या आपल्याला आपले आयुष्य सुधारण्याची संधी नाकारतात. उदा. टेलिव्हिजनवरून भुरळ पाडणाऱ्या जाहिरातींमधल्या एकूण 28 प्रकाराच्या धान्यांपैकी न्याहरीसाठी कोणते निवडायचे हे ठरवण्याची संधी ब्रिटिश मुलांना आज आहे. ह्यांपैकी सत्तावीस प्रकारांमध्ये शासकीय शिफारशींपेक्षा अधिक शर्करा आहे. त्यापैकी नऊ प्रकारांमध्ये तर चाळीस टक्के शर्करा आहे. हे झाले सुपरमार्केट्सनी दिलेल्या निवडीच्या स्वातंत्र्याचे एक उदाहरण. आहार-आरोग्याच्या बाबतीत आपण एका कृतक जगात राहतो, जेथे आपल्याला, कॉर्पोरेशन्सना ज्यामधून फायदा मिळेल असेच अन्न खाण्यास भाग पाडले जाते. अशा रीतीने ही ब्रिटिश मुले शर्करायुक्त धान्यावर वाढतात आणि इकडे त्यांचे मध्यमवर्गीय भारतीय बांधवही बाजारपेठेने पुरस्कृत केलेल्या निःसत्त्व आहारावर जगतात. त्यातही गरीब भारतीय मुलांना काहीच खायला नसते. तीन वर्षांपर्यंतची 46 टक्के भारतीय मुले तर कुपोषितच आहेत. नव्वदच्या दशकात मनमोहन सिंग वित्त मंत्री असताना त्यांनी केलेल्या सुधारणा आणि आज देशाला हादरवून सोडणारी विषमता ह्यांच्यातील साटेलोटे समजावून सांगण्याचे कार्य ह्या पुस्तकाने केले आहे.
लेखकाने त्या आर्थिक स्वातंत्र्याच्या युगातील भारतीय सामाजिक-राजकीय अनुभवाचे पैलूही आपल्या ओघवत्या भाषेत उलगडून दाखवले आहेत. बाजाराचा अदृश्य हात ह्या सगळ्या परिस्थितीच्या मागे कसा कार्यरत आहे ते ह्यातून स्पष्ट होते. नवीन आर्थिक धोरणांनी, गरिबांसाठी असलेले सामाजिक पाठबळ आणि संरक्षणाच्या यंत्रणा नष्ट केल्या. ग्रामीण भागातील गरिबांना ग्रासून टाकणाऱ्या संकटातून बाहेर पडण्यास त्यांना प्रवृत्त करण्यासाठी युनायटेड प्रोग्रेसिव अलायन्सने दिलेल्या कर्जमाफीसारख्या युक्त्या प्रयुक्त्या फार काही करू शकलेल्या नाहीत. देशाची प्रगती आणि विकास ह्याची किंमत चुकवताना गरिबांची विलक्षण कोंडी झाली आहे. त्यांच्या मूलभूत गरजाही भागत नसल्यामुळे शरीर-मनाचे किमान स्वास्थ्यही त्यांना अनुभवता येत नाहीय. लेखकाच्याच शब्दांत सांगायचे तर, बाजारपेठेमुळे जेव्हा लोक उपासमारीने मरतात, तेव्हा अदृश्य हात आपले ठसेही मागे ठेवत नाहीत.
अत्यंत योग्य शब्दांचा वापर करून लिहिलेले स्टफ्ड् ऍड स्टाव्हर्ड् हे पुस्तक जागतिक अन्न व्यवस्थेचे यथायोग्य चित्र दर्शवून त्यामागील राजकारणाशी सर्वसामान्य वाचकास अवगत करते. लेखक मेक्सिकोमधील गरीब शेतकऱ्यांच्या संबंधात असलेल्या उत्तर अमेरिकी मुक्त व्यापार कराराबद्दल लिहीत असो वा भारत सरकारने दारिद्र्यरेषा खाली आणून केलेल्या गरिबांच्या क्रूर थट्टेविषयी. सगळी किचकट व आकडेवारी सुगम गोष्टींमध्येच त्याने गुंफली आहे. विश्लेषणे आणि युक्तिवादही असेच सहजगत्या येतात. क्लिष्ट परिभाषेचा वापरही त्याने टाळला आहे. त्याने वाचक त्यात अनायास गुंतत जातो. उदाहरणार्थ मुक्त व्यापार स्पर्धेवर कितीही काव्य केले, तरी तिच्या अंदरकी बात काय आहे ते सांगताना तो म्हणतो, उत्पादकांची संख्या कमी असल्याचे गृहीत धरले जाते, त्यांच्यात जबरदस्तीने स्पर्धा लावून किंमती कमी करायला भाग पाडले जाते ज्यामुळे त्या मोजक्या उत्पादकांना कमी नफा मिळतो, आणि अनेक ग्राहकांना काहीशा स्वस्ताईचा लाभ होतो. यातील मेख अशी आहे की शेतीमध्ये कित्येक उत्पादक असे असतात की जे प्रत्यक्षात ग्राहकांपेक्षाही गरीब असतात. किंमती घसरल्या की शेतकरी आणि शेतमजुरांचे उत्पन्न आपोआप कमी होते. त्यांना जास्त उपभोग घेता येत नाही. त्याशिवाय, मुक्त व्यापारातून मिळणारा मलिदा गरिबांना क्वचितच पुनर्वितरित केला जातो. सरकारी हस्तक्षेप हा वाक्प्रयोग तर आधीच बदनाम झाला आहे. त्यामुळे परिणाम एकच – घसघशीत फोफावणारी विषमता.
आजच्या वाढत्या विषमतेचे ऐतिहासिक मूळ शोधण्याचाही प्रयत्न पुस्तकात केला आहे. त्यासाठी ब्रिटनमधील वसाहतवाद, पंधराव्या शतकापासून तेथे जोम धरू लागलेली एनक्लोजर प्रथा (त्या देशात सार्वजनिक जमिनीला कुंपणे घालून त्या सरदार व अमीर-उमरावांच्या वापरासाठी राखून ठेवण्यात आल्या, जी खाजगीकरणाची सुरुवात मानली जाते.) त्यानंतर देशाची सामंतशाहीतून भांडवलवादाकडे वाटचाल व भारत, चीन इत्यादींचे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या गुंत्यात फसणे. ह्यातून, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा इमला हा शोषणासाठीच उभारला होता असा निष्कर्ष. अफ्रिकेतील गुलाम संयुक्त संस्थानातील धनिकांच्या मळ्यांवर कामासाठी जाणे, कॅरीबियन आणि ब्राझिल देशांनी शहरी युरोपीय लोकांना अर्थसहाय्यित अन्नधान्य देणे, भारतातील अन्नधान्य ब्रिटिश बाजारपेठांमध्ये फुंकून टाकणे. त्याच्या परिणाम वाढती भूक आणि गरिबी, लाखों लोकांचे बळी. आधुनिक युगाच्या अन्नव्यवस्थेचा पाळेमुळे खणून झाल्यावर पुस्तक अमेरिकेची उभारणी व तेथील मार्शल प्लान (दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपला मदत करण्याचा अमेरिकेचा कार्यक्रम.) नियम 480 वा प्लान 480 (P.L. 480) ज्याद्वारे अमेरिकी अन्नसहाय्य एका नवीन सीमारेषेला पोहोचले. ती रेषा म्हणजे जागतिक दक्षिण दिशा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन आणि फोर्ड ह्या दोघांच्या मंत्रिमंडळात कृषी सचिव असलेल्या अर्ल बट्झ ह्यांचे विधान उद्धृत केले आहे. ‘भुकेले लोक नेहमीच ज्यांच्याकडे भाकरीचा तुकडा आहे अशा लोकांचे ऐकतात. अन्न हे साधन आहे. आपल्या वाटाघाटींच्या थैलीतले ते एक हत्यार आहे.’ त्याचबरोबर, हरित क्रांतीबरोबरच एक नवीन राजकीय व्यवस्था व नवीन अर्थव्यवस्था आकाराला आली. आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष, विश्व बँक आणि जागतिक व्यापार संघटना हे त्याचे प्रमुख घटक होते. त्यांनी अन्नधान्यावर नव्हे, तर कर्ज व पैशाच्या सहाय्याने गरीबगुरीबांना नियंत्रणाखाली ठेवले. आहार कधी टेलिव्हिजनने तर कधी दक्षिण अफ्रिकेतील वंशभेदाने कसा ठरविला जातो त्याचीही वाचकाला झलक दिसते. जागतिक अन्नधान्य व्यवस्था आणि आपल्या जीवांच .जाता जाता, अमेरिकेतील नियंत्रण ह्यावर प्रश्न उपस्थित करता करता, पुस्तकात ह्याहून वेगळ्या जगाच्या आशेची बीजंही मधूनमधून पेरली आहेत. परिवर्तन, न्याय आणि स्वातंत्र्य ह्यांसाठी संस्था आणि चळवळी तयार करणाऱ्या अनेक गटांच्या कथाही ह्यामध्ये सांगितल्या आहेत. त्यांच्यापैकी एक गोष्ट ही ब्राझिलच्या भूमिहीन ग्रामीण मजुरांच्या चळवळीची आहे, ज्यांनी, टिकाऊ शेती आणि पर्यायी अर्थव्यवस्थेसाठी शासनाने व सोया उद्योगाने जमीन बळकावल्यामुळे त्यांच्याविरुद्ध लढा उभारला आहे. पश्चिम ओकलंडमधील (कॅलिफोर्निया) पीपल्स ग्रोसरी हीदेखील अशीच एक संस्था. त्यांनी आपल्या आसपासच्या तीस हजार रहिवाशांना, छत्तीस किराणा व दारू दुकाने आणि एक सुपरमार्केट ह्यांना अन्नवितरणाची यंत्रणा उभारली आहे. स्लो फूड चळवळीच्या 800 शाखांमध्ये अन्नाची चव बघून त्यात सुधारणा केली जाते. ला व्हिया कोसिया नावाच्या आंतरराष्ट्रीय चळवळीने शेतकऱ्यांना एकत्र येऊन कृती करण्याचे आवाहन केले आहे.
पुस्तकात आलेले विभिन्न मुद्दे आपल्या आयुष्यातही प्रकट होतात. ह्याच्याशी संबंधित असलेली दोन उदाहरणे आताच माझ्या मनात येताहेत. एकत्रीकृत बाल विकास योजना आणि माध्याह्न भोजन योजना ह्यांच्यामध्ये मुलांसाठी पोषक आहार कोणता ह्याबद्दल वाद झाला होता. बिस्किट उत्पादक संघटनेने गरम, शिजवलेल्या जेवणाच्या ऐवजी बिस्किटे द्यावीत असा आग्रह धरला. दुसरे उदाहरण आहे स्वाईन फ्लूच्या साथीचे. लेखकाने पुस्तकाच्या अखेरच्या चरणात मॅड काऊ रोग हा औद्योगिक अन्न व्यवस्थेमुळे झाला असून बर्ड फ्लू हा कोंबड्यांचा रोग आहे असा निष्कर्ष काढला आहे. तथापि सध्याची स्वाईन फ्लू साथ आणि डुकरांची पैदास ह्यांच्यात संबंध असल्याचे बोलले जात आहे. ह्या दोन उदाहरणांवरून, आधुनिक अन्न उद्योगाने आपल्या जिवाला कसा धोका निर्माण केला आहे ते स्पष्ट दिसते. आपल्याला माहिती, अंतर्दृष्टी आणि प्रेरणा देणारे, नवीन शक्यता दाखवून आपल्या जीवनाला नवीन आकार देणारे हे पुस्तक. तात्पर्य हे की ते आपल्यालाच बदलायला लावते. आम्ही लोकशाहीचे उपभोक्ते नाही, तर मालक आहोत ह्याची आठवण करून देते. अन्न उद्योगाच्या भूलभुलैयामधून वाट काढत आपल्याला ज्ञान, आरोग्य आणि स्वातंत्र्य ह्यांच्या प्रदेशात घेऊन जाते.
(स्टफ्ड् ऍड स्टाव्ह्ड्र् – लेखक राज पटेल)
डी-234, न्यू हाऊसिंग कॉलनी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोर – 560012 (कर्नाटका) (भ्र.ध्व.: +91-9764642434)