[ज्यावर काहीच वेगळी टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही अशा बोलक्या चालू-घडामोडींकडे वाचकांचे लक्ष वेधण्यासाठी हे सदर ह्या अंकापासून सुरू करीत आहोत. वाचकांच्या प्रतिसादाची व सहभागाची अपेक्षा आहे. – संपादक]
१. ‘ओपन सोसायटी जस्टिस इनिशिएटिव्ह’ ही न्यूयॉर्क येथील एक स्वयंसेवी संघटना आहे. ह्या संघटनेतर्फे नुकताच ‘ग्लोबलायज़ींग टॉर्चर’ नावाचा एक २१६-पानी अहवाल प्रकाशित करण्यात आला. सी आय ए. मानवी हक्कांचे उल्लंघन सातत्याने कानी आली आहे, हे सर्वविदित आहे. परंतु, आता सी आय ए ने ह्या ‘कामांची’ व्याप्ती वाढवली आहे. संशयावरून कोणाही व्यक्तीला ताब्यात घेणे, कोणतीही कायदेशीर मदत मिळू न देता तिला अज्ञात ठिकाणी अडकवून ठेवणे, तिचा विविध पद्धतीने छळ करणे ही सारी कृत्ये सी आय ए आता ५४ देशांच्या सरकारांच्या संगनमताने करीत असल्याचा गौप्यस्फोट ह्या अहवालात करण्यात आला आहे. दहशतवादी असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या १३४ माणसांच्या केसेस ह्या अहवालात मांडण्यात आल्या आहेत. ह्यातील अनेकाना कोणत्याही सबळ कारणाशिवाय, केवळ संशयावरून अटक करण्यात आली. उदा. खलीद एल- मासरी हा एक जर्मन नागरिक. त्याचे अपहरण करून त्याला मॅसिडोनियाला नेण्यात आले. तेथे २३ दिवस त्याचा अनन्वित छळ करण्यात आला. त्यानंतर त्याला अफगाणिस्तानला नेऊन चार महिने छळण्यात आले. ह्याबद्दल युरोपमधील सर्वोच्च मानवी हक्क न्यायालयाने अमेरिकन सरकार व मॅसिडोनियाच्या सरकारला दोषी ठरविले आहे. अशा अनेक ‘चुकांची’ कबुली सी आय ए ऑफिस ऑफ इंस्पेक्टर जनरल रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे असे हा अहवाल म्हणतो. ह्यातील बऱ्याच व्यक्ती नाहीशा झाल्या. ज्या काही जगून वाचून परतल्या, त्यांना कोणतीही नुकसान भरपाई देण्यात आली नाही. अमेरिकन कोर्टानी त्यांची दखल घेण्याचे नाकारले. निवडून येण्यापूर्वी मानवी हक्कांचे हिरिरीने समर्थन करणारे ओबामा आता मात्र सी आय ए च्या ह्या कारवायांविषयी ठोस भूमिका घेण्यास कचरत आहेत, असाही आरोप ह्या अहवालात करण्यात आला आहे. ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जर्मनी अशा मानवी हक्कांविषयी जागृत असलेल्या देशांसह जगातील १/४ हून अधिक देशांची सरकारे सी आय ए च्या कृष्णकृत्यात सहभागी असल्याचा गौप्यस्फोट करणारा हा अहवाल सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. पण भारतात त्याची दखलही घेण्यात आली नाही. ह्या अहवालाच्या लेखक आहेत अमृत सिंग, ज्या ‘ओपन सोसायटी’ मध्ये वरिष्ठ विधी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे त्यांचे वडील आहेत.
२. राजस्थानामधील बुन्दी जिल्ह्यातील बिचडी हे एक छोटेसे गाव. तेथील रामसिंह कसाणा नावाच्या गृहस्थांचे देहावसान झाले. स्थानिक परम्परा अशी आहे की बाराव्याला सर्वांना गावजेवण घालायचे व त्यानंतर होणाऱ्या समारम्भात मयत व्यक्तीच्या मुलाला पगडी घालायची. म्हणजे तो मुलगा हा मयत व्यक्तीचा कयदेशीर वारस आहे असे जाहीर होते. ज्याना मुलगा नसतो, त्यांच्या पुतण्याला पगडी घालण्यात येते. रामसिंहाना मुलगा नव्हता. पण त्यांची पत्नी – अमृता सिंह व मुलगी डॉ. त्रिशला सिंह ह्यानी गावजेवण देण्याऐवजी 40 उम्बऱ्यांच्या ह्या छोट्याशा गावात मुलींची शाळा काढण्याचे जाहीर केले. एवढेच नाही, तर त्यानंतर त्यांच्या पत्नीने आपल्या ज्येष्ठ मुलीला सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक पगडी घातली. आय आय टी, कानपूर मधून डॉक्टरेट मिळविलेल्या त्रिशला सध्या बंगलोर येथील फ्रॉस्ट ऍड सुलेवान कम्पनीत आशिया प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. गावातले काही लोक नाराज आहेत, पण चांगल्या कामाला कोणाला तरी सुरुवात करावी लागते, असे मत अमृता सिंह ह्यानी ह्या प्रसंगी व्यक्त केले.
(दैनिक भास्कर वरून)