[मानवी व एकूण सजीवांचे आयुष्य, त्याचा आदि-अंत, त्याचे कारण- परिणाम, ते जेथे फुलते त्या जागेशी असलेले त्याचे नाते, त्याची स्वयंसिद्धता वा अवलंबित्व, विश्वाच्या विराट अवकाशातील त्याची प्रस्तुतता ह्या विषयांचे मानवी मनाला नेहमीच कुतूहल राहिले आहे. माणसाने विवेकवादी असण्या- नसण्याची व असावे नसावेपणाची काही कारणे वा पूर्वअटीही ह्या मुद्दयांमध्येच दडून आहेत. त्यामुळे आ. सु.चा तर हा विशेष जिव्हाळ्याचा विषय आहे. ह्यावर वैज्ञानिक दृष्टिकोणातून लिहिलेली प्रभाकर नानावटींची मानवी अस्तित्व ही मालिका आपण गेल्या वर्षीपासून वाचत आहोतच. आता ही थोड्या वेगळ्या अंगाने लिहिलेली, विज्ञान व अध्यात्म ह्यांची सांगड घालणारी मालिका. किशोर देशपांडे ह्यांची पुण्यनगरी मध्ये प्रकाशित झालेली ही मालिका थोडी संपादित करून अनवरत भूमंडळ ह्या नावाने ह्या अंकापासून सुरू करीत आहोत. – संपादक।
स्वभान आणि विश्वभान
आपण कोण आहोत? आपल्याला दिसणाऱ्या, जाणवणाऱ्या सृष्टीपलीकडे आणखी काही अस्तित्वात आहे का? सृष्टीच्या निर्मितीला काही प्रयोजन आहे का? या जन्मापूर्वी आपण अस्तित्वात होतो का? मृत्यूनंतर आपण पूर्णपणे संपणार, काकी आपला काही अंश शिल्लक राहणार? सृष्टीचा कोणी निर्माता आहे, की ती नुसतीच प्रयोजनशून्य अनादि- अनंत अपघातांच्या व योगायोगांच्या मालिकेतून साकारत चाललेली स्वयंभू जड ऊर्जा आहे? आपले शरीर, अंत:करण, बुद्धी, ज्ञानेंद्रिये, संवेदना, इच्छा, भय, विकार, वासना, विचार या सर्वांचा समुच्चय म्हणजे आपण आहोत, की या समुच्चयापेक्षाही वेगळे असे आपले ‘स्वत्व’ आहे? आपला व सृष्टीचा निर्माता जर कोणी खरेच असला, तर तो कुठे असतो? कसा दिसतो? काय करतो? त्या निर्मात्यांचा निर्माता कोण? आणि निर्मितीचा उद्देश काय? या निर्मितीवर निर्मात्याचे नियंत्रण आहे, की ती केवळ भौतिक नियमांनी बांधलेली स्वयंचलित यंत्रणा आहे? जीवनाचा हेतू काय? खरेच जीवनाला काही हेतू. आहे, की ही सर्व एक निर्हेतूक, उद्देश्यविहीन, प्रयोजनशून्य गतिमानता आहे?
सर्व मानवांना नव्हे, परंतु भिन्न-भिन्न संस्कृतींमधील परस्परांना सर्वस्वी अनोळखी असलेल्या व वेगवेगळ्या काळात जन्मलेल्या असंख्य मानवांना वरील प्रकारच्या प्रश्नांनी सतत भेडसावलेले आहे.
सृष्टीचे रहस्य जाणून घेण्याचा प्राचीन काळापासून मानवाने जो प्रयत्न चालविला आहे, त्यातून एक गोष्ट तर निर्विवाद सिद्ध झाली आहे की, पदार्थांच्या व ऊर्जेच्या अंतरंगापर्यंत पोचून, जड सृष्टीतील अनेकानेक नियम जाणून घेऊन व त्या नियमांचाच वापर करीत मानवाने आपल्या भोवतालच्या सृष्टीवर बरेचसे नियंत्रण प्राप्त केले आहे. म्हणजे आज आपल्याला जे काही नैसर्गिक पदार्थ दिसतात व वीज, उजेड, आवाज, चुंबक या सारख्या विविध ऊर्जा जाणवतात, त्या सर्वांची निर्मिती हेतुपूर्वक झाली असो वा योगायोगाने अनेक अपघातांच्या मालिकेतून झालेली असो, ते सर्व पदार्थ व ऊर्जेची ती विविध रूपे काही कठोर नियमांनी बांधलेली आहेत आणि ते नियम समजून घेतल्यास त्या पदार्थांना वा बहुरूपी ऊर्जेला काही प्रमाणात मानव आपल्या नियंत्रणात आणू शकतो.
अगदी मुळाशी जाऊन पाहिले तर पदार्थ आणि ऊर्जा या दोन वेगळ्या वस्तू नसून मूलत: एकच वस्तू आहे, असेही आता विज्ञानाने शोधले आहे. प्रकाशाचे उष्णतेत, विजेत, ध्वनीत वगैरे रूपांतर तर होतेच. विद्युत-चुंबकीय बल, परमाणूंमध्ये इलेक्ट्रॉन्सना धरून ठेवणारे क्षीण बल, अणुगर्भातील प्रोटॉन, न्यूट्रॉन इ. मूलकणांना धरून ठेवणारे भारी बल व गुरुत्वाकर्षण अशी चार प्रकारची ऊर्जेची रूपे वैज्ञानिकांना सध्या तरी दिसतात. या चार बलांचे एकमेकांत रूपांतर होत असते काय व होत असल्यास ती एकमेव मूळ ऊर्जा कोणती, हे बहुधा लवकरच कळेल. पदार्थांच्याही अंतरंगात शोध घेतल्यावर परमाणूच्या पोटातील मूलकणांची यादी झाली असून त्या मूलकणांची वर्तणूक कधी पदार्थासारखी तर कधी ऊर्जेसारखी असल्याचे आढळून आले आहे.
एक मजेशीर बाब म्हणजे परमाणूच्या अंतरंगातील व सृष्टीतील दूरवरच्या अंतराळातील पदार्थांच्या हालचाली बहुधा कठोर नियमांनी बांधलेल्या नसून त्यांत काही अनिश्चितता व गोंधळही जाणवतो (आपल्याला परिचित असलेल्या ढोबळ पदार्थांच्या तुलनेत), असेही वैज्ञानिकांना वाटते.
गेल्या शतकाच्या उत्तरार्धात विज्ञानाने कमालीची ज्ञेप घेतली असून सृष्टीच्या निर्मितीचे रहस्य शोधून काढण्यासाठी आता वैज्ञानिक प्रचंड महागडे प्रयोग करत आहेत. एकीकडे परमाणूच्या अंतरंगात तर दुसरीकडे अथांग अंतराळात चाललेल्या संशोधनाने दूरसंचार क्षेत्रामध्ये घडवून आणलेल्या अभूतपूर्व क्रांतीचा लाभ सामान्य माणसाच्या पदरात मागील दोन-तीन दशकांपासून पडू लागला आहे. याचे ठळक उदाहरण म्हणजे मोबाईल फोन, अतिप्रगत रंगीत टी.व्ही. संच, संगणक, इंटरनेट या गोष्टी आता सामान्यांच्या आवाक्यात आल्या असून त्यांची कल्पनादेखील ४०-५० वर्षांपूर्वी करणे अशक्य होते.
अचेतन सृष्टीसोबतच सचेतन सृष्टीचा, म्हणजेच जीवनाचाही शोध मानव विविध पद्धतींनी घेत राहतो. अचेतन पदार्थ व सचेतन जीव यांच्या सीमारेषेवर, नक्की काय घडले हे जाणून घेण्याची विज्ञानाची उत्कंठा कायम आहे. जीवनाला धारण करण्याची क्षमता असणारी एक किमान संरचना पदार्थात निर्माण झाल्यावरच त्यातून जीवन प्रस्फुटित झाले, हे निश्चित! पण मग जीवनाची संभावना निर्जीवामध्ये प्रारंभापासून होती, फक्त योग्य ती रचना साकारण्यात वेळ गेला, असे मानावे लागेल. नाही तर पदार्थाची धारणक्षमता तयार झाल्यानंतर त्यात प्राण एका वेगळ्या पातळीवरून अवतरला व नंतर विविध रचना व आकार ह्यांच्या माध्यमातून विकसित होत गेला, असे तरी मानावे लागेल.
जीवसृष्टीच्या उत्क्रान्तिक्रमात काही जीवांमध्येच मनाचा व बुद्धीचा विकास होत गेला व त्या विकासाने सध्या गाठलेले शिखर म्हणजे मनुष्यप्राणी होय, असे दिसून येते. परंतु मानवाची निर्मिती हा पृथ्वीवरील उत्क्रान्तीचा अंतिम टप्पा आहे काय? की आज आम्हाला अज्ञात असलेल्या चेतनेच्या उच्चतर पातळ्यांना धारण करू शकणारा अथवा स्वतःतून प्रगट करू शकणारा नवा ‘प्राणी’ उत्क्रान्तिक्रमात जन्माला येईल, जो मानवापेक्षा अधिक विकसित जीव सिद्ध होईल?
विज्ञानाच्या दृष्टीतून पाहिले असता अतिसूक्ष्म जीवाणूंपासून मानवापर्यंत जीवनाची उत्क्रान्ती टप्प्याटप्प्याने होत गेल्याचे समजते. आता तर जैवपूर्व (प्रि-बायोटिक) म्हणजे सजीव पेशी प्रथम निर्माण होण्यापूर्वी निर्जीव पदार्थांत जी उत्क्रान्तीची प्रक्रिया घडली असेल, तिचाही अभ्यास पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र व जीवशास्त्र ह्यांच्या आधारे होत आहे. त्या अभ्यासात बरीच प्रगतीही झाल्याचे समजते. परंतु प्रत्यक्षात निर्जीव पदार्थातून प्राण नेमका कसा प्रगटला व प्राणी-जीवनात आत्मभान (सेल्फ अवेअरनेस) मनुष्य पातळीवर कसे प्रगटले, या टप्प्यांबाबत विज्ञान अजूनही चाचपडत असून केवळ अंदाज व्यक्त होताना दिसतात. असो.
मात्र प्राण आणि बुद्धी व अंत:करण यांना देहाशिवाय वेगळे अस्तित्व नाही असे मानले व देहाच्या उत्क्रान्तीतूनच ते प्रगटले असे गृहीत धरले तर आणखी एक बाब गृहीत धरणे भाग पडते व ती म्हणजे प्राण, जीवन, अंतःकरण, बुद्धी, कल्पनाशक्ती, विचारक्षमता, वासना, भावभावना, प्रतिभा या सर्व बाबी निर्जीवांच्या ठायीदेखील बीजरूपाने असणारच! कारण बीजरूपाने मुळात अस्तित्वात असलेली संभावनाच उत्क्रान्तिक्रमात प्रगटू शकते.
असतेपणाची जाणीव
असामान्य बुद्धिमत्ता, कल्पकता व अत्याधुनिक तांत्रिक उपकरणांच्या साहाय्याने विश्वाच्या जडणघडणीचे, त्याच्या स्वरूपाचे व नियमांचे जे दर्शन वैज्ञानिकांना झाले आहे व त्यांपैकी आपणा सामान्य वाचकांपर्यंत जितकी माहिती झिरपते, त्यावरून असे निश्चित म्हणता येते की ब्रह्मांडाचा हा पसारा थक्क करून सोडणारा आहे. सतत जळत राहून प्रचंड ऊर्जा प्रस्फुटित करत राहणारे सूर्यासारखे अब्जावधी तारे, त्या ताऱ्यांच्या भोवती एका निश्चित गतीने व निश्चित कक्षेत फिरत असलेले ग्रह, त्या ग्रहांभोवती तसेच कोटेकोर कक्षेत फिरत असलेले उपग्रह, या कोटी-कोटी सूर्यांची, ग्रहांची व उपग्रहांची मिळून बनलेली एक आकाशगंगा, यातील सर्व सूर्यमाला एका केंद्राभोवती फिरत आहेत; अशा अनेकानेक आकाशगंगांचे समूह, जे सर्व मिळून पुन्हा एका तिसऱ्याच केंद्राभोवती फेर धरतात! शिवाय हे सर्व आकाशगंगांचे समूह त्याचवेळी एकमेकांपासून विलक्षण गतीने दूर-दूरही जातच आहेत. हे सर्व अब्जावधी सूर्य, तारे, ग्रह, उपग्रह करोडो वर्षांपासून नियमबद्ध वागत आहेत.
शिवाय या ब्रह्मांडात मध्ये कुठेतरी प्रचांड कृष्णविवरे देखील आहेत, जी त्यांच्या विशिष्ट कक्षेच्या आत शिरणाऱ्या सूर्यमालांना नव्हे तर अख्ख्या आकाशगंगेला गिळून टाकतात. या कृष्णविवरांना (ब्लॅकहोल्स) आकार नसतो, परंतु लक्षावधी ताऱ्यांचे वस्तुमान (मास) व ऊर्जा त्या विवरातील एकाच बिंदूत सामावलेली असते. त्यामुळे त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती इतकी वाढलेली असते की प्रकाशकिरणदेखील त्या विवरातून बाहेर पडू शकत नाही आणि म्हणूनच ते कृष्णविवर आम्हाला दिसू शकत नाही.
काही वैज्ञानिकांच्या मते या कृष्णविवरांमध्ये ओढल्या जाणाऱ्या वस्तू (वस्तू म्हणजे महाकाय तारे व त्यांचे ग्रह, उपग्रह) आतील भयानक उष्णतेने पूर्णत: वितळून, त्यांचे पदार्थरूप नष्ट होऊन निव्वळ एकाच मूलभूत ऊर्जेत रूपांतरित झाल्यावर ती ऊर्जा आम्हाला सध्या माहीत नसलेल्या वेगळ्याच कोणत्यातरी विश्वाच्या किंवा आमच्याच विश्वातील वेगळ्या ठिकाणी नवनिर्मितीसाठी उपयोगात आणली जात असावी.
जी कथा ब्रह्मांडाची तीच अणूची. प्रत्येक पदार्थातील सर्वांत सूक्ष्म घटक म्हणजे अणू. तो आकाराने इतका सूक्ष्म असतो की एका केसाच्या टोकावर पाच लक्ष अणू मावतात! इतक्या सूक्ष्म पदार्थापेक्षा आणखी सूक्ष्म ते काय असणार? परंतु वैज्ञानिकांनी त्या अणूचेही अंतरंग शोधून काढलेच. ते तर आणखी थक्क करणारे सूक्ष्मातिसूक्ष्म विश्व आहे. सूर्याभोवती जसे पृथ्वीसारखे ग्रह फिरत राहतात व मध्ये पोकळी असते, तसेच अणूच्या पोटात मध्यभागी एक अतिसूक्ष्म असे केंद्र असते व त्या केंद्राभोवती इलेक्ट्रॉन नावाचे सूक्ष्म कण प्रचंड वेगाने फिरत असतात. हे गरगर फिरणारे इलेक्ट्रॉन आणि अणूचे केंद्र यांच्यामध्ये खूप मोठी पोकळी असते. केंद्रस्थानी प्रोटॉन व न्यूट्रॉन नावाचे इलेक्ट्रॉनपेक्षा खूप जास्त वस्तुमान असलेले सूक्ष्मकण असतात. अणूच्या आतली पोकळी किती मोठी असते? एखाद्या मोठ्या सभागृहाच्या मध्यभागी एक माशी ठेवली तर त्या सभागृहाच्या आकाराच्या मानाने माशीचा आकार लक्षात घेऊन मधल्या पोकळीची जी कल्पना आपण करू, त्याच प्रमाणात अणूचा आकार व त्याचे केंद्र यांच्यातील पोकळी असते. म्हणजे आमच्या दृष्टीला व स्पर्शाला जे जे भरीव व ठोस भासणारे पदार्थ जाणवतात, ते प्रत्यक्षात अतिशय विरविरीत व महापोकळ असतात. परंतु एखादे अनेक आरे असलेले चक्र वेगाने फिरत असले तर त्यातील आऱ्यांमधील पोकळी आपल्या नजरेस दिसत नाही. तसेच इलेक्टॉन्सच्या प्रचंड गतिमान फेऱ्यांमुळे आम्हाला पदार्थ ठोस वाटू लागतो.
अणूगर्भातील प्रोटॉन व न्युट्रॉन हे सूक्ष्मकणदेखील अविभाज्य नसून ते सुद्धा क्वार्क नावाच्या अतिसूक्ष्म कणांपासून बनले आहेत. त्याशिवाय या अतिसूक्ष्म कणांना एकमेकांशी जोडून ठेवणारे ‘फोर्स पार्टिकल्स’ या जातीत मोडणारे आणखी वेगळेच अतिसूक्ष्म कण आहेत. अणूच्या आतली रचना अशाप्रकारे चक्रावून सोडणारी आहे.
एकापेक्षा अधिक अणू (ॲटम) एकत्र येऊन रेणूची (मॉलिक्यूल) रचना होते. जसे हायड्रोजनचे दोन व ऑक्सिजनचा एक अणू एकत्र येऊन पाण्याचा रेणू तयार होतो. आता या रेणूचे गुणधर्म पुन्हा त्याच्या घटक अणूंच्या गुणधर्मापेक्षा विपरीत असू शकतात. म्हणजे ऑक्सिजन व हायड्रोजन हे वायू ज्वलनशील असतात, पण पाणी मात्र पेटूच शकत नाही !
सर्व सजीवांचा आधार असलेले डीएनए रेणू त्या त्या सजीव प्राण्याच्या संभाव्य विकासाचा सर्व आराखड़ा बाळगून असतात. आपल्या देहाच्या प्रत्येक पेशीमध्ये हे डीएनए रेणू आहेत. ज्युरासिक पार्क या चित्रपटात दाखविल्याप्रमाणे एका डीएनए रेणूतून संपूर्ण प्राण्यांची निर्मितीही करता येईल. देहाच्या प्रत्येक अवयवाच्या रंग, रूप, आकार व अंतर्गत रचनेचा स्पष्ट आराखडा या अतिसूक्ष्म डीएनए रेणूमध्ये कसा साठवला जातो? त्याच्या मदतीला धावपळ करणारे ‘निरोप्ये’ आरएनए नावाचे रेणू असतात. ते सुजाण असतात काय? प्रत्येक जीवपेशीतील डीएनए रेणू हे त्या त्या पेशीचे आर्किटेक्ट, इंजिनीअर, गवंडी, डॉक्टर, नर्स, आई वगैरे सर्व ऑल-इन-वन असतात.
एका जीवपेशीच्या उदरात दुसरी जीवपेशी सुखाने नांदू लागल्यावर मोठ्या आकाराचे सजीव निर्माण झाले. कोटी-कोटी पेशी (सेल्स) एकत्र येऊन देहरचना करतात. देहाच्या प्रत्येक अवयवांची रचना वेगळी, कार्यही वेगळे. देहातील लक्षावधी पेशी दरक्षणी नष्ट होतात, त्यांची जागा नवनिर्मित पेशी घेत राहतात आणि तरीही त्या देहाचे जीवन अखंड सुरू राहते. गळून पडणाऱ्या पेशींपेक्षा नवनिर्मित पेशींची संख्या कमी होत गेली की वार्धक्य व मृत्यूकडील वाटचाल सुरू होते. परंतु मृत्यूपूर्वी स्वतःसारखा दुसरा देह निर्माण करूनच सहसा प्रत्येक प्राणि-जीवनाचा अंत होतो.
ही सर्व एकाच वेळी महाविराट व अतिसूक्ष्म, गुंतागुंतीची पण नियमबद्ध रचना काय दर्शविते? आणि पृथ्वीवर सजीवांच्या उत्क्रान्तीसोबत विकसित होत गेलेली ती असतेपणाची जाणीव, त्या जाणिवेला फुटलेले वासनांचे, विकारांचे, बुद्धीचे, विचारांचे, कल्पनांचे, प्रतिभेचे धुमारे – ते कशासाठी?
योगायोग, अपघात की संकल्प
निर्जीव पदार्थ (मॅटर) व विविध प्रकारच्या ऊर्जा (एनर्जी) मूलत: एकाच तत्त्वापासून विस्तारल्या आहेत, ही बाब आता विज्ञानमान्य झाली असून या प्रचंड विश्वाचा प्रारंभदेखील एका बिंदूपासून झाला असावा, असाही अनेक मोठमोठ्या वैज्ञानिकांचा अंदाज आहे. कारण असे की पृथ्वीवरून अत्याधुनिक दुर्बिणींच्या मदतीने अंतराळाचे निरीक्षण केले असता दिसणाऱ्या सर्व आकाशगंगा (प्रत्येक आकाशगंगेत करोडो सूर्यमाला असतात) पृथ्वीपासून सर्व दिशांनी दूर-दूर जाताना दिसतात. एखाद्या फुग्यावर अगदी छोट्या छोट्या अनेक चकत्या चिकटवून त्या फुग्यात हवा भरू लागलो तर त्या फुग्यावरील सर्व चकत्या एकमेकांपासून दूर जातात, परंतु त्या चकत्यांचे आकार वाढत नाहीत, तसेच काहीसे घडत आहे. आकाशगंगांच्या दूर-दूर जाण्याचा वेग देखील शास्त्रज्ञांनी मोजला असून त्या वेगाची दिशा बघूनच त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की, फार फार पूर्वी म्हणजे विश्वाच्या आरंभी विश्वातील सर्व ग्रह-तारे हे एकाच बिंदूमध्ये सामावले असावे व त्या बिंदूतून झालेल्या अतिप्रचंड स्फोटामुळे (बिगबँग) दशदिशांना ऊर्जा फेकल्या गेली, तिचे रूपांतर हळूहळू तारे व ग्रहगोलांमध्ये आणि विविध पदार्थांमध्ये होत गेले. आपण याला काळ (टाईम) व अवकाश (स्पेस) म्हणतो त्यांना विश्वारंभापूर्वी अस्तित्वच नव्हते. ही कल्पना समजणे अवघडच आहे!
काळ आणि अवकाश यांनी बद्ध असलेल्या लांबी, रुंदी व उंची या त्रिमितीतच जाणवणाऱ्या भौतिक विश्वाचाच एक क्षुद्रातिक्षुद्र घटक असलेला मनुष्यप्राणी त्या त्रिमितीपाकिडे व अवकाश काळापलिकडे काही असू शकेल, अशी शक्यतेच्या पातळीवरच सूट देऊ शकतो. परंतु ते पलिकडील अस्तित्व कसे असेल याबाबत कल्पना करण्यास तो असमर्थ ठरतो.
असो. परंतु महास्फोटाचा (बिगबँग) हा सिद्धान्त सर्वच वैज्ञानिकांना मान्य नाही. फ्रेड हॉईल व व आपले डॉ. जयंत नारळीकर यांच्या संशोधनातील अनुमानानुसार दृश्य विश्व अनादि-अनंत असून त्यातील काही भागांत अधून मधून स्फोट होत राहतात व पदार्थांचा नाश व नवनिर्मिती या क्रियाही घडत राहतात. त्यामुळे विश्वाचे संतुलन कायम राहते. सर्व आकाशगंगा (गॅलॅक्सीज) एकमेकांपासून वेगाने दूर जाताना आढळत असल्या तरी अधून-मधून विश्व थोडेबहुत आंकुचनही पावते व पुन्हा प्रसरणशील होते. मात्र अलिकडील काळात महास्फोटाच्या सिद्धान्ताला वैज्ञानिक जगतात जास्त मान्यता मिळत असल्याचे आढळून येते.
विश्व – निर्मितीबाबत सध्या अंदाजाच्या स्वरूपातच असलेल्या वेगवेगळ्या सिद्धान्तांमध्ये काही मूलभूत गृहीतके मात्र समान आहेत. उदाहरणार्थ, प्रकाशापेक्षा अधिक वेग कोणत्याही पदार्थाचा असू शकत नाही व विश्वातील एकूण ऊर्जा नेहमीच कायम असते. ऊर्जा रूपांतरित होते, पण नष्ट होत नाही. मध्यंतरी वृत्तपत्रांत एक खळबळजनक वैज्ञानिक बातमी प्रसिद्ध झाली की प्रकाशापेक्षा अधिक वेगवान असलेला एक मूलकण प्रयोगात आढळून आला. ही बातमी खरी असल्यास पदार्थ-विज्ञानशास्त्राला पुन्हा शीर्षासन करावे लागेल..
आतापावेतो वैज्ञानिकांना ही बाब स्पष्टपणे उमजली आहे की या विश्वात करोडो- करोडो आकाशगंगा (गॅलॅक्सीज) असून प्रत्येक आकाशगंगेत आपल्यासारख्या करोडो सूर्यमाला असू शकतात. आपल्या पृथ्वीवरून पाहिले असता प्रत्येक आकाशगंगा वेगाने दूर जात आहे. त्यातही जी आकाशगंगा आपल्यापासून जितकी आपल्यापासून दूर, तितका तिचा वेग जास्त हे दृश्य फक्त पृथ्वीवरूनच अनुभवता येईल असे नव्हे. विश्वातील प्रत्येक जागेवरून पाहिले असता असेच आढळून येईल. म्हणजेच विश्व एखाद्या फुग्यासारखे प्रसरण पावत आहे व प्रसरणासोबत अवकाश व काळाची नवनिर्मितीही करत आहे.
अवकाश (स्पेस) आणि काळ (टाईम) या परस्परांशी मुळीच संबंधित नसलेल्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत, असे पूर्वी मानले जाई. परंतु महान प्रतिभाशाली वैज्ञानिकांनी लांबी, रुंदी व उंची या अवकाशाच्या तीन मितींशी/आयामांशी (डायमेन्शन्स) घट्टपणे निगडित असलेली चौथी मिती म्हणजे काळ होय, हे शोधून काढले. एकाच जागी उभे असलो तर आपण फक्त काळातून प्रवास करता असतो. परंतु चालू लागताच आपण अवकाश-काळाच्या चौमितीतून प्रवास करू लागतो. आपण अतिशय वेगाने अवकाशातून प्रवास करू लागलो तर अवकाश वाढल्यामुळे काळ लहान होतो, म्हणजेच घड्याळ हळू चालू लागते. प्रकाशाचा वेग जवळपास 3 लक्ष कि.मी. प्रति सेकेंद इतका आहे. त्या वेगाच्या आसपास आपला वेग वाढल्यास काळ जणू स्तब्ध होतो म्हणजे घड्याळ थांबून जाईल. दोन तरुण जुळ्या भावांपैकी एकजण जर अंतराळयानातून भ्रमण करून अनेक वर्षांनी पृथ्वीवर परतला, तर त्याचे वय फारसे वाढलेले नसेल, पण पृथ्वीवरचा भाऊ मात्र तोपावेतो चक्क म्हातारा झालेला असणार.
असे हे अवकाश-काळयुक्त भौमिती विश्व आरंभी केवळ लांबी-रुंदी-उंची नसलेल्या एका बिंदूत महाऊर्जेच्या रूपात सामावले होते, अशी गंभीर मांडणी आता वैज्ञानिक करताहेत. विश्व शून्यातून निर्माण झाले, असे विज्ञान म्हणू शकत नाही. कारण विश्वातली एकूण उर्जा ही अक्षय आहे – म्हणजे तिचे रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत अथवा पदार्थात होईल, परंतु ऊर्जेला ह्रास कधीच होत नसतो – हा विज्ञानाचा एक महत्त्वाचा सिद्धान्त आहे. त्यामुळेच विश्वनिर्मितीपूर्वी हे आज असीम भासणारे संपूर्ण विश्व, त्यातील अब्जावधी ग्रहताऱ्यांसह महाप्रचंड ऊर्जेच्या स्वरूपात एकाच बिंदूमध्ये सामावले असणार आणि महास्फोटानंतर ती महाऊर्जा प्रगट होऊन अवकाश-काळाची निर्मिती करत प्रसरण पावू लागली. या महास्फोटाचे वेळी जी अतिप्रचंड उष्णता निर्माण झाली असेल, उष्णतेमध्ये पदार्थांचे अणूसारखे घटक तयार होणे अशक्य होते. तापमान पुरेसे कमी झाल्यानंतर प्रोटॉन-न्यूट्रॉनयुक्त अणुगर्भांच्या रचना तयार झाल्या व कालांतराने पदार्थमय वायुगोळे निर्माण होऊन ताऱ्यांची सृष्टी झाली.
एक गमतीचा भाग असा की शास्त्रज्ञांच्या मते सृष्टि-निर्मितीच्या अगदी सुरवातीस चार पेक्षा अधिक मितीं (डायमेन्शन्स) मध्ये विश्व साकार होत गेले. परंतु लवकरच त्यांपैकी बाकीच्या मिती (बहुतेक 6.7) आपल्या भौमिती विश्वापासून वेगळ्या होऊन अतिसूक्ष्म आकारात आकुंचन पावल्या. दुसरी गंमत अशी की प्रत्येक पदार्थ (मॅटर) कणासोबत त्याच्या विरुद्ध गुणधर्म असणारा परंतु समान वस्तुमानाचा दुसरा पदार्थकण (अँटीमॅटर) देखील सुरवातीस निर्माण झाला. उदा. इलेक्ट्रॉन इतकेच वस्तुमान असलेला, परंतु घन (पॉझिटिव्ह) विद्युतभार असलेला पॉझिट्रॉन नावाचा मूलकण. इलेक्ट्रॉनमध्ये ऋण (निगेटिव्ह) विद्युतभार असतो. मॅटर व अँटीमॅटर एकमेकांस नष्ट करू लागते परंतु अंतिमतः मॅटरची मात्रा अँटीमॅटरपेक्षा किंचित जास्त होऊन पुढे मॅटरचाच फैलाव झाला. यावरून आपल्या पुराणकथांमधील देव-दानव संघर्षांची कथा स्मरते. दानव देवांना भारी पडत होते. पुराणानुसार अशावेळी देव महादेवांचा धावा करायचे. आणि महादेवांना हस्तक्षेप करून दानवांची बाजू लंगडी करावी लागे. त्या सृष्टीच्या आरंभकाळात दानवांची सरशी झाली असती तर पृथ्वीचा विनाश निश्चित होता.
प्रश्न असा पडतो की, अँटीमॅटर पेक्षा मॅटर भारी ठरते. हे केवळ योगायोगाने, अपघाताने की त्या महाऊर्जेच्या उदरात असलेल्या चैतन्याच्या संकल्पामुळे?
१२, विनोद, स्टेट बँक कॉलोनी, कॅम्प, अमरावती.