सर्व आघाडीच्या उद्योगपतींचे संमेलन गुजरातमध्ये जसे नियमितपणे होते तसे भारतातल्या कुठल्याच राज्यात आजपर्यंत कधीच पाहायला मिळाले नाही. हे घडवून आणणारी व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी. पण गुजरातमध्ये फक्त मोदीच प्रकाशझोतात असतात, इतर कोणीच नाही. प्रादेशिक नेत्यापासून सार्वभौ सत्ताधीशापर्यंतचा बदल सोपा नाही. योद्ध्यापासून योग्यापर्यंतचा प्रवास करण्यात मोदी कदाचित यशस्वी होणार नाहीत. . . श्री. मो. क. गांधीनी भारतीय मानसिकतेचे पदर समजून घेण्यासाठी संपूर्ण भारत दोनदा पालथा घातला. साधे दिसणे, निर्धन असणे आणि अहिंसेचा अंगीकार हीच देशाला जागे करण्याची सूत्रे असू शकतात हे त्यांना समजले. ऋषीच्या पोशाखात ते नैसर्गिकपणे समरस झाले आणि सात्त्विक प्रतीकांची अन् उपक्रमांची त्यांनी निवड केली. भारतीय जनतेला नेत्यांधले स्त्रीतत्त्व भावते. कविमनाच्या नेहरूंनी वल्लभभाई पटेलांवर आघाडी घेतली. सौम्य व्यक्तिमत्त्वाचे व्ही. पी. सिंग यशस्वी झाले. लढाऊ शरद पवार नाकारले गेले तर गुळमुळीत मऊ नरसिंहराव खुर्चीवर बसले. ग्रामीण भारतात सोनिया गांधीनी केलेल्या हळुवार भावनिक आवाहनांनी आक्रमक ‘शायनिंग इंडिया’ प्रचाराला नमवले. ‘मौत का सौदागर’ आणि असे काही वाक्प्रचार सोडले तर सोनिया गांधी आणि त्यांचा परिवार सौम्य भाषा वापरतात. उदाहरण द्यायचे तर वरुण गांधीनी केलेल्या विषारी टीकेला त्यांच्या चुलत भावंडांनी ‘त्यांच्या बोलण्याचे आम्हाला दुःख होते’ इतकेच उत्तर दिले.
गेल्या काही वर्षांत गुजरातमध्ये झालेल्या महत्त्वाच्या तीन प्रचारकी उपक्रमांत नरेंद्र मोदी सर्वेसर्वा होते. श्रेय वाटून घ्यायला कोणी सहकारी नसल्याने दिसणारी ‘सब कुछ मोदी’ प्रतिमा त्यांच्या विरोधात जाईल. तिथे फक्त मोदी आणि मोदीच दिसतात. भारतीयांना त्यांच्या राजाच्या व्यक्तिमत्त्वात समर्पण, सेवाभाव, त्याग पाहायला आवडते. यातले मोदींमध्ये काहीच दिसत नाही. ‘हे मी नाही, त्या सर्वांनी साध्य केले’ असे धोनी वर्ल्ड कप जिंकल्यावर म्हणाला. पण मोदींनी हे कधीच प्रत्यक्ष म्हटले नाही किंवा सुचवले नाही.
इंदिरा गांधी सुरुवातीला नवशिक्या होत्या. देवळात जायच्या, बायकांना भेटायच्या, त्यांनी गरिबी हटाव घोषणा दिली. आणीबाणीत त्यांच्या ठाम पुरुषी वागण्यामुळे त्या अप्रिय झाल्या अन् हरल्या. नंतर जनता सरकारने त्यांना शहा कमिशन पुढे खेचले आणि दिवसांगून दिवस सुनावणी चालली. तेव्हा देश संतापला, ‘बाईला किती त्रास द्यायचा?’ जनता पार्टीतल्या अंतर्गत भांडणाबरोबरच इंदिरा गांधींच्या स्त्रीत्वाने काँग्रेसला परत सत्तेवर आणले. नरेंद्र मोदींनी सोनिया गांधींवर केलेली व्यक्तिगत टीका मोदींचे नुकसान करेल.
लालकृष्ण अडवाणींपेक्षा अटल बिहारी वाजपेयी त्यांच्या मित्रपक्षांना पसंत होते कारण वाजपेयी कटकटे अन् सैनिकी वृत्तीचे नव्हते. ते कवी होते, सहज भावुक व्हायचे, सौम्य, जिंकणारे हास्य आणि स्त्रीतत्त्वाचा अंश त्यांच्यात होता. जे त्यांना मवाळ अन् अडवाणींना जहाल मानतात, ते हे विसरतात की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दोघांचे विचार सारखेच आहेत, पण दृश्य व्यक्तिमत्त्व मात्र दोघांचेही खूप वेगळे आहे. म्हणूनच अडवाणी कधीच पंतप्रधान होऊ शकणार नाहीत.
ममता बॅनर्जी, उमा भारती किंवा मोरारजी देसाई यांची व्यक्तिमत्त्वे पुरुषी आहेत. आणीबाणीत मोरारजी देसाई तुलनेने कमी पुरुषी होते म्हणून स्वीकारले गेले. भाजप कार्यकर्त्यांचा उदोउदो अन् मोदींना असलेला प्रचंड पाठिंबा योग्य आहे कारण ते कार्यक्षम आहेत, स्वच्छ आहेत आणि एक उत्तम व्यवस्थापक आहेत. गुजरातमध्ये अनेक राज्यांपेक्षा जास्त नोकऱ्या आहेत, जास्त पाणी आणि वीज आहे याचे श्रेय मोदींना आहे. टाटांनी त्यांच्या नॅनोसाठी गुजरात निवडला तो केवळ मोदींच्या वेग, कार्यक्षमता, व्यवस्थितपणा आणि गंभीर दृष्टिकोनामुळे. पण व्यवस्थापक पंतप्रधान होऊ शकत नाहीत. बदल हृदयात अन् आत्म्यात होणे आवश्यक आहे.
अलीकडे नरेंद्र मोदी जास्त शांत आणि मृदू झाले आहेत. त्यांचा सूर मवाळ असतो. पण २००२ च्या दंग्यात झालेल्या वाईट सरकारी कारभाराबद्दल ते माफी मागतील? हिंदू आणि मुस्लिम दोघांच्याही कायमच्या अंतरलेल्या प्रियजनांसाठी ते अश्रू ढाळतील? आजच्या निरर्थक राजकारणातून बाहेर पडून ते प्रायश्चित्त घेतील? त्यांनी ते केलेले नाही आणि विकासाचे कितीही नवे उपक्रम या आध्यात्मिक कृतीची जागा घेऊ शकणार नाहीत.
अब्जावधी पैलू असलेले भारतीय समाजमन वैशिष्ट्यपूर्ण आहे. ७० च्या दशकात जनसंघाविरुद्धची संपूर्ण राजकीय नाराजी आणि आज मोदी विरुद्ध इतर सर्व या स्थितीत अनेक संदेश दडलेले आहेत. मोदींना त्यांच्या सर्व ज्येष्ठांकडूनही नकारात्मक प्रतिक्रिया मिळतात कारण ते उद्धट आहेत आणि गुजरातमध्ये तर त्यांच्यामागे कुणी ज्येष्ठच नाहीत. ते शक्तिमान आणि एकाधिकारशहा आहेत. पण प्रेमळ अन् विश्वासार्ह नाहीत. वाजपेयी अन् इतर पंतप्रधानांवर त्यांचे विरोधकही प्रेम करीत. मोदींची प्रतिमा मात्र घाईत असलेला जादूगार अशी भासवली जात आहे.
भारताला खंबीर पंतप्रधान हवा आहे पण लोकांना सौम्य बोलणारा, त्यांच्या जखमा भरू शकणारा नेता हवा आहे. म्हणून मनमोहन सिंगांनी दोन निवडणुका जिंकल्या. १९४७ मध्ये देशाला एक नकाशा मिळाला. पण स्वातंत्र्यसंग्राम आजही जारी आहे. आपल्याला माओवाद्यांचा अन दहशतवाद्यांचा मुकाबला करू शकणारे मोदी केंद्रात हवेत. पण जनतेला शक्तिमान नेता हवा आहे जो जखमाही भरू शकेल. नरेंद्र मोदी या अपेक्षांना पुरे पडणार नाहीत. . . पण त्यांना हे लक्षात येईल तेव्हा कदाचित, जरा उशीर झाला असेल. .
(अनुवादः सीमंतिनी चाफळकर)