धर्म-विचार

मनुष्य रोज खातो-पितो, भोग भोगतो, हें सगळें तो करत असतो. पण एक दिवस एकादशीचा उपवास करतो आणि त्याच्या चित्ताचें समाधान होतें. मुसलमान लोक रमजानच्या दिवसांत उपवास करतात. एकादशीच्या किंवा रमजानच्या नांवाने खाणें सोडणारा मनुष्य हाच एक प्राणी आहे. याचा अर्थअसा की मनुष्याला केवळ खाण्या-पिण्यात किंवा भोग भोगण्यात जीवनाचीं सार्थकता वाटत नाही. तो जेव्हा आपल्या इंद्रियांवर अंकुश ठेवतो, देवाचें नांव घेतो तेव्हा त्याला बरें वाटतें. म्हणून तो एकादशीच्या दिवशीं देवाच्या नांवाने उपवास करतो. तसें पाहिलें तर एकादशीच्या उपवासानेहि त्याला पूर्ण समाधान मिळत नसतें. त्याचें खरेंखरें समाधान दो जेव्हा एखाद्या उपाशी माणसाला जेऊ घालतो तेव्हा होतें. ई श्वराने मनुष्याला एका निराळ्याच साच्यात घालून बनविलें आहे. त्याने माणसाच्या हृदयात सद्भावना ठेवली आहे. अनुकंपा ठेवली आहे. पशूंमध्ये ती नाही. म्हणून मनुष्य कोणाचें दुःख पाहू शकत नाही. एखादा प्राणी दुःखाने तळमळत पडला असेल तर जोंपर्यंत त्याचें दुःख निवारण करण्यासाठी तो काही करत नाही, तोपर्यंत त्याला समाधान मिळत नाही. जेव्हा तो आपल्या भोगाचा थोडा त्याग करतो, दुसऱ्यांचें दुःख दूर करण्यात मदत करतो तेव्हा त्याच्या चित्ताला शांति मिळते, समाधान मिळते.