युद्ध माझं सुरू

स्त्री, दुःख, हिंसा, बलात्कार, समस्या
—————————————————————————–
पुण्यात राहणारी लष्करातली उच्चपदस्थ महिला अधिकारी परळी वैजनाथहून परतत असताना तिच्यावर 2010 च्या एप्रिल महिन्यात चार दरोडेखोरांनी बलात्कार केला. बलात्काराच्या घटनेनंतर खचून न जाता तिनं या चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली. सहा वर्षांच्या न्यायालयीन लढाई नंतर तिला न्याय मिळाला आहे. या चौघा नराधमांना जन्मठेपेची शिक्षा मोक्का न्यायालानं दिली आहे. या सहा वर्षांच्या कालखंडात तिला कुठल्या प्रसंगांतून जावं लागलं, तिलाकाय काय सहन करावं लागलं, पोलिस खात्याचं सहकार्य कसं मिळालं या सगळ्याचा तिच्याशी प्रत्यक्ष भेटीत बोलून घेतलेला हा वेध…
—————————————————————————–
लष्करातली त्रेचाळीसवर्षीय उच्चपदस्थ महिला अधिकारी परळीवैजनाथच्या दर्शनाहून पुण्याला परतत असताना चार तडीपार गुंडांनी पाठलाग करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सहा वर्षांपूर्वीची ही घटना. त्या महिलेला विवस्त्र करून गाडीतून फेकून दिलं जात असतानाच, “मी लष्करात आहे, तुम्हाला सोडणार नाही,’ असं तिनं त्या चौघांनाही ठणकावलं. चिंचोडी गावाच्या एका शेतात तिला फेकून देण्यात आलं. वाढलेल्या गवताच्या आडोशाला विवस्त्रावस्थेत ती महिला पडून राहिली. दूध टाकायला निघालेल्या एका शेतकर्यानं तिला पाहिलं आमि त्यानं आपला शर्ट तिला घालायला दिला. त्या दिवशी शरीरावर झालेल्या अत्याचारानं, मनावर झालेल्या आघातानं, अवहेलनेनं ती पूर्ण हादरली. ‘या नराधमांना सोडायचं नाही, त्यांना शिक्षा करायचीच,’ अशी खूणगाठ तिनं मनाशी बांधली. सहा वर्षांचा प्रदीर्घ न्यायालयीन लढा लढल्यानंतर गेल्या आठवड्यात मोक्का कायद्यानुसार या चारही गुन्हेगारांना न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा आणि दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायासाठी लढ्याचं पहिलं आवर्तन पूर्ण झालं.
या घटनेनंतर प्रथमच ही महिला अधिकारी ‘सकाळ’शी भडभडून बोलली. आजही त्यांच्या डोळ्यांचं पाणी गळत नाही. जखमेवरची खपली कुणी काढू नये, किंबहुना ती जखमही कुणाला कळू नये, याची काळजी घेणाऱ्या त्या न्यायालयाच्या निकालानं समाधानी असल्याने त्यांनी मन थोडं हलकं केलं. शरीराचे, मनाचे लचके तोडणारं पुरुषी आक्रमण आणि त्यानंतर समाजाकडून वाट्याला आलेली अवहेलना यांच्यात डावं-उजवं करता येणार नाही, इतकं दोन्हींत साम्य आहे. किंबहुना न्यायालयीन लढाई च्या माध्यमातून गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा मिळावी, याचा प्रयत्न करता आला; पण बलात्कारित महिलेला जिवंत राहण्याचा अधिकार नाकारण्याचाच प्रयत्न करणाऱ्यांना कुठल्या न्यायालयात शिक्षा होणार?
एखादीवर बलात्कार होतो म्हणजे केवळ तिचं शरीर तिच्या इच्छेविरुद्ध ओरबाडणं एवढंच असतं का? लष्करी सेवेत असलेल्या या अधिकारी महिलेचं बलात्कार होण्यापूर्वीचं आयुष्य आणि त्यानंतरचं आयुष्य यात खरंतर काहीच फरक राहता कामा नये. पण तसं घडलं नाही. आपल्या “शूचिर्भूत’ समाजानं ते असं राहूच नये, याची मोठीच खबरदारी घेतली. मोठ्या प्रेमानं नात्यांमध्ये गुंफलेल्या, आपल्या म्हणवल्या जाणाऱ्या रक्ताच्या नात्याच्या माणसांचे खरे चेहरे या घटनेनंतर त्यांच्यासमोर आले. खंरतर बलात्काराची घटना आणि त्यानंतरचं त्यांचं आयुष्य या दोन्ही वेगवेगळ्या घटना असायला हव्या होत्या; पण दुःखाची, वेदनेची कधीही न संपणारी एक लांबलचक साखळीच त्यानंतर तयार झाली. अपहरण होऊन बलात्कार झाला, यातली हिंसा, क्रौर्य आणि स्त्रीवरचं आक्रमण यातलं काहीएक समजून न घेता ‘एवढ्या रात्री या कुटुंबानं प्रवास का केला?’ ‘नवरा आणि मुलानं प्रतिकार का केला नाही?’ ‘हिच्यावरच बलात्कार का झाला?’ ‘हिचंच काही तरी चुकलं असेल,’ अशा शब्दांत हजेरी घेतली जाऊ लागली. ज्याप्रमाणे हिंसा एखाद्याचा जीव घेऊ शकते, त्याप्रमाणेच शब्दसुद्धा माणसाला कणाकणानं जगणं कसं असह्य करू शकतात, याचा विदीर्ण करणाऱ्या अनुभवाचा निखारा या बाईंच्या गाठीशी आहे.
बलात्काराच्या घटनेनंतर या बाईंची समाजात ओळख गोपनीय ठेवण्याचा शंभर टक्के प्रयत्न पोलिसांनी केला; पण खरी समस्या घराबाहेर नसून, ती घरातच असल्यानं भयंकर मानहानीला या बाईंना तोंड देण्याची वेळ आली. बाहेरच्यांशी लढणं सोपं असतं; पण आपल्याच माणसांशी लढणं खूपच क्लेशदायक. ही सुरुवात जर आई पासून होत असेल, तर मग सगळंच संपतं. बाई सांगतात ः ”ज्या वेळी पाठीवरून आईचा हात फिरावा…. आईच्या कुशीत शिरून अश्रूंना वाट मोकळी करून द्यावी, असं वाटत होतं, त्या वेळी आई आली नाही. त्यानंतर माझ्या डोळ्यांतून पाणी येणंच थांबलं. त्या घटनेनंतर सासूबाईही आमचं घर सोडून दुसऱ्या दिराकडं गेल्या, त्या परत कधीच फिरकल्या नाहीत. बाई म्हणून माझं दुःख त्यांच्यापर्यंत पोचलंच नाही. गेल्या तीन-चार वर्षांत त्या दोघींचंही निधन झालं; पण मी त्यांच्या शेवटच्या कार्याला गेले नाही. जिवंतपणी माझ्या सुरू असलेल्या मरणयातनांना त्यांनी साथ देणं टाळल्याची खंत माझ्या मनातून कधीच जाणार नाही.” नातं दुरावण्याची सुरवात आई आणि सासूपासून सुरू झाली. कुटुंबातल्या इतरांनी पण तेच सुरू ठेवलं. बाईंचा एकुलता एक भाऊ, वहिनी, मोठे दीर अशी कुटुंबातली कोणतीच माणसं त्या घटनेनंतर त्यांच्याजवळून फिरकलीदेखील नाहीत. त्या सांगतात :“आमच्या कुटुंबातली जवळपास 12 लग्न माझ्या घरात ठरलीत. कितीतरी मुली मी पसंत करून घरात आणल्या. इतक्या सगळ्या लग्नांमध्ये आम्ही हौसेनं मिरवलो. माझ्याशिवाय आमच्या कुटुंबातलं पान हलत नव्हतं की सणवार होत नव्हता. त्या घटनेनंतर मात्र ‘अशी बाई आपल्या घरातही यायलो नको’ असं मला सुनावलं जाऊ लागलं. बलात्काराच्या घटनेनंतर ‘हे माझ्याच बाबतीत का घडलं,’ असा प्रश्न मला सतत पडत होता. आजूबाजूच्या लोकांच्या या अशा वागण्यानं ‘यात माझा काय दोष?’ हाही प्रश्न मला छळत होता. खूप खचले होते मी. नऊ महिने कामावर जाऊ शकले नव्हते. दुःखाच्या खोल गर्तेत मला माझ्या नवऱ्यानं फक्त हात दिला. या घटनेनंतर माझा जेवढा छळ झाला, त्यापेक्षा कैक पटींनी अधिक अवहेलना माझ्या नवऱ्याची झाली. ‘तो तिला साथच कशी देऊ शकतो?’ ‘सरकारी नोकरीतला मोठा पगार मिळतोय म्हणून तो तिच्याबरोबर थांबलाय…’ असं कितीतरी त्याच्याविषयी बोललं गेलं. मात्र, तो त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला अव्हेरून माझ्यासोबत उभा राहिला. ‘तू हा लढा लढलाच पाहिजेस’, अशी उभारी त्यानंच मला दिली.”
पराया ठिकाणीच पाझर
माणसानं कसं असू नये, याचा वस्तुपाठ या बाईंच्या नातलगांच्या निमित्तानं समोर आला. मात्र, गेल्या सहा वर्षांच्या या संघर्षात त्यांच्याबरोबर उभं राहिलेल्यांची संख्याही मोठी आहे. बाई त्यांची नावं आवर्जून घेतात. बाई सांगतात : “ही घटना घडल्यानंतर ज्या एकपींनी गुन्हा दाखल करून घेतला, ते रवींद्र सेनगावकर यांनी पहिल्या दिवसापासून आम्हाला जो विश्वास दिलवा, त्या विश्वासाच्या बळावरच न्यायालयीन लढा लढण्याची उमेद मला मिळाली. 24 तासांच्या आत त्यांनी चारही गुन्हेगारांना जेरबंद केलं. ही गोष्ट त्या परिस्थितीत आमच्यासाठी खूप आश्वासक होती. आमदार डॉ.नीलम गोऱ्ऱ्र्हे यांनी विधान-परिषदेत या घटनेला वाचा फोडली. खासदार वंदना चव्हाण यांनीही सातत्यानं या प्रकरणाचा पाठपुरावा केला. तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर.आर.पाटील यांनी दखल घेत गुन्हेगारांवर मोक्का लावला. माझी ओळख गोपनीय राहावी यासाठी, मी मागेन त्या जिल्ह्यात खटला चालवला गेला. अॅड. नीलिमा वर्तक याही माझ्यामागं खंबीरपणे उभ्या होत्या. गेली सहा वर्ष पुणे आणि बीड पोलिस प्रशासन माझाच नव्हे; तर माझ्या नवऱ्याचा आणि मुलाचाही आधार बनून उभं राहिलं. माझी माणसं म्हणून आम्हाला ज्यांचं कौतुक होतं आणि अभिमान होता, त्यांनीच आम्हाला अव्हेरल्यानंतर तर जगणं अधिक अवघड होतं. मात्र, मी कोलमडणार नाही, याची काळजी सेनगावकर सरांपासून ते अगदी आमच्या केसचे चौकशी पोलिस अधिकारी असणारे संभाजी कदम यांच्यापर्यंत अनेकांनी सातत्यानं घेतली. आमच्या नात्यातली माणसं दुरावली होती. अशा प्रकरणांमध्ये खरंतर प्रेमाचा आधार देणारी माणसं तुमच्या अवतीभोवती 24 तास हवी असतात. ही कमतरता संभाजी कदम यांनी पूर्ण केली. गेली सहा वर्षे ते दर 15 दिवसांनी फोन करतात. हा त्यांच्या कामाचा भाग अजिबात नाही. ताई , काळजी करू नका; तुम्हाला न्याय मिळेल, असा आधार देतात. जगण्यासाठी अजून काय हवं असतं…?
हीघटनेनंतर पहिल्या सहा महिन्यांतच चारही आरोपी न्यायालयाच्या आवारातून पळाले होते. तिघांना त्याच वेळी आणि एकाला पंधरा दिवसांनंतर अटक करण्यात आली. तेव्हापासून मला पोलिसांनी पूर्णवेळ संरक्षण दिलं. गेल्या सहा वर्षांत जवळपास 250 वेगवेगळे पोलिस आमच्या कुटुंबाचा भाग बनून राहले आहेत. यातले अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी बदली होऊन गेले, तरी आवर्जून फोन करून चौकशी करतात. म्हणजे, अनेकजण तर माझ्या मुलाच्या वयाचे असल्यानं त्याचे ते मित्र झाले आणि यांनीही त्याला खूप आधार दिला.
ही घटना घडली तेव्हा या बाई चा मुलगा 16 वर्षांचा होता. याच्या आई वरच्या बलात्काराच्या घटनेचा तोसाक्षीदार होता. बाई सांगतात ः “उमलण्याच्या वयात तो कोमेजून गेला. सारखा घराबाहेरच राहायचा. खूप अबोल झाला होता. तीन वषापूर्वी जीवघेण्या अपघातात तो अंथरुणाला खिळला. गेली दोन वर्षे तो याच अवस्थेत होता. आता काही महिने झाले, तो घरातल्या घरात चालू लागलाय. त्याच्या या अपघातानंतर पुन्हा एकदा माझ्या आणि त्याच्या नात्याला पालवी फुटू लागली. आता तो आम्हा दोघांशीही मोकळेपणानं बोलू लागला आहे. कोणतीच अढी त्याच्या मनात नाही.”
दिल्लीत चार वर्षांपूर्वी तरुणीवर बलात्कार झालेल्या घटनेमुळं बाई साहिजकच खूप अस्वथ होऊन गेल्या.
“कशा सहन केल्या असतील या कोवळ्या वयात या मुलीनं या वेदना…? जगली-वाचली तर कशी उभी राहील ती…? असे प्रश्न त्यांच्या मनात येत राहिले. त्या सांगतात : लहान, तरुण वयातल्या मुलींवरच्या बलात्काराच्या बातम्या वाचल्या की मला खूप अस्वस्थ व्हायला होतं. या वेदना, अवमान सहन करण्याची ताकदच नसते कुठल्याच वयात. मी लष्करात नोकरीला होते. नवरा, मुलगा, संसार होता माझ्याकडं; पण या लहान वयातल्या मुलींकडं काय असतं? मी कुणावर अवलंबून नसतानाही माझी जवळची माणसं मला परकी झाली. या मुलींचं तर ते फुलण्याचं वय असतं. त्यांच्या वाट्याला अशा प्रकारची दुर्घटना आली तर त्या कशा सावरणार? आपला समाज खूप कोत्या मनाचा आहे. त्यामुळंच अशा घटना होऊच नयेत, याची खबरदारी यंत्रणेनं घ्यायला हवी आणि घडल्याच तर त्यांना तोंड देण्यासाठी सगळ्याच पातळ्यांवर मदतीचे हात मनापासून पुढं केले गेले पाहजेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, दीर्घ काळासाठी अशा पीडितांसाठी चांगल्या दर्जाचं समुपदेशन उपलध करून दिले पाहिजे… बाई बोलायच्या थांबल्या… त्यांच्या डोळ्यांत पाणीही होतं आणि चेहऱ्यावर काहीसं हसूही…ते दृश्य पाहून गलबलून आल्यासारखं झालं. त्या जे काही बोलल्या, ते अर्थातच हिमनगाचं टोक होतं, हे तर स्पष्टच आहे. नवरा वगळता इतर प्रेमाची माणसं दुरावल्यावर दोन पर्शियन मांजरं आणि एक कुत्री हे त्यांच्या कुटुंबाचे सदस्य झाले आहेत.
बाई म्हणतात : माझ्या दोन्ही मांजरांना माझ्या वेदना कळतात. माझी सगळी दु:खं मी त्यांना सांगते. त्यांच्या डोळ्यांत माझ्या वेदना उमटतात… इतरांनी माणूसपण गमावलं असलं, तरी या प्राण्यांनी ते जपलं आहे. बलाकाराच्या निषेधासाठी केवळ मेणबत्या घेऊन बाहेर पडणाऱ्यांच्या डोळ्यांत हे खासच अंजन असेल!
***

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.