शिक्षणात लैंगिकताशिक्षणाचा उतारा हवाच हवा

वेळोवेळी उघडकीस येणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांचा धिक्कार करावा तेवढा थोडाच. पण यावर दीर्घमुदतीचा आणि सर्वात परिमाणकारक उपाय म्हणजे, मुलामुलींना अगदी शालेय जीवनापासून लैंगिकताशिक्षण देणे. दुर्दैवाने ‘फाशी’, ‘नराधम’, ‘हिंसा’ वगैरेच्या चर्चेत हा मुद्दा बाजूलाच राहतो.

लैंगिकताशिक्षणाला नाव काहीही द्या. ‘जीवन शिक्षण’ म्हणा, ‘किशोरावस्था शिक्षण’ म्हणा किंवा आणखी काही म्हणा. पण व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इंटरनेटच्या जमान्यात पुढच्या पिढीपर्यंत, या बाबतीतली अत्यंत विपर्यस्त, चुकीची आणि चुकीच्या स्रोतांद्वारे पसरवली जाणारी माहिती सदासर्वदा पोहोचत असते. ती थोपवणे आता सरकार, पालक, शिक्षक, शाळा कोणालाच शक्य नाही. तेव्हा योग्य त्या वयात, योग्य त्या स्रोतांकडून, योग्य ती माहिती उपलब्ध होईल अशी व्यवस्था करणे, एवढेच आपण करू शकतो. दोन्हींतले काय निवडायचे हा अर्थात ज्याच्या त्याच्या सदसद्विवेकबुद्धीचा प्रश्न राहील.

वास्तविक हाच मुद्दा इथे सर्वांत महत्त्वाचा आहे. हा सदसद्विवेक जागृत ठेवणे हेही या अभ्यासक्रमाचे काम आहे. हे लैंगिक शिक्षण नाहीच. हे ‘लैंगिकता’ शिक्षण आहे. Sex आणि Sexuality असा हा फरक आहे. Sex (समागम) ही शारीर क्रिया झाली. Sexuality (लैंगिकता) ह्याला मानसिक, भावनिक, सामाजिक, आर्थिक, नीतिविषयक अशी इतरही अनेक अंग आहेत. लैंगिकता तुमचे बाल्य, तारुण्य, वार्धक्य हे सारे सारे व्यापून असते. समागमातून एखादा ब्रह्मचारी सुटका करून घेईलही स्वतःची, पण लैंगिकतेतून त्याचीही सुटका नाही. शरीरातील, मनातील नैसर्गिक बदल थोपवता येत नाहीत. त्यामुळे कोंबडं झाकलं तरी उजाडायचं राहत नाही. तेव्हा लैंगिकताशिक्षणाला पर्याय नाही.

ही शाळेची/ कॉलेजचीच जबाबदारी आहे. ‘पपा, ‘फक्‌ यू’ म्हणजे काय हो?’ अशा प्रश्नाने गांगरणारे मम्मी/पप्पा ह्या कामी कुचकामी आहेत. लैंगिकता शिकवणे हेही एक कौशल्य आहे. ते शिक्षकांना सहजप्राप्य आहे. आईबाबांना नाही. तेव्हा शिक्षकांचीच ती जबाबदारी आहे. ह्यात स्त्री-पुरुष समानता, प्रेम आणि त्याचा अर्थ, परस्परांबद्दल आदर, जोडीदाराची निवड, हुंडा, बालविवाह, स्त्रीभृणहत्या, लैंगिक व्यवहाराबद्दल समज गैरसमज, जबाबदार पालकत्व, लैंगिक आरोग्य, लैंगिक शोषण, गर्भनिरोधन असे अनेक विषय येतात.

लैंगिकताशिक्षण म्हटले की लोक दचकतात. जरा हळू बोला म्हणतात. त्यांना असे वाटते, की हा माणूस आता समागमाची सचित्र माहिती देणार. (ह्यांचीच पोरंपोरी समागमाची चित्रफीत मोबाईलमध्ये बघत असतात ते ह्यांना दिसत नाही.) काही तरी असभ्य, अश्लील, अचकट विचकट बोलणार. पण इथेच सगळे चुकते. असभ्य, अश्लील, अचकट विचकट बोलण्यापासून ते नृशंस लैंगिक अत्याचारापर्यंत घडणाऱ्या घटना ह्या लैंगिकताशिक्षण दिल्यामुळे घडत नाहीत; तर बरेचदा ते न दिल्यामुळे घडतात. अगदी प्रत्येकवेळी शाळा-कॉलेजमध्ये या विषयावर कार्यशाळा घेतल्यावर, उपस्थित शिक्षक खिन्न मनाने येऊन सांगतात, ‘आम्ही शाळेत असताना तुम्ही हे शिकवायला यायला हवं होतं.’

लोकांना वाटते की हे ‘ज्ञान’ प्राप्त झाले की ते वापरण्याचा जास्तच मोह होईल (कुंती परिणाम). खरेतर मोह, उत्सुकता, जिज्ञासा हे सारे असतेच. वयानुरूपच आहे हे. अज्ञानात ते उलट जास्त फोफावते. त्याचे तण माजते. ब्लू फिल्म्स, गावगप्पा यातून ‘माहिती’ प्राप्त होण्यापेक्षा, ‘ज्ञान’ प्राप्त झाले तर या साऱ्याला जबाबदारीचे कोंदण मिळते. हे कोंदण देण्याचे काम लैंगिकताशिक्षणात अभिप्रेत आहे. वयात येणे म्हणजे काही नुसते दाढी-मिशा फुटणे किंवा पाळी येणे नाही. वयात येण्यामधे स्वतःची मूल्य ठरवणे, स्वतःच्या निर्णयाची जबाबदारी घेणे, हेही आले. शिक्षणाने हे दुष्कर काम सुकर नाही का होणार?

जगभरातल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की तरूणांचे लैंगिक वर्तन शिक्षणाने सुधारते, बिघडत नाही. या शिक्षणाने माणसे बिघडतील असे म्हणणे म्हणजे भाषेच्या अभ्यासाने माणसे फक्त उत्तमोत्तम शिव्या देतील असे म्हटल्यासारखे आहे. उलट भाषेवर प्रभुत्व असेल तर शिव्या न देताही अगदी तोच परिणाम साधता येतो. शेवटी तुम्ही काय आणि कसे शिकवता हे महत्त्वाचे आहे. शिक्षण हे दुधारी असते. इतिहास शिकवता शिकवता द्वेषही पसरवता येतो हे मान्यच आहे की. पण यावर उपाय लैंगिकता शिक्षणावर बंदी हा असूच शकत नाही. अभ्यासक्रमाची अधिकाधिक सुयोग्य रचना हा असू शकतो.

ज्या वयात अभ्यास आणि करिअर घडवायचे त्या वयातच हे पुढ्यात येते. विकृत पोर्नक्लिप्स, मुलींबद्दल गलिच्छ शेरेबाजी, स्वतःची ‘पुरुषी’ प्रतिमा जपण्यासाठी व्यसनांची साथ, वेश्यागमन असे अनेक भाग ह्यात असतात. पुढे स्वतःबद्दल नकारात्मक भावना, अपराधगंड यांनी अभ्यास पार उद्ध्वस्त होतो. यावर लैंगिकताशिक्षण हा उपाय आहे. शिक्षण ह्या निसरड्या वाटेवरून तुमचे बोट धरून तुम्हाला नेते. तुमचा हात धरून चालते. तुमचे पाऊल वाकडे पडेल ते शिक्षणाच्या अभावानी.

बरेच पालक म्हणतात, ‘हे असले काही मुलांना सांगायचे, म्हणजे त्यांना आमच्याबद्दल काय वाटेल?’ ही भीतीही अगदीच अनाठायी आहे. शरम, लाज, संकोच हा बहुतेकदा पालकांच्या मनात असतो. मुलांना असते निव्वळ उत्सुकता. एकदा परिपक्व पद्धतीने, सजीवांचा जगण्याचा नियम म्हणून ही गोष्ट सांगितली तर मुलांना काही विशेष वाटणार नाही. जसे गुरुत्वाकर्षणाच्या नियमाला ती आपल्या आई-बाबांना जबाबदार धरत नाहीत, तसेच ह्यालाही आई-बाबांना जबाबदार धरणार नाहीत. काळजी नसावी.

‘पाण्यात पडल्यावर पोहायला येतंच की’ असलाही युक्तिवाद असतो. पाण्यात पडल्यावर आपोआप पोहता येत नाही. आधी गटांगळ्या खाव्याच लागतात. शिवाय पोहोता येईलच असेही नाही. कदाचित बुडूही. कित्येक बुडालेले आहेत. शिकण्याचा हाही एक मार्ग आहे, मान्य आहे. पण असेल त्या पोराला, दिसेल तो क्लास लावणाऱ्या पालकांनी, आपल्या पोरांना पोहोण्याचा क्लास लावायचा की द्यायचे ढकलून, हे ठरवायची वेळ आली आहे.

‘प्राण्यांना कोण शिकवतं हो?’ अशीही पृच्छा येते. प्राण्यांची आणि मानवाची बरोबरी निदान या क्षेत्रात तरी होऊ शकत नाही. प्राण्यांची वागणूक ही सर्वस्वी निसर्गस्वाधीन असते. समाज, धर्म, संस्कार असे अनेक घटक, मानवी लैंगिक वागणूक नियंत्रित करत असतात. समाज, धर्म, संस्कार विरुद्ध निसर्ग असा काहीसा हा लढा असतो. लढा म्हटल्यावर आधी त्याचा धडा नको? बिनधड्याचे शिपाई हे ऐन लढाईत शेंदाडशिपाई ठरतात, नाही का?

बलात्कार हे पुरुषी कामजन्य हिंसेच्या हिमनगाचे फक्त टोक आहे. त्याखाली निव्वळ ‘नजरेने बलात्कार’, कामाच्या ठिकाणचे लैंगिक शोषण, लिंगाधारित भेदभाव, छेडछाड, बालकांचे लैंगिक शोषण, वैवाहिक जीवनातला बलात्कार असे अनेक स्तर आहेत आणि या साऱ्यावर लैंगिकताशिक्षण हा उतारा आहे. आपण फक्त दरवेळी मिडीयात गाजणाऱ्या बलात्कारालाच जागे होणार का? पण आज परिस्थिती अशी आहे की, जागतिक आरोग्य संघटना, इंटरनॅशनल प्लँड पेरेंटहूड आणि अनेक शिक्षण मंडळांनी सुचवून, आग्रह धरूनही, काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय आमदारांनी विधानसभेत एकमुखी ठराव करून हा विषय अभ्यासक्रमात येऊ दिला नाही. आता तरी शहाणे होऊ या. पुढच्या पिढीच्या निरामय कामजीवनासाठी योग्य त्या वयात, योग्य त्या स्रोतांकडून, योग्य त्या लैंगिकताशिक्षणाचा आग्रह धरूया. विधानसभेत गाजायला पाहिजे असेल तर ही मागणी गाजू दे.

पुनःप्रकाशित, साभार.

डॉ. शंतनू अभ्यंकर
9822010349
shantanuabhyankar.blogspot.in

अभिप्राय 1

  • लैंगिकता आणि त्या संबंधातली नैतिकता आणि कायदा या सर्वाचे शिक्षण हवे. सर्व प्रकारची लैंगिकता जरी मान्य केली तरी त्यामध्ये कमी मान्य असणारी लैंगिकता आणि अधिक मान्य असणारी लैंगिकता असे प्रकार होऊ शकतात. असे प्रकार नैतिकतेच्या आणि वैयक्तिक-सामाजिक स्वास्थाच्या निकषांवर तपासून घेता येतात. त्यानुसार त्यांची वैधानिकताही ठरते किंवा ठरावी. या सर्वाचा शिक्षणात समावेश हवा.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.