मन केले ग्वाही

‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ या विषयावर ऑक्टोबरचा विशेषांक काढायचा संपादकांचा मानस आहे. नास्तिक्य हे केवळ देवाला नाकारण्यातून आलेले नसून अफाट वाचन, अभ्यास, विज्ञानाशी त्याची सांगड, चिकित्सा असे सारेच त्यामागे असते, असे त्यांचे म्हणणे आहे. “बुद्धिप्रामाण्यवाद हा समस्त सृष्टीसाठी हितकारक आहे” अशी ह्या अंकाची मध्यवर्ती कल्पना असावी असे त्यांनी ठरवले आहे. समस्त सृष्टीपेक्षा मनुष्यसमाज असे संपादकांना म्हणायचे आहे असे मानते. माणसे बुद्धिप्रामाण्यवादी वागू लागल्याने सृष्टीचे म्हणजे समग्र जीवसृष्टीचे काही वेगळे भले होईल की नाही असा विचार मी केलेला नाही. आपण मनुष्यवस्तीच्या परिप्रेक्ष्यातूनच विचार करत असतो. तसेच हितकारक कशाला म्हणायचे हेही दृष्टिकोणांवर अवलंबून असते. लगेचचे हित, मध्यम अंतरावरचे आणि अंतिमत: अशी हिताची वेगवेगळी रूपेही असतात. हे सगळे पाहायचे तर फारच खोलात जावे लागते. मग त्यासाठी अफाट वाचन, अभ्यास इ. लागेल. मी काही तो केलेला नाही.

तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाची पार्श्वभूमी माझ्याजवळ नाही. बुद्धिप्रामाण्यवाद हा शब्ददेखील मला बराच उशिरा कळला. मात्र मी विज्ञानाची नम्र विद्यार्थिनी आहे. मला पटेतोवर विज्ञानाला प्रश्न विचारत राहावे आणि पुरेसे उत्तर मिळेपर्यंत त्याचा माग सोडू नये, एवढे मला माझ्या विज्ञानावरच्या विश्वासाने सांगितले आहे.

नास्तिक्याचा तत्त्वज्ञानातला अर्थ वेदप्रामाण्य न मानणे असा आहे. खरोखर वेद वाचलेले लोक आज अगदी चिमूटभर आहेत. उरलेल्यांनी जे वाचलेलेच नाही त्याला ते प्रमाण मानणार तरी कसे? म्हणजे जर बहुसंख्य नास्तिक्य नाकारत असले तर ते केवळ अंधश्रद्धेमुळेच असू शकते. अंधश्रद्धा म्हणजे कुणीतरी सांगितले की त्या समजुतीला प्रश्न न विचारता मान्य करणे. विज्ञानशिक्षणात अशीच फसवाफसवी चालू शकते. जरा वेगळ्याच विषयावर जाण्याचा धोका पत्करून एक गंमत सांगते. बशीत मेणबत्ती लावून त्यात पाणी घालून नंतर मेणबत्तीवर ग्लास उपडा टाकायचा असा एक प्रयोग शाळेत शिकवत. ह्या प्रयोगाची सुरुवातच, ‘हेतू: हवेत प्राणवायूचे प्रमाण किती आहे हे मोजणे’ अशी असे. ग्लास उपडा ठेवल्यावर मेणबत्ती विझते आणि ग्लासात पाणी वर चढत जाते. हे साधारण १/५ चढते असे दाखवून त्याचे कारण ग्लासातला प्राणवायू संपला म्हणून निर्वात पोकळी निर्माण झाली व त्यावरून हवेत १/५ प्राणवायू असतो असे सिद्ध झाले असा निष्कर्ष काढत. प्रत्यक्षात या प्रयोगाचा हेतू आधीच मनात ठेवला नसता आणि बदलता येण्याजोग्या गोष्टी बदलून प्रयोग करायला उद्युक्त केले असते तर… उदा. एकाऐवजी दोन-तीन मेणबत्त्या एकाच बशीत लावून हा प्रयोग केला तर अर्ध्या ग्लासापर्यंत पाणी चढवता येते. हवेतल्या प्राणवायूचे प्रमाण तर असे बदलत नाही. पाणी चढण्याचे कारण इथे हवेच्या दाबाशी जोडलेले आहे. हे सांगण्याचे कारण शिक्षणविभागाने क्रमिक पुस्तकातूनही या चुकीच्या प्रयोगावर दोन पिढ्या म्हणजे ५० वर्षे काढली. विज्ञानशिक्षणही असे आपल्याला चकवते. मुळात विज्ञानशिक्षणाने जी वैज्ञानिक दृष्टी द्यायला हवी ती ते देत नाही. विचार करायला उद्युक्त करत नाही. असे या एकाच नाही अनेक प्रयोगांत घडलेले आहे. आणि नेमकी हीच बाब सर्वत्र घडते. त्यामुळे, ‘सत्य-असत्याशी मन केले ग्वाही। मानियले नाही, बहुमता॥’ असे संत तुकारामांचे म्हणणे सतत ध्यानात ठेवावे आणि शक्य असेल तिथे तरी आपण स्वत:ला साक्षी ठेवून कारण शोधावे हेही मी या प्रवासात शिकले आहे.

मी देवाला नाकारलेले नव्हते, पण मला वाटते, मुळात स्वीकारलेलेही नव्हते. याचे माझ्यापुरते कारण कदाचित मला देवाबद्दल सांगणार्‍यांबद्दल एकूण नाराजी असावी आणि त्यांचे म्हणणे जसेच्या तसेच स्वीकारू नये असे मला वाटले असावे म्हणून मी त्याच्या खोलात उतरले.

माझ्या आईवडिलांच्या घरात आणि दोन्ही आजोळी कमीअधिक प्रमाणात देव, व्रते, कुळाचार होते. आई सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी घरातल्या देवघरासमोर उभे करून चांगले वागण्याची शपथ देत असे. पण त्यांचा हा सगळा प्रकार देवावरच्या भक्तीपेक्षा आमच्याकडे ना असं असतं, आमच्याकडे ते चालत नाही; आमचं असं – आमचं तसं असे इतरांना दाखवण्याचा भाग जास्त असल्याचे मला नेहमीच जाणवे. अधूनमधून सत्यनारायण चाले. पूजेला बसलेले, जानवे घातलेले आणि पूर्ण मांडी घालून बसलेले पुरूष आणि रेशमी साडीत, पाटल्यातोडे घातलेल्या, अर्ध्या पाटावर मावत नवर्‍याकडे अदबीनं झुकलेल्या त्यांच्या बायका बघितल्या की त्या माणसांचे हे खरे रूप नाही, हे देवाला दाखवायला केलेले नाटक आहे असे वाटे. आईच्या माहेरी मोठे देवघर, त्यात चाळीस-पन्नास मूर्ती असत. आजोबा पहाटे चारला उठून तीन तास पूजा करत. मात्र त्यानंतरचे सर्व जागे तास ते इतरांवर आरडाओरडा, स्वत:ची प्रौढी आणि हेवेदाव्यांमध्ये आणि त्यांना हवे तेच करवून घेण्यात व्यतीत करत. त्यापेक्षा ते तीन तास ढुंगण वर करून झोपले असते आणि घरातल्यांशी थोडे बरे वागले असते तर बरे झाले असते असे मीच नाही, घरातले सगळेच म्हणत. त्यामानाने वडिलांची आई बरी होती. तिच्याकडे विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती होत्या आणि त्या वयात मी माझ्या बाहुलीला कपडे शिवे तशी तीही त्या मूर्तींना! रोजचे आणि विशेष प्रसंगाचे दागिने, थंडीत स्वेटर, शाल, सणाला नवे कपडे असे ती शिवत-विणत असे. सासूने सुनांना थोडे तरी छळलेच पाहिजे या धारणेने ती संधी मिळेल तेव्हा त्यांच्यावर ओरडत असे. शिवाय लहानपणी आश्रितासारखे जीवन गेल्याने मुलग्यांकडून लुगडी, दागिने असे स्वत:चे लाडही करून घेत असे. एकंदरीत आता घरात आजीला करायला काही काम नसे. काम नसले तरी आवराआवरी कर, पापड लाट, उद्याच्या स्वयंपाकाची तयारी कर असली कामे शोधून करणारी काही माणसे असतात, त्यातलीही ती नव्हती. तिला लहानपणी बाहुलीशी खेळायला मिळाले नसावे असे तिच्या त्यातल्या लगबगीवरून मला दिसे.

माझे आईवडील उच्चशिक्षित होते. विज्ञान विषयाचे उच्चशिक्षण त्यांनी दोघांनीही घेतलेले होते. मात्र ते विज्ञान शिकलेच नव्हते असे मला खरेच वाटते. जीवनातल्या व्यावहारिक संबंधात किंवा नातेसंबंधातदेखील काही प्रश्न आला की आई देवापुढे बसून अमूकतमूक उपास करेन असे नवस बोले आणि वडील कुणा बाबा-बुवांना गाठून निरसनाविषयी विचारत. मला शाळेत त्यांच्या अपेक्षेप्रमाणे गुण कधीच मिळत नसत तर मला शनीची पीडा आहे असे कुणीतरी सांगितल्याने त्यांनी मला शनीला तेल घालायला पाठवले होते. मी सारखे प्रश्न विचारून आईला हैराण करत असे. मी सुधारावे म्हणून आईने सोळा सोमवारचे कडक उपास धरले होते. उपासाने तिचे डोके भयंकर दुखे. त्यामुळे यापुढे तिला प्रश्न विचारायचे नाहीत असे मी ठरवले होते. ते उपास तिला मुलगा व्हावा म्हणून असल्याचे मला नंतर कळले. माझ्या अपेक्षेप्रमाणे त्या सोळा सोमवारांनीही तिला ठकवलेच.

शनीला तेल घातल्याने तो माझ्या शिक्षकांना मला गुण द्यायला कसे लावेल हे मला कळत नव्हते. तसे अर्थातच झाले नाही. तेव्हा मात्र मला खूप आनंद झाला… “बघ, मी सांगत नव्हते…”. आईने कपाळाला हात लावला.

मी कितीतरी स्तोत्रे मात्र म्हणत असे. स्तोत्रांचे पाठांतर करायला लहानपणी सहज जमे आणि म्हणून आवडेही. स्पष्ट शब्दोच्चारात आल्यागेल्यांना पाठ म्हणून दाखवले की एरवी वाट्याला न येणारे कौतुकही होई, हाही एक फायदा असावा. पण त्या स्तोत्रांचा थोडाफार अर्थ कळायला लागल्यावर लक्षात आले की बहुतेक स्तोत्रांच्या शेवटी, ते म्हटल्यास धनधान्य, पैसाअडका, पुत्रपौत्र मिळेल आणि दोष-पापे अनंतकोटी नष्ट होतील, इतकेच नाही तर भूत-प्रेत-समंध, रोग-व्याधीही जातील असा दावा असे. विद्या तर मिळणार होतीच पण रूपही मिळण्याची लालूच होती. “स्तोत्र म्हटल्याने एवढे सगळे कसे होईल?” असे मी आईला विचारले. पण तिला उत्तर देता आले नाही. ती म्हणाली, “तसा अनुभव तुला येईल.” बरेचदा स्तोत्रे म्हणूनही एकंदरीने दावा केल्याप्रमाणे ती स्तोत्रे काम करत नाहीत हे माझ्या लक्षात आले तेव्हा या उद्योगात काहीतरी गोची आहे असे माझे मत झाले. तसे बोलून दाखवल्यास, ‘मी उद्धट आहे. मुलीच्या जातीला असा उद्धटपणा बरा नाही – सासरी आईवडिलांचा उद्धार होईल’ असे म्हटले जाई. तसेच, ‘दोन थोबाडीत ठेवून दे म्हणजे ताळ्यावर येईल’ असे उपायही सुचवले गेले. आईने ते क्वचित करूनही बघितले. असो.

या पार्श्वभूमीवर पृथ्वीवरच्या जीवसृष्टीच्या उत्क्रांतीचा प्राथमिक अभ्यास शाळाकॉलेजमधल्या विज्ञानात व्हायला लागला तेव्हा देव हा माणसानं कल्पनेनं निर्माण केला आहे, तो उपास करण्यात, तेल घालण्यात, आजोबांच्या तीन तासांच्या पूजेत किंवा देवाच्या मूर्तीला कपडे शिवण्यात नाही हे कळायला काहीच विशेष बुद्धी लागली नाही. शालेय, महाविद्यालयातल्या अत्यंत प्राथमिक विज्ञानशिक्षणातही देव नावाची वस्तू कुठेही नाही, किंवा तिला देता येईल अशी जागाही मला दिसली नाही. मानवप्राणी हा कुणा देवांनी वगैरे निर्माण केलेला नाही. मुळात जीवसृष्टी हा पृथ्वीवर घडलेला रासायनिक अपघात आहे. अब्जावधी वर्षांच्या अशा अनेक जीवरासायनिक अपघातांनंतर मानव निर्माण झाला. आणि त्यानंतर लाखभर वर्षांनी म्हणजे सुमारे १०-१२ हजार वर्षांपूर्वी मनुष्यवस्ती व्हायला लागली. हे पुढे झालेल्या थोड्याफार वाचनातून समजल्यावर आपला अंदाज बरोबरच होता ह्याची खात्री पटली. आईच्या एकंदर शिकवणुकीवरून देव हे जीवनातल्या भद्रतेचे दुसरे नाव म्हणून मी मान्य केले तरी तो धर्माशी जोडलेला, मूर्तीतला, देवळातला, व्रताने, पूजेने प्रसन्न होणारा नसून फार तर आपण सज्जनपणानं वागण्यात आणि आपल्या आनंदातच असतो… आपण हवे तर तसा मानावा; असे समजण्याशिवाय देव या गोष्टीला माझ्या मनात स्थान असण्याचे कारण नव्हते.

सामाजिक जीवनात माझ्या आसपास ज्या बहुविध विषयांवर चर्चा होत असे किंवा वर्तमानपत्रांतून व पुस्तकांमध्ये मी जे वाचले त्यातून मिळालेल्या माहितीनुसार – विचारी माणसे तर्काला धरून अन्वय काढून सांगतात – अशी एक माझी सामान्य धारणा तयार झाली. आपणही बुद्धीला-विचारांना-तर्काला मानवेल ते वागावे असे मी ठरवले. बालमानसशास्त्राचा अभ्यास करताना लहान मुले त्यांच्या चौकटीत तर्कपूर्ण वागतात. प्रश्नही तसेच विचारतात हेही मी वाचले आणि प्रत्यक्ष अनुभवले. तेव्हा लहानपणापासून प्रत्येकाजवळ वयानुरूप तर्कबुद्धी असते असे माझे गृहीतक होते आणि आहे. सामान्य बुद्धिमत्तेच्या माझ्यासारख्या अनेकांनी सामान्यपणे हेच ठरवलेले असणार. असे तार्किक वागणेही दु:ख, अतीव आनंद, भीती वगैरे भावनिक प्रसंगी आपल्याला कधीकधी जमत नाही, तरी त्या भावनेच्या प्रभावातून बाहेर आल्यावर आपण पुन्हा समतोलाच्या दिशेने जातो, निदान जावे अशी आपली इच्छा असते आणि तसा प्रयत्नही असतो, असे माझे माझ्या लक्षात आलेले होते. पण आसपासचे लोक देव का मानतात हा प्रश्न मात्र मला सुटत नसे.

भोवतीच्या चारपाच माणसांबाबत तरी इतरांपेक्षा आपण कसे श्रेष्ठ आहोत, आपला धर्म कसा उच्च आहे यावर त्यांची श्रद्धा अधिक आहे आणि देव वगैरे कल्पना ते स्वत:ला आणि इतरांना सिद्ध करून देण्यासाठी वापरतात हे मला दिसले. पण हाच तर्क सर्वांबाबत लावणे थोडे अतिरेकी वाटत होते, म्हणून ते कळून घेण्याच्या इच्छेने मी देव – त्यामागून धर्म, पाप-पुण्य अश्या कल्पना आल्याच कुठून ह्याचा माझ्यापुरता शोध घेतला.

इतर प्राण्यांपेक्षा मनुष्यप्राण्याची विशेष क्षमता आहे – ती कल्पिते निर्माण करण्याची. जे घडलेले नाही ते मनात घडवायची क्षमता म्हणजे कल्पिताची क्षमता. त्यातूनच देवाची, धर्मांची, माणसानं उभारलेल्या विविध धर्मांच्या सुंदर देवळांची, इतकेच काय तर अनेक भाषा-बोलींची उत्पत्ती झाली आहे. पूर्वजांच्या त्या कल्पनासौंदर्याचे आपल्याला आत्यंतिक कौतुक वाटले तरी मूळ कल्पितांना आज आपण सत्य मानत असू तर ती आपल्या मानसिक कमकुवतपणाची खूण आहे. एखादा विचार किंवा काल्पनिक गोष्ट आवडली, त्याचा आपल्या मनावर परिणाम झाला की आपण त्यात रमतो. मग ती बाब आपण मनाने आपलीशी करतो. तसे हे कल्पित आपण आपलेसे केलेले आहे. आपण ह्याचा अर्थ मनुष्यसमाजाने. एकेकाळी लेखन-छपाई स्वरूपात सर्वांपर्यंत येणे शक्य नसल्याने ते मौखिक-स्मरण मार्गाने ध्यानात ठेवले जाई. एखादे वाचलेले पुस्तक एकवेळ आपण विसरू पण असे मौखिक-स्मरण विसरले जात नाही. ते आपलेसे होते. पुढे ते सत्यच आहे असे वाटले असेल आणि तेच पिढ्यानुपिढ्या लोक मानत गेले असावेत. पण मग त्याला काय अर्थ आहे, हे तर सापाची शेपटी पिळून तोंडात दिल्याप्रमाणे तेच ते घडत जाणे आहे. प्रत्येक पुढच्या काळात काही नवी गृहीतके निर्माण होतात. त्यांना जागा द्यायला नको का? आपले पूर्वज किती हुशार होते याची प्रचिती या कल्पितांमधून आली तरी आज आपल्याला परिस्थितीचे गमक काही प्रमाणात तरी उलगडलेले आहे, त्याची समज आपण बाजूला सारून कसे चालेल?

मृत्यू हे जीवसृष्टीच्या अस्तित्वातलं एक अटळ सत्य. विकसित प्राणिमात्र त्याला घाबरतात. दूर लोटायचा प्रयत्न करतात. मनुष्यप्राण्यालाही त्याची भीती वाटते. पण कल्पिते निर्माण करण्याची क्षमता असल्याने मनुष्यप्राण्याने त्यातून पुनर्जन्माचे, अविनाशी आत्म्याचे कल्पित निर्माण केले. आपण मेलो तरी आपला आत्मा जिवंत राहातो, तो फक्त कपडे बदलल्याप्रमाणे शरीर बदलतो – असे म्हटले की मृत्यूची भीती थोडी कमी होत असावी. आपण मेलो तरी आपला आत्मा असेल, तो प्रिय व्यक्तींच्या आसपास राहील ही कल्पना त्याने मृत्यूची भीती पार करण्यासाठी निर्माण केलेली आहे. त्यात सत्यांश नाही. हेच कल्पित पुढे वाढवत जन्मपत्रिका, अठरा लक्ष की काय त्या योनी, शनी-मंगळ वगैरे ग्रह, त्यातल्या कुणाकुणाच्या वक्रदृष्ट्या, सतराशे साठ देव, त्यांच्यातले हेवेदावे, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांना प्रसन्न करायच्या अठरापगड युक्त्या असा सगळा परिवार त्यासोबतीने निर्माण झालेला आहे. एखादी वाचकांना रमवून टाकणारी कादंबरी किंवा नाटक-चित्रपट खरा मानावा आणि त्यातल्या पात्रांच्या दु:खालाही आपण आपलेसे करावे व रडावे, रुसावे, चिडावे तसेच हे.

राम, कृष्ण ही कादंबरीतील म्हणजे कल्पितातील पात्रे आहेत. एखाद्या कादंबरीतल्या पात्राची बाजू घेऊन आपण चर्चा करतो, तेव्हा ते पात्र खरे नाही तर कल्पित आहे, लेखकाच्या मनात निर्माण झालेले आहे, खर्‍या व्यक्तीचे मूल्यमापन केल्याप्रमाणे त्याचे मूल्यमापन करू नये, ह्याची आठवण आपल्याला ठेवावीच लागते. खरे तर मूल्यमापन करण्याचीही गरज नसते, आपल्याला त्या उदाहरणातून मानवी जीवनातल्या एखाद्या तत्त्वाबद्दल म्हणायचे असते. रामायणात उर्मिलेवर अन्याय झाल्याचे दाखवले असले आणि एखाद्या स्त्रीवर असा अन्याय होणे चूक आहे असे आपले मत असले तरी आज उर्मिलेवरच्या त्या अन्यायाचे परिमार्जन करायला आपण सुप्रीम कोर्टाकडे धावत नाही. कादंबरीत खून करणार्‍याला आपण शिक्षा देऊ शकत नाही. तसेच असा अन्याय करणे योग्यच आहे किंवा कुणाला मारून टाकणे हे योग्यच आहे असेही मानायचे नसते. रामायण, महाभारत किंवा इतर देवांबद्दलच्या कथा अश्याच आहेत. त्यांना आपल्याकडे आपण अक्षरवाङ्मय मानू. कोणतेही अक्षरवाङ्मय मानवी वृत्तीबद्दल बोलते आणि कोणत्याही काळात ते असंगत ठरत नाही, हेच त्याचे वैशिष्ट्य असते. तरीही ते एक कल्पितच असते. लिहिणाराने ते हवेवर लिहिले नसते. तशी कुठलीही कलाकृती हवेवर निर्माण होतच नसते, तरी ती वास्तवाचा दस्तावेजही नसते. त्यात निर्मिकाच्या कल्पनाशक्तीच्या भरार्‍या असतात, तश्या त्या असण्याबद्दल तक्रार नाही, खरे म्हणजे त्या असायलाच हव्यात; पण त्यातल्या पात्रांना आज त्या कलाकृतीच्या समीक्षेपलीकडे महत्त्व नाही. त्या पात्रांच्या वर्तनाबद्दल आज गळेही काढायचे नसतात किंवा दोषही द्यायचा नसतो.

देवाने हे जग निर्माण केले आहे. आपण त्याची भक्ती केली, त्याला प्रिय गोष्टी (हीदेखील कल्पित टोकेच) दिल्या तर तो आपल्याकडे विशेष लक्ष देतो आणि आपली दु:खे निवारण करतो, वगैरे कल्पना मूळ सुंदर कल्पिताला जोडली गेलेली अतिसामान्य आणि दुर्दैवी कल्पिते आहेत. वास्तव नाहीत.

आईनस्टाईनचे एक वाक्य आहे. जपानवर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्यानंतर त्याने म्हटले होते की इतकी लहान मुले यात मृत्युमुखी पडली, त्यांनी कुठले पाप केले होते? त्याबद्दल देवाला फक्त तो नसलाच तरच आपण क्षमा करू शकू.

देवकल्पना सुचण्याबद्दल ते सुचलेल्यांच्या कल्पनालाघवाचे मला आजही कौतुक वाटते. त्या कल्पनेतून अनेक उत्सव निर्माण झाले, सुंदर देवळे किंवा प्रार्थनास्थळे उभारली गेली, मन थक्क करणारी लेणी खोदली गेली. त्याने मनुष्यजातीचे आयुष्य सुंदर झाले. भाषा हे तर जीवनाचे कारण झालेले कल्पित. ते नसते तर काय झाले असते असे वाटते. कलावंतांनी चित्रे काढली, कथा-कविता लिहिल्या, अनेक प्रयत्नांनी जग हरक्षणी अधिकाधिक सुंदर केले. अर्थात त्या धर्माधर्मातील भांडणांनी, त्या प्रार्थनास्थळांबद्दलच्या अगोचर हट्टांनी आणि उत्सवांच्या व्यापारी स्वरूपांनी जीवन विकृतही झाले. आणि आजच्या वास्तवातल्या हर्ष-दु:खामागची कारणे मागच्या-पुढच्या जन्मांमध्ये शोधण्यामधले कहर-कल्पित तर कल्पनेपलीकडे निरर्थक आणि अतार्किक आहे. शनी-मंगळ वगैरे ग्रह नियमितपणे सूर्याभोवती फिरण्याचे काम सोडून मनुष्यजातीच्या आयुष्यांमध्ये ढवळाढवळ करू शकतील असे वाटण्यामागे एक तर स्वत:च्या कृत्यांची जबाबदारी टाळण्याचे आणि कल्पिताच्या आधाराने इतर समाजाच्या अगतिकतेचा गैरफायदा घेऊन स्वत:चे खिसे भरण्याचेच कारण आहे.

बघू लागलो की देव, त्यांच्या निर्मितीसोबतीनं आलेले धर्म यांच्या परिवारातल्या अनेक गोष्टी हास्यास्पद असल्याचे दिसू लागते. व्रतांच्या कहाण्यांचे पुस्तक माझ्या पिढीतल्या बहुतेकांनी वाचलेले असते. त्यात पती-पुत्रांचे आयुष्य वाढावे यासाठी व्रते आहेत. नवरा दुसर्‍या बाईच्या आकर्षणात अडकला तर त्याला परत आपल्याकडे खेचून आणण्यासाठीदेखील एक व्रत आहे. बाईचे आयुष्य वाढवायला किंवा ती दुसर्‍या पुरुषात किंवा स्त्रीत गुंतली तर परतवायला कोणते व्रत करावे याचे मार्गदर्शन त्यात नाही. ते जाऊदे, पण सांगायची गोष्ट, आपण पूजा करून, उपासतापास करून कुणाचे आयुष्य मोठे वा लहान कसे होईल? ते फारतर काही आजारपण आले तर उपचार करूनच होण्याची शक्यता आहे. कदाचित वैद्यकशास्त्राबद्दलचे संशोधन अपुरे आणि सर्वांना उपलब्ध नसताना काहीतरी करावे म्हणून बाया ते करत असतील म्हणावे तर शिक्षण मिळू लागल्यावर स्त्रियांनी आपल्या कल्पनांमध्ये बदल का नाही केला, आणि शिक्षण मिळालेल्या पुरुषांचे काय? त्यांना प्रश्न का पडत नाहीत? त्याच त्या धारणा मनाशी घट्ट जपून जगणार्‍या अनेकांना ते आजही का पडत नाहीत हे मला खरेच कळत नाही. हा विचार मनात यायला कुठल्याही गंभीर वाचनाची किंवा अभ्यासाची तशी काहीच गरज नाही. अगदी मासिक पाळीबद्दल अश्याच खूप समजुती समाजमनात आत्ताआत्तापर्यंत होत्याच की. या काळात स्त्री अमंगळ असते, तिने देवळात जाऊ नाही, तिने केलेले लोणचे बिघडते, झाड लागत नाही वगैरे. आता मी त्याबद्दल शिकवताना मुलामुलींनाच विचारते की आपल्याला जन्माला घालण्यासाठी आपल्या आईच्या शरीरात होणार्‍या त्या बदलांना आपण अमंगळ म्हणावे का? आणि अर्थातच एकालाही तसे वाटत नाही.

पुण्यात गणपतीच्या एका देवळावर ‘जागृत देवस्थान’ अशी पाटी आहे. म्हणजे काय विचारले तर नवसाला पावणारा असे त्यांनी सांगितले. त्यामागचा पुरावा काय तर आमचा अनुभव असे त्यांचे म्हणणे. इथला गणपती जागृत आणि दुसरीकडचा गणपती झोपलेला असे कसे? गणपती तरी इथला आणि तिथला यात फरक कसा? मुळात देव एकच आहे की अनेक? आणि अनेक असले आणि आपापल्या भक्तांची इच्छा पूर्ण करत फिरत असले तर Too many cooks spoil the broth असे होणार नाही का? लोक ‘तर्क’ हा मुद्दाच विसरून गेल्यासारखे का वागतात? आणि सारखी जादूचीच अपेक्षा का करतात?

अनेकांना मी हे प्रश्न काही वर्षे विचारत असे. त्यांची एकूणएक उत्तरे तर्कहीन होती. काहींनी वेगळ्याच योगायोगाचा अर्थ परमेश्वर असा लावल्याचे दिसले. एकाने तर म्हटले की तसे मलाही देवबीव पटत नाही पण काय आहे आपल्याला माहीत नसणार्‍या बर्‍याच गोष्टी जगात आहेत. असलाच समजा देव तर उगाच आपण नमस्कार केला नाही म्हणून त्याची आपल्यावर अवकृपा झाली असे नको व्हायला! इतके सोयीस्कर उत्तर दुसरे नाही.

एक म्हणाल्या, एखादे संकट आले तर आधार हवासा वाटतो. आपल्यामागे परमेश्वर आहे ह्यामुळे जरा सावरल्यासारखे वाटते. हे शेवटचे उत्तर मला पटले नाही तरी खरे वाटले. ते भाबडे होते पण निदान त्यात खोटारडेपणा नव्हता. वेळप्रसंगी आधार तर प्रत्येकालाच हवासा वाटतो, मलाही; पण नसलेला परमेश्वर आपल्याला आधार देईल अशी शक्यता नसल्याने कुणी एक वा अनेक व्यक्ती आधाराला जास्त बर्‍या. लोकसंख्येची मुळीच कमतरता नसलेल्या आपल्या देशात आणि जगात वेळेला आधार देणारी एक व्यक्ती आपल्याला मिळू नये का? आणि समजा तीही नाही गावली तरी काल्पनिक आधारावर खरे वेळप्रसंग कसे सोसणार? त्यात वेळ घालवण्यापेक्षा आपणच काहीतरी हातपाय हलवावे. तेही करण्याजोगे नसेल तर दु:खाची कळ सोसावी, आणि गप्प बसावे. एका मानसशास्त्रज्ञाशी याबद्दल बोलणे झाले तेव्हा ते म्हणाले की देव नाही, हे खरे. पण देवकल्पनेमुळे आमचे काम खूप कमी झाले आहे. ते पुढे म्हणाले, सामान्य माणसांना असा काहीतरी काल्पनिक का होईना आधार हवासा वाटतो. तसा मिळाला नसता तर ते आणखी सैरभैर झाले असते. ही केवळ वेदनाहारक उपचारपद्धती, ज्याला पॅलिएटिव्ह थेरपी म्हणतात तशी किंवा स्वत:ला फसवायची ‘थ्री इडियट्स’मधल्यासारखी ‘ऑल इज वेल’ समजायची पद्धत नाही का, असा मला प्रश्न पडला. समाजहिताच्या दृष्टीने देवकल्पना फायदेशीर असल्याचे त्यांनी म्हटले होते… देवाला सगळे दिसते, त्याला कळते, त्यामुळे वाईट वागल्यास देव शिक्षा करेल या कल्पनेने माणसे त्यातल्यात्यात बरे वागण्याचा प्रयत्न करत राहतात; त्यामुळे एकंदरीने समाजाचे नैतिक आरोग्य थोडेफार बरे राहाते, त्यामुळे एकंदर समाजाचा विचार करता देव खरा नसला तरी मानत राहाणे हितकारक आहे… प्रत्यक्षात तर मला नेमकी याच्या उलट परिस्थिती दिसत आली आहे.

कुणाला जाणूनबुजून फसवू नये, त्याची चीजवस्तू हिरावून घेऊ नये, खोटे बोलून कुणाकडून पैसे उकळू नये, कुणाचे नुकसान करू नये म्हणजे बरे वागणे – असे आई देवापुढे हात जोडून म्हणायला शिकवे. फार खोलात न जाता, तेवढे साधेसुधे चांगले वागणे जरी समोर घेतले तरी मला देवाला अभिषेक करा, नारळ फोडा, यज्ञ करा, देवीला दागिने वाहा, ब्राह्मणाला सोन्याचा नाग वाहा, देवळे उभारा म्हणणारे तसेच अमुकतमुकचा जप करा, ध्यान करा, फोटो, अंगठ्या विकत घ्या वगैरे सांगणारे तसे वागताना मुळीच दिसले नाहीत. उलट असे वागणार्‍यांना या देव, पापपुण्य वगैरे कल्पना निखालस खोट्या आहेत हे पक्के माहीत असणार. ते मान्य करणार नाहीत, कारण मान्य केले तर त्यांचा धंदा बुडेल.

हे खरे या काळातले ब्राह्मण आहेत. वर्ण्यव्यवस्थेत ब्राह्मणांचे तत्त्वच असे की वैश्य किंवा विश (म्हणजे सामान्य जनता) हिचे दोहन करावे – दूध काढावे. ज्याप्रमाणे गायी, म्हशी, शेळी, उंट वगैरे प्राण्यांचे दूध आपण तसे काहीही न करता, ते आपल्यासाठी नसूनही केवळ आपल्याला काढता येते म्हणून काढतो तसे सामान्य जनतेचे दूध काढावे, त्यांना लुटावे. या जन्मी तुम्ही मला धनदौलत द्या, म्हणजे मृत्यूनंतर तुम्हाला स्वर्ग मिळेल, तुमची पापे मी यज्ञ करून, पूजा घालून धुऊन देतो. पुत्रकामेष्टी यज्ञ करा म्हणजे मुलगा होईल, मुख्य म्हणजे त्याबदल्यात तुम्ही मला धन द्या असे ते दोहन असे. त्याकाळात विज्ञान मागासलेले होते. सामान्य जनतेला यामागचे वैज्ञानिक सत्य कळणे शक्य नव्हते, म्हणून तसे घडे. पण दुर्दैव असे की ते आजही चालूच आहे. यामधून समाजाचे कुठलेही हित घडत असेल असे म्हणणे माझ्या दृष्टीने साध्या तर्कालाही धरून नाही. असे असूनही लोक या देवकल्पनेला आणि त्यातून निर्माण होणार्‍या अनेक वेडगळ कल्पनांना का फसतात?

विश्वाच्या तुलनेत एका पृथ्वीग्रहावरचे आपण छाडछूड मानवप्राणी आणि आपले ५०-१०० वर्षांचे आयुष्य! यात आपल्या स्वत:च्या दृष्टिकोणाशिवाय तसे फारसे महत्त्वपूर्ण इतर कोणत्याही दिशेने नाही. त्यामुळे स्वत:ला मोठे, महत्त्वाचे मानण्याची किंबहुना तसे सांगत राहण्याची वाईट खोड आपल्याला जडलेली आहे. आपले मोठेपण असे काही नसल्याने इतरांच्या तुलनेत (शेजारी लहान रेषा ओढली की पहिली रेषा मोठी दिसते) हे मोठेपण मिरवण्याला मग पर्याय उरत नाही. हे एकमेव कारण शेवटी आपल्याला या वेडगळपणामागे दिसते. ही बाब केवळ देव-धर्म वगैरेंबाबतची नाही. स्वत:ला बुद्धिप्रामाण्यवादी मानणार्‍या, तशी टिमकी वाजवणार्‍यांबद्दलही आहे. तेही आपल्या अनुयायांसमोर इतका टेंभा मिरवतात की त्यांच्या आणि देव मानणार्‍यांच्या मध्ये काही फरकच नाही असे वाटू लागते. असो. अर्थात सर्वच असे नाहीत आणि कुणा चारदोघांना उद्देशून काही म्हणायचेही नाही. विश्व जसे अनंत–अपार आहे तसे ज्याच्या-त्याच्या डोक्याएवढेही आहे. आपल्याला जेवढे कळते, वळते तेवढेच आपले विश्व.

आपल्या डोक्यात मावणार्‍या किती सुंदर गोष्टी विश्वातही आहेत. तार्किक तरीही भुरळ पाडणार्‍या! आपल्या गरजेतून आपण निर्माण केलेल्या भाषा आहेत, जादू करणारे सूर ऐकू येत आहेत, मनाच्या तळापर्यंत पोचणारे रंग आहेत, शिवाय फार सुंदर अशी एकमेकांबद्दलची आपुलकी आहे, जीव ओवाळून टाकावा अशी प्रेम करायची ताकद आहे. अतिशय लवचीकपणे लवलवणारे शरीर आहे, हाताची दहा बोटे तर इतकी सुंदर कलाकृती निर्मू शकतात की त्या बोटांनाच देव म्हणावेसे वाटते. भवतालला साठवून घेणारे डोळे आहेत. सतत शिकणारी, विचार करणारी बुद्धी आहे आणि सगळ्यांत आश्चर्यकारक आहे ते आपले मन. ते मात्र दुधारी तलवारीसारखे आहे. ते नितळ ठेवायचे तर तर्कदृष्टी स्वच्छ हवीच पण ती एकवेळ जमली नाही तरी भद्रतेची आस हवी. त्याला पर्याय नाही. आपल्याला आवडतील तेवढ्यांनीच या जगात जगायचे असा विचार सर्वांनाच विनाशाकडे नेईल. या जगातल्या लोकांसमवेत जगायचे तर इतरांनाही माझ्याइतकाच जगायचा हक्क आहे हे ध्यानी ठेवावे लागेल. निदान इतर मानवांच्या अस्तित्वाची आपल्याला गरज आहे म्हणून तरी. या सर्वांसह माझा संवाद होईल तसा आणि तेवढा, एकवेळ तांत्रिक मार्गांनी झाला तरी हरकत नाही पण संवाद तांत्रिक नसावा इतकेच.

माझ्या एका शहाण्या मैत्रिणीचे शब्द मला आठवतात. ती म्हणाली होती, “मृत्यूपर्यंत निदान मन स्वच्छपणे स्थिर असावे. त्याशिवाय सोबतच्या सर्वांबद्दल ऋजू वृत्ती आणि शरीरमनाची एकतानता एवढे जमले तर डोक्यावरून पाणी.” मलाही अगदी हेच वाटते. तुम्हाला तिचे म्हणणे पटते का पहा.

अभिप्राय 5

  • .संजिवनी कुळकर्णी यांनी लेखाची मांडणी अतिशय कल्पकतेने केलेली आहे. त्या बद्दल त्यांचे कौतुकच करायला हवे. पण विज्ञाना संबंधी लेखाचा विस्तार करताना त्या मुख्य मुद्याला बगल देण्यात यशस्वी झाल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे जीव स्रुष्टी रासायनिक क्रियेने उत्पन्न झाली. मग H2O म्हणजे पाणी. दोन हा ड्रोजन आणि एक आँक्सिजन आणू एकत्र केले तर जसे पाणी करता येते, तसे कोणत्या रासायनिक आणुंच्या संयोगाने जीव निर्माण होऊ शकतो हो? आहो त्या स्रुष्टी निर्माण करणाय्राने जीवस्रुष्टीचे सातत्य रहावे म्हणून सर्व योजना करून ठेवलेली आहे. त्यानेच निर्माण केलेला DNA वेगळा असतो, त्यामुळेच माणसांचे वेगळे पण आहे. विज्ञानाला त्या DNA मध्ये तरी ढवळाढवळ करता येते काय? पण एक ठीक आहे, आपणच लेखाचा समारोप करताना आपण “या जगातल्या लोकांसमवेत जगायचे तर इतरांनाही माझ्याइतकाच जगण्याचा हक्क आहे हे ध्यानी ठेवावे लागेल” असे म्हणून कळत नकळत नास्तिकांनी आस्तिकाच्या जीवनात लुडबूड करू नये असेही सुचवले आहे. धन्यवाद!

  • > माणसे बुद्धिप्रामाण्यवादी वागू लागल्याने सृष्टीचे म्हणजे समग्र जीवसृष्टीचे काही वेगळे भले होईल की नाही असा विचार मी केलेला नाही.

    माणसे बुद्धिप्रामाण्यवादी वागली तर उपयुक्त जीवसृष्टीचे भले करण्याचा आणि उपद्रवी जीवसृष्टीला नष्ट करण्याचा प्रयत्न करतील. माणसे बुद्धिप्रामाण्यवादी वागली तर ओझोनचे भोक लवकर बुजेल, त्यामुळे समग्र जीवसृष्टीचे भले होऊ शकेल.

    > नास्तिक्याचा तत्त्वज्ञानातला अर्थ वेदप्रामाण्य न मानणे असा आहे.

    संपादक मंडळाने त्या अर्थाने नास्तिक्य हा शब्द वापरलेला नाही. तो अर्थ आता प्रचलित नाही. नास्तिक्य या शब्दाचा प्रचलित अर्थ ‘जडवादी, निधर्मी निरीश्वरवाद’ असा आहे. ‘सर्व पारलौकिक धारणांना नाकारणे’ इतकाच आताच्या नास्तिक्याचा अर्थ आहे.

    > देव हे जीवनातल्या भद्रतेचे दुसरे नाव म्हणून मी मान्य केले

    शब्दाची प्रचलित व्याख्या टाळून काय साध्य होणार आहे? देव या शब्दाचा प्रचलित अर्थ सज्जनपणा आणि आनंदीपणा असा नाही.

    > पात्रांच्या वर्तनाबद्दल आज गळेही काढायचे नसतात किंवा दोषही द्यायचा नसतो.

    पात्रांचे कोणते वर्तन लेखक कौतुकास्पद म्हणून रंगवतो आणि कोणते वर्तन टीकर्ह म्हणून दाखवतो त्यातून त्या लेखकाच्या काळातील समाजाचे मूल्यमापन करता येते, तो दोष पात्राला नसून त्या समाजाच्या कालविपर्यस्त मूल्यांना देता येतो.

    > स्वत:ला बुद्धिप्रामाण्यवादी मानणार्‍या, तशी टिमकी वाजवणार्‍यांबद्दलही आहे. तेही आपल्या अनुयायांसमोर इतका टेंभा मिरवतात की त्यांच्या आणि देव मानणार्‍यांच्या मध्ये काही फरकच नाही

    नास्तिक लोकांना बहुतेकदा आस्तिकांइतकेच डोळे असतात, नास्तिक लोकांना बहुतेकदा आस्तिकांइतकेच कान असतात, नास्तिक लोकांना बहुतेकदा आस्तिकांइतकाच स्वार्थ असतो, नास्तिक लोकांना बहुतेकदा आस्तिकांइतकेच टेंभा मिरवायचा असतो हे शक्य आहेच. नास्तिक्य आणि आस्तिक्यात केवळ ‘पारलौकिक धारणा’ इतकाच फरक आहे. टेंभा मिरविणे न मिरविणे याबाबत त्यांच्यात वाद असेलच असे नाही.

  • Sanjivani Kulkarni, खरंच अप्रतिम सुंदर लेख. कळते पण वळत नाही असे बरेच जण आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने, आपले अथवा स्वकीय जणांचे हीत जपण्यात मग्न आहेत. सध्या बुद्धी प्रामाण्य vadee अल्प मतात आहेत एवढेच. सुधारणा vadee सुजाण व्यक्तीने आपल्या तर्क शक्ती ला स्मरून योग्य त्याचं समर्थन करायलाch हवे. शतशः धन्यवाद.

  • या लेखा संबंधात मी कालच माझी प्रतिक्रिया दिली आहे. एक मुद्दा राहून गेला तो लिहित आहे. या लेखात लेखिकेने त्यांच्या बुध्दीला पटले त्याप्रमाणे जीवन व्यतित केले हे ठीक. पण मनाचा आणि बुध्दीच्या संबंधाबद्दल काही मुद्दे आहेत. बुध्दिचा संबंध मेंदूशी आहे, आणि मन आणि मेंदू जरी आपल्या मस्तकात असले, तरी मेंदूचा मनावर ताबा नसतो, पण मनाचा मेंदूवर ताबा असल्याचे दिसते. त्यामुळे बुध्दीप्रामाण्य नास्तिक्याला आपल्या मनाची मान्यता असेलच असे नाही. आणि देव आणि देवावरील श्रध्दा ही मनावर अवलंबून असते. आपले मन अती चंचल आणि अत्यंत वेगवान आहे. आपण एकाजागी बसलेलो असताना आपले मन शेकडो, हजारो मैलांवरील गोष्टी पहात असते. मनाची ईश्वरावर श्रध्दा असते. त्यामुळे बुध्दीप्रामाण्यवादी नास्तिक असला तरी त्याच्याही मनातच्या खोल कप्यात ईश्वर वसत असतोच. पण तो ते मान्य करत नसावा. पण त्याने अंतरमनाचा शोध घेतला, तर नक्कीच त्याला तसा साक्षात्कार होऊ शकेल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.