स्नेह.
सर्वेपि सुखिन: संतु — म्हणजेच सर्व लोक सुखी व्हावेत ही संकल्पना प्राचीन भारतीय परंपरेत खोलवर रुजलेली आहे. पाश्चिमात्य विचारसरणीत ह्याला समांतर कल्पना “the greatest good for the greatest number” ह्या उपयोगितावादी तत्त्वज्ञानातून व्यक्त झाली आहे.
ह्याच संदर्भात चार्वाक किंवा लोकायत, ह्या प्राचीन भारतीय इहवादी विचारसरणीची आठवण होते. लोकायताचे वैशिष्ट्य असे समजतात की त्यात केवळ प्रत्यक्षच प्रमाण मानले जात असे. त्यामुळे शब्दाधारित वेद, अनुभवता न येणारे परलोक, व देव, ह्या तिघांनाही त्यात फेटाळून लावले होते. ह्या जगात प्रत्यक्ष अनुभवलेलेच खरे, बाकी आत्मा, पुनर्जन्म, परलोक, ह्या साऱ्या केवळ कल्पना. ही त्यांची विचारसरणी विषद करणारे एक वचन प्रसिद्ध आहे,
“यावज्जीवेत् सुखं जीवेत् नास्ति मृत्योरगोचर:। भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:।।
जोवर जीवन आहे तोवर सुखाने जगावे. मृत्यूनंतर अगोचर आत्मा वगैरे काहीही अस्तित्वात राहत नाही. शरीर भस्मीभूत अर्थात् जळून राख झाल्यावर पुनर्जन्म होणार कसा?
त्यांच्या मते ऐहिकसुख हेच अंतिम ध्येय आहे. ह्या दृष्टिकोनाला आक्षेप घेतला जातो, कारण सुखोपभोग हा आपल्याला अत्यंत स्वार्थी विचार वाटतो. आपला दांभिकपणा असा की प्रत्यक्षात मात्र आपण सगळेच “यावज्जीवेत् सुखं जीवेत्” ह्या ध्येयानेच आपापला प्रयत्न करीत असतो.
सुख हे तर व्यक्तिनिष्ठ आहेच. परंतु तसे आपले सगळे अनुभव व्यक्तिनिष्ठच. त्यातील ज्या गोष्टींना सर्वमान्यता प्राप्त होते त्यांना आपण वस्तुस्थितीचा वा वस्तुनिष्ठतेचा दर्जा देतो. प्रश्न असा की, सुखाचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करणे शक्य आहे काय? त्याचे प्रमाण आपण वाढवू शकतो काय?
आधुनिक काळात ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा एक प्रयत्न World Happiness Index द्वारे केला जातो आहे. 2011 पासून सुरू झालेल्या ह्या निर्देशांकात दरवर्षी पुढील सहा निकषांवर देशांचे मूल्यमापन होते: (१) देशांतर्गत प्रति व्यक्ती उत्पन्न (GDP per capita), (२) सामाजिक आधार (social support), (३) निरामय आयुर्मान (healthy life expectancy), (४) जीवनपद्धतीच्या निवडीचे स्वातंत्र्य (freedom to make life choices), (५) औदार्य (generosity) आणि (६) सचोटी वा भ्रष्टाचाराचा अभाव (absence of corruption). ह्या निर्देशांकात 2013ला 156 देशांतून 111 व्या स्थानावर असलेला भारत, 2024 मध्ये 137 देशांतून 126 व्या स्थानावर घसरला आहे. “अच्छे दिन आयेंगे” ह्या आश्वासनाच्या नेमक्या उलट दिशेने.
वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्सचे हे सहा निकष सुखाच्या वास्तविक मूल्यमापनासाठी पर्याप्त आहेत काय? ते आणखीन सर्वंकष करण्यासाठी काय करता येईल? सुख हे इतके बहुआयामी आहे की केवळ आर्थिक संपन्नता वा सामाजिक आधारावर त्याचे अंतिम मूल्यांकन करता येणार नाही. मानसिक आरोग्य, सांस्कृतिक अभिव्यक्ती, सामाजिक विषमता, पर्यावरण ह्यांसारखे इतर अनेक घटकही लक्षात घेणे आवश्यक आहे.
चार्वाकांनी ज्याला सर्वोच्च मान दिला, त्या ऐहिक सुखाची पातळी प्रत्यक्ष वाढवण्यासाठी व्यक्ती, समाज, व शासन ह्या सर्व पातळ्यांवर कोणत्या उपाययोजना करता येतील?
आजचा सुधारकच्या ऑक्टोबरमध्ये प्रकाशित होणाऱ्या अंकामध्ये वरील प्रश्नांवर साधकबाधक चर्चा व्हावी ही अपेक्षा आहे. आपले साहित्य लेख, निबंध, कविता, कथा, रेखाचित्रे, व्यंगचित्रे, ऑडिओ, व्हिडीओ अशा कुठल्याही स्वरूपात २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत aajacha.sudharak@gmail.com अथवा +91 9372204641 वर पोहोचावे ही अपेक्षा. शब्दमर्यादा नाही.
समन्वयक
आजचा सुधारक