आनंदाचा मापदंड : हसरे चेहरे मोजायला मोडक्या पट्ट्या

भारताचा वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्समधला क्रमांक जेव्हा जाहीर होतो, तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया तीन वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलेल्या दिसतात. एक गट मोठ्याने म्हणतो – “हे सगळं खोटं आहे, आपण इतके दुःखी नसतो!” दुसरा गट एका डोळ्याने रडत आणि एका डोळ्याने हसत म्हणतो – “पाहा, पाहा, हेच तर आपल्या रोजच्या वास्तवाचं चित्र आहे.” तिसरा गट मात्र शांतपणे डोकं खाजवत विचारतो – “खरंच हे आकडे सांगतात ते आणि तेवढंच सत्य आहे का? की हा फक्त आकड्यांचा खेळ आहे?” सोशल मीडियावर मीम्स लगेच तयार होतात : गर्दीने गच्च भरलेली लोकल, आणि कॅप्शन – “World Happiness Report, India Edition.”  या गोष्टी हसण्यावारी  नेणं सोपं आहे, पण खरा प्रश्न उरतोच : आनंद नेमका कशात असतो आणि तो मोजायचा कसा?

मोडक्या पट्टीने मोजलेलं सुख
हा इंडेक्स म्हणजे जणू मोडक्या पट्ट्यांनी मोजलेलं सुख. छोटा सर्व्हे, मोठे निष्कर्ष. कोट्यवधी लोकसंख्या असलेल्या देशात काहीशे लोकांच्या काही प्रश्नांच्या उत्तरांवरून संपूर्ण समाजाचं सुख-दुःख ठरवलं जातं.

मुंबईच्या लोकलमध्ये एखाद्या प्रवाशाला जर सर्व्हेकर्त्याने विचारलं, “तुम्ही आनंदी आहात का?” तर त्याचं उत्तर बहुतेक हॉर्नच्या आवाजाइतकंच खडबडीत असेल: “भाऊ, आधी उतरू दे, मग आनंदाबद्दल बोलूया!” चेन्नईजवळच्या छोट्या गावात उकाड्यात वीजकपातीत घामाघूम बसलेल्या कुटुंबाला हाच प्रश्न विचारला, तर त्यांचं उत्तरही “फॅन सुरू करा, मग सांगतो आनंदाबद्दल” असंच असेल.

त्याउलट, फिनलंडमध्ये हा प्रश्न सॉनामध्ये शांतपणे बसलेल्या व्यक्तीला विचारला तर तो स्मित करून “होय, बरं आहे की” म्हणेल. असे अनेक आकडे एकत्र करून अहवाल लिहिणारे ठरवतात – हे राष्ट्र जगातलं सर्वात आनंदी आहे, ते दहावं, ते शंभरावं वगैरे. यावरून लक्षात येतं की हा इंडेक्स आकड्यांचा खेळ आहे, पण जीवनाचा सार नाही. IQ टेस्टप्रमाणेच – आकडे ठळकपणे छापले जातात, पण नेमकं काय मोजलं जातं हे विचारल्यावर सर्वांचेच हात वर होतात.

आरशात दिसणारं सत्य
तरीसुद्धा, अहवाल अगदीच टाकाऊ असतो का? अजिबात नाही. जरी पट्टी मोडकी असली तरी तिने दाखवलेले मोजमाप सत्याच्या जवळपास असतेच. आपल्या समाजातल्या दैनंदिन अडचणी इतक्या ठळक आहेत की आनंदावर विरजण पडतेच.

आरोग्यसेवेची अवस्था अशी की, रुग्णालयात पाऊल टाकायच्या कल्पनेनेच हृदय धडधडायला लागतं. रांगा, धावपळ, धांदल – सगळं एकाच वेळी. गर्दी-गोंगाट-गोंधळ हे आपल्या शहरांचं रोजचं दृश्य झालं आहे. प्रदूषण इतकं की सकाळी सूर्योदयाऐवजी स्मॉग दिसतो. भ्रष्टाचारामुळे छोट्या छोट्या कामांसाठीही “काहीतरी” खर्च करावं लागतं. या सगळ्यामुळे मनावर सतत ताण येतो.

म्हणून अहवालाकडे दुर्लक्ष करणं म्हणजे बाथरूममधला वजनाचा काटा फोडून टाकण्यासारखं आहे. यंत्राच्या मोजमापात थोडी चूक असली तरी वाढलेलं वजन हे सत्यच. त्याचप्रमाणे अहवालात कमतरता असल्या तरी आपण कुठेतरी त्रस्त आहोत हे मान्य करायलाच हवं.

आनंद मोजण्याची निकषांची नाळ
या इंडेक्समध्ये काही ठरावीक घटकांचा विचार केला जातो : दरडोई उत्पन्न, शासकीय विश्वासार्हता, सामाजिक आधार, आरोग्य सेवा, आयुष्यमान, स्वातंत्र्य, आणि उदारता. हे सगळं कागदावर छान दिसतं, पण प्रत्येक देशासाठी सारखेच निकष लागू होतात का हा एक मोठा प्रश्न आहे.

दरडोई उत्पन्नाच्या निकषावर प्रचंड लोकसंख्येमुळे भारतासारखे देश मागेच दिसतील. त्यात पुन्हा संपत्तीचं वाटप असमान. पण उत्पन्न कमी असलं तरी कुटुंबात नात्यांमध्ये मिळणारा आधार कधी कधी इतका मजबूत असतो की तो आकड्यांतून दिसतच नाही. भारतात एखादं मूल आजारी पडलं तर केवळ आई-वडील नाही, तर मावशी, काका, शेजारी, सगळेच धावून येतात. हा सामाजिक आधार ‘सर्व्हे फॉर्म’मध्ये सहज नोंदला जात नाही.

शासकीय विश्वासार्हतेचा विचार केला की स्कॅन्डिनेव्हियन देश सरस ठरतात, कारण तिथे सार्वजनिक सेवा वेळेवर मिळतात. भारतात मात्र शासकीय दारं ठोठावली की लोकं थकून जातात. पण त्याचवेळी लोकांमध्ये “जुगाड” करण्याची, अडचणीतून मार्ग काढण्याची ताकद असते. ती ताकद इंडेक्समध्ये दिसत नाही.

म्हणजेच हे निकष पश्चिमेकडील समाजासाठी जास्त अनुकूल, आणि भारतासारख्या ऑरगॅनिक समाजासाठी जरा अन्यायकारक ठरतात.

धर्म, परलोक आणि वर्तमान
आनंद मिळवण्यासाठी धर्मच एकमेव मार्ग आहे, असं अनेकदा सांगितलं जातं. पण धर्म बहुतेक वेळा परलोकावर भर देतो – “या जन्मात दुःख सहन करा, पुढच्या जन्मात स्वर्ग मिळेल.” हा विचार सद्य जीवनातला भार हलका करण्याऐवजी ओझं वाढवतो.

पण अनेक धर्मांमध्ये काही सार्वत्रिक मूल्यं आहेत – करुणा, दयाळूपणा, अनासक्ती, एकमेकांना मदत करणं. हे घटक खरंच उपयुक्त आहेत, कारण ते आपल्याला आणि आपल्या शेजाऱ्यांना या क्षणात मदत करतात. महत्त्वाचं म्हणजे ही मूल्यं फक्त धर्मात नाहीत; ती अधिक ठळकपणे निरपेक्ष, नास्तिक दृष्टिकोनात दिसतात. “हे आयुष्यच आपलं सर्वस्व आहे, त्यामुळे इथेच एकमेकांसाठी चांगलं करा” – हा दृष्टिकोनच खरं समाधान देतो.

म्हणून धर्माच्या बाहेर जाऊनही, समभाव, अनासक्ती आणि परस्पर करुणा या सगळ्या प्राचीन पण व्यावहारिक गोष्टी आपल्याला सुख देऊ शकतात. परलोकाचं आश्वासन नव्हे, तर वर्तमानकाळातला आधारच मनाला सुखावतो.

भूतान, स्कॅन्डिनेव्हिया आणि आपण
भूतानने जगाला Gross National Happiness ही संकल्पना दिली. तिथे सुख मोजताना केवळ उत्पन्न पाहिलं जात नाही; लोक किती शांत आहेत, निसर्गाशी नातं किती घट्ट आहे, यालाही महत्त्व दिलं जातं. स्कॅन्डिनेव्हियन देशांत आरोग्यसेवा मोफत, शिक्षण उत्तम, आणि सुरक्षितता चांगली – म्हणून ते इंडेक्समध्ये वरती दिसतात.

अमेरिकेत संविधानातच “पर्सूट ऑफ हॅपिनेस” आहे. पण प्रत्यक्षात तिथलं सुख मॉलमधल्या सेलमध्ये किंवा कर्जावर घेतलेल्या गाडीत शोधलं जातं. आनंद मिळतो, पण थोड्याच काळासाठी. मग परत रिकामेपण. सध्याची स्थिती तर विचारायलाच नको.

भारतात मात्र वेगळंच गणित आहे. कुणाला नोकरी लागली की तो म्हणतो, “आता आनंदाचे दिवस आले.” कुणाच्या मुलीचं लग्न झालं की, “सुटलो – आता खरं सुख.” कुणाला शेजाऱ्यापेक्षा मोठं घर असलं की, “हो, मी सुखी आहे.” म्हणजेच सुख बरंचसं तुलनात्मक आणि वेगवेगळ्या टप्प्यांवर अवलंबून असतं.

सुखाची सुरुवात घरातच
“चैरिटी बिगिन्स एट होम” म्हणतात. पण खरं तर भ्रष्टाचारही घरातूनच सुरू होतो. मुलाला व्हिडिओ गेम खेळल्यामुळे गृहपाठ करायला वेळ मिळाला नाही, तर आई-वडील खोट्या दाखल्यावर सही करून देतात. तेवढं छोटं खोटं पुढे मोठं होतं. मोठा झालेला मुलगा ऑफिसात गोड बोलून खोटं बिल पास करतो. आपण मग म्हणतो – “देश बुडतोय!” पण खरं म्हणजे देश बुडायला सुरुवात डायनिंग टेबलवरच झाली होती.

याउलट, जर घराघरात प्रामाणिकपणाची शिकवण दिली, तर त्यातून सुखाची पालवी फुटणार. मुलाला खरेपणा शिकवला, शेजाऱ्याला मदत केली, रुग्णालयात रक्तदान केलं, आपला परिसर स्वच्छ ठेवला – या छोट्या कृतींमधूनच समाजात समाधानाचा सुगंध पसरतो.

गोंगाटात हरवलेला गाभा
आजकाल प्रत्येक उत्सव म्हणजे डेसिबलची स्पर्धा. ढोल-डोल-डीजे, मूर्तीपेक्षा मोठे स्पीकर. गणपतीच्या मिरवणुकीत भक्तीपेक्षा बास जास्त. नवरात्रीत देवीच्या आराधनेपेक्षा राजकीय जाहिराती ठळक दिसतात

हा गोंगाट फक्त कान दुखवत नाही; तो मनाची शांतताही हिरावून घेतो. रुग्णालयातील रुग्ण झोपू शकत नाहीत, परीक्षेला बसलेली मुलं अभ्यास करू शकत नाहीत, वृद्ध लोक डोकं धरून बसतात. धर्माच्या किंवा संस्कृतीच्या नावाखाली आपण आनंदाचाच गाभा गडगडवतो. उत्सव हे एकत्र येण्यासाठी, आनंद साजरा करण्यासाठी असतात; पण आपण त्यांना गोंधळाच्या प्रदर्शनात रूपांतरित केलं आहे. सुख शांततेत असतं; गोंगाटात नाही.

आनंद पुढे ढकलण्याची कला
भारतीयांची एक खासियत आहे – आनंद नेहमी पुढच्या टप्प्यावर शोधणं. मुलगा परीक्षेत पास झाला की म्हणतो- “नोकरी लागली की सुखी होऊ.” नोकरी लागली की – “लग्न झालं की.” लग्न झालं की – “मुलं झाली की.” मुलं झाली की – “नातवंडं आली की.” आयुष्य संपतं, पण आनंद मात्र ‘लवकरच येत आहे’ या पाटीवरच अडकून राहतो. खरं तर आनंद हा पुढच्या टप्प्यावर नाही; तो आत्ताच आहे. पण आपण त्याला नेहमी पुढे ढकलतो, आणि मग स्वतःला कायम प्रतीक्षेत ठेवतो.

सरकारची खरी जबाबदारी
सरकारचं खरं काम म्हणजे लोकांना रोज भेडसावणाऱ्या अडचणी दूर करणं – स्वच्छ पाणी, सुरक्षित रस्ते, विश्वसनीय आरोग्यसेवा, उत्तम शाळा, आणि रोजगाराच्या संधी. ह्यामुळेच लोकांच्या चेहऱ्यावर खरं हसू उमलतं. पण आपल्याकडे बहुतेक वेळा सरकारचा डोळा मतपेट्यावर असतो – धर्माच्या नावाखाली गर्दी जमवणं, सवलतींचे गाजावाजे करणं, मोठमोठे पुतळे उभारणं, किंवा दिखाऊ उत्सवांना निधी ओतणं. हे सगळं लोकांना क्षणिक करमणूक देतं, पण आनंद नाही.

लोकांना खरं सुख हवं असेल तर सरकारने धाडसाने प्राधान्यक्रम बदलायला हवेत. आवाजाच्या राजकारणाऐवजी शांततेकडे लक्ष द्यावं, धार्मिक भावनांमध्ये गुंतण्याऐवजी वैज्ञानिक विचार आणि सामाजिक समानता बळकट करावी, रुग्णालयात कमी किमतीत सेवा आणि औषधं उपलब्ध करावी. खरं सुख म्हणजे सगळीकडे शाळा असणं, शाळेत शिक्षक वेळेवर पोचणं, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर हजर असणं, दिव्यांगांना सुविधा मिळणं, आणि नागरिकांना त्यांच्या हक्काची सेवा मिळणं.

आणि सरकारने हे खरंच करावं असं वाटत असेल, तर नागरिकांनीसुद्धा आपले हक्क बजावणं आवश्यक आहे. फक्त केंद्रातल्या एका चेहऱ्याकडे पाहून नव्हे, तर प्रत्येक पातळीवर मत व्यक्त करून. ग्रामपंचायतीपासून ते संसदपर्यंत – जिथे खरंच काम करणारा, प्रामाणिक उमेदवार दिसतो, तो कोणत्याही पक्षाचा असो, त्यालाच मत दिलं पाहिजे. तेव्हाच लोकांचा आवाज सरकारपर्यंत पोचेल, आणि आनंदाचा खरा पाया रचला जाईल.

खरा बदल भाषणांनी किंवा घोषणांनी होत नाही; तो दैनंदिन सवयींनी होतो. प्रत्येकाने स्वतःच्या घरात एक छोटी शपथ घ्यावी: मी प्रामाणिक राहीन, मुलांना खरेपणा शिकवीन, शेजाऱ्याशी सौजन्याने बोलेन, उत्सवात आवाजाऐवजी आनंद जपेन.

सोशल मीडियावर वाद घालण्यात वेळ वाया घालवण्याऐवजी जर आपण कुटुंबासाठी, मित्रांसाठी काही शांत क्षण राखले, तर त्या छोट्या पावलांनीही मन हलकं होतं. घराघरात सुरू होणारा हा आनंद समाजाला जोडतो.

संयुक्त राष्ट्रांच्या तक्त्यावर आपला क्रमांक कितीही खाली असो, खरा हॅपिनेस इंडेक्स चेहऱ्यावरच्या हास्यात दिसतो. शेजाऱ्याने उन्हाळ्यात चार आंबे दिले, मित्राने दुःखात  डोकं टेकवायला खांदा दिला – हे क्षण जागतिक अहवालात नोंदले जात नाहीत. पण हाच खरा हॅपिनेस इंडेक्स आहे.

जर आपण घराघरात प्रामाणिकपणा वाढवला, उत्सवात गोंगाटाऐवजी शांततेला स्थान दिलं, छोट्या कृतींमध्ये मोठं समाधान शोधलं, आणि प्रत्येक स्तरावर चांगले लोक निवडून आणले, तर क्रमवारी काहीही सांगो, आपला समाज हसरा राहील. आकड्यांच्या तक्त्यात न बसलेलं, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चमकणारं – हेच खरं आनंदाचं मोजमाप आहे.

पुढचं पाऊल
हेही लक्षात ठेवायला हवं की जरी सरासरी आनंदाचा आकडा फारसा वर गेलेला दिसत नसला, तरी जीवनमानात सुधारणा झाली आहे. आज जास्त लोकांना आरोग्यसेवा झटपट मिळू शकते, औषधं पोचतात, माहिती द्यायला-घ्यायला मोबाईल आहे, संवाद साधायला सोशल मीडियापासून ते व्हिडिओ कॉलपर्यंत सुविधा आहेत. या आधुनिक साधनांचा उपयोग आपण खरंच आनंद पसरवण्यासाठी केला, तर एकत्रित समाधान वाढू शकतं.

पण जर कुणाचं सुख दुसऱ्याला दुःखी करण्यात दडलं असेल, तर सरासरी आनंद कधीच उंचावणार नाही. म्हणून एकमेकांना आनंद देऊ या – पण वैज्ञानिक विचार बाजूला ठेवून नव्हे, आणि धार्मिक भेदांवरून नक्कीच नाही. आपल्याला मिळालेल्या या आधुनिक साधनांचा, नव्या कल्पनांचा उपयोग अधिक लोकांचं आयुष्य सुकर करायला करुया. कारण खरा आनंद तोच – जेव्हा आपल्या हास्यामुळे दुसऱ्याच्याही चेहऱ्यावर हास्य उमटतं.

TIFRचे भौतिकशास्त्रज्ञ अशोक सेन यांच्या खोलीत असं काहीसं लिहिलेलं एक पोस्टर लावलेलं होतं: “Have you brought some solution? Or are you part of the problem?” हेच या प्रसंगालाही लागू होतं. जर आपण इतरांना आनंद देण्याचं काम केलं, तर आपल्या आनंदाची काळजी आपसूकच घेतली जाईल. 

अभिप्राय 1

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.