मनोगत

‘सर्वेऽपि सुखिनः सन्तु’मधील सुख ह्या शब्दाची व्याप्ती मोठी, त्यामुळे त्याचे मोजमापही अवघड. greatest good मध्ये ‘सुख’ ह्या शब्दाची छटा आहे. अधिकाधिक लोकांचे अधिकाधिक भले व्हावे, अर्थात अधिकाधिक लोक सुखी असावेत, हा तो भाव. 

पण, ‘सर्वेऽपि’चा भाव greatest number मध्ये येऊ शकत नाही, त्यामुळे हे उद्दिष्ट बहुसंख्याकवादात अडकण्याची शक्यता जास्त. तसेच ह्यात सार्वकालिक भाव नसल्याने त्यात शाश्वत सुख अभिप्रेत आहे, की तात्कालिक, हादेखील संभ्रम. 

जे असेल ते असो. दोन्हीं उद्दिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावयाचा म्हटले तर आधी सुख म्हणजे नेमके काय असते ते निश्चित करावे लागेल. बरेचदा सुख हे आनंदाच्या समानार्थी म्हणून वापरले जाते, परंतु ह्या संदर्भात ते त्याहून व्यापक, आणि दीर्घकालीन अर्थाने वापरले आहे. इंग्रजीतील happiness शब्द आनंदाच्या जवळचा. मला आज आनंद झाला म्हणजे मी सुखी झालो, असे होत नाही. आनंद जसा ‘होतो’ किंवा ‘जाणवतो’ तसे ह्या संदर्भातले सुख मला ‘होत’ नाही. हे सुख ‘जाणवण्यात’ नाही, तर ‘मानण्यात’ आहे. “मी सुखी आहे का?” ह्या प्रश्नाच्या उत्तरादाखल मी केवळ माझ्याबद्दलचं माझं मत व्यक्त करत असतो. ते मत वस्तुस्थितीवर आधारितच असेल असे नाही. वस्तुस्थिती अत्यंत अनुकूल असली तरीही माणूस सुखी असेलच असे नाही. आणि परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असली तरीही तो दुःखीच असेल असे नाही.

सुखप्राप्तीचे मार्ग हे आंतरिक समाधानात सापडतात, बाह्य मानके इथे कामाची नाहीत. 

परंतु तरीही, कोण सुखी आहे आणि कोण नाही, हे सामाजिक दृष्टीतूनही बघितले जात असते. दरिद्री, भुकेकंगाल माणूस कितीही उच्चरवाने “मी सुखी आहे” असे सांगत असला तरीही इतर लोक त्यावर विश्वास ठेवणार नाहीत. आणि श्रीमंत, सुखवस्तू माणूस, दुःखाचे इतर कोणतेही दृश्य कारण नसताना “मी दुःखी आहे” असे म्हणत असेल तर त्यावरही विश्वास ठेवणार नाहीत. सुख कशात आहे हे जसे व्यक्ती ठरवते तसेच समाजमनही ठरवत असते. आणि, त्यानुसार सुख कशात आहे, ह्याचे समाजाद्वारे शिक्षणही दिले जाते. (आणि कोणत्या मार्गाने समाज सुखी होऊ शकेल ह्याच्या आडाख्यावरून त्या त्या समाजातील नीती व्यवस्थाही ठरत असते). समाज आपल्या मनात बिंबवतो ते पर्याय आपल्याला दिसत जातात आणि त्यातच आपण सुख मानतो. उदा. देशासाठी बलिदान देणाऱ्यांचा सन्मान केला जातो, जेणेकरून तसे करण्यातच खरे सुख आहे, असे लोकांचे मत तयार होते, आणि अधिकाधिक लोक तसा त्याग करण्यास उद्युक्त होतात.

चार्वाकांचा मात्र सगळा भर प्रत्यक्ष प्रमाणावर, दृश्य परिस्थितीवरच होता. आनंदाच्या प्रत्यक्ष अनुभवातच सुख निहित असल्याने, आणि सुखाची व्याप्ती तात्कालिक आनंदापेक्षा जास्त असल्याने, असे जास्तीतजास्त अनुभव घेता येण्याची शाश्वती ज्यांना असेल ते सुखी, अशी त्यांची सुखाची व्याख्या असावी.

आनंद आणि वेदना ही जशी नैसर्गिक असतात, तशीच मानवनिर्मितही असतात. त्यामुळे मानवी आनंदनिर्मितीस पोषक वातावरण आणि मानवनिर्मित दुःखाच्या निरसनाची आणि नैसर्गिक दुःख/आपत्ती ह्यांच्या निवारणार्थ न्याय्य व्यवस्था केल्यास; सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय उन्नयनाची समान संधी असल्यास; भीती, दहशत, अनिश्चितता, असुरक्षितता, विषमता ह्यांचे निर्मूलन केल्यास; सुखात भर टाकता येऊ शकते. अश्या प्रकारची सुखाची शाश्वती संघटित प्रयत्नांतूनच देता येऊ शकते. कुटुंब, जात, धर्म, देश, ह्यांच्याद्वारेच ती दिली जाऊ शकते. जे समाज, धर्म, देश, ती प्रत्यक्षात आणू शकतात ते प्रगती करतात. जे धर्म, देश, ती प्रत्यक्षात आणू शकत नाहीत, त्यांना पारलौकिक/काल्पनिक सुखाचा आधार घेण्याखेरीज गत्यंतर नसते. अशा धर्मांतून, देशांतून, धर्मांतर, स्थलांतर होऊ लागते, आणि ते ही शक्य न झाल्यास आत्महत्या होऊ लागतात. मग ‘अच्छे दिन आएंगे’ची कितीही ग्वाही दिली तरीही!

समन्वयक,
आजचा सुधारक

अभिप्राय 5

  • या अंकातले सगळे लेख वाचनीय आहेत, आणि विचार करायला लावणारे आहेत.

  • चार्वाकचिंतनास समर्पित अंकाचे स्वागत.
    आभार आणि शुभेच्छा.

  • सुख हे व्यक्तिनिष्ठ असल्याने त्याची ‘उद्गामी’ व्याख्या करण्यात अनंत अडचणी आहेत. त्यापेक्षा सुखाची ‘निगामी’ व्याख्या करण्यात यावी. प्रत्येक व्यक्ती, तिला जे सुखकर होतील असे ती समजते, असेच पर्याय निवडते ह्याबाबत दुमत नसावे. मग तिला मरणही का ‘बरे’ वाटेना! त्यामुळे हवा तो पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य म्हणजेच सुख, अशी सुखाची व्याख्या फारशी वावगी ठरणार नाही.
    प्रत्येक व्यक्तीला निरनिराळे, ज्यात सामायिक हित अंतर्भूत असेल असेच, पर्याय उपलब्ध करून देण्याची आणि ज्या मार्गाने सामायिक हित साध्य होईल तो मार्ग/नीती ठरवण्याची जबाबदारी मात्र सगळ्यांची!

  • धन्यवाद! का पण कोणजाणे पण या महिन्यात प्रकाशित झालेला अंक मला आज आठ दिवसा नंतर मिळाला. असो. मनोगत वाचले. खरे आहे सुख म्हणजे काय असते, या प्रश्नाचे उत्तर हे व्यक्तिनिठच असते. एकाला ज्या गोष्टित सुख वाटेल त्या गोष्टित दुसय्राला ते वाटेलच असे नाही. आपल्या मनोगतात आपण म्हटले आहे की, पैशाने गरीब माणूस सुखी असू शकत नाही व पैशाने व सर्व सुविधांनी युक्त माणूस तो कितीही बोलला तरी दु:खी असू शकत नाही. पण हे बरोबर नाही असे मला वाटते. कारण पैसा व सर्व सुखसोयी हे सुखाचे कारण असू शकत नाही. एकवेळ ते आनंदाचे कारण असू शकेल, पण सुखाचे नाही. उदाहरणार्थ एखाद्या कोट्याधिशाला जर संतान नसेल तर तो मनात दु:खीच असतो. उलट पक्षी पैशाने गरीब असलेला माणूस जर मनाने समाधानी असेल तर आहे त्या परिस्थितीत तो सुखी असतो. तात्पर्य समाधनी असणे हेच सुखाचे उगमस्थान आहे. आणि विचारी माणसच समाधानी आणि पर्यायाने सुखी असतात. श्रीस्वामी समर्थ विचारतात ” जगी सर्व सूखी असा कोण आहे? आणि दुसय्राच चरणात त्या प्रश्नाचे उत्तर देतात ” विचारी मना तूच, शोधून पाहे “. समर्थ म्हणतात विचारी माणूसच सर्व सूखी असतो. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडली तर माणसाला आनंद होतो. पण तो क्षणिक असतो. त्यामुळे आनंद म्हणजे सूख नसते हेही समजणे आवश्यक आहे.

  • मी आताच मनोगतावर माझे विचार पाठवले आहेत त्यात शेवटच्या परिच्छेदात श्रीस्वामी समर्थ असे लिहिले आहे, तेथे श्रीसमर्थ रामदासस्वामी असे वाचावे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.