अतार्किक बोलण्यातून किंवा कृतीतून विनोद निर्माण होत असतो. असंबद्ध बोलणे, कृती करणे, हे विनोदनिर्मितीतील प्रमुख तंत्र आहे. आपण दररोजच्या धकाधकीच्या धबडग्यात विनोद निर्माण करून थोडा विसावा शोधत असतो. व्यक्तीला कामाच्या ताणतणावात तेवढाच विरंगुळा आणि त्यातून आनंद मिळत असतो. कला, सांस्कृतिक कार्यक्रमांतून होणारी आनंदनिर्मिती मनाला स्वस्थता आणि शांतता मिळवून देते. ह्याच आनंदाचा, सुखाचा निरंतर शोध पुढे नकळत काही गोष्टी घडवून आणत असतो. आनंद ह्याचा अर्थ नेहमी काहीही विचार न करणे, दु:ख विसरणे होय. दु:ख अगदी समोर दिसत असतानाही आनंद घेण्याच्या प्रक्रियेत, त्याचा विसर पडू लागतो. मात्र हा आनंद अल्पकाळच टिकतो. अनेकदा आनंद वा सुख मिळवण्याची लालसा ही मृगजळासारखी असते. कारण, मनासारखे, हवे ते मिळाले नाही की, भ्रमनिरास होतो आणि अल्पकाळाचा आनंद आपल्या दु:खाचे कारण बनतो. ज्याप्रमाणे मृगजळातून सुख मिळवण्याची मनोकामना वास्तवाचे भान राहू देत नाही, त्याप्रमाणे आनंददायी वाटणारे, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाद्वारे (एआय) निर्मित डिजिटल जग वास्तवाला विसरण्यास कारणीभूत ठरते काय?
आपण एआयच्या युगात प्रवेश केलेला आहे. मानवी जीवन कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने व्यापले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ताधिष्ठित समाज कशा पद्धतीचा निर्माण होईल, ह्याबाबत जी कल्पना केली जात होती, ती आता काही प्रमाणात स्पष्ट होऊ लागली आहे. ‘लार्ज लँग्वजे लर्निंगवर’ आधारीत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाल्यापासून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. आर्टिफिशिअल जनरल इंटेलिजन्स (एजीआय) किंवा सुपर इंटेलिजन्सचे संशोधन अस्तित्वात येण्यापूर्वीची ही एक पायरी आहे. एजीआयची निर्मिती झाल्यानंतर काही प्रमाणात हे तंत्रज्ञान मानवाच्या जैविक बुद्धीची जागा व्यापणार आहे. ह्याला मानवाच्या जैविक बुद्धीला पर्याय निर्माण करणारे तंत्रज्ञान असे म्हणू शकतो. ते अद्याप अस्तित्वात आले नसले तरी ते होणारच नाही आणि त्यापासून मानवाला धोका नाही, असे समजणे बाळबोधपणाशिवाय दुसरे काहीही म्हणता येणार नाही, असे मला वाटते. विज्ञानात ‘अशक्य’ हा शब्द प्रमाण मानला जात नाही. अॅलन ट्युरिंग ह्यांनी चाईल्ड मशीनचे सूत्र मांडले, तेव्हा त्यांनी त्या तंत्रज्ञानाला कविता (सॉनेट) करता येते की नाही, हे सांगण्यापेक्षा त्याबाबत हे तंत्रज्ञान विचार करू शकते का? हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे, असे मानले होते. एजीआय आल्यानंतर संपूर्ण मानवजात अडगळीत जाईल, असे होणार नाही. हे जरी खरे असले तरी एजीआयमुळे फायद्यापेक्षा नुकसान कमी होईल, किंवा सदुपयोगापेक्षा दुरुपयोग कमी होईल, असे मानण्यास जागा नाही. ह्यामधील ह्या दोन्हीं टोकाच्या भूमिका आहेत. विज्ञानात असे कधी घडत नाही. एक प्रयोग यशस्वी झाल्यानंतर, त्यावरील दुसरा पुढचा प्रयोग सुरू होत असतो. त्यामुळे एजीआयमुळे मानवाचे होणारे नुकसान टाळण्याकरिता ह्या तंत्रज्ञानाला नियंत्रणात ठेवणारे किंवा हे मशीन सुरू झाल्यानंतर ते टोकाला जाण्यापूर्वीच त्याला थांबविणार्या तंत्रज्ञानाचे संशोधन सुरू करण्यात आले आहे. हे संशोधन पूर्ण होईपर्यंत एआयचे पितामह समजले जाणारे डॉ. जेफ्री हिंटन, तसेच त्यांच्यापूर्वी प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ दिवंगत स्टीफन हॉकिंग ह्यांच्यासारख्या मान्यवरांनी एआयच्या दुष्परिणामाबाबत जनजागृतीचा मार्ग अवलंबिला आहे.
मागील काही दिवसांपासून ‘सैयारा’ ह्या हिंदी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्या चित्रपटातील एक जुने गाणे, ‘सैयारा तु तो बदला नही हैं…मौसम जरासा रुठा हुआ है’, हे संगीतकार अंशुमन शर्मा आणि लोकप्रिय आरजे किसना ह्यांनी एआयच्या मदतीने सन्माननीय गायक किशोर कुमार ह्यांच्या आवाजात व लकबीमध्ये पुनर्निर्मित केले आहे. किशोर कुमार ह्यांचा आवाज आणि त्यांच्या शैलीमधील गाण्याने जेन-झी वेडी झाली आहे. तीन वर्षांपूर्वी संगीतकार ए. आर. रहमान ह्यांनी एआयच्या मदतीने सदाबहार गायक मोहम्मद रफी ह्यांच्या आवाजात चित्रपटासाठी एक गीत तयार करणार असल्याची घोषणा केली होती. किशोर कुमार किंवा मोहम्मद रफी हे आता ह्या जगात नाहीत, त्यामुळे त्यांच्या आवाजाचा उपयोग करण्याबाबत आक्षेप घेण्यात आलेला नाही. प्रसिद्ध बॉलिवूड गायक अरिजीत सिंग ह्यांच्या आवाजाचे एक अॅप बाजारात उपलब्ध झाले होते. अरिजीत सिंग ह्यांचा आवाज, लकब व शैलीची हुबेहुब नक्कल करून एआय अॅपच्या सहाय्याने अरिजीत सिंग ह्यांच्या आवाजात नवीन गीत तयार करण्याचे टूल इंटरनेटवर उपलब्ध झाले होते. त्यामुळे कलाजगतातील त्यांच्या अस्तित्वावरच अतिक्रमण झाले होते. त्याविरोधात त्यांनी ई-कॉमर्स कंपन्या आणि इंटरनेटआधारित एआय अॅप्लिकेशन कंपन्या, आदि ३७ कंपन्या, मंच, व व्यक्तींविरोधात मुंबई उच्चन्यायालयात धाव घेतली. त्यावर उच्चन्यायालयाने अरिजीत सिंग ह्यांच्या बाजूने, आवाज व शैलीची चोरी करण्यास प्रतिबंध करणारा अंतरिम आदेश दिला आहे. त्यावरून एआयचा दुरुपयोग होणार नाही, असे समजणे चुकीचे असल्याचे आढळून येत आहे.
आधुनिक जगात, एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि डिजिटल माध्यमांमुळे, साहित्य, कला, कविता, चित्रपट, कथा, हे सर्वकाही पूर्वीपेक्षा निराळे झाले आहे. आता, तो ‘गायक’, ‘संगीतकार’, ‘कवी’ असो किंवा ‘चित्रकार’, ती वास्तविक व्यक्ती नसली तरी, एआय कला निर्माण करू शकते. मात्र, जर्मन तत्त्वज्ञ थिओडोर अॅडोर्नो ‘द कल्चर इंडस्ट्री’मध्ये ज्या गोष्टीवर टीका करतात, तेच येथे घडत आहे. एआयनिर्मित आवाज, संगीत, चित्र, किंवा कविता, ह्यामध्ये वास्तव, प्रतिमा, आणि कलात्मक कल्पनाशक्तीमधील फरक अस्पष्ट होऊ लागतो.
साहित्य, कविता, गीत, चित्रकला, आणि संगीत, ह्यांसारख्या कलाक्षेत्रांमध्ये मानवी भावना, अनुभव, आणि कल्पनाशक्ती ह्यांचा नेहमीच अनमोल वाटा राहिला आहे. परंतु, २१व्या शतकात, एआय आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या झपाट्याने वाढणाऱ्या वापरामुळे कला व साहित्याचे स्वरूप मोठ्या प्रमाणावर बदलत चालले आहे. आज साहित्य केवळ माणसाच्या अनुभवातून साकारत नाही, तर मशीनद्वारेही तयार केले जाते. आज चॅटजीपीटी, बार्ड, मिडजर्नी, डेल-ई, जेमिनी अंतर्गत नॅनो, बनाना, ह्यांसारखे अॅप्लिकेशन्स साहित्य, कथा, कविता, आणि चित्रे बनवतात. पण त्या निर्मितीमागे मानवी वेदना, जीवनानुभव, किंवा गूढ विचार नसतो. त्यामध्ये केवळ पुरवठा केलेल्या विदेचा वापर व त्यावरील प्रक्रिया असते. त्यामुळे, आजची डिजिटल साहित्यनिर्मिती एक ‘प्रतिमा’ आहे, जी वास्तव असल्याचा भास देते, पण ती भावनिक गाभा नसलेली साहित्यनिर्मिती असते.
अश्या पद्धतीने निर्माण होणार्या डिजिटल वाङमयनिर्मितीचा सौंदर्याशी, सत्याशी, आणि कल्पनाशक्तीशी असलेला संबंध फारसा स्पष्ट राहिलेला नाही. ह्याच मुद्यावर थिओडोर अॅडोर्नो म्हणतात, की ‘कल्पनेची जागा यांत्रिकरीत्या अथक नियंत्रण यंत्रणेने घेतली आहे.’ कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान, कल्पनाशक्तीची जागा घेत आहे. लेखक किंवा कलाकाराला आता कल्पना करण्याची गरज नाही, कारण एआय त्यांच्यासाठी कल्पना ‘आणते’ किंवा कृत्रिमरीत्या ‘तयार’ करते. म्हणजेच, कल्पनाशक्तीची जागा एका यंत्राने घेतली आहे, जे विशिष्ट आणि पूर्वनिर्धारित निकषांनुसार निर्मिती करते. अॅपमध्ये पुरवलेल्या आधीच्या विदेवर आधारित कृत्रिम कल्पनांची निर्मिती होत असते. एआयनिर्मित साहित्य, कथा, व्हीडिओ इतके वास्तवसदृश असतात, की वाचक वा प्रेक्षकाला खरे आणि खोटे ह्यांत फरक करणे कठीण होते. प्रसिद्ध छायाचित्रकार बोरिस एल्डगसेनला वर्ल्ड फोटोग्राफी ऑर्गनायझेशनचा २०२२चा पुरस्कार मिळाला होता. १५ लाख छायाचित्रांतून त्याच्या छायाचित्राची निवड झाली होती. परंतु बोरिसने स्वत: तो पुरस्कार नाकारला. कारण ते छायाचित्र त्याने एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केले होते. आणि हे बोरिसने स्वत:च सांगितले. एक छायाचित्रकार तयार करू शकेल, असे हुबेहुब छायाचित्र एआयने तयार केले होते. तज्ज्ञ परीक्षकदेखील बोरिस एल्डगसेनने स्वत: माहिती देईपर्यंत, स्पर्धेत पाठलेले छायाचित्र एआयच्या मदतीने तयार केले होते, हे ओळखू शकले नव्हते.
एआयनिर्मित साहित्य इतके वास्तवसदृश असते, की लोक खरे-खोटे ओळखू शकत नाहीत. ह्यालाच जर्मन तत्त्वज्ञ मॅक्स हार्कहायमर म्हणतात की, ‘प्रतिमा वास्तवात विलीन होते’. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी टेलिप्रॉम्पटरचा उपयोग करून भाषण देत असतात. लोकांना वाटते, पंतप्रधान मोदी स्वत:चे विचार मांडत आहेत. हे टेलिप्रॉम्पटर बंद पडले होते, तेव्हा मोदी ह्यांच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता, हे आपण सर्वांनीच बघितले आहे.
चॅटजीपीटी मालिका, बार्ड, बिंग, हे लार्ज लँग्वजे लर्निंगवर आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आहे. त्यात भाषेला गणिताची जोड देण्यात आलेली आहे. त्यातून मानवाने विकसित केलेली भाषा काही प्रमाणात यंत्राला अवगत होत आहे. मानवाने स्वकष्टाने भाषेची निर्मिती केली आहे. जंगलात राहत असताना त्याने इशार्यावरून भाषा विकसित केली. ही भाषा आणि विचारनिर्मिती मानवाशिवाय दुसरा कोणताही प्राणी करू शकलेला नाही. ही किमया एआययुक्त यंत्र वा उपकरण करू लागले आहे. गणिताची गती मानवी विचारक्षमतेपेक्षा अधिक आहे. यंत्र २४ तास विचार करू शकते, मानवाला ते शक्य नाही. आणि मानवी मेंदू जागृत राहून गणिताच्या गतीने २४ तास कार्य करू शकत नाही. एआयच्या सहाय्याने कविता, लेख, छायाचित्र, संगीत आदि कलाकृती अव्याहत तयार केल्या जातात. त्याकरिता एआय अॅपला मानवाकडून विदा पुरवठा केला जातो. तसेच त्या अॅपवर तयार होणार्या सर्वच कलाकृती, व्यवहाराची विदा एआय कंपन्यांच्या सर्व्हरमध्ये जमा होत जाते. त्या सर्व्हरमधील विदेवर मूळ निर्मात्याची मालकी राहत नाही. एआयने तुम्हाला कविता, कलाकृती निर्मितीचा व सृजनाचा आनंद दिला, तरी ती कलाकृती त्या कंपनीच्या गिग इकॉनॉमीची उर्जा असते.
एआय टूलमुळे निर्माण होणारे सर्वच भाषांमधील साहित्य, कलाकृती, ही भांडवली अर्थव्यवस्थेचा भाग आहेत. फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्टाग्राम, एक्स, आदिंवर लोकांनी लेखन केल्यानंतर निर्माण होणार्या विदेच्या भरवशावर कॉर्पोरेट कंपन्या व्यापारउद्योग करतात. ह्या कंपन्या त्या डेटावर नफा कमावतात. चॅटजीपीटीवर तयार केलेली कविता एक उत्पादन असते. एआयनिर्मित थ्रिलर कादंबर्या, रोमँटिक पुस्तके, कविता सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहेत. एआयच्या मदतीने ब्लॉग/निबंध लिहिले जात आहेत. डिजिटल माध्यमांवर मानवी सर्जनशीलतेतून आलेल्या कलेची संख्या कमी आणि एआयनिर्मिती जास्त होत आहे. साहित्य आता ‘कल्पनांनी बनलेली वस्तू’ नाही, तर ‘डिजिटल उत्पादन’ आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) किंवा डिजिटल उपकरणांद्वारे तयार केलेल्या वस्तू ‘कला’ असल्याचे भासते. परंतु, त्या प्रामुख्याने विक्री, प्रचार, किंवा वापरासाठी असतात. म्हणजेच, त्या बाजारपेठेतील वस्तू बनतात. त्यामध्ये सर्जनशीलतेपेक्षा कार्यक्षमतेला प्राधान्य दिले जाते. जेव्हा एआय तंत्रज्ञान चित्रे, कथा, आणि कविता तयार करते, तेव्हा ते मानवी भावनेऐवजी आकडेवारी आणि नियमांवर आधारित असते. म्हणून, ती तयार केलेली कविता किंवा चित्र हे एक प्रकारचे ‘तांत्रिक सौंदर्य’ असते.
आजची लोकप्रिय कला (मास आर्ट) ही वास्तवाची नक्कल करणारी एक यांत्रिक प्रक्रिया बनली आहे. त्यामध्ये जाहिरात, विपणन, आणि मनोरंजन केंद्रस्थानी आहेत. आपल्याला ही गोष्ट चित्रपटांवरून अधिक लवकर लक्षात येते. भारतातील लोकांनी अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात बायोपिक चित्रपटांची निर्मिती पाहिली आहे. ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘संजू’, ‘पीएम नरेंद्र मोदी’, ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘छावा’ ह्या चित्रपटांमध्ये, वास्तविक लोकांच्या कथा थोड्या नाट्यमयतेने घेतल्या आहेत. हे वास्तवाचे ‘परिष्कृत रूप’ आहे. हे प्रेक्षकांमध्ये आदर, करुणा किंवा अभिमान निर्माण करते; परंतु अनेकदा कठोर, अस्वस्थ वास्तव लपवते. ‘संजू’ हा चित्रपट अभिनेता संजय दत्तच्या वादग्रस्त जीवनाचे चित्रण काहीसे ‘पुनर्वसन कथा’ म्हणून करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतो. ‘पीएम नरेंद्र मोदी’, ‘छावा’, ‘काश्मीर फाईल्स’ हे चित्रपट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा सेट करणारे प्रोपगंडा चित्रपट होतात. मात्र, प्रेक्षकांना त्यातील वास्तव लक्षात आले नाही. ह्याप्रकारे ही कला, वास्तवाची नक्कल सादर करून विशिष्ट अजेंडा राबविणारी एक विचारसरणी बनत चालली आहे. ‘प्रतिमा’ आणि ‘वास्तव’ ह्यांच्यातील रेषा जाणूनबुजून अस्पष्ट करून सत्ताधारी पक्षाकरिता प्रोपगंडा करणे आणि चित्रपट विकून प्रेक्षकांच्या खिशातून कोट्यवधी रुपये काढणे असे दोन्हीं उद्देश येथे यशस्वी झाले आहेत. ‘पीएम नरेंद्र मोदी’ ह्या चित्रपटातून संबंधित नेत्याचे प्रतिमासंवर्धन करणे अधिक महत्त्वाचे झाले आहे. कलाकृती एक ‘पूर्ण उत्पादन’ बनली आहे.
निसर्गाकडून मानवाला जे प्राप्त झाले, त्यावर प्रक्रिया करून जे तयार होते, ती संस्कृती होय. प्रत्येक भागातील जनसमूहांची संस्कृती वेगळी असते. नैसर्गिक वारसा, विशिष्ट भूप्रदेश, जीवनशैली, भाषा, विचारसणी, कलाकृती, साहित्य आणि भारतासंदर्भात धर्म-जात ह्या गोष्टींच्या समान धाग्यातून संस्कृतीचा आविष्कार होत असतो. त्यामध्ये लोकसंस्कृती आणि उच्च संस्कृती असे विभाजन दिसून येते. आजच्या काळात, संपूर्ण लोकसंस्कृतीने ‘न्यू वर्ल्ड’ची जागा घेतली आहे. समाजमाध्यमांवरील रील्स, शॉर्ट्स हे त्या नवीन लोकसंस्कृतीची आवृत्ती आहे. आजच्या काळात प्रत्येक गोष्टीत, अगदी युद्धातही, एक प्रकारचे बनावट सौंदर्य (कवित्व) तयार केले जाते. ह्या कलात्मक सादरीकरणामागे मोठी भांडवल गुंतवणूक आणि एआय, व्हीएफएक्स, ह्यासारखे तंत्रज्ञान असते. ह्या बनावट सौंदर्याला आपण कला समजतो. पण त्यामागे एक सामाजिक नियंत्रणाचा प्रकार असतो. ह्या सामाजिक नियंत्रणाच्या भिंती तोडण्याचे काम आता यू-ट्युबवर स्वतंत्र निर्माते करू लागले आहेत. मुक्त पत्रकार, सामाजिक टीकाकार त्याच सांस्कृतिक उद्योग प्लॅटफॉर्मचा वापर करून मुख्य प्रवाहातील प्रोपगंडाला आव्हान देऊ लागले आहेत, हीच थोडी जमेची बाजू.
लेखक सोशिओटेक्नॉलॉजी आणि तंत्रतत्त्वज्ञानाचे अभ्यासक असून त्यांनी लिहिलेले ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल युग : तंत्रज्ञानाची प्रबळ सत्ता’ (खंड पहिला) आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल युग : सहमतीची हुकूमशाही’ (खंड दुसरा) हे दोन ग्रंथ लोकवाङमय गृह, मुंबईने नुकतेच प्रकाशित केले आहेत.
मोबाईल- ९४०५३२५०४८