पुस्तक परिचय – अप अगेन्स्ट डार्कनेस

मूळ लेखिका – मेधा देशमुख भास्करन
भाषांतर – फिटे अंधाराचे जाळे – सुनंदा सदाशिव अमरापूरकर 

वेश्यांबद्दल सामान्य माणसाच्या भावना संमिश्र असतात. कुतूहल, घृणा आणि करुणा असे एक रसायन त्याच्या मनात असते. घरांमध्ये वेश्यांचा विषय काढला जात नाही. बायका वेश्यांबद्दल बोलणे टाळतात, पुरुष बोलले तर त्यांचा उल्लेख “रांडा” असे तुच्छतादर्शक करतात. पण एखादा माणूस कुतूहल आणि घृणेच्या पार पलीकडे जातो आणि अथांग करुणेने वेश्यांच्या प्रश्नाला भिडतो. त्याच्या जिद्दीने, परिश्रमाने आणि धैर्याने अनेकजण त्याच्या कार्यात सहभागी होतात आणि तो संस्था उभारून आपल्या कार्याला स्थायी रूप आणतो. त्या विलक्षण व्यक्तीचे नाव गिरीश कुलकर्णी. ह्या गिरीशची आणि त्याच्या कार्याची कहाणी ह्या पुस्तकात सांगितली आहे. 

बरेचदा मोठ्या कार्याची सुरुवात योगायोगाने घडलेल्या एखाद्या छोट्या प्रसंगात असते. गिरीशच्या बाबतीत असेच घडले. एक वेश्या, गिऱ्हाईक जाऊ नये म्हणून आपल्या लहान बाळाला चापट्या मारमारून दूर लोटत होती आणि ते मूल रडत रडत तिला आणखीनच बिलगत होते. हे दृश्य गिरीशने पाहिले. आईला सांगून त्याने त्या बाळाला सायकलवर घेतले आणि चांगले तास दीडतास गमतीदार गोष्टी सांगत फिरवून आणले. लहान मुलांपासून सुरुवात करून आपण ह्या बायकांना मदत करू शकतो, त्यांना दुःखाच्या गर्तेतून वर आणू शकतो, हे गिरीशला समजले. त्याने बायकांची खूप विनवणी केली. पहिल्यांदा त्या बायकांनी त्याला खूप शिव्याशाप दिले, पण शेवटी काही मुले त्याला मिळाली. त्यांना तो मैदानावर नेई, लिहिणे-वाचणे शिकवी, गाणी-गोष्टी सांगे आणि खायला पाव देई. अशी ही पावशाळा सुरू झाली.

काही काळानंतर, एका संध्याकाळी त्या लालबत्ती विभागातून चक्कर मारताना गिरीशने एक भयानक दृश्य पाहिले. एक लहान मुलगी एका वेश्यागृहातून रडत किंचाळत बाहेर आली आणि बोअरवेलकडे धावत गेली. इतक्यात चार दांडगे पुरुष तिच्याकडे आले आणि त्यांनी तिला तिथून लांब ढकलले. ती बिचारी रस्त्यावर पडून विव्हळत राहिली. तिच्याभोवती गर्दी जमली. गिरीश गर्दीत घुसला आणि लोकांना त्याने काय झाले ते विचारले. त्या दिवशी ह्या मुलीला ताप असल्यामुळे तिने मालकीणीकडे काम न करण्याची परवानगी मागितली होती. मालकीण चिडली. तिने तिचे पाळलेले गुंड बोलावले. त्यांनी त्या मुलीला जमिनीवर पाडून घट्ट धरून ठेवले. मग त्या मालकिणीने त्या मुलीची चड्डी काढून तिच्या योनीमध्ये लाल मिरचीची पूड ठासून भरली. तिने तेथून कसाबसा पळ काढला होता. बिचारीचा जीव पाण्यासाठी कासावीस झाला होता.

गिरीशने त्या गर्दीला जरबेच्या आवाजात बजावले, “मी ह्या मुलीला आत्ता लगेच हॉस्पिटलमध्ये नेणार आहे. ती जर मेली तर तिला मारणाऱ्यावर खुनाचा गुन्हा लागेल. जर कुणाला अडवायचे असेल तर या पुढे, आत्ताच सांगा.” गिरीशचा आवेश बघून ते गुंड पळून गेले. मग त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. ती बरी झाली आणि तिची कुंटणखान्यातून सुटका करण्यात आली. ह्या सर्व प्रसंगी गिरीशने दाखवलेल्या असामान्य करुणाभावाने आणि धैर्यवृत्तीने गिरीशची प्रतिष्ठा आणि लोकप्रियता वाढली. त्याच्या शाळेतील मुलेही आता वाढली होती. गिरीशने त्यांच्यासाठी म्युनिसिपालटीच्या एका ओसाड इमारतीतील एक मोठी खोली मिळवली. त्यात त्याने फायली आणि इतर सामान ठेवले. मुलांच्या राहण्याचा प्रश्न गिरीशच्या वडिलांनी सोडवला. त्यांनी त्यांच्या घरातील एका बाजूच्या साताठ लहान खोल्या त्यांना रहाण्यासाठी दिल्या. त्यांना सांभाळण्यासाठी एचआयव्हीबाधित किंवा टीबी झाल्यामुळे ज्यांना धंदा करता येत नव्हते अशा वेश्यांची नेमणूक केली. ह्याच सुमारास शरद मुठा नावाच्या एका उदार धनिकाने शहरापासून दूर असलेली, एमआयडीसीमधली आपली नापीक, खडकाळ अशी दहा हजार फुटांची जमीन गिरीशला त्याच्या कार्यासाठी दान दिली. अर्थात, ह्या सर्व गोष्टी सुरळीतपणे झाल्या असे अजिबात नाही. प्रत्येक टप्प्यावर त्याला झगडावे लागले, निर्णय घ्यावे लागले, योजना आखाव्या लागल्या आणि त्या कष्टाने आणि प्रामाणिकपणे अंमलात आणाव्या लागल्या.

दान मिळालेल्या जागेवर १९८९ मध्ये काही झोपड्या उभारून गिरीशने स्नेहालय ह्या संस्थेची स्थापना केली. एचआयव्ही आणि एड्स झालेल्या, पळवून आणलेल्या, बलात्कार झालेल्या, गरिबीमुळे गांजलेल्या अशा स्त्रिया, लहान मुले आणि एलजीबीटी समूहातील व्यक्ती ह्यांना मदत करणे आणि सक्षम करणे हे ह्या संस्थेचे उद्दिष्ट आहे. गिरीश आणि त्याचे सहकारी इथे आलेल्या व्यक्तींची सर्वतोपरीने काळजी घेतात. संस्थेची स्थापना झाली त्या काळात एड्स अगदी जोरात होता. दर दिवशी एखाद्या व्यक्तीचा प्राण गेलेला असे किंवा एखादी व्यक्ती शेवटचे आचके देत असे. मेल्यानंतर त्या व्यक्तीचे अंत्यविधीसुद्धा स्नेहालयला करावे लागत. 

१९९६ मध्ये गिरीशची सत्वपरीक्षा पाहणारी एक घटना घडली. बूथ नावाच्या हॉस्पिटलमध्ये टीबी आणि एड्स झालेली एक स्त्री मरणासन्न अवस्थेत आणण्यात आली होती. तिला लघवी आणि शौचाची जराही शुद्ध नव्हती. थोड्याच वेळात संपूर्ण हॉस्पिटल दुर्गंधीने भरून गेले. तेथील डॉक्टरने गिरीशला फोन केला. गिरीश आपले दोन सहकारी आणि एक दोनचाकी हातगाडी घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये आला. सर्व परिसर घाणेरड्या कुबट वासाने भरून गेला होता. एका खोलीतल्या चटईवर ठेवलेल्या त्या स्त्रीच्या अंगावर असंख्य अळ्या वळवळत होत्या. चटईवर रक्ताची लहान लहान थारोळी आणि विष्टेचे छोटे छोटे ढीग होते. ती स्त्री असह्य वेदनांनी जोरजोराने किंचाळत होती. कोणीही माणूस घृणेने भरून जाईल असे ते दृश्य होते. त्या स्त्रीजवळ जायची कोणाची हिंमत होत नव्हती. पण गिरीश पुढे गेला, त्याने त्या स्त्रीला उचलले आणि तिला बाहेर आणून हातगाडीवर ठेवले. त्याच्या चेहऱ्यावर किळस किंवा घृणेचा जराही भाव नव्हता. त्याने तिला आपल्या ऑफिसमध्ये नेऊन टेबलावर अलगद झोपवले आणि तिची शुश्रुषा केली. पण एव्हाना तो असह्य घाणेरडा वास सगळीकडे पसरला होता. लोक घाबरले, चिडले. त्यांनी दगड मारायला सुरुवात केली. शेवटी गिरीशने त्या स्त्रीला पुन्हा हातगाडीवर ठेवून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या नुकत्याच मिळालेल्या एमआयडीसीमधल्या जागेवरच्या झोपडीत आणले. गिरीश आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तिची सर्वतोपरी शुश्रुषा केली. काही आठवड्यांनी त्या स्त्रीचा मृत्यू झाला. 

ही सर्व घटना गिरीशची सत्वपरीक्षा पाहणारी होती. त्यात तो खरा उतरला. त्यामुळे त्याच्या सहकाऱ्यांचा अढळ विश्वास त्याला लाभला. आणखी एक चांगली गोष्ट घडली. प्राजक्ता नावाची मुलगी ह्या गोष्टीला साक्षी होती. तिला गिरीशचे असामान्यत्व भावले आणि काही काळाने ती गिरीशची पत्नी झाली.

प्राजक्ताही गिरीशबरोबर वेश्यांच्या उत्थानासाठी काम करू लागली. प्राजक्ताने काही काळानंतर दोन संस्था स्थापन केल्या. स्त्रियांना फसवून किंवा त्यांचा बळजबरीने उपभोग घेतल्यामुळे जन्मलेल्या बालकांचा प्रश्न फार मोठा असल्याचे तिला अगदी आतून जाणवले. अशा आयांसाठी स्नेहाधार आणि बाळांसाठी स्नेहान्कुर अशा दोन संस्था उभ्या करण्यात आल्या. ह्या बाळांना नंतर दत्तक देण्यात येते. ह्या संस्था उभ्या करण्याअगोदर ह्या विषयाची सर्वांगीण माहिती आणि अभ्यासक्रम प्राजक्ता आणि तिच्या सहकाऱ्यांनी पूर्ण केला होता.

ह्या पुस्तकात स्नेहालयशी जोडल्या गेलेल्या काही वेश्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या हकिगती दिलेल्या आहेत. त्यांच्यावर जे प्रसंग कोसळले ते वाचताना जिवाचा थरकाप होतो. माणूस अधमपणाच्या किती खालच्या पातळीला जाऊ शकतो ह्याचे भयचकित करणारे दर्शन त्यातून घडते. त्यामुळे हे पुस्तक सलग वाचणे फार कठीण आहे आणि नेमक्या ह्याच कारणासाठी ते गरजेचे आहे. 

वेश्याव्यवसाय किती अक्राळविक्राळ आहे? एका अहवालानुसार भारतात तीस लाख वेश्या आहेत आणि त्यापैकी पाच लाख मुली अठरा वर्षांच्या आतील आहेत. (दुसऱ्या एका अहवालानुसार वेश्यांची संख्या दोन कोटी आहे ज्यातील एक कोटी साठ लाख मुली/स्त्रिया पळवून आणलेल्या आहेत.) वेश्यांचे जीवन म्हणजे नरक असतो. काही वर्षांनंतर अनेक रोग होऊन त्यांची शरीरे सडतात आणि शेवटी त्या बेवारस मरून जातात. फसवणूक, दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा ह्या कारणांमुळे वेश्यांचा पुरवठा अखंडित राहतो. ह्या पुस्तकातून ह्या गोष्टी लख्खपणे समोर येतात. 

अतिशय मौलिक असलेल्या ह्या पुस्तकात काही किरकोळ उणिवा जाणवतात. स्नेहालय, स्नेहाधार, स्नेहान्कुर ह्या संस्थांची स्थापना आणि प्रगती, त्यांच्यामधील स्त्रियांची/बालकांची वर्षवार संख्या, निधीसंकलन अशा गोष्टींचा सांख्यीकी तपशील दिला तर अधिक भरीव चित्र उभे राहील. तसेच गिरीश ह्यांचे व्यक्तिमत्व कसे घडले, त्यांच्यावर कोणाचा प्रभाव आहे, त्यांच्या प्रेरणा कोणत्या वगैरे माहिती आवश्यक वाटते. अर्थात ह्या किरकोळ उणिवा आहेत. नरकपुरीतील काळ्याकुट्ट जगाचे आणि त्याविरुद्ध लढणाऱ्या एका असामान्य योद्ध्याचे जीवन समोर आणणाऱ्या मूळ लेखिका मेधा देशमुख भास्करन आणि अनुवादिका सुनंदा सदाशिव अमरापूरकर ह्या कौतुकास पात्र आहेत.

५, जलसान्निध्य, नारायण पुजारी नगर, गफारखान मार्ग, वरळी, मुंबई ४०००१८
मोबाईल : ९९६७७७१९६०
मेल : ajgaonkar.gopal@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.