जावेद अख्तर आणि मुफ्ती शमैल नदवी ह्यांच्यात देवाच्या अस्तित्वाबाबत झालेली चर्चा एका धर्मसमूहातील व्यक्तीशी एक विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक व्यक्ती किती निखळ, सभ्य आणि तर्काधिष्ठित संवाद साधू शकते, ह्याचे उत्तम उदाहरण ठरते.
हा कार्यक्रम आयोजित करणारे, त्याचे मॉडरेटर सौरभ द्विवेदी, कार्यक्रमात सहभागी झालेले मुफ्ती शमैल नदवी, तसेच उपस्थित आमंत्रित वर्ग — ह्या सर्वांचेच अभिनंदन करायला हवे.
जावेद अख्तर आणि मुफ्ती शमैल नदवी ह्यांनी चर्चेचे स्वरूप निखळ आणि संयत ठेवले होते. प्रश्न तर्काचा होता, श्रद्धेचा होता, आणि धर्मव्यवस्थेशी निगडित आस्थेचाही होता. तरीही, त्याला गंभीर किंवा आक्रस्ताळे स्वरूप येऊ न देता चर्चा पुढे नेण्यात आली.
धर्मव्यवस्थेच्या चौकटीतून येणारे प्रश्न असतील, ह्याची जाणीव जावेद अख्तर ह्यांनाही होती. काही प्रश्नांमधून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला; परंतु त्यालाही तितक्याच सक्षमपणे उत्तरे देण्यात आली. तिरकस, हिणकस किंवा धर्मद्वेषात्मक भाषेचा वापर न करता, केवळ तर्काच्या आणि तथ्यांच्या आधारे उत्तरे देत जावेद अख्तर ह्यांनी प्रेक्षकांच्या, तसेच चर्चा ऐकणाऱ्या वर्गाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले.
ही चर्चा, एका ठरावीक धर्मचौकटीत राहून विचार करणाऱ्या वर्गाला हे निश्चितच आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारी ठरली आहे. शतकानुशतके धर्मव्यवस्थेतून घडत आलेल्या समाजासमोर तर्क, तथ्य, सत्य आणि विज्ञान ह्यांच्या आधारावर एक स्वच्छ व स्पष्ट भूमिका मांडणे — ही मोठी जबाबदारी जावेद अख्तर ह्यांनी समर्थपणे पेलली आहे.
नैतिकता आणि निसर्ग ह्याबाबत घेतलेली भूमिका, तसेच मानवी मूल्यांची मानवनिर्मित रचनात्मक मांडणी करताना, प्रत्येक व्यक्तीला विचार करायला भाग पाडणारी माहिती ते देतात. ह्याच प्रक्रियेत कर्मसिद्धांताचा (दैववादी) फोलपणा उघडकीस येतो.
(जावेद अख्तर ह्यांनी तयारी केली नव्हती, असा चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न काही ठिकाणी झाला; मात्र चर्चेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी दिलेली उत्तरे श्रोत्यांचे हे म्हणणे स्पष्टपणे खोडून काढतात.)
प्रत्येक बुद्धिप्रामाण्यवादी व्यक्तीने ही चर्चा पाहिली पाहिजे. धार्मिक व्यक्तीसमूहाशी निखळ चर्चा कशी करता येते, ह्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
कोणत्याही व्यक्तीसमूहाला लेबल न लावता, त्यांच्या विचारांचा आदर राखून, त्यांच्या चुकीच्या समजुती, गृहितकं, तसेच विज्ञान आणि वास्तव ह्यांची जाणीव करून देणे आवश्यक आहे. इथूनच उत्कृष्ट संवादाची सुरुवात होते; कारण बदलांची शक्यता ही चर्चेतूनच विचारांमध्ये प्रवेश करते. ही प्रक्रिया इथून पुढे सुरू राहील.
सर्वच जण जन्मतः एखाद्या धर्म–जात–कुटुंबव्यवस्थेत जन्माला येतात. अनेकांना विज्ञानाच्या क्षमता आणि कक्षा ह्यांचा सखोल अभ्यास करण्याची संधीच मिळत नाही. त्यामुळे काही लोकांना धर्मावर तर्क लावणे चुकीचं वाटते.
ह्याठिकाणी रिचर्ड डॉकिन्सचा उल्लेख करावाच लागेल. तो म्हणतो की, धार्मिक, अज्ञानी व्यक्तींना अविवेकी समजणे किंवा त्यांच्याशी चर्चा करताना त्यांना असमंजस ठरवणे तर्कसुसंगत नाही. त्यांना वैचारिक करणे, त्यांना नवीन विचारांची चालना देणे गरजेचे आहे. हीच बदलांची खरी सुरुवात ठरू शकते.
बदलांच्या सुरुवातीचे उदाहरण उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणाऱ्या चार्ल्स डार्विनच्या जीवनातून देता येईल. डार्विन तरुणपणी ख्रिश्चन विश्वात वाढलेला होता आणि काही काळ पाद्री होण्याचाही विचार करत होता. Beagle ह्या प्रवासाच्या आधीपर्यंत तो ईश्वरावर विश्वास ठेवणारा होता.
प्रकृतीचा सखोल अभ्यास, उत्क्रांतीचा सिद्धांत आणि नैसर्गिक निवडीची प्रक्रिया समजत गेली, तसा ईश्वराने थेट सृष्टी निर्माण केली ही कल्पना त्याला पटेनाशी झाली. ह्याशिवाय निसर्गातील निरर्थक क्रौर्य, आजार, वेदना, बालमृत्यू आणि वैयक्तिक दुःख — विशेषतः मुलीचा मृत्यू — ह्या सगळ्यांनी त्याचा धार्मिक विश्वास ढळला. डार्विन स्वतः म्हणतो, “I am in a muddle.” असो.
कधी कधी माझ्यासारखे लोकसुद्धा केवळ टीकात्मक टीकाटिप्पणी करण्यावर भर देतात. नक्कीच ते बुद्धिप्रामाण्यवादी ठरत नाहीत. अज्ञानावर उपहास करण्यापेक्षा योग्य विचारांकडे प्रेरित करणे अधिक गरजेचे असते.
नास्तिक, विवेक आणि मानवतावाद ह्यावर माझा एक लेख ‘आजचा सुधारक’ ह्या अनियतकालिकात तसेच मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या अंकातही आहे. त्यामध्येही हेच मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
जावेद अख्तर आणि मुफ्ती शमैल नवीद ह्यांच्यामधील चर्चेचे एक मोठे फलित एवढेच आहे की, ज्यांना कट्टरवादी समजले जाते, त्या वर्गाने कोणत्याही अडथळ्याशिवाय, अगदी नम्रपणे चर्चा करून जगाला एक वेगळाच अनुभव दिला.
आज भारतीय प्रजातांत्रिक आणि सार्वभौम देशाच्या संविधानाने दिलेल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा नेमका अर्थ काय असतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अशा संविधानात्मक देशाचा भारतीय नागरिक असल्याचा, आणि संविधाननिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा, मला अभिमान वाटतो. मी बदलांच्या शक्यता स्वीकारतो — माझ्याही आणि इतरांच्याही.
अशा निखळ संवादांची आणि चर्चांची सातत्याने गरज आहे.