पुस्तक परिचय – मढवून ठेवलेल्या समाजव्यवस्थेला सुरुंग लावणारे शरणकुमारांचे ‘अक्करमाशी’

पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव : अक्करमाशी
लेखक : शरणकुमार लिंबाळे
प्रकाशक : दिलिपराज प्रकाशन

आपल्याकडील समाजव्यवस्थेत, कुटुंबव्यवस्थेत सोज्वळतेचे रूप दिसते. ह्या व्यवस्थांमधील परंपरांच्या कप्प्यांमध्ये माणूस जगत असतो. वरून दिसणारी सोज्वळता आतून कितीही पोखरलेली असली, तरी ती दुर्लक्षून दिखाऊपणाचे तेज कायम टिकवून ठेवले जाते. ही नटवी व्यवस्था खिळखिळी कशी झालेली असते ते ‘अक्करमाशी’ ह्या आपल्या आत्मकथनात शरणकुमार लिंबाळेंनी दाखवून दिले आहे. समाजाने ठरविलेल्या नैतिक-अनैतिकतेच्या, शुद्ध-अशुद्धतेच्या मोजपट्ट्या मानवी जीवनात कशा नकली ठरतात हे दाखवून देऊन केवळ माणूस शिल्लक राहतो हे ‘अक्करमाशी’त आपणास पाहायला मिळते. समाज आणि समाजातील कल्पना कश्या सोयीच्या असतात, त्या विषमतेचे विष पेरतात, माणूसच माणसाला हीन समजू लागतो, माणसाचे माणूसपण हिसकावून घेणारी ही माणसे, कदाचित माणसे राहिलेली नसतात. सदर पुस्तकात अशा सगळ्या मुद्द्यांना स्पर्श झाला आहे.

समान जातीचे आईबाप असणे, समाजाने लग्न लावून दिल्यानंतर संतती जन्माला घालणे, लग्न लावून दिलेल्या नवऱ्याबरोबर स्त्रीने एकनिष्ठ राहिलेच पाहिजे, ह्या अपेक्षा समाजाला असतातच. परंतु समाजाने लग्न जरी लावून दिले असले, तरी पुरुषाला स्त्रीशी एकनिष्ठ राहिलेच पाहिजे असे बंधन मात्र नाही. त्याने अनेक स्त्रियांशी संबंध प्रस्थापित करणे, मुले जन्माला घालणे, मान्य असते. मुले जन्माला घालण्याचा त्याला अलिखित अधिकारच जणू असतो. त्या मुलांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी त्याची असतेच असे मात्र अजिबात नाही. समाजातील खालच्या जातीची बाई शरीरसंबंध प्रस्थापित करण्यासाठी चालते. पण तिला घरात आसरा दिला जात नाही. घरातील बायकोप्रमाणे तिला घरात घेतले जात नाही. जातीची बाई ही बायको असते तर दुसऱ्या किंवा खालच्या जातीची, मग ती लग्न झालेली असो, अगर नसो, ती ‘रांड’ म्हणून ठेवली जाते. अशी परंपरा महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून असलेली पहायला मिळते. ही परिस्थिती स्त्री-जातीचे कसे शोषण करते, ह्याची उदाहरणे पुस्तकात जागोजागी सापडतात.

महाराष्ट्रात पाटील परंपरा फार मोठी आहे. पाटील हे गर्भश्रीमंत, जमीनदार, प्रतिष्ठित असतात. त्यांची गावावर हुकूमत चालते. त्यांच्याकडे चाकरी करण्यासाठी खालच्या जातीतील मुबलक नोकरचाकर म्हणण्यापेक्षा गुलाम असतात. त्यांना घरातील हलक्या प्रतीची कामे करण्यापासून, शेतातील कामे, गुरांची, घराची साफसफाई , कष्टाची कामे, करावी लागतात. कष्टाची कामे करणारी ही मंडळी त्यांच्या शेताच्या बाजूला किंवा शेतात पाचटाचे, पालापाचोळ्याचे खोपट घालून राहतात. पुरुष शेतातील, गोठ्यातील कामे करतात. त्यांच्या बायकापोरे शेतातील, तर कधी घरातील साफसफाईची कामे करतात. त्या कामगारांच्या स्त्रियांवर पाटील, जमीनदार, ह्यांचा डोळा असतो. कामगार गुलाम असतो. त्यामुळे त्याची बायकोदेखील त्यांची गुलाम असते. पोटापाण्याचा प्रश्न त्यांच्यापुढे असतोच.

कामगाराच्या कुटुंबावर कर्जाचा बोजा वाढत असतो. कर्जाचा बोजा आणि अडचणींचा फायदा घेऊन त्यांच्या स्त्रियांना कधी जबरदस्तीने, कधी भीती घालून, कधी आमिष दाखवून, खोटे बोलून, त्यांचा उपभोग घेणे ह्यात जमीनदार, पाटील ह्यांची प्रतिष्ठा असते. एकदा त्या स्त्रीचा उपभोग घेतला की पुढे वारंवार धमक्या देऊन उपभोग घेत राहणे, त्यामधून त्या स्त्रीला दिवस गेले तर त्या बाळाची जबाबदारी न घेता तिला मारून टाकणे किंवा पैसे देऊन गर्भ खाली करण्यास लावणे, हे त्यांचे धाडस. नवजात बालकाला जन्माला येण्यापूर्वी त्याचा बळी घेणारे हे जमीनदार. जर त्या स्त्रीने गर्भपात केला नाही किंवा त्या बालकाचा जन्म झाला तर तिची आणि त्या बाळाची जबाबदारी घेणे, तिला सुरक्षा देणे त्यांच्याकडून होत नाही. उलट तिचा छळच केला जातो. तोही दुहेरी! एक समाजाकडून आणि दुसरा ह्या उपभोग घेणाऱ्या पाटील, सावकार, जमीनदार, ह्यांच्याकडून. तिची रांड म्हणून ओळख होते. तिच्या मुलांना अनौरस म्हणजे ‘अक्करमासी’ म्हणून ओळखले जाते. त्या मुलांच्या वाट्याला बाप नसतो आणि आईही नसते. शरणकुमार लिंबाळे लिहितात, “ती माझी आई पाटलाची बाई होती. अर्धी कामाची आणि अर्धी पाटलाची.”

गरती स्त्री आणि बाहेरख्याली स्त्री किंवा रांड स्त्री, असे समाजामध्ये स्त्रियांचे भेद असलेले दिसतात. लिंबाळे ह्यांनी ‘अक्करमाशी’ मध्ये रांडेच्या मुलाची कथा सांगितलेली आहे.

सुवासिनी स्त्री असणे म्हणजे भूषण असा समाजात समज आहे. स्त्रीने पतिव्रता असावे ही केवळ अपेक्षाच नव्हे, आग्रह असतो. त्यामुळे त्या आपल्या सौभाग्याला म्हणजे नवऱ्याला दागिन्यासारखे जपतात. ‘एकवचनी एकपत्नीव्रती’ असावे, ही म्हण जरी पुरुषासाठी असली तरी पुरुषाने एकवचनी राहिलेच पाहिजे असे नाही. किंवा एकवचनी, एकपत्नीव्रती राहिला नाही तरी अशा पुरुषाला फासावर दिल्याचे एकही उदाहरण सापडत नाही. किंवा लग्नापूर्वी पुरुषाचे एखाद्या स्त्रीशी संबंध आहेत म्हणून तो बाटला किंवा भ्रष्ट झाला, त्याचे एकपत्निव्रत भंग झाले, असे होत नाही. समाज त्याला वाळीत टाकत नाही, किंवा टीका, टोमणे मारत नाही. त्याची समाजात अवहेलना होत नाही. उलट तो ताठ मानेने मिरवत राहतो. एक लग्न झालेले असताना एकापेक्षा जास्त स्त्रियांशी संबंध ठेवले किंवा एकापेक्षा जास्त स्त्रियांशी लग्न न करता मुले जन्माला घातली म्हणून त्याची फार मोठी बदनामी होत आहे किंवा त्याला अपमानित जीवन जगावे लागत आहे, असे आढळत नाही. बदनामीमुळे त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली, अशी घटना कुठे घडलेली दिसत नाही. ह्यामागे पुरुषसत्ताक व्यवस्थेने पुरुषांना दिलेले अमर्याद अधिकार आणि स्त्रियांना काचेची वस्तू म्हणून बंदिस्त करून ठेवण्याची प्रवृत्तीच दिसते.

त्यामुळे पुरुषांना त्यांच्या मतानुसार जगता येईल आणि स्त्रीला गुलाम म्हणून ठेवून तिचा उपभोग घेता येईल, ही समाजव्यवस्था असावी. ‘स्त्री ही काचेचे भांडे असते’ ह्या म्हणीनुसार स्त्री बाटू नये, ती शुद्ध राहावी, ती एकाच पुरुषाशी एकनिष्ठ राहावी, असाच समाजाचा एकंदरीत कल असतो. पुरुषाची स्त्रीवर अक्षरशः मालकी असते. तिला तो आपल्या सोयीनुसार वापरतो. पण स्त्रीला ही मुभा नाही. स्त्री काचेचे भांडे, तर पुरुष मात्र लोखंडाचे भांडे असते. त्याला तडा जात नाही, ते भ्रष्ट होत नाही. स्त्रीला काचेचे भांडे ही उपमा देणारा आणि त्याची अंमलबजावणी करणारा हा पुरुषसत्ताक समाज असल्यामुळेच अशी व्यवस्था निर्माण झालेली आहे. पण त्यामुळे स्त्रिच्या आणि तिच्या मुलांच्या वाट्याला आलेले वेदनामय जीवन ‘अक्करमाशी’त वाचायला मिळते. लेखकाने अतिशय प्रांजळ अशी मांडणी केली आहे. भोगलेले दुःखाचे, वेदनेचे प्रसंग स्पष्टपणे आणि निर्भीडपणे सांगितले आहेत. लेखकाने कुणावर टीका केली नाही. कोणाला दोष दिला नाही. ‘अक्करमाशी’ हे एका दृष्टीने पुरुषी मानसिकतेचा जाहीरनामाच आहे.

‘अक्करमाशी’ ही केवळ शरणकुमार, मसामाय, संतामाय, नागी, चंदामाय ह्यांच्याच जीवनाची कहाणी नाही. किंवा शरणकुमार लिंबाळे ह्या एकट्या व्यक्तीच्या जीवनाची कहाणी नाही, तर महाराष्ट्रातील तमाम सावकार, पाटील, जमीनदार ह्यांनी प्रतिष्ठेचे घातलेले बुरखे आणि नैतिक आणि शुद्धतेच्या मोजपट्टयांनी मढवलेल्या समाजव्यवस्थेची कहाणी आहे. ही व्यवस्था आपल्या आत्मकथनात मांडून शरणकुमार लिंबाळे ह्यांनी अख्ख्या समाजव्यवस्थेला सुरुंग लावला आहे.

– सतेज दणाणे, कोल्हापूर, मो.9404761427

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.